माझा मुस्लीम समाजाच्या शिक्षणाचा प्रवास
पडघम - सांस्कृतिक
वासंती दामले
  • मुस्लीम स्त्रिया
  • Wed , 30 November 2016
  • मुस्लीम समाज मुस्लीम महिला Muslim Women हमीद दलवाई Hamid Dalwai असगर अली इंजीनिअर Asghar Ali Engineer

मुस्लीम समाजाविषयी जाणून घेण्याचा माझा प्रवास सुरू झाला, तेव्हा माझ्या लक्षात आले की, हिंदू घरात जन्म घेणाऱ्या अनेकांप्रमाणे माझे त्या समाजाविषयी ज्ञान शून्य व फार वरवरचे होते. माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेत व विद्यापीठात (इंग्रजी माध्यम) कुणीही सहपाठी मुस्लीम नव्हते. त्यानंतर शिक्षणासाठी मी दिल्लीत, जेएनयूमध्ये दाखल झाले. तिथे मात्र अनेक मित्र-मैत्रिणी मुस्लीम मिळाल्या; पण तेही माझ्यासारखेच. म्हणजे जन्माने मिळालेल्या सांस्कृतिक वारशाचे धनी. सगळेच वसतिगृहात राहणारे असल्यामुळे एकत्र अभ्यास, एकत्र मौजमजा व एकत्र हिरीरीने चर्चा! तशीही चर्चा व चळवळीचे बाळकडू जेएनयूमध्ये पहिल्या वर्षापासूनच आम्हाला मिळायला सुरुवात झाली. तेच तिथले वातावरण होते. त्यामुळे थोडे थोडे मुस्लीम राहणी-खाणे या विषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळाले, पण तेवढेच.

१९७० साली बांगला देशाची चळवळ सुरू झाली, शेख मुजीब तुरुंगात गेले व आमच्या संस्थेत असणारे अनेक बंगाली प्राध्यापक सक्रिय झाले. आम्ही विद्यार्थी मानवाधिकाराच्या बाजूने प्रत्येक चळवळीत होतोच. त्या चळवळीचा भाग म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधींच्या घरासमोर धरणे देऊन बसलो होतो. तेवढ्यात आम्हाला कुणीतरी मराठी लहेजात हिंदी बोलल्याचा आवाज आला. मी हळूच त्या दिशेने नजर टाकली आणि लगेच राजन हर्षेकडे बघितले. त्यानेही माझ्याकडे बघितले. आमची नजरानजर त्या गृहस्थांनीही बघितली व मोठ्याने हसून म्हणाले, '‘हो! हो! मी मराठीच आहे.” आम्ही उठून त्यांच्या जवळ जाऊन बसलो. ते हमीद दलवाई होते. त्या काळी मुस्लीम सत्यशोधक संघटना स्थापून, त्यांच्या कामासाठी ते वारंवार दिल्लीला येत असत व महाराष्ट्र सदनात उतरत असत. त्यांची ‘इंधन’ ही कादंबरी वाचली होती, तसेच त्यांचे लेखही वाचले होते. प्रश्न विचारणे व चर्चा करणे जेएनयूत आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जायचेच. दलवाईंचे दिल्लीतील काम संध्याकाळी लवकर आटपायचे व आमचे वसतिगृह जवळच होते. महाराष्ट्र सदनात जेवायची सोयही नव्हती. शिवाय ते आलेले आम्हाला आवडायचेही. यामुळे ते दिल्लीला असले की, संध्याकाळी त्यांनी जेवायला यायचे व आम्ही सगळ्या मराठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती गोळा होऊन गप्पा मारायच्या, हे नित्याचे झाले. आमचे इतर मित्र कुरकुरायचे, “अरे वो एक मराठा आता है और सारे मराठे इकठ्ठा हो जाते है.”

त्या वेळी त्यांनी आम्हाला त्यांच्या चळवळीविषयी, इस्लामविषयी, खऱ्या इस्लाममध्ये असणाऱ्या तरतुदींविषयी सांगितले. ते अभ्यासू होते व मुस्लीम समाजाविषयी त्यांना आत्यंतिक कळकळ वाटायची. तो त्यांच्या राजकारणाचा भाग नव्हता, तर त्यांच्या समाजसुधारणेचा वसा होता. आम्ही चौकस होतो, उत्सुक होतो व ते इस्लामचा पूर्ण अभ्यास करूनच समाज सुधारायला बाहेर पडले होते. त्यांनी कुराण, हादीस, निकाहनामा, तलाकनामा, मेहेर इत्यादींवर आम्हाला जी माहिती दिली, ती आमची मुसलमान समाज समजून घेण्याची सुरुवात होती. त्या वेळी त्यांनी जे सांगितले, त्यापेक्षा वेगळे असे आजवर मी काहीही ऐकले वा वाचले नाही. पुढील वाटचालीत या माहितीत भर पडत गेली. त्यांच्या प्रत्येक भेटीत आम्ही त्यांचे अनुभव ऐकण्यास उत्सुक असायचो. 'तलाक मुक्ती मोर्च्या'च्या वेळी सय्यदभाईदेखील त्यांच्याबरोबर आले होते. त्यांच्या तोंडून तळागाळातील मराठी मुस्लीम समाजाविषयी ऐकताना समृद्ध झाल्यासारखे वाटले. त्यानंतर दोन वर्षांसाठी मी परदेशी गेले व परत आले तोवर हमीदभाई आजारी पडले होते व लवकरच त्यांचा मृत्यू झाला. इतक्या अभ्यासू व कळकळीने काम करणाऱ्या माणसाचा अकाली मृत्यू चळवळीची हानी करतोच!

नोकरीसाठी मुंबईला आल्यावर, रमला बक्सामुसा या बोहरी मैत्रिणीमुळे असगरअली इंजिनिअर यांच्या कामाची व त्यांच्या लिखाणाची ओळख झाली. रमला बोहरी चळवळीविषयी खूप सांगायची. तिच्या भेंडीबाजारातील घरी आम्ही अनेकदा गेलो व राहिलो आहोत. तिची मते स्पष्ट व परखड होती; विचार करण्याची पद्धत तर्कनिष्ठ होती. त्यामुळे भेंडीबाजारात राहणाऱ्या विविध जातीसमूहांना ‘मुस्लीम’ म्हणून न ओळखता, केरळी, ‘भय्ये’, कानडी वगैरे समज येऊ लागली. असगरअली तर त्यांच्या अभ्यासूपणाने व उत्तम वर्क्तृत्वाने विद्यापीठाच्या अनेक चर्चासत्रांमध्ये आवश्यक वक्ते होते. पुढे तर माझ्या मैत्रिणीने त्यांच्या मुलाशी, इरफानशी विवाह केल्याने त्या कुटुंबाशी माझी जवळीक वाढली; परंतु त्याआधी शहनाज शेखने माझ्या आयुष्यात प्रवेश केला होता. ‘मुस्लीम वैयक्तिक कायदा व तलाक हे माझ्या मुलभूत हक्कांशी विसंगत आहे’, असा तिने सर्वोच्च न्यायालयात १९८३मध्ये दावा दाखल केला. तिच्याविषयी मी प्रथम वर्तमानपत्रात वाचले. आमच्या फोरम या गटाने तिला शोधून काढली व ती आमच्या गटात येऊ लागली. समाजापासून व कुटुंबापासून दुरावलेल्या शहनाझला स्त्री-चळवळीतील मैत्रिणींचा आधार मिळाला. अनेक तऱ्हेचे मानसिक त्रास व कष्ट सहन करीत ती एकटी जीवन कंठित होती. तलाक झाल्यावर तिने तिच्या आई-वडलांशी संपर्क साधला नव्हता, कारण या सर्व समाजव्यवस्थेविषयीच तिच्या मनात रोष निर्माण झाला होता. कॉलेमध्ये प्राध्यापक असणारा तिचा नवरा तिला पारंपरिक पद्धतीनेच वागवत होता. या वागणुकीला विरोध करताच 'शिक्षण फक्त पैसे कमावण्याचे साधन' म्हणून घेतल्याचे व त्याचा व जीवनाचा काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले. 'माहेरी परत गेल्यास, घरचे लोक परत दुसरे लग्न जमवण्याची खटपट करतील व आपले आयुष्य परत त्याच मार्गाने जाईल', या भीतीमुळे ती परत घरी गेली नव्हती. स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या प्रयत्नात तिला आलेल्या अनुभवांमुळे अनेक संकटे मुस्लीम स्त्रीसमोर असतात, याची जाणीव आम्हाला झाली. ती आमच्या चळवळीत येईपर्यंत एकही मुस्लीम स्त्री चळवळीत नव्हती व कुठल्याही माणसाला 'तुझ्या समाजात हे वाईट आहे, तर हे बदल' असे सांगितलेले आवडत नाही, याचा आम्हाला कायमच अनुभव येत होता. “हमारेमे ऐसाही होता है.” या म्हणण्यात 'तुम्हाला काय माहित!' असा एक आंतरिक सूर ऐकू येतो. विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थिनींना 'अभ्यास करा, स्वत:च्या पायावर उभे रहा', एवढेच फक्त सांगायची. त्यांचा माझ्यावर विश्वास बसला की मग त्यांना मुस्लीम वैयक्तिक कायदा, त्यांचे हक्क या विषयी माहिती पुरवायची (अभ्यासक्रमात नसूनही), मग गप्पा मारताना त्यांचे आयुष्य, बुरखा या विषयी माझी मते स्पष्टपणे मांडायची. त्यांच्यामुळे मला त्या समाजात होणाऱ्या बदलाविषयी कळायचे उदा. बाबरी मशिदीनंतर शिक्षिका असणाऱ्या मुलींची मागणी समाजात वाढली. हेही कळाले की कुठलाही समाज स्थितीशील नसतो. परिस्थितीची गरज त्याला पुढे ढकलत असतेच, पण चळवळ त्याला वेग देते. बऱ्याच मुली इंग्रजी माध्यमातील व उर्दू माध्यमातील असल्या ,तरी अंगात मेहनत करण्याची इच्छा असणाऱ्या होत्या. अनेकींचे वडील टक्सी-चालक, अंडीविक्रेतेही होते, पण त्यांच्यात शिकण्याची जिद्द मोठी होती. या मुलींनी मला मुंबईत असणाऱ्या विविध मुस्लीम समाजांविषयी खूप शिकवले. त्यांना ९२-९३च्या दंगलीनंतर त्यांच्या समाजाच्या वस्तीमध्ये राहणे सुरक्षित वाटत असले, तरी त्याचमुळे त्यांना मनासारखे जगणेही अशक्य वाटत असल्याची जाणही आली. वडलांपेक्षा आईला त्यांच्या शिक्षणाचे महत्त्व जास्त वाटते. एका आईने मला सांगितले की, ‘माझ्या मुलीने खुर्चीवर बसून नोकरी करावी असे मला वाटते.’

शहनाजने स्त्रीमुक्तीची संकल्पना झपाट्याने आत्मसात केली. मुस्लीम स्त्रियांच्यात काम करण्याची तिची तिलाच निकड वाटू लागली. तिच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामुळे देशभर तिचे नाव गाजले होतेच. ती इतके मोठे धाडस करू शकली, कारण तिचे विचार स्वतंत्र होते व तिच्यात धडाडी होती. तसेच तिला स्त्री- संघटनांची साथ मिळाली होती. तरुण वयात तलाक मिळालेल्या मुलींना एकत्र करून तिने आवाज-ए-निस्वा (स्त्रियांचा आवाज) ही स्त्री-संघटना सुरू केली. या काळात तिचा आमच्याशी संवाद सतत चालू असायचा. ती स्वत:ही गरीब वस्तीत वाढली असली, तरी मिश्र समाजात वाढली होती व आई-आजीच्या दूरदृष्टीमुळे इंग्रजी माध्यमात शिकली होती. स्त्रियांसाठी काम करायचे ठरवल्यावर काही दिवसांनी तिला भेंडीबाजारात राहायला जायची गरज वाटली. ते अनुभव तिच्यासाठीही नवीन होते. अनेक नवर्‍यांनी त्यागलेल्या बायकांशी तिचा संपर्क आला. त्यांचे शिक्षण कमी होते, त्यांना बाहेर नोकरीला जाण्याची मुभा नव्हती; परंतु माहेरावर ओझे बनून राहायचे नाही म्हणून त्या जुने कपडे उसवायचे काम करत. त्याला ‘तुरपायी’ करणे म्हणत. तिच्या बोलावण्यावरून मीही एकदा आवाज-ए-निस्वांच्या एका बैठकीला गेले. तिथे मला अनेक तरुण त्यक्ता भेटल्या; खूपच लहान असूनही माता झालेल्या होत्या. त्यांना शिक्षण न देता त्यांचे लग्न करून दिल्याबद्दल एकीच्या आईला रागवू लागले, तर रडकुंडीला येत ती म्हणाली, “मै तो बहुत कह रही थी!” तेव्हा लक्षात आले की, 'लग्न' हे बहुसंख्य मुलींचे एकमेव लक्ष असल्याने त्यांच्या घरात अभ्यासाचे वातावरण कमीच असते.

मुलगी सुंदर होती. का सोडले म्हणून विचारले तर म्हणाली, “अरबांच्या बरोबर नंगी फोटो काढायला सांगत होता. 'ते तुला काही करणार नाहीत' म्हणाला, पण मला लाज वाटत होती. मी नाही म्हणाले”. हे सर्व एक मुलगा झाल्यावर सुरू झाले. मुलाला आजी-आजोबांनी ठेऊन घेतले. नवऱ्याने खूप समजावल्यावरही ती तयार झाली नाही म्हणून तिला सोडले. मला पुढे कुणालाही समजवण्याचे धैर्य झाले नाही. ज्याची मेहर छोटी होती, त्यांना ती लगेच मिळाली होती, पण कच्छी मेमन समाजात मेहेर मोठी असल्याने त्या मुलीला असेच सोडून दिले होते. कारण तो दुसरे लग्न करू शकत होता. मला डाक्तर रखमाबाईंची गोष्ट आठवली. अशा अनेक मुली व स्त्रिया आणि त्यांच्या असंख्य कहाण्या! त्यांचे कोर्टातले दावे लढताना संघटनांची मदत व्हायची. त्या स्त्रियाही शहनाजबरोबर मोर्चांना, निदर्शनांना यायच्या. त्यांना ते सर्व आवडायचेही; पण शहाबानू केस झाल्यावर मुस्लीम वैयक्तिक कायद्यातील बदलाने पहिला घाव घातला. पिडीत स्त्रियांची प्रतिक्रिया अतिशय तीव्र होती. हा बदल शरियाप्रमाणे असल्याचे समजवायचा शहनाजने प्रयत्न केला. त्यावर, “शरिया घाल त्या मुल्लाच्या....” ही त्यांची प्रतिक्रिया होती. कारण त्यांचा जगण्याचा आधारच गेला. बऱ्याच वेळा छोटीशी मेहरची रक्कमही माफ करून घेतलेली असायची. बाबरी मशिदीचा विध्वंस व आनुषंगिक दंगलींमुळे संघटनेवर दुसरा घाव घातला गेला. मुंबईभर दंगली चालू होत्या. भेंडीबाजारात तर गोंधळ चालू होता. कारण थोड्याशा संशयावरूनही मुस्लीम तरुण मुलांना पकडून पोलीस ठाण्यावर नेऊन बदडले जात होते. शहनाज आम्हाला नंतर सांगत होती की, एरवी कितीही तक्रार केली, तरी “घरका मामला” म्हणून काहीही न करणारे पोलीस थोड्याशा तक्रारीवर पुरुषांना पकडून त्यांना जबरदस्त मारहाण करू लागले होते. आमची चळवळ पुरुषप्रधान संस्कृतीविरुद्ध होती, पण पुरुषविरोधी कधीच नव्हती. त्यामुळे आवाजे-निस्वांसमोर पेच असा पडला की, 'पुरुषांविरुद्ध तक्रार करावी व त्यांना मारहाणीला तोंड द्यावे लागावे का निर्दोष मुस्लीम पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांचे रक्षण करावे!' एकाच वेळी हा पुरुष कुणाचा भाऊ, बाप, नवरा वा शेजारी असायचा. या सगळ्या गोंधळात संघटना तुटली. शहनाज सर्व सोडून, विपश्यना करायला इगतपुरीला निघून गेली.

काही वर्षांनी हसीनाने आवाज-ए-निस्वां पुनरुज्जीवित केली. आता ती जोरात चालू आहे. त्यात येणाऱ्या मुली आता फक्त तलाकपिडीत नाहीत. तरीही मुस्लीम लोकसंख्येच्या मानाने संघटना लहानच आहे. कारण शिक्षणाचे प्रमाण कमी, स्पर्धात्मक युगात लागणारी मानसिकता नाही व समाजाविरुद्ध जाण्याची भीती या गोष्टी फक्त मुस्लीम स्त्रीचेच नाही, तर पुरुषाचेही पाय मागे ओढतात.साम्य शोधण्यासाठी, १९व्या-२०व्या शतकातील मराठी समाजाच्या स्त्रीप्रश्नाचा इतिहास आठवून पाहावा. स्वातंत्र्यापासून राजकारणासाठी मुल्ला-मौलवींना साथ देणारे आपले सरकार प्रश्न जास्त जटिल करत आहे. त्याचबरोबर हिंदू कोडबिलाच्या विरुद्ध जमा केलेल्या हिंदू स्त्रियांचा मोर्चा आठवावा. म्हणजे मौलवी जमा करत असलेल्या स्त्रियांचे इंगित कळेल.

मला सुशिक्षित करणाऱ्या हमीद दलवाई, असगरअली इंजिनिअर, शहनाज शेख किंवा हल्ली काही मुस्लीम समाजावर लिहायची वेळ आल्यावर बरोबर-चूक याची शहानिशा करायला ज्यांना मी फोन करते, ते अब्दुल कादर मुकादम, या सगळ्यांचा कुराण व हादिसचा अभ्यास चांगला आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, एकाच वेळी त्रिवार तलाक मुस्लीम धर्माविरुद्ध आहे. पैगंबरांनी याला 'हराम' ठरवले होते. तोंडी तलाक एक-एक महिन्याच्या अंतराने व दोन साक्षीदारांसमोर, तसेच तलाक देण्याची कारणे देऊन द्यायचा असतो. आज एकाच वेळी फोनवर किंवा पत्राने होणारा तलाक धर्मसंमत नाही. या सगळ्यांनी मला माझ्याच समाजाच्या एका हिश्श्याबद्दल माहीतगार केले, याबद्दल मी आभारी आहे. कधीकधी सगळे ऐकून त्रास झाला, तरी हा प्रवास मला माणूस म्हणून समृद्ध करून गेला व म्हणूनच तो तो त्या अर्थाने माझ्यासाठी आनंददायीही होता. 

लेखिका निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com