‘सेक्युलॅरिझम’च्या तत्त्वास हरताळ फासत हिंदू धर्मीयांस ‘सनातन’मध्ये धर्मांतरित करण्यात येत आहे. खरे तर हिंदू धर्म आज खरोखरच ‘खतरे में’ आहे!
पडघम - देशकारण
रवि आमले
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 29 November 2025
  • पडघम देशकारण भाजप BJP बिहार Bihar हिंदू Hindu हिंदू धर्म Hindu Dharma

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

धर्म परमतसहिष्णु राहिलेला आहे. वेदांना मानणारे ‘हिंदू’ असतात. वेदांना नाकारणारे ‘हिंदू’ असतात. ईश्वरास मानणारे ‘हिंदू’ असतात. आणि ईश्वरास न मानणारे असे कपिल मुनींचे मूळ सांख्यदर्शन हे ‘हिंदू धर्मा’चेच एक दर्शन आहे. बृहस्पतीने मांडलेले वेदविरोधी, ईश्वरविरोधी, पुरोहितविरोधी, कर्मकांडविरोधी ‘लोकायत’ तत्त्वज्ञान हा ‘हिंदू धर्मा’चाच भाग आहे. आणि ते लोकायतीकही ‘हिंदू’ म्हणूनच जगत असतात. ही आपली प्राचीन परंपरा. हा आपला हिंदू धर्म. त्याचे आता ‘सनातन धर्म’ असे ब्रँडिंग करण्यात येत आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘संपूर्ण क्रांती’चा नारा देणाऱ्या जेपींच्या बिहारमधून ‘प्रतिक्रांती’चा ‘पांचजन्य’ निनादू लागला आहे. भारतीय संविधानाच्या चौकटीस मोठा तडाखा देण्यात आला आहे. सनातन धर्मप्रसारासाठी त्या राज्याच्या सरकारने ‘संयोजकां’ची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संयोजक निवडले जाणार आहेत केवळ मंदिर वा मठांच्या महंतांमधून. त्यांचे काम असणार आहे नोंदणीकृत मंदिरे व मठ येथे दर महिन्याला ‘सत्यनारायण कथा’ आणि ‘भगवती पूजा’ होईल, असे पाहणे आणि लोकांना त्यांच्या घरी पूजा करण्यास प्रोत्साहित करणे, त्यातून सनातन धर्माचा प्रसार करणे.

भारतीय संविधान सांगते, हे शासनव्यवस्थेचे काम नाही. कारण ती कोणत्याही एका धर्माची नाही. राज्यघटनेनुसार भारत हा ‘सेक्युलर’ देश आहे. हा शब्द घटनेत नंतर समाविष्ट करण्यात आला, हे खरे, पण तो शब्द नव्हता, तेव्हाही घटना ही ‘सेक्युलर’च होती. जेव्हा सरकार कोणत्याही एका धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य हाती घेते, तेव्हा तो ‘सेक्युलरत्वा’वर घाला असतो. तो घटनेची चौकट मोडून फेकण्याचा प्रयत्न असतो. या देशात राज्यघटना लागू होणे, ही एक उज्ज्वल क्रांती होती. त्या घटनेविरोधातील प्रतिक्रांतीचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून येथे सुरूच होते. आता त्यांनी थेटच हल्ला चढवलेला आहे.

आता राज्य सरकार सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रचार-प्रसार करणार याची टिंगल-टवाळी करणे, त्याचे ‘मीम्स’ बनवणे सोपे आहे. अशा गोष्टींना अनेकदा या पद्धतीनेच उत्तर दिले जाते. विद्यापीठांत ज्योतिष अभ्यासक्रम सुरू झाला, तेव्हा हेच झाले. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात कर्मकांडे, वास्तुशास्त्र, मंदिर उभारणे आदी बाबींचा समावेश असलेला मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला, तेव्हाही त्याची डावीकडून खिल्ली उडवण्यात आली, पण एकमेकांना टाळ्या देण्यापलीकडे त्यातून काहीही साध्य झाले नाही.

जीवनाच्या एकेका अंगावर, एकेका क्षेत्रामध्ये उजवे आक्रमण आस्तेकदम सुरूच राहिले. त्या आक्रमणाचा चेहरा नीट समजून न घेतल्याचे दुष्परिणाम आज सर्वच सुजाण हिंदू समाज भोगत आहे… आणि आता हे बिहारमधील सनातन धर्माच्या सरकारी प्रचाराचे घटनाविरोधी कारस्थान. आपल्यातील अनेकांच्या हे लक्षातच आले नाही की, आपण जन्मापासून ज्या हिंदू धर्माचे पालन करत आहोत, तो हिंदू धर्म आता चर्चेतच नाही. ते नाव केव्हाच बाजूला पडलेले आहे. आता कट्टरतावादी हिंदू नेतेही स्वतः ‘गर्व से’ हिंदू म्हणत नाहीत, ते स्वतःस ‘कट्टर सनातनी’ म्हणवून घेतात.

हे नामांतर प्रकरण विवेकी हिंदूंनी समजून घेतले पाहिजे. आपला हिंदू धर्म ही आपली जगण्याची पद्धत आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणण्यानुसार, हा अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, विविध धर्मद्रष्टे यांचा संग्रह आहे. तो व्यक्तिनिष्ठ नाही. शैव, वैष्णव, गाणपत्य, दत्त, सौर, वारकरी, महानुभाव असे पारमार्थिक उन्नतीचे अनेक पंथ व संप्रदाय त्यात आहेत. तुम्ही हाच पंथ स्वीकारा, हाच मार्ग धरा असा आग्रह आपला हिंदू धर्म धरत नाही.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

या पंथांमध्ये संघर्ष नव्हता असे नाही. पण तरीही मोठ्या स्तरावर आपला हा धर्म परमतसहिष्णु राहिलेला आहे. वेदांना मानणारे ‘हिंदू’ असतात. वेदांना नाकारणारे ‘हिंदू’ असतात. ईश्वरास मानणारे ‘हिंदू’ असतात. आणि ईश्वरास न मानणारे असे कपिल मुनींचे मूळ सांख्यदर्शन हे ‘हिंदू धर्मा’चेच एक दर्शन आहे. बृहस्पतीने मांडलेले वेदविरोधी, ईश्वरविरोधी, पुरोहितविरोधी, कर्मकांडविरोधी ‘लोकायत’ तत्त्वज्ञान हा ‘हिंदू धर्मा’चाच भाग आहे. आणि ते लोकायतीकही ‘हिंदू’ म्हणूनच जगत असतात. ही आपली प्राचीन परंपरा. हा आपला हिंदू धर्म. त्याचे आता ‘सनातन धर्म’ असे ब्रँडिंग करण्यात येत आहे, ते का?

तो सरळ सरळ राजकीय हिंदूंच्या प्रोजेक्टचा एक भाग आहे. हिंदू धर्म हा ‘किताबी’ नाही, ही त्यांची मूळ खंत आहे. इस्लाम, ख्रिस्ती, यहुदी यांसारखे ‘किताबी धर्म’ अतिरेकाच्या मार्गावर सहज नेता येतात. तसे करणे हिंदू धर्माच्या मूळ स्वरूपामुळे अवघड. ते साधायचे, तर हिंदू धर्म ‘किताबी’ करणे गरजेचे. त्याचे नव्याने ‘ब्रँडिंग’ करणे आवश्यक. त्यासाठी सनातन धर्म हा शब्दप्रयोग. वस्तुतः हा शब्दप्रयोग जुनाच आहे. हिंदू धर्माचा उल्लेख प्राचीन ग्रंथांत सहसा आर्य धर्म, वैदिक धर्म, वर्णाश्रमधर्म, सनातन धर्म अशा प्रकारे करण्यात आल्याचे दिसते.

यातील ‘सनातन’ या शब्दाचा अर्थ शाश्वत असा होतो. ज्याचा अंत होत नाही ते सनातन. हिंदू धर्म असा आहे. तो प्राचीन आहे, शाश्वत आहे, म्हणून तो सनातन आहे. पण गंमत अशी, की बौद्ध आणि जैन धर्म हेही सनातन असल्याची मान्यता आहे. पण सनातन हा शब्द आधुनिक काळात वेगळ्याच अर्थाने वापरला गेलेला आहे.

आजही आपल्या तुकोबारायांचा, ज्ञानोबा माऊलींचा छळ सनातन्यांनी केला असे आपला वारकरी सहज म्हणून जातो. सनातनी हा शब्द रूढीवादी, कर्मकांडांना चिकटून बसणारा, सुधारणावादी विचारांना विरोध करणारा या अर्थाने आजवर वापरला गेलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाला विरोध करणारे लोक सनातन धर्माची पताका फडकावत होते. आर्य समाजाच्या विरोधात पंजाब प्रांतात ‘सनातन धर्म सभा’ नावाची संघटना स्थापन झाली होती.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

आजचे सनातनी सांगतात की, सनातन ही एक प्राचीन जीवनपद्धती आहे. संस्कृती, जीवनमार्ग आहे. त्यांना हेही मान्य असणार, पण वस्तुस्थिती अशीच आहे की, येथील सर्व हिंदू हे कधीही सनातनी धर्म मानणारे नव्हते. तसे मानण्यास गेलात, तर मग आमच्या खंडोबाचे, भैरवनाथाचे, आमच्या रवळनाथांचे, तमाम ग्रामदेवतांचे काय करणार? त्यांना पौराणिक धर्माशी भलेही जोडाल, पण सनातन आर्य वैदिक धर्मात त्यांना कसे स्थान देणार?

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

त्या काळातील हा सनातन धर्मविचार कसा होता, हे अहिताग्नी राजवाडे यांच्यासारख्या सनातनी पंडिताकडून समजते. सनातन्यांचे प्रतिनिधी मानावेत असे अहिताग्नी राजवाडे त्यांच्या आत्मवृत्तात म्हणतात, ‘‘हल्लीच्या निधर्मी राजवटीत वैदिक धर्माकडे दुर्लक्ष करून जी बौद्ध आणि ख्रिस्ती धर्माची कास धरलेली दृष्टोत्पत्तीस येते, तीत बुद्धाच्या अहिंसामार्गावर क्षत्राचा आणि ख्रिस्ताच्या अस्पृश्यतामार्गावर ब्रह्माचा उघड नाश दिसत आहे. हल्लीच्या स्वराज्यघोषित राज्याचे मुख्य राजचिन्ह या देशातून पूर्णपणे निष्कासित झालेल्या बौद्धधर्मीय अशोक मौर्याच्या सांची येथील स्तूपस्तंभावरील तीन सिंहमुखांचे आहे. त्या धर्माशी टक्कर देऊन वैदिक धर्माचे संगोपन करणाऱ्या दिग्विजयती समुद्रगुप्ताच्या अश्वमेधातील प्रज्वलित अग्नीचे नाही. अर्वाचीन काळचा जर्मन फॅसिस्ट वीर हेर हिटलर याला आर्यधर्माचे रहस्य उत्तम कळले असल्याकारणाने त्याने आपल्या राजवटीत अग्नीचे प्रतीक मानले आणि आपल्या ध्वजावर स्वस्तिक चिन्ह धारण केले. गेल्या महायुद्धात दैवयोगेकरून जर त्याचा जय झाला असता तर जगात आज ख्रिस्ती धर्माच्या जागी आर्यधर्माचे निशाण फडकले असते आणि या देशात अस्पृश्योद्धाराच्या ऐवजी ब्राह्मणोद्धाराचे कार्य दृष्टोत्पत्तीस पडले आले असते.’’ (अहिताग्नी राजवाडे आत्मवृत्त, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती १९८०, पृ. २६३, २६४).

अहिताग्नी सांगतात तो आर्य धर्म, तोच सनातन धर्म, तोच वर्णाश्रम धर्म. ते सांगतात – ‘‘ब्राह्मणोपदिष्ट भत्रिय कुलावतंस राजाचे राज्य हे रामराज्य होय.’’ (उपरोक्त, पृ. २६३). ते म्हणतात – ‘‘आधुनिक युजेनिक्स शास्त्राप्रमाणे… उच्चाचे उच्चत्व रक्षण करण्याकरिता नीचाचे सेग्रेगेशन म्हणजे दूरीकरण हाच एक मार्ग आहे, दुसरा नाही; आणि तोच वर्णाश्रमधर्माच्या समाजात काटोकोर रीतीने प्रतिपाळण्यात आला आहे.’’ (पृ. २५३)

भारतात लोकराज्य स्थापन झाले. त्याबाबतचे त्यांचे मत आहे – ‘‘जेथे संपूर्ण राज्यच बाजारबुणग्या वैश्यवणिकांच्या हातात गेले तेथे स्त्रिया अधिकारपदावर आल्या आणि अंत्यज घटना करू लागले तर त्यात नवल कसचे?’’ (पृ. २४३)… ‘‘आता इंग्रजी राज्य जाऊन स्वराज्य स्थापन झाले आहे. आता तरी हा अन्याय धुतला जाऊन ब्राह्मणांचे गेलेले ब्रह्मस्व परत त्यांना मिळेल अशी आशा करावयाची तर हे राज्य उघड उघड सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष पुकारले गेले आहे,’’ (पृ. २७१) ही अहिताग्नींसारख्या सनातन्यांची खंत आहे. तमाम सुधारणावादास, मानवतावादास, लोकशाहीस विरोध करणारा असा हा विचार.

अर्थात आजचे सनातनी हा आपला विचार असल्याचे कधीही मान्य करणार नाहीत. ते सांगतात की, सनातन ही एक प्राचीन जीवनपद्धती आहे. संस्कृती, जीवनमार्ग आहे. त्यांना हेही मान्य असणार, पण वस्तुस्थिती अशीच आहे की, येथील सर्व हिंदू हे कधीही सनातनी धर्म मानणारे नव्हते. तसे मानण्यास गेलात, तर मग आमच्या खंडोबाचे, भैरवनाथाचे, आमच्या रवळनाथांचे, तमाम ग्रामदेवतांचे काय करणार? त्यांना पौराणिक धर्माशी भलेही जोडाल, पण सनातन आर्य वैदिक धर्मात त्यांना कसे स्थान देणार? मुळात, वर म्हटल्याप्रमाणे विविध पंथ, संप्रदाय, परंपरा, रूढी यांनी मिळून बनलेला आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

राज्याच्या व्यवहारात धर्माचा हस्तक्षेप नसणे म्हणजे सेक्युलर असणे. शासनव्यवस्था ही देशाने स्वीकारलेल्या घटनेनुसार चालणार. नरहर कुरुंदकर सांगतात, ‘‘समाजजीवनाच्या सार्वजनिक कक्षेतून धर्म बाजूला सारणे आणि तो केवळ पारलौकिक बाबीसाठी मर्यादीत करणे हा मी सेक्युलॅरिझमचा अर्थ मानतो.’’ पण सेक्युलॅरिझमला असे करण्याची गरज काय? कुरुंदकरांनी ‘सेक्युलॅरिझम आणि इस्लाम’ (जागर, देशमुख आणि कंपनी) या प्रदीर्घ लेखात त्याची उत्तम मांडणी केलेली आहे. ते सांगतात, ‘‘व्यक्तीची व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा निर्माण करून धर्माच्या गुलामगिरीतून मानवी मन मोकळे करणे हा सेक्युलॅरिझमचा आशय आहे… धर्म आधुनिक काळात विकास अवरूद्ध करतो, सेक्युलॅरिझम तो विकास अप्रतिहत करतो. बहुसंख्याकांचा विकास अप्रतिहत करणे हेच कार्य प्रमुख असते.’’

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ही विविधता हा खरा राजकीय हिंदूंसमोरील अडथळा आहे. तो दूर करायचा, तर हिंदू धर्माचे स्वरूप वेदप्रामाण्य, ब्राह्मण्य, वर्णाश्रम धर्म, कर्मकांडे यांत घट्ट करावे लागणार. घाट घालण्यात आला आहे तो याचाच. त्याचेच नाव – ‘सनातन वैदिक धर्म’. काही धर्मज्ञात्यांनुसार, हिंदू धर्म हा सनातन मार्गाचे विस्तारित रूप आहे. तसे असेल, तर सर्व हिंदूंना सनातनच्या व्याख्येत बसवून ते हिंदू धर्म संकुचित करत आहेत असे म्हणावे लागेल. ते काहीही असो, एक राष्ट्र, एक धर्म, एक भाषा, एक ध्वज आणि एक नेता या प्रोजेक्टला धरून हे चाललेले आहे. हिंदूंना वेगळ्या मार्गाने ‘किताबी’ करण्याचा हा डाव आहे.

हे करताना ‘सेक्युलर’ या संकल्पनेविषयी आपल्या मनात जेवढे म्हणून कालकूट कालवता, येईल तेवढे कालवले जात आहे. तिच्याविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. आणि त्याचा प्रारंभ ‘सेक्युलॅरिझम’साठी वापरण्यात आलेल्या प्रतिशब्दांतून झालेला आहे. निधर्मी, धर्मातीत वा धर्मनिरपेक्ष म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’ नव्हे. या एकाही नकारात्मक प्रतिशब्दातून या संकल्पनेचा पुरेसा अर्थबोध होत नाही.

खरे तर, ‘एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका’ म्हणतो त्या प्रमाणे, ‘‘अगदी विद्वानांनाही सेक्युलॅरिझमची नेमकी व्याख्या करणे अवघड आहे.’’ पण आजवर अनेकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. त्यातून एक गोष्ट पक्की झाली आहे की, राज्याच्या व्यवहारात धर्माचा हस्तक्षेप नसणे म्हणजे सेक्युलर असणे. शासनव्यवस्था ही देशाने स्वीकारलेल्या घटनेनुसार चालणार.

नरहर कुरुंदकर सांगतात, ‘‘समाजजीवनाच्या सार्वजनिक कक्षेतून धर्म बाजूला सारणे आणि तो केवळ पारलौकिक बाबीसाठी मर्यादीत करणे हा मी सेक्युलॅरिझमचा अर्थ मानतो.’’ पण सेक्युलॅरिझमला असे करण्याची गरज काय? कुरुंदकरांनी ‘सेक्युलॅरिझम आणि इस्लाम’ (जागर, देशमुख आणि कंपनी) या प्रदीर्घ लेखात त्याची उत्तम मांडणी केलेली आहे. ते सांगतात, ‘‘व्यक्तीची व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा निर्माण करून धर्माच्या गुलामगिरीतून मानवी मन मोकळे करणे हा सेक्युलॅरिझमचा आशय आहे… धर्म आधुनिक काळात विकास अवरूद्ध करतो, सेक्युलॅरिझम तो विकास अप्रतिहत करतो. बहुसंख्याकांचा विकास अप्रतिहत करणे हेच कार्य प्रमुख असते.’’

कुरुंदकरांनी हेही म्हटले आहे, की ‘‘आजच्या राजकारणात सेक्युलॅरिझमचा विचार नेहमी अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाच्या संदर्भात होतो, हीच मुळात पहिली चूक आहे. सेक्युलॅरिझम अल्पसंख्येच्या हितासाठी नसतो, तर नेहमीच बहुसंख्येच्या हितासाठी असतो.’’

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सेक्युलॅरिझम म्हणजे मुसलमानांचे लांगूलचालन हे समीकरण जोडले गेले, ते काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या मतपेढीच्या भोंगळ राजकारणामुळे. पण हे लक्षात घ्यायला हवे की, या देशात आपण हिंदू बहुसंख्य आहोत. ‘सेक्युलॅरिझम’ हा आपल्याला जुनाट रूढी-परंपरांच्या दास्यातून मोकळे करू पाहतो आहे. तो आधुनिक मन बनवू पाहत आहे. हे मन आजच्या कृत्रिम प्रज्ञेच्या काळातही जुनाट विचारांच्या साखळदंडांनी जखडण्याचे काम सारे ‘अतिरेकी धर्मवादी’ करत आहेत.

येथे हे नमूद करायला हवे की, यात कोणीही मागे नाही. ना ख्रिस्ती, ना मुस्लीम. आपल्याकडील असंख्य उजव्यांना ‘त्यांच्या’सारखे व्हायचे आहे, हा खरा काळजीचा विषय आहे. कारण तसे होणे म्हणजे आपला सगळा भविष्यकाळ मध्ययुगात नेऊन ठेवणे.

बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे ‘सत्यनारायणा’तून ‘सत्तानारायण’ अशा प्रकारे, केवळ निवडणूक राजकारणाच्या चष्म्यातून पाहणे घातक ठरेल. राज्यघटनेने घातलेले एकेक बंधन मोडणे, त्याच्या परिणामांचा कानोसा घेणे आणि पुढे जाणे, हे तंत्र उजव्या सरकारांनी आत्मसात केलेले आहे. ‘सेक्युलॅरिझम’बाबत तसेच सुरू आहे. त्या तत्त्वास हरताळ फासतानाच हिंदू धर्मीयांस ‘सनातन’मध्ये धर्मांतरित करण्यात येत आहे. खरे तर हे हिंदू धर्मावरील संकट आहे. हिंदू धर्म आज खरोखरच ‘खतरे में’ आहे.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘परकीय हात’ आणि ‘प्रोपगंडा’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 03 December 2025

रवि आमले,

तुम्ही सेक्युल्यारिझम म्हणून जे काही डोक्यावर घेता आहात, ती मुळातून ख्रिश्चन संज्ञा आहे. दोन क्लर्जी ( म्हणजे चर्चचे पदाधिकारी ) आपसांत चर्चा करतांना जे विषय ख्रिश्चनचर्च च्या अखत्यारीत येत नाहीत अशा बाबींना सेक्युलर म्हणतात. मग भारताला सेक्युलर बनायची गरजच काय ती मुळातून? आणि तुमच्या मते हा सेक्युल्यारिझम म्हणे भारतीयांना जुनाट रूढी-परंपरांच्या दास्यातून मोकळे करू पाहतो आहे .... ? डोकंबिकं ठीक आहे ना?

बाकी, खंडोबा व रवळनाथांचं काय करायचं ते भक्त लोकं बघून घेतील. तुमच्यासारख्या नास्तिकांनी वृथा चिंता करू नये.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......