‘काला’ आणि ‘ब्लॅक पँथर’ला मिळून ‘काला पँथर’ बनण्याची नितांत गरज आहे
पडघम - देशकारण
पवन नंदकिशोर गंगावणे
  • ‘काला’मधील रजनीकांत आणि ‘ब्लॅक पँथर’मधील Chadwick Boseman
  • Mon , 18 June 2018
  • पडघम देशकारण ब्लॅक पँथर Black Panther काला Kaala दलित पँथर Dalit Panther डॉ. बाबासाहेब आंबेडकर B. R. Ambedkar शाहू-फुले-आंबेडकर Shahu Phule and Ambedkar दलित चळवळ Dalit Movement

‘ब्लॅक पँथर’मधल्या वडील टचाकाच्या मृत्यूनंतर राजपुत्र टचालाला वकांडाच्या राजगादीवर विराजमान व्हावे लागते. वकांडा, पूर्व आफ्रिकेत दडलेला एक मायावी देश आहे. तिथं वायब्रेनियम नावाचा एक दुर्मीळ धातू मिळतो. त्यात बऱ्याच चमत्कारी क्षमता आहेत. या वायब्रेनियममुळे वकांडामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं की, आज रोजी त्यांच्याकडे अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, जी आपण पाहिलीच काय, तिचा विचारसुद्धा केला नाहीये. या वायब्रेनियमच्या हव्यासापोटी इतर देशांनी वकांडावर आक्रमण करू नये म्हणून वायब्रेनियमचं अस्तित्वच नाही असं दाखवून, एका संरक्षक थराखाली वकांडा बाकी जगापासून लपून राहतो आणि वरून बघितल्यास जंगलांनी भरलेल्या एखाद्या मागास देशासारखाच भासतो.

भारतही तसं पाहता वकांडासारखाच आहे, पण उलट्या पद्धतीनं. भारत वरून पाहता एक प्रगतीशील देशासारखा दिसतो. ‘इंडिया’ नावाचा. पण या ‘इंडिया’ नावाच्या संरक्षक थरास पार करून खऱ्या ‘भारता’त शिरल्यास त्याचा खरा मागासलेला चेहरा दिसतो, ज्याच्या नसानसात जातीभेद भरलेला आहे… जिथून ‘मनुस्मृती’ ही वस्तूस्वरूपातुन लुप्त झाली, पण लोकांच्या मनात आजही जिवंत आहे.

जातीवादाविरुद्ध वाचा फोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली. शतकानुशतकं कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं घेऊन फिरणाऱ्या दलितांच्या हाती त्यांनी लेखणी देऊन त्यांचं कल्याण घडवलं. बाबासाहेबानंतरही आंबेडकरी चळवळ चालू राहिली, पण तिचं स्वरूप बदलत गेलं, तर परिणाम निवळत गेला.

वकांडात मूळ पाच गट होते, जे आपापल्या कबिल्यांवर राज्य करतात. १९५६ साली बाबासाहेबांनी सुरू केलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’चे पडत पडत ५० पेक्षा जास्त गट पडले. पुढे २००९ साली प्रकाश आंबेडकर यांचा ‘भारतीय रिपब्लिकन पार्टी’ (भारिप बहुजन महासंघ) वगळता सर्व रिपब्लिकन पक्षांनी सोबत येऊन ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (युनायटेड) हा पक्ष सुरू केला, पण लवकरच त्यातूनही ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (गवई) तसेच ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ (ए) असे गट पडले. आता हे सगळे गट आपापल्या राजासह स्वतःचं राज्य सांभाळतात, अगदी वकांडाच्या कबिल्यांप्रमाणे.

कृष्णवर्णीयांना त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेमुळे नेहमीच अपमान सहन करावा लागलाय. हक्क मारले जाण्यापासून तर गुलामगिरीपर्यंत. १७व्या शतकापासून या समुदायानं खूप सोसलंय. दलितांची व्यथाही काहीशी अशीच. ‘मनुस्मृती’पासून उदयास आलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेनं दलितांना अस्पृश्य बनवलं. या समाजाला अतोनात हाल, अपेष्ठा, अपमान सहन करावे लागले. त्यांच्या कल्याणाला शाहू-फुले-आंबेडकरांसारखी माणसं पुढे आली, तर कृष्णवर्णीयांसाठी अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांनी अथक प्रयत्न केले. समाजातील एक छोटासा हिस्सा आरक्षणाचा फायदा घेऊन शिकला, लायक बनला. बाकी बहुतांश समाज मात्र आजही मागासच आहे. त्यांच्यासाठी रोज दोन वेळा जेवण मिळेल का हाच मोठा प्रश्न असतो त्यामुळे दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षण घेणं, ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे.

प्रगत झालेला समाज कदाचित टचाला आहे आणि आजही हाल अपेष्ठा सोसणारा समाज किलमाँगर. टचाला पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात यशस्वी झालाय, पण त्याच्या गटात असेही बरेच आहेत, जे समाजालाच विसरून गेलेत आणि स्व-कल्याणालाच धर्म समजू लागलेत.  किलमाँगर वकांडात परततो, तो एकाच ध्येयानं. वायब्रेनियमच्या मदतीनं हत्यारं बनवून ते आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या हाती देण्यासाठी, जेणेकरून ते त्यांच्यासोबत होणाऱ्या अपमानाचा बदला घेऊ शकतील आणि बरोबरीचं आयुष्य व्यतीत करू शकतील.

काळ लोटत गेला, तसा जातिभेदाचा चेहराही बदलत राहिला आहे. आता जातीवाद नियोजनबद्ध पद्धतीनं केला जातो, पोलीस व प्रशासनाला हाताशी घेऊन. भर रस्त्यावर दलित तरुणाची हत्या करणं, सगळ्या गावानं मिळून दलित तरुणीवर बलात्कार करणं, ‘रामायणा’चे प्रयोग चालू असताना दलितांना घरातून बाहेर निघण्यास मज्जाव करणं, तर थाटामाटात लग्नाची वरात काढल्याबद्दल दलितांच्या विहिरीत विष कालवणं, सवर्णीयांच्या विहिरीत पोहायला गेले म्हणून नग्न करून मारहाण करणं, गावातून धिंड काढणं, हे प्रकार आजही सर्रासपणे सुरू आहेत.

या घटनांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून मग मीडियाही विकत घेतला जातो आणि या बातम्या कधी कोणत्याच वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर झळकत नाहीत. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ असाच चालू राहतो. पाठ्यपुस्तकातून धडे वगळण्यापासून तर थेट इतिहास बद्दलण्यापर्यंत सगळे हातखंडे अजमावले जातात. सायबर बुलिंग करून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं जातं.

याहून पुढची पायरी म्हणजे दलित समाजच कसा जुलमी आहे हे दाखवणं. अॅट्रॉसिटी हा किती जाचक आणि अन्यायी कायदा आहे किंवा आरक्षणानं सवर्णांचं कसं नुकसान होत आहे, हे नव्या पिढीला शिकवून त्यांचं ब्रेनवॉशिंग केलं जातं आणि जातीवाद वारसाहक्कासारखा पुढच्या पिढीस ट्रान्सफर केला जातो.

या दृष्टचक्रातून शेकडो वर्षं किलमाँगरची सुटका होत नाहीये. हा समूह एका वार्षिक यात्रेला जातो, तर तिथंही त्यांच्यावर दगडफेक झाली. मग त्याचा संताप अनावर झाला. तो पेटून उठला आणि त्या आगीत काही बसेस जळून खाक झाल्या. किलमाँगरनं आवेशात येऊन एकाची गाडी पेटवून दिली आणि मग सगळ्या राज्यानं किलमाँगरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं की, तो सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करतोय. म्हणून त्यालाच ‘नक्षलवादी’ घोषित करण्यात आलं. किलमाँगरला आता समानतेनं जगण्याचा हक्क हवा होता, मग तो कोणत्याही मार्गानं मिळो.

तर दुसरीकडे टचालाकडे सर्व संसाधनं होती. शिक्षण होतं, विवेकबुद्धी होती, पैसाअडका होता, पण तो फक्त त्याच्या वकांडापुरताच विचार करत होता. शेवटी त्या दोघांमध्येच युद्ध पेटलं. कधी १४ एप्रिलच्या स्टेजवरून, तर कधी पक्षाचा नेता कोण बनेल, अशा कारणांवरून त्यांच्यात तुंबळ हाणामाऱ्या होऊ लागल्या. तिसरी मोठी राजकीय शक्ती बनण्याचं सामर्थ्य असलेला हा समाज वकांडासारखी ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ बनण्यातच समाधान मानू लागला. वायब्रेनियमचा शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी वकांडावर हल्ले होत असतात.

जे वकांडाकडे वायब्रेनियमच्या रूपात आहे, तेच धारावीतल्या लोकांकडे जमिनीच्या रूपात आहे. वायब्रेनियम/जमीन ही ती शस्त्रं आहेत, जी या दोघांना समृद्ध बनवतात. हे वायब्रेनियम/जमीन दुसरं काही नसून बाबासाहेबांच्या ज्ञानाचा वारसा आहे, त्यांनी सर्वांना समानतेनं जगायचा हक्क दिलेलं संविधान आहे, त्यांनी बनवलेले कायदे आहेत. ते भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा हक्क देतात, आठच तास काम करण्याची, पगारी रजा घेण्याची, महिलांना बाळंतपणासाठी रजा घेण्याचा हक्क देतात, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात.

कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी १९६६ साली ‘ब्लॅक पँथर’ पार्टीची स्थापना ऑकलंड, कॅलिफोर्निया शहरात झाली होती. यामुळे ‘ब्लॅक पँथर’ सिनेमासुद्धा ऑकलंड शहरात सुरू होतो. १९७२ साली ‘ब्लॅक पँथर’ पार्टीचा आदर्श घेऊन नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांनी ‘दलित पँथर’ची स्थापना केली होती. महत्त्वाचं म्हणजे ‘ब्लॅक पँथर’ पार्टीनं त्यांच्या वर्तमानपत्रात ‘दलित पँथर’चा उल्लेख केला होता, तसंच आपला पाठिंबासुद्धा जाहीर केला होता.

जेव्हा आफ्रिकेतील आदिवासी उपाशी मरत होते, दुष्काळ, कुपोषणाचा सामना करत होते, धारावीतले लोक दलदलीत, हलाखीच्या परिस्थितीत जनावरांपेक्षा खराब आयुष्य जगत होते. तेव्हा त्यांच्या मदतीला कोणी आलं नाही, पण जेव्हा वकांडा वायब्रेनियमच्या साहाय्यानं समृद्ध झाला, दलितांनी दलदलीला राहण्यालायक बनवलं, तेव्हा मात्र त्यांची संसाधनं लुटायला युलेसिस क्लॉ, हरिदादा अभ्यंकरसारखे लोक धावून येतात. पाच वर्षं यांची दुःखं जाणून घ्यायला कोणी त्यांच्या आसपास भटकतसुद्धा नाही, पण निवडणुका आल्या की, नेत्यांना त्यांच्या भाषणात अचानक फुले- शाहू-आंबेडकर आठवायला लागतात. त्यांचीच संसाधनं वापरून त्यांचंच नुकसान केलं जातं.

यात भर म्हणजे हे लोक एमबाकु असतात. ‘ब्लॅक पँथर’मध्ये एमबाकू नावाचा सैनिक असतो, जो नंतर पलटी मारून शत्रूपक्षात सामील होतो. ‘काला’मध्येसुद्धा जेव्हा मार्ग कठीण होतोय असं दिसायला लागतं, तेव्हा ‘काला’ची मुलं घरातून वेगळं होण्याचा निर्णय बापाला सुनावतात. असे अनेक एमबाकु नेते समाजात आहेत, जे मंत्रीपद भेटत असेल किंवा एखादी चारचाकी घरासमोर येणार असेल किंवा गेलाबाजार रात्री चपटीची सोय होत असेल तर विकले जायला तयार होतात. निवडणुकीच्या आदल्या रात्री ‘नोटां’च्या बदल्यात ‘वोट’ बदलतात, ते हेच.

एमबाकूची दुसरीसुद्धा एक प्रजाती असते, ‘सुखवस्तू एमबाकू’. हे शिकून समृद्ध होतात आणि मग ‘मला वेळ नाही या गोष्टींसाठी’, ‘माझी नोकरी धोक्यात येईल’ अशा प्रकारची विधानं करून समाजाकडे पाठ करतात. तिसरे असतात ‘कृतघ्न एमबाकू.’ ते आरक्षणाचा लाभ तर घेतात, पण त्यांना बाबासाहेबांबद्दल थोडीही आस्था नसते. ज्या कर्मकांडाविरुद्ध बाबासाहेबांनी आयुष्यभर झगडून दलितांना त्यांचा हक्क मिळवून दिला, ते मातंग, लोहार, बंजारा, वंजारी, माळी आणि इतर अनेक समाजातले लोक हिंदू धर्माच्या सर्व मान्यता, परंपरा पाळतात आणि शाळा, कॉलेजात मात्र हळूच जातीचं प्रमाणपत्र दाखवून आरक्षण लाटतात. हे लोक ना कधी ‘जयभीम’ करतात, ना त्यांच्या घरात बाबासाहेब व गौतम बुद्धाची छायाचित्रं असतात. हे बाबासाहेबांच्या उपकाराला बेईमान झालेले ‘कृतघ्न एमबाकू’ आहेत.

‘काला’मधलं नाना पाटेकरचं पात्र देशातल्या एका महत्त्वाच्या नेत्यासारखीच चष्म्याची फ्रेम वापरतं. झरीना आणि अभ्यंकरमध्ये ‘पुणे करार’ पद्धतीचाच एक सीन होतो, ज्यात दलितांच्या मागण्या मान्य न करता, मला जे हवंय तेच होईल असं सांगत स्वतःचा मोठेपणा दाखवत अभ्यंकर झरीनाला त्याच्या पाया पडायला लावत त्याची दलितविरोधी भूमिका स्पष्ट करतो.

आज भारतात जातीवादाचं स्तोम माजलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर दलितांना पुन्हा एकदा गुलाम करण्याचा, त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशात डोनाल्ड ट्रम्पसारखी रेसिस्ट व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर जाऊन पोचलीय. त्याच्या पॉलिसी वर्णभेदी आहेत. तो खुलेआम मुस्लीम व स्पॅनिश लोकांविरुद्ध बरळत असतो. तिथं कृष्णवर्णीयांना अजूनही दुय्यम वागणूक दिली जाते, गुन्हेगारीशी जोडलं जातं, तेव्हा ‘ब्लॅक पँथर’ आणि ‘काला’सारख्या सिनेमांचं अस्तित्व असणं अनन्यसाधारण बनतं.

मार्व्हल स्टुडिओजचे माजी सीईओ आईक पर्लमटरनं ‘आयर्न मॅन’च्या दुसऱ्या भागात रोडीच्या पात्रासाठी टेरेन्स हॉवर्डला बदलून डॉन शिडलला हे कारण सांगून घेतलं की, ‘सगळे काळे लोक एकसारखेच दिसतात. यामुळे अभिनेता बदललाय हे कोणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही.’ अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीचा खूप जुना इतिहास आहे, तर भारतात जातीवाद, चातुर्वर्ण्य व्यवस्था आजही सुरूच आहे. या स्थितीत मार्व्हल स्टुडिओनेच पूर्ण कृष्णवर्णीय टीम (Crew) घेऊन कृष्णवर्णीयांच्या संस्कृतीला सेलिब्रेट करणारा सिनेमा बनवणं, तो प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेणं, त्यानं एक बिलीयनच्या पार कमाई करणं, इतिहासातला सर्वांत यशस्वी सोलो सुपरहिरो सिनेमा बनवून देणं आणि भारतात मेन्स्ट्रीम पद्धतीनं दलितांबद्दल सिनेमा बनणं, त्यात रजनीकांतसारख्या सुपरस्टारनं दलिताची भूमिका वठवणं, निळ्या रंगाचा, बाबासाहेबांचा पुरस्कार करणं, समाजातल्या सर्व स्तरातून त्याचं कौतुक होणं, हा संकेत आहे बदलणाऱ्या वाऱ्याचा. या दोन सिनेमांचं अस्तित्व आशादायी आहे.

या दोन्ही सिनेमांत एकावेळी ‘काला’ आणि ‘ब्लॅक पँथर’ दोघांना मृत घोषित केलं जातं, पण शेवटी ते राखेतून फिनिक्ससारखी भरारी घेऊन दृष्टशक्तींचा नाश करतात. यावरून हे समजतं की, आंबेडकरी चळवळ दाबली जाऊ शकते, पण नष्ट केली जाऊ शकत नाही. एकीकडे कालाचा मुलगा लेनिन आहे, जो निषेध करून, सत्याग्रह करून संवैधानिक मार्गानं त्याचा हक्क मिळवू पाहतोय. पण हा खेळच फेअर नसल्यानं लेनिनचं कोणी काही चालू देत नाही. तर दुसरीकडे जहालवादी काला आहे, जो शत्रूचे हातपाय तोडून मोकळा होतो. पण चलाख जातीवादी शक्ती त्याला सरळ ‘नक्षलवादी’ घोषित करून टाकतात.

हे दोघंही आपापल्या परीनं संघर्ष करत आहेत, पण समाजाच्या खालच्या स्तरावर असल्यानं दोघांचंही फारसं चालत नाही. चालतं ते टचालाचं, कारण तो राजा आहे, शासनकर्ता आहे. म्हणून बाबासाहेब सांगून गेले होते की, अन्याय रोखायचा असेल तर ‘शासनकर्ती जमात बना… तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे. तुमच्या कल्याणाकरता कोणी महापुरुष जन्म घेईल अशा अपेक्षेत राहू नका.’ हे बाबासाहेबांचं वाक्य कधी नव्हतं तेवढं महत्त्वपूर्ण वाटतं.

‘चळवळ भरटकली आहे.’, ‘आपल्याकडे चांगल्या नेत्यांची कमी आहे.’ ही एमबाकूसारखी कारणं देणं सोडून आपण चळवळीला जमेल तेवढा हातभार लावण्याची गरज आहे. ही अस्तित्वाची लढाई असल्यानं यात सगळ्यांना खारीचा वाटा उचलावा लागेल. म्हणून कायद्याची लढाई असेल तिथं लेनिन हवा, मुष्टीयुद्धात तो कमी पडेल तेव्हा काला आणि किलमाँगर यांनी समोर यावं. यासोबतच ब्लॅक पँथरला समाजाप्रती त्याची असलेली जबाबदारी समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण आज दीनदुबळ्या, अशिक्षितांच्या समाजाला टचालाच्या ज्ञानाची, त्याच्या संसाधनांची गरज आहे. जे सुशिक्षित आहेत, इतर समाजबांधवांपेक्षा उन्नत आहेत, त्यांना चळवळीतल्या लोकांना आधार देण्याची गरज आहे. कारण काही मूठभर लोकांनी आंबेडकरी चळवळ चालवण्याचा ठेका घेतलेला नाही. जर सगळ्यांना जातीवाद, भेदभाव नकोय, तर त्यासाठी फक्त काही लोकांनीच का बलिदान द्यावं? समाजातील सर्व स्तरातील लोकांना या लढ्यात सहभाग द्यावा लागेल.

‘काला’ आणि ‘ब्लॅक पँथर’ हे विभक्तपणे कमजोर आहेत, पण ते सोबत आल्यास आंबेडकरी चळवळीस सबळ बनवू शकतात. कारण हे दोन घटक परस्परास पूरक आहेत. यामुळे आज ‘काला’ आणि ‘ब्लॅक पँथर’ला मिळून ‘काला पँथर’ बनण्याची नितांत गरज आहे…

.............................................................................................................................................

लेखक पवन नंदकिशोर गंगावणे चित्रपट अभ्यासक आहेत.

g.pavan018@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ramesh singh

Thu , 21 June 2018

"१९७२ साली ‘ब्लॅक पँथर’ पार्टीचा आदर्श घेऊन नामदेव ढसाळ आणि ज. वि. पवार यांनी ‘दलित पँथर’ची स्थापना केली होती."- राजा ढाले यांचे नाव वगळण्यामागे अभ्यासाचा अभाव आहे की पूर्वग्रह? काहीही असले, तरी त्यातून अडाणीपणा जाणवतो. लेखकापेक्षाही आलेले लेखन जसेच्या छापणाऱ्या संपादकांची अल्पक्षमता यातून प्रदर्शित होते.


Gamma Pailvan

Mon , 18 June 2018

पवन नंदकिशोर गंगावणे, तिखट चिकन-पिझ्झावर श्रीखंड फासून भाजायला भट्टीत टाकलेला वाटतो. एका वेळेस एकाच चित्रपटाचं परीक्षण लिहा हो ! ही काय विचित्रं खिचडी करून ठेवलीये तुम्ही. आता एकेक मुद्दे बघूया. १. >> जिथून ‘मनुस्मृती’ ही वस्तूस्वरूपातुन लुप्त झाली, पण लोकांच्या मनात आजही जिवंत आहे. >> खरंय हे. खुद्द आंबेडकरांनी मनुस्मृतीचा गौरव केलेला आहे. २. >> शतकानुशतकं कंबरेला झाडू आणि गळ्यात मडकं घेऊन फिरणाऱ्या दलितांच्या हाती त्यांनी लेखणी देऊन त्यांचं कल्याण घडवलं. >> गळ्यात मडकं व कंबरेला झाडू ही शुद्ध लोणकढी थाप आहे. 'कुण्या ढोम्या महारास गळ्यांत कुंभ अन कटीस केरसुणी बांधोन पुण्यनगरीतील कुठल्याशा मार्गावरून फिरविले' अशा अर्थाचं एकतरी अस्सल चिटोरं पेशवाई दप्तरांत आजवर सापडलंय काय ? ३. >> कृष्णवर्णीयांना त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेमुळे नेहमीच अपमान सहन करावा लागलाय. हक्क मारले जाण्यापासून तर गुलामगिरीपर्यंत. >> हे अमेरिकेतलं वर्णन आहे ना? वकांडा तर आफ्रिकेतला आहे. लावा लावा, वडाची साल पिंपळाला लावा ! ४. >> ‘मनुस्मृती’पासून उदयास आलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेनं दलितांना अस्पृश्य बनवलं. >> आंबेडकरांच्या मते इसवी सन चौथ्या शतकानंतर अस्पृश्यता अस्तित्वात आली. मनुस्मृती तर त्यापूर्वी हजारो वर्षं अस्तित्वात होती. तिच्या नावाने खडे फोडायलाच पाहिजेत का? काहीतरी फालतूपणा ! ५. >> .... दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन शिक्षण घेणं, ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. >> रोचक विधान आहे. नेमक्या याच कारणामुळे आरक्षणाचे फायदे उकळणारे सुखवस्तू 'दलित' उत्पन्नं झालेत. त्यांच्या बंदोबस्ताचं बघा अगोदर. नंतर मनुस्मृतीच्या नावाने गळे काढा. ६. >> वायब्रेनियमच्या मदतीनं हत्यारं बनवून ते आपल्या कृष्णवर्णीय बांधवांच्या हाती देण्यासाठी, जेणेकरून ते त्यांच्यासोबत होणाऱ्या अपमानाचा बदला घेऊ शकतील आणि बरोबरीचं आयुष्य व्यतीत करू शकतील. >> परस्परविरोधी विधान ! अपमानाचा बदला शस्त्राने घेणं म्हणजे दोन्ही समाजांनी एकमेकांचे शत्रू होणं. शत्रूंमध्ये बरोबरीचं आयुष्य व्यतीत करता येत नसतं. ७. >> किलमाँगरला आता समानतेनं जगण्याचा हक्क हवा होता, मग तो कोणत्याही मार्गानं मिळो. >> त्यासाठी आधी कोणी असा हक्क मिळवलाय का ते बघायचं असतं. आज ग्वाल्हेरचे शिंदे व इंदूरचे होळकर स्वत:स मराठा म्हणवून घेतात. कोणी एके काळी शिंदे पाणक्या होता तर होळकर धनगर. मग त्यांनी आपली प्रगती कशी साधून घेतली ? तीसुद्धा ऐन पेशवाईत ? ज्याला तळमळ आहे तो स्वत:ची प्रगती स्वत:च साधून घेतो. तुमच्यासारखा रडंत बसंत नाही. ८. >> मोठ्या प्रमाणावर दलितांना पुन्हा एकदा गुलाम करण्याचा, त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. >> याविषयी काही पुरावे मिळतील का ? अमुकेक ठिकाणी तमुकेक परिषद झाली. तिच्यात उपरोक्त ठराव पारित झाला, वगैरे ? आत्मसन्मानाने जगायचं असेल तर आगोदर आरक्षणावर लाथ मारायला शिका ! ९. >> तो (ट्रंप) खुलेआम मुस्लीम व स्पॅनिश लोकांविरुद्ध बरळत असतो. >> बेकायदेशीर घुसखोरांची तळी उचलून धरायला अमेरिका काय भारताप्रमाणे सेक्युलर आहे का ? 'इन गॉड वुई ट्रस्ट' हे वाक्यं अमेरिकेच्या संदर्भात ऐकलंय ना तुम्ही ? १०. >> बाबासाहेब सांगून गेले होते की, अन्याय रोखायचा असेल तर ‘शासनकर्ती जमात बना… तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे. तुमच्या कल्याणाकरता कोणी महापुरुष जन्म घेईल अशा अपेक्षेत राहू नका.’ >> आरक्षणाच्या भिका मागून कोणी शासनकर्ता होण्याची स्वप्नं पहात असेल तर त्यास काय म्हणावं बरं ? कपाळकरंटा ? कर्मदरिद्री ? पढतमूर्ख ? अरण्यपंडीत ? ११. >> आज दीनदुबळ्या, अशिक्षितांच्या समाजाला टचालाच्या ज्ञानाची, त्याच्या संसाधनांची गरज आहे. >> म्हणूनंच मोदी डिक्कीच्या कार्यक्रमांस जातो : https://www.youtube.com/watch?v=--RQfBmRv6E तुम्ही काय करताय ? असो. मजा आली लिहायला. आपला नम्र, -गामा पैलवान