गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट
पडघम - बालदिन विशेष
टीम अक्षरनामा
  • प्रस्तुत लेखात उल्लेख आलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Mon , 14 November 2016
  • बालदिन विशेष Winnie the Pooh Little Mermaid Children's Books Children's Day

हंड्रेड नव्हे फाईव्ह थाऊजण्ड एकर वूड

ए. ए. मिल्ने यांच्या लेखणीतून आणि पी. एच. शेपर्ड या चित्रकाराच्या कुंचल्यातून जिवंत झालेलं ते मनस्वी अस्वल, 'विनी द पूह' आजही अवघ्या जगाचं लाडकं आहे. ते आणि त्याची मित्रमंडळी 'हंड्रेड एकर वुड' नावाच्या जादूई राईत राहतात.  बाहेरच्या जगातली धावपळ, झिगझिग, दुष्टावे,  स्पर्धा आणि त्यातून येणारं कोरडं, प्रेमहीन जगणं यांच्यापासून अभय मिळालेली ही वनराई आहे. विनी द पूह, छोटं पिगलेट, टिग्गर नावाचा सतत टणाटण उड्या मारणारा वाघोबा, आई कांगाचं पिलूरू, सतत ओशाळगत इयॉर गाढव, पूहचा जीवाचा सखा ख्रिस्टोफेर रॉबिन असे सगळे तिथं राहतात. त्यांचे खेळ, सहली, उद्योग, निरुद्देश्य भटकंती या साऱ्यामध्ये हंड्रेड एकर वुड सतत सोबत असतं. या भारलेल्या जगाचा भाग होण्यासाठी पुस्तकाच्या पानांत शिरण्याचा मोह आवरणं कठीण. ते शक्य नसलं, तरी  विनीचं हे जग ज्या खऱ्याखुऱ्या वनाच्या आधारे उभं राहिलं त्या 'फाईव्ह थाऊजण्ड एकर वूड'मधून भटकंती शक्य आहे. लंडनच्या आग्नेय दिशेला मैलोनमैल पसरलेल्या अॅशडाऊन जंगलामध्ये ही वनराई आजही तशीच राखलेली आहे. मिल्ने यांचा मुलगा ख्रिस्तोफर रॉबिन याचं लहानपण इथं गेलं. विनीच्या पुस्तकांतील पात्रं म्हणजे जशी ख्रिस्तोफर आणि त्याची खरी खेळणी होती तसाच हा परिसरही खरा आहे. या पुस्तकांचे चाहते आजही इथं मोठ्या प्रमाणात येतात. सिल्वर बर्च आणि पाइन वृक्षांच्या सोबतीनं इथल्या पायवाटांवरून चालतात. त्यांना गोष्टींतल्या कितीतरी खुणा तिथं सापडतात. पूहस्टिक्स खेळाचा शोध लागला तो नदीवरचा लाकडी पूल, पूह आणि पिगलेटने ईयोरसाठी बांधलेलं काटक्यांचं घर, उत्तर ध्रुवाच्या दिशेनं जाणारी पायवाट असं बरंच काही तिथं आहे. हे वर्ष विनी द पूहच्या गोष्टीची नव्वदी साजरी करतंय. त्यामुळे या जंगलातला पदरव वाढला असणार. पण पूहची भेट घडायची तर दिशादर्शक पाट्या पाहत फिरण्याऐवजी आपल्याच विचारांत दंग होत स्वछंद भटकणं जास्त लाभदायक, हे त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना वेगळं सांगायला नको.

उदास एकटी छोटी मरमेड

डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनच्या बंदरावर, एका मोठ्याशा खडकावर छोटी मरमेड उदास बसून आहे. डेन्मार्कचं राष्ट्रीय स्मारकच म्हणावं इतका मान आहे तिला. पर्यटकांची गर्दी तिच्या अवतीभोवती सतत असते. कॅमेरे क्लिकक्लिकत असतात सतत. मरमेडला त्याचं काहीच नाही. तिची नजर पाण्याखालचं आपलं ओळखीचं जग कुठे दिसतंय का याचा शोध घेते आहे. हॅन्स अँडरसन आपल्या गोष्टीत चितारलेली तिच्या मनाची विषण्ण अवस्था एडवर्ड एरिकसन या शिल्पकाराने जशीच्या तशी या शिल्पात उतरवली आहे. कार्ल जेकबसन नावाच्या धनिकाने मरमेडच्या गोष्टीवर रचलेला एक बॅले पाहिला. तो पाहून भारावलेल्या जेकबसननं तिची मूर्ती घडवण्याचं काम एरिकसनला दिलं. एरिकसननं आपल्या पत्नीला मॉडेल म्हणून बसवून हे शिल्प घडवलं. ते कोपेनहेगेनच्या बंदरावर ठेवलं गेलं. त्या गोष्टीला आता साली १०३ वर्षं झाली. मधल्या काळात मरमेडच्या पुतळ्याची विटंबना खूप झाली. कधी तिचा हात कुणी कलम केला, कधी डोकं उड़वलं, कधी तिच्यावर रंग ओतले गेले, तर कधी बुरखे पांघरले गेले. मरमेड मुळचीच सोशिक. खरं तर माणसांच्या जगाचं तिला कोण आकर्षण. त्यासाठी आपलं समुद्राखालचं जग सोडलं तिने. माणसांच्या मनातल्या या विकृतीबद्दल काही म्हणायचं असेल तिला? पण ती बोलणार कशी? इथं येण्यासाठीच तिने आपला आवाज देऊन नाही का टाकला त्या दुष्ट समुद्री चेटकिणीला?

पुलाखालचा ट्रॉल

सीएटलमधल्या ऑरोरा पुलाखाली तो १९९० साली वस्तीला आला. १८ फूटी उंच, भयानक चेहऱ्याचा. चेहऱ्यावर पसरलेल्या केसांच्या जटा, वटारलेला एकच धातूचा  डोळा, हाताखाली दाबून धरलेली छोटी गाड़ी जशी काही आताच वरच्या पुलावर हात घालून उचलून घेतलेली असावी. हा अगडबंब राक्षस थेट 'थ्री बिली गोट्स' नावाच्या लहान मुलांच्या लोकप्रिय लोककथेतून इथं आलाय. कथेत त्याचं काम पुलावरून येणा-जाणाऱ्यांना खाऊन टाकणं हेच असलं तरी इथं त्याच्या असण्यामागचं कारण नेक आहे. भंगार टाकण्याची आणि गर्दुल्ल्यांच्या हक्काची बनलेली ही पुलाखालची जागा वर्दळीची व्हावी या हेतूने स्थानिक प्रशासनानं नागरिकांकडून कल्पना मागवल्या होत्या. त्यासाठी झालेल्या स्पर्धेत चार स्थानिक कलाकारांनी हा ट्रॉल उभा करण्याची शक्कल लढवली. त्यांना पहिलं बक्षीस मिळालं आणि पुलाखालच्या निर्जन जागेला कायमचा राखणदार! तो घाबरवत कुणाला नाही, पण त्याला बघायला येणाऱ्या, त्याच्या अंगाखांद्यावर बसून फ़ोटो काढणाऱ्यांमुळे इथं जाग मात्र असते. लोककथा जुन्या होत नाहीत. रूपं बदलत त्या पुन्हा पुन्हा भेटीला येतच राहतात. सीएटलच्या ट्रॉलचं म्हणणं बहुदा हेच असावं.

हरवलेल्या मुलांची आठवण

घटना खरीच आहे असं सगळे म्हणतात. गावाला उंदरांच्या जाचापासून सोडवायचा उपाय घेऊन कुणी रंगबिरंगी कापड्यातला माणूस आला. आपल्या पुंगीच्या तालावर नाचवत त्याने खरंच उंदरांना गावाबाहेर नेलं. गावकऱ्यांनी मात्र आपलं काम निभल्यावर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. मग मात्र चिडलेल्या पुंगीवाल्याने तोच प्रयोग गावातल्या लहान मुलांवर केला. शे- दीडशे मुलांचा तो घोळका त्याच्यामागून नाचत गेला, तो पुन्हा कधी कुणालाही दिसला नाही. घटना घडून म्हणे ७२५ वर्षं होऊन गेलीत. मधल्या काळात या घटनेची एक सुप्रसिद्ध लोककथाही बनून गेली. पण ती जिथं घडली ते जर्मनीतलं हाम्लेन गाव आजही रोज त्यांची आठवण जागवतं. हाम्लेन गावातल्या मुख्य चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सगळीकडे उंदीरच उंदीर दिसतात. खरे नाहीत, चितारलेले. या रस्त्यांवर आजही कुणी गाणं बजावणं करत नाही.  मुख्य चौकात मध्यभागी पूंगीवाल्याचा पुतळा उभा आहे. तिथल्या मॅरेज हाऊसच्या खिड़कीत उभ्या चावीच्या बाहुल्या अनेकदा ती गोष्ट सांगतात. उन्हाळी दिवस असतील तर खरोखरीचं संगीतिकही सादर केलं जातं. ही गोष्ट म्हणजे त्या गावाची मुख्य ओळख आहे. त्यामुळे पर्यटनस्थळ म्हणून त्याचा गाजावाजा खूप होतो. पण त्या साऱ्याच्या मूळाशी अखेर हरवलेल्या मुलांची आठवणच आहे… ज्यांचं गूढ़ अजूनही सुटलेलं नाही.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......