टिपू सुलतान : जमातवादाचा बळी ठरलेला लोकोत्तर इतिहासपुरुष
पडघम - सांस्कृतिक
सरफराज अहमद
  • टिपू सुलतान
  • Fri , 10 November 2017
  • पडघम सांस्कृतिक टिपू सुलतान Tipu Sultan

आज टिपू सुलतानची जयंती. भाजपनं निर्माण केलेल्या टिपू सुलतान वादावर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी पडदा टाकला होता, पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी पुन्हा एकदा पक्षाच्या अधिकृत ट्विटर पेजवरून टिपू जन्मोत्सवावरून कर्नाटक सरकारवर निशाणा साधला. याचा अर्थ भाजपला हा वाद पेटत ठेवायचा आहे. अमित शहांच्या या टीकेकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे हा वाद तूर्तास शमला आहे, पण केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या विधानामुळे देशभरात गदारोळ माजला. इतिहासप्रेमींनी काही ठिकाणी हेगडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे; पण येत्या काळात हा वाद पुन्हा डोकं वर काढू शकतो. या वादामागे नेमकं कारण काय आहे?

.............................................................................................................................................

भारतीय समाजमनाला नेहमीच इतिहासपुरुषांच्या अलौकिक कर्तृत्वाचं आकर्षण वाटत आलं आहे. त्यांच्या इतिहासाची सातत्यानं चर्चा होत राहिली आहे. भारतीय समाजोद्धाराच्या अनेक चळवळी इतिहासपुरुषांच्या प्रेरक कार्यातून उभ्या राहिल्या आहेत. या इतिहासपुरुषांचा इतिहास वेगवेगळ्या विचारधारेतून रेखाटण्यात आला आहे. वेगवेगळ्या समाजवर्गातल्या महापुरुषांनी घडवलेला इतिहास आधुनिक काळात वेगवेगळ्या दृष्टींनी मांडण्यात आला आहे. त्यातून भारतीय समाजात अनेक स्थित्यंतरं घडली आहेत. या स्थित्यंतरांमधून भारतीय समाजमन समृद्ध झालं आहे. त्याच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. भारतीय समाज प्रगतीकडे झेपावत असला, तरी मुस्लीम राज्यकर्त्यांच्या इतिहासाविषयी भारतीय समाजात प्रचंड चुकीच्या समजुती रूढ आहेत. जमातवादी इतिहासलेखकांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

पूर्वग्रहदूषित इतिहासलेखकांमुळे भारतीय समाजाला मुस्लीम राज्यकर्त्यांच्या इतिहासाचं सत्य स्वरूप समजू शकलेलं नाही. त्यामुळेच मुस्लिमांच्या अनेक अलौकिक इतिहासपुरुषांविषयी भारतीय समाजातून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. समाजाचे नायक म्हणून ज्यांची ओळख व्हावी, ते इतिहासपुरुष आज खलनायक म्हणून हिणवले जात आहेत. समाजाच्या सुखाची स्वप्नं पाहिलेले हे लोकनायक तिरस्काराचा विषय ठरले आहेत. अशा तिरस्काराचा बळी ठरलेले दोन लोकोत्तर इतिहासपुरुष म्हणजे - ‘नबाब फतेहबहादूर हैदरअली खान’ आणि ‘फतेहअली टिपू सुलतान’.

म्हैसूरच्या इतिहासाचं जमातवादी लेखन

आधुनिक काळात टिपूचा इतिहास लिहिण्याची सुरुवातच मुळात त्यांच्या शत्रूंकडून म्हणजे इंग्रजांकडून करण्यात आली. शत्रूपक्षातले इतिहासकार प्रतिस्पर्धी राज्यकर्त्यांचा इतिहास कधीच प्रामाणिकपणे मांडत नाहीत. हे इतिहासकार स्वपक्षापेक्षा प्रतिस्पर्ध्याला कायम कमअस्सल ठरवतात. ते जेत्यांचे कालखंड लोकहितनिष्ठूर असल्याचे प्रकर्षाने मांडतात. टिपूचा इतिहास लिहिणार्‍या गोऱ्या इतिहासकारांना वसाहतवादी धोरणाचा प्रचार करायचा होता. त्यामुळे त्यांनी वसाहतवादाच्या विरोधात संघर्ष करणार्‍या प्रत्येक राज्यकर्त्याला बदनाम केलं. भारतीय समाजात द्वेषपेरणी करण्यासाठी इंग्रजांनी या राज्यकर्त्यांना जातीयवादी ठरवलं. त्यातून भारतीय समाजात द्वेषाची भिंत उभारून वसाहतवादी इतिहासकारांनी इंग्रजी सत्ता बळकट केली. इंग्रजांनी अशा पद्धतीनं फूट पाडून भारतीयांवर राज्य केलं. हीच पद्धत आजच्या जमातवाद्यांनी स्वीकारली आहे. अल्पसंख्य धर्ममार्तंडांच्या हाती सत्तेची सर्व सूत्रं राहावीत यासाठी या मार्तंडांनी इतिहासाचं जमातवादीकरण केलं आहे. त्यातून मुस्लीम राज्यकर्त्यांच्या इतिहासाचा विपर्यास करून तो मांडला जात आहे.

टिपूविषयीचे गैरसमज याच जमातवादी इतिहासकारांनी दृढ केले आहेत. त्यासाठी त्यांनी वसाहतवादी इंग्रज इतिहासकारांच्या ग्रंथातले संदर्भ मोठ्या खुबीनं वापरले आहेत. टिपूच्या बदनामासाठी एक मोहीमच राबवली आहे. या इतिहासकारांच्या मांडणीत मोठं साम्य आणि त्यांच्या लेखनात सातत्य आहे. मग ते खरे यांनी लिहिलेलं ‘श्रीरंगपट्टणमची स्वारी’ हे पुस्तक असेल, आपटे यांचं ‘श्रीरंगपट्टणमची मोहीम’ असेल, सावरकरांचं ‘सहा सोनेरी पाने’ असेल  किंवा सरदेसाई यांचं ‘रियासत’ असेल. या सर्व पुस्तकांमधून टिपूच्या बाबतीतलं लेखन जमातवादाकडे झुकणारं आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यात ‘सेतूमाधवराव पगडी’, ‘ब. ना. जोग’ आणि संघपुरस्कृत काही प्रचारकी इतिहासकारांचीही भर पडली आहे.

टिपूविषयी सावरकरांची भूमिका

विसाव्या शतकात एतद्देशीय इतिहासकारांमध्ये सरदेसाई यांनी सर्वप्रथम टिपूविषयी आकसानं इतिहास-लेखन केलं. त्यांच्या पश्चात सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातून टिपूचा इतिहास विकृत केला. जमातवादी इतिहासकार सरदेसाईंपेक्षा सावरकरांचं टिपूविषयीचं लिखाण प्रमाण मानतात. ते त्यांच्या सोयीचंही आहे. सावरकरांनी टिपूचा इतिहास लिहिताना अनेक ठिकाणी तर्कशास्त्राचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला आहे. अनेक प्रसंगांचा प्रक्षेप केला आहे. हैदरअली व टिपूचा इतिहास म्हणून स्वरचित घटना समोर आणल्या आहेत. किंबहुना या लोकोत्तर पिता-पुत्रांवर आरोपांची सरबत्तीच केली आहे. टिपूच्या बदनामीची कपोलकल्पित कथा साहित्यिक कौशल्यानं, भाषेवरच्या प्रभुत्वानं आणि इंग्रजी इतिहासकारांच्या मदतीनं सावरकरांनी चांगलीच रंगवली आहे. टिपू लोकांच्या तिरस्काराचा विषय ठरावा यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

सावरकर टिपूचा इतिहास पुराव्यांऐवजी जमातवादी विचारांच्या आधारे मांडतात. अनेक घटना चुकीच्या पद्धतीनं सादर करतात. टिपूच नव्हे, तर सर्वच बहुजन इतिहासपुरुषांविषयी सावरकरांनी इतिहासलेखनात अशीच संकुचित भूमिका घेतली आहे. ब्राह्मणेतर इतिहासपुरुषांचा इतिहास लिहिताना सावरकर संकोचतात, हे त्यांच्या इतिहासलेखनातून स्पष्टपणे जाणवत राहतं. त्यामुळेच अनेक विचारवंतांनी त्यांना इतिहासकार मानण्यासाठी नकार दिला आहे.

सावरकर टिपूविषयी अनेक आक्षेप घेतात. टिपूची राजवट म्हणजे हिंदू-मुस्लीम महायुद्धातली, सहस्रवर्षीय कालखंडातली शेवटची मुस्लीम राजवट असल्याचा दावा सावरकरांनी केला आहे.‘हिंदूप्रपीडक क्रूरकर्मा टिपू सुलतान’ या प्रकरणात सावरकर स्वरचित इतिहासातले प्रसंग नोंदवतात. सावरकर म्हणतात, ‘कोणत्याही मुस्लीम सुलतानांचे त्याच्या परंपरेनुसार जे पहिले कर्तव्य त्या काळी समजले गेले, त्याप्रमाणे टिपूने ‘सर्व काफरांना मी मुसलमान करून सोडीन’ अशी प्रतिज्ञा प्रकटपणे भरवलेल्या त्याच्या दरबारात केली आणि लगोलग त्याच्या राज्यातील सर्व हिंदूंना मुसलमान होण्याची आज्ञा केली. आपल्या गावोगावच्या मुस्लीम अधिकार्‍यांना लेखी कळवले की, ‘झाडून सार्‍या हिंदू पुरुषांना दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने मुसलमान न होतील त्यांना बळाने मुसलमान करा, नाहीतर हिंदू पुरुषांना ठार करा आणि पकडून आणलेल्या हिंदू स्त्रियांना बटकी करून मुसलमानांना वाटून घ्या’. सावरकरांनी उपरोक्त लिखाणातून टिपूवर एकाहून एक भयंकर आरोप केले आहेत.

सावरकरांच्या या अनैतिहासिक लेखनामुळेच त्यांच्या इतिहास-लेखनाला इतिहासकार ‘जदुनाथ सरकार’ यांनी ‘रोमँटिक इतिहासलेखन’ म्हटले होते. सावरकरांची रोमँटिक हिस्ट्री मनोरंजनापुरती मर्यादित राहिली असती, तर त्याची दखल घेण्याची काही एक गरज नव्हती, पण सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ आणि इतर पुस्तकांना काही प्रचारकी इतिहासकार (इतिनाशकार?) ‘इतिहासाची साधने’ समजत आहेत. सावरकरविरचित विकृतीच्या सिद्धान्ताला आपल्या धार्मिक तेजोभंगाचा आणि धार्मिक कर्तृत्वाचा इतिहास समजून त्याचा प्रचार करत आहेत. जमातवादी इतिहासकारांनी टिपूविरोधी घेतलेल्या भूमिकेच्या प्रेरणा सावरकरांच्याच आहेत, हे त्यांच्या लिखाणावरून सहज स्पष्ट होते. त्यामुळे सावरकरांच्या इतिहास-लेखनाची चिकित्सा करून त्यातली अनैतिहासिकता उघडी पाडणं, ही कालप्राप्त गरज बनली आहे.

ज्या दरबारात सावरकरांनी धर्मांतराचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं आहे, त्या पहिल्या दरबारात टिपूनं रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केलं होतं. ‘राज्याविषयी आपण कोणती कर्तव्ये पार पाडणार आहोत’, ‘राज्य चालवण्याची आपली ध्येयधोरणं काय आहेत’, या विषयी टिपूनं आपली भूमिका त्यातून मांडली आहे. एका आदर्श आणि असामान्य राज्यकर्त्यांचे कालपरिवर्तक विचारच त्या घोषणापत्रातून ध्वनित झाले आहेत. मो. इलियास नदवी यांनी या जाहीरनाम्याचा आपल्या ग्रंथात समावेश केला आहे. त्या जाहीरनाम्यात टिपू म्हणतो -

१) मी ‘सल्तनत ए खुदाचा’ प्रमुख असे जाहीर करतो की, मी माझ्या राज्यात कोणत्याही प्रकारचा धार्मिक आणि वंशीय भेदभाव न करता माझ्या रयतेचे नैतिकतेच्या पातळीवर प्रबोधन करण्याचा व सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.

२) त्यांच्या सुखासाठी, व्यावसायिक व राजकीय प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करेन.

३) शेवटच्या श्वासापर्यंत सल्तनत-ए-खुदाच्या एक एक इंच भूमीच्या रक्षणासाठी प्रयत्न करेन.

४) मुस्लीम समाजात धार्मिक व नैतिक पातळीवर समन्वय घडवण्याचा प्रयत्न करेन

५) इंग्रजांना, जे आपल्या देशाचे वास्तविक शत्रू आहेत, या देशातून बाहेर करण्यासाठी संपूर्ण हिंदुस्तानातील लोकांना एकत्र आणेन.

६) निष्पाप आणि लाचार रयतेला जमीनदार आणि जहागिरदारांच्या अन्यायातून मुक्त करेन. प्रत्येकाशी समान न्याय करण्याचा प्रयत्न करेन.

७) राज्यातील लोकांमध्ये आढळणार्‍या चुकीच्या धार्मिक आणि सामाजिक चालीरीती संपवण्यासाठी प्रयत्न करेन.

८) वेळप्रसंगी गरज पडल्यास देशाच्या संरक्षणासाठी परकीय मदत घेईन, राज्यात व्यापाराच्या वृद्धीसाठी प्रयत्न करेन.

सावरकरांचा आक्षेप आणि पहिल्या दरबारातील जनतेला उद्देशून काढलेला जाहीरनामा, यात कुठेच साम्य आढळत नाही. उलट सावरकरांच्या लेखी त्याज्य असणार्‍या धार्मिक सहिष्णुता, राष्ट्रप्रेम, सामाजिक हित, न्यायप्रियता आणि मानवतेच्या जाणिवा या जाहीरनाम्यात आढळतात. सावरकरांना स्वत:च्या श्रद्धा भारतीय समाजाच्या गळी उतरवायच्या होत्या. यासाठी त्यांनी त्या इतिहासावर लादल्या आणि प्रक्षिप्त घटनांची अनैतिहासिक इमारत उभी केली.

स्त्रियांच्या अब्रूवर घाला घालणार्‍या सैनिकांना मृत्युदंड!

युद्धानंतर शत्रूंच्या स्त्रियांचं शोषण केल्याचाही आरोप सावरकर टिपूवर करतात. नरगुंदमध्ये अशी कोणतीही घटना घडली नसताना त्याविषयी सावरकर वायफळ शब्दच्छल करत राहतात. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात महिलांचा आदर करणार्‍या टिपूवर स्त्रीलंपट असल्याचा आरोप सावरकरांसोबत इतर काही इतिहासकारांनीही लावला आहे. त्यामुळे टिपूच्या आयुष्यातील काही प्रसंगांचं अवलोकन करणं इष्ट ठरेल. कांचनगडचा किल्ला मिळवल्यानंतर पेशव्यांच्या ताब्यात असणार्‍या कंपलीवर टिपूनं हल्ला चढवला. मोठं युद्ध झालं. सैनिकी कौशल्याच्या बळावर कंपलीला आपल्या अधिकारकक्षेत आणण्यात टिपू यशस्वी झाला. सैन्यानं विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. याच दरम्यान म्हैसूरच्या सैन्यातील काही हिंदू-मुस्लीम सैनिकांनी कंपलीतल्या नागरिकांच्या घरात घुसून त्यांच्याशी गैरवर्तन केलं. स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. सैनिकांच्या गैरवर्तनामुळे एका तरुणीनं तुंगभद्रा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. टिपूला ही हकिगत समजल्यानंतर त्यांनी या घटनेविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली. गैरवर्तन करणार्‍या सैनिकांच्या चौकशीचे आदेश दिले. ५० हिंदू-मुस्लीम सैनिकांची नावे चौकशीनंतर समोर आली. दोष सिद्ध झालेल्या सैनिकांना कोणताही धार्मिक भेदभाव न करता मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वांदखत त्या सैनिकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं.

‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात सावरकरांनी सदगुण विकृतीचा सिद्धान्त मांडला आहे. त्यात सावरकरांनी स्त्रियांविषयी अतिशय घृणास्पद लेखन केलं आहे. शत्रूच्या स्त्रिया हाती आल्यानंतर त्यांना सोडून देणं, ही सदगुणी विकृती असल्याचं सावरकरांचं मत आहे. त्यामुळे टिपू यांनी शत्रूंच्या स्त्रियांविषयी दाखवलेलं औदार्य सावरकरांना दिसणं शक्य नव्हतं. सदगुणांना विकृती मानणारे सावरकर सदगुणी व्यक्तीचा गौरव करणं अशक्य आहे.

सावरकर हिंदूवीरांनी मुस्लीम स्त्रियांवर अत्याचार न केल्याचा शोक करतात. तर दुसरीकडे टिपू शत्रूच्या स्त्रिया सैनिकांच्या हाती आल्यानंतर त्यांना साडी-चोळीचा आहेर करून पालखीत बसवून स्वगृही परत पाठवतात. टिपूचा इतिहास व सावरकरांची भूमिका यात टोकाचं अंतर आहे. टिपूची शत्रूंच्या स्त्रियांविषयीची भूमिका स्पष्ट होईल, असे अनेक प्रसंग त्यांच्या इतिहासात नोंद आहेत. मोहम्मद इलियास नदवी यांनी उल्लेखिलेला असाच एक प्रसंग महत्त्वपूर्ण आहे. नदवी म्हणतात- ‘‘रात्रीच्या वेळी झालेल्या युद्धात टिपूच्या फौजेनं आपलं रणशौर्य दाखवून दिलं. सल्तनत-ए-खुदादच्या सैन्याच्या आक्रमक आघाडीपुढे पेशव्यांच्या लष्कराची दैना झाली. त्यांचं सैन्य जीवाच्या आकांतानं पळून गेलं. पेशव्यांच्या लष्करी छावणीतच कित्येक सैनिकांना कैद करण्यात आलं. सकाळी शत्रूंच्या सैनिकी छावणीतील स्त्रिया आणि लहान मुलांना वेगळं करून स्वतंत्र मंडपात ठेवण्यात आलं. काही दिवसांनी टिपू सुलतान यांनी युद्धात हाती आलेल्या स्त्रियांचा सन्मान देऊन कपड्यांचा आहेर केला. लहान मुलांना सोन्याचं कडं भेट दिलं. आपल्या सैनिकी तुकडीच्या संरक्षणात त्यांना स्वगृही पाठवलं. त्या स्त्रियांनी हरिपंत फडके यांस टिपू सुलताननं आपल्याला कशा रीतीनं वागवले याची हकीगत सांगितली.”

सरदेसायांचा प्रादेशिक आणि धार्मिक दृष्टिकोन

इंग्रजांसोबत सावरकरांनी इतिहासलेखनाच्या एकतर्फी न्यायदानास सरदेसाई आणि खर्‍यांना देखील साक्षीला उभं केलं आहे. रियासतकार सरदेसायांनी टिपूविषयी घेतलेली भूमिकाही काही प्रमाणात चुकीची आहे. टिपूच्याबाबतीत ते प्रादेशिक व वांशिक पूर्वग्रहानं ग्रस्त असल्याचं दिसतं. प्रदेशभिन्नता आणि धर्मभिन्नतेमुळे त्यांच्या विचारात निरपेक्षता किंवा निष्पक्षता दिसत नाही. त्यातही पेशव्यांविषयीचा वांशिक दुराभिमानदेखील त्यांच्या लिखाणात पाहायला मिळतो. ‘मराठी रियासती’च्या सातव्या खंडात ते म्हणतात. ‘‘१७८४ च्या पावसाळ्यात नानाने महादजीस लिहिले. टिपूची चाल ठीक नाही. उजम (गर्व) भारी आहे. वर्तणूक मनस्वी क्षेत्र चांगले नाही. अलिकडे नूर महंमद खानास (सलतनत इ खुदादचा पुणे दरबारातील वकील) टिपूचे पत्र आले की, एके दिवशी पन्नास हजार हिंदू बायकामुले सुद्धा बाटवून मुसलमान केले, अशी गोष्ट ती म्हणे. पूर्वी पातशहा वजीर मोठमोठे झाले. परंतु जाली नाही ती खुदाचे फज्ले करून झाली. नवाबाच्या लष्करात टिपूचे वकील आहेत. त्यासही त्याने असेच लिहिले. सवंत्सर व महिने यांची नावे सोडून नवी केली. पुढेही गावचे गाव बाटवत चालला आहे. यास्तव हरीपंत त्यावर सुरापूर पावेतो गेले. इतक्यात मुंबईकरांचे पत्र टिपूचा तह झाला म्हणोन आले. त्यावरून मजबूद मनसुबा केल्याखेरीत टिपूचे तालुक्यात उपद्रव करू नये.”  असे हरिपंतास नानाने लिहून ठेवले. या पत्राद्वारे महादजीला टिपू सुलतान यांच्याविरोधात भडकवण्याचा व लष्करी सहाय्य मिळवण्याचा नाना फडणवीसाचा हेतू स्पष्ट आहे. त्यामुळे महादजीच्या धार्मिक अस्मिता जागृत केल्यास महादजी आपल्या मदतीला उभा राहील असे नानाला वाटले असेल. त्यामुळे नानानं अशी अवास्तव माहिती पत्रातून दिली होती. कारण पत्रात ज्या ५० हजार स्त्री-पुरुषांच्या धर्मांतराचा मुद्दा मांडला आहे. त्याविषयी म्हैसूर दरबारच्या तत्कालीन कोणत्याही कागदपत्रात याविषयीची नोंद सापडत नाही. ज्या पत्राचा उल्लेख नाना फडणवीसानं केला आहे त्याविषयी देखील अनेक प्रश्न उपस्थित होतात.

नूर महंमद खान या आपल्या पुण्यातील वकीलास टिपूच्या या तथाकथित धार्मिक कर्तृत्वाची माहिती का दिली हेदेखील स्पष्ट होत नाही. जर टिपूनं धर्मांतर केलंच असं मानलं तरी काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. आपण एका परधर्मीय शत्रुपक्षीय दरबारात असणार्‍या आपल्या वकीलास पत्र लिहितोय याची जाणीव टिपूला नसेल का? त्यामुळे या शत्रुच्या धर्माविरुद्ध केलेल्या प्रत्याघाताची बातमी टिपू आपल्या वकीलास द्यायला काही दुधखुळे नव्हते. एका निष्णात राजकीय मुत्सद्याचे गुण टिपूमध्ये पुरेपूर होते. राजकीय विवेकदेखील त्यांच्या ठायी कोणत्याही समकालीन राज्यकर्त्यापेक्षा अधिक होता. त्यामुळे टिपूच्या त्या पत्राविषयीचा नानानं केलेला उल्लेख हा राजकीय डावपेचाचा भाग होता.

उजव्या इतिहासकारांची संदर्भनीती

भगव्या इतिहासलेखकांची संदर्भ वापरण्याची आणि संदर्भ साहित्याची निर्मिती करण्याची एक विशिष्ट शैली आहे. बारकाईनं त्याकडे पाहिल्यास त्यातील गांभीर्य स्पष्ट होईल. इंग्रज अधिकार्‍यांच्या आणि आपणास इच्छित संदर्भाच्या अनुषंगानं सुरुवातीला खर्‍यांनी लेखन करायचं, मग सरदेसायांनी आपला टिपू द्वेष खर्‍यांच्या मदतीनं उगाळून घ्यायचा. पारसनीसांनी या दोघांसह इतर काही माहिती देऊन लेखन करायचं. त्यानंतर सावरकरांनी ‘हा घ्या पुरावा’ म्हणून या तिघांना व इंग्रज लेखकांना नोंदवत टिपूची बदनामी करायची. मग आधुनिक इतिहासलेखकांनी पुराव्यांसाठी खरे, पारसनीस, सरदेसाई आणि सावरकरांना उद्धृत करत पुस्तके लिहीत राहायची आणि द्वेषाची आग भडकवत ठेवायची अशी ही संदर्भनीती आहे.

भारतीय राज्यकर्त्यांच्या प्रादेशिक, सांस्कृतिक अस्मिता एतद्देशीय होत्या. त्यामुळे राज्यातल्या जनतेविषयी त्यांना ममत्व वाटायचं. सिराजउद्दौलासारख्या राज्यकर्त्यांनी इंग्रज व्यापार्‍यांशी होणार्‍या व्यावसायिक स्पर्धेत भारतीय व्यापारी टिकावेत म्हणून प्रयत्न केले. त्याने भारतीय व्यापार्‍यांना करमुक्त व्यापार करण्यास परवानगी दिली होती. टिपूनंही जनहिताची अगणित कामं केली. म्हणूनच मठाचे महंत, स्वामी,आचार्य, ब्राह्मण यांच्या विजयासाठी अनुष्ठानं करत होते. भारतीय राज्यकर्त्यांची नाळ रयतेशी जोडलेली होती. त्यामुळे रयतेच्या मनात राजाविषयी आदराची भावना असायची. राज्यकर्त्यांविषयी भारतीय लोकांना वाटणारं ममत्व इंग्रजांना धोक्याचं वाटत होतं. त्यासाठीच भारतीय राज्यकर्त्यांचं राजकीय अस्तित्व संपवल्यानंतर त्यांचं सामाजिक अस्तित्व संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याविरोधात लढणार्‍या राज्यकर्त्यांना बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सिराजउद्दौलाच्या इतिहासाविषयी बंगालमध्ये असणारे गैरसमज इंग्रजांच्या धूर्तपणाचे फलित आहेत.

भारतीय राज्यकर्त्यांना बदनाम करण्यासाठी इंग्रजांनी योजना आखली होती. इंडिया कौन्सिलच्या गोपनीय कामकाजाचा सचिव सर जॉननेच याविषयी कबुली दिली आहे. सर जॉन म्हणतो, ‘‘आमची कार्यपद्धतीच मुळात तशी आहे. सुरुवातीला आम्ही एखाद्या सत्ताधिशाच्या राज्यावर अधिकार जमवतो, मग आम्ही त्या बादशहाला बदनाम करतो.”  विरोधात लढलेल्या भारतीय राज्यकर्त्यांना बदनाम करणार्‍या इंग्रजांच्या अधिकृत धोरणाविषयीच सर जॉन याने माहिती दिली आहे.

इतिहासाचं उदध्वस्तीकरण

इंग्रज इतिहासकारांची अवास्तव माहिती, प्रादेशिक इतिहासकारांचा दुराग्रह, किरमाणीसारख्यांनी इंग्रजांच्या दिशादिग्दर्शनाखाली नजरकैदेत लिहिलेल्या ग्रंथामुळे टिपूविषयी गैरसमज निर्माण केले आहेत. तत्कालीन संदर्भ म्हणून या साधनांचा वापर करून आजही काही आधुनिक इतिहासकार टिपूला क्रूरकर्मा ठरवण्याच्या कामात मश्गुल होते. फक्त जुने संदर्भ वापरूनच उजव्या इतिहासकारांचं समाधान होत नाही. त्यांनी स्वत:देखील काही खोट्या कथा नव्यानं रचल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आणि इतिहाससंशोधक संजय सोनवणींनी नोंदलेली ही माहिती इतिहासाच्या विध्वंसीकरणाची आधुनिक आवृत्ती आहे. सोनवणी लिहितात, ‘‘टिपूने ७०० अय्यंगारांना दिवाळीच्या दिवशी मारले असे मानले जाते. खरे तर इतिहासात कोठेही ही घटनेची नोंद नाही. डॉ. एम.ए.जयश्री व डॉ. एम.ए. नरसिंहन यांनी अलिकडेच एक पेपर प्रसिद्ध करून ज्याला इतिहासात कोठेही स्थान मिळालेले नाही. याबाबत इतिहासात कसलाही पुरावा नाही. हे प्रकरण दडवले गेले असाही आरोप आहे. आपण तरीही घटकाभर हे प्रकरण खरे मानू. टिपूचा जन्म १७५०सालचा, वरील घटना १७६० किंवा १७६१ ची. म्हणजे ही घटना घडली तेव्हा टिपू १०-११ वर्षांचा होता. हे हत्याकांड त्याने कसे केले?” संजय सोनवणींनी इतिहासकारांच्या भूमिकेची केलेली समीक्षा आजच्या आधुनिक इतिहासकारांच्या भावना आणि विचारांना अधोरेखित करणारी आहे. सोनवणी यांच्याप्रमाणेच काही अन्य इतिहासकारांनी देखील टिपूविषयी ऐतिहासिक सत्य समोर आणताना अशा घटनांचा उल्लेख केला आहे.

.............................................................................................................................................

निद्रित निखारे - नासिरा शर्मा, अनुवाद - प्रमोद मुजुमदार 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4283

.............................................................................................................................................

बी.एन. पांडे हे निरपेक्ष दृष्टीचे राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून विख्यात आहेत. ते लिहितात, ‘महामहोपाध्याय डॉ. प्रसाद शास्त्री यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात तीन हजार ब्राह्मणांनी आत्महत्या केली, कारण टिपू सुलतान त्यांना मुसलमान बनवू इच्छित होता अशी माहिती लिहिलेली होती. मी डॉ. शास्त्री यांच्याशी संपर्क करून त्यांनी सदर माहिती कशाच्या आधारे लिहिली आहे याविषयी विचारणा केली. त्यांनी उत्तरादाखल म्हैसूर गॅझेटमधून ती माहिती घेतल्याचे मला सांगितले. त्यांनी उत्तर दिल्यानंतर मी म्हैसूर विद्यापीठाचे ब्रजेंद्र नाथ यांच्या माध्यमातून म्हैसूर गॅझेटयरचे कान्टइया यांच्याशी संपर्क केला. म्हैसूर गॅझेटमध्ये कोठेच या घटनेचा उल्लेख नसल्याची माहिती त्यांनी मला दिली. म्हैसूरच्या इतिहासाचा अभ्यासक या नात्याने त्यांनी मला ही घटना घडली नसल्याचे विश्वासपूर्वक सांगितले. कान्टईय्या यांच्या मते ती घटना शास्त्री यांनी कर्नल माईल्सच्या ‘हिस्ट्री ऑफ म्हैसूर’ या ग्रंथातून घेतली असल्याची शक्यता व्यक्त केली. महाराणी व्हिक्टोरियाच्या खाजगी ग्रंथालयातील पर्शियन पुस्तकाचे आपण भाषांतर केल्याचा दावा माईल्सने केला होता. पण महाराणी व्हिक्टोरियाच्या ग्रंथालयात असे कोणतेही फारसी पुस्तक त्यावेळी उपलब्ध नव्हते.  हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या इतिहासाच्या विध्वंसाचे असे प्रयत्न आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.”

भारतीय समाजचिंतनाच्या चळवळीनं कित्येक दशकांचा प्रवास केला. समाजउद्धाराच्या अनेक चळवळी सबंध देशानं अनुभवल्या. पण मुसलमान इतिहास पुरुषांविषयीची रूढ मानसिकता काही प्रमाणात तशीच अबाधित राहिली. त्यांच्याविषयीचं चिंतन परंपरागत पद्धतीनेच होत राहिलं. मुस्लीम महापुरुषांच्या इतिहासाविषयी उल्लेखनीय असं संशोधन स्वातंत्र्याच्या सहा दशकानंतरही होऊ शकलेलं नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या आणि समाजक्रांतीच्या लढ्यातील त्यांचं योगदान दुर्लक्षितच राहिलं. उलट त्यांच्याविषयी अपसमज निर्माण करण्यात आले. त्यांच्यावर आरोप लावण्यात आले. त्यांचा इतिहास उदध्वस्त करण्याचे प्रयत्नच मोठ्या प्रमाणात झाले. कोणताही समाज विघातक इतिहासाच्या पायावर समृद्ध भविष्याची इमारत उभी करू शकत नाही. त्याच्या भविष्याला आशेची रसरशीत अशी पालवी फुटू शकत नाही. स्वातंत्र्याच्या सहा दशकांत इतिहासाच्या विध्वंसाचे विघातक परिणाम आपण सर्वांनीच भोगले आहेत. त्यातून आपण तावूनसलाखून निघालो आहोत. इतक्या विदारक अनुभवानंतर तरी आपण कृतघ्नता सोडूया, इतिहासपुरुषांना सामाजिक आणि धार्मिक बंधनात अडकवून त्यांच्यावर अन्याय करणं थांबवूयात. समृद्ध इतिहासाच्या भक्कम अधिष्ठानावर समाजाच्या समृद्ध भविष्याची स्वप्नं पाहूयात. एकमेकांच्या हृदयात पडलेली दरी इतिहासाच्या पुनर्लेखनातून सांधण्याचा प्रयत्न करूयात. कृतज्ञ होऊया. समाज घडवू या.

.............................................................................................................................................

'हैदर अली टिपू सुलतान स्थापित सल्तनत ए खुदादाद' - सरफराज शेख

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4284

.............................................................................................................................................

लेखक सरफराज शेख इतिहासाचे अभ्यासक असून त्यांनी सात वर्षं संशोधन करून ‘हैदर अली टिपू सुलतान स्थापित सल्तनत-ए-खुदादाद’ हे पुस्तक लिहिलं आहे.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.