अमित शहांना इशारा, नरेंद्र मोदींना दिलासा
पडघम - गुजरात निवडणूक २०१७
राजा कांदळकर
  • नरेंद्र मोदी आणि अमित शहा
  • Tue , 19 December 2017
  • पडघम गुजरात निवडणूक २०१७ Gujarat Elections 2017 नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP काँग्रेस Congress

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला ९९ जागा मिळाल्या. त्या मिळवून हा पक्ष सत्ता स्थापन करेल. हा आकडा भाजपच्या दृष्टीनं विजयाचा असला तरी शानदार नक्कीच नाही. कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजरातमध्ये आम्ही १५० जागा जिंकू, विरोधकांना २०-२५ जागा मिळतील, अशा वल्गना करत होते. काँग्रेसची चेष्टा करण्यासाठी हे आकडे भाजप नेते सांगत होते. खुद्द काँग्रेसलाही आपण किती जागा जिंकू याचा अंदाज नव्हता. पण लोक भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारविषयी नाराज होते. ती नाराजी त्यांनी या निवडणुकीत व्यक्त केली.

८० जागा मिळवून काँग्रेसनं गुजरात विधानसभेत दमदार विरोधी पक्ष म्हणून प्रवेश केला आहे. गुजरातच्या जनतेनं मोदी-शहा यांच्या अरेरावीला उत्तर दिलंय आणि त्याचबरोबर विरोधी पक्षांना अधिक काम करावं लागेल, हा संदेशही दिलाय.

या निवडणुकीत वडगाम विधानसभा मतदारसंघात जिग्नेश मेवानी हे विजयी झालेत. त्यांचा विजय महत्त्वाचा आहे. उना परिसरात दलितांवर अन्याय झाला होता. त्याविरोधात मेवानी उभे राहिले. त्यांनी गुजरातच्या दलित जनतेचं नेतृत्व केलं. त्यांच्या रूपानं देशाला एक नवा दलित नेता मिळाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावती आणि भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यापलीकडे जाऊन दलित समाजाला एक नेता मिळाला आहे.

अल्पेश ठाकूर हा ओबीसी समाजाचा आश्वासक नेताही निवडून आलाय. त्याचं नेतृत्वही आश्वासक आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालानं दाखवून दिलं की, अहंकारी नेतृत्वाला जनता पसंत करत नाही. मोदी-शहा यांच्या एकछत्री नेतृत्वाला जनतेनं इशारा दिलाय की, हे आम्हाला मान्य नाही. सावध व्हा. अन्यथा तुम्हाला आम्ही हरवू.

२०१९ला लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांसाठी मोदी-शहा या जोडगोळीला या निवडणुकीनं इशारा दिलाय. गुजरामध्ये १५० जागा मिळवू, काँग्रेस व विरोधकांना २०-२५ जागांवर अडवू हा मोदी-शहा यांचा अतिविश्वास गुजराती मतदारांनी धुळीस मिळवला आहे. सत्ता भाजपची आली हे खरंच, पण भाजपला गुजराती मतदारांनी दिलेला धडा महत्त्वाचा आहे. तो धडा असा की, सत्ता डोक्यात जाऊ देऊ नका. राज्य करायचं असेल तर खूप नम्रपणे लोकांचा आदर करा. अन्यथा लोक तुम्हाला खड्यासारखं बाजूला करतील.

गुजरात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेच्या पायाच्या विटा या निवडणुकीत हलल्या आहेत. गुजरातचे चार मंत्री हरले. या मंत्र्यांमध्ये कृषिमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांचा समावेश आहे. याचा अर्थ असा की, लोक नाराज होते. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हरता हरता वाचले आहेत. लोकांनी किती नाराजी व्यक्त केली आहे, त्याचे हे द्योतक म्हणता येईल. गुजरात विधानसभेची निवडणूक ही काँग्रेस व भाजप या दोघांनाही महत्त्वाचे राजकीय संदेश देणारी आहे.

लोकशाहीत प्रत्येक निवडणूक हा एक उत्सव असतो. इंग्रजी प्रसारमाध्यमं निवडणुकांचं वर्णन ‘डान्स ऑफ डेमॉक्रसी’ असं करतात. या उत्सवातून राजकीय नेत्यांचं, राजकीय पक्षांचं आणि मतदारांचंही शिक्षण होत असतं. गुजरात विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक होती. या राज्यात २२ वर्षं भाजपची एकछत्री सत्ता आहे. भाजपनं गुजरात विकासाचं मॉडेल तयार करून स्वत:च्या सत्ताकारणाची, राजकारणाची शैली विकसित केली आहे. या राजकीय शैलीत हिंदू व्होट बँक ही एक महत्त्वाची संकल्पना भाजपने विकसित केली आहे. देशात हिंदू मताची एक बँक असावी, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचं स्वप्न होतं. हे गुजरातमध्ये प्रयोगशाळा उभारून भाजपनं वास्तवात आणलं होतं. या हिंदू व्होट बँकेच्या जोरावर गेली २२ वर्षं भाजप विधानसभा निवडणुका जिंकत होतं. काँग्रेसला धूळ चारत होतं.

काँग्रेसला या हिंदू व्होट बँकेशी संवाद साधण्यात, तिला आपला विचार सांगण्यात अडथळे येत होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे हिंदू व्होट बँकेशी बोलू शकत नव्हते. सोनियांचं परदेशी असणं, मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा या अडचणी होत्या. गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं राहुल गांधी यांनी पहिल्यांदा हिंदू व्होट बँकेशी बोलण्याचा प्रयत्न केला. ते गुजरातमध्ये मंदिरांमध्ये आवर्जून गेले. दर्शन, पूजा करू लागले. काँग्रेसच्या मंचावर हिंदू धर्मातील विविध जातीचे नेते यांचा वावर वाढला. पटेल, ओबीसी, हिंदू दलित यांच्याशी राहुल त्यांच्या प्रश्नावर बोलता बोलता आपण सगळे हिंदू आहोत, एकोप्यानं राहू, सदभाव वाढवू, विकास करू, द्वेष भावना संपवू असा संदेश आपल्या भाषणातून देत होते.

या निवडणुकीत पटेल, ओबीसी, दलित यांच्याशी राहुल त्यांच्या प्रश्नावर हिंदू नेता म्हणून बोलत होते. यापूर्वी असं घडताना दिसत नव्हतं. ते गुजरात निवडणुकीत झालं. या निवडणुकीत काँग्रेसला ४३ टक्के मतं पडली. २०१२च्या विधानसभेच्या मतांपेक्षा चार टक्के मतं यावेळी काँग्रेसची वाढली आहेत. काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आलं नसलं तरी काँग्रेस हा गुजरातमधल्या सर्व घटकांचा पक्ष आहे, हे या वाढलेल्या मतदानातून स्पष्ट झालं.

राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये सोमनाथ मंदिराचं दर्शनं घेतलं, तेव्हाच भाजपचे नेते सावध झाले होते. राहुल जर असं मंदिर दर्शन करत राहिले, हिंदू नेता म्हणून हिंदू व्होट बँकेशी संवाद साधू लागले, तर आपल्या हिंदू व्होट बँकेला धक्का लागेल हे भाजपनं तात्काळ ओळखलं. म्हणूनच सोमनाथ मंदिरात राहुल ‘हिंदू’ म्हणून गेले की ‘अहिंदू’ म्हणून, हा मुद्दा भाजपनं प्रसारमाध्यमांच्या मदतीनं प्रभावीपणे उभा केला. राहुल यांनी सोमनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या रजिस्टरमध्ये स्वत:चा धर्म ‘अहिंदू’ लिहिलाय अशी माहिती पुढे आणण्याची खेळी भाजपनं खेळली. तो निवडणुकीचा मुद्दा बनवला.

या संवेदनशील मुद्द्याला काँग्रेसनंही हुशारीनं टोलवलं. काँग्रेस प्रवक्ते रणजित सिंग सुरतेवाला यांनी राहुल हे जाणवेधारी हिंदू आहेत, असं सांगून अहिंदू मुद्द्याची हवा काढून घेतली. पुढे जाऊन काँग्रेसनं राहुल हे नुसते जाणवेधारी हिंदू नाहीत, तर शिवभक्त आहेत असंही सांगितलं.

राहुलच्या शिवभक्त असण्याचा संदर्भ काश्मिरी पंडित घराण्याशी नातं सांगणारा आहे. राहुल हे मोतीलाल नेहरू, पं. नेहरू, इंदिरा गांधी यांचे वारस आहेत. हे तिघेही काश्मिरी पंडित घराण्यातले. इंदिरा गांधी शिवभक्त होत्या. काश्मिरी पंडित शिवाला खूप मानतात. शिवरात्री हा त्यांचा मोठा उत्सव असतो. इंदिरा या शिवरात्रीचा उपास करत आणि त्यादिवशी पूजाअर्चा करत हा इतिहास काँग्रेसकडून माध्यमांत उजळवण्यात आला. भाजप जर धर्माचं राजकारण करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न दिसत होता.

राहुल यांची हिंदू नेता म्हणून नवी ओळख गुजरात निवडणुकीत पुढे आणताना काँग्रेसनं एक गोष्ट हुशारीनं केली. २००२च्या हिंदू-मुस्लिम दंग्यांचा मुद्दा काढणं, त्याची चर्चा करणं काँग्रेसनं टाळलं. कारण अल्पसंख्याकांचे प्रश्न, धर्मनिरपेक्षता हे मुद्दे पुढे आणले की, भाजप काँग्रेसला मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष म्हणून हिणवायला लागते. भाजप आणि संघ परिवाराच्या अशा प्रकारच्या सततच्या गैरप्रचारातून अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्षता हे मुद्दे म्हणजे मुस्लिम हिताचं राजकारण असा गैरसमज पेरला गेलाय. यातून हिंदू मतं बिथरतात, हे काँग्रेसला कळून चुकलंय. त्यामुळे या निवडणुकीत १० टक्के मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचा मोह काँग्रेसनं टाळला.

काँग्रेसचा नेता म्हणून राहुल गांधींनी हिंदू मतदारांशी संवाद साधला, त्यांच्या सभांना प्रतिसाद मिळाला, त्यांच्या सभेत ‘जय सरदार, जय भवानी, जयभीम’ अशा घोषणा घुमल्या. यामुळे भाजप गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातच हडबडली होती. म्हणूनच मणिशंकर अय्यर नरेंद्र मोदी यांना ‘नीच’ म्हणाल्याचा मुद्दा आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या उपस्थितीतली बैठक हे दोन्ही मुद्दे हिंदू मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपनं खुबीनं वापरले. राहुल आणि काँग्रेसपासून हिंदू मतं दूर ठेवणं हाच त्याचा उद्देश होता. मणिशंकर यांच्या ‘नीच’ उल्लेखाचा वापर करत मोदींनी हिंदू ओबीसींना काँग्रेसपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम या निवडणुकीत भाजपच्या विजयात दिसतो.

राहुल यांच्या रूपानं हिंदू व्होट बँकेशी संवाद साधणारा नेता मिळाला ही एक मोठी उपलब्धी काँग्रेसला लाभलीय. काँग्रेस हा अल्पसंख्याक केंद्री पक्ष आहे असं वारंवार सांगून भाजप काँग्रेसवर कुरघोडी करायचा, त्याला आता राहुल गांधी उत्तर देऊ शकतील. ती कला गुजरात निवडणुकीत राहुल यांना प्राप्त झालीय.

१९९२साली अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात हिंदू व्होट बँक तयार करण्यात भाजपला यश आलं. त्यानंतर काँग्रसचा हिंदू मतदार भाजपनं खेचला. उत्तर भारतात सर्व राज्यात त्याचा परिणाम झाला. त्यामुळे पंजाब सोडला तर आज उत्तरेत सर्व छोट्या-मोठ्या राज्यांत भाजपची सत्ता आहे. हिंदू मतं दुरावल्यानं ही ताकद घटली.

राहुल आता काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. काँग्रेसची गेलेली शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील. या प्रयत्नात त्यांना हिंदू मतदारांना विश्वासात घ्यावं लागेल, तरच काँग्रेसला गतवैभव पुन्हा मिळू शकेल. राहुल यांना हिंदू मतदारांशी बोलण्याचा सूर गुजरात निवडणुकीत सापडल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आत्मविश्वास मिळेल.

पुढील वर्षात राजस्थान, मध्यप्रदेश या मोठ्या राज्यांत विधानसभांच्या निवडणुका आहेत. या दोन्ही राज्यांत हिंदू व्होट बँक प्रभावी आहे. त्या जोरावर तिथं भाजपची सरकारं आहेत. त्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये राहुल हिंदू मतदारांशी कसं बोलतात, त्यांना कसं पटवतात याची चाचणी होईल. त्यात राहुल यशस्वी झाले तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या नेतृत्वाचा करिष्मा काँग्रेसला गतवैभव परत मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. राहुल हे देशातले सर्वांचे नेते म्हणून मान्यता मिळवू शकतील.

भाजपला या निवडणुकीनं संदेश दिलाय की, अमित शहांची दादागिरी चालणार नाही. नरेंद्र मोदी यांचा विकासाचा विचार ठीक आहे. यापुढे भाजपनं विकास केला पाहिजे, अन्यथा आम्ही अन्य पर्याय निवडू असा इशारा गुजराती मतदारांनी दिलाय.

गुजरातचा जनादेश २०१९सालासाठी मार्गदर्शक ठरेल असा आहे. भाजपने लोकांचे प्रश्न सोडवले तर ठीक, नाहीतर आम्ही काँग्रेसला निवडून देऊ, सत्तेवर बसण्याची संधी देऊ हा संदेश या निवडणुकीनं दिलाय. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी यातून बोध घेतला पाहिजे.

थोडक्यात गुजरात निवडणुकीत अमित शहांना मतदारांनी इशारा दिलाय, तर मोदींना दिलासा दिलाय असं म्हणता येईल.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.