चेल्याबिन्स्क अशनि, उल्कापात आणि रुद्र
पडघम - विज्ञाननामा
रवींद्र गोडबोले
  • चेल्याबिन्स्क शहरातील अशनि पृथ्वीच्या दिशेने येताना.
  • Sat , 22 October 2016
  • चेल्याबिन्स्क उल्कापात अंतराळ क्लब आणि नेपियर अशनि Chelyabinsk Ravindra Godbole रवींद्र गोडबोले

१५ फेब्रुवारी २०१३, स्थळ – रशियातील अवकाश, स्थानिक वेळ – सकाळी ९ वाजून २० मिनिटे. साधारणपणे २० मीटर व्यास आणि १०,००० टन वजन असलेल्या अवकाशात भटकणाऱ्या एका अशनीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीची जोड मिळताच या अशनीचा वेग प्रचंड वाढला. सेकंदाला १८.६ कि.मी. म्हणजेच ताशी ६६,९६० कि.मी. (विमानाच्या वेगाच्या ३० ते ३५ पट) वेगानं तो जमिनीकडे येऊ लागला. हवेशी झालेल्या घर्षणामुळे त्याचं तापमान वाढलं आणि तो सूर्याहूनही अधिक तेजस्वी दिसू लागला. हे अद्भुत दृश्य केवळ चेल्याबिन्स्क शहरातीलच नव्हे, तर त्या परिसरातील अनेक गावांमधून व शेजारील राष्ट्रांमधूनही दिसत होतं.

जमिनीपासून २३ कि.मी. उंचीवर असतानाच प्रचंड वेग, हवेचा दाब आणि भयानक उष्णता यांमुळे स्फोट होऊन या अशनीचे असंख्य तुकडे झाले आणि धुराचे लोट मागे ठेवत ते पृथ्वीवर कोसळू लागले. या स्फोटामुळे शेकडो सूर्यांच्या इतका तेजस्वी प्रकाश पडला. तप्त वारे झंझावाताप्रमाणे वाहू लागले. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या स्फोटाची तीव्रता अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बच्या शक्तीपेक्षा २५ पट अधिक होती. जमिनीपासून २३ कि.मी. उंचीवर झालेल्या या स्फोटानं जमीनही हादरली. जमिनीवरील भूकंपमापन केंद्रांनी २.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद केली. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या इन्फ्ररा-साउंड लहरींनी दोन पृथ्वी प्रदक्षिणा केल्या.

सुदैवानं हा स्फोट खूप उंचावर झाल्यामुळे त्याची बरीचशी ऊर्जा वातावरणामध्येच शोषली गेली. जी ऊर्जा पृथ्वीपर्यंत पोचली तिने एकूण सहा शहरांमधील ७,२०० इमारतींना कमी-जास्त प्रमाणात हानी पोचवली, तर १,००० हून अधिक लोकांना वैद्यकीय मदतीची गरज भासली. एका कारखान्याचं ६,५०० चौरस फुटांचं छत कोसळलं. स्फोटामुळे झालेली आर्थिक हानी तीन कोटी डॉलर्स (१८० कोटी रुपये) हूनही अधिक होती.

या अशनीच्या एका छोट्या, सुमारे २ फूट व्यासाच्या तुकड्यामुळे एक वीस फूट व्यासाचा गोलाकार खड्डा बर्फाच्छादित पृष्ठभागावर पडला असल्याचंही शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं. अवकाशात इतस्तत: भटकत असणाऱ्या असंख्य छोट्या अशनींच्या विनाशकारी शक्तीची एक चुणूक पृथ्वीवासीयांना या निमित्तानं पाहता आणि अनुभवता आली. याआधी १९०८मध्ये रशियाच्याच सायबेरिया या वैराण प्रांतामधील तुंगुस्का या गावाजवळ एका अशनीने असाच विध्वंस केला होता.

प्रश्न असा पडतो की, असे किती लहान-मोठे अशनी पृथ्वीनजीच्या अंतराळात भटकत आहेत, ते तिथं आले तरी कोठून आणि पृथ्वीला त्यांच्यापासून किती आणि कोणत्या प्रकारचा धोका संभवतो?

या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न डॉ. व्हिक्टर क्लब आणि डॉ. विल्यम नेपियर या दोन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञांनी १९८०च्या दशकात केला. सूर्याभोवती अवघ्या ३.३ वर्षांत प्रदक्षिणा घालणारा ‘एन्के’ नावाचा एक छोटा धूमकेतू आणि त्याच्या विघटनामुळे निर्माण झालेला, ‘टॉरिडस’ हा अशनी आणि धूलिकणांनी बनलेला एक अजस्र, अस्ताव्यस्त पट्टा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यांचा निष्कर्ष असा होता की, रात्रीचं आकाश, त्यात चमकणारी नक्षत्रं, चंद्राचा शीतल प्रकाश आणि मधूनच सरकन पडणारी एखादी उल्का हे आकाशाचं मनोहर, आल्हाददायक आणि रमणीय रूप नेहमीच असत नाही. गेल्या दहा हजार वर्षांमध्ये तीन ते चार वेळा अशा येऊन गेल्या आहेत की, ज्या काळात आकाशानं रौद्र रूप धारण केलं होतं. अनेक तेजस्वी गोल आकाशात नव्यानं निर्माण होत होते. वेगानं प्रवास करत होते आणि त्यातील काही प्रकाशानं लखलखत, प्रचंड गर्जना करत पृथ्वीवर धावून येत होते. हे कालखंड पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी भीतीदायक, विनाशकारी होते.

चेल्याबिन्स्कमध्ये २०१३साली जे घडलं तशा स्वरूपाच्या घटना या कालखंडांमध्ये अनेक ठिकाणी व वारंवार घडत होत्या. २०१३च्या जून आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात असे उत्पात घडण्याची शक्यता सर्वांत जास्त होती. क्लब आणि नेपियर या दोघा खगोलशास्त्रज्ञांच्या मते इ.स.पूर्व ८०००, इ.स.पूर्व २००० आणि इ.स. ५००च्या सुमारास हे उत्पाती कालखंड येऊन गेले. आता इ.स. ३०००च्या सुमारास पृथ्वीला पुन्हा एकदा या अस्मानी संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यांचा हा सिद्धान्त प्रत्यक्ष निरीक्षणं आणि गणिती प्रारूपं (Mathematical Models) यांच्यावर आधारित आहे. या सिद्धान्ताला अजून सार्वत्रिक मान्यता मिळाली नसली तरी जगभरातील विविध ज्ञानशाखांमधील शास्त्रज्ञ आता या विषयावर आपलं लक्ष केंद्रित करत आहेत आणि या सिद्धान्ताचं समर्थन करणारे शेकडो प्रत्यक्ष पुरावे आता जगभरातून गोळा होऊ लागले आहेत. क्लब आणि नेपियर यांचा हा सिद्धान्त ‘एकाच कालखंडात सातत्यानं होणाऱ्या छोट्या छोट्या उत्पातांचा सिद्धान्त’ (Coherent Catastrophism) या नावानं ओळखला जातो. जिज्ञासू वाचकांना इंटरनेटवर या सिद्धान्ताविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे.

जगभरात या सिद्धान्ताची चर्चा होत असताना अनेक भौगोलिक, सांस्कृतिक पुरावे गोळा करून त्यांचं विश्लेषण केलं जात असताना भारतात मात्र या विषयाबाबत उदासीनताच दिसून येत आहे. खगोलशास्त्र, भूगोल-भूगर्भशास्त्र, पुरातत्त्व, संस्कृत आणि प्राच्यविद्या-इतिहास या शाखांमधील विद्वानांनी हा सिद्धान्त समजून घेऊन त्याचं समर्थन करणारे किंवा त्याच्या विरोधात जाणारे कोणते पुरावे आपल्या या मातृभूमीत आणि तिच्या प्राचीन इतिहासात दडलेले आहेत, त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. भारताच्या प्राचीन इतिहासासंबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिले आहेत.

सिंधू संस्कृती कोणत्या लोकांची? आर्य भारतात कोठून व कधी आले? वेदांची रचना कोणत्या भूप्रदेशात व कधी करण्यात आली? महाभारत आणि रामायण ही महाकाव्यं भारतीय इतिहासाचा भाग आहेत की, निव्वळ काल्पनिक कथा? वैदिक देवता आणि यज्ञसंस्था यांची उत्क्रांती कशी झाली असावी? अशा प्रश्नांची उत्तरं या सिद्धान्ताच्या साहाय्यानं मिळू शकतात. तसंच प्राचीन संस्कृत ग्रंथांमधील वर्णनं आणि सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष या सिद्धान्ताचा समर्थक पुरावा म्हणून वापरता येऊ शकतात. तसा प्रयत्न मी माझ्या ‘वेदांचा तो अर्थ’ या पुस्तकात केला आहे.

या पुराव्यांखेरीज क्लब आणि नेपियर यांच्या सिद्धान्ताला आधार देणारे भौगोलिक पुरावेही असू शकतात. यातील एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे विवरं – जमिनीवर पडलेले (पाण्यानं पूर्ण वा अंशत: भरलेले) वतुर्ळाकार, लंबवर्तुळाकार खड्डे. असे छोटे ते मध्यम खड्डे उल्कापातानं निर्माण होतात, होऊ शकतात हे आता सिद्ध झालं आहे. भारतात रुद्र-शंकराची जागृत देवस्थानं ज्योतिर्लिंग या नावानं प्रसिद्ध आहेत. ‘ज्योति’ या शब्दाचा एक अर्थ आकाशातील तेजस्वी वस्तू तर लिंग म्हणजे चिन्ह वा खूण. ही ज्योतिर्लिंगं म्हणजे अवकाशातून झालेल्या विनाशकारी उल्कापाताच्या भीतीदायक आठवणी जागृत ठेवण्यासाठी निर्माण केलेली देवस्थानं असतील तर या देवस्थांनाच्या परिसरात अशी विवरं आढळून येणं आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वर आणि ओंढ्या नागनाथ या देवस्थानांच्या परिसरातील अशी काही विवरं दाखवणाऱ्या लिंक्स पुढे दिल्या आहेत.

http://wikimapia.org/#lang=en&lat=19.543634&lon=77.038761&z=17&m=b

http://wikimapia.org/#lang=en&lat=19.522259&lon=77.003689&z=17&m=b

शक्यता अशीच वाटते की, ज्या ज्या ठिकाणी असे उल्कापात झाले, त्या त्या ठिकाणांच्या स्मृति रूद्र, अंबिका आणि त्यांचा पुत्र स्कंद-खंडोबा यांची देवस्थानं लोकांनी स्थापन केली आणि त्यांच्या विनाशकारी शक्तींची दहशत पिढ्यांमागून पिढ्या समाजमानसात जागृत ठेवली.

 

पुण्यातील देशमुख आणि कंपनीचे प्रकाशक आणि 'औरंगजेब- शक्यता आणि शोकांतिका', 'सम्राट अकबर', 'इंद्राचा जन्म' आणि 'वेदांचा तो अर्थ' या चार संशोधनपर पुस्तकांचे लेखक रवींद्र गोडबोले यांचं जुलै २०१४मध्ये निधन झालं. त्यांचा हा अप्रकाशित लेख.

रवींद्र गोडबोले यांची पुस्तके खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://goo.gl/24crqy

 

Post Comment

Nilesh Pashte

Fri , 21 October 2016

test


Nilesh Pashte

Fri , 21 October 2016

test


Nilesh Pashte

Fri , 21 October 2016

test


Nilesh Pashte

Fri , 21 October 2016

Test Comment


Nilesh Pashte

Wed , 19 October 2016

Test Comment