मुस्लिमांच्या आजच्या भयानक परिस्थितीला ‘सो कॉल्ड’ साहित्यिकही जबाबदार
पडघम - साहित्यिक
कलीम अजीम
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 04 November 2017
  • पडघम साहित्यिक ११वे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन पनवेल Panvel 11 Ve Akhil Bhartiya Muslim Marathi Sahitya Sammelan हमीद दलवाई Hamid Dalwai रफीक झकेरिया Rafiq Zakaria राजन खान Rajan Khan

कालपासून म्हणजे, ३ नोव्हेंबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत पनवेलमध्ये ११वे अ.भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या निमित्तानं मुस्लीम मराठी साहित्याचा सडेतोड पंचनामा करणारा विशेष लेख. आजचा मुस्लीम बदलतोय. मेनस्ट्रीममध्ये येऊ पाहतोय. सांस्कृतिक अवकाश शोधू पाहतोय. कधी रेखाटणार ही प्रतिमा? मुस्लीम हात रिक्षावाला, भाजीपाला विकणारा, नऊवारी नेसून धुणं-भांडीसाठी जाणारी मुस्लीम बाई, ब्रेड व कुरकुरे विकणारा सायकलवाल्याला कधी मिळणार तुमच्या मराठी साहित्यात ‘स्पेस’?

.............................................................................................................................................

समाजाचा बदलता परिपेक्ष्य साहित्यामध्ये प्रतीत होतो, पण गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्यात बदलत्या समाजाचं नेमकं चित्रण येताना दिसत नाहीये. हा आक्षेप अनेक नवलेखक नोंदवतात. तंत्रज्ञान, बदलते नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था, सामाजिक बदल, राजकीय घडामोडी, अर्थकारण, सांस्कृतिक आंदोलन इत्यादी साहित्य क्षेत्रातून दुरावले जात आहेत. फिक्शन आणि नॉन फिक्शन गटात साहित्याची विभागणी केली असता, नॉन फिक्शन गटातलं वैचारिक साहित्य प्रगतीच्या अतिउच्च टोकाला पाहायला मिळतं. पण फिक्शनच्या बाबतीत आजही प्रस्थापित मराठी साहित्यिक जुन्या स्टिरिओ टाईप भूमिकेमधून बाहेर पडायला तयार नाहीयेत.

जागतिकीकरण, अप्पर क्लासचं जगणं, त्यांचे छंद, अभिजनाचं सौंदर्यशास्त्र, प्रतीकं, प्रेमकथा, गुढ आणि रहस्यकथा अशा रोमँटिक दुनियेत मराठी साहित्यिक वावरत आहेत. बरंच साहित्य ऐंशी व नव्वदच्या दशकातून बाहेर पडलेलं नाहीये. हीच अनास्था मराठी मुस्लीम साहित्यिकांमध्ये बऱ्यापैकी आढळते. प्रस्थापितांच्या कंपुतून बाहेर फेकले जाऊ अशा भीतीमुळे मुस्लीम मराठी लेखक बंदिस्त झाले आहेत. त्यांचा हा बंदिवास समाजासाठी घातक ठरतोय. २१व्या शतकात मुस्लीम समाजाचे प्रश्न बदलले आहेत. समस्या वाढल्या आहेत. शिक्षण, रोजगार, स्पर्धा, संघर्ष, सामाजिक सुरक्षा, दहशतवाद, तुच्छतावाद इत्यादी विषयानं साहित्याला अजून स्पर्शही केला नाहीये. परिणामी मुस्लीम मराठी साहित्यिकाच्या बंदिस्त भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रगल्भ साहित्यानं समाजात लहानसहान बदल होत असतात. जेवढे वैचारिक साहित्य प्रभाव करू शकत नाही, त्यापेक्षा जास्त फिक्शन अर्थात कथा, कादंबऱ्या मनात जाऊन भिनत असतात. त्यामुळे साहित्य प्रकारात कथा-कादंबऱ्यांनाही वैचारिक इतकंच महत्त्व आहे. पण आजचं मराठी साहित्य पाहता, ही भूक कशी भागणार असा प्रश्न पडतोय.

संतकवी शेख महंमद यांच्यापासून महाराष्ट्राला मुस्लीम मराठी लेखकाची परंपरा लाभली आहे. शेख महंमद पंधराव्या शतकातील महत्त्वाचे कवी होते. महंमद यांच्या अनेक रचना आजही लोकप्रिय आहेत. यांच्यानंतर शहा मुंतोजी, हुसेन अंबरखान, अलमखान, शेख सुलतान इत्यादी कितीतरी मुस्लीम कवी, लेखक मराठीत होते. रा.चिं. ढेरे यांनी ‘मुस्लीम मराठी संतकवी’ या पुस्तकात मुस्लीम मराठी लेखकांबद्दल सविस्तर लिहिलं आहे. या कवींनी लोकसंवादातून समाज प्रबोधनाचं काम केलं. ओव्या व खंडकाव्यातून समाजात गंगा-जमुनी संस्कृतीची बीजं रोवली, जातीय व धार्मिक एकतेचा संदेश देऊन लोकशिक्षण केलं. मुस्लीम मराठी लेखनाची परंपरा जरी खूप जुनी असली तरी मुख्य प्रवाहातील लिखाण बऱ्याच उशीरा सुरू झालं. या लेखन प्रक्रियेत १९३० सालचे सांगलीचे ‘सय्यद अमीन’ यांचं नाव हमखास घ्यायला हवं. माझ्या माहितीप्रमाणे सय्यद अमीन यांनी शाहू महाराजांनंतर प्रथमच कुरआन मराठीत आणलं. यापूर्वी कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी कुरआनचा मराठीत अनुवाद करून घेतला होता. यानंतर अनेक मराठी कवी लेखक साहित्यिक व विचारवंत मुस्लीम मराठीला लाभले. तत्कालीन साहित्याची गरज म्हणा किंवा अन्य काही, या लेखकांचं लिखाण हे मुख्य प्रवाहातील मराठी लेखनाप्रमाणंच होतं. कोणीही प्रवाहाविरोधात जाऊन लेखन केलेलं आढळत नाही.

१९६०च्या दशकात महाराष्ट्रात दलित साहित्य लेखनाची प्रक्रिया सुरू झाली. या साहित्यानं लेखन सौंदर्यशास्त्राची कथित सर्व परिमाणं मोडून टाकली. दलित साहित्यानं देशाचं समाजकारण हादरवून सोडलं. याआधी अठराव्या शतकात महाराष्ट्राला महात्मा फुलेंनी विद्रोही साहित्य दिलं. या तुलनेनं दलित साहित्य लेखनाची परंपरा खूप उशीरा सुरू झाली. पण मुस्लीम मराठी साहित्य फारसं काही लक्षवेधी लिखाण झालं नाही. १९५०च्या दशकात शाहीर अमर शेखच्या रूपानं विद्रोही कवी मराठी मुस्लीम महाराष्ट्राला लाभला. शाहीर अमर शेखशिवाय संयुक्त महाराष्ट्राची लोकचळवळ पुढेच जाऊ शकली नसती. त्यांचा विद्रोही साहित्याचा वारसा आजही त्याचा कन्या मल्लिका अमर सेख चालवत आहेत. १९६०-७०च्या दशकात आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून मुस्लीम साहित्य निर्मिती झाली. सुधारक हमीद दलवाई यांनी मराठीत उत्तम दर्जाची मुस्लीम साहित्य निर्मितीच केली नाही, तर त्याला राजकीय व सामाजिक पदर जोडले. दलवाईंच्या ‘इंधन’, ‘लाट’ यांसारख्या पुस्तकांना आजही मराठी साहित्यात मानाचं स्थान आहे.

सत्तर साली दलवाईंनी प्रवाहाविरोधात लिखाण केलं होतं. समाजाचं प्रतिबिंब त्यांनी साहित्यात मांडलं होतं. दलवाईंनी वैचारिक लिखाणही केलंय. वैचारिक लेखन शैलीत औरंगाबादचे रफीक जकेरिया आणि वसमतचे मोईन शाकीर यांचा नाव न विसरण्यासारखं आहे. या राजकीय विश्लेषक द्वयींनी दलवाईपेक्षा सरस व उत्तम लिखाण केलंय. रफिक जेकरिया व मोईन शाकीर यांना आधुनिक भारताचे पोलिटिकल थिंकर मानलं जातं. राष्ट्रवाद, सांप्रदायिकता, सामाजिक सुरक्षा इत्यादी विषयात व्हिजनरी लिखाण या दोघांनी केलंय. पण सुलभीकरणाच्या राजकारणानं दोघंजणही महाराष्ट्रात कालबाह्य झाले. रफिक जकेरिया व मोईन शाकीर यांचं बरंचसं लिखाण इंग्रजीतून आहे. कदाचित हेदेखील कारण त्यांना मागे ढकलण्याला कारणीभूत असावं.

ऐंशी आणि नव्वदच्या दशकात वैचारिक मुस्लीम लेखकांची एक मोठी फळी तयार झाली. यू.म. पठाण, दाऊद दळवी, फक्रुद्दीन बेन्नूर, अब्दुल कादर मुकादम, ऐहतेशाम देशमुख, महंमद खडस इत्यादींनी सामाजिक व राजकीय पटलावर लिखाण केलं. दळवी आज हयात नाहीत, पण बाकीचे आजही वयाच्या ज्येष्ठतेतही लिखाण करतात. ऐंशीच्या दशकात याच काळात फिक्शन लिखाणालाही थोडीशी गती मिळाली. अर्थातच मराठी लेखन परंपरेतील मुळं घेऊन हे लेखन आलं. या लेखनात मुस्लीम प्रश्न व सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब फारसं जाणवत नव्हतं. तुलनेनं उर्दू साहित्याची परंपरा वगळता हिंदी किंवा इंग्रजीत ५० च्या दशकापासूनच लिखाण सुरू झालं होंत. उर्दूत सदाअत हसन मंटो, इस्मत चुगताई, अमरावतीच्या वाजेदा तबस्सूम, भारतीय वंशाच्या पाकिस्तानी लेखिका किश्वर नाहिद आणि जाहिदा हिना या सर्वांनी कथित धार्मिक व सामाजिक अस्मितांवर प्रहार केला. पंजाबी, काश्मिरी, तामिळ भाषेतही दर्जदार लिखाणाची परंपरा ५० च्या दशकातच सुरू झाली होती. त्यामानानं मराठी साहित्यात मुस्लीम खूप उशीरा प्रकट झाले.

तीसच्या दशकात सय्यद अमीन यांनी धार्मिक लिखाण मराठीत आणलं. पण फिक्शन साहित्य प्रकारात मराठी मुस्लीम ७०च्या काळात आले. पण सामाजिक संघर्ष करणारं मुस्लीम चित्रण क्वचितच कुणी केलं असेलं. मुस्लीम मराठी साहित्यात अश्रफ आणि पांढरपेशा वर्गाचं चित्रण असायचं, आजही हीच परंपरा मुस्लीम मराठी साहित्यिक पुढे घेऊन जाताना दिसतात. प्रस्थापित साहित्य क्षेत्रात केवळ लोकमान्यता हवी म्हणून काही लेखक लिहीत असतात. काहीजण तर साहित्याचं राजकारण करण्यातचं धन्यता मानतात. अनेक लेखक प्रतीकांच्या बंदिस्त जगातून बाहेरही निघत नाही. नव्वदच्या दशकात भारतानं ग्लोबलायझेशनचं धोरण स्वीकारलं. याची फळं भारतीय समाजातील अश्रफ वर्गानं चाखली. आजही त्याचे फायदे तेच घेत आहेत. याच काळात कामगार वर्ग देशोधडीला लागला. जगभरात कामगार अधिकारांविषयी बोललं गेलं. ही एक बाजू भाषिक साहित्यात प्रकर्षानं आली. पण मागास जातीतील वर्ग आणि ग्लोबलायझेशनमध्ये त्यांचं नेमकं स्थान याचं रेखाटन साहित्यात पाहिजे तसं झालेलं दिसत नाहीये.

कालपासून मुंबईजवळ पनवेलला ११वं अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन सुरू झालंय. याचे उद्घाटक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आहेत. उदघाटक म्हणून श्रीपाल सबनीस जे भाषण करणार आहेत, त्याची ४० पानांची एक छोटी पुस्तिका त्यांनी मला पाठवलीय. त्यात सबनीस यांनी महाराष्ट्रातील विभागवार अशी २०० मराठी मुस्लीम लेखकांची नावं दिली आहेत. त्यातील बोटावर मोजण्याइतकी चार-दोन नावं सोडली तर बाकी सर्व लेखक फिक्शन मराठी साहित्य लिखाणाच्या बंदिस्त चौकटीत जेरबंद आढळतात. इथं नाव घेण्याची गरज नाही, पण बहुतांशी मुस्लीम मराठी लेखक हे अजूनही ऐंशीच्या दशकात जगत आहेत.

प्रस्थापित होऊ पाहात असलेले लेखक अभिजन सौंदर्यशास्त्र, रहस्यकथा, शेत-शिवार, गावगाडा, गावकूस, निमशहरी, शहरी उच्चवर्ग या जोखंडातून सुटू शकलेले नाहीत. कवींच्या बाबतीत तर जास्त काही सांगायला नकोच अशी परिस्थिती आहे. आजचा तरुण उच्चभ्रू विद्यापीठं व एमएनसी कंपनीत शिफ्ट हेड झालाय. पण आमचे कवी पक्ष्यांचे थवे मोजत आहेत. त्यांना घरट्यात जाऊन बडबडगीतं ऐकवत आहेत. समाजातील मोठा वर्ग दहशतवादाच्या खोट्या आरोपाचा दंश झेलत असताना आमचा कवी मात्र चंद्र, सूर्य, आकाश, नद्या, पाऊस, फुलं, अशा प्रतीकांसाठी व्यक्त होतोय.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

मराठी साहित्यात आजही ८०-९०च्या दशकातला शेत-शिवार, गावगाडा रेखांकित होताना दिसतोय. एकविसावे शतक आलं तरी विषय बदलत नाहीये. तंत्रज्ञान युगानं मानवाचं अवघं जगणं व्यापून टाकलंय. शिक्षण आणि रोजगाराची साधनं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. शहरीकरण आणि स्थलांतर या दोन टप्प्यांनी तरुणाईचं अवघं जग बदललं आहे. असं असताना आजही मराठी साहित्य ऐंशीच्या दशकात रमलंय. मुंबई दंगल, गुजरात दंगलीनंतर मुस्लीम समाजाचं राजकीय व सामाजिक अवस्था पूर्णपणे बदलली आहे. दहशतवादाचे आरोप, पोलिसांच्या छळवादाला त्रासलेले तरुण, निर्दोषांना १०-१० वर्षांची जेल, विरोधी राजकारण, सामाजिक हल्ले, द्वेषभावना, तुच्छतावाद आजच्या साहित्यात का प्रतिबिंबीत होत नाही.

फाळणीनंतरचा मुस्लीम समाज पूर्णत: बदलला आहे. मुस्लीम समाजही नव्या सहस्त्राचं प्रतिनिधित्व करतोय. मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये सहा आकडी पगार कमवतोय. मर्सिडीज बेन्ज् घेऊन फिरतोय. उंच टॉवरमध्ये राहतोय. मॉलमध्ये शॉपिंग करतोय. जीन्स टीशर्ट घालून मिरवतोय. महिला पाश्चिमात्य पेहरावात बाजारहाट करतायेत. मुस्लीम तरुण विद्यापीठं, रिसर्च लॅब, प्रशासकीय कार्यालयं, नोकरदार, आमदार-खासदार झाला. उद्योजक होऊन लाखोंना रोजगार देतोय. शहरातल्या उच्चभ्रू सोसायटीत थ्री बीचकेमध्ये राहतोय. मीडिया हाऊस सांभाळतोय. सुपर-डूपर हीट सिनेमे दिग्दर्शित करतोय. सुपरस्टार होऊन जगावर राज्य करतोय. महिला-पुरुष आंतरराष्ट्रीय खेळात नाव कोरताहेत. वैमानिक, शास्त्रज्ञ होत आहेत. पब ऑर्केस्ट्रा, जीम, क्लब सारख्या आधुनिक म्हणवणाऱ्या शानशौकी पाळतोय. मुस्लीम मराठी साहित्य मात्र यापासून कोसो दूर आहे.

ग्रामीण निमशहरी भागातलं समाजकारण व अर्थकारण बदललं तसं राहणीमानात प्रचंड बदल झाला. पठाणी कुडता व टोपीतला मुस्लीम आज बहुसंख्याकांमध्ये नाहीये. क्लीनशेव, सलमान कट, फ्रेंच कट मुस्लीम तरुण बाईकगिरी करतोय. जीएममध्ये तासंतास गाम गाळतोय. मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी धडपडतोय. पण आजही समाजातले मुस्लीम प्रतीकं बदललेली नाहीत. मेनस्ट्रीमला मुस्लीम लांब दाढीत हवाय, महिला डोळेबंद बुरख्यात हवीय. आजही मेनस्ट्रीम मीडियानं मुस्लिमांना सिब्बलमध्ये बंदिस्त केलंय. आजही बहुतेक सिनेमांत अब्दुल नावाचं कॅरेक्टर ड्रायव्हर आहे. चहावाला बाबूभाईच आहे. इस्माईल हा मटणच विकतोय. सिनेमात मुस्लीम पात्र मदिनेच्या गुंबद व तसबिरीशिवाय येतंच नाही. कपाळाला चिटकून टोपी न राहता डोक्याच्या मागच्या बाजूला कलंडलेली टोपी अजूनही सिनेमात दिसतेय. गळ्यातला ताईत २१व्या शतकातही लटकलेलाच दिसतोय. बिर्याणीचे दस्तरखान, झुमर, कमानी, मस्जिदीचे भोंगे आजही ५०च्या दशकातील तपशिलासह मांडली जात आहेत. कधी बदलणार ही सुलभीकरणाची प्रतिमा? वर्षानूवर्षांपासून हीच प्रतिमा मुस्लीम समाज म्हणून रंगवली जातेय. मुस्लीम मराठी लेखक, विचारवंत सुलभीकऱणाची प्रतिमा तोडू शकले नाहीत, याचं अतिव दुख: होतं.

इथल्या व्यवस्थेनं मुस्लीम समाजाचं सामान्यीकरण नाकारलं. नेहमी नावाची स्पेशल ट्रिटमेंट देऊन राजकारण खेळलं. ते टोप्या घालणारे! ते दाढ्या ठेवणारे! ते झब्बे घालणारे! ते बुरखा घालणारे! ते हजला सबसिडी घेतात! ते नमाजसाठी रस्ता अडवतात! ते अमके! ते तमके! अबब कितीही हे आरोप! कोण देणार यांना उत्तर? कुठेय साहित्याचं प्रतिबिंब? किती दिवस स्वान्त सुखाय लेखन? कधी संपणार पांढरपेशा समाजाचं प्रतिनिधित्व?

आजचा मुस्लीम बदलतोय. मेनस्ट्रीममध्ये येऊ पाहतोय. सांस्कृतिक अवकाश शोधू पाहतोय. आधुनिक होऊ पाहतोय. कधी रेखाटणार ही प्रतिमा? रोजगारासाठी भल्या पहाटेच बाहेर पडणारा मुस्लीम हात रिक्षावाला, भाजीपाला विकणारा, नऊवारी नेसून धुणं-भांडीसाठी जाणारी मुस्लीम बाई, ब्रेड व कुरकुरे विकणारा सायकलवाल्याला कधी मिळणार तुमच्या मराठी साहित्यात ‘स्पेस’? पाठीवर कुऱ्हाड घेऊन जाणारा लाकूडतोड्या, भंगारवाला, पंक्चरवाला, गॅजेरवाला आणि बांधकाम मजूराला आहे, का जागा तुमच्या सो कॉल्ड मराठी साहित्यात?

दलवाई, राजन खान, महंमद खडस यांनी मुस्लीम पात्राला मोहल्यातून उचललं. सामाजिक व राजकीय स्तरावर न्याय देण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात अमर हबीब, एहतेशाम देशमुख, समर खडस, फ.म. शाहजिंदे, अजीम नवाज राही यांनी भाकरीच्या वेदना सांगणारा मुस्लीम रेखाटला. यात काही मुस्लीमोत्तर लेखकांची नावंही घेता येईल, त्यात भारत सासणे, विजय पाडळकर यांनी मुस्लीम पात्रांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. बाकी मुस्लीमोत्तर साहित्यिकांनी सुप्त राजकीय मेख मारली. ती आजतागायत कथित प्रस्थापित साहित्यिक शोधू शकले नाहीयेत. मुस्लीम साहित्यिकांनी पांढरपेशा, भांडवलदार व बुर्ज्वा वर्गाचे प्रतिनिधित्व साहित्यातून रेखाटलं. सर्व काही आलबेल आहे, या अविर्भावात बहुतांशी लिखाण झालंय. समाजाचा सुधारवाद बाजूला ठेवून दहशवादाच्या भिंतीतून लिखाण झालं. परिणामी भाकरीच्या वेदना सांगणारं लिखाण बाजूला पडलं. धर्मचिकित्सा, प्रश्न विचारणं, बंडखोरी, विद्रोह साहित्यातून कोसो दूर निघून गेला.

सामाजिक सोहार्दाचं वातावरण तयार करणारं लिखाण साहित्यातून गायब झालं. अन्वर राजन, फक्रुद्दीन बेन्नूर, अलीम वकील, राजन खान, अमर हबीब यांनी गंगा-जमुनी संस्कृती जपणारं लिखाण मधल्या काळात केलं. अमर हबीब यांचं ‘नाते’ व ‘कलमा’, अन्वर राजन यांचं ‘सदभावनेच्या वाटेवर’ भारताच्या मिश्र संस्कृतीवर भाष्य करणारी अप्रतिम पुस्तकं आहेत. समर खडस यांचं ‘बकऱ्याची बॉडी’ बदलत्या सामाजिक परिस्थितीवर चपखल भाष्य करणारं समकालीन पुस्तक आहे. राजन खान यांची अशी अनेक पुस्तकं व लेखसंग्रह आहेत. अशा सामाजिक व लोकशिक्षण देणाऱ्या साहित्याची आज गरज आहे. पण आजचं मुस्लीम मराठी साहित्य प्रतीकांमध्ये अडकलेलं आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संवादाच्या कक्षा वाढल्या आहेत. फेसबुकसारखं पर्यायी सशक्त मीडिया उभा राहिला आहे. यावर बरेच नवलेखक उत्तम प्रबोधनाची मांडणी करणारे लेखन करत आहेत. येत्या काळात हेच मराठी मुस्लीम साहित्याची धुरा सांभाळतील.. पण प्रस्थापित होऊ पाहणाऱ्यांनी हे काम आधीच केलं असतं तर आज समाजमन इतकं कलुषित झालं नसतं. आजच्या भयानक परिस्थितीला राजकीय नेते नव्हे, तर हे ‘सो कॉल्ड’ साहित्यिकही तेवढेच जबाबदार आहेत.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ या  मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Sat , 04 November 2017

लेखक श्री. कलीम अजीम यांस सप्रेम नमस्कार. मुस्लिम मराठी साहित्याचा लेखाजोखा घ्यायचा तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे. आजचा मुस्लिम बदलतोय किंवा बदलू पाहतोय, पण मराठी साहित्यात हा बदल आविष्कृत होत नाहीये. ही खंत देखील योग्यच आहे. पण मुस्लिम मराठी साहित्य म्हणजे नेमकं काय? मुस्लिम लेखकांनी लिहिलेलं मराठी साहित्य अशी ढोबळ व्याख्या करता येईल का? आजचा आधुनिक मुस्लिम तरुण जगाच्या बरोबरीने धावतोय, त्याच्या आकांक्षा मराठीतून व्यक्त व्हायला हव्यात. जे कष्टकरी मुस्लिम आहेत त्यांच्याही व्यथा मराठीतनं व्यक्त व्हायला हव्यात. मात्र असं झालं तर त्यात मुस्लिम असं काय राहील? वरील दोन्ही बाजू उर्वरित हिंदू (वा बहुसंख्य) समाजासारख्याच होतील ना? मला वाटतं की मुस्लिम ओळख जपून ठेवायची असेल तर एक करावं. अतिरेक्यांनी इस्लामी तत्त्वे वेठीस धरून नयेत म्हणून आज सौदी मध्ये हदीस चं पुनरावलोकन चालू आहे. (बातमी : https://uk.reuters.com/article/uk-saudi-islam/saudi-arabia-to-vet-use-of-prophets-sayings-to-counter-extremism-idUKKBN1CN1TT) इथे भारतीय मुस्लिमांना नक्कीच योगदान देता येईल. कारण की देवबंदमध्ये जे पिकतं ते इस्लामी जगतात विकतं. मात्र त्यासाठी हमीद दलवाई यांच्यासारखा विचारांत ठामपणा हवा. मुल्ला मौलवींना आडवे तिडवे प्रश्न विचारता यायला हवेत. बघा जमतंय का. या कामात हिंदू आनंदाने मदत करतील. तसेच पाकिस्तानी मुस्लिमसुद्धा आनंदाने मदत करतील. कारण या दोन समूहांनी इस्लामच्या आडमुठेपणाचे चटके सोसलेत. आपला नम्र, -गामा पैलवान


milin khadake

Sat , 04 November 2017

पंधराव्या शतकातील मुस्लीम संतकवी शेख महंमद यांचा दाखला देणारे हे लेखकमहाशय पुढे असेही म्हणतात की, इतर भाषांच्या तुलनेत मराठी साहित्यात मुस्लीम उशिरा प्रकट झाले! यातला विरोधाभास जाणवण्यासाठी स्वतःचे लेखन परत एकदा वाचावे, ही विनंती. अत्यंत उथळ लेख आहे. मुस्लिमांच्या समस्या, आनंद, विविध भावना मराठी साहित्यात उचितरित्या आलेल्या नाहीत, हे खरे आहे. परंतु अशा प्रकारच्या कालबाह्य निरीक्षणांच्या नावाखाली चिखल उडवणाऱ्या लेखांनी योग्य दिशा मिळण्याऐवजी नुकसानच जास्त होते. असो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......