विजय तेंडुलकर यांना एका संपादकाचे अनावृत पत्र
पडघम - सांस्कृतिक
विनोद शिरसाठ
  • विजय तेंडुलकर
  • Mon , 28 May 2018
  • पडघम सांस्कृतिक विजय तेंडुलकर Vijay Tendulkar नरेंद्र मोदी Narendra Modi

मराठीतील श्रेष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या निधनाला नुकतीच, म्हणजे १९ मे रोजी १० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा लेख पुनर्प्रकाशित करत आहोत. साधना साप्ताहिकाच्या अंकावर ज्या तारखेचा उल्लेख असतो, त्याच्या बरोबर सात दिवस आधी अंक छापायला जातो. त्यामुळे हा लेख १९ मेच्या आधी लिहिला गेला असून तो २६ मेच्या अंकात प्रकाशित झाला आहे, याची नोंद घ्यावी, ही विनंती.

.............................................................................................................................................

आदरणीय विजय तेंडुलकर,

१९ मे २००८ रोजी तुमचे निधन झाले, त्यावेळी तुम्ही वयाची ८० वर्षे पूर्ण केली होती. तुम्ही गेलात त्याला आता दहा वर्षे झालीत, आज हयात असता तर ९० वर्षांचे झाले असता. तुमच्या दहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पॉप्युलर प्रकाशनाने तुमच्या सर्व नाटकांची पुस्तके संचरूपाने एकत्रित प्रकाशित केली आहेत. महिनाभर आधीच त्यांनी मराठीतील साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रांतील व्यक्तींना व मराठी माध्यमांना आठवण करून दिली होती, तुमच्या दहाव्या स्मृतिदिनाची. आणि त्यानिमित्ताने, या ना त्या प्रकारे तेंडुलकरांची स्मृती जागवावी असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यामुळे असेल कदाचित, मागील आठवडाभरात तसे लहान-मोठे कार्यक्रम-उपक्रम विविध संस्थांनी केले, वृत्तपत्रांनी लेख प्रसिद्ध केले आणि मराठी वृत्तवाहिन्याही १९ मे या दिवशी तुमच्याविषयी काही ना काही दाखवतील/ऐकवतील.

‘साधना साप्ताहिका’तून तेंडुलकरांची स्मृती जागवण्यासाठी काय करणार आहात, असा प्रश्‍न काहींनी विचारला. तेव्हा तेंडुलकरांविषयी पूर्वीच सर्वत्र इतके काही येऊन गेले आहे की, नव्याने सांगण्यासारखे कोणाकडे आणि काय असेल असा प्रश्‍न पडला. आणि असेल कोणाकडे वेगळे वा वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी, पण ते आपल्याला मिळवता येत नसेल तर, उगीच काही छापण्यापेक्षा काहीही न छापलेले बरे, असेही वाटून गेले. तेच तुमच्या वृत्तीला साजेसे, नाही का?

पण तेंडुलकरसर, तुमच्याविषयी आत्मीयता बाळगणारा, तुमचा प्रभाव सांगणारा फार मोठा वर्ग विविध क्षेत्रांत आजही आहे, बरं का! नाटकाच्या क्षेत्रात तर विशेष जास्त आहे. तुमच्या समकालीनांपैकी फारसे कोणी आता उरले नाहीत, पण तुमच्या नंतरच्या तीन-चार पिढ्यांतील अनेक नाट्यकर्मी तुमची आठवण या ना त्या प्रकारे जागवत असतात. मराठी रंगभूमीवरील तेंडुलकर युगाविषयी ते भरभरून बोलत असतात. मराठीतील ललित लेखनाच्या बाबतीत बोलले जाते तेव्हा, अनेक जाणकार ‘गोळीबंद लेखनाचा वस्तुपाठ’ म्हणून तुमचे नाव घेत असतात. या पार्श्‍वभूमीवर, आता असे लक्षात येऊ लागले की, तुमचा चाहता वर्ग तीन प्रकारांत विभागता येईल. एक- संपूर्ण तेंडुलकर हवे असणारा. दुसरा- नाटककार तेंडुलकरांचा प्रभाव असलेला. आणि तिसरा- तेंडुलकरांचे ललित-वैचारिक लेखन आवडणारा.

प्रस्तुत संपादक तिसऱ्या प्रकारातील आहे. कदाचित ‘होता’ म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण बारा-तेरा वर्षांपूर्वी तुमचे बहुतांश ललित-वैचारिक लेखन वाचून झाले. आणि नंतर तुमचे पूर्वीचेच लेखन पुन:पुन्हा वाचावे अशी वेळ व उसंत मिळाली नाही; तशी उर्मी आली नाही किंवा गरज वाटली नाही, काहीही म्हणा. मात्र ऐन उमेदीच्या काळात ज्या काही थोरामोठ्यांच्या भाषेचा, लेखनशैलीचा विशेष प्रभाव प्रस्तुत संपादकावर पडला, त्यापैकी तुम्हीही एक आहात. त्यामुळे भारावलेल्या दिवसांची आठवण व कृतज्ञतेची जाणीव मनात आहेच.

आणखी एका कारणाने तुमच्यासाठी मनात विशेष स्थान आहे. चौदा वर्षांपूर्वी ‘साधना साप्ताहिका’त ‘विजय तेंडुलकर यांना एका तरुणाचे अनावृत पत्र’ प्रसिद्ध झाले होते. तो त्या तरुणाचा खऱ्या अर्थाने पहिला लेख होता, तो लेख त्यावेळी विशेष गाजला. त्यानंतर तो तरुण ‘साधना’शी जोडला गेला आणि आता ‘प्रस्तुत संपादक’ म्हणून हे पत्र लिहितो आहे.

त्या तरुणाने ते पत्र लिहिले तेव्हा तुम्ही पंचाहत्तरीच उंबरठ्यावर होता, तेव्हा तुमचे लेखन जवळपास थांबले होते. मात्र मराठी साहित्य-संस्कृतीच्या विश्‍वात व सामाजिक-राजकीय जगतात, तुमच्या प्रत्येक लहान-मोठ्या विधानांचे प्रतिध्वनी खड्या आवाजात उमटत होते आणि त्यांचे तरंग सर्वदूर जात होते. त्यातून समाजमनात लाटा-लहरी उसळत होत्या. कारण तब्बल पन्नास वर्षे नाटक, चित्रपट आणि ललित लेखन केलेले असल्यामुळे तुमच्या कार्यकर्तृत्वाचा बहर साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रात बराच जास्त पसरलेला होता. आणि अर्थातच त्या लेखनाची खोलीही बरीच जास्त होती. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही तुम्हाला प्रतिष्ठेचे व आदराचे स्थान प्राप्त झाले होते. अनेक मानसन्मान तुमच्या वाट्याला येत होते. शिवाय तुमचे समकालीन म्हणावे असे अन्य साहित्यश्रेष्ठ कमी कमी होत चालले होते. परिणामी, तुमच्याकडे आधीच्या तुलनेत अधिक लक्ष वेधले जात होते. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो म्हणतात, तसा तो काळ होता.

आणि त्या पत्राचा संदर्भ कमालीचा खळबळजनक होता. म्हणजे इ.स. २००३ च्या अखेर पुण्यात झालेल्या ‘सृष्टी’ या संस्थेचा ‘चालता-बोलता दिवाळी अंक : विषय- विजय तेंडुलकर’ या  दिवसभराच्या कार्यक्रमानंतर समारोपाच्या वेळी तुम्ही केलेले भाषण कमालीचे स्फोटक ठरले होते. ‘पुढचा जन्म मिळणार असेल तर मला लेखणी नको, शस्त्र हवे’ या तुमच्या विधानामुळे व त्या विधानाचे मार्मिक विवेचन करून स्पष्टीकरण देण्याचे टाळल्यामुळे, महाराष्ट्राच्या विचारी वर्गात हलकल्लोळ माजला होता. तुमच्या बाजूने व विरोधात उलट-सुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. त्यानंतर महिनाभराने, कोकणातील एका शाळेत एका मुलीने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना तर तुम्ही कहरच केला होता. ‘तुमच्या हातात शस्त्र दिले तर तुम्ही पहिली गोळी कोणाला घालाल?’ असा तो प्रश्‍न होता, अर्थातच त्याला पुण्यातील तुमच्या भाषणाचा संदर्भ होता. आणि तेव्हा बेधडकपणे तुम्ही ‘नरेंद्र मोदी’ हे नाव घेतले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या विचारी वर्तुळात गहजब झाला होता. आणि त्या पार्श्‍वभूमीवर ‘साधना’त ते पत्र प्रसिद्ध झाले होते.

चौदा वर्षांनंतर मागे वळून पाहताना काय वाटते, असा विचार तेव्हाचा तरुण म्हणजे आताचा प्रस्तुत संपादक करतो, तेव्हा दोन प्रश्‍न मनात येतात. एक- अशा प्रकारची विधाने तेंडुलकरांसारख्या एखाद्या महनीय व्यक्तीने केली तर संपादक म्हणून प्रतिक्रिया काय राहील? आणि दोन-आज तुम्ही हयात असता तर, तुमची सभोवतालच्या परिस्थितीविषयीची प्रतिक्रिया काय राहिली असती?

या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे देऊन हे पत्र संपवणार आहे. खरे तर या प्रश्‍नांची उत्तरे तुमचे निधन झाले, तेव्हाच मनात आकाराला आली होती, पण आता दहा वर्षानंतर त्यासाठी निमित्त मिळते आहे.

दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे संदर्भासह देतो. अर्थातच आधी पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर... तुम्हाला उद्देशून अनावृत पत्र लिहिल्यानंतर तो तरुण ‘साधना’शी जोडला गेला, किंबहुना तेच त्यासाठी मुख्य कारण ठरले. त्यानंतर दोनेक वर्षांनी तुमची नांदेडला झालेली एक मुलाखत (शब्दांकन केलेली) प्रसिद्धीसाठी ‘साधना’कडे आलेली होती. तो तरुण तेव्हा ‘साधना’चा युवा अतिथी संपादक होता. ती मुलाखत वाचून त्याने जवळच असलेल प्रा.रा.ग.जाधव यांना विचारले, “ही मुलाखत ‘छापायला हरकत नाही, पण छापलीच पाहिजे अशी नाही’, या प्रकारातली आहे. तर काय करावे?” प्रा.जाधव यांनी तत्काळ उत्तर दिले, ‘असे वाटत असेल तर छापू नये.’ त्यावर तो तरुण म्हणाला, ‘तरीही एकदा नजर टाकून तुमचे मत सांगता का?’ तेव्हा सौम्य प्रकृतीचे ते समीक्षक जाधव म्हणाले, ‘गरज नाही. सर्जनशील लेखकांच्या मुलाखती गांभीर्याने घेऊ नयेत.’ रा.ग.जाधवांचे ते विधानही त्या तरुणासाठी स्फोटकच होते, पण त्याच्या मनातील एका गहन प्रश्‍नाच्या उत्तराची वाट सापडण्याची शक्यता त्यातून निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने समीक्षक जाधवांना त्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, “सर्जनशील लेखक एका नव्या किंवा स्वायत्त अशा विश्‍वाची निर्मिती करण्यात दंग असतो. त्याला विद्यमान समाजव्यवस्था/राज्यव्यवस्था यांच्याविषयी प्रश्‍न विचारले तर तो त्याला हवी असलेल्या व्यवस्थेविषयी सांगण्याची शक्यता जास्त असते. शिवाय, विद्यमान व्यवस्थांचे व प्राप्त परिस्थितीत असलेल्या मर्यादांचे पुरेसे आकलन त्याला असेलच असे नाही. त्यामुळे त्या संदर्भातील त्याची बेधडक वक्तव्ये एकांगी, आक्रस्ताळी, न पटणारी असण्याची शक्यता जास्त असते. आणि वर्तमानाविषयी, आजच्या व्यवस्थांविषयी बोलायचे असेल तर राजकारण, समाजकारण, अर्थकारण व अन्य अनेक अंगांनी अभ्यास केलेला असणे आवश्यक असते. तशी तयारी झालेली नसणाऱ्या कोणाचीही विधाने एकारलेली असणे साहजिक असते. सर्जनशील लेखकही त्याबाबत अपवाद असू शकत नाहीत.”

तेंडुलकरसर, रा.ग.जाधव यांच्या त्या त्रोटक स्पष्टीकरणानंतर आणि त्या विधानाला समीक्षाशास्त्राचा आधार आहे, असे त्यांनी सांगितल्यानंतर एक मोठाच कूटप्रश्‍न निकालात निघाला, अशी भावना त्या  तरुणाची झाली. इतके महान लेखक असे कसे व का बोलतात, हा प्रश्‍न त्याला नंतरच्या काळात सतावणारा वाटेनासा झाला. एवढेच नाही तर, कोणत्याही क्षेत्रातील महनीय व्यक्तीकडून अन्य क्षेत्रांच्या संदर्भात भाष्य केले जाते, तेव्हा त्याला मर्यादित अर्थानेच महत्त्व द्यावे, असा तो धडा होता. अर्थातच, शासनसत्ता असो वा अन्य कोणतीही व्यवस्था, यांच्यासंदर्भात सर्व क्षेत्रांतील ‘ओपिनियन मेकर’ वर्गाने वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जास्तीत जास्त लोकांनी उपभोगलेच पाहिजे, असाही त्या धड्याचा बोध होता. तर, तेंडुलकरसर आज तुम्ही किंवा अन्य कोणी त्या प्रकारचे विधान केले असते तर त्या विधानाचा तेवढा धक्का प्रस्तुत संपादकाला बसला नसता.

आता दुसरा प्रश्‍न. आज तुम्ही हयात असता तर, सभोवतालाविषयी तुमची प्रतिक्रिया काय राहिली असती? या प्रश्‍नाचे उत्तरही तुमच्याच पूर्वीच्या विधानाच्या आधारे देता येईल. आज तुम्ही असता तर कमालीची चमत्कारिक स्थिती तुमची राहिली असती. तुमची नको तितकी चेष्टा झाली असती, हुर्रे उडवली गेली असती. कारण इ.स. २००३ मध्ये ज्या नरेंद्र मोदी यांच्याविषयी तुम्ही कमालीचे निर्दयी व क्रूर विधान केले होते, तेच मोदी आता देशाचे पंतप्रधान आहेत. तुम्ही २००८ मध्ये हे जग सोडून गेलात, तेव्हा मोदी हे केवळ गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते देशाच्या स्तरावर अवतरून पंतप्रधान होण्याची शक्यता दूर दूर तक नव्हती. पण तुम्ही गेल्यानंतर पाच वर्षांत देशाचे चित्र इतके झपाट्याने पालटत गेले की, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मागील चार वर्षांत त्यांची लोकप्रिता कमी-अधिक फरकाने कायम आहे. त्यांच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होतेय, म्हणून साहित्यिकांचे उद्रेक झाले, अनेकांनी त्यांना मिळालेले पुरस्कार परत केले. नंतर वैज्ञानिकांचे मोर्चे निघाले. आणि अलीकडे तर सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी, लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांची अनेक आंदोलने झाली, उच्च शिक्षणसंस्था व विद्यापीठे या ठिकाणची अस्वस्थता उग्र रूप धारण करणारी ठरली. अन्य अनेक क्षेत्रांतील खदखदही रोजच वाचायला, ऐकायला, पाहायला मिळत आहे.

ही सर्व परिस्थिती पाहून तुमची काय अवस्था झाली असती तेंडुलकरसर? या परिस्थितीवर तुम्ही काय भाष्य केले असते? काय उपाययोजना सुचवली असती?

तुम्ही ‘सृष्टी’तील त्या ऐतिहासिक स्फोटक भाषणात म्हणाला होता की, ‘मी आयुष्यभर माणूस शोधत आलो. आणि आता कुठे मला तो थोडाथोडा सापडायला लागलाय. पूर्णत: सापडलेला नाही.’ अगदी खरे आहे. तुमची सर्व नाटके आणि तुमचे सर्व ललितलेखन यांचा मध्यबिंदू शोधला तर तुमचे वर्णन ‘माणूस शोधणारा माणूस’ असेच करावे लागेल. आणि त्याच दरम्यानच्या काळात, तुम्ही इतिहासाचे काही दाखले देऊन सांगत होता की, ‘माणसाला जसे वेड लागते, तसे वेड कधीकधी संपूर्ण समाजालाही लागत असते.’ हाच तो मर्मबिंदू. माणूस शोधण्याची प्रक्रियाच तुम्ही व्यवस्थांचा शोध घेण्यासाठीही वापरत होता का? ते जर खरे असेल आणि तुम्ही आज हयात असता तर मोठी शक्यता ही राहिली असती की, तुम्ही मोठमोठ्याने ओरडून सांगितले असते, ‘आजच्या समाजाला वेड लागले आहे, वेड! आख्खाच्या आख्खा समाज वेडा झाला आहे.’ आणि रशियातील पुतीन, चीनचे जीनपिंग, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलाढाली आणि त्यांची लोकप्रियता(?) पाहून तुम्ही म्हणाला असता, ‘केवळ भारतीय समाजाला नाही, तर संपूर्ण जगालाच वेड लागले आहे...’ आणि अर्थातच, तुमची ही ओरड ऐकणाऱ्यांपैकी बहुतांश लोक काय म्हणाले असते? ते म्हणाले असते, ‘अरेरे, तेंडुलकर ठार वेडे झाले आहेत.’

(‘साधना’ साप्ताहिकाच्या २६ मे २०१८च्या अंकातून)

.............................................................................................................................................

लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.

vinod.shirsath@gmail.com

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 30 May 2018

विनोद शिरसाठ, मोदींना गोळ्या घालीन म्हणणाऱ्या तेंडुलकरांची तुम्ही केलेली भलामण खरंच आवडली. निरपराध्यांना ठार मारणारे २६/११ चे जिहादी अतिरेकी सुद्धा दार-उल-इस्लाम नामक नवनिर्मितीतच दंग होते. त्यांच्या कृत्यांकडे असंच सहानुभूतीपूर्वक पाहायला हवं. पण शिंचं मेलं ते न्यायालय ! त्याने असंवेदनाशीलपणे कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली. तसंच तो बकबकुद्दीन ओवैश्या. १५ मिनिटं पोलीस दूर झाले की १५ कोटी मुस्लिमांच्या १०० कोटी हिंदूंवर साकारायच्या रचनात्मक कार्यास ऊत येणार आहे. कसाब व बकबकुद्दीन या महानुभावांच्या पंगतीत तेंडुलकर बस(व)ल्याबद्दल तुमचं (व माझंही) अभिनंदन. आपला नम्र, -गामा पैलवान