ही गोष्ट आहे एका ध्येयवेड्या व्यक्तीची. आकाशाला गवसणी घालूनही मातीवरच पाय असणाऱ्या ‘जीनियस जेम’ची, अर्थातच डॉ. गंगाधर मोतीराम वारके उर्फ डॉ. जीएम यांची
ग्रंथनामा - झलक
अनुराधा परब
  • ‘जीनियस जेम’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 07 September 2025
  • ग्रंथनामा झलक जीनियस जेम Genius Gem गंगाधर मोतीराम वारके GANGADHAR MOTIRAM WARKE हायमीडिया लॅबोरेटरीज HiMedia Laboratories

फार्मा क्षेत्रातील मीडिया उत्पादनामध्ये भारताला स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न ऐंशीच्या दशकात पाहणाऱ्या, त्यासाठी अहोरात्र काम व संशोधन करणाऱ्या आणि ‘हायमीडिया लॅबोरेटरीज प्रा. लि.’च्या सुमारे पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून एक आगळावेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचे चरित्र अनुराधा परब यांनी लिहिले आहे. रोहन प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या चरित्राला लेखिकेने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

आकाशात भरारी घेताना पक्ष्याला आपल्या पंखांवर, त्यांच्या बळावर प्रगाढ विश्वास असावा लागतो. तेव्हाच तो सगळे आकाश आपल्या कवेत घेऊ शकतो. पंखांची ताकद ओळखून असलेल्या त्या पक्ष्याला ते विस्तीर्ण आकाश ना भिववू शकत, ना त्याच्या भरारीला रोखू शकत. जमिनीवरून उडून आकाशाकडे झेपावताना, कर्तृत्वाची उंची गाठताना विसाव्याला आपल्याला पुन्हा जमिनीकडेच जावे लागणार आहे, याचे भान असणाऱ्याचीच गगनभरारी नजरेत भरते, हेही तेवढेच खरे.

ही गोष्ट अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तीची. आकाशाला गवसणी घालूनही मातीवरच पाय असणाऱ्या जीनियस जेमची (हिऱ्याची), अर्थातच डॉ. गंगाधर मोतीराम वारके उर्फ डॉ. जीएम यांची. संघर्ष निसर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तो झाडावेलींना, पशूपक्ष्यांना चुकला नाही, तर मानवाला तरी कसा काय चुकणार? गगनभरारी कधीही सहजसोपी नसते. ती अडथळे, समस्या, संकटे, विरोध, स्पर्धा, चढउतार अशा एक ना अनेक खाचखळग्यांची मालिकाच असते. या सगळ्यांवर अंगभूत धैर्याने, धाडसाने, बुद्धिचातुर्याने मात करत संपादलेले यश हे कौतुकास्पद असते.

डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचे कार्यचरित्र हेदेखील असेच रोचक, रंजक आणि नव्यांना उदबोधक ठरणारे आहे. विशेषतः गावखेड्यातील मुलांसाठी डॉ. जी. एम. वारके यांचा हा जीवनसंघर्ष एखाद्या दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरेल. माणूस जन्म कुठे घेतो यापेक्षा तो आपली प्रगाढ इच्छाशक्ती, अपार मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर आपल्या स्वप्नाला सत्यामध्ये कसे आणू शकतो, याचे हे कार्यचरित्र बोलके उदाहरण ठरावे.

वृत्तीने संशोधक आणि आचार- विचाराने द्रष्टा व्यावसायिक हे आगळे समीकरण या एका व्यक्तीच्या ठायी पाहायला मिळते. फार्मा क्षेत्रातील मीडिया उत्पादनामध्ये भारताला स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न ऐंशीच्या दशकात पाहणारे आणि त्यासाठी अहोरात्र काम व संशोधन करणारे हे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व. औषध-उत्पादन क्षेत्रातील मीडिया उत्पादनांच्या आयातीद्वारे परदेशात जाणारा भारतीय पैसा रोखायचा असेल, तर परदेशस्थ कंपन्यांवरील अवलंबित्व संपवले पाहिजे; त्यासाठी भारताला मीडिया उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण व्हावे लागेल, हे चाणाक्षपणे जाणलेल्या आणि त्याप्रमाणे स्वसंशोधनातून निरनिराळे मीडिया उत्पादित करण्यासाठी आयुष्य झोकून दिलेल्या एका कर्मयोग्याचे हे कार्यचरित्र आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आज एकविसाव्या शतकामध्ये एका द्रष्ट्या संशोधक-व्यावसायिकाने ‘हायमीडिया लॅबोरेटरीज प्रा. लि.’ कंपनीच्या सुमारे पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून अनेक नवोदित उद्योजकांना, संशोधक-वैज्ञानिकांना मार्ग प्रशस्त करून दिला आहे. आपल्या अनुभवांच्या माध्यमातून डॉ. जीएम यांनी पुढच्या पिढ्यांसाठी आशादायी चित्र समोर ठेवलेले आहे.

माणसाला जे हवे ते त्याला मिळाले, तर आयुष्य आणि स्वप्न यात फरकच उरला नसता. डॉ. जी. एम. वारके या जीनियस संशोधक- व्यावसायिकाची हीच तर खासीयत आहे. भारताला औषधक्षेत्रामध्ये, विशेषत: मीडियाक्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण करणे, हा ध्यास त्यांनी केवळ बाळगला आणि तो प्रत्यक्षात उतरेपर्यंत क्षणाचीही उसंत घेतली नाही. ध्यानी-मनी-स्वप्नी हेच स्वप्न त्यांनी जाणीवपूर्वक पाहिले, पूर्णत्वाला नेले.

अर्थात, या सर्व प्रवासामध्ये कुणाला हे करून दाखवायचे आहे, असा डॉ. गंगाधर मोतीराम वारके - डॉ. जीएम यांचा अजिबात अभिनिवेश नाही. अडथळा असेल, तर त्यावर मात करण्याचे पर्यायही असू शकतात, यावर गाढ विश्वास, बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर नितांत श्रद्धा असेल, तर काय घडू शकतं, हेच डॉ. जी. एम. वारके यांच्या कार्यचरित्रामधून सामोरे येत राहते.

माणसाचे जगणे हेच मुळात पहिल्या श्वासापासूनच संघर्षाचे असते. आईच्या उदरातून बाहेर पडण्यापासून ते प्रत्यक्ष जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करण्यापर्यंतची लढाई यातल्या हरेक टप्प्यावर माणूस झगडत राहतो. कधी परिस्थितीशी, कधी माणसांशी, कधी आपल्याच नशिबाशी... दरखेपेस ठेचकाळून, टक्के-टोणपे खाऊन नव्या जोमाने उभे कसे राहावे, हेच डॉ. जीएम यांचे हे चरित्र सांगते.

मी डॉ. जीएम यांच्या जगण्याचा संघर्ष पाहते, तेव्हा कधीही कच न खाता भरारी घेण्याची त्यांची विजिगीषू वृत्ती पाहून अचंबित होते. लहानपणी वाचलेली आणि कायमची मनावर कोरली गेलेली कष्टकरी मुंगीची गोष्ट, तिची चिकाटी, परिश्रम करण्यातील सातत्य यांचीच आठवण होत राहते. संत ज्ञानेश्वरांनी सूर्याला गिळण्याची क्षमता राखणाऱ्या त्या इवल्याशा मुंगीचा दृष्टान्त ‘ज्ञानेश्वरी’मध्ये दिला तो तिच्यातल्या अशा असामान्य गुणांमुळेच. अथक या शब्दाचा अर्थही तिच्याचकडून शिकावा, इतके तिचे माहात्म्य आणि वेगळेपण. तेच गुण आपल्याला डॉ. जीएम यांच्यामध्येही दिसून येतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

एखाद्या व्यक्तीकडे काहीही नसताना त्याने दाखवलेला संयम आणि सर्व काही आल्यानंतर, यश मिळाल्यानंतर त्याची वर्तणूक या दोन गोष्टींनी माणसाची पारख होत असते. परिस्थितीच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेली व्यक्ती, तिचे कार्य निःसंशय सोन्यासारखे झळाळून उठते. डॉ. जीएम यांचा जीवनालेख आणि त्यांनी त्यांच्या आप्तांच्या सहकार्याने उभारलेल्या, वाढवलेल्या हायमीडिया लॅबोरेटरीज प्रा. लि. कंपनीचा गतिमान प्रवास आपल्याला थक्क करतो. उमेद हरलेल्यांना, वाट हरवलेल्यांना आणि नव्याने शोधणाऱ्यांना डॉ. जीएम यांचे हे कार्यचरित्र नक्कीच प्रेरक ठरेल, अशी आशा मला वाटते.

हे चरित्र लिहिताना मला स्वतःला डॉ. जीएम यांच्यातील परिस्थितीला निडरपणे भिडण्याची वृत्ती कायमच प्रेरणा देत राहिली आहे. त्यांनी वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेली असली, तरी आजदेखील औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये देशाला स्वयंपूर्ण आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल, विचाराने त्यांचा दिवस उजाडतो आणि मावळतोही.

डॉ. वारके यांच्या ध्यासाची कहाणी आरंभ, मध्य आणि गती अशा टप्प्यांतून मला लिहिता आली, याचा आनंद वाटतो. डॉ. जीएम वारके यांच्या पूर्ण शैक्षणिक कारकीर्दीचा उल्लेख विद्यार्थी दशेमुळे एकेरी तर पीएच.डी.नंतरचा सन्मानपूर्वक आदरार्थी असा जाणीवपूर्वक ठेवण्यात आला आहे.

जीएम यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्ती दीपस्तंभासारख्या असतात, कायम समाजाला दिशा देण्याचे, जागतं ठेवण्याचे काम त्या करत राहतात. देशासाठी करत असलेले काम हे त्यांच्यासाठी अतीव महत्त्वाचे असते. पुरस्कार, कौतुकाची थाप त्यांची उमेद अधिकाधिक वाढवत असली, तरीही त्याचा आनंद त्यांच्यासाठी तेवढ्यापुरताच असतो. आपल्या उद्दिष्टावर पुन्हा ते आपलं चित्त एकाग्र करतात. दीपस्तंभ उधाणलेल्या समुद्रात घट्ट पाय रोवून तो निश्चल, स्थितप्रज्ञ उभा असतो... एखाद्या साधकासारखा. जुन्या नव्यांना एकाचवेळी आधाराचा, आशेचा हात देणाऱ्या सेतूसारखा. डॉ. जीएम यांचा हा प्रगतीशील जीवनसंघर्ष आपल्यातील सुप्त सामर्थ्याला प्रदिप्त करणारा वाटाड्या ठरेल, यात शंका नाही.

‘जीनियस जेम : डॉ. जीएम’ – अनुराधा परब

रोहन प्रकाशन, पुणे । पाने – ३५६ । मूल्य – ४२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......