दिवाळी अंक : लसाविमसावि
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ऋतुरंग, मुक्त शब्द आणि संवाद यांची मुखपृष्ठं
  • Wed , 23 November 2016
  • दिवाळी २०१६ संपादक अक्षरनामा Aksharnama Divali 2016

ऋतुरंग

‘ऋतुरंग’चा दिवाळी अंक दर वर्षी एकाच विषयाला धरून काढला जातो. हे वर्षही त्याला अपवाद नाही. तो विषयही असा असतो की, त्याचं नंतर पुस्तक होऊ शकेल. हे वर्षही त्याला अपवाद नाही. या वर्षीचा विषय आहे – ‘मी आणि माझे वडील’. मराठीमध्ये आईविषयीच्या लेखांची संख्या काही कमी नाही. त्या तुलनेत बापाविषयीचे लेख मात्र कमीच भरतील. नेमकी ही उणीव लक्षात घेऊन हा अंक संपादित करण्यात आला आहे. गुलज़ार यांचा लेख हेही ऋतुरंगचं एक वैशिष्ट्य झालं आहे. या अंकाची सुरुवात कायम त्यांच्या लेखानेच होते. त्यानंतर लता मंगेशकर, शरद पवार, जावेद अख्तर, सुशीलकुमार शिंदे, राजीव खांडेकर, यशवंतराव गडाख, विद्या बालन, जॉनी लिव्हर, नागराज मुंजळे, मनोज जोशी, तौफिक कुरेशी, शोभा डे, ज्ञानेश्वर मुळे, अमृता सुभाष, मुक्ता बर्वे यांचे लेख आहेत. ‘विशेष लेख’ या विभागात श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर, स्मिता पानसरे यांनी त्यांच्या वडलांविषयी लिहिलं आहे. या विभागात ‘राष्ट्रपिता बापू’ हा विनोद शिरसाठ यांचा लेख सुरुवातीलाच आहे. तो सर्वोत्तम आहे. खरं तर या लेखाने या अंकाचा समारोप केला असता, तर ते अधिक उचित झालं असतं. सर्वच लेखकांनी स्वतःच्या वडलांविषयी प्रेमानं, आस्थेनं आणि मायेनं लिहिलं आहे. कुणीही वडलांना 'खलनायक' म्हणून रंगवलेलं नाही. मात्र बरेच लेख स्वतंत्रपणे लिहिले गेलेले नाहीत. त्या-त्या लेखकाला बोलतं करून या लेखांचं शब्दांकन केलं गेलं आहे. मात्र हे शब्दांकन तितकंसं परिणामकारक झालेलं नाही. तसंच या लेखांची तेवढी खोलीही नाही. त्यामुळे ते दीर्घ काळ मनात रेंगाळत राहत नाहीत, पण ते वाचनीय मात्र नक्कीच आहेत. ‘भंगू दे काठीण्य माझे’ हा अमृता सुभाष यांचा लेख मात्र विनाकारण पोझ घेऊन लिहिल्यासारखा वाटतो. मात्र एकंदर हा अंक वाचनीय आहे, हे नक्की.

सर्वोत्तम –  राष्ट्रपिता बापू (विनोद शिरसाठ)

उत्तम मध्यम –  नाना (नागराज मंजुळे),  माझे बापे मन दिधले भातुके (डॉ. सदानंद मोरे)

मध्यम मध्यम – बाबांबद्दल (मुक्ता दाभोलकर)

ऋतुरंग’, संपादक – अरुण शेवते,  पाने - २००, मूल्य – २०० रुपये.

……………………………

मुक्त शब्द

‘मुक्त शब्द’चा दिवाळी अंक नेहमीसारखा संमिश्र स्वरूपाचा आहे. या अंकात व्यक्तिचित्र, लेख, कथा, कविता, विचारतुला, अनुवादित असे सहा विभाग आहेत. व्यक्तिचित्र विभागात अंबिका सरकार या प्रसिद्धीपराङ्मुख लेखिकेविषयी सानिया यांनी लिहिलं आहे. आपल्या शिक्षिकेविषयी लिहिताना सानिया यांनी जरासा हळवा सूर लावला आहे, पण सरकार यांच्याविषयी ममत्वानं लिहिलं आहे. मिलिंद बोकील यांनी अशोक सासवडकर या सामाजिक कार्यकर्त्याविषयी असंच ममत्वाने लिहिलं आहे. त्यामुळे ही दोन्ही व्यक्तिचित्रं या अंकाची विशेष आकर्षणं म्हणावी लागतील. लेख विभागातला जयप्रकाश सावंत यांचा ‘कुर्त वोल्फ : काफ्का आणि टागोर यांचा प्रकाशक’ हा लेख वाचनीय आणि नवी माहिती देणारा आहे. बाकीचे मराठा आंदोलनाविषयीचे तिन्ही लेख एकच बाजू मांडणारे आहेत. गेल्या २५ वर्षांतल्या बदलत्या समाजभानाची जाणीव त्यात फारशी प्रतिबिंबित होताना दिसत नाही. हेमंत देसाई, ज.शं.आपटे यांचे लेख ठाकठीक म्हणावे असेच आहेत. अनेकांनी अनेक वेळा केलेली चर्चाच त्यांनी पुन्हा नव्याने केली आहे. सुकन्या आगाशे यांनी रामायणातल्या ताटकावधाविषयी लिहिलेला संशोधनपर लेख चांगला असला, तरी तो अनवट विषयावरचा आहे. कथाविभागात जी.के.ऐनापुरे, कृष्णात खोत, मनस्विनी लता रवींद्र, प्रशान्त बागड, सतीश तांबे यांचा, तर कविता विभागात अनुराधा पाटील, माया पंडित, कल्पना दुधाळ, रमेश इंगळे उत्रादकर, मलिका अमरशेख, प्रफुल्ल शिलेदार, वसंत आबाजी डहाके, कविता महाजन, उत्तम कोळगावकर या मान्यवर लेखकांचा समावेश आहे. ‘विचारतुला’ हा विभाग मुक्त शब्दमध्ये गेली चार-पाच वर्षं सातत्याने केला जातो आहे. या वेळी त्यात म.गांधी-मार्टिन ल्यूथर किंग, मुसोलिनी-गोळवलकर, सावरकर-भगतसिंग, मार्क्स-लेनिन आणि फुले-आंबेडकर, चे गवेरा-भगतसिंग यांचा समावेश आहे, पण हे सर्वच लेख प्राध्यापकी थाटाच्या परिभाषेनं क्लिष्ट झाले आहेत. त्यामुळे या परिसंवादात पहिल्या वर्षी जी गंमत होती, ती आता राहिली नाही, असं वाटतं.

सर्वोत्तम –  अंबिका सरकार : मैत्रीची वाट (सानिया), समाजकार्याचे अशोकवन (मिलिंद बोकील)

उत्तम मध्यम –  कथा-कविता हे दोन्ही विभाग

मध्यम मध्यम – कुर्त वोल्फ : काफ्का आणि टागोर यांचा प्रकाशक (जयप्रकाश सावंत)

‘मुक्त शब्द’, संपादक - यशोधन (येशू) पाटील, पाने – २२६, मूल्य – २५० रुपये.

……………………………

संवाद

नाशिकचे प्रसिद्ध कवी किशोर पाठक गेली तीन वर्षं ‘संवाद’चा अंक संपादित करत आहेत. यंदा या अंकाचं चौथं वर्ष आहे. या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे, यात ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ लेखक अनिल अवचट, रंगकर्मी प्रशांत दामले, शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, इंग्रजी मिथक-कथालेखक देवदत्त पट्टनाईक आणि शॉपर्स स्टॉपचे व्यवस्थापकीय संचालक गोविंद श्रीखंडे अशा सहा मान्यवरांच्या मुलाखती आहेत. सर्वसामान्यपणे विचार केला, तर मतकरी-अवचट वगळता उर्वरित चारही मुलाखती संबंधितांना समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. फार काही अपेक्षा ठेवल्या नाहीत, तर अपेक्षाभंग होत नाही. मतकरी-अवचट यांच्या मुलाखतींमधून मात्र फारसं काही नवं हाती लागत नाही. याचं कारण आजवर त्यांच्या अनेक मुलाखती प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांनी वेळोवेळी स्वत:च्या प्रवासाविषयी लिहिलंही आहे. तसंच मुख्य म्हणजे, या मुलाखतीमध्ये त्यांना जे प्रश्न विचारले गेले आहेत, ते प्रश्न त्यांना अनेक वेळा विचारले गेले आहेत आणि साहजिकच त्यांनी या प्रश्नांची उत्तरंही अनेकदा दिली आहेत. ज्यांना मतकरी-अवचट यांच्याविषयी फारसं काही माहीत नाही, त्यांना मात्र या मुलाखती समाधान देऊ शकतात. याशिवाय या अंकात कथा आहेत, एक नाट्यछटाही आहे. बारा-तेरा लेख आहेत आणि ६०-७० कविता आहेत, पण या अंकातला खरा ‘ऐवज’ सहा मुलाखती हाच आहे.

सर्वोत्तम, उत्तम मध्यम आणि मध्यम मध्यम या तिन्ही विभागात मुलाखतींचाच समावेश करावा लागेल.

‘संवाद’, संपादक – किशोर पाठक, पाने – १६८, मूल्य – १५० रुपये.

editor@aksharnama.com