सोशल मीडियाचे ‘अन-सोशल’ करणारे, जीवावर बेतणारे घातक दुष्परिणाम
पडघम - तंत्रनामा
आकांक्षा कांबळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 24 August 2017
  • पडघम तंत्रनामा सोशल मीडिया Social Media

‘ब्लू व्हेल चॅलेंज गेम’च्या व्यसनातून भारतात व जगभरात काही मुलांनी केलेल्या आत्महत्या, आई-वडिलांनी मोबाईल काढून घेतल्यामुळे हरियाणातील चौथीतल्या मुलानं हाताच्या नसा कापून केलेला आत्महत्येचा प्रयत्न, नागपूरमध्ये नौकाविहारासाठी गेलेल्या तरुणांना ‘फेसबुक लाइव्ह’ करायच्या नादात बोट उलटून मिळालेली जलसमाधी, मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर पावसाचा आनंद घ्यायला गेलेल्या एका तरुणीचा सेल्फी काढायच्या नादात समुद्रात पडून गेलेला जीव, चार महिन्यांपूर्वी अर्जुन भारद्वाज नावाच्या तरुणानं आत्महत्येच्या तयारीचं सोशल मीडियावर चित्रीकरण करून इमारतीवरून उडी मारून केलेली आत्महत्या, १४-१५ वर्षांच्या मुलांनी शाळेतील शिक्षिकेला लिहिलेलं अश्लील पत्र आणि लहान मुलींवर होत असलेले बलात्कार, अशा काही उदाहरणांवरून सोशल मीडिया नकारात्मक रूपात आपल्या समोर येत आहे.

या माध्यमाचं अतिरेकी व्यसन लहान मुलं, तरुण यांना अमलीपदार्थाप्रमाणे जगण्यातून उठवू पाहत आहे. काय आहेत या मागची कारणं? का वाढत आहे सायबर व्यसनाधिनता? त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल? यांबाबत आता खरंच विचार होणं गरजेचं झालं आहे.

आपलं काम, कुटुंब, मित्र, समाज, आवडी-निवडी, वाचन इतकंच नव्हे, तर विचार हे सगळं आणि याच्याशी संबंधित असलेली सगळी कामं समाजमाध्यमांना जोडून घेतल्याशिवाय आपण करूच शकणार नाही, अशी परिस्थिती हळूहळू निर्माण व्हायला लागली आहे. त्यामुळे अगदी कमी कष्टात आणि कमी खर्चात आपण जास्तीत जास्त काम करू शकू, वेगवेगळ्या लोकांशी जोडले जाऊ शकू, असं तंत्रज्ञान पसरवणाऱ्या कंपन्या आपल्याला सातत्यानं सांगत असतात. आपल्याला हल्ली इतरांसाठी अजिबात वेळ नसतो, पण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इ-मेल, एसएमएस, कॉल्स, हाईस मेल्स, ट्विट, चॅटिंग, मॅसेजिंग, अॅलर्टस, कॉमेंटस्, टॅग्ज, फोटो, व्हिडिओ लॉग, सर्च, डाउनलोड, अपलोड, कीड्स, फिल्टर्स, वॉल्स, विजेट्स, क्लाऊड्स, युजरनेम्स, पासवर्डस्, अॅप्स, बॅनर्स, रिंग टोन्स, हायब्रेशन यांसारख्या शब्दांनी आपला बराचसा वेळ व्यापून टाकलेला असतो. समाजमाध्यमांचा वापर आपली सीमारेषा ओलांडून कधी गैरवर्तनात परावर्तीत होतो, हे त्या आपल्यालाही कळत नाही. दिवसाचे जवळपास आठ तास तरुण पिढी (आणि इतर वयोगटातलीही बरीचशी मंडळी) या व्यसनासाठी खर्च करत आहे. त्यातून मेंदूची डोपामिन यंत्रणा सतत या मार्गानं सुख मिळवायचा प्रयत्न करते आणि बघता बघता या वर्तनाचं रूपांतर व्यसनात होतं!

अगदी दोन-तीन वर्षांच्या वयातच मुलांनी एका ठिकाणी शांत बसावं, आपल्या नजरेसमोर राहावं म्हणून पालकांकडूनच मुलांच्या हाती मोबाईल दिला जातो. त्यामध्ये असणाऱ्या विविध खेळांमध्ये मुलं हिरोची प्रतिमा शोधू लागतात. खेळात असणाऱ्या थ्रिलचं त्यांना आकर्षण वाटतं. या खेळांमध्ये मुलं बंदुका घेऊन मारामारी करतात. त्यात त्यांना मजा वाटते. या खेळांतून मिळणाऱ्या आदेशानुसार वर्तन करून ते हिरो बनण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी आत्महत्येच्या आदेशाचंही पालन करायला मागे-पुढे पाहत नाहीत. आपल्या मनोव्यापारावर नियंत्रण ठेवणारी ही शक्ती कोण, कुठे आहे, वास्तवात ती खरोखरीच आहे किंवा नाही, याचा विचार करण्याच्या भानगडीत ही मुलं पडत नाहीत. त्यातूनच ‘ब्लू व्हेल चॅलेंज’, ‘पोक मन गो’, ‘कँडी क्रॅश मॅनिया’, ‘अँग्री बर्ड’ यांसारख्या खेळाचं मुलांना व्यसन लागतं.

स्वतःच्या आत्महत्येचं चित्रीकरण सोशल मीडियावर करून केलेल्या आत्महत्येमागे असं दिसून आलं आहे की, प्रत्येकाची व्यक्त होणं, लक्ष वेधून घेणं ही महत्त्वाची गरज असते. घरात, बाहेर आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं, आपलं ऐकावं; पण त्यांच्याकडे लक्ष देणारं, समजून घेणारं कोणी नसेल तर ही मुलं एकलकोंडी होतात, नैराश्यामध्ये जाऊ लागतात आणि अशा प्रकारची कृत्यं करतात.

सेल्फीचं व्यसन असण्यामागे असं दिसून आलं आहे की, पौंगडावस्थेत मुलांची स्वतःची ओळख विकसित होत असते. ‘मी कोण?’ या पडलेल्या प्रश्नातून ते स्व-प्रतिमेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या पौंगडावस्थेत शारीरिक बदल होताना काही न्यूनगंडही तयार व्हायला लागतात. ते दूर करण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, स्व-प्रतिमा निर्माण करण्यासाठी कुठेही, कोणत्याही परिस्थिती सेल्फी काढण्याचा मोह निर्माण होतो. त्यातून अनेक अपघात घडतात.

पौंगडावस्थेत मुलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. तसेच भिन्नलिंगाविषयी शारीरिक आकर्षणही निर्माण होत असतं. पण या काळात होणारे बदल आणि लैंगिकतेबद्दल शाळेतून, कुटुंबीयांकडून शास्त्रीय माहिती मिळत नाही. मात्र त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलमधील इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीतून त्यांना लैंगिकतेबद्दल अवास्तव माहिती मिळते. त्यातून त्यांच्या लैंगिक भावनेला उत्तेजन मिळून त्यांकडून बलात्कारासारखे गुन्हे घडतात.

कोणत्याही अमली पदार्थाच्या व्यसनाप्रमाणे याही व्यसनाची लक्षणं ठळकपणे जाणवतात. अशा मुलांची एकाग्रता कमी असते. त्यांच्या झोपेच्या, खाण्यापिण्याच्या सवयी बिघडलेल्या असतात. रोजच्या व्यवहारातील आंघोळीपासून अभ्यासापर्यंतच्या गोष्टी टाळल्या किंवा पुढे ढकलल्या जातात. हिंसेवर आधारलेल्या गेम्सच्या प्रभावातून मुलांमधली हिंसक प्रवृत्ती आणि एकूणच संवेदनशून्यता वाढीला लागते. हळूहळू घरातील मंडळीशी संवाद कमी होतो आणि पर्यायानं घरातले, बाहेरचे नातेसंबंध बिघडतात. खोटं बोलणं, पैसे चोरणं, काही कारणास्तव इंटरनेटपासून दूर राहावं लागल्यास चिडचिड होणं, अशी मानसिक लक्षणं दिसू लागतात. मान, कंबर, हाताची बोटं, मनगट दुखणं; डोकेदुखी, डोळ्यावरील ताण, शारीरिक अस्वच्छता अशी शारीरिक लक्षणंही दिसून येतात. सामाजिक जीवनात कुणाच्या डोळ्यात डोळा घालून समोरासमोर संवाद साधण्याची त्यांच्यात हिंमत निर्माण होत नाही. समाजजीवनात ते एकटे-एकटे राहायला लागतात. मनातील भावना कोणासमोर व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या मनात दाटलेल्या सुख-दु:ख, निराशा, वैफल्य, न्यूनगंड अशा भावना मनातच दाटून राहतात.

Elias Aboujaoude नावाच्या स्टॅनफर्ड विद्यापीठामधल्या मानसोपचार तज्ज्ञानं यासंदर्भात लिहिलेल्या ‘Virtually You : The Dangerous Powers of the E-Personality’ या अप्रतिम पुस्तकामध्ये इंटरनेटचा वापर हा ‘ऑबसेसिव्ह-कम्पलसिव्ह डिसऑर्डर’ या विकारामध्ये मोडतो, असं म्हटलं आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य, आपले मित्र, नातेवाईक, आपला जोडीदार, आपली मुलं, आपली कारकीर्द या सगळ्यांना धोक्यात आणू पाहणाऱ्या सवयी इंटरनेटनं आपल्याला लावल्या आहेत. आपण स्वतःकडे आणि इतरांकडे कोणत्या नजरेनं बघतो, यातही इंटरनेटच्या अतिवापरामुळे बदल होत आहेत. आपला स्वतःच्या क्षमतांविषयी विनाकारण आत्मविश्वास निर्माण होतो. इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं, आपल्या नीतिमत्तेची संकल्पना बदलणं, विचारपूर्वक निर्णय यापेक्षा घाईघाईनं, पटापट निर्णय घेऊन पुढे जाणं, एखाद्या लहान मुलासारखं उतावीळ होणं, यांसारख्या गोष्टी घडतात. आपण कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात कसे निर्णय घेतो आणि ते अमलात आणतो, इतरांशी कसं वागतो, बोलतो, लिहितो, विचार करतो, आपल्या आशा-आकांक्षाविषयी काय पावलं उचलतो, या गोष्टींमध्ये आपल्याही नकळत बदल होतात. एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणं, पटकन कुणाला तरी दुखावणारं विधान करणं यांसारख्या गोष्टी घडायला लागतात. कारण इंटरनेटवर असताना आपल्याला आपल्या बोलण्या-लिहिण्यात दुसऱ्याला, समोरच्याला काय वाटत असेल याचा अंदाज येत नसतो. हीच सवय आपल्या इंटरनेटबाहेरच्या संभाषणांतही परावर्तित व्हायला लागते.

आपल्या मुलांना आणि स्वतःला समाजमाध्यमाचं व्यसन लागू नये म्हणून काही उपाय करणं आवश्यक आहे. पालक लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. त्यामुळे पालकांनी  गरजेपेक्षा जास्त मोबाईल, इंटरनेटचा वापर करायला नको. योग्य वयात सामाजिक माध्यमं हाताळण्याची समज आल्यावरच गरजेनुसार ती मुलांच्या हातात द्यावीत आणि त्यांना शक्य तेवढा वेळ देऊन, संवाद साधून या माध्यमांच्या गैरवापराच्या परिणामांची जाणीव करून द्यायला हवी. मुलांमध्ये मोकळ्या हवेत खेळण्याची, तसंच वाचन, संगीत यांची आवड निर्माण केल्यास ती इंटरनेट व्यसनाच्या मागे जाणार नाहीत. पौगंडावस्थेतच मुलांना घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून व शाळेतील अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण ज्ञान द्यायला हवं. ज्यांना या समाजमाध्यमाचं व्यसन लागलं आहे, त्यांना बाहेर काढण्यासाठी अमली पदार्थाच्या व्यसनासाठी जी औषधं वापरली जातात, त्या औषधांचा वापर होऊ शकतो का, याबाबत वैद्यकशास्त्रात संशोधन चालू आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या निमित्तानं इंटरनेट साक्षरता निर्माण करणं आता गरजेचं झालं आहे. म्हणजे इंटरनेटचा वापर आपल्या गरजेपुरता व आपल्या विकासासाठी कसा करता येईल, याबाबत कौशल्य निर्माण करणं. आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित समाजाची तीच खरी गरज आहे.

लेखिका स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड इथं पीएच.डी.करत आहेत.
akanksha.papi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.