सद्य:स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यापुढील आव्हाने!
पडघम - साहित्यिक
प्रा. डॉ. युसूफ बेन्नूर
  • मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह
  • Thu , 02 November 2017
  • पडघम साहित्यिक ११वे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन पनवेल

उद्यापासून म्हणजे, ३ नोव्हेंबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत पनवेलमध्ये ११वे अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या निमित्तानं मुस्लीम मराठी साहित्यापुढील आव्हानांचा आढावा घेणारा हा विशेष लेख. नवीन पिढीला सक्षम, समंजस आणि सुदृढ घडवण्यासाठी दर्जेदार आणि स्थानिक भाषांमधून साहित्य वाचावयास आणि अभ्यासावयास मिळालं तरच वैचारिक क्रांती होऊ शकते. ही वैचारिक क्रांती मानवीसंबंध अक्षय अखंड राहावेत, यासाठी निश्चितच काम करेल असा विश्वास वाटतो. 

.............................................................................................................................................


मुस्लीम मराठी साहित्य म्हणजे मराठीतून लेखन करणाऱ्या मुस्लीम लेखकांचं साहित्य. मराठी माणूस म्हणून जगत असताना जे ताणतणाव निर्माण होतात, ते व्यक्त करणारं किंवा त्यामधील समन्वय शोधण्याचा प्रयत्न करणारं साहित्य हे मुस्लीम मराठी साहित्य होय.  

सांगलीचे साहित्यिक सय्यद अमीन यांनी १९३०च्या सुमारास मुस्लीम मराठी साहित्याचा पाया घातला. त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांनी ‘एकसत्वस्थ मुस्लीम मराठी साहित्यिक’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता. तसंच सुप्रसिद्ध साहित्यिक रा. चिं. ढेरे यांनी ‘मुस्लीम मराठी संतकवी’ या नावानं एक पुस्तक लिहिलं आहे. यावरून असं स्पष्ट होतं की, मुस्लीम मराठी साहित्याचा इतिहास हा फार वर्षापासूनचा आहे. मुस्लीम मराठी साहित्य या संकल्पनेचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात मुस्लीम मराठी साहित्यिकांचं लेखन १९८० नंतरच्या काळातच मोठ्या प्रमाणात विकसित झालं. प्रा. फ.म. शहाजिंदे, प्रा. जावेद पाशा, प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, डॉ. अजीज नदाफ यांच्यासारखे लेखक आणि कवी यांचं साहित्य पुढे आलं. याचा परिणाम म्हणजे सोलापूरमध्ये ‘मुस्लीम मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना साहित्यिक, विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर व डॉ अजीज नदाफ यांच्या पुढाकारानं झाली.  

१९८०च्या दशकानंतर जागतिकीकरणाच्या लाटेची सुरुवात झाली. त्याचा परिणाम आपल्याकडेही पाहायला मिळतो. १९८० ते २००० पर्यंत महाराष्ट्रातील आणि एकंदरीतच देशातील मुस्लीमांपुढील समस्यांना सुरुवात झालेली होती. कॉर्पोरेट साम्राज्यवादानं उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांचं धोरण आणून बाजारपेठीय अर्थव्यवस्था अंमलात आणली. परिणामी महाराष्ट्रातील आणि भारतातील ग्रामीण भागांतून, छोट्या छोट्या शहरातून मुस्लिमांचे पारंपारिक व्यवसाय उदध्वस्त होऊ लागले. त्यांचं अपवर्जन सुरू झालं. त्याचं चित्रण २००० पर्यंतच्या मुस्लीम मराठी साहित्यात आढळून येतं. १९८५-८६ नंतर मुसलमान विरोधी दंगलीचं राजकारण सुरू झालं. त्याचं प्रतिबिंब प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर, प्रा. जावेद पाशा यांच्यासारख्या विचारवंत-साहित्यिकांच्या लिखाणातून व काही निवडक लेखातून आढळून येतं. 

परंतु २१व्या शतकात जी जागतिक व भारतीय समाजाची उलथापालथ आणि राजकारण सुरू झालेलं आहे, त्याची पुरेशी दखल घेणारं साहित्य निर्माण होताना दिसत नाही. प्रा. फ.म. शहाजिंदे, प्रा. सय्यद अलाउद्दीन व प्रा. जावेद पाशा यांच्यासारखे, मुबारक शेख सारखे दोन-चार लेखक आणि कवीवगळता, इतरांच्या लेखनात साचेबंदपणा आढळून येत आहे. २१व्या शतकातील मुसलमानांपुढील प्रश्न अवघड झालेले आहेत. कॉर्पोरेट जागतिक साम्राज्यवादानं उजव्या शक्ती मोकाट सोडलेल्या आहेत. अमेरिकेपासून भारतापर्यंत उजव्या धर्मवादी शक्ती उफाळून आल्या आहेत. धर्मवादाचं राजकारण साम्राज्यशाहीच्या हातातील प्रमुख शस्त्र असतं. अमेरिका आणि युरोपमध्ये ख्रिस्ती धर्मवाद, अरबी प्रदेशात इस्लामी धर्मवाद आणि भारतात हिंदुत्ववादी धर्मवाद उफाळून आलेला आहे. ख्रिस्ती आणि हिंदुत्ववादी धर्मवादामुळे भारतातील मुस्लिमांची परिस्थिती बिकट झालेली आहे. भारतात आणि महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात त्यांचं अपवर्जन होत आहे. परिणामी त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होऊन ते परिघाबाहेर ढकलले जात आहेत. ही परिस्थिती फार गंभीर स्वरूपाची आहे. सध्याच्या साहित्यातून हे प्रश्न मांडले गेले पाहिजे. 

उजव्या धार्मिक मूलतत्ववादी शक्ती संमिश्र जीवन पद्धतीच्या आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या पूर्णपणे विरोधी असतात. त्यांना एकेरी पोथीनिष्ठ आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारा माणूस निर्माण करावयाचा असतो. भारताची आणि महाराष्ट्राची जीवनपद्धती सांस्कृतिक, संमिश्र आणि बहुधार्मिक सहकार्याची राहिलेली आहे. ही जीवनपद्धती नष्ट करण्याचे प्रयत्न हिंदू आणि मुसलमानांच्या मूलतत्ववादी धार्मिक शक्ती करत आहेत. तबलीग जमात आणि जमाती इस्लामीनं मुसलमानांची संमिश्र जीवन पद्धती नष्ट करून त्यांचं ‘अरबीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतात गेल्या काही वर्षांत, विशेषत: ९/११च्या दुर्दैवी घटनेनंतर मुस्लिम द्वेषाचा महापूर आलेला आहे. मुसलमानांचं आणि इस्लामचं पाशवीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. यासाठी त्यांच्या हातात ब्रिटिशांनी लिहिलेला मुस्लीम आणि इस्लामविरोधी इतिहास हे मुख्य शस्त्र आहे. भारतातील ८५ टक्के मुसलमान वंश सांस्कृतिकदृष्ट्या धर्मांतरित भारतीयच आहे. त्यांची मुळं उखडून त्यांना परकीय करण्यात येत आहे. मुस्लीम मराठी साहित्यिक, इतिहासकार, अभ्यासक यांनी इथल्या मुसलमानांची वंश-सांस्कृतिक भारतीय ‘मुळं’ (रुट्स ) पुढे आणली. सध्याचं मुस्लीम मराठी साहित्य या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. चळवळीचा कार्यकर्ता, अभ्यासक या नात्यानं या आव्हानांचा विचार होणं गरजेचं आहे. 

मुस्लीम मराठी साहित्यिकापुढे सद्य:स्थितीत बरीच आव्हानं उभी ठाकली आहेत. त्यापैकी काही निवडक आव्हानांवर लक्ष केंद्रित करताना; मध्ययुगीन मुस्लीम मराठी संतकवींनी पोथीनिष्ठतेविरुद्ध जो आवाज उठवला, त्यासंदर्भात सातत्यानं छोट्या पुस्तिकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून साहित्यनिर्मिती करणं गरजेचं आहे. सुफीसंताचं बंड व तळागाळातील बहुजन मुस्लिमांच्या व्यथा, दु:खावर भाष्य करणारं साहित्य, तसंच तत्कालीन मुस्लीम संतांच्या साम्यवादी भूमिका अधोरेखित करणारं, मुस्लीम मराठी साहित्य संशोधन रूपात प्रसिद्ध व्हायला हवं. स्वातंत्र्योतर काळातील मुस्लीम मानस आणि त्या अनुषंगानं फाळणीनं निर्माण केलेल्या प्रश्नांना समर्थपणे उत्तर देणारं साहित्य प्रसिद्ध झालं पाहिजे. तसंच इतिहासाच्या विकृतीकरणामुळे सर्वसामान्य मुस्लीमांसंबंधी तयार झालेले भ्रम नाहीसे करणारं, अभ्यासपूर्ण साहित्यनिर्मिती, हेसुद्धा एक आव्हान आहे. 

भारतातील अश्रफ मुसलमान व त्यांची जीवनपद्धती आणि तळागाळातील कष्टकरी मुस्लीम यांच्या जगण्याचे प्रश्न व त्यांचं वास्तव दर्शवणारे साहित्य निर्माण करणं, नवोदित मुस्लीम मराठी साहित्यिक की, जे कथा, कादंबऱ्या लिहितात किंवा वर्तमानपत्रं, मासिकांतून लिखाण करतात, त्यांना ज्येष्ठ, तज्ज्ञ साहित्यिकांनी लेखन कार्यशाळांच्या माध्यमांतून मार्गदर्शनाची गरज आहे. अशा लेखन कार्यशाळांचं आयोजन जिल्हा पातळीवर होणं गरजेचं आहे. मात्र हे कोण? केव्हा? कुठे ?कसं होणार? आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीचं व्यवस्थापन राजकीय पाठबळाशिवाय कोण करणार?

हे सद्य:स्थितीत मुस्लीम मराठी साहित्यापुढील एक महत्त्वाचं आव्हान म्हणून नोंदवावंसं वाटतं. त्याचप्रमाणे सद्य:परिस्थितीत नोटबंदी आणि जीएसटीमुळे लघुउद्योगांचं होणारं उदध्वस्तीकरण आणि त्या अनुषंगानं नव्याने उभे राहिलेले मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न, कष्टकरी महिलांचं होणारं शोषण, मुस्लीम मुल्ला-मौलवींचा धर्माच्या नावाखाली होणारा अवास्तव हस्तक्षेप आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, या वास्तवावर भाष्य करणाऱ्या कथा, कादंबऱ्या, नाट्यसंहिता आणि ते प्रकाशित करायचं धाडस करणारे प्रकाशक हेही एक आव्हान आहे.

इतकंच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर सात दशकं लोटली तरी स्वतःला स्वयंघोषित मुस्लिमांचे नेते म्हणवणारे तथाकथित मुस्लीम पुढारी, त्यांचं सत्ताधाऱ्यांचे हस्तक म्हणून भूमिका, विकास कार्यातील त्यांचा फोलपणा आणि त्यांच्यामुळे सर्वसामान्य तळागाळातील मुस्लीम जनतेची होणारी फसवणूक व शोषण दर्शवणारं/अधोरेखित करणारं साहित्य निर्माण करणं, हेही मुस्लीम मराठी साहित्य पुढील आव्हान आहे. 

नवीन पिढीला सक्षम, समंजस आणि सुदृढ घडवण्यासाठी दर्जेदार आणि स्थानिक भाषांमधून साहित्य वाचावयास आणि अभ्यासावयास मिळालं तरच वैचारिक क्रांती होऊ शकते. ही वैचारिक क्रांती मानवीसंबंध अक्षय अखंड राहावेत, यासाठी निश्चितच काम करेल असा विश्वास वाटतो.    

.............................................................................................................................................

लेखक प्रा. डॉ. युसूफ बेन्नूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्राध्यापक असून मुस्लीम मराठी साहित्य परिषद (औरंगाबाद)चे संस्थापक सदस्य आहेत.

bennuryusuf@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.