काँग्रेसचा ‘हात’ बळकट करण्यासाठी लाल निशाण पक्षाचे आणि भाकपचे मीलन
पडघम - राज्यकारण
कॉ. भीमराव बनसोड
  • भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि लाल निशाण पक्ष यांचे विलिनीकरण
  • Tue , 22 August 2017
  • पडघम राज्यकारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष Communist Party of India CPI लाल निशाण पक्ष Lal Nishan Party

भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९६५ साली फूट पडल्यानंतर निर्माण झालेला लाल निशाण पक्ष शुक्रवारी, १८ आॅगस्ट रोजी पुन्हा भाकपमध्ये विलीन झाला. कम्युनिस्टांची एकजूट बांधण्यासाठी आणि फॅसिझमविरोधी संयुक्तपणे लढण्यासाठी लाल निशाण पक्षाचे भाकपमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पक्षनेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षात १९४२ साली झालेल्या मतभेदांमुळे कॉम्रेड एस.के. लिमये, भाऊ फाटक, यशवंत चव्हाण आणि लक्ष्मण मेस्त्री यांना पक्षाबाहेर पडावे लागले. त्यानंतर १९६५ साली भाकपमध्ये फूट पडत लाल निशाण पक्षाची स्थापनाही झाली. मात्र आता तब्बल ७५ वर्षांनंतर मतभेदांना तिलांजली देत या दोन पक्षांचे विलिनीकरण झाले आहे. त्यानिमित्ताने हा लेख...

.............................................................................................................................................

आस्थेवार्इकपणे पण जरा काळजीच्या सुरात चौकशी करणारे काही मित्रांचे मला फोन आले. ते विचारत होते की, ‘अहो कॉम्रेड, लाल निशाण सीपीआयमध्ये विलीन झाला म्हणतात! तो कोणता लाल निशाण?’ त्यांनी वर्तमानपत्रांतून तशा बातम्या वाचल्या होत्या. फेसबुकवरही काही पोस्ट झळकल्या होत्या. ‘कोणता लाल निशाण? लेनिनवादी की काँग्रेसवादी?’ असा तो प्रश्र होता. मला ‘लेनिनवादी नाही’ अशी पोस्ट टाकावी लागली. फोनवरही ‘लेनिनवादी विलीन नाही’ असे सांगितल्यावर तिकडून ‘बरे झाले’ असल्याचा सुस्कारा आला. बऱ्याच जणांना तर महाराष्ट्रात दोन लाल निशाण पक्ष होते, हेही माहीत नसावे. त्यामुळे जणू काही आम्हीच भाकपमध्ये गेलो की काय अशी भीती त्यांना वाटत होती. तसे नाही म्हटल्यावर त्यांना दिलासा मिळाला. लहान बाबींचाही मोठा बाऊ (इव्हेंट) करण्याची मोदींपासून क्रेझच निर्माण झाली आहे. पण या घटनेमुळे दुसराही एक लाल निशाण पक्ष होता, हे बऱ्याच जणांना माहीत करून द्यावे लागत आहे.

१९६७ सालापासून लाल निशाण पक्षाशी संबंधित व आता लेनिनवादी पक्षात असलेले कॉ. कृष्णा केमुसकर हे गिरणी कामगार कार्यकर्ते मध्यंतरी मुंबईला ‘श्रमिक’वर गेलेले असता तेथे मिलिंद रानडे (विलिनीकरणवाले) यांची भेट झाली. तेथे त्यांनी ‘आम्ही सीपीआयमध्ये जात असल्याचे’ सांगितले. कॉ. कृष्णाने त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि ‘तुम्ही एक प्रकारे प्रगतीच केलेली आहे. तुमच्यातले निम्मे लोक सरळ काँग्रेसमध्ये गेलेले असताना व त्यातील निला लिमये (कॉ. एस.के. लिमये यांची नात) सारख्यांनी नवी मुंबर्इ प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्तेपदासारखी पदे घेतली असताना तुम्ही मात्र पहिला मुक्काम सीपीआयमध्ये करत आहात, ही समाधानाची बाब’ असल्याचे सांगितले. मला वाटते एक प्रकारे कॉ. कृष्णा केमुसकर यांनी लाल निशाण पक्ष, लेनिनवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. आम्हीही त्यांच्या या मुक्कामाने समाधानी झालो आहोत.

देशातील सर्वच कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र आले पाहिजे, सुरुवातीला निदान दोन लाल निशाण पक्षांनी तरी एकत्रित येऊन तसे उदाहरण घालून दिले पाहिजे, असे जाहीर आवाहन कॉ. यशवंत चव्हाण यांनी २००२ च्या अखेरीस आमच्या पक्षाचे अध्यक्ष कॉ. आप्पासाहेब भोसले यांच्या अंत्ययात्रेनंतरच्या शोकेसभेत जाहीरपणे केले होते. ज्या धोरणामुळे आपला पक्ष विभक्त झाला होता, त्या धोरणाबद्दल काय? त्याचा तुम्ही आत्मटीकात्मक राहून पुनर्विचार करणार आहात काय? असा प्रश्न ‘लाल निशाण’मध्ये लेख लिहून लेनिनवाद्यांनी विचारला होता. पण त्या वेळी त्याला त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर १५ वर्षानी त्या आमच्या मित्रांनी सीपीआयमध्ये विलीन होण्यापूर्वी दोन वर्षांआधी आमच्याशी याबाबत चर्चा सुरू केली होती. तसे करणे स्वाभाविक होते, असे आम्ही मानतो. कारण आम्हा दोन्ही पक्षांची जन्मकुंडली व नाळ तशी एकच होती.

१९४२ साली एकच असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ४२ च्या ‘चले जाव’ स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेण्याची तयारी नव्हती. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर ‘देशद्रोही’ असल्याचे आरोपही झाले होते. (नंतर पक्ष अधिवेशनात ठराव करून ही चूक त्यांनी मान्य केली.) त्या वेळेच्या आमच्या पुढारीपणाने या धोरणावर केलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या परिणामी प्रस्थापित पुढारीपणाने त्यांना पक्षातून काढून टाकले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेणारी वाट चोखाळली. अशा प्रकारे आमच्या लाल निशाण पक्षाच्या निर्मितीचा इतिहास एकच आहे.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर १९५६ साली सोविएत युनियन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ख्रु्श्चेव्ह यांनी घेतलेल्या ‘दुरुस्तीवादी’ सिद्धान्ताचाही वैचारिक पातळीवर आमच्या पूर्वसुरींनी विरोध केलेला. कॉ. माओेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या केवळ चिनी क्रांतीचेच नव्हे तर सांस्कृतिक क्रांतीचेही समर्थन केले होते. या काळात सीपीआय तर सोविएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाची भारतीय शाखा असल्यासारखीच वागत होती! परराष्टी्य धोरणांशी संबंधित राष्ट्रीय धोरणाबाबतही त्यांची हीच स्थिती होती. म्हणून आणीबाणीलाही त्यांनी पाठिंबा दिला होता. आणीबाणीत आमचे त्या वेळचे कॉ. आहेरकर, कॉ. माणिक जाधव यांना तुरुंगात डांबले होते. अशी आमची संयुक्त लाल निशाण पक्षाची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर वैचारिक व व्यeवहारिक बाबतीत उज्ज्वल परंपरा असल्यामुळे त्यांनी पुन्हा आमच्याशी संपर्क साधने आम्ही स्वाभाविकच समजत होतो.

याचा अर्थ एकत्रित लाल निशाण पक्षात सर्वच आलबेल चालले होते असे नाही. नंतरच्या काळात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाबतीत घ्यावयाच्या भूमिकेबद्दल सुरुवातीला संथपणे, पण नंतरच्या काळात तीव्र मतभेद उफाळून आले. त्यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे, देशातील राष्ट्रीय भांडवलदार वर्गाचे, त्यातही भांडवली प्रवृत्तीचे मध्यमवर्गीय बुद्धिजीवी पुढारीपणाचे व आणखीच स्पष्ट सांगायचे तर काँग्रेसचे, त्या पक्षाच्या पुढारी इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांचे मापन कसे करायचे? दुसरा मुद्दा होता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सोविएत युनियन कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी स्थानापन्न झालेल्या गोर्बाचेव्ह यांचे व त्यांच्या ‘पेरेरोस्त्रायका व ग्लासनोस्त’च्या धोरणाचे मापन कसे करायचे? मुख्यत: या दोन मुद्यांशिवाय स्त्रियांच्या चळवळीबद्दल, उच्च व मध्यमवर्गीय स्त्रिया की, कष्टकरी श्रमिक स्त्रिच्या प्रश्नाबद्दलची प्राधान्यक्रमाची व इतरही भूमिका काय असावी? यासारख्या मुद्द्यांना धरून इतरही काही मुद्दे वादाचे होते. पण यात चुकूनही धर्मांध व जातीय शक्तींबद्दलचा मुद्दा चर्चेत नव्हता, हे येथे निक्षून सांगत आहोत. त्याबद्दल येथे जास्त तपशिलात लिहिणे शक्य नाही. याबद्दल घमासान चर्चा व वादविवाद व प्रचंड लिखाणही झाले आहे.

अशा रीतीने कॉ. एस.के. लिमये, कॉ. यशवंत चव्हाण, कॉ.दत्ता देशमुख, कॉ. संतराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील विभागाने आपल्या पक्षाचे नाव पूर्वाश्रमीची मालकी म्हणून ‘लाल निशाण पक्ष’च ठेवले. आमच्या कॉ. आप्पासाहेब भोसले, कॉ. डी.एस. कुलकर्णी, कॉ. भास्करराव जाधव, कॉ. मधुकर कात्रे, कॉ. भी.र. बावके, कॉ. अशोक मनोहर, कॉ. पी.डी. दिघे, कॉ. डी.एस. देशपांडे, कॉ. लिलातार्इ भोसले, कॉ. नाना शेटे, या दुसऱ्या विभागाने आपल्या ‘लाल निशाण पक्षा’च्या पुढे कंसात ‘लेनिनवादी’ लावले. त्याचे मुख्य कारण होते की, आंतरराष्ट्रीय पातळीवर गोर्बाचेव्हचे ‘पेरेरोस्त्रोयका व ग्लासनोस्त’ (पुनर्रचना व खुलेपेपणा)चे धोरण म्हणजे त्यांनी लेनिनवादावर चढवलेला हल्लाच आहे, असे आमच्या पुढारीपणाचे मत होते. तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी प्राप्त परिस्थितीत ‘लेनिनवादी’ शब्दच योग्य राहील असे मत पडले. तेव्हापासून त्याच नावाने आमच्या पक्षाने मासिक मुखपत्र काढणे सुरू केले, ते आजपर्यंत अखंडपणे चालू आहे व पुढेही चालू राहणार आहे. त्यावरील आमचे घोषवाक्य आहे, ‘कामगार क्रांतिशिवाय दलित व स्त्रिची मुक्ती नाही व त्यांच्या सहभागाशिवाय कामगार क्रांती शक्य नाही’. आमच्या दुसऱ्या मित्रांनी गोर्बाचेव्ह यांनी जगात जणू काही आता बदलाचे नवीनच वारे सुरू केले आहे, अशा भ्रमात त्यांचे ‘जग हे परस्परावलंबी, परस्पर संबंधित आहे व परस्परपूरक आहे’ हे गोर्बाचेव्ह यांचे घोषवाक्य घालून ‘नवे पर्व’ नावाचे मासिक सुरू केलेले. काही काळ ते चालले पण पुढे बंद पडले. तरीही महाराष्ट्रातील जाणते राजकीय कार्यकर्ते त्यांना ‘नवे पर्व’वाले म्हणूनच ओळखतात!

पुढे चालून लाल निशाणच्या या दोन्ही विभागांनी आपापल्या धोरणानुसार मार्गक्रमण सुरू केले. साधारणत: २८ वर्षाचा हा काळ आहे. या काळात ‘नवे पर्व’वाल्यांनी घेतलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोरणाची व्यावहारिक परिणती काय झाली, याचा आढावा २००२ साली त्यांनी केलेल्या एकत्रीकरणाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना आम्ही आमच्या ‘लाल निशाण’च्या अंकातील लेखात घेतला आहे. इच्छुकांनी तो लेख जरूर वाचावा. २००२ नंतर तर त्यांच्या धोरणाचे फारच धिंडवडे उडाले आहेत. त्यामुळे ‘नवे पर्व’च्या परिवारातील कार्यकर्ते इतस्तत: आपापला मार्ग चोखाळायला लागले. त्यातील काही सरळ काँग्रेसमध्ये गेले, जे गेले नाहीत त्यांचीही उठबस मुंबर्इतील काँग्रेसच्या ‘टिळक भवनात’च राहिली. कारण काँग्रेसच्या पुढाऱ्यांशी संबंध वृद्धिंगत करण्यात त्यांना रस होता. काहींनी काँग्रेस नेतृत्वाच्या इंग्रजी पुस्तकांची मराठीत भाषांतरे करण्यात आपली ऊर्जा खर्च केली. ज्यांनी भाषांतरे केली नाहीत, अशांनी काँग्रेस अजूनही कशी धर्मनिरपेक्ष आहे व रा.स्व. संघ, भाजपशी कशी मुकाबला करू शकते, पण डावे पक्ष त्याची दखल घेत नाही म्हणून नाराजी व्यक्त करणारे लेख लिहायची मोहीम हाती घेतली. काही तर थेट सोनिया गांधींच्या सल्लागार मंडळात पोहोचेले. त्यांनी पक्षाशी औपचारिक संबंध न ठेवता स्वत:स शिक्षणक्षेत्राला वाहून घेतले व झोपडपट्ट्ट्यातील गोरगरीब मुलांना ‘प्रथम शिक्षणाच्या कक्षा’त आणण्याचे महत्कार्य अविरतपणे चालू ठेवले. काही जण पक्षातच राहून एनजीओच्या प्रमुख पदावर आरूढ झाले आणि एनजीओंना निधी देण्याचे निकष तपासू लागले. जे अशा प्रमुख पदावर जाऊ शकले नाहीत, त्यांनी जेथल्या तेथेच ‘ओला कचरा-सुखा कचरा’ गोळा करणे सुरू केले. देशातील वीज टंचार्इचा प्रश्न ध्यानी घेऊन आणि कोणा तज्ज्ञांनी ‘ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती’ होत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांनी तो वेगवेगळा करणे सुरू केले.

यूपीएचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाबद्दल फ्रान्सच्या अरेवा कंपनीशी करार केला, तेव्हा या परिवाराने त्याचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर कोकणासह महाराष्ट्रातील जनता या जैतापूर प्रकल्पाविरोधी आंदोलने करत होती आणि त्या आंदोलनात त्या परिसरातील काही लोकांचा बळीही सरकारने घेतला, तरीही या प्रकल्पाच्या बाजूने हे ठामपणे उभे राहिले. पण हा अपवाद नव्हता. जागतिकीकरणाचा अविभाज्य भाग असलेल्या सरकारच्या ‘सेझ’लाही यांचा पूर्ण पाठिंबा होता. महाराष्ट्रासह देशातील जनता ‘सेझ’ विरुद्ध ठिकठिकाणी संघर्ष करत असताना, चीनमध्येही ‘सेझ’द्वारे प्रगतीच झाली आहे, असे ‘नवे पर्व’वाल्यांकडून सांगितले जात होते. त्यामुळे महाराष्ट्रातील डाव्या पक्ष संघटनांनी भार्इ एन.डी.पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन केलेल्या ‘जागतिकीकरणविरोधी कृती समिती’चे ते कधीच घटक बनले नाहीत. एन्रॉन लढ्याच्या वेळीही त्यांची हीच गत होती. त्यांच्या अशा धोरणामुळे महाराष्ट्रीय जनतेच्या लढ्याशी त्यांचा काहीच संबंध आला नाही. जेथे कॉ. यशवंत चव्हाणांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त आधार कार्डचे जनक नंदन निलकेणींचे मार्गदर्शन घेतले जाते, जागतिकीकरणाचे खंदे समर्थक आणि विविध भांडवली वृत्तमानपत्रांचे संपादकपद भूषवलेल्यांशी जैव संबंध असलेल्यांकडून तशी अपेक्षा करणेही चूकच आहे. ‘नवे पर्व’वाल्यांचा परिवार हा असा काँग्रेस धार्जिणा आहे.

वरीलप्रमाणे ‘नवे पर्व’ची त्यांच्या धोरणामुळे वाताहत चालू असताना त्यांच्यापैकी ज्यांचे ट्रेड युनियनमध्ये अजूनही बस्तान कायम होते, अशांनी एकत्रिकरणासाठी आमच्या मुंबर्इच्या कॉम्रेडशी संपर्क साधला. निदान त्यांचे कामगार कष्टकऱ्यादी तळच्या विभागांशी संबंध तरी होते. त्यांच्या काँग्रेसशी असलेल्या राजकीय संबंधाची ट्रेड युनियन पातळीवर मदत व्हायची, हे खरे आहे. मुंबर्इ महापालिकेतील सफार्इ कामगारांबरोबरच महाराष्टा्तील वन सामाजिक वनिकरण, गांव कोतवाल इत्यादी ग्रामीण विभाग निश्चितच त्यांचा ॠणी राहील. पण जागतिकीकरणाच्या बदललेल्या परिस्थितीत पूर्वीसारख्या ट्रेड युनियन चालवणेही अवघड होऊ लागले. त्यात ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणतात, त्याप्रमाणे काँग्रेसची केंद्र व राज्यातील सत्ताही गेलेली. एक प्रकारे बेवारस झालेल्या स्थितीत कोणीतरी मित्र शोधणे आवश्यक होते. पूर्वाश्रमीची एकच नाळ असलेले म्हणून त्यांनी आमच्याकडे बघितले असावे, असे आम्हाला वाटले. आम्हाला त्यांच्यातील एनजीओ वगैरेमध्ये फारसा रस नव्हता. कष्टकऱ्यांमध्ये संबंध असलेले काही कार्यकर्ते आले तर बघू या, या इराद्याने आम्ही त्यांना साथ द्यायचे ठरवले. सुरुवातीला आमच्या मुंबर्इच्या कार्यकर्त्यानी तुमच्या काँग्रेसवादी व गोर्बाचेव्हवादी धोरणाचे काय झाले, अशी विचारणा करणे साहजिक होते. कारण आम्ही नसता विचारला तरी महाराष्ट्रातील इतर कार्यकर्त्यांनी तो प्रश्न विचारलाच असता. त्याचे उत्तर देणे भाग होते. पण आमचे असे विचारणे म्हणजे जणू काही आम्ही त्यांना ‘नाक मुठीत धरून शरण यायला सांगत आहोत’ अशी त्यांची भावना झाली असावी. काही काळ तसाच गेला. आम्ही या मुद्यावरून थोडी ढिल दिली. आमच्या पक्षाची घटना व नियम तसेच पक्ष कार्यक्रम त्यांना वाचायला दिला. त्याला धरून तरी एकत्रित काम करता येईल किंवा त्याबाबत त्यांचे काय मत आहे ते तरी कळेल हा त्यामागे उद्देश होता. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. आणखी काही काळ तसाच गेला.

मग त्यांनी आपल्या एकत्रित लाल निशाण पक्षातील जुन्या, ज्येष्ठ पुढारी-कार्यकर्त्याचा सर्वांच्या वतीने सत्कार करण्याचा प्रस्ताव ठेवला. आम्ही त्याला मान्यता देऊन त्या कार्यक्रमात जुन्या कार्यकर्त्यांसह सहभागी झालो. त्यानंतर ट्रेड युनियन पातळीवर संयुक्तपणे आंदोलने करावीत म्हणून काही मोर्चेही एकत्रित काढले. त्यांचे ‘नवे पर्व’’ बंद पडले होते म्हणून त्यांना काही लेख वगैरे लिहायचे असल्यास ‘लाल निशाण’मधून प्रसिद्धी देऊ असे सांगितले. अट फक्त एकच होती की, त्यांनी लिहिलेल्या लेखांशी आमचे मतभेद असल्यास तसे संपादकीय चौकटीत आम्ही लिहू. त्यांनी तसे एक-दोन लेख लिहिले. आम्हीही संपादकीय चौकटी देऊन ते छापले. पण गाडी यापेक्षा फारशी पुढे गेली नाही. आणखी काही काळ असाच गेला. त्यांनी आपल्या एकत्रिकरणाबद्दल त्यांच्या पक्षाची एक समिती स्थापन केली असल्याचे समजले. त्याचेही आम्ही स्वागत केले. त्या समितीबरोबर आमची मुंबर्इ येथे बैठकही आयोजित केली होती. पण त्या समितीतील कोणीतरी एक कॉम्रेड आजारी असल्याने ती बैठक पुढे ढकलल्याचे व नंतर अशी बैठक घेऊ असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्याबाबतही आमचे काही म्हणणे नव्हते. पण मग अचानक एके दिवशी या समितीने भाकपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बातमी वाचून आम्हाला धक्का बसला. परस्परांवरील विश्वासार्हतेला तडा गेला. भांडवली ‘राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो’ हे खरे आहे, पण डाव्या राजकारणातही ते तसेच आहे, याची प्रचिती ‘नवे पर्व’वाल्यांनी आणून दिली. खंत केवळ त्याची वाटते.

याप्रमाणे ‘नवे पर्व’चे लेनिनवाद्यांशी जुळणे शक्य नव्हते, हे स्पष्ट झाले. मग प्रश्न उरतो त्यांचे भाकपशी जुळण्यामागे समान धागे कोणते? खरे म्हणजे लेनिनवाद्यांशी न जुळण्याची जी कारणे आहेत, त्याच धोरणामुळे भाकपशी त्यांचे जुळू शकते. भाकपच्या आणीबाणीपूर्वच्या डांगेवादी धोरणानुसार भारतातील राष्ट्रीय भांडवलदार येथील भांडवली लोकशाही क्रांतीच्या नेतृत्वस्थानीसुद्धा कामगारवर्गाबरोबर राहू शकतो. त्याच धोरणाने त्यांनी पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत सर्वांबरोबर सहकार्य केले होते. आणीबाणी हे त्याचे भयानक रूप आहे. आणीबाणीनंतर मात्र त्यांनी राष्ट्रीय भांडवलदारवर्गाच्या नेतृत्वस्थानाचे धोरण सोडले असल्याचे जाहीर केले, पण अजूनही ते त्यांचे धोरण पूर्णपणे बदलले नाही. ग्रामीण भागातील शोषक असलेल्या व दलितादी शोषित घटकावर अन्याय-अत्त्याचार करण्यात पुढाकाराने असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांबरोबर सलगी करण्याचे आवाहन ते पक्ष अधिवेशनातून अधूनमधून करत असतात. काँग्रेसच्या विखे पाटलांपासून अजित पवारांपर्यंत हे आवाहन पोहोचते. ग्रामीण भागातील सधन शेतकऱ्यांचा हा शोषक वर्ग, त्यांच्या भावी क्रांतीतील मित्र वर्ग आहे.. अजूनही इंदिरा गांधींचे गुणगाण चालू असते. हीच आवाहने व गुणगाणाची गुणगुण ‘नवे पर्व’ला त्यांच्याकडे आकर्षित करते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भाकपवाले तर गोर्बाचेव्हच्या विचारांचे वाहकच होते. सोविएत युनियनची पूर्णपणे वाट लागेपर्यंत त्यांनी हे वाहकाचे काम केले. हेच काम लाल निशाणमधील ‘नवे पर्व’चा गट करत होता. लेनिनवाद्यांमुळे त्यात त्यांना अडथळा येत होता. वेगळे झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे मोकळेपणाने या कामाला वाहून घेतले. गोर्बाचेव्हच्या खुलेपणाने सोविएत युनियन बरबाद झाल्यानंतर पूर्वीचा विरोधक असलेल्या चीनकडे आता भाकपवाले मोठ्या आशाळभूतपणे पाहतात. चीन कशी प्रगती करत आहे, याचे दाखले तर सर्वच देतात. ‘नवे पर्व’वालेही चीनची प्रगती कशी होत आहे, त्यात तेथील ‘एफडीआय व सेझ’चा वाटा किती महत्त्वाचा आहे, हे सांगताना थकत नव्हते. आम्ही मात्र कॉ. माओनंतर चीनने समाजवादी मार्ग सोडून भांडवली विकासाचा मार्ग पत्करला आहे आणि त्याचे दुष्परिणाम तेथे होत आहेत, असे सुचवत आहोत.

आताच्या त्यांच्या एकजुटीच्या निवेदनात १९८८ सालच्या त्यांच्या एकजुटीच्या आवाहनाचा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे भारत, चीन, सोविएत युनियन एकत्र येत आहेत आणि त्यामुळे अमेरिकन साम्राज्यवादाविरोधात जगाचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, अशी आशा व्यक्त करून या पार्श्वभूमीवर भारतातील दोन्ही कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेस (‘नवे पर्व’ त्यात आपसूकच समाविष्ट होता) यांनी एकत्र आल्यास देशातील लोकशाही कार्यक्रम राबवण्यासाठी परिस्थिती पोषक होईल, अशी दूरदृष्टी दाखवली होती.

पण काँग्रेसच्या (की ‘नवे पर्व’च्या?) दुर्दैवाने काँग्रेससह दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जे होऊ नये ते घडले. भाजपच्या कधी काळी दोनवर असलेल्या खासदारांची संख्या आता २८२ वर गेली आहे. ते केंद्रात व राज्याच्या सत्तेवर जाऊन बसले आहेत. त्याला काँग्रेसवाले बिचारे काय करतील? ‘नवे पर्व’च्या आवाहनाकडे त्याच वेळी दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी गांभीर्याने पाहिले असते, तर आज देशावर हा दुर्धर प्रसंग ओढवला नसता. पण आता तो ओढवलाच आहे, तर मग निदान आतातरी भाकप आणि आणि माकपसह सर्वांनी एकजूट होऊन काँग्रेसला बळकट करावे. पण हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत निदान ‘नवे पर्व’ आणि भाकप यांनी सुरुवातीला एकत्र यावे आणि या फॅसिस्ट शक्तीशी मुकाबला करावा, यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल आहे. स्वत:च्या वर्तणुकीचेच आदर्श उदाहरण घालून दिल्यास पुढे-मागे इतर कम्युनिस्ट पक्षही हाच मार्ग अवलंबतील, अशी त्यांना आशा आहे. पण या सर्व प्रक्रियेत काँग्रेसवाले कोठे आहेत? काँग्रेस यांच्यात येऊन मिळणार आहे, की पुढे-मागे हेच काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत, याचा काहीही थांगपत्ता त्याच्या संयुक्त निवेदनावरून लागत नाही.

विलिनीकरणाबाबतच्या निवेदनातील एक पान

त्यांच्या निवेदनात जगातील ठिकठिकाणच्या फॅसिस्ट शक्ती कशा वाढत आहेत, हे सांगितले असून आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती किती बिकट आहे, देशातील कामगार कष्टकऱ्यादी विभागावर किती हल्ले वाढत आहे आणि देशातील धर्मांध व जातवर्चस्ववादी शक्ती कसा धुमाकूळ घालत आहेत, याचे मोठे सुंदर वर्णन केले आहे. पण ही सर्व परिस्थिती कशामुळे व कोणामुळे निर्माण झाली, याचा काहीही ठावठिकाणा या निवेदनातून लागत नाही. केवळ त्यांच्यासह दोन्ही कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले नाही आणि काँग्रेसमध्ये विलीन झाले नाही, यामुळे हे इपरीत घडले की काय? या सर्व परिस्थितीला देशात व विविध राज्यांत जास्तीत जास्त काळ सत्तेत राहिलेली काँग्रेस थोडीही जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांच्या निवेदनात नाही. ही बाब मोठी शोचनीय आहे. काँग्रेससोबत जावे, ही तर ‘नवे पर्व’वाल्यांची लार्इनच आहे, पण आणीबाणीनंतर ती आम्ही सोडली, असे भाकपवाले म्हणतात. मग तसा उल्लेख या संयुक्त निवेदनात का केला नाही? अनवधानाने तसे घडले असावे, असे आम्हाला वाटत नाही.

वरील परिस्थितीस जगातील साम्राज्यवाद्यांनी व देशोदेशीच्या राज्यकर्त्या वर्गांनी आणि त्यांच्या विविध पक्षांनी (भारतात मुख्यत्वेकरून काँग्रेस व भाजप) आपापल्या ठिकाणी राबवत असलेले जागतिकीकरणाचे, खुल्या मार्केटचे, खाजगीकरण व आधुनिकीकरणाचे धोरण याला खास करून जबाबदार आहे. जागतिक मंदीसदृश्य आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हेच धोरण राबवावे लागते. दुसरा मार्ग त्यांच्याकडे नाही. जागतिकीकरणाचे हे जे आर्थिक धोरण आहे, त्याचीच राजकीय परिणती म्हणजे फॅसिस्ट शक्तींनी जगभर सत्तास्थानी येणे व धुमाकूळ घालणे होय. आपला भारत देशही त्याला अपवाद नाही.

आपल्या देशात आताचे सत्ताधारी रा.स्व. संघ, भाजप हेच धोरण जास्त नंगाटपणाने राबवत आहेत आणि त्याचे भोग भारतीय जनता भोगत आहे हे खरे आहे. पण या जागतिकीकरणाच्या धोरणाची मुहूर्तमेढ तर काँग्रेस पक्षाच्या राजीव गांधी-नरसिंहराव–मनमोहनसिंग यांनीच रोवली आहे. त्यांना या जबाबदारीतून मोकळे कसे सोडता येर्इल? त्यांच्याच धोरणातून वाढलेल्या संघ-भाजप या फॅसिस्टांशी मुकाबला काँग्रेसला पक्ष म्हणून बरोबर घेऊन कसा करता येर्इल? या संघर्षाच्या नेतृत्वस्थानी तर काँग्रेस असूच शकत नाही. त्यांच्यातील काही व्यक्ती खरोखरच धर्मनिरपेक्ष व फॅसिस्टविरोधी असतील तर अशा व्यक्ती अथवा समूह, या संघर्षाच्या बरोबर मात्र राहू शकतील. तसे त्यांना सर्व डाव्यांनी आपल्याबरोबर घ्यावे, असे आमचे मत आहे.

या निवेदनात ‘भाकपच्या नव्या पक्ष कार्यक्रमात डाव्या पक्ष संघटनांच्या एकत्रिकरणाचे आवाहन करणे, हे या एकजुटीच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरते. त्यामुळे लाल निशाण पक्षाने भाकपमध्ये विलिनीकरणाचा निर्णय घेतला आहे’, असे म्हटले आहे. केवळ त्यांनी एकजुटीचे आवाहन केले, यामुळे ते त्या पक्षात विलीन झाले असे म्हणावे तर मग तसे आवाहन तर अनेक कम्युनिस्ट पक्ष\संघटना सातत्याने करत असतात. माकपने (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) पश्चिम बंगालमधील पराभवानंतर अशाच निखळ डाव्यांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. तो तर देशातील सर्वांत मोठा संसदीय डावा पक्ष आहे. मग त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘नवे पर्व’वाले त्यात का विलीन झाले नाहीत? त्याचे साधे कारण असे की, त्या पक्षात काँग्रेस सोबत जाण्याविषयी मतभेद आहेत. बंगाल व केरळ लार्इन, प्रकाश करात व सीताराम येचुरी लार्इन म्हणून तो वाद चर्चेत आहे. म्हणून त्यापेक्षा निर्विवाद असलेल्या भाकपमध्ये जाणे त्यांनी पसंत केलेले आहे.

ते तेथे गेले आणि तेथेच विलीन झाले! याचा आम्हाला यामुळे आनंद होत आहे की, आतापर्यंत नवजीवन संघटना, लाल निशाण पक्षाचा जो वैचारिक वारसा होता, तो ते गमावून बसले आहेत. त्या मौल्यवान वारश्याचे आता केवळ आम्हीच वारस उरलो आहोत. एकत्र असताना ‘फडकत आम्ही उभे ठेविले, लाल निशाण हे लाल निशाण’ हे आमचे पक्ष गीत असायचे. शिबिरादी कार्यक्रमातून ते आम्ही गायचो. वेगळे झाल्यानंतर आम्ही पक्ष नावाप्रमाणेच पक्ष गीतातही भर टाकली. नंतर आम्ही ‘फडकत आम्ही उभे ठेविले, लेनिनवादी लाल निशाण’ असे म्हणायचो. आता आम्ही ते पक्ष गीत पूर्ववत म्हणणार आहोत आणि आमच्या नावापुढील ‘लेनिनवादी’ या नावाचे काम व महत्त्व संपले नसले तरी ते आता लाल निशाण पक्षाचे वेगळेपण ठेवण्याचे कारण उरले नाही. म्हणून आम्ही येथून पुढे आमच्या पक्षाला केवळ ‘लाल निशाण पक्ष’ असेच म्हणणार आहोत. त्यासाठी आता आमचा मार्ग मोकळा झाला आहे!

लेखक मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.

bhimraobansod@gmail.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.