नेहरू-गांधी कुटुंबाची ‘घराणेशाही’ कोणत्या कारणांमुळे टिकून आहे?
पडघम - सांस्कृतिक
किशोर रक्ताटे
  • नेहरू-गांधी कुुटुंब
  • Tue , 19 September 2017
  • पडघम अर्थकारण घराणेशाही Nepotism पं. जवाहरलाल नेहरू Jawaharlal Nehru इंदिरा गांधी Indira Gandhi राजीव गांधी Rajiv Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi

राजकारण असो, वा उद्योग क्षेत्र, भारतात सर्वच क्षेत्रांच घराणेशाही आहे. हा देशच घराणेशाहीवर चालतो,’ असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात भाषणानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. १२ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांनी या विद्यापीठात भाषण केले, त्याच्या आधीपासूनच त्यांच्यावर नेहमीप्रमाणे टीकेची झोड उठली होती. ती ‘घराणेशाही’च्या निमित्ताने मागील पानावरून पुढे चालू राहिली. त्यानिमित्ताने गांधी-नेहरू कुटुंबाच्या घराणेशाहीची तटस्थपणे चर्चा करणारा हा लेख...

.............................................................................................................................................

‘घराणेशाही’ हे भारताच्या राष्ट्रीय राजकारणाचं प्रमुख अंगच मानावं लागेल, इतक्या मोठ्या प्रमाणात घराणेशाही पाहावयास मिळते.

राष्ट्रीय राजकारणाच्या चौकटीत घराणेशाहीचा सिद्धान्त व व्यवहार गांधी-नेहरू घराण्याभोवतीच फिरत राहतो. नेहरूंनी सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या एकमेव कन्येला, इंदिरा गांधी यांना अत्यंत व्यवस्थितपणे सार्वजनिक जीवनाचं आणि भारतीय समाजाचं दर्शन घडवलं होतं. नेहरूंनी आपल्या हयातीतच इंदिरा गांधी यांना सक्रिय राजकारणात आणलं होतं. इंदिरा गांधींचा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश हा राष्ट्रीय पातळीवरील घराणेशाहीच्या जन्माचा पहिला अध्याय मानावा लागेल. नेहरूंनंतर १९६४ मध्ये लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. आणि त्याच सरकारमध्ये इंदिरा गांधी या माहिती आणि नभोवाणीमंत्री झाल्या. पुढे १९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ या काळात जवळपास १६ वर्षं त्यांनी देशाचं नेतृत्व केलं.

नेहरू- गांधी घराण्याच्या प्रत्येक व्यक्तीचा सबंध आयुष्याचा संबंध राजकीय सत्ता व्यवहारांशी आलेला दिसतो. याबाबत विनय हर्डीकर म्हणतात, ‘पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत पंतप्रधानपदासाठी इंदिरा गांधींची चर्चा सुरू झाली. इंदिरा गांधींचे निधन झाल्यानंतर पुढच्या १५ मिनिटांत राजीव गांधींचा शपथविधी झाला. आणि राजीव गांधींचे निधन झाल्यानंतर सोनिया गांधींनी थेट राजकारणात यायला पाच वर्षे वेळ घेतला. दहशतवाद्यांचे सावट आपल्या कुटुंबाभोवती फिरते या भीतीदायक भावनेतून सोनिया गांधींनी राजकीय सत्तेतील थेट सहभागाला सर्वप्रथम टाळले. मात्र, आता सोनियांच्या बरोबरीने पंडित नेहरूंचे पणतू, इंदिरा गांधींचे नातू आणि राजीव गांधी व सोनिया गांधी यांचे चिरंजीव अशी थोर राजकीय सावली असलेले राहुल गांधी आणि प्रियंका वढेरा-गांधी राष्ट्रीय पातळीवरील राजकीय प्रक्रियेत आलेच आहेत. या गांधी घराण्याला टिकवून ठेवणारी राजकीय प्रक्रियेत एक मोठी फौज आहे. ही फौज आपापले हितसंबंध जपण्यासाठी गांधी घराण्याच्या वारसदारांचे गुण अगतिकतेपोटी शोधत असते. एकूणच घराणेशाही भारतीय समाजाचा दंडक आहे, हे नाकारून चालणार नाही.’ (हर्डीकर विनय, मुलाखत : १० फेब्रुवारी २०१३)

नेहरू-गांधी घराणेशाही नेमकी कोणत्या कारणांमुळे टिकून आहे, याचा या निमित्तानं वेध घेतला पाहिजे. राजकारणात सत्तेची अनेक केंद्रं असतात. सत्तेच्या प्रत्येक केंद्रात कुणाची ना कुणाची वर्णी लावावी लागते. प्रत्येक राजकीय व्यक्ती सत्तेच्या प्रांगणात आपल्याला अधिक संधी मिळावी म्हणून सतत प्रयत्न करत असतो. नेहरू-गांधी घराण्याच्या अधिपत्याखाली देशाची वाटचाल झालेली दिसते. प्रस्तुत घराण्याला केंद्रीय पातळीवरील सत्ता महत्त्वाची वाटते. मात्र, ती सत्ता आपल्याच हाती ठेवण्यासाठी त्या सत्तेला आधारभूत असलेल्या संस्थांवर आपल्याच पक्षाचे सदस्य निवडून येणे आणि तिथली सत्ता आपल्याच हाती ठेवणे आवश्यक असते. प्रत्यक्षात हा सत्ता व्यवहार गुंतागुंतीचा आहे. पण घराणेशाहीच्या वर्तुळासाठी तो अत्यंत सरळ आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद, सरकारमधील प्रत्येक निर्णयात घराण्यातील व्यक्ती घेईल ती भूमिका योग्य मानली म्हणजे अन्य सत्ताकेंद्रावर पक्षनिष्ठेच्या नावाखाली त्या त्या व्यक्तीला ती ती सत्ता मिळते. प्रत्यक्षात पक्षनिष्ठा ही विचारसरणीशी निगडित नसून, त्या त्या काळातील व्यक्तींच्याप्रती (सध्या सोनिया व राहुल गांधी) निष्ठा असली पाहिजे. पक्षसंघटनेतील काही मातब्बर नेत्यांची मिळून पक्षश्रेष्ठी बनवली जाते. तिथेही अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्षांचा असतो. देशाचे पंतप्रधानपद, राष्ट्रपतिपद, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल या व अशा नियुक्त्यांमध्ये सदरच्या नेत्याची त्या - त्या सभागृहातील आणि जनमाणसातील मान्यता लक्षात न घेता त्यांची ‘व्यक्तिनिष्ठा’ आणि तथाकथित ‘पक्षनिष्ठा’ महत्त्वाची मानली जाते.

नेहरूंच्या निधनानंतर अवघ्या चार वर्षांत देशाची सूत्रे इंदिरा गांधींकडे गेली. त्यावेळी स्वातंत्र्यचळवळीची पार्श्वभूमी असलेला एक मोठा गट काँग्रेसमध्ये होता. त्यातील काहींनी इंदिरा गांधींचे नेतृत्व प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे मान्य केले. त्यातून ‘इंदिरानिष्ठ’ असा गट काँग्रेसमध्ये तयार झाला. या ‘नेहरूनिष्ठ’, ‘इंदिरानिष्ठ’ या गटांना आपापली सत्तापदं टिकवायची असतात. त्यासाठी त्यांना तत्त्वत: मान्य असो वा नसो राष्ट्रीय नेतृत्व म्हणून नव्हे; तर आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समर्थक व्हावं लागतं. गांधी घराण्याच्या प्रत्येक नेतृत्वानं आपापल्या राजकीय शैलीचा एक प्रभावी गट निर्माण केलाच होता. आजमितीला काही दुय्यम पातळीवरील सत्ता भोगणारे असे नेते आहेत की, त्यांच्या प्रत्येक पिढीनं दुय्यम पातळीवरील सत्ता स्वातंत्र्यापासून उपभोगली आहे.

राष्ट्रीय पातळीवरील घराणेशाहीच्या राजकारणात एक मुख्य मुद्दा आहे तो एकमेकांची सत्ता टिकवण्याचा. केंद्रीय पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतची सत्ता एकमेकांवर अवलंबून असते. म्हणजे जसे संसदेत आपल्या पक्षाचे जितके खासदार निवडून येतील, तेवढी केंद्रातील सत्ता अबाधित. तसेच, जास्त संसद सदस्य निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता हाती असणे संयुक्तिक असते. स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय भरतीचे माध्यम आहे. या माध्यमातून ‘घराणे’ आपापली सत्ता टिकवून ठेवतात.

अगोदर म्हटल्याप्रमाणे, नेहरू - गांधी घराण्यांपासून आपली वेगवेगळी दुय्यम दर्जाची (केंद्रीय पातळीच्या तुलनेत) सत्ता टिकवून ठेवताना सतत गांधी कुटुंबाबद्दल समाजात आदर वाढवण्याचं कार्य सुरू असतं. त्यातून दोन प्रकारच्या अधिमान्यता आकाराला येतात. पहिली, गांधी कुटुंबाचं आणि पर्यायानं काँग्रेसचं मान्यताविश्व रुंदावते. त्याचा परिणाम सदर व्यक्तीला अपेक्षित सत्ता मिळविण्यात होतो.

राजकीय घराणेशाहीतून एखादा पक्षही सुटलेला नाही. निवडणुकीच्या राजकारणात यशापयश कमी अधिक होत असेल. मात्र, घराणेशाही सर्वत्र आहे. ज्या पक्षांचा जन्म काँग्रेसमधील घराणेशाहीला विरोध करण्यातून झाला आहे, त्या पक्षांचे स्वरूपही घराणेशाहीच्या विळख्यात अडकलेले दिसते. (उदा – तेलुगू देसम, शिवसेना, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस इ.)

राष्ट्रीय पातळीवर सध्या किमान शंभरहून अधिक कुटुंबं अशी आहेत, ज्यांच्या हाती सत्तेच्या राजकारणातील कुठलं ना कुठलं सत्तापद आहेच. सत्ता हे मुख्य ध्येय आणि त्यासाठी धडपडत राहणे हे समीकरणच बनले आहे.

राष्ट्रीय पातळीवर, राहुल गांधी, सचिन पायलट, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, ज्योतिरादित्य सिंधिया, जितेंद्र प्रसाद, मिलिंद देवरा, अगाथा संगमा, जगमोहन रेड्डी, वरुण गांधी ही सध्याच्या राजकीय प्रक्रियेत सक्रिय असलेली राजकीय वारसा असलेली काही निवडक उदाहरणे.

या सर्व मंडळींच्या बाबतीत काही समान धागे आहेत. यातील बहुतेक लोक परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेले आहेत. तसेच, यातील बहुतेकांनी निवडणुकीच्या राजकारणात येण्यापूर्वी आपल्या वारसाचं बॅक ऑफिस चालवलं आहे. किंवा कोणत्या तरी दुय्यम जबाबदाऱ्या पार पाडून वारसाच्या चाहत्यांमध्ये आपल्या नावाची चर्चा घडवून आणली आहे. तिथेही जे अगदी केंद्रीय पातळीवर घडतं तेच घडतं. म्हणजे, प्रत्येक नेत्याच्या भोवती पुन्हा पक्ष संघटना आणि अन्य राजकीय - अराजकीय संस्थांची जंत्री असते. त्या जंत्रीत वर्णी लागण्याच्या उद्देशानं मुख्य सत्ता किंवा मुख्य पद (खासदार- आमदार) जरी आपल्याला नाही मिळालं, तरी चालेल, पण आपण साहेबांच्या मुलाभोवती वावरलं पाहिजे. त्याचं लाँचिंग त्याच्या असलेल्या – नसलेल्या गुणांतून घडून आलं पाहिजे. विशेषत: जनाधार नसलेल्या पक्षसंघटनेतील नेत्यांना हे करावंच लागतं. आणि तेही इमाने इतबारे करत असतात.

भारतात कुटुंब, जात, गणगोत या निष्ठा फार चिवट आहेत. हजारो वर्षांपासून हे सुरू आहे. आपलं गाव, भाषा आणि आपला कबिला धरून भारतीय माणूस जगत असतो. (महाराष्ट्र माझा, २०११, पृ. १४) त्यामुळे घराणेशाहीमागे एकच एक जाणीव नसून त्यास पूरक असे अनेक घटक असतात. अशा विविध घटकांतून घराणेशाही बळावत असते. भारतीय समाजव्यवस्थेत वडिलांचा व्यवसाय मुलानं पुढे न्यावा, हे अगदी पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वाटत असतं. वडिलांचे कलागुण मुलांमध्ये उतरावेत, अशी मानसिकता भारताय समाजमनाची आहे. वडिलांच्या निधनानंतर मुलानं जर त्यांचं काम पुढे नेलं तर वडील अमर होतात, हीदेखील अंधश्रद्धाळू मानसिकता भारतीयांमध्ये पहावयास मिळते. मात्र, राजकीय घराणेशाही प्रबळ करण्यासाठी जे आकांडतांडव त्या कुटुंबाकडून केलं जातं, त्यातील उद्देश निश्चित विशिष्ट महत्त्वाकांक्षेतून आलेला दिसतो.

राजकीय नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा आपला स्वत:चा असा एक चाहतावर्ग असतो. हा वर्ग निर्माण होण्याची कारणे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी आहेत. भारतातील सबंध राजकीय इतिहासात पंडित नेहरूंपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत वलयांकित नेत्यांच्या चाहत्यांचे वेगवेगळे वर्ग होते. हे वर्गच या नेत्यांना आणि त्यांच्या वारसदारांना पुन्हा पुन्हा राजकीय रणांगणात सत्ता मिळवून देण्यात पुरेसे ठरतात, हे अर्धसत्य असेल. मात्र, एक अत्यंत महत्त्वाची जागा या चाहत्यांच्या माध्यमातून भरून निघते. नेत्यांचे वलय चाहत्यांना कधीकधी इतके आंधळे करते की, हे चाहते बदलत्या काळात त्या नेत्यांचे अनुयायी होतात. आणि अनुयायांना आपल्या नेत्याच्या पलीकडील जग दिसेनासे होते. त्यामुळे त्या त्या नेत्यांच्या प्रेमाबरोबर त्या नेत्यांच्या कुटुंबाभोवती सत्ता – व्यवहाराचे कुंपण तयार होते. त्यातूनच त्या – त्या नेत्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचे राजकीय सत्ता व्यवहारात आगमन होते.

विनय हर्डीकर म्हणतात, ‘जेव्हा आपण घराणेशाही असा शब्दप्रयोग करतो, तेव्हा त्याचे अनेक गर्भितार्थ असतात. काही माणसं जन्मत:च काही गुण घेऊन जन्माला येतात. त्यापैकी एक म्हणजे नेतृत्व करणे आणि सत्ता हस्तगत करणे. हा गुण निसर्गत:च आहे किंवा असतो, अशी समजूत बाळगणारा मोठा वर्ग भारतीय समाजात आहे. अशी समजूत कधी संस्कृतीच्या रूपाने तर कधी संस्कृतीच्या नियम बनून जातात. एक गोष्ट मात्र प्राचीन काळापासून निश्चित आहे, ती म्हणजे नेतृत्व करण्याची ओढ माणसांना आहे. दुसऱ्या बाजूला समाजात सत्तेविषयी नकारात्मक भाव असतो. तो असा की, सत्ता क्रूर असते; ती गाजविणारी व्यक्तीदेखील क्रूर असते. एकूणच राजकीय व्यवहारांविषयी कुठलीही चर्चा किंवा प्रश्न – उपप्रश्न हे एका स्वाभाविक प्रक्रियेचा भाग म्हणून पुढे येतात, तसेच घराणेशाहीदेखील भारतीय समाजासमोरील एक अपरिहार्यता आहे. भारतीय समाजाच्या स्वभावाने आता घराणेशाही स्वीकारली आहे. त्याचा जास्त बाऊ करू नये, असेच मला वाटते. या भारतीय समाजाच्या घराणेशाही स्वीकृत मानसिकतेचा फायदा राजकीय घराणे करून घेतात. म्हणून संधीचा फायदा घेणाऱ्याला दोषी कसे ठरविणार? आणि कोण हे ठरविणार?’ (हर्डीकर विनय, मुलाखत : १० फेब्रुवारी २०१३)

लेखक ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

kdraktate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.