‘रागमुद्रा’ : अभ्यास म्हणजे नेमकं काय, हे रागसंगीतातले कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी परत एकदा अनुभवण्यासाठी हा ग्रंथ जरूर अभ्यासावा!!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
किरण सोहळे
  • शास्त्रीय गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर. सोबत त्यांच्या ‘रागमुद्रा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 03 August 2025
  • ग्रंथनामा शिफारस अतिंद्र सरवडीकर Atindra Sarvadikar रागमुद्रा Raagmudra

सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर यांनी रचलेल्या रागदारी संगीतातल्या बंदिशींचा ‘रागमुद्रा’ हा ग्रंथ संस्कार प्रकाशनातर्फे प्रकाशित होतोय. त्याविषयीचा गायक व अभ्यासक किरण सोहळे यांचा हा परिचयपर लेख…

.................................................................................................................................................................

एकाच वेळी हरखून आणि हबकून जावं, तसं डॉ. अतिंद्र सरवडीकर यांनी रचलेल्या बंदिशींचा ‘रागमुद्रा’ हा ग्रंथ पाहताना झालं. या तब्बल ५४९ पानांचा ग्रंथात भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या २५५ नव्या बंदिशींचा समावेश आहे. ख्याल, तराण्यापासून धृपद, धमार, ठुमरी, चतुरंग, त्रिवट, टप्पा, स्वरार्थ प्रबंध अशा वैविध्यपूर्ण सांगीतिक घाटातल्या नव्या विलक्षण वेधक रचना या ग्रंथात आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताची अनेक शतकांची दीर्घ परंपरा, श्रेष्ठ कलाकारांची मांदियाळी आणि पारंपरिक रचनांचा उपलब्ध साठा, या पार्श्वभूमीवर शास्त्रीय संगीतात नवनिर्मिती करणं अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. राग व घाटाचे नियम-कायदे पाळत सौंदर्यनिर्मिती करणं तर महाकठीण! आजच्या काळात संगीत जगतात मुख्यत्वे भूतकाळातल्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या लोकप्रिय कलाविष्कारांच्या पुनरावृत्ती ऐकायला मिळतात. प्रभावी नवनिर्मिती करणारे कलाकार फारच थोडे आहेत. म्हणून हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे.

प्रस्तावना वाचताना ध्यानात येतं की, या रचनांमागे विचारांची बैठक, सौंदर्यदृष्टी आणि अपार मेहनत आहे. जी मुद्देवजा मते प्रस्तावनेत येतात, ती विचारप्रवण करणारी आहेत. उत्तम प्रस्तावना केवळ वैचारिक पातळीवर विकास कसा घडतो हे सांगत नाहीत, तर यातून पुढे निर्मिती कशी घडते, याची कृतीही सांगते.

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्याकडून जवळपास २० वर्षांची गायनाची तालीम, निकटच्या सहवासातून झालेले संगीताचे संस्कार यातून न कळत नवनिर्मिती करण्याची प्रेरणा लाभल्याचं सरवडीकर आवर्जून नमूद करतात आणि हा ग्रंथ नम्रपणे गुरुचरणी अर्पण करतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या ग्रंथात विभिन्न रागांमधील नवरचित बंदिशी दिल्या आहेत. त्यामध्ये प्रचलित रागांबरोबरच अनवट, अप्रचलित राग व ताल यांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, प्रचलित मिश्र व संकीर्ण रागांबरोबरच हंसकिंकीणी, शिवमत भैरव, देवगंधार, गौरी, बिहागडा, सावनी, गावती, नायकी कानडा, प्रतापवराळी, चक्रधर, मालती, दोन निषाद युक्त रागेश्री, शुद्ध धैवत बिभास, भिन्नकंस असे दुर्मीळ राग; हमीर, कामोद, छायानट, गौड सारंग, गौड़ मल्हार असे चलन प्रधान राग; बसंती-केदार, ललिता-गौरी, कौशी कानडा, ललत-भटीयार यांसारखे जोड राग; जनसम्मोहीनी, सालगवराळी, परमेश्वरी, वाचस्पती, प्रतीक्षा, चारुकेशी, भिन्नषडज यांसारखे आधुना प्रसिद्ध राग आणि ‘केदार-भटियार’, ‘प्रभावती’ या नवनिर्मित रागांमधल्या रचनांचा समावेश आहे.

प्रचलित तालांबरोबरच आडा चौताल, पंचम सवारी, अष्ट रूपक, पश्तो, अद्धा अर्धांग तालांमध्ये साडेनऊ मात्रांचा सुनंद ताल, साडे सात मात्रांचा नील ताल इत्यादी विविध तालांचा समावेश आहे, हेही विशेष.    शास्त्रीय संगीताची परंपरा भलीमोठी असली, तरी आजही अनेक रागांमध्ये एखादीच बंदिश उपलब्ध आहे, आणि तीच सर्वत्र गायली जाते. अशा रागांमध्ये नव्या बंदिश रचना ऐकणं हा सुखद अनुभव आहे. नंद, ललितागौरी, गौरी, प्रतापवराळी, नायकी कानडा, बिहागडा, सावनी, शुद्ध सारंग अशी काही रागांची नावं या बाबतीत सहज आठवतात.

या ग्रंथातल्या बंदिशी आजच्या सर्व प्रचलित घराण्यांच्या गायनशैलीशी मेळ साधतील अशी रचना करण्याचा प्रयत्न जाणवतो. तशी लय, तालाची योजना व स्वरसंगतींचं उपयोजन आढळतं. जसं पुरीया धनाश्री रागाचा मध्यलय रूपकचा ख्याल ‘सांझ भयी प्रीतम’ जयपूर घराण्याची इतकी चपखल लय घेऊन येतो की, मल्लिकार्जुन मन्सूरांच्या प्रवाही लयकारीची आठवण होते!

या रचनांमध्ये भक्ती, शृंगार, प्रेम, संगीत चिंतन, तत्वचिंतन, ऋतुवर्णन, नायिक भेद, व्यक्ती विशेष, वर्तमान घटना इ. विभिन्न विषयांवरील रसपूर्ण काव्याचा रागरूपाशी सौंदर्यपूर्ण मेळ साधलेला आहे. मुख्यत्वे प्रभावी मैफल गायन सादरीकरणाच्या दृष्टीने या रचना केलेल्या असल्या, तरी गांधर्व मंडळाच्या प्रारंभिक परीक्षेपासून अगदी डॉक्टरेटपर्यंतचे बहुतेक राग या ग्रंथात समाविष्ट आहेत. एकंदरीत सर्वांगीण विचार करूनच हा रचना संग्रह निर्माण केला गेला आहे. हे अत्यंत मेहनतीचं काम तर आहेच, परंतु सौंदर्यदृष्टी आणि संगीतसाधनेची खोलवर डूब असल्याखेरीज असं कार्य घडणार नाही.

रागदारी संगीतात बंदिशीला खूप महत्त्व असतं. बंदिशीच्या आधारावरच पुढची उत्स्फूर्त राग प्रस्तुती आकार घेत असते. म्हणून वेगवेगळ्या बंदिशींच्या आधारे मांडलेला राग वेगवेगळा वाटतो. त्यात विविधता येते. या बंदिशींची आपली एक भाषा असते, एक विश्व असतं.

‘ब्रज’ या उत्तर प्रदेशातल्या बोलीभाषेमध्ये बहुतेक पारंपरिक बंदिशी असतात. त्यातील लोकप्रिय विषय म्हणजे कृष्णलीला, सासू-सूनेची तक्रार, ईशभक्ती किंवा प्रियकराचा विरह. त्यांखेरीज नवे विषय बंदिशींमध्ये आणणं अतिशय आव्हानात्मक ठरतं. शब्दांचा ढंग फार बदलला, तर ती बंदिश न वाटण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. गीतलेखन आणि बंदिशींचं काव्यलेखन यांमध्ये हा फार मोठा फरक आहे.

‘रागमुद्रा’मध्ये अतिंद्रजींनी विषयवस्तूबाबत काही प्रयोग उत्कृष्टपणे केल्याचं अनुभवाला येतं. अस्सलपणाचं एक लक्षण म्हणजे एखाद्या संदर्भात तो संदर्भच आपल्याकडे नसल्याने नवे शब्द घडवावे लागतात आणि ते आपल्या संस्कृतीत घोळवलेलेही नको, पण आपले वाटतील असे हवे असतात. असे नवे शब्द व क्रियापदं या ग्रंथात सापडतात. काही उदाहरणं पाहूया -

पंढरीचा विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत. भारतीय रागदारी संगीत बहरलं तेही महाराष्ट्रातच. परंतु बंदिशमध्ये विठ्ठलाचा उल्लेख आलेला आढळत नाही. या ग्रंथात ‘करन फुल मकरकार’ या श्याम कल्याणातल्या बंदिशीद्वारे असा उल्लेख झालेला आढळतो. अशाच काही वेगळ्या रचनांबद्दल बोलायचं तर, अनेक मुघल बादशहांचे गुणवर्णन करणाऱ्या अनेक बंदिशी असतात, परंतु या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचं वर्णन अडाणा रागातल्या ‘शिव छत्रपती के दरबार में’ या बंदिशीत आढळतं आणि सुखावून जातं.

महात्मा गांधींच्या विचारांवर गोरखमधली ‘सत्य की धार तेजमान’, सावरकरांच्या व्यक्तित्वावर भिन्नषडज रागातली ‘अतही प्रखर देश भगत’, आंबेडकरांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित पुरीया धनाश्री रागात ‘दारिद्र्य दुःख भंजन ग्यानन’ यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. अशी आणखीही उदाहरणं या ग्रंथात सापडतात.

गौरी, ललिता गौरी मध्ये आलेलं गौरी देवीच सुंदर वर्णन, दुर्गा रागात नवदुर्गांच वर्णन, मारव्यात उतरलेली व्याकुळ तिन्हीसांज, सारंग रागात दिसणारं ग्रीष्म ऋतूच दाहक वर्णन, भटियारचा प्रसन्न माहोल उभा करणारी ‘दिनकर शुभकर आयो’ ही रचना, भिन्नकंसच्या बंदिशीत उमटलेली शरदाची रात्र, तर रागेश्री मध्ये अशाच एका शरद रात्री झुल्यावर बसलेले राधा कृष्ण आणि त्यांना हरखून एकटक बघणारे ब्रजवासी, गंगा नदीच्या प्रवाह मार्गाचं वर्णन करणारी २३ रागांची सुंदर गुंफण असलेली रागमाला, पूरब आणि पंजाब दोन्ही बाजांचे नजाकतीने नटलेले ठुमरी, दादरे तसंच चैती, झुला, होरी यांच्याही काही सर्वांग सुंदर रचना यात समाविष्ट आहेत. उपशास्त्रीय संगीतातील घाटात तर नवीन रचना फारच क्वचितच होताना दिसतात. म्हणून याला विशेष महत्त्व प्राप्त होतं.

बडा आणि छोटा ख्यालाच्या रचना समान अर्थाच्या असणं हा विचार अनेक रचनाकारांच्या रचनांमध्ये दिसतो, परंतु बड़ा ख्यालामध्ये वर्णन केलेल्या स्थितीची पुढची अवस्था छोटा ख्यालात मांडून विषय पुढे प्रवाहित करणे, हा एक नवा विचार या ग्रंथात आढळतो.

उदाहरणार्थ, शुद्ध सारंग या रागाच्या बडा ख्यालात उन्हाळ्यातल्या रखरखत्या दुपारचं वर्णन सजल नैना बाट तकत आहे, तर छोटा ख्यालात दुपार नंतर येणाऱ्या काहीश्या थंड संध्याकाळचं वर्णन ‘पवन पुरवाई चले’ दिसतं. वनवासाला निघालेल्या कोवळ्या वयातल्या सीतेला पाहून जनक राजाच्या मनात उमटलेल्या विचारांची कल्पना ‘सुकुमारी रे सिया बन बन चली पाछे पिया’, तर छोटा ख्यालात ते वनवासातून परतताना सगळीकडे साजऱ्या झालेल्या दिवाळीचं वर्णन आलंय.

आपल्या भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करता आल्या पाहिजेत. रागदारी संगीतही याला अपवाद नाही, हे अशा प्रयोगांनी पुन्हा सिद्ध होतं. परंतु असं असलं तरी कोणते विषय बंदिशमध्ये समाविष्ट करायचे, याची नजर असणं फार महत्त्वाचं आहे. करमणूक म्हणून बंदिशीच्या काव्याची कशीही छेडखानी खटकणारी ठरेल, याचं रचनाकाराला पुरतं भान आहे. शेवटी मनोरंजन हा संगीताचा हेतू नाही, तर परिणाम असतो. रागदारी संगीत एक स्वतंत्र माध्यम आहे. ते आपल्या जीवनाचं छायाचित्र टिपणारं यंत्र नाही वा आपल्या थकल्या मनाला नुसतंच रिझवणारं खेळणंही नाही, याचंही या निमित्तानं पुनस्मरण होतं!

विशेष म्हणजे टप्प्यांची ही एक अतिशय सुंदर रचना या ग्रंथात आहे. टप्पा हा गान प्रकार दुर्मीळ आणि अवघड. महाराष्ट्रात तर अगदीच कमी गायला जाणारा. टप्प्याच्या पारंपरिक रचना पंजाबी भाषेत असतात, परंतु या ग्रंथात दिलेला टप्पा सर्वांना समजणाऱ्या हिंदी भाषेत आहे हेही विशेषच. नादमय आणि चुस्त आकृतीबंध असणाऱ्या तराण्यांबरोबरच धृपद धमार, चतुरंग, त्रिवट यांच्याही आकर्षक रचना यात आहेत. स्वरार्थ प्रबंध म्हणजे अशी रचना ज्यामध्ये काव्य हेच त्या गीताचे स्वर असतात. अवघड अशा या प्रकारातही काही रचना दिसतात. भीमपलास म्हणजे पळसाची मोठी पाने. हा अर्थ उलगडणारं ‘खिले पलाश विशाल परनन’ हे लक्षण गीत अनोखं आहे, तसंच काही सुंदर सरगम गीतं ही आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

रचनाकार अतिंद्र यांचा शब्दसंग्रह अमाप आहे आणि शब्द-स्मृती विलक्षण आहे, हे दर रचनेगणिक जाणवतं. त्यामुळे कालबाह्य झालेले शब्द फारसे वापरात न राहिलेले उत्कृष्ट वेचक शब्द, साहित्यात विशेषतः प्रचलित साहित्यात येणारे काही विशेष देखणे शब्द ते अत्यंत सहज वापरतात. एखादाच ठळक दागिना घातला की, तो लक्ष वेधून घेतो, तसं या शब्दांनी होतं. साधेपणाही दिसतो आणि आकर्षकही वाटतं, अशी गंमत त्यामुळे भाषेत येते. शास्त्रोक्त संगीताच्या बाबतीत बंदिशीचा शब्द कसा प्रसरणशील होऊ शकतो, याचा अंदाज घेऊन शब्द योजना होणं महत्त्वाचं असतं. याचा रचनाकाराला अचूक अंदाज असल्याचं जाणवतं. काव्यातली अनुप्रासांची गंमत अनुभवताना वेगळाच आनंद लाभतो. भाषिक स्वर विशेषतः ईकार उकारांचा नादमधुर नेमका वापर अनेक बंदिशीत आढळतो. अनेक विषयांवर विविध शैलीत लिहिल्या गेलेल्या बंदिशीच्या कविता भाषा लय राखून रागाच्या चौकटीत समाविष्ट करणं, हे प्रचंड भावनिक आणि वैचारिक कष्टाचं काम आहे, ते डॉ. सरवडीकर यांनी अत्यंत समर्थपणे साधलं आहे.

पुण्याच्या संजाली ओक यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शीर्षकासाठी तसेच बंदिशींच्या शब्दांचे जे सुलेखन केलं आहे, ते विशेष उल्लेखनीय आहे. पुस्तकात दिलेल्या QR codesच्या मदतीनं वाचक या सगळ्या रचना उत्तम स्टुडिओ क्वालिटीमध्ये तसेच लोकप्रिय साथीदारांच्या साथीमध्ये सहज ऐकू शकतात.

भारतीय संगीताचा गाभाच सृजनशीलता हा आहे, परंतु नवं काही निर्माण करायचं तर सातत्यानं अभ्यास हवा, परंपरेशी जवळून ओळख हवी, डोळस तालीम हवी, अनेक पैलूतून विचार हवा आणि मुख्य म्हणजे निर्मिती क्षमता हवी! या सर्व बाबतीत सरवडीकर यांच्या साधनेची ‘तप्तमुद्रा’ या रागमुद्रेवर उमटल्याचं प्रकर्षानं जाणवतं.

संवेदनशील कलाकारानं परंपरेकडे आपल्या काळाच्या आणि वयाच्या बिंदूवरून परत पाहणं हे नेहमीच परंपरेला अधिक समृद्ध करणारं ठरतं. अभ्यास म्हणजे नेमकं काय, हे रागसंगीतातले कलाकार, विद्यार्थी आणि रसिकांनी परत एकदा अनुभवण्यासाठी हा ग्रंथ जरूर अभ्यासावा!!

.................................................................................................................................................................

लेखक किरण सोहळे गायक व अभ्यासक आहेत.

kiran94222@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......