मला पुस्तकं वाचायला का आवडतात?
पडघम - बालदिन विशेष
तनया टेंबे
  • लेखिका पुस्तकांच्या गराड्यात
  • Mon , 14 November 2016
  • बालदिन विशेष पालक Children's Day हॅरी पॉटर फेमस फाइव्ह Young readers

तुम्हाला कुठले छंद आहेत? मला आहेत. मला अनेक छंद आहेत, पण त्यांपैकी पुस्तक वाचणं हा माझा आवडता छंद आहे. तो आवडता होण्याचं कारण म्हणजे मी अगदी दोन वर्षांची छोटी मुलगी होते, तेव्हा माझे आई-बाबा – विशेषत: आई – मला खूप पुस्तकं वाचून दाखवायचे. आम्ही सुरुवातीला चित्रांच्या गोष्टींची पुस्तकं वाचायचो. त्यानंतर पऱ्यांच्या गोष्टी वाचायला लागलो. असं करत करत बेडटाइम स्टोरी बुक्स वाचण्यापर्यंत आम्ही मजल मारली. माझ्या मावशीने मला पुष्कळ मराठी पुस्तकं वाचण्यासाठी आणून दिली होती, पण त्या वेळी मी फक्त पाच वर्षांची असल्याने मला वाचता येत नव्हतं. त्यामुळे रोज रात्री आई पार थकून गाढ झोपी जाईपर्यंत मी तिला गोष्टी वाचून दाखवायला लावायचे. ‘तोत्तोचान’, ‘जोयानाचे रंग’ आणि माझं खास आवडतं पुस्तक – ‘मोरू-मैना’. ही पुस्तकं मला आजही आठवतात. माझी आई मला इंग्रजी पुस्तकंही वाचून दाखवायची. त्यांपैकी ‘थंबलीना’, ‘हॅन्सल अँड ग्रेटेल’, ‘द वुल्फ’ आणि ‘द सेव्हन लॅम्बस’ ही पुस्तकं मला आजही आठवतात.

जेव्हा मी सहा वर्षांची झाले, तेव्हा मला पुस्तकं वाचायला फारसं आवडतं नव्हतं, कारण त्यावेळी मी नुकतंच वाचायला शिकले होते. त्यामुळे चित्रविचित्र दिसणारे शब्द उच्चारणं आणि वाचणं ही मला डोकेदुखी वाटायची, पण तरी तेव्हाही मला गोष्टी ऐकायला आवडायच्याच. माझे आई-बाबा मी वाचावं म्हणून मला सतत भरीस घालायचे आणि मी नको-नको करायचे, पण शेवटी मला वाचावंच लागायचं.

असं करता करता मी सात वर्षांची झाले. आता मला इंग्रजी नीट वाचता येत होतं. मी अगदी मोजकी आणि निवडक पुस्तकं वाचायला लागले होते. पण अजूनही मला आईने पुस्तकं वाचून दाखवायला हवी होती, कारण अजून मला माझ्या कल्पनेतलं पुस्तक मिळायचं होतं.

माझ्या आठव्या वाढदिवसाला मला पहिल्यांदा रोआल्द दालच्या चार पुस्तकांचा संच मिळाला – ‘द मॅजिक फिंगर’, ‘जॉर्जस मार्व्हलस मेडिसिन’, ‘द पेलिकन’, ‘मंकि अँड द जिराफ’ आणि ‘आयसोट्रोट’. ही पु्स्तकं माझ्या हातात आली, तेव्हा मी ती नीट चाळूनसुद्धा पाहिली नाहीत आणि परस्पर पुस्तकांच्या कपाटात लोटून दिली. काही महिन्यांनंतर एके दिवशी मला खूप बोअर होत होतं आणि करायला काहीच नव्हतं (टीव्ही पाहायचीही परवानगी नव्हती.), त्यावेळी मला या पुस्तकांची आठवण झाली. ती वाचून मी माझा कंटाळा घालवण्याचा प्रयत्न केला.

या संचातलं ‘द मॅजिक फिंगर’ हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं. ते सुरुवातीला फार इंटरेस्टिंग नव्हतं, पण तरीही मी वाचत राहिले. नंतर नंतर ते फारच इंटरेस्टिंग होत असल्याचं मला जाणावलं. मग मी ते पूर्ण वाचून काढलं. या सगळ्यात एक आठवडा संपला होता. आता मला टीव्ही बघायचीही परवागी होती, पण आता मला पुढचं पुस्तक वाचून पाहावंसं वाटत होतं. माझं अगदी बरोबर होतं. मला दुसरं पुस्तक पहिल्यापेक्षाही जास्त आवडलं. ते वाचताना मला अगदी टीव्ही बघितल्यासारखंच वाटलं. त्यातली संपूर्ण गोष्ट जणू माझ्या डोळ्यापुढे घडत असल्याची कल्पना मी करू शकत होते. पुढच्या दोन महिन्यांमध्ये मी चारही पुस्तकं वाचून संपवली. तेव्हा एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली, ‘वाचन ही माझ्यापाशी असलेली खास गोष्ट होती.’

मग मी माझ्या पुस्तकांच्या छोट्या कपाटाचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली. ज्या गोष्टी मी करोडो वेळा ऐकल्या होत्या, त्या गोष्टींची पुस्तकं पुन्हा वाचून काढली. ही पुस्तकं वाचताना मला नव्याने आनंद मिळाला. माझा दिवसभराचा थकवा आणि रिकामपणा पळून जायला लागला.

लवकरच पुस्तकांच्या कपाटातली सगळी पुस्तकं वाचून संपली. पूर्वी कुठल्याही इतर गोष्टीसाठी न अनुभवलेली पुस्तकांबद्दलची अनिवार ओढ माझ्या मनात दाटून आली होती. मग मी माझ्या मित्र-मैत्रिणींकडून पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात केली. जेव्हा माझ्या बाबाला माझी पुस्तकांबद्दलची ओढ जाणवली, तेव्हा त्याने मला एक मोठं सरप्राईज दिलं! कुठलं माहितीये? लायब्ररी! ती लायब्ररी लावण्यासाठी मी अगदी उतावीळ झाले होते. मी बाबाबरोबर लायब्ररीत गेले, तेव्हा इतकी पुस्तकं पाहून वेडी झाले. जगात इतकी पुस्तकं अस्तित्वात असल्याचं त्यापूर्वी मला माहीत नव्हतं.

एका वेळी दोन पुस्तकं नेण्याची मुभा असलेली योजना आम्ही सुरुवातीला घेतली. प्रत्येक वेळी लायब्ररीत गेल्यावर मला माझ्या आवडीचं काहीतरी वाचायला मिळायचं. त्यामुळे मला लायब्ररीत जायला आवडायला लागलं. जेव्हा मी पहिल्यांदा लायब्ररीत गेले, तेव्हा मी आधी जेरोनिमो स्टिल्टन आणि नंतर थिया स्टिल्टन वाचायला सुरुवात केली. काही महिन्यांनी मला स्पेल सिस्टर्सची नवी मालिका मिळाली. मग मी ‘टिंकल डायजेस्ट’सारखी कॉमिक्स वाचायला सुरुवात केली. मग काही महिन्यांनी मी पऱ्यांच्या धडासी कथांसारखी पुस्तकं वाचायला लागले.

मग मी नऊ वर्षांची झाले, तशी माझी आवड बदलायला लागली. मला विज्ञानकथा आणि कथा वाचायला आवडायला लागल्या. पऱ्यांच्या गोष्टी बंद झाल्या! एके दिवशी आई-बाबा घरात नव्हते. मी एकटीच होते आणि लायब्ररीची सगळी पुस्तकं वाचून संपली होती. मला बोअर होत होतं. मग मी माझ्या बाबाचं पुस्तकांचं कपाट धुंडाळायला सुरुवात केली. तिथं मला हॅरी पॉटर आणि सॉर्सरर्स स्टोन हे पुस्तकं सापडलं. मी ती वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला ही पुस्तकं वाचताना मला बोअर झालं, पण करण्यासारखं दुसरं काहीच नसल्याने आणखी कंटाळण्यापेक्षा मी वाचत राहिले. थोड्या वेळाने ही पुस्तकंही इंटरेस्टिंग असल्याचं मला जाणवलं. मग मी ती पुस्तकंही वाचून संपवली. त्यानंतर बाबाने मला आणखी एक सरप्राईज दिलं! लायब्ररीची एका वेळी चार पुस्तकं घेता येण्याची योजना त्याने माझ्यासाठी घेतली. मग मी हॅरी पॉटरची संपूर्ण मालिका वाचायला घेतली आणि वर्षभरात या मालिकेबरोबर फेमस फाइव्ह नावाची आणखी एक मालिकाही वाचून काढली.

मी दहा वर्षांची होताना जॅकलिन विल्सन, फाइव्ह फाइंड-आउटर्स आणि सिक्रेट सेव्हन वाचायला  सुरुवात केली. आता मला पुस्तकं वाचणं लहानपणापेक्षाही आवडायला लागलं होतं. माझ्या वाचनाच्या वेडापायी मी त्या वेळी आणि आजही अनेकदा अडचणीत सापडते. पण त्याचा माझ्या वाचण्याच्या ओढीवर काहीएक परिणाम होत नाही. माझा नवीन पुस्तकांचा शोध चालूच राहतो.

आता मी अकरा वर्षांची आहे. अजूनही मी जॅकलिन विल्सन वाचते, पण त्याचबरोबर ‘हंगर गेम्स’, ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ आणि ‘नॅन्सी ड्रयू’सारखी पुस्तकंही वाचते. भविष्यात ‘मेझ रनर’ आणि ‘पर्सी जॅक्सन’ ही पुस्तकं वाचायचं डोक्यात आहे.

वाचनामुळे एका खोलीत बसून तुम्हाला लाखो ठिकाणांची सफर घडते. वाचनामुळे तुम्हाला कुणा दुसऱ्याचं आयुष्य अनुभवता येतं. वाचनामुळे तुम्हाला वास्तवापासून पळही काढता येतो. माझ्यासाठी तर वाचन स्वर्गसुखच आहे! वाचनामुळे झालेल्या दोन गोष्टींसाठी मी स्वत:ला नक्कीच नशीबवान समजते. एक म्हणजे मला प्रवास करायला खूप आवडतो. एकाच पुस्तकातून मी हजारो ठिकाणचा प्रवास करू शकते. आणि दुसरी, जर मला वाचायची आवड नसती तर मी तुमच्यासाठी हा लेख लिहू शकले नसते.

 

लेखिका सहाव्या इयत्तेत शिकत आहे.

twinklingtanaya@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......