रामनाथ कोविंद – ‘हिंदू राष्ट्रपती’!
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद
  • Thu , 27 July 2017
  • पडघम देशकारण जयदेव डोळे Jaidev Dole रामनाथ कोविंद Ram Nath Kovind डॉ. बाबासाहेब आंबेडकर B.R. Ambedkar अमित शहा Amit Shah डॉ. अब्दुल कलाम A. P. J. Abdul Kalam प्रणब मुखर्जी Pranab Mukherjee भाजप Bharatiya Janata Party BJP राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Rashtriya Swayamsevak Sangh RSS

भारतीय राजकारणात काही परंपरा पाळल्या जातात. एखादे पद कोणाला मिळाले की, ती व्यक्ती मोजक्या लोकांचे आभार तर मानतेच, शिवाय ज्यांचा वरदहस्त आपल्यावर होता अशा व्यक्ती व देवता यांचाही उल्लेख करते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवायला संसद कशी कामी आली हे आवर्जून सांगितले. एक दलित म्हणून सारे जण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या यशप्राप्तीच्या वेळी आवर्जून उल्लेख करतात. कोणाची नावे घ्यावीत अशी सक्ती नसते अथवा कोणाविषयी कृतज्ञ राहावे याबद्दल काही आग्रह नसतात. असा नामोल्लेख जसा एक उपचार असतो, तसा ऋणमुक्तीचा तो एक सोहळाही असतो.

नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ते निवडणूक जिंकल्यानंतरच्या पत्रकारांच्या पुढ्यात केलेल्या निवेदनात आपले घर, गरिबी, पावसाळा, कष्ट आदींचा उल्लेख केला. राजेंद्र प्रसाद, राधाकृष्णन, अब्दुल कलाम आणि प्रणब मुखर्जी यांचा त्यांनी आपले विद्वान पूर्वसुरी म्हणूनही उल्लेख केला. पण एक दलित म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख मात्र टाळला! एकतर त्यांनी एक लिखित भाषण वाचून दाखवले, दुसरे त्यांनी प्रश्नोत्तरे टाळली. सामान्य परिस्थितीतून राष्ट्रपतीभवनापर्यंत त्यांनी मारलेली मजल कोणाही भारतीयासाठी अभिमानास्पद आहेच, पण दलित जातीत जन्मलेल्याने एवढे मोठे स्थान प्राप्त करावे हे अधिक गौरवास्पद आहे. अशा वेळी स्वाभाविकपणे डॉ. आंबेडकर यांचे नाव तोंडात आले असते तर ते आणखी उचित झाले असते. मात्र तसे झाले नाही.

शपथविधी समारंभानंतरच्या भाषणात कोविंद यांनी आंबेडकरांचे सर्व विदित म्हणणेच नोंदवले. ‘डॉ. आंबेडकरांमुळे माझ्यासारखी व्यक्ती सर्वोच्चपदी बसू शकली’ असे ते म्हणाले नाहीत. डॉ. आंबेडकरांना आपल्या यशाचे श्रेय न देणारी अशी एक दलित व्यक्ती राष्ट्रपतीपदी बसावी याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे.

कोविंद यांची उमेदवारी ‘दलित’ म्हणूनच जाहीर झाली आणि ती करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी चारदा ‘दलित’ शब्द उच्चारला होता. शिवाय भाजप व संघ डॉ. आंबेडकरांचा जयजयकार आजकाल जोराने करूही लागले आहेत. तरीही ‘डॉ. आंबेडकर झाले, त्यांनी आमच्यासाठी काही करून ठेवले, म्हणून आम्ही ताठ मानेने जगू शकलो,’ असे कोविंद का म्हणाले नाहीत? एरवी तमाम संघसृष्टी ‘डावे-पुरोगामी तेव्हा गप्प का होते?’, ‘त्यांनी अमूक घटनेचा का नाही धिक्कार केला?’ अशा तऱ्हेचा जाब विचारत असताना आता कोविंदांनी ‘संधी असताना डॉ. आंबेडकरांचा नामोल्लेख का टाळला?’ असा जाब विचारणे क्रमप्राप्त ठरते. म्हणजे डॉ. आंबेडकर न मानणारे दलित अशा प्रकारातील राष्ट्रपती कोविंद आहेत काय? असतीलही.

डॉ. आंबेडकरांचे नाव कृतज्ञतापूर्वक न घेण्याला कोविंदांचा प्रेरणास्रोत असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कारण असेल काय? असणार. कारण संघ डॉ. आंबेडकरांचा स्वीकार अंत:करणापासून करत नाही. दलित मते डॉ. आंबेडकरांमुळे मिळत असतील तर नाव घ्या. डॉ. आंबेडकर हिंदूधर्माचा त्याग करणारे आहेत. त्यामुळे त्यांचे नाव राष्ट्रपती झालेल्या व्यक्तीने घेऊन धर्मत्याग अधिकृत ठरवू नये असा स्वार्थी विचार संघाचा असावा. हिंदूराष्ट्राच्या तयारीला लागलेल्यांना ‘हिंदू राष्ट्रपती’ डॉ. आंबेडकरांच्या कृतीला संमत ठरवणारा नको आहे. म्हणून डॉ. आंबेडकरांचे फक्त एक वाक्य ऐकवून नामोल्लेख केल्याचा उपचार कोविंद यांनी उरकला.

कोविंदांच्या उजव्या मनगटावर गंडेदोरे बांधलेली काही छायाचित्रे दाखवून गेली. आजकाल भाजपमध्ये अनेक मंत्री, प्रधानमंत्री, नेते अशी ‘मनगटी अंधश्रद्धा’ सतत व्यक्त करत असतात. कोविंदांचा शपथविधी चक्क मुहूर्त पाहून झाल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. आपल्या भाषणात भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आवर्जून उल्लेख राष्ट्रपतींनी केली. तिचा आधुनिकतेशी मिलाफही घडवून टाकला!

एकीकडे मोदी सरकार ‘एनजीओ’ म्हणजेच ‘नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स’ना अटकाव करते, तर दुसरीकडे नवे राष्ट्रपती केवळ सरकार सारे काही करेल असे मानणे गैर असल्याचे सांगत ‘समाज’सुद्धा तेवढाच पुढे यायला हवा असे म्हणाले. कोणता समाज? मोहन भागवत यांच्या प्रत्येक भाषणात महत्त्वाची जागा पटकावून असतो तो समाज? संघ सदैव समाजाला महत्त्व देऊन कायदा, संविधान, लोकशाही राज्यव्यवस्था मागे टाकत असतो, हे या निमित्ताने लक्षात घेतले पाहिजे. समाज म्हणजे प्रथा, चालीरीती आणि रूढी. समाज म्हणून बहुसंख्याकांना जे जे मान्य ते सारे योग्य असे सांगण्याचा हा प्रयत्न झाला कोविंद मुखी बोललेल्या संघाचा.

कोविंद ‘जय हिंद’ म्हटल्यावर ‘वंदे मातरम’ का म्हणाले? ही तर खास संघीय कूटनीती झाली लोकशाही परंपरा हटवण्याची. गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय यांचा एकत्रित उल्लेख तर हास्यास्पदच. ‘सर्वधर्मसमभाव’ असा शब्दप्रयोगही राष्ट्रपतींनी केला. जणू भारताची ती अधिकृत पॉलिसीच! कोविंदांचे अर्धे भाषण प्रचलित मूल्यव्यवस्थेवर आणि अर्धे संघीय मूल्यव्यवस्थेवर आधारलेले दिसले.

रामनाथ कोविंद, ‘सबका साथ…’ विसरले की काय…? आणि हो, सेंट्रल हॉल ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला बरे का…!

लेखक माध्यम विश्लेषक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागामधून नुकतेच सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत.

djaidev1957@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.