गौतम बुद्ध ते शरद् पाटील या परंपरेच्या नीट वाचनातून येणार्‍या काळातील जगण्याची दिशा सापडेल
पडघम - साहित्यिक
सुशील धसकटे
  • कॉ. शरद् पाटील आणि गौतम बुद्ध
  • Thu , 24 May 2018
  • पडघम साहित्यिक सुशील धसकटे गौतम बुद्ध Gautama Buddha कॉ. शरद् पाटील Sharad Patil शिवार साहित्य संमेलन Shivar Sahitya Sanmelan

मराठवाडा साहित्य परिषद, शाखा : माजलगाव, जि. बीड, आयोजित मंजरथ येथे २२ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या दहाव्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश. धसकटे यांची ‘जोहार’ ही कादंबरी प्रकाशित झालेली असून, तिला अनेक प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

.............................................................................................................................................

१.

जोहार... मंडळी... जोहार...

दहाव्या शिवार संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण सर्वांनी मिळून माझी निवड केलीत, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. वास्तविक यापूर्वी इतकी ज्येष्ठ मंडळी या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभलेली आहेत की, या ज्येष्ठांच्या परंपरेत बसताना एक तरुण म्हणून मी मनातून पुष्कळ संकोचलेला आहे. तसेच आपणांसारख्या मान्यवर आणि अधिकारी मंडळींसमोर काही एक विचार मांडतानाही माझ्या मनावर दडपणही आहे, हे मी सुरुवातीलाच मान्य करतो. काही कमी-जास्त वगैरे झालं तर आपण समजून घ्याल, अशी अपेक्षा बाळगून मी माझे विचार मांडतो.

वास्तविक, हा जो बहुमान आपण मला दिलात, तो फार क्वचित लोकांच्या वाट्याला येतो. माझ्या गाव-शिवारानं केलेला हा बहुमान इतर कोणत्याही बहुमानापेक्षा मला जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण तो आपल्या गावच्या मातीनं केलेला असतो. त्यात प्रेम-माया-जिव्हाळा-कौतुक ओतप्रोत भरलेलं आहे. आताच्या बेगडी आधुनिकतेच्या जगात अशा प्रांजळ भावना माणसांच्या मनातून हळूहळू हद्दपार होत असताना, या आपलेपणाच्या भावनेची ओल एक लेखक आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून मला कायम जिवंत आणि संवेदनशील ठेवील; या मातीशी आणि या मातीत मळणार्‍या माणसांशी असलेली माझी नाळ अबाधित ठेवील, या विचारानंच मी मनोमन समाधान पावलो आहे. या मातीपासून, इथल्या लोकसंस्कृतीपासून आणि इथल्या शिवारापासून माझी मुळं तुटू नयेत यासाठी हा बहुमान माझ्या मनावर सतत अंकुश ठेवील. मुळं तुटली नाही पाहिजेत, कारण ती तुटली की मग सगळंच तुटत तुटत जातं. उसवत जातं. या तुटलेपणामुळे आपण जसे या शिवाराचे राहत नाही, तसेच आपण आपल्या स्वत:चेही राहत नाही. मंजरथ-सांडस चिंचोली-देपेगाव वगैरे हा परिसर आज आठवतो. कधीकाळी या भागांतून मी वावरलो, इथली गाईगुरं आणि कष्टानं रापलेली बायागडीमाणसं या सगळ्यांसोबत घालवलेले ते एकेक उत्कट क्षण आणि समृद्ध दिवस त्यांच्या बर्‍या-वाईट आठवणींसह मनात साठलेले आहेत. इथला निसर्ग, इथली शेती, इथली माणसं, इथल्या रीतिभाती, इथल्या परंपरा, इथली भौगोलिकता, भाषा, लोकसंस्कृती, सिंदफणा व गोदावरी या नद्या, अशा सर्व घटकांचा कळत-नकळत खोलवर प्रभाव माझ्या जाणीव-नेणिवेत आणि एकंदर व्यक्तिमत्त्वात रुतून बसलेला आहे. यातलं पुष्कळ काही ‘जोहार’मधून आलेलंच आहे. पुष्कळ काही येऊ घातलेल्या आगामी कादंबरीतून येत आहे.

२.

आपल्या या संमेलनाचं नाव ‘शिवार’ असं आहे आणि शिवार म्हटलं की शेती-माती-पक्षी-प्राणी-झाडं-नदी-ओढे आणि एकूणच निसर्ग केंद्रस्थानी येतो. या अर्थानं ‘शिवार’ ही संकल्पना खूप व्यापक आहे. शिवारावरून त्या त्या भागाची ओळखही सिद्ध होत असते. या शिवारात निसर्गाच्या संगतीनं लोकसंस्कृतीही नांदत असते. म्हणजे निसर्गाशी नातं ठेवून आणि निसर्गासोबतच आपण माणूस म्हणूनही वाढत असतो. या वाढण्यातूनच आपण खर्‍या अर्थानं ‘शहाणं’ होत असतो. असं शहाणपण कुठल्याही विद्यापीठात शिकून वा ग्रंथ वाचून मिळत नाही. निसर्ग आहे तर माणूस आहे, म्हणूनच मला हे निसर्गकेंद्री माणूसपण फार महत्त्वाचं वाटतं. खासकरून आताच्या जागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर तर हे खूपच महत्त्वाचं वाटतं. लेखक म्हणून मी जसं विशिष्ट विचारधारेशी, इथल्या समाजाशी माझी घट्ट बांधीलकी मानतो, तशीच ती जंगल-जल-जमीन-निसर्ग-पर्यावरणाशीही अधिक घट्ट मानतो. मी माझं नातं निसर्ग-पर्यावरण यांच्याशी सांगतो, तेव्हाच माझ्या माणूस आणि लेखक असण्याला नकळतपणे समृद्ध आशय प्राप्त होत जातो. ही समृद्धता आपल्याला जगाच्या कोणत्याच ‘मार्केट’मध्ये विकत मिळत नाही. म्हणूनच तिचं मोल आहे.

ही गोष्ट जर इतकी महत्त्वाची असेल तर या शिवाराचं रक्षण करण्याची जबाबदारीही आपल्या शिरावर येऊन पडते. आज ज्या ‘शिवार’ नावानं आपण सर्वजण साहित्याबद्दल बोलण्यासाठी एकत्र आलो आहोत, तेच ‘शिवार’ वाचवण्यासाठी भविष्यात आपल्याला एकत्र यावं लागेल, अशी अराजक परिस्थिती येऊ घातलेली आहे. कारण आजच्या साम्राज्यशाहीच्या आणि भांडवलशाहीच्या विकृत अवस्थेत एकंदर निसर्ग-शेती-जमीन-पर्यावरण-भौगोलिक असं सगळं तथाकथित विकासाच्या नावानं एकेक करून संपवलं जात आहे. येणार्‍या काळात हे सगळे प्रश्‍न आपल्यापुढे आ करून उभे असणार आहेत. कोईमतूरच्या प्रिन्सिपल हेल्थ लॅबोरेटरीमध्ये जलतज्ज्ञ म्हणून काम करणारे एम.मणिवासकम् यांनी ‘एन्व्हायर्नमेंटल पोल्युशन’ या त्यांच्या पुस्तकात पृथ्वी वाचवण्याची हाक सर्वांना दिली आहे. त्यांच्या मते “पृथ्वी आणि निसर्गाचा जो वारसा आपल्याला मिळाला आहे, तो आपल्या येणार्‍या पिढ्यांनाही लाभावा असं वाटत असेल तर आपण निसर्गपर्यावरणाच्या संरक्षणाच्या कामाला लागलंच पाहिजे.’’ हे पाहता आपलं शिवार वाचवण्यासाठी आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे, हे ओघानेच आलं.

वास्तविक, तुम्ही म्हणाल आज संमेलन आहे, तर मी साहित्यावर वगैरे बोललं पाहिजे, कथा-कविता-कादंबरीवर बोललं पाहिजे, मग मध्येच हा असंबद्ध विषय कशाला? आपली ही अपेक्षा मला मुळीच गैर वाटत नाही. परंतु पुढे जे वाढून ठेवलंय, ज्या पद्धतीची आताची एकूण स्थितिगती आहे, त्याविषयी एक लेखक म्हणून बोलणं मला महत्त्वाचं वाटतं. तसं मी बोललो नाही तर मग एक लेखक म्हणून जो देशीविचार घेऊन चालतो आहे, त्या मूळ विचारभूमिकेला काही अर्थ उरत नाही. या क्षणाला हा असंबद्ध विषय वाटत असला तरी माणसाच्या-जीवसृष्टीच्या-निसर्गाच्या अस्तित्वाचा विषय असल्यानं आपल्याला यावर बोलावंच लागेल. औचित्याला धरून बोललं तर, आजचं ‘शिवार’ संमेलन हे अशा प्रकारचा विचार मांडण्यासाठी अतिशय योग्य विचारपीठ आहे, असं मला वाटतं. कारण साहित्य म्हणजे घरात बसून लिहिणं आणि छापून आल्यावर लेखकराव होऊन त्याचा आपणच गवगवा पिटणं, इतक्या संकुचित अर्थानं मला अभिप्रेत नाही. माणसासकट आपला भवतालच जिथं संकटात आहे, तिथं आपण लेखक म्हणून कसल्या वाङ्मयीन गप्पा कराव्यात? स्वत:च्या लेखकीय प्रतिमेत अडकून स्वप्रेमात मश्गूल होऊन कसले साहित्यिक सोहळे आपण साजरे करावेत? साहित्याकडे भाबडेपणानं बघण्याचे दिवस आता संपले आहेत.

मित्रहो, तुकारामांच्या काळात दुष्काळ पडला तेव्हा तुकोबा एक कवी म्हणून काय भूमिका जगत होते, जोतीराव फुल्यांच्या काळात ब्रिटिश सत्तेनं देशभर सुरू केलेले अन्याय-अत्याचार आणि दुसरीकडे भारतीय समाजातले अनेक सामाजिक प्रश्‍न उभे असताना जोतीराव कोणती भूमिका जगले, हे पाहता आपण लेखक म्हणून काय भूमिका आचरावी, याचं दिग्दर्शन होतं. मला याची जाणीव आहे की, आपण काही तुकाराम आणि फुले नाही आहोत. परंतु एक लेखक म्हणून स्वत:च्या लेखकीय कीर्तीचे गोडवे गाण्यापेक्षा किंवा लेखनाकडे करिअरिस्ट वृत्तीनं पाहण्यापेक्षाही समाजाशी असलेली बांधीलकी योग्य व निष्ठापूर्वक पद्धतीनं निभावणं, हीच मला माझी लेखक म्हणूनची जबाबदारी महत्त्वाची वाटते. म्हणून एकूण समाजालाच व्यापून राहिलेल्या काही मुद्यांवर आपल्याला आज बोलणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.

३.

शेवटी साहित्य म्हणजे तरी काय असतं? आम्ही एम.ए.ला साहित्याच्या अनेक संस्कृत-इंग्रजी व्याख्या अभ्यासल्या. उदा. ‘वाक्यं रसात्मकं काव्यम्’ (विश्‍वनाथ), ‘विभावानुभावभिचारिंसंयोगाद्रसनिष्पत्ती’ (भरत), ‘काव्यस्य आत्मा ध्वनी:’ (आनंद वर्धन), ‘शब्दार्थौ सहितौं काव्यम्’ (भामह), ‘बेस्ट वर्डस् इन द बेस्ट ऑर्डर’ (कोलरिज) अशा व्याख्या आम्ही अभ्यासल्या, पाठ केल्या, पण केवळ मार्कांसाठी. या व्याख्यांचा आणि आमचा पुढील आयुष्यात काही संबंध उरला नाही. म्हणजे या व्याख्या आजवरच्या जगण्यात कुठे उपयोगात आल्याचा माझा तरी अनुभव नाही. आज जेव्हा मागे वळून मी एम.ए.च्या दिवसांकडे बघतो, तेव्हा मीच मला प्रश्‍न विचारतो की, ‘या व्याख्या पाठ करून त्या वेळी तुला साहित्य म्हणजे काय हे कळलं होतं का?’ तर याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे.

मग साहित्याचं प्रयोजन काय असतं? तर...

गौतम बुद्ध पंचशील आणि विश्‍वशांती सांगतात.

बसवेश्‍वर आणि भगवान महावीर विज्ञाननिष्ठतेवर आधारित मानवता सांगतात. ज्ञानेश्‍वर पसायदानातून ‘आता विश्‍वात्मके देवे’ म्हणतात. तुकोबा ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ म्हणतात. शिवाजीमहाराज ‘स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य’ म्हणतात. कबीर दोन धर्मांना भक्तीने सांधत ‘ऐसी बिधी सब लोक बिगारा । हिंदू मुसलमान तैं न्यारा ।’ म्हणतात, जोतीबा ‘महार-मांगासी धरावे पोटासी’ म्हणतात. सावित्रीबाई आणि फातिमाबी ‘स्त्री शिक्षित झाली पाहिजे’ म्हणतात. मिर्झा गालिब ‘मानवी जीवनाच्या मुळाशी प्रेम’ महत्त्वाचं मानतात, महर्षी शिंदे ‘मानवता हाच खरा धर्म’ म्हणतात. मार्क्स ‘जुलमी आणि शोषण करणारी भांडवलशाही उलथवून समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत मानवता नांदली पाहिजे. म्हणजेच समाजवादी क्रांती.’ म्हणतात. बाबासाहेब आंबेडकर ‘सर्व भेदांच्या विरोधात मानवी समतेची लढाई’ म्हणतात. गांधी ‘वैष्णव जन तो तेणे कहीये’ म्हणतात. साने गुरुजी ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ म्हणतात. ताराबाई शिंदे ‘स्त्री-पुरुष समानता’ सांगतात. बहिणाबाई चौधरी ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर’ म्हणतात. आण्णा भाऊ साठे एकंदर समाजाकडे व्यापक दृष्टीने बघत समतेच्या क्रांतीचे पोवाडे तळमळीनं गातात. या सगळ्या मंडळींचं म्हणणं पाहिलं तर यापेक्षा वेगळं साहित्याचं काय प्रयोजन असू शकतं! लेखकानं साहित्याच्या माध्यमातून समाज एक राहील असाच समताधिष्ठित निसर्गपूरक विचार पुढे घेऊन गेलं पाहिजे, समाजातल्या विसंगती टिपून त्यावर लेखणी चालवली पाहिजे, मानवतेच्या आड येणार्‍या शक्तींच्या विरोधात आणि शांतता प्रस्थापित होईल असं लिहिलं पाहिजे, असंच ही सगळी परंपरा सांगते.

आपल्याकडची शिक्षणव्यवस्था ही पाठांतरवादी असल्यामुळे चांगले गुण मिळवून पास व्हायचं असेल तर पाठ करून लिहिणं, हेच महत्त्वाचं ठरत गेलं. त्यामुळे समजून घेऊन ‘शहाणं करावे सकळ जन’ किंवा नामदेव म्हणाले तसे ‘ज्ञानदीप लावू जगी’ हा जो शिक्षणाच्या बुडाचा मुख्य हेतू असावयास हवा तसा तो राहिला नाही. म्हणजे आपल्याकडील संत घेतले किंवा महापुरुष घेतले तर त्यांनी जीवनाच्या विविध अंगांवर इतकं काही सांगून ठेवलं आहे की, ते नीट वाचून, समजून घेऊन आपल्याला आपली स्वत:ची इथली शैक्षणिक धोरणं, शिक्षणव्यवस्था उभी करणं शक्य होतं. ‘ज्ञानदीप लावू जगी’ (नामदेव) किंवा ‘जे का रंजले गांजले’ (तुकाराम)- यामध्ये शिक्षणाचा मुख्य हेतूच सांगितलेला आहे. पण आपल्या बुडाशी असलेलं हे देशी शहाणपण सोडून आपण परकी ‘आधुनिक’ शैक्षणिक सिद्धान्त आयात करून त्यावर आधारित शैक्षणिक धोरणं ठरवली. शिकायचं कशासाठी तर नोकरीसाठी-पैसा मिळवण्यासाठी, हे महत्त्वाचं झालं. अशा व्यावहारिक आणि पैसावादी धोरणांमुळे शिक्षणातून मूल्यांचं उच्चाटन झालं. मूल्येच नसतील तर विचार आणि बांधिलकीही संपुष्टात येते. स्पर्धा वाढल्यानं सहभाव संपला. तात्पर्य, केवळ अक्षरं लिहिणारे-वाचणारेच आज पैदा होतायत, शहाणे-सु-शिक्षित नव्हे. आता तर गावोगाव इंग्लिश मीडियमच्या शाळा निघतायत, नवनवी चकचकीत विद्यापीठं येतायत, शिक्षण हायटेक होतंय, तंत्रज्ञानाची जोडही त्याला मिळतीय. असं असलं तरी पण त्यामुळे इतकं शिकूनही आपल्याला जीवनाचाजगण्याचा अर्थ कळत नाही, इतकं शिकूनही आपण जातीयता पाळतो, इतकं शिकूनही आपण दुसर्‍यांकडून लाच घेतो-भ्रष्टाचार करतो, इतकं शिकूनही आपण झाडं तोडतो-पर्यावरणाचं नुकसान करतो, इतकं शिकूनही आपण हिंदू-मुस्लीम-ख्रिश्‍चन-बौद्ध म्हणून एकमेकांची डोकी फोडतो, इतकं शिकूनही आपण एकमेकांची खूनं पाडतो, इतकं शिकूनही आपण एकमेकांचा द्वेष करतो, इतकं शिकूनही अन्याय-अत्याचार थांबत नाहीत, तर उलट वाढताना दिसतात. मग आपल्या इतक्या हायटेक उच्च शिकण्याला काय अर्थ राहिला? आपल्या शिकण्याचा आणि त्याच्या उलट वागण्याचा आपल्याला कधीतरी विचार करावाच लागेल. कोरेगाव-भीमा ज्या समाजात घडतं तो तथाकथित समाज सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत आहे, असं म्हणताना आपली मान खाली जाते. कारण इतरांचे हक्क आणि त्यांचं अस्तित्व नाकारून प्रभुत्वासाठी आपली मतं हिंसकपणे त्यांच्यावर लादून आपली संस्कृती थोर असल्याचा ढोल लबाड लोकच बडवू शकतात.

हे सगळं कस नसलेल्या या पाठांतरवादी आणि बाजारू शिक्षणव्यवस्थेचं फलित आहे. बुद्धापासून  सर्व संत, बहिणाबाई चौधरी, गाडगेबाबांपर्यंतची सगळी मंडळी घेतली तर ही सगळी मंडळी कोणत्या विद्यापीठात शिकली? कोणतं हायटेक-तंत्रज्ञानाचं शिक्षण यांनी घेतलं? एमए-पीएचडी-इंजिनिअरींग-डॉक्टर वगैरे कोणत्या डिग्र्या यांनी मिळवल्या? पण आजही समाजात भाईचारा ठेवण्यासाठी आपल्याला या मंडळींचाच विचार कामाला येतो ना, त्यांचा अभ्यास करावा लागतो. जीवनाचं आणि जगण्याचं एक उपजत शहाणपण त्यांनी दिलं. समाज एकत्र कसा राहिल, माणूस म्हणून आपण सगळे एकत्र कसं नांदलं पाहिजे, खरं माणूसपण कशात आहे, वगैरे अतिशय साध्यासोप्या भाषेत किती तरी पुढचा आणि माणुसकीला सांधणारा विचार या मंडळींनी दिला. हे पाहता आपली देशी श्रमणपरंपरा ही खूप सशक्त आणि दीर्घ विचार करणारी होती. श्रमण परंपरा ही मुळातच कष्टाशी-मातीशी-निसर्गाशी आणि एकूणच आपल्या जमिनीत खोल घट्ट गेलेल्या मुळांशी निगडित होती. तुकोबा म्हणतात, “मूळ पाहू जाता । मुळीच आपण । ऐसी आहे खूण । अनुभवाची ॥’’ त्यामुळे दैनंदिन जगण्यातून येणार्‍या अनुभवातून हे शहाणपण पाझरत होतं. हे शहाणपण माणूस म्हणून आपल्याला खर्‍या  र्थाने ‘माणूस’ करणारं होतं. इतकंच काय बुद्धांनी आपल्याला दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांति, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या दहा पारमिता दिल्या. आजपर्यंत कोणत्याही शालेय, विद्यापीठीय अभ्यासक्रमात या दहा पारमितांचा किंवा जातककथांचा अभ्यासक्रमात समावेश होऊ नये, हे आपलं करंटेपण आपण एकविसाव्या शतकात आणि या नव्या परकी मॉडर्निटीचा नित्य ढोल पिटणार्‍या काळात तरी मान्य केलं पाहिजे.

आपल्या स्वत:ची अशी खास देशीभाषांमधील शिक्षणव्यवस्था नसल्यानं किंवा तशी असावी असं आपल्या गुलामीमनोवृत्तीला वाटत नसल्यानं आजही आपल्याकडचे अभियांत्रिकीचे, मेडिकलचे वगैरे सगळे अभ्यासक्रम इंग्रजीतच चालवले जातात. देशी भाषांमधून आपण याला पर्याय देण्याचा साधा विचारही करू शकलेलो नाही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मध्यंतरी मी एके ठिकाणी असं वाचलं होतं, की जपानने त्यांच्या देशातील सर्व शिक्षणशाखा त्यांच्या देशीभाषांमध्ये सुरू केलेल्या आहेत. म्हणजे मेडिकल, इंजिनिअरिंग असे अनेक अभ्यासक्रम त्यांच्या मातृभाषेतून चालवले जातात. त्यामुळे भाषेच्या न्यूनगंडात न अडकता तेथील विद्यार्थी शिकतात आणि स्वत:च्या सर्जनशीलतेला वाट करून देत नवनवे संशोधन करतात. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या देशाच्या एकूण प्रगतीवर झालेला आहे. अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात कोलमडलेल्या जपानने अल्पावधीतच गगनभरारी घेऊन आज अनेक देशांची आर्थिक बाजारपेठ आपल्या ताब्यात घेतली, हे आपण जाणतोच. मात्र आपल्याकडे ग्रामीण भागातील करोडो विद्यार्थी क्षमता असूनही एकट्या इंग्रजीच्या न्यूनगंडापायी स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. यावरून आपण किती तरी चांगल्या संशोधक-अभ्यासकांना मुकतो हे कळेल. हे सगळं कधीतरी आपल्याला मागे वळून बघत लक्षात घ्यावंच लागेल. कारण आपल्या भूतकालीन सामाजिकऐितहासिक-सांस्कृतिक वारशाचं नीट वाचन केल्याशिवाय वर्तमानात काय चाललंय आणि भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची उकल होत नाही, हे खरंच आहे.

४.

मित्रहो, आजच्या समकालीन वास्तवाकडे कानाडोळा करून चालणार नाही. त्याबद्दलही आपल्याला सतत बोलत राहावं लागणार आहे. आज प्रत्येकजण भयग्रस्त आहे. तणावग्रस्त आहे. दहशतवादाचे विविध रूपं समोर येत आहेत. म्हणजे बंदुक-अणुबॉम्ब-रासायनिक बॉम्बचा एक दहशतवाद; सांस्कृतिक दहशतवाद; जातीय-धार्मिक दहशतवाद चालू आहे. अस्मितेच्या पलीकडे नांदणारी जातीजातींतली परस्परपूरकता आपण आधुनिक आणि पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या चारांचा उठताबसता ‘जात्यंतवादी’ हवाला देत संपुष्टात आणली. या परस्परपूरकतेचा कौशल्याने उपयोग करत आणि कटुभावना येऊ न देता जातीयता संपवण्याचे नवीन देशी मार्ग शोधण्यात आपण कमी पडलो. जात्यंत करता करता नकळत जाती जातींतल्या दर्‍या वाढवत गेलो. त्यातून सांधणं ही प्रक्रिया बाजूला पडली. त्यामुळे प्रत्येक जण एकमेकांकडे माणूस म्हणून न बघता संशयानं आणि द्वेषभवानेतून बघत आहे. जनतेच्या कल्याणाकरता म्हणून जी शासनसंस्था असते, तिच्यावरचा सर्वसामान्य माणसाचा विश्‍वास पूर्णपणे उडत चालला आहे. सरकार कोणतंही असलं तरी सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला जे यायचं तेच येतं, असा अनुभव गेल्या तीस चाळीस वर्षांनी दिलाय. रोजच कायदे, नियम बदलताहेत. पुन्हा हे नियमांचे पाश बड्या लोकांऐवजी सामान्य लोकांच्या भोवतीच जास्त आवळले जाताहेत. त्यामुळे स्वाभाविक जगण्या-वागण्यावरही बंधनं आलेली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराचा हवाला देत महागाई वरचेवर वाढवून एकप्रकारे लूटच केली जात आहे. एकंदर शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्यातून बाहेर गेलंय. इंजिनिअरींग, मेडिकल वगैरे गोष्टी पूर्वीही श्रीमंतांनाच शक्य होत्या आणि आताही त्यांनाच शक्य आहेत. दहा-पंधरा हजार रुपये कमावणारा माणूस त्याच्या मुलाला उच्चशिक्षण देऊ शकत नाही. एकीकडे माध्यमिकपर्यंतचं शिक्षण मोफत म्हणायचं, तर दुसरीकडे त्याच्या दर्जाकडे-सोयीसुविधांकडे कानाडोळा करायचा. महिलांच्या सुरक्षिततेचे तर रोजच धिंडवडे निघताहेत. स्त्री अत्याचार, बलात्कार ह्या घटना नित्याच्या झाल्यामुळे एकूण सामाजिक पातळी किती घसरत आहे, दिवसेंदिवस समाजमन किती कोडगं होतं आहे, याचाही अनुभव आपण घेत आहोत. सुशिक्षित बेकारांची तर पलटनच्या पलटन निर्माण होत आहेत. शिक्षण घेऊन पुढे १०-१५ वर्षं बेकार फिरणारे तरुण पाहतो, तेव्हा मनाची घालमेल होते. एकीकडे भारत हा तरुणांचा देश म्हणून गणला जातो, येणार्‍या काळातील महासत्ता म्हणूनही बोलबाला सुरू आहे. परंतु इतकी तरुण ऊर्जा जर अशी बेकार सडत असेल तर या देशाचं पुढचं भवितव्य काय असेल, हे सांगायला कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. शिकूनही नोकरी नाही म्हणून लग्नं होत नाही, पोराच्या शिकण्याचा काही उपयोग होत नाही म्हणून आईबाप मनात झुरत असतात. आला दिवस प्रचंड मानसिक तणावाखाली घालणारे अनेक तरुण रोज मी बघतो. यात अनेक जण निरनिराळ्या व्यसनांच्या आहारीही गेलेले असतात.

दुसरीकडे शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न तसेच पडलेले आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्टोबर १९२६ मध्ये अस्पृश्यांच्या शेतकी परिषदेत केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, “हिंदुस्थानासारख्या मागासलेल्या व दुहीने सडलेल्या देशात शेतकीच्या भरभराटीचा प्रश्‍न केवळ अर्थशास्त्राच्या पोकळ तत्त्वांवर किंवा प्रदर्शनाच्या परकीय भपक्यांवर अवलंबून नसून तो सामाजिक शिक्षणावर व हितसंबंधांच्या सहकार्यावर जास्त अवलंबून आहे.’’ महर्षी शिंदे यांच्या या मताकडे आपल्या कृषितील धुरिणांनी कायम दुर्लक्ष करून किती मोठी चूक केली आहे, हे कळतं. कारण शेतीच्या प्रश्‍नाकडे बघण्याची महर्षींची दृष्टी ही निखळ देशी असून त्यात सामाजिक शिक्षण आणि हिंतसंबंध यावर त्यांनी दिलेला भर खूप काही सूचवून जातो. वर ज्या परस्परपूरकतेचा मी उल्लेख केला ती आणि महर्षी म्हणतात ते सामाजिक हितसंबंध यावर आज ना उद्या आपल्याला विचार करावाच लागणार आहे. औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाकडे सरकारचं जितकं लक्ष आहे, तितकं ते शेतीकडे मुळीच नाही. जणू देशाच्या गळ्यात बांधलेलं लोढणं, अशी भारतीय शेतीची आताची अवस्था आहे. धड काढूनही टाकता येत नाही, की बाजूलाही सारता येत नाही. भांडवलीकरणातून शेतीचे उद्भवलेले प्रश्‍न दिवसागणिक तीव्र होतायत. त्यात जमिनीचा पोत संपणे, विषारी रासायनिक खते आणि कीटकनाशके, पाण्याचा अभाव, वीजेची कमतरता, दळणवळणाच्या पायाभूत सोयींचा अभाव, उत्पन्नाला योग्य दर नसणे, कर्जबाजारीपणा, निरनिराळ्या प्रकल्पांसाठी शेतजमिनी ताब्यात घेणं, निसर्गाचा लहरीपणा या सर्वांचा परिपाक म्हणजे शेतकर्‍यांच्या आत्महत्या, असे अनेक गंभीर प्रश्‍न सांगता येतील. ‘शेतकरी सुखी, तर देश सुखी,’ ही एकेकाळची म्हण बदलून, ‘भांडवलदार-नोकरदार सुखी, तर सरकार सुखी,’ अशी आजची स्थिती आहे. यावरून आपली कृषिप्रधान देश म्हणून असलेली ओळख पुसली जात आहे, ज्याचं काहीच न वाटावं इतकाबिनलाजेपणा आपल्या समाजात मूळ धरू लागलेला आहे. याचे गंभीर परिणाम आपण आता भोगतच आहोत.

मराठी शाळांवर संक्रांत लादून इंग्रजी शाळांना मोकळं रान ठेवलं जात आहे. देशी भाषांची गळचेपी करत जी भाषा आपली नाहीच तिचे लाड-कोडकौतुक चालवून व्यवहाराच्या केंद्रस्थानी तिला आणायचं आणि तिच्याद्वारे श्रीमंतांना प्रस्थापित करायचं, हा प्रकारही चालू आहे. यूनोच्या सनदेत मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल सांगितलेलं आहे. शिवाय जगभरच्या भाषातज्ज्ञांचं मत मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे, असंच आहे. या सगळ्यांकडे रीतसर डोळझाक करत आपल्याच भाषांना आपण नष्ट करत आहोत. आज इंग्लिश माध्यमांकडे पाल्यांना घालायचा पालकांचा वाढलेला ओढा भविष्यातील भयंकर संकटांचे सूतोवाच करतो. हे आपण वेळीच ओळखलं नाही तर आपल्या मुळांपासून तुटलेली ही मुलं धड इंग्रजी नाही की धड मराठी नाही, अशा मानसिक द्वंद्वात भेलकांडत जगणार. म्हणजे एकेकाळी आपल्या देशाची जी ओळख होती ‘विविधतेत एकता’ आता ही ओळख हळूहळू पुसली जात आहे. नामदेव म्हणतात त्याप्रमाणे ‘बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा । तृण रानोमाळ पांगलेसे’ असं काहीसं होत आहे.

५.

आज आपण छातीठोकपणे असं म्हणूच शकत नाही की, मी आणि माझं कुटुंब पूर्णपणे सुरक्षित आहे. असुरक्षिततेचा लंबक प्रत्येकाच्या डोक्यावर फिरतोय. त्यामुळे उद्या काय होईल, याबद्दल प्रत्येकजण मनातून धास्तावलेला आहे. अशा स्थितीत याला आधार लिंक करा, त्याला आधार लिंक करा, असं चाललेलं आहे. पण जिथं माणूसच माणसाला लिंक राहणार नाही, याची सूक्ष्म काळजी घेतली जात आहे, तिथं याला लिंक करा त्याला लिंक करा, अशा गोष्टींनी काय साध्य होणार? माणूसच माणसाला लिंक नाही, हेच आजचं वास्तव आहे. भांडवली मार्केट, तंत्रज्ञान, आभासी वास्तव आणि सर्व क्षेत्रात मूळ धरू लागलेली असहिष्णूता, अशा गोष्टी माणसाला माणसाशी जोडून राहण्यात अडथळा बनून आहेत. अशी विचित्र संभ्रमावस्था व्यापून राहिलेली आहे. सामाजिक-राजकीय-नैतिक-सांस्कृतिक माणूसपण-चांगूलपण अशा अनेक पातळ्यांवरील अस्वस्थ करणार्‍या या र्‍हासशील काळात आणि दुटप्पी दुनियेत ‘लिहिणं’ ही क्रियाही तितकीच जपून, काटेकोरपणे आणि नेटानं करावी लागणार आहे. लेखकरावाच्या भ्रमात प्रसिद्धीलोलूप लेखनाला वरवर प्रसिद्धी मिळत असली तरी त्याचा समाजाला काडीचा उपयोग होत नाही. ‘विकाल तेथे विका । माती नाव ठेवून बुका । हा तो निवाड्याचा ठाव । खर्‍याखोट्या निवडी भाव।’ या तुकारामोक्त ओळींनुसार समाज खर्‍याखोट्याचा निवाडा करत असतोच. एक लेखक म्हणून आपण प्रसिद्धीपराङ्मुख अशी खर्‍याची वाट धरावी, हेच मला जवळचं वाटतं.

मित्रहो, आज जगभर सर्वत्र दहशतवादी लोकांनी अशांतता निर्माण केली आहे. याआधी अफगाणिस्तान, इराण, इजिप्त, लीबिया आणि परवाच सिरियात काय झालं, हे आपण पाहिलं आहेच. रासायनिक अस्त्रांचा वापर करून निरपराध लोकांना मारणं याचं सदसद्विवेक जागा असलेला कुठलाच माणूस समर्थन करणार नाही. आपल्या देशातही काश्मीर धुमसत आहे. अन्याय-अत्याचार-दहशतवादी कारवाया, सीमेवरील चकमकी, बॉम्बस्फोट, खून, चोर्‍या असं सगळं सुखेनैव चालू आहे. त्यात पुन्हा धार्मिक मुद्द्यांवरून, जातीय मुद्द्यांवरून सामाजिक तेढ पसरवण्याचेही उद्योग वरचेवर चालू आहेत. आपण या आभासी जगात शतखंडीत मनानं कसंबसं जगणं चालवले आहे. तेव्हा हे सर्व राजकीय डावपेच आणि खेळ्या नीट ओळखून त्या उलथवून लावण्यासाठी आपल्याला आताचं भांडवली राजकारणही समजून घ्यावं लागेल. कारण राजकारण आता गावागावांत-माणसामाणसांत नीट झिरपलंय. त्याची दिशा समाजसन्मुख असण्याऐवजी समाजविन्मुख असल्यानं लोकहित त्यातून हळूहळू कमी होतंय. त्यामुळे केवळ साहित्य एके साहित्य करून पुस्तकात डोकं खुपसून बसण्यानं आपल्यावरही भयंकर वेळ येऊ शकते, याची जाणीव ठेवायला हवी. एक कविता, एक कथा किंवा एक कादंबरी हीसुद्धा चांगल्याप्रकारचा राजकीयसामाजिक-सांस्कृतिक हस्तक्षेप असू शकते, असं मला वाटतं. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘तुकारामांची गाथा’, ‘समग्र जोतीराव फुले’, ‘समग्र महर्षी वि. रा. शिंदे’, ‘हिंदस्वराज’, ‘अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट’, ‘व्हू व्हेअर शूद्रास’, ‘दासशूद्रांची गुलामगिरी’, ‘टीकास्वयंवर’-‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’, ‘तणकट’, ‘ब, बळीचा’ ही आणि अशी अनेक महत्त्वाची उदाहरणं राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक हस्तक्षेप म्हणून देता येतील. त्यामुळे आपण लिहिणार्‍या मंडळींनी अतिशय गंभीरपणे लिहिणं-वाचणं याकडे बघितलं पाहिजे. केवळ मानसन्मान, पुरस्कारं, पदं किंवा किरकोळ फायदे समोर ठेवून चालणार नाही. यातून क्षणिक बोलबाला होत असला तरी हे फार काळ टिकत नाही. आज समाजातून लेखकाची पत घसरत चाललीय, त्याचं कारण आपण आपल्या ‘लेखकीबाण्या’ला जपत नाही. मोजकंच पण कसदार लिहिणंच दीर्घकाळ टिकतं, हे खूप महत्त्वाचं.

परवा प्रवासात असेच एक ज्येष्ठ गृहस्थ खूप अस्वस्थ होऊन बोलत होते. आज दिवस किती बदललेत, माणुसकी उरली नाही, माणसंच माणसांना मारतायत, आई-बहीण बघत नाहीत की कोवळं लेकरू, सगळे हैवान झालेत वगैरे वगैरे त्यांच्या शब्दाशब्दांतून चिड आणि तळमळ दिसत होती. यातून आता काहीच मार्ग नाही, असं ते म्हणाले. बसमधून उतरताना मी त्यांना एवढंच म्हणालो, “सर, एक मार्ग आहे. तो म्हणजे गौतम बुद्धानं दिलेला शांती आणि अहिंसेचा मार्ग, जो महात्मा गांधींनी आचरला होता. या मार्गानं जाण्याशिवाय आज माणूस म्हणून आपल्याकडे अन्य पर्याय शिल्लक नाही.’’

मित्रहो, आज शांतता नांदावी म्हणून जगभरातील अनेक देशांतील बहुसंख्य नागरिक भारतातील गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी या दोन महापुरुषांची आठवण काढत असतात. या दोन महापुरुषांच्या विचारानं चालल्यास चिरकाल शांतता नांदू शकते, अशी खात्री या लोकांना पटलेली आहे. या देशाचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट असली तरी, दिव्याखाली अंधार या म्हणीची प्रचीती या संदर्भात येते, तेव्हा खंत वाटते.

एक लेखक म्हणून मला आजच्या या काळात मागे वळून पुन्हा आपल्या बुद्ध ते शरद् पाटील या परंपरेचं नीट वाचन करणं आवश्यक वाटतं, कारण येणार्‍या काळातील जगण्याची दिशा यातूनच आपल्याला सापडेल, यावर माझा ठाम विश्‍वास आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे तरुण कादंबरीकार आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......