स्पर्धा परीक्षांच्या बाजारातली सुगी!
पडघम - सांस्कृतिक
सतीश देशपांडे
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Wed , 30 November 2016
  • स्पर्धा परीक्षा Competitive Exam यूपीएससी UPSC एमपीएससी MPSC

एसटीआय परीक्षेची बराच काळ लांबलेली जाहिरात आल्याचे समजताच गावाकडची मित्रमंडळी शहरात अभ्यासासाठी दाखल झाली आहेत. लगोलग आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचीजाहिरात येईल. पुणे, कोल्हापूर, औरंगाबादसारख्या शहरात आणखी लाखभर तरुण-तरुणी महिनाभरात दाखल होतील. सबंध महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अंदाजेपाच लाख विद्यार्थी गाव सोडून शहरात राहतात. परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे क्लासेस विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे सज्ज झाले आहेत. त्यांच्या जाहिराती चहाच्या टपरीवर, अल्पोपहार सेंटरवर डकवलेल्या आहेत. त्यांपैकी कुणी दोन महिन्यांत यशाची हमी दिली आहे, कुणी आमच्या सराव प्रश्नपत्रिकांमधीलच बहुतांश प्रश्न कसे विचारले जातात, याची मांडणी केली आहे. कॉटबेसिसचे दर आता दोनशे ते पाचशे रुपयांनी वाढले आहेत. बहुतेक वसतिगृहे गच्च भरलेली आहेत. एका वनबीएचके फ्लॅटमध्ये दहा ते बारा विद्यार्थ्यांना घरमालकांनी प्रवेश दिला आहे. खरं म्हणजे विद्यार्थी वसतिगृहात राहतातच कुठे? ते रात्री झोपण्यापुरते येतात आणि सकाळी सातच्या आत बाहेर पडतात. अभ्यासिकांचीही प्रवेश मर्यादा संपत आलेली आहे. नव्या अभ्यासिका उघडल्या जात आहेत. अभ्यासिकेतसुद्धा आता आर्थिक वर्गनिहाय विभागणी झाली आहे. वातानुकुलित, बिगरवातानुकुलित, वायफाय युक्त, साधी अशा वेगवेगळ्या अभ्यासिकांचे वेगवेगळे दर आहेत. अभ्यासिकांची दरमहा फी शंभर रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. गावाकडून आई-वडील, इतर पालक न चुकता दर महिन्याला पैसे पाठवतात. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा बाजार अधिकच तेजीत आहे. परीक्षेसंबंधी पुस्तके छापणाऱ्या प्रकाशकांना मंदी नसतेच कधी, ते सदैव तेजीत असतात. तेजी कमी किंवा जास्त, एवढाच काय तो फरक... तर अशा रीतीने भावी अधिकारी कम परीक्षार्थी नव्या दमाने पुन्हा एकदा अभ्यासाला लागलेले आहेत. त्यांनी स्वत:ला पूर्वीपेक्षा अधिक बंदिस्त करून घेतले आहे.

हे लिहीत असताना महिनाभरापूर्वीचा प्रसंग आठवतोय. परराष्ट्र सेवेतले ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात म्हणाले, “आयएएस ही २५ हजार कोटींची फॅक्टरी झाली आहे. जो तो उठतो आणि आयएएस होण्याच्या मागे लागतो. यामुळे इतर क्षेत्रांकडे दुर्लक्ष झाले आहे.” मुळे यांचे म्हणणे खरे आहे. कारण स्पर्धा परीक्षांच्या दिशेने वाढत जाणारी दिशाहीन गर्दी, ही त्यांच्या म्हणण्याला एका अर्थाने पुष्टी देते. परीक्षा पास होऊन अधिकारी होणे, हे उद्दिष्ट असतानाही या गर्दीला दिशाहीन म्हणावे का, तर होय जरूर म्हणावे. त्याच्या कारणांची वेगळी चर्चा करता येईल, पण या गर्दीपासून अलिप्त राहणारे आणि समान उदिद्ष्टाकडे जाणारेही थोडेबहुत आहेत. त्यांना मात्र गर्दीतलाच एक मानून दुर्लक्षून चालणार नाही. ते चूक ठरेल. अभ्यासू मुला-मुलींसाठी अन्याकारक ठरेल. कारण ही चूक माध्यमांचे अनेक प्रतिनिधी आणि माध्यमांच्या बाहेरचेही लोक करत असतात.

इथे अनेक प्रकारचे विद्यार्थी दिसतात. त्यांचे प्रकारनिहाय वर्णन करता येईल. पहिल्या प्रकारात येणारे विद्यार्थी हे असे आहेत की, ज्यांना खरोखरच पहिल्यापासून अधिकारी व्हावेसे वाटते. अधिकारी होणे हे त्यांचे ध्येय आहे. त्याची त्यांनी पूर्ण माहिती घेतली आहे आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. अभ्यासात त्यांनी मन रमवले आहे. त्यांना योग्य दिशा मिळाली आहे. दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी यापेक्षा एकशे ऐंशीच्या कोनात वेगळे आहेत. म्हणजे दुसरा कोणी तरी व्यक्ती अधिकारी झाल्याचे पाहिले आणि आपल्या हातातले बाजूला ठेवून ते अधिकारी होण्याच्या मागे लागले आहेत. अशा विद्यार्थ्यांपैकी अनेक यशस्वी उदाहरणेही आहेत. काही विद्यार्थी असेही आहेत की, त्यांना ‘स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कर’ म्हणून कुणीतरी सांगितलेले असते. सरकारी नोकरी ही सुरक्षितता वाटते, अधिकारी असणे ग्लॅमरस वाटते म्हणून ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. विश्वास बसणार नाही, पण काही विद्यार्थी-विद्यार्थिनी असेही आहेत की, ज्यांना लग्नापासून एक-दोन वर्षे मोकळीक हवी आहे, म्हणून ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. काहींना घरच्या व्यवसायात वा शेतीत काम करायचा कंटाळा आहे म्हणूनही ते अभ्यासाच्या नावाखाली शहरात येऊन राहिले आहेत. असे असंख्य प्रकारचे लोक स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची संख्या फुगलेली दिसते, गुणवत्ता मात्र अल्प दिसते.

स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ एमपीएससी-युपीएससीतर्फे घेतली जाणारी नव्हे, तर लिपिक पदापासून आयएएस पर्यंत, कॉन्स्टेबलपासून आयपीएसपर्यंत, तंत्र सहायकापासून मंत्रालय सहायकापर्यंत आणि अभियंत्यापासून अधिव्याख्यात्यापर्यंत अनेक पदांसाठी परीक्षा द्याव्या लागतात. पद मिळवण्यासाठी स्पर्धा असते. एकेक गुण भवितव्य ठरवत असतो. त्यासाठी सगळे अट्टाहास करत असतात. स्पर्धा परीक्षेपासून दूर असणाऱ्या बहुतेकांच्या मनात एक प्रश्न नेहमी डोकावत असतो. तो म्हणजे, इतक्या कमी जागा आणि त्यासाठी लाखो अर्ज. मग कशा मिळणार सर्वांना नोकऱ्या? किती मोठी ही स्पर्धा? या प्रश्नाच्या उत्तरासाठी युपीएससीच्या एका अहवालाचा आधार घेऊ या. हा ६५ वा वार्षिक अहवाल युपीएससी ने २०१४-१५ या वर्षासाठी प्रकाशित केला आहे. या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, जेवढे उमेदवार पूर्वपरीक्षेला बसले, त्यांपैकी केवळ पाच टक्के विद्यार्थी (१४,९५९) मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. मुलाखतीसाठी यापैकी केवळ २१ टक्के विद्यार्थी पात्र ठरले. याशिवाय ध्यानात घ्यायची बाब म्हणजे मेरीट लिस्ट २० ते ३५ टक्के या दरम्यान क्लोज होत आहे. याचा अर्थ असा होतो की, इथे संख्येची गर्दी आहे, पण गुणात्मकतेची फारशी स्पर्धा नाही. हवे तेवढ्या गुणवत्तेचे उमेदवार आम्हाला मिळत नाहीत, हे एमपीएससीच्या अध्यक्षांचे मत या साऱ्या पार्श्वभूमीवरील आहे. २०१२-१३ पासूनच्या बदलत्या परीक्षा पद्धतीचा विचार करता, इथे गुणवान विद्यार्थ्यांनाच यश मिळणार हे नक्की. स्पर्धा केवळ पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांमध्ये आहे, उर्वरितांमध्ये नाही. एकूणच काय, तर आकडा फुगलेला आहे, पण पोकळ आहे.

‘युनिक अॅकॅडमी’चे प्रा. प्रवीण चव्हाण सर म्हणतात, ‘मागील दहा वर्षांपूर्वीचे विद्यार्थी ज्या पद्धतीने झोकून देऊन अभ्यास करत होते, तसे झोकून देणारे विद्यार्थी आता दिसत नाही. अजित जोशी, अभिनय कुंभार, मोक्षदा पाटील, रोहिणी भाजीभाकरे यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आता गुणवत्ता ढासळली आहे.’

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक बोल लावला जातो की, हे विद्यार्थी निष्कारण वेळ वाया घालवत आहेत. स्वत:चं वाटोळं करून घेत आहेत. हे म्हणणे काहीसे खरे आहे, पण याची एक वेगळी बाजू ‘द युनिक अॅकॅडमी’चे मानव संसाधन विषयाचे प्राध्यापक अमोल घोडके यांच्याशी चर्चा करताना समजली. त्यांच्या मते, ‘विद्यार्थी जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, तेव्हा ते विज्ञानापासून राज्यशास्त्रापर्यंत अशा विविध विषयांचे वाचन करतात. चालू घडामोडी समजून घेतात. मुलाखतीची तयारी करतात. त्यामुळे विद्यार्थांच्या विचार करण्यात, वागण्यात बदल होतो. ते परीक्षा पास होवोत अथवा न होवोत, त्यांचे व्यक्तिमत्त्व मात्र सुधारते.’ घोडके यांचे म्हणणे सत्य वाटते. कारण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण बोलत आहेत. महाविद्यालयांमध्ये मत मांडणारे विद्यार्थी खूप कमी पाहायला मिळतात. परीक्षेचा अभ्यास करताना काही विद्यार्थी आपली मते तयार करत आहेत, ती मांडत आहेत, हे आयोगाच्या परीक्षांचे यश आहे. एक उदाहरण- त्रिभुवन कुलकर्णी हा ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील विद्यार्थी. त्याने सांगितले, “मी कॉलेजला असताना वर्तमानपत्रं वाचत नव्हतो. अवांतर पुस्तकं वाचत नव्हतो. कॉलेजचाच फक्त अभ्यास करे. आजूबाजूला काय घडतंय याची माहिती नव्हती. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला लागल्यापासून मी चालू घडामोडींच्या अभ्यासावर भर दिला आहे. विविध विषयांवर माझी स्वत:ची मतं तयार केली आहेत. या अभ्यासामुळं मला कॉन्फिडन्स आल्यासारखं वाटतंय.” त्रिभुवन हे एक उदाहरण, पण असे अनेक विद्यार्थी विविध चर्चांमध्ये सहभागी होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल करणारी परीक्षेची तयारी तो परीक्षेत यशस्वी नाही झाला, तरी त्याच्या आयुष्यात उपयोगी पडणारी आहे. पुण्यातल्या चाणक्य मंडलचे अविनाश धर्माधिकारी विद्यार्थांना कार्यकर्ता अधिकारी व्हा, असे सूचवतात. विद्यार्थ्यांना ते सामाजिक कामाची प्रेरणा देतात. ते म्हणतात, ‘अधिकारी म्हणून मला मानसन्मान मिळेल, भरपूर पगार मिळेल असे जर कुणाला वाटत असेल, तर या क्षेत्राकडे वळू नका. कारण पैसे कमवण्याची क्षेत्रं अनेक आहेत. अधिकारी झाल्यावर पैसा, प्रतिष्ठा मिळेलच, पण अधिकाऱ्याने कार्यकर्त्यासारखे काम करणे महत्त्वाचे आहे.’ धर्माधिकारी आपल्या भाषणातून सी. डी. देशमुखांपासून ते अनिकेत मांडवगणे पर्यंतची उदाहरणे देऊन ‘जरी एक अश्रू पुसायास आला...’ हा आदर्श ते समोर ठेवतात.

स्पर्धा परीक्षेत सर्वांनाच यश मिळणार नाही, हे नक्की, पण केलेला अभ्यास कधीही वाया जाणार नाही. कारण या परीक्षांच्या अभ्यासक्रमात अर्थशास्त्र, राज्यशास्र, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, भूगोल, पर्यावरण, इतिहास, अंकगणित, नीतीशास्त्र, संरक्षण, बुद्धिमापन... अशा अनेक विषयांचा समावेश आहे. या सर्वच विषयांची प्राथमिक माहिती असणारा नागरिक सापडणे कठीण. पण या परीक्षांच्या अभ्यासामुळे या सर्व विषयांची किमान प्राथमिक माहिती असणारे विद्यार्थी तयार होतात ही जमेची बाजू आहे.

अर्थात या जमेच्या बाजूला अभ्यासाच्या संकुचिततेची एक झालर आहे. काही अपवाद वगळता बहुतांश विद्यार्थी चाकोरीबद्ध विचारांत अडकले आहेत. त्यांचा अभ्यास केवळ पुस्तकी आहे. घोकंपट्टी करून केलेला अभ्यास त्यांना विचारांच्या व्यापकतेकडे नेत नाही. स्पर्धेत मार्क महत्त्वाचे आहेत, पण मार्कांच्या पलीकडे जाऊन एखादा मुद्दा समजून घ्यायचाच नाही का, हा प्रश्नदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. असे कित्येक विद्यार्थी दिसतील की, ज्यांची संपूर्ण राज्यघटना तोंडपाठ आहे, पण त्यांच्या वागण्यात मात्र समानता, धर्मनिरपेक्षता आढळत नाही. याचे कारण संकुचितपणात आहे. परीक्षा अव्वल क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्येही असे संकुचित विचारांचे विद्यार्थी दिसतील. मध्यंतरी राज्य सेवा परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आलेला विद्यार्थी भाषणात म्हणाला, “परीक्षा पास व्हायचे असेल तर मैत्रिंणींपासून दूर राहायला हवे.” किती हा बुरसटलेला दृष्टिकोन? मैत्रीण ही अभ्यासात अडथळा कशी काय ठरू शकते? उलट कितीतरी मुलींनी आपल्या मित्राला, पतीला अभ्यासात मदत केली आहे. अशीही अनेक उदाहरणे आहेत की, मित्र-मैतत्रण दोघांनी मिळून अभ्यास केलाय आणि ते यशस्वीही झालेत. फेमिनीझम अभ्यासणारे परीक्षार्थी स्त्री-पुरुष समानतेचा अर्थ आचरणात आणायला मात्र सोयीस्करपणे विसरतात.

परीक्षार्थींचे वाचन हाही एक चर्चेचा विषय होऊ शकतो. ठराविक पुस्तकांच्या पलीकडे वाचन करताना फार कोणी दिसत नाही. वेळेची मर्यादा समजू शकतो, पण विषयाचा आवाका येण्याच्या दृष्टीने, आकलन होण्याच्या दृष्टीने संदर्भग्रंथांचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. उदा. प्राचीन इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर रोमिला थापर यांच्या पुस्तकाला डावलून चालणार नाही. राज्यघटनेचा अभ्यास करायचा असेल तर सुभाष कश्यप, उपेंद्र बक्षी यांच्या पुस्तकांचे वाचन व्हायला हवे. पण कुठल्या तरी क्लासच्या शिक्षकांनी तयार केलेले पुस्तक वाचण्यात बहुतांश विद्यार्थी धन्यता मानतात. वर्तमानपत्र वाचनाच्या बाबतीतही असेच घडते. ठराविक एका वृत्तपत्राचे वाचन करायचे आणि त्याचा दृष्टिकोन प्रमाण मानायचा, हा प्रकार अनेक विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो. सत्यासत्यता पडताळून पाहिली जात नाही. इंग्रजी वृत्तपत्र वाचणारे ‘द हिंदू’ आणि त्याखालोखाल ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला अग्रक्रम देताना दिसतात. पण ही दोन वृत्तपत्रे परीक्षाभिमुख पद्धतीने वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना समजतात किती, हा मोठा प्रश्न आहे. मराठी वृत्तपत्रांचे वाचन करणारे बहुतांश लोकसत्ता वाचतात. संपादक अग्रलेखातून जी भूमिका मांडतात तीच भूमिका विद्यार्थी प्रमाण मानताना दिसतात. हे खूप गंभीर आहे. अशाने स्वत:ची विचारसरणी विकसित होणार कशी? खरे तर आपण जे वाचले ते वेगळ्या अंगाने विचार करून पाहिले पाहिजे, पण तसे घडताना दिसत नाही.

स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात अनेक सकारात्मक-नकारात्मक गोष्टी पाहायला मिळतील. ज्या दोन बाजू सर्वच क्षेत्रात आढळतात, त्याला स्पर्धापरीक्षेचे क्षेत्र अपवाद कसे काय ठरू शकते? काही वर्षांपूर्वी अॅग्रीकल्चर कॉलेजचेच विद्यार्थीच या परीक्षेमध्ये यशस्वी होतात, असा एक ट्रेंड निर्माण झाला होता. त्यामुळे अॅग्रीकल्चर कॉलेजलाही डिमांड आली होती. युपीएससी परीक्षेत टेक्निकल फील्डचे विद्यार्थी यशस्वी व्हायचे, पण आता असा कुठलाही ट्रेंड नाही. आयोगाने सर्व ज्ञानशाखांच्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणून ठेवले आहे. ही अर्थातच चांगली गोष्ट आहे.

इथे ताणतणावही प्रचंड जाणवतो. कारण आयुष्यातील महत्त्वाची वर्षे खर्च करून यश नाही मिळाले, तर मानसिकता बिघडणे साहजिक आहे. यावर उपाय काय, हा प्रश्न लातूर येथील स्पर्धा परीक्षा केंद्राचे सचिन जगताप यांना विचारला. ते म्हणाले, “जागा कमी आणि विद्यार्थी ज्यादा, म्हणजे सगळ्यांना यश मिळणार नाही. यशासाठी सर्वांनी जरूर प्रयत्न करावेत, पण त्याचसोबत आपला प्लॅन बी तयार ठेवावा. प्लॅन बी म्हणजे, आपण जर स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलो तर दुसऱ्या क्षेत्रातही आपल्याला चांगल्या पद्धतीने करिअर करता यावे. अन्यथा हाती काहीच आले नाही म्हणून मानसिक संतुलन बिघडण्याची चिन्हे असतात.”

अनेक परीक्षार्थी असे आहेत, ज्यांनी आपला प्लॅन बी तयार ठेवलाय. सुधाकर वाघ (पंढरपूर) याच्याशी चर्चा केली. तो म्हणाला, “मी बीएससी झालोय. मी मागच्या अडीच वर्षांपासून परीक्षेचा अभ्यास करतो, पण यश आले नाही. थोड्या थोडक्या मार्कांत ही परीक्षा मी पास होऊ शकलो नाही. मी आणखी एक वर्ष तयारी करणार आहे. यश मिळेल याची खात्री आहे. पण नाहीच मिळाले तर मी शेती उत्तम पद्धतीने करीन, ग्रामविकासाच्या दृष्टीने प्रयत्न करीन.” सुधाकरचा मित्र निलेश देशपांडे याने शिक्षक होणे हा प्लॅन बी तयार केलाय. धम्मपाल जाधव हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. त्याने पत्रकारितेमध्ये एम.ए. पूर्ण केले आहे. तो म्हणाला, “मी मूळचा हिंगोलीचा. विद्यापीठात चार वर्षांपासून आहे. स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी केली आहे. महिन्याकाठी येणारा खर्च मी स्वत: भागवतो. हा माझा दुसरा प्रयत्न आहे. आणखी एक वेळ परीक्षा देणार. नाहीतर पत्रकारिता करणार. माझ्या अभ्यासाचा फायदा मला पत्रकार म्हणून नक्की होईल.” ज्योती हुंडेकर ही नांदेडची. बीटेक फुड टेकनॉलॉजी शिकलीय. ती दोन वेळा पूर्व परीक्षा पास झाली. तिने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अभ्यास केला. नाही परीक्षा पास झाले तर फुड टेक्नॉलॅाजीमध्ये जॉब करेन, असे तिने सांगितले. मुंबई येथे विक्रीकर निरीक्षक पदी काम करत असलेली पाथर्डी, जि. अहमदनगर येथील अश्विनी फुंदे म्हणाली, “मी तीन वेळा परीक्षा पास झाले. खूप मेहनत घेतली. भरपूर अवांतर वाचन केलं. पुण्यातल्या अनेक वैचारिक कार्यक्रमांना हजेरी लावायचे. सामाजिक चळवळीत सहभागी व्हायचे. सामाजिक चळवळीमुळे आपण परीक्षा पास होऊन गरीब लोकांसाठी काम करावे, ही भावना मनात तयार केली. मी आता वर्ग दोन पदावर कार्यरत आहे. क्लासवन होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.”

सुधाकर, निलेश, धम्मपाल आणि ज्योती हे चौघे प्रतिनिधिक आहेत. असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशन येणार नाही.

स्पर्धा परीक्षा या विषयाची चर्चा करताना एका मुद्याच्या विसर पडू देता कामा नये. तो म्हणजे या वर्तुळाभोवतीचे अर्थकारण. राहण्याची सोय, मेसचा डब्बा, चहा-नाष्टा, अभ्यासिकेची फी आणि इतर किरकोळ खर्च, यासाठी एका विद्यार्थ्याला किमान पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. यामध्ये क्लासची फी, पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रांसाठीचा खर्च वेगळा. एमपीएससी पूर्ण वर्षभरासाठी (इंटिग्रेटेड बॅच) ५० हजार रु. फी आहे. युपीएससी साठी ही फी ७५ हजार ते एक लाखापर्यंत आहे. बाकी पदांच्या कोर्सेसची फी कमीत कमी दहा हजारांपेक्षा अधिक आहे. काही विद्यार्थी एकाच विषयाचा क्लास लावतात. त्यासाठी चार ते सात हजार रुपये फी आकारली जाते. युपीएससीच्या एका विषयासाठी १० ते १५ हजार रुपये फी आहे. उदाहरण म्हणून पुणे शहराचा विचार करूया. इथे विविध परीक्षांच्या अभ्यासासाठी किमान अडीच लाखाहून अधिक विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी वर्षभरासाठी किमान ऐंशी हजार ते एक लाख रुपये पुण्यासारख्या शहरात खर्च करतो. याचा अर्थ अडीच लाख गुणिले एक लाख, हा आकडा काही अब्ज रुपयांच्या घरात जातो. सबंध महाराष्ट्राचा आणि देशभराचा विचार करता विविध स्पर्धा परीक्षांसाठीचा बाजार महाप्रचंड आहे. ज्यावेळी आयटी क्षेत्र जोरात होते, त्यावेळी या बाजारात मंदी होती. २००८ पासून (आर्थिक मंदीनंतर) तेजी सुरू आहे. उद्या मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाले, तिथे नोकऱ्या वाढल्या, तर हा बाजार ओसरेल यात शंका नाही. एका अर्थाने ते चांगले होईल.

 

लेखक ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे सहसंपादक आहेत.

sdeshpande02@gmail.com

Post Comment

bhaskarrao mhaske

Sun , 04 December 2016

great. well done. All the best.


tribhuvan kulkarni

Thu , 01 December 2016

sir tumhi parkhad lihinare v apalya vaktrutvatun mandani karanare mhanun amhala parichit ahatach .....ha lekh vachalya nantar te ajunach sidhh hotey. varil mudde vastavavadi varnan kharokharch amha spardha parikhsha karanarya mulanchya dolyat anjan ghalanarech......sir ajun mahatva purn mudda ha ki Maharashtra gov 90 hajar rikta jaganchi bharatich kadhanar nahi ashi ek batami don mahinyan purvi sarv pramukh Marathi vrutta patranmadhe hoti ....mag ata amhi pan morche kadhayache Kay ....kimbhahuna the nighale pan hote ......


tribhuvan kulkarni

Thu , 01 December 2016

sir tumhi parkhad lihinare v apalya vaktrutvatun mandani karanare mhanun amhala parichit ahatach .....ha lekh vachalya nantar te ajunach sidhh hotey. varil mudde vastavavadi varnan kharokharch amha spardha parikhsha karanarya mulanchya dolyat anjan ghalanarech......sir ajun mahatva purn mudda ha ki Maharashtra gov 90 hajar rikta jaganchi bharatich kadhanar nahi ashi ek batami don mahinyan purvi sarv pramukh Marathi vrutta patranmadhe hoti ....mag ata amhi pan morche kadhayache Kay ....kimbhahuna the nighale pan hote ......


tribhuvan kulkarni

Thu , 01 December 2016

sir tumhi parkhad lihinare v apalya vaktrutvatun mandani karanare mhanun amhala parichit ahatach .....ha lekh vachalya nantar te ajunach sidhh hotey. varil mudde vastavavadi varnan kharokharch amha spardha parikhsha karanarya mulanchya dolyat anjan ghalanarech......sir ajun mahatva purn mudda ha ki Maharashtra gov 90 hajar rikta jaganchi bharatich kadhanar nahi ashi ek batami don mahinyan purvi sarv pramukh Marathi vrutta patranmadhe hoti ....mag ata amhi pan morche kadhayache Kay ....kimbhahuna the nighale pan hote ......


Ashwini Funde

Wed , 30 November 2016

Khup manapasun & abhyaspurn lekhan kele aahe.... anekana bhetun charcha kelyamule attyant vastav lekhan zale aahe..... Spardhakanche prakar, tyanchi mate, Samajik tasech aarthik ganite mandalyane lekh vishesh vachaniy zala aahe.... Aksharnama varil itarahi lekh vachaniy astat.... US election sambadhit lekh aavadle..... "All done best."


Mayur Bhave

Wed , 30 November 2016

सतीश, अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख लिहिलात. स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आणि एकूणच स्पर्धा परीक्षांचे वर्तुळ या परिघाचा हा उत्तम 'रिपोर्ताज' आहे असे म्हणण्यास हरकत नाही. हे वाचून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी भान ठेवून योजना आखाव्या आणि बेभान होऊन त्या पूर्ण कराव्या, ही अपेक्षा...!!