मला पुस्तकं वाचायला का आवडतात?
पडघम - बालदिन विशेष
तनया टेंबे
  • लेखिका पुस्तकांच्या गराड्यात
  • Mon , 14 November 2016
  • बालदिन विशेष पालक Children's Day हॅरी पॉटर फेमस फाइव्ह Young readers

तुम्हाला कुठले छंद आहेत? मला आहेत. मला अनेक छंद आहेत, पण त्यांपैकी पुस्तक वाचणं हा माझा आवडता छंद आहे. तो आवडता होण्याचं कारण म्हणजे मी अगदी दोन वर्षांची छोटी मुलगी होते, तेव्हा माझे आई-बाबा – विशेषत: आई – मला खूप पुस्तकं वाचून दाखवायचे. आम्ही सुरुवातीला चित्रांच्या गोष्टींची पुस्तकं वाचायचो. त्यानंतर पऱ्यांच्या गोष्टी वाचायला लागलो. असं करत करत बेडटाइम स्टोरी बुक्स वाचण्यापर्यंत आम्ही मजल मारली. माझ्या मावशीने मला पुष्कळ मराठी पुस्तकं वाचण्यासाठी आणून दिली होती, पण त्या वेळी मी फक्त पाच वर्षांची असल्याने मला वाचता येत नव्हतं. त्यामुळे रोज रात्री आई पार थकून गाढ झोपी जाईपर्यंत मी तिला गोष्टी वाचून दाखवायला लावायचे. ‘तोत्तोचान’, ‘जोयानाचे रंग’ आणि माझं खास आवडतं पुस्तक – ‘मोरू-मैना’. ही पुस्तकं मला आजही आठवतात. माझी आई मला इंग्रजी पुस्तकंही वाचून दाखवायची. त्यांपैकी ‘थंबलीना’, ‘हॅन्सल अँड ग्रेटेल’, ‘द वुल्फ’ आणि ‘द सेव्हन लॅम्बस’ ही पुस्तकं मला आजही आठवतात.

जेव्हा मी सहा वर्षांची झाले, तेव्हा मला पुस्तकं वाचायला फारसं आवडतं नव्हतं, कारण त्यावेळी मी नुकतंच वाचायला शिकले होते. त्यामुळे चित्रविचित्र दिसणारे शब्द उच्चारणं आणि वाचणं ही मला डोकेदुखी वाटायची, पण तरी तेव्हाही मला गोष्टी ऐकायला आवडायच्याच. माझे आई-बाबा मी वाचावं म्हणून मला सतत भरीस घालायचे आणि मी नको-नको करायचे, पण शेवटी मला वाचावंच लागायचं.

असं करता करता मी सात वर्षांची झाले. आता मला इंग्रजी नीट वाचता येत होतं. मी अगदी मोजकी आणि निवडक पुस्तकं वाचायला लागले होते. पण अजूनही मला आईने पुस्तकं वाचून दाखवायला हवी होती, कारण अजून मला माझ्या कल्पनेतलं पुस्तक मिळायचं होतं.

माझ्या आठव्या वाढदिवसाला मला पहिल्यांदा रोआल्द दालच्या चार पुस्तकांचा संच मिळाला – ‘द मॅजिक फिंगर’, ‘जॉर्जस मार्व्हलस मेडिसिन’, ‘द पेलिकन’, ‘मंकि अँड द जिराफ’ आणि ‘आयसोट्रोट’. ही पु्स्तकं माझ्या हातात आली, तेव्हा मी ती नीट चाळूनसुद्धा पाहिली नाहीत आणि परस्पर पुस्तकांच्या कपाटात लोटून दिली. काही महिन्यांनंतर एके दिवशी मला खूप बोअर होत होतं आणि करायला काहीच नव्हतं (टीव्ही पाहायचीही परवानगी नव्हती.), त्यावेळी मला या पुस्तकांची आठवण झाली. ती वाचून मी माझा कंटाळा घालवण्याचा प्रयत्न केला.

या संचातलं ‘द मॅजिक फिंगर’ हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं. ते सुरुवातीला फार इंटरेस्टिंग नव्हतं, पण तरीही मी वाचत राहिले. नंतर नंतर ते फारच इंटरेस्टिंग होत असल्याचं मला जाणावलं. मग मी ते पूर्ण वाचून काढलं. या सगळ्यात एक आठवडा संपला होता. आता मला टीव्ही बघायचीही परवागी होती, पण आता मला पुढचं पुस्तक वाचून पाहावंसं वाटत होतं. माझं अगदी बरोबर होतं. मला दुसरं पुस्तक पहिल्यापेक्षाही जास्त आवडलं. ते वाचताना मला अगदी टीव्ही बघितल्यासारखंच वाटलं. त्यातली संपूर्ण गोष्ट जणू माझ्या डोळ्यापुढे घडत असल्याची कल्पना मी करू शकत होते. पुढच्या दोन महिन्यांमध्ये मी चारही पुस्तकं वाचून संपवली. तेव्हा एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली, ‘वाचन ही माझ्यापाशी असलेली खास गोष्ट होती.’

मग मी माझ्या पुस्तकांच्या छोट्या कपाटाचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. ज्या गोष्टी मी करोडो वेळा ऐकल्या होत्या, त्या गोष्टींची पुस्तकं पुन्हा वाचून काढली. ही पुस्तकं वाचताना मला नव्याने आनंद मिळाला. माझा दिवसभराचा थकवा आणि रिकामपणा पळून जायला लागला.

लवकरच पुस्तकांच्या कपाटातली सगळी पुस्तकं वाचून संपली. पूर्वी कुठल्याही इतर गोष्टीसाठी न अनुभवलेली पुस्तकांबद्दलची अनिवार ओढ माझ्या मनात दाटून आली होती. मग मी माझ्या मित्र-मैत्रिणींकडून पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात केली. जेव्हा माझ्या बाबाला माझी पुस्तकांबद्दलची ओढ जाणवली, तेव्हा त्याने मला एक मोठं सरप्राईज दिलं! कुठलं माहितीये? लायब्ररी! ती लायब्ररी लावण्यासाठी मी अगदी उतावीळ झाले होते. मी बाबाबरोबर लायब्ररीत गेले, तेव्हा इतकी पुस्तकं पाहून वेडी झाले. जगात इतकी पुस्तकं अस्तित्वात असल्याचं त्यापूर्वी मला माहीत नव्हतं.

एका वेळी दोन पुस्तकं नेण्याची मुभा असलेली योजना आम्ही सुरुवातीला घेतली. प्रत्येक वेळी लायब्ररीत गेल्यावर मला माझ्या आवडीचं काहीतरी वाचायला मिळायचं. त्यामुळे मला लायब्ररीत जायला आवडायला लागलं. जेव्हा मी पहिल्यांदा लायब्ररीत गेले, तेव्हा मी आधी जेरोनिमो स्टिल्टन आणि नंतर थिया स्टिल्टन वाचायला सुरुवात केली. काही महिन्यांनी मला स्पेल सिस्टर्सची नवी मालिका मिळाली. मग मी ‘टिंकल डायजेस्ट’सारखी कॉमिक्स वाचायला सुरुवात केली. मग काही महिन्यांनी मी पऱ्यांच्या धडासी कथांसारखी पुस्तकं वाचायला लागले.

मग मी नऊ वर्षांची झाले, तशी माझी आवड बदलायला लागली. मला विज्ञानकथा आणि कथा वाचायला आवडायला लागल्या. पऱ्यांच्या गोष्टी बंद झाल्या! एके दिवशी आई-बाबा घरात नव्हते. मी एकटीच होते आणि लायब्ररीची सगळी पुस्तकं वाचून संपली होती. मला बोअर होत होतं. मग मी माझ्या बाबाचं पुस्तकांचं कपाट धुंडाळायला सुरुवात केली. तिथं मला हॅरी पॉटर आणि सॉर्सरर्स स्टोन हे पुस्तकं सापडलं. मी ती वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला ही पुस्तकं वाचताना मला बोअर झालं, पण करण्यासारखं दुसरं काहीच नसल्याने आणखी कंटाळण्यापेक्षा मी वाचत राहिले. थोड्या वेळाने ही पुस्तकंही इंटरेस्टिंग असल्याचं मला जाणवलं. मग मी ती पुस्तकंही वाचून संपवली. त्यानंतर बाबाने मला आणखी एक सरप्राईज दिलं! लायब्ररीची एका वेळी चार पुस्तकं घेता येण्याची योजना त्याने माझ्यासाठी घेतली. मग मी हॅरी पॉटरची संपूर्ण मालिका वाचायला घेतली आणि वर्षभरात या मालिकेबरोबर फेमस फाइव्ह नावाची आणखी एक मालिकाही वाचून काढली.

मी दहा वर्षांची होताना जॅकलिन विल्सन, फाइव्ह फाइंड-आउटर्स आणि सिक्रेट सेव्हन वाचायला  सुरुवात केली. आता मला पुस्तकं वाचणं लहानपणापेक्षाही आवडायला लागलं होतं. माझ्या वाचनाच्या वेडापायी मी त्या वेळी आणि आजही अनेकदा अडचणीत सापडते. पण त्याचा माझ्या वाचण्याच्या ओढीवर काहीएक परिणाम होत नाही. माझा नवीन पुस्तकांचा शोध चालूच राहतो.

आता मी अकरा वर्षांची आहे. अजूनही मी जॅकलिन विल्सन वाचते, पण त्याचबरोबर ‘हंगर गेम्स’, ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ आणि ‘नॅन्सी ड्रयू’सारखी पुस्तकंही वाचते. भविष्यात ‘मेझ रनर’ आणि ‘पर्सी जॅक्सन’ ही पुस्तकं वाचायचं डोक्यात आहे.

वाचनामुळे एका खोलीत बसून तुम्हाला लाखो ठिकाणांची सफर घडते. वाचनामुळे तुम्हाला कुणा दुसऱ्याचं आयुष्य अनुभवता येतं. वाचनामुळे तुम्हाला वास्तवापासून पळही काढता येतो. माझ्यासाठी तर वाचन स्वर्गसुखच आहे! वाचनामुळे झालेल्या दोन गोष्टींसाठी मी स्वत:ला नक्कीच नशीबवान समजते. एक म्हणजे मला प्रवास करायला खूप आवडतो. एकाच पुस्तकातून मी हजारो ठिकाणचा प्रवास करू शकते. आणि दुसरी, जर मला वाचायची आवड नसती तर मी तुमच्यासाठी हा लेख लिहू शकले नसते.

 

लेखिका सहाव्या इयत्तेत शिकत आहे.

twinklingtanaya@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......