अमरनाथ आणि जुनैद : चेतन भगत यांच्या विचारसरणीतील ‘थ्री मिस्टेक्स’
पडघम - देशकारण
सिद्धार्थ वरदराजन
  • चेतन भगत
  • Tue , 08 August 2017
  • पडघम देशकारण चेतन भगत Chetan Bhagat सिद्धार्थ वरदराजन Siddharth Varadarajan

चेतन भगत हे सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणारे भारतीय लेखक आहेत. त्यांनी इथल्या मध्यमवर्गाची नाडी अचूक ओळखली आहे. अमरनाथवरून येणाऱ्या गुजरातमधील हिंदू यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी ट्विटरवर एक अविचारी पोस्ट टाकली. वरकरणी ती पोस्ट एवढी गोड आणि समतोल वाटत होती की, त्यावर प्रतिक्रिया म्हणून हजारो लोकांनी ट्विट केलं आणि ‘लाईक’सुद्धा केलं.

परंतु त्यांनी लावलेल्या तर्कामुळे काही लोकांना आश्चर्याचा धक्काही बसला. जेव्हा @anirbanblah यांनी चेतनना प्रश्न विचारला की, “तुमच्या या ट्वीटची आपल्या देशाला मदत झाली का? त्यामुळे हे जग जगण्यासाठी अधिक चांगलं बनलं का?’’ तेव्हा चेतननी उत्तर दिलं की, “मला या विषयावर चर्चा करायला आवडेल. मी कुणाला दोष देत नाहीये फक्त तुमच्या कृतीत एकवाक्यता ठेवा आणि वस्तुस्थितीला धरून राहा एवढंच म्हणत आहे.’’

ठीक आहे, तर मग आपण वस्तुस्थितीच तपासून पाहूया. जुनैद मुस्लिम होता म्हणून त्याला लक्ष्य केलं गेलं आणि त्याची हत्या झाली असा मीडियानं अहवाल दिला का? मीडियातील काहींनी तसं केलं आणि त्यांचं बरोबरही होतं. परंतु काहींनी असा सूर आळवला की, आगगाडीत झालेल्या ज्या हाणामारीत त्या तरुणाचा जीव गेला, ती बसायच्या आसनांवरून झाली. त्यात त्याच्या धर्माचा काहीच संबंध नव्हता. खरं सांगायचं तर पोलीस आणि सोशल मीडियावरचे हिंदुत्ववादी अजूनही याच भूमिकेला चिकटून आहेत. परंतु त्या हाणामारीतून वाचलेल्या लोकांच्या आणि आरोपी म्हणून पकडलेल्या लोकांच्या विधानांतून स्पष्ट होतंय की, आगगाडीतील काही प्रवाशांनी जुनैद आणि त्याच्या सहप्रवाशांना लक्ष्य करून मारहाण केली. कारण ते पेहरावावरून मुस्लीम आहेत हे कळत होतं. त्यानंतर ‘मुस्लीम दिसणाऱ्या कुटुंबांवर आगगाडीत हल्ला झाल्याची कमीत कमी एक खळबळजनक घटना नोंदवली गेली आहे.

आता आपण अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील ७ बळींकडे वळूया. मीडियाने ताबडतोब त्यांना यात्रेकरू (हिंदू) म्हणून ओळखलं. आणि नंतर असंही सांगितलं की, उरलेल्या प्रवाशांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणारा बसचालक मुस्लीम होता. (त्यामुळे प्रवासी मुस्लीम नव्हते हीच बाब अधोरेखित झाली.) प्रवासी ‘यात्रेकरू’ होते म्हणून लक्ष्य केलं गेलं, याबद्दल काही गोंधळ असेल तर तो तिथल्या बीजेपी-पीडीपी राज्य सरकारच्या जम्मू-काश्मीर पोलिसांचा दोष आहे. कारण त्यांनी वार्ताहरांना सांगितलं की, दहशतवाद्यांनी अगोदर पोलीस जीपवर गोळीबार केला आणि ते तिथून निसटून जात असताना यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला.

तरीही पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चाललेल्या गोळीबारात हे बळी चुकून मारले गेले, असा एकही मीडिया रिपोर्ट मला पाहायला मिळाला नाही. ट्विटरवर असं लिहिणारे मूठभर काश्मिरी लोक होते, जे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हाकेला धावून आले होते. परंतु हे लोक ‘जुनैदची हत्या आगगाडीतील आसनावरून झाली’ असं म्हणणाऱ्या हिंदुत्ववादी समर्थकांच्याच पठडीतलेच होते. अर्थात् संख्येनं अल्प असलेल्या या दोन्हीकडील समर्थकांची नैतिक कुवत एवढी भ्रष्ट झाली आहे की, ती दुरुस्तीच्या पार पलीकडेच गेली आहे.

मात्र मला असाही मीडिया रिपोर्ट बघायला मिळालेला नाही, ज्यात असं म्हटलंय की बळींची हत्या झाली कारण ते गुजराती होते किंवा गुजरातचे परवानाफलक लावलेल्या गाडीतून जात होते. नाही हो, मीडिया रिपोर्टमध्ये बळींना ‘यात्रेकरू’ असं संबोधलं गेलं. ते यात्रेकरू होते म्हणूनच त्यांच्यावर गोळीबार झाला. २००० सालानंतर प्रथमच या प्रकारे दहशतवाद्यांनी हिंदू यात्रेकरूंना लक्ष्य बनवलं असंही म्हटलं गेलं.

खरं सांगायचं तर मीडियानं दिलेल्या बातम्यांतून असाही अंदाज वर्तवला गेला की ‘इस्लामिक स्टेट’च्या तत्त्वज्ञानानं प्रेरणा मिळालेल्या नव-दहशतवाद्यांचं हे कृत्य असावं. इसिसच्या सिद्धान्तानुसार बिगर-मुस्लिम आणि ‘सलाफी’ आदेशांचं पालन न करणारे मुस्लिमही हत्येस पात्र ठरतात.

अमरनाथ हत्याकांडाची बातमी ज्या पद्धतीनं दिली गेली, त्यावरून हे कळत नाही की, चेतन भगतना सुसंगती हवी आहे तरी कुठली? तिथल्या बळींचं वर्णन करताना ‘हिंदू’ या शब्दाऐवजी ‘यात्रेकरू’ हा शब्द वापरला गेला आणि जुनैदचं वर्णन करताना मात्र ‘ईद साजरी करायला बाहेर पडलेला माणूस’ असा शब्द न वापरता ‘मुस्लीम’ हा शब्द वापरला गेला, म्हणून ते अस्वस्थ झालेत का? अमरनाथचा यात्रेकरू हिंदू सोडून अन्य कुणी असू शकतो का? काश्मिरातील अतिरेक्यांनी अमरनाथ यात्रेकरूंना ठार मारलं अशी बातमी पाहाणाऱ्या/ऐकणाऱ्या माणसांना बळी कोण असतील याबद्दल काही प्रश्न पडेल का? बळी हिंदू होते आणि हिंदू होते म्हणूनच मारले गेले, याबद्दल त्यांच्या मनात काही शंका येईल का?

सत्य हेच आहे की चेतन भगतनं केलेलं ट्विट केवळ ‘शब्दार्थांचा कीस पाडणारं’ नाहीये. कदाचित त्यांनी लिहिताना पूर्ण विचारांती लिहिलं नसेल. किंवा मग ‘टाईम्स नाऊ’सारख्या ज्वलज्जहाल वृत्तवाहिनीचं तर्कशास्त्र त्यांनी भोळसटपणे मान्यही केलं असेल. ‘टाईम्स नाऊ’चे संपादक स्वतःविषयी बोलताना ‘आपण हिंदू लोक’ असं म्हणतात. पण ‘कृतीत सुसंगती पाहिजे’ अशी ‘वास्तवाधारित’ मागणी करताना शेवटी ते हीच कल्पना लोकांपुढे ठेवतात की, भारतातील कुणालाच हिंदूंची पर्वा नाहीये. भारतात हिंदूंची बहुसंख्या असूनही त्यांच्याबद्दल भेदभाव केला जातो आणि त्यांनाच बळी दिलं जातं. भारत हा हिंदूंसाठी सुरक्षित देश नाही. हिंदू मरतात तेव्हा कुणीही अश्रू ढाळत नाही. त्यांना वाचवण्यासाठी मीडिया, पोलीस किंवा सरकार काहीच करत नाही, कारण ही सर्व मंडळी मुस्लीम तुष्टीकरणात पूर्ण गुंतून गेलेली असतात. मुस्लीमही आपण ‘बळी’ आहोत असा कांगावा करतात आणि हिंदूंना नमवायला त्याचं भांडवल करतात. हिंदूंना जो त्रास सहन करावा लागतो त्याच्या मुळाशी मुस्लीमच आहेत. सगळे हक्क आहेत ते अल्पसंख्याकांनाच आहेत, बहुसंख्याकांना काहीच हक्क नाहीत.

आपल्याला काय सांगायचं आहे ते स्पष्टच बोलून टाकणं चांगलं. उगाच आडवळणं कशाला घ्यावीत? परंतु तसं करणं या बाबतीत नक्कीच बरं ठरत नाही. कारण एकदा का हा ‘दृष्टिकोन’ स्पष्टपणे समोर मांडला की, त्यातलं ‘कारस्थान’ झळाळून उठेल. मग प्रत्येकालाच स्वानुभवावरून त्यातला वेडगळपणा समजून येईल. अगदी चेतन भगतचं ‘कथाबीज’ असलं तरी तसंच होईल.

मुसलमानांचे असे लाड होत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी मी कुठलीही आकडेवारी देत बसत नाहीये. ती तर सच्चर समितीनं ढिगानं दिली आहे. त्याऐवजी चेतन भगत आपल्याला ज्या काल्पनिक कथावस्तूवर विश्वास ठेवायला सांगत आहेत, त्या कथावस्तूतील फक्त तीन विसंगतीच मी आपल्या नजरेसमोर आणू इच्छितो.

अमरनाथ यात्रेत मुस्लीम दहशतवाद्यांनी हिंदूंचे बळी घेतले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी लागोपाठ तीनदा ट्विट केलं. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. परंतु हिंदू गुन्हेगारांनी घेतलेल्या एका तरी मुस्लिम बळीबद्दल त्यांनी अजून एकदाही ट्विट का केलं नाही, याबद्दल माझ्यापाशी काहीच स्पष्टीकरण नाही. त्या बाबतीत चेतन भगत कदाचित म्हणतील की, ‘मी कुणाला दोष देत नाहीये. मी फक्त कृतीत एकवाक्यता असावी आणि ती वास्तववादी असावी एवढंच म्हणतो.’

अमरनाथ हल्ल्यातून वाचलेल्यांना विमानानं घरी परत आणलं गेलं, त्यांना आश्वासन दिलं गेलं की हिंसाचार घडवणाऱ्यांची ओळख पटवली जाईल आणि त्यांना शासन केलं जाईल. अमरनाथ यात्रा बोर्डाकडे तुम्ही नियमानुसार नोंदणी केली होती का? तुमच्याकडे आवश्यक ते परवाने होते का? अशा प्रश्नांनी त्यांची छळणूक करण्यात आली नाही. कुठल्याही सुसंस्कृत समाजातील अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील बळींशी जसं वागलं पाहिजे तसंच पोलीस वागले म्हणून मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते.  

मात्र त्या उलट पाहता दादरी आणि अलवार येथे जमावानं केलेल्या हिंसक हल्ल्यातून वाचलेल्या मुस्लिमांवर खटले दाखल झालेत आणि हल्लेखोरांची त्वरित मुक्तता व्हावी म्हणून भाजपच्या आमदार-खासदारांची लॉबी सज्ज होती. हिंसाचाराचा आरोप असलेला एक माणूस डेंगूनं मरण पावला तेव्हा त्याच्या दहनविधीच्या वेळेस एका मंत्र्यांनी हजेरी लावून त्याचा सन्मान केला आणि त्याचं पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आलं.

सगळ्यात शेवटी ही बघा केवढी मोठी विसंगती. तोच मीडिया (आणि तेच कार्यकर्ते) जुनैदच्या हत्येनंतर भारतीय मुस्लिमांच्या जगण्याच्या हक्कासाठी ठाम उभे राहिले, ज्यांनी ‘नॉट इन माय नेम’ या घोषवाक्याखाली मेळावे भरवले- ज्यांचं उणंदुणं चेतन भगत काढताहेत तेच लोक अमरनाथमधील हल्ल्यांचा धिक्कार करण्यासाठीही रस्त्यावर उतरले आणि भारतीय हिंदूंच्या जगण्याच्या आणि पूजा करण्याच्या अधिकारासाठी ठाम उभे राहिले. परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि त्यांचे सहकारी त्यांच्या धर्माच्या नसलेल्या भारतीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करतील म्हणून मी अजूनही वाट पाहत आहे. बळी पडणाऱ्या मुस्लिमांमुळे त्यांचं काळीज हलत नाही आणि जेव्हा मुसलमानांना लक्ष्य केलं जातं, तेव्हा प्रत्येक वेळी ते कुठली ना कुठली सबब देत राहतात.

वास्तव हेच आहे की, ज्यांना मानवी जीवनाची फिकीर आहे ते मुळी हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करतच नाहीत. असा फरक करणारे आहेत मुस्लीम धर्मातिरेकी आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चालणारे मुस्लिमद्वेष्टे हिंदू. राजकारणीसुद्धा त्यातच येतात – ज्यांना मतं मिळवण्यासाठी प्रत्येक शोकांतिकेचं भांडवल करायचं असतं.

एका शोकांतिकेतील बळींविरुद्ध दुसऱ्या शोकांतिकेतील बळींचा वापर करण्यासाठी, दोन सारख्या गुन्ह्यांना समान न्याय न लावता त्यातही राजकारण करण्याची संधी पाहण्यासाठी खास वेगळ्या प्रकारचा हिडीस ओंगळपणा लागतो.

अखलाक, पहलू खान आणि जुनैद यांची हत्या झाल्याचं मान्य करून त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यामुळे आणि त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी करण्यामुळे ११ जुलै रोजी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या सात अमरनाथ यात्रेकरूंच्या बलिदानाची कसलीही अवहेलना होणार नाही. मग श्रीमान चेतन भगत, तेवढं तुम्ही का म्हणत नाही आहात?

.............................................................................................................................................

सिद्धार्थ वरदराजन इंग्रजीतील ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत.

मराठी अनुवाद- सविता दामले प्रसिद्ध अनुवादक आहेत. त्यांचा ई-मेल - savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख thewire.in या पोर्टलवर १४ जुलै २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://thewire.in/157435/chetan-bhagat-amarnath-junaid/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......