पंचाहत्तर वर्षांचा तरुण
पडघम - सांस्कृतिक
राम जगताप
  • डॉ. कुमार सप्तर्षी त्यांच्या पत्नी, मुलगा आणि सुनेसह एका निवांत क्षणी
  • Sat , 22 October 2016
  • डॉ. कुमार सप्तर्षी Kumar Saptarshi युक्रांद सत्याग्रही विचारधारा येरवडा विद्यापीठातील दिवस

१९६० ते ८० या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयानं झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षं झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्नं पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षं मोठी धामधुमीची होती. त्यातच १९६२च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. या पराभवाने त्या वेळच्या तरुण पिढीमध्ये मोठं नैराश्य निर्माण झालं होतं.  त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली. ६४ साली भारताचे आशास्थान असणाऱ्या नेहरूंचं निधन झालं. ६५ साली पाकिस्तानबरोबर युद्ध झालं. ६६च्या जानेवारी महिन्यात ताश्कंदमध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं आकस्मिकपणे निधन झालं. १९६७च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची एकाधिकारशाही उद्ध्वस्त झाली. राम मनोहर लोहिया यांनी ‘अँटी काँग्रेस’ची चळवळ सुरू केली. ६७-६८ साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.

साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल, कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते. तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरंच अराजक माजलं होतं.

या साऱ्या परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे, क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वांगीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केलं. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.

डॉ. कुमार सप्तर्षी या काळाचंच अपत्य आहेत, हे नीट ध्यानात घेतल्याशिवाय त्यांचं योगदान नीटपणे समजून घेता येत नाही आणि त्यांचे विश्लेषणही करता येत नाही. कारण सप्तर्षी स्वत:च्या पिढीचं वर्णन ‘आयडेंटीटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असं करतात.  

साधारणपणे १८ ते ३५ हा वयोगट तरुण मानला जातो. अठराव्या वर्षी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळतो तर पस्तीशी हा तारुण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. या अर्थाने १९६० ते ८० हा सप्तर्षी यांचा बहराचा काळ मानता येईल, तर ६५ ते ८० या काळाला खऱ्या अर्थाने ‘सप्तर्षी पर्व’ म्हणता येईल. वयाच्या १८ ते २५ या काळात प्रत्येकाची वैचारिक जडणघडण होते. या काळात आपल्यावर परिणाम करणारे घटक आपली आयुष्याबद्दलची एकंदर भूमिका ठरवत असतात.

सप्तर्षी अहमदनगर जिल्ह्यातील राशीन या दुष्काळी खेडेगावातून साठच्या दशकात पुण्यात आले, तेव्हा २१ वर्षांचे होते. नगरच्या वास्तव्यात त्यांना राजकीय पक्ष, पुढाऱ्यांच्या सभा, मोर्चे, आंदोलनं यांचा चस्का लागला होता. तो पुण्यात आल्यावरही कायम राहिला.

त्यातही सप्तर्षींचं वेगळेपण असे की, ते एका सामान्य खेड्यातून आलेले होते. त्यांचे वडील त्या भागातले पहिले सरकारी डॉक्टर होते. अशा सुखवस्तू घरातला लाडका, पण अभ्यासू मुलगा पुण्यात आल्यावर त्याला पंख फुटणं स्वाभाविक होतं. एस. पी. कॉलजेनंतर ते वैद्यकीय शिक्षणासाठी बी. जे. मेडिकलला गेले. तिथं असताना सप्तर्षींनी तत्त्वज्ञानावरील पुस्तकं आणि टॉलस्टॉय, गांधी, लेनिन, माओ यांच्या पुस्तकांची पारायणं केली. त्या वेळी बी. जे.तले डॉक्टर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चांगल्या प्रकारे समाजजीवनाशी निगडीत होते. डॉ. अनिल अवचट,   डॉ. अनिल लिमये, डॉ. जब्बार पटेल, डॉ. सतीश आळेकर ही काही नावं वानगीदाखल सांगता येतील.

त्याच काळात पुण्यात राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवनव्या घडामोडी घडत होत्या. एसेम जोशी, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे या समाजवादी नेत्यांकडे ही तरुण मंडळी आकर्षित होऊ लागली. समाजवादी, संघपरिवार यांच्या संस्था-संघटनांनी चांगली घुसळण चालवली होती. त्यामुळे त्या वेळच्या तरुण पिढीला आपण काहीतरी करावं असं वाटत होतं.

म्हणजे पुण्यातलं बौद्धिक वातावरण, राष्ट्रीय अस्वस्थता आणि घरचं टिपिकल ब्राह्मणी वातावरण यातून सप्तर्षींमधल्या तरुणाची जडणघडण झाली आहे. १९६५ साली सप्तर्षींनी ‘यूथ ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या वेळी ते २६ वर्षांचे होते. या त्यांच्या संघटनेनं विद्यार्थ्यांची अनेक आंदोलनं केली. पूनम हॉटेलमध्ये वेटरची कामं करून, बूटपॉलिश करून बिहारमधील दुष्काळग्रस्तांसाठी २६,००० रुपयांचा निधी पाठवला. शिवाय ६७च्या मे महिन्यात गया जिल्ह्यातील रजौली गावी (आता नवादा जिल्हा) अनिल अवचट आणि सप्तर्षीनी दोन महिने दवाखाना, कार्यकर्त्यांसाठी खाणावळ चालवली.

बिहारहून आल्यावर, काहीतरी करून दाखवण्याच्या ध्येयानं झपाटलेल्या या तरुणांनी ‘युक्रांद’ची स्थापना केली. या दलाचे मार्गदर्शक होते, प्रा. राम बापट, गं. बा. सरदार आणि दि. के. बेडेकर. या मान्यवरांना तरुण पिढीकडून चांगल्या अपेक्षा होत्या. भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज त्यांनी जाणवत होती, त्यामुळे ते तरुणाईवर भिस्त ठेवून होते. 

‘युक्रांद’ची स्थापना सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात झाली. त्या वेळी ४० तरुणी आणि ६० तरुण, असा १०० युवकांचा गट सप्तर्षि-अवचट यांनी तयार केला होता. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक सुधारणा आणि मग सर्वांगीण क्रांती असे त्यांचे तीन टप्पे होते. त्यावर सप्तर्षींचा आजही विश्वास आहे. या त्रिसूत्रीपासून ते आजही ढळलेले नाहीत. ‘आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली’ ही त्यांची पुस्तिका तेव्हा प्रकाशित झाली. ती वाचून पु. ल. देशपांडे, एसेम जोशी यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ‘माणूस’च्या माजगावकरांनी ती आपल्या अंकात छापली. ‘आम्ही विद्यार्थी दंगली करणार. का करू नयेत?’ अशी भूमिका सप्तर्षीनी या पुस्तिकेमध्ये मांडली होती.

‘युक्रांद’ची चार सूत्रं होती\आहेत- १) स्त्री-पुरुष समानता, २) जातीपातीला विरोध, ३) धर्मनिरपेक्षता आणि ४) ग्रामीण-शहरी भागातली दरी मिटवणं. या चारही संस्कारांनी त्या वेळचा प्रत्येक युक्रांदी आणि युक्रांदच्या संपर्कातला तरुण झपाटून गेला होता. या चार संस्कारांनी त्या वेळच्या अनेक तरुणांना घडवलं. नंतर काही कारणांनी युक्रांदमधून बाहेर पडलेल्यांनीही स्त्री-पुरुष समानतेबाबत आपल्यापरीने प्रयत्न केले. त्याची सुरुवात स्वत:पासून केली. जातीपातीला विरोध करण्यासाठी जाणीवपूर्वक आंतरजातीय लग्नं केली. धर्मनिरपेक्षतेचा लढा हा संघाच्या जातीयवादी प्रचाराला टक्कर देण्यासाठी उभारलेला लढा होता. त्या वेळची तरुण पिढी ही आता साठी-सत्तरीची आहे. आणि ती सर्व आजही ‘युक्रांद’चं योगदान मान्य करते. त्यात मुकुंद टाकसाळे, (कै) नरेंद्र दाभोलकर, नीलम गोऱ्हे, आनंद करंदीकर, प्रभाकर करंदीकर, सुरेश खोपडे, बबनराव पाचपुते, शांताराम पंदेरे, विलास भोंगाडे अशा अनेकांचा समावेश आहे. ७७ साली युक्रांदमध्ये मतभेद झाल्यावर सप्तर्षी बाहेर पडले, तेव्हा ते पस्तीशीचे होते. मात्र ६७ ते ७७ या दहा वर्षांच्या काळात तत्कालीन तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यात सप्तर्षी यांचा फार मोठा वाटा आहे.

आणीबाणी १९७५ ला आली, त्याआधीच जेपींचं भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन सुरू झालं होतं. त्यामुळे इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना झाली. ते सत्तेवर आले, पण त्यांचं सरकार जेमतेम अडीच वर्षंही टिकलं नाही. या काळात सप्तर्षी महाराष्ट्रात होते. ८० नंतर तर जनता पक्ष पूर्णपणे भरकटला. भाजपने वेगळा मार्ग आखला, समाजवाद्यांचं पूर्ण विघटन होऊन अनेक समाजवादी राजकीय परिघाबाहेर- एनजीओंमध्ये गेले. क्रांतीची स्वप्नं पाहणाऱ्या सप्तर्षीसारख्यांना या उलथापालथीनं काहीसं निराश केलं.

१९६७ पासून आजवर सप्तर्षींना पस्तीस-चाळीस वेळा तुरुंगवास झाला आहे. १९७३ साली सप्तर्षींनी पुण्यात पुरीच्या शंकराचार्यांबरोबर जाहीर वादविवाद केला. १९६७मध्ये पुण्यातील महाविद्यालयांनी केलेल्या फीवाढ विरोधी आंदोलनापासून ते ८३मध्ये राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या ‘कुलगुरू हटाव’ मोहिमेपर्यंतची सप्तर्षींची सर्व आंदोलनं ही विद्यार्थ्यांसाठीची होती. त्यांचा परीघ पुण्यापुरता मर्यादित नव्हता तर तो महाराष्ट्रभर विखुरलेला होतात. ऐंशीच्या दशकात सप्तर्षी महाराष्ट्रातल्या तरुणांचे हिरो होते, ते यामुळेच.

८०-९० या दशकात सप्तर्षीनी वेगवेगळे प्रयोग केले. राशीनला शाळा-कॉलेज काढलं, आसपासच्या गावांमध्ये शेतीचे प्रयोग केले. जनता दलाच्या तिकिटावर नगरमधून दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आलं नाही.

१९९१ साली सप्तर्षींचे दुसरं पर्व सुरू झालं. त्यांनी ‘सत्याग्रही विचारधारा’ हे वैचारिक मासिक सुरू केलं. त्या वेळी माध्यमांचं आजच्या इतकं वैपुल्य नव्हतं. त्यामुळे ‘सत्याग्रही विचारधारा’ वैचारिक मासिक म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत पोहचलं. २००१ पर्यंतचा काळ सप्तर्षीचा संपादक म्हणून बहराचा काळ होता. २००१ला त्यांनी ‘युक्रांद’चं पुनरुज्जीवन केलं.

संपादक म्हणून सप्तर्षींनी जातीयवादी, धर्मांध शक्ती आणि काँग्रेसची सरंजामशाही यांच्याबाबतची आपली भूमिका सातत्याने मांडली आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप आणि महाराष्ट्रातल्या प्रांतीय संघटना या धर्मांध शक्ती; शिवसेना, मराठा महासंघ, ब्राह्मणांच्या संघटना, दलितांच्या अस्मितेवर आधारित संस्था-संघटना हे जातीयवादी प्रवाह आणि काँग्रेसची सरंजामशाही या सर्वावर सप्तर्षींनी सडेतोड आणि अतिशय मुद्देसूद टीका केली आहे. याचबरोबर समाजवाद्यांमधील गट-तट आणि त्यांच्या भोंगळपणावरही ते टीका करत आले आहेत. हा त्यांचा पोलिटिकल अन-करेक्टनेस हेच त्यांचं ९०नंतरचं महत्त्वाचं योगदान आहे, वैचारिक बलस्थान आहे. करेक्टिव्ह फॅक्टर म्हणून भूमिका बजावताना ते कुणाच्याही आहारी गेले नाहीत, त्यांनी कुणाचाही अनुनय केला नाही, हे त्यांचं वैचारिक मोठेपण.  गेली जवळपास २४ वर्षं सप्तर्षी ‘सत्याग्रही विचारधारा’च्या प्रत्येक अंकाला संपादकीय लिहीतात. ते त्या मासिकाचा सर्वांत ‘बेस्ट अॅसेट’ ठरला आहे. राजकीय-सामाजिक घटना-घडामोडींचं विश्लेषण ते ज्या अचूकतेनं करतात, त्यापुढे अनेकदा वर्तमानपत्रांचे संपादकही फिके पडतात!

वयाच्या साठीच्या टप्प्यावर पोहचल्यावर सप्तर्षींनी आत्मचरित्र लिहिलं. त्याला नाव दिलं - ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’. एखाद्यानं ‘मी हार्वर्डमध्ये वा केंब्रिजमध्ये शिकलो’ असं अभिमानानं सांगावं, तसं येरवडा तुरुंगात मी काय शिकलो, या विषयी सप्तर्षींनी अभिमानानं या आत्मकथनात सांगितलं आहे. ते म्हणतात – “ज्या ‘येरवडा विद्यापीठा’नं माझं जीवन घडविलं, जीवनाचे दडलेले अर्थ उलगडून दाखविले, आत्मबल विकसित केलं आणि आत्मपरीक्षणाचे पाठ देऊन बुद्धी शक्य तेवढी शुद्ध करण्यास साहाय्य केलं त्या येरवडा विद्यापीठाचा मी कायमचा ऋणी आहे.” तुरुंगाविषयी सर्वसाधारण माणसाची प्रतिक्रिया ही नकारात्मकच असते. शक्यतो त्या जागेत राहायला लागू नये असंच त्याला वाटत असतं. पण तुरुंग ही समाजजीवनाचं दर्शन घडवणारीही जागा कशी असू शकते, याचा दाखला सप्तर्षींच्या आत्मकथनातून मिळतो. त्यामुळे आपल्या ध्येयाप्रती ठाम असलेल्या तरुणांसाठी त्यांचं हे आत्मचरित्र सदासर्वकाळ प्रेरणादायी राहील यात काही शंका नाही.

‘सत्तातुराणाम’, ‘यात्री’, ‘संकल्प’ आणि ‘धर्माबद्दल’ ही त्यांची इतर पुस्तकंही सप्तर्षी आणि त्यांचं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी प्रत्येकानं वाचायला हवीत. भाषा, विचारस्पष्टता, विरोध प्रदर्शन, युक्तिवाद आणि लयबद्ध शैली ही लेखन वैशिष्ट्यं समजून घेण्यासाठीही सप्तर्षींचं लेखन मार्गदर्शक ठरणारं आहे.

खाणं आणि गप्पा हे सप्तर्षींचे दोन महत्त्वाचे वीकपॉइंट्स आहेत. आजही त्यांच्याभोवती सतत तरुणांचा गराडा असतो. कुठल्याही तरुणाशी त्यांची पहिल्या पाच मिनिटांत मैत्री होते. कुठल्याही तरुणाला त्यांचं बोलणं दोन-तीन तास ऐकत राहावंसं वाटतं. असे महाराष्ट्रात किती लोक आहेत? आजच्या तरुणाईबद्दल फारसं काही बरं बोललं जात नाही, पण सप्तर्षींना विचारलं तर ते या तरुण पिढीचं गुणगानच करतील. ते तरुणाईबद्दल अजिबात निराश नाहीत आणि स्वत:च्या आजवरच्या यशापयशानेही त्यांना नैराश्य आलेलं नाही. एवढा मोठा काळ पाहिलेल्या, त्यातही उमेदीच्या काळात सक्रिय राहिलेल्या माणसांना उतारवयात नैराश्य येतं; ती फार नकारात्मक बोलतात, असा सार्वजनिक अनुभव आहे, पण सप्तर्षी तिथेही आपली विकेट काढतात. त्यांनी स्वत:ला भयंकर भयग्रस्ततेतून वाचवलेलं आहे आणि आजच्या तरुणाईलाही आपल्या परीनं वाचवायचा ते प्रयत्न करत आहेत.

तरुण मुलं त्यांचं का ऐकतात? कारण ते तरुणाईच्या भाषेत बोलतात, त्यांना अपील होईल असं बोलतात. पोलिटिकली-सोशली-कल्चरली अनकरेक्ट काय आहे, हे नेमकेपणानं सांगतात. त्यासाठी या माणसाकडे प्रचंड उत्साह आहे. तो सतत उत्साहाने फसफसलेला असतो. त्यामुळे तुम्ही कितीही प्रश्नांचं जंजाळ त्यांच्याकडे घेऊन गेलात तरी ते ऐकणाऱ्याचं समाधान होईपर्यंत खुलासेवार बोलतील, प्रश्नांशी भिडण्याची खिलाडूवृत्ती समजावून सांगतील. गप्पा मारायला सप्तर्षी सदैव तयार असतात. ते त्यांचं व्यसन इतकं दांडगं आहे की, त्यालाच त्यांनी आपलं टॉनिक बनवलं आहे. त्यांच्या या गप्पांमध्ये कधीच म्हातारेकोतारे नसतात, तर लातूर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर-कोल्हापूर या जिल्ह्यांमधून आलेली तरुण मुलं असतात. सतत तरुणांच्या गराड्यात असलेल्या सप्तर्षींना चिरतरुणही म्हणवत नाही. ते तरुणच आहेत!

त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्याला ते म्हणतील, ‘तू माझा शत्रू आहेस का? की माझ्या शत्रूने तुला पाठवलेय?’ वयाच्या पंचाहत्तरीत पोहचूनही त्यांच्यातील बंडखोरपणा तितकाच ज्वलंत आहे. कारण बंडखोरी ही कुठल्याही व्यक्तीच्या मनाची, बुद्धीची युवावस्था असते. साधना साप्ताहिकाचे माजी संपादक यदुनाथ थत्ते ‘युवक’ या शब्दाची सहा लक्षणं सांगत. ती अशी – “युवक साहसाच्या मार्गानं जातात, सुरक्षिततेच्या नाही. आपल्या आधीच्या पिढ्यांचं ढोंग ते उघडकीला आणतात. परिवर्तनाला विरोध करणारी (जुनाट) विचारसरणी युवक नाकारतो. युवकाला आयुष्यासाठी एक उदात्त हेतू हवा असतो. त्याला मुक्कामापेक्षा प्रवास महत्त्वाचा वाटतो. वैफल्याची चैन त्यांना परवडत नाही.”

ही सहाच्या सहाही लक्षणं सप्तर्षींना आजही जशीच्या तशी लागू पडतात.  म्हणून ते इतर कुणाहीपेक्षा अधिक तरुण आहेत.

 

लेखक ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

Post Comment

Vivekanand

Sat , 22 October 2016

Okay chalel