पॉम्पे : ज्वालामुखीच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे काही क्षणांत धरतीखाली गडप झालेले इटलीतील शहर
ग्रंथनामा - झलक
रवींद्र गुर्जर
  • ‘रमणीय पुरातत्त्व’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 13 July 2025
  • ग्रंथनामा झलक रमणीय पुरातत्त्व रवींद्र गुर्जर

प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर यांचे ‘रमणीय पुरातत्त्व’ हे आगळेवेगळे पुस्तक नुकतेच पुण्याच्या ‘मिहाना पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित झाले आहे. जगभरातील काही महत्त्वाच्या उत्खननांचा थोडक्यात परिचय करून देणाऱ्या या पुस्तकातील एका लेखाचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

तो दिवस होता २४ ऑगस्ट, इसवी सन ७९. इटलीतील समृद्ध पॉम्पे शहरात एकाच वेळी अनेक व्यवहार चालू होते. संगीत, लोकप्रिय खेळ, दुकानांमधील खरेदी-विक्री, गजबजलेली मद्यालये आणि वेश्यागृहे - एक ना अनेक. कोणालाही अशी कल्पना येण्याची काही शक्यताच नव्हती की, त्या सर्वांचा तो जीवनातील अखेरचा दिवस होता. आदल्या दिवशीच रोमन लोकांची अग्निदेवता ‘व्हल्कानेलिया’चा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला होता.

एकाएकी नजीकच्या व्हेसुवियस पर्वतामधील निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि अल्पावधीतच संपूर्ण पॉम्पे शहर त्याच्या अतितप्त राखेखाली गडप झाले. आजूबाजूच्या काही गावांनाही प्रचंड विनाशाला सामोरे जावे लागले. किमान दहा हजार लोक क्षणार्धात मृत्युमुखी पडले. संपूर्ण पॉम्पे शहरच तमाम स्थावर-जंगमासह १५ ते २० फूट भूमिगर्भात गायब झाले.

इ.स. पूर्व सातव्या शतकात पॉम्पे वसले गेले. त्यानंतर ३०० वर्षांनी ते रोमन अधिपत्याखाली आले. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी तिथे सुमारे ११००० लोकवस्ती होती, जी पूर्णपणे नामशेष झाली. पॉम्पे एक प्रसिद्ध बंदर होते. प्रचंड मोठे अॅम्फी थिएटर आणि क्रीडांगण तिथे होते. पाणी-पुरवठ्याची विशेष यंत्रणा शहरात होती. आताच्या ‘सानो’ (जुन्या सार्नस) नदीच्या मुखाजवळ या शहराचे स्थान आहे. आजुबाजूस छोटी उपनगरे पसरली होती. व्हेसुव्हियस पर्वत तिथून आठ किलोमीटर अंतरावर होता. शहराची व्याप्ती १७० एकर एवढी होती.

पुरातत्त्वामधील संशोधनात उत्खननाला फार मोठे महत्त्व आहे. प्राचीन स्थळांचे संदर्भ मिळाल्यानंतर त्या जागी काळजीपूर्वक खोदकाम करण्यात येते. जमिनीखाली नेमके काय दडले आहे, याची आधी कल्पना नसते. वस्तू आणि वास्तूचे नुकसान न होता पुरावे उजेडात आणावे लागतात. बऱ्याच वेळा हवामान (ऊन, पाऊस इ.) त्या ठिकाणी प्रतिकूल परिणाम करते; आणि ‘खजिना’ हाती लागावा या आशेने चोऱ्यामाऱ्या होतात. त्यामुळे अर्धवट पुरावे हाती लागतात. त्यावरून काढलेले निष्कर्ष चुकीचे/अपुरे ठरू शकतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पॉम्पे या शहराची गोष्ट एकदम वेगळी होती. ज्या क्षणाला ते शहर राख आणि दगड-धोंड्यांखाली गाडलं गेलं, त्या वेळी लोकांची आणि इमारतींची जी स्थिती होती, तशीच्या तशी पुढे शेकडो वर्षे टिकून राहिली. त्याला कोणी धक्का लावण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच पुरातत्त्वाच्या इतिहासात पॉम्पेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्णपणे जमिनीखाली न गेलेल्या वास्तूंना (चोर व हवामानाचा) थोडाफार धक्का पोचला. परंतु तिथे एकेकाळचे एक समृद्ध शहर पाताळात असेल, अशी शंका कोणालाच आली नाही.

हजारो टन राखेखाली त्या शहराचे रहिवासी मृत्युमुखी पडले, याचा पत्ररूपी पुरावा ज्युनिअर प्लिनीने (एक इतिहासकार) मागे ठेवला होता. त्याने दूरवरून ज्वालामुखीचा उद्रेक स्वतः पाहिला होता. त्याचे लष्करी अधिकारी काका (सीनिअर) प्लिनी त्या वेळी लोकांचे बचावकार्य करताना मरण पावले होते. त्यानंतर सुमारे १,५०० वर्षांनी इ.स. १५९९मध्ये त्या जागेचा प्रथम शोध लागला. पुढे १७४८ साली एका स्पॅनिश इंजिनिअरने तिथे गंभीरपणे उत्खननाचा प्रयत्न केला. हवा आणि दमटपणाच्या अभावामुळे जमिनीखालच्या सर्व वस्तू (लोक आणि इमारती) जशाच्या तशा टिकून राहिल्या होत्या. त्यामुळे त्या काळातील शहराचे जीवन सूक्ष्म तपशीलासह उजेडात आले. मृत मानवी शरीराच्या जागी राखेमध्ये पोकळ्या निर्माण झाल्या होत्या. तिथे प्लॅस्टर भरण्यात आले. असे शेकडो पुतळे तयार झाले. ज्या स्थितीत त्या व्यक्तींचा मृत्यू झाला त्या पुरातत्त्वज्ञांना जशाच्या तशा सापडल्या.

इ.स.पू. चौथ्या शतकात संपूर्ण शहराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. इ.स. ७९मध्ये असलेल्या रस्त्यांच्या पातळीपर्यंत राख/ मातीचे ढिगारे उत्खननात उपसण्यात आले. काही ठिकाणी त्याखालीही उत्खनन झाले. जुन्या वस्त्यांचे पुरावे त्या जागी मिळाले. नेहमीप्रमाणे प्राण्यांची हाडे, खापरे आणि वनस्पतींचे पुरावेही उपलब्ध झाले. सध्याचे अपोलो देवतेचे देऊळ इ.स.पू. दुसऱ्या शतकात बांधण्यात आले होते. शहरातील ते महत्त्वाचे धार्मिक स्थळ होते. रोम आणि दक्षिण इटलीबरोबर समुद्रमार्गे व्यापार चालत असे.

उत्खनित शहराचे पहिल्या शतकातील रोमन जीवन आपल्यासमोर स्पष्ट उभे राहते. सार्वजनिक बागा, सभागृहे, स्नानगृहे, असंख्य घरे आणि काही आलिशान बंगले. भिंतींवर मिळालेल्या चित्रे आणि चिन्हांमुळे माहितीचा प्रचंड खजिनाच खुला झाला. सुतार, सोनार, लोहार अशा व्यावसायिकांची दुकाने लक्षणीय होती. दारूचे गुत्ते आणि वेश्यांची वस्ती ही आणखी काही वैशिष्ट्ये. भडक आणि शृंगारिक चित्रे जागोजागी रेखाटलेली दिसतात. लैंगिक व्यवहार त्या वेळी खुले असावेत, असे त्यावरून कळून येते. आधुनिक विद्वानांच्या मते त्या वेळचे विशाल अॅम्फी थिएटर हे अत्याधुनिक स्थापत्याचा नमुना होता. विशेषतः गर्दीला नियंत्रणात ठेवण्याची विशेष व्यवस्था तिथे होती.

त्या काळातही पर्यटक बाहेरून त्याजागी येत असत. त्यातले काही दुर्दैवाचे बळी ठरले असणार! रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरे आणि दुकाने उभी होती. रस्ते प्रशस्त होते. विविध प्रकारची धान्ये पिकवण्यासाठी तिथली जमीन भरपूर सुपीक होती. व्हेसुवियस पर्वताच्या भोवतालीसुद्धा शेती पसरलेली होती. पाणीपुरवठा मुबलक होता. इटलीत आज अस्तित्वात असलेल्या द्राक्षांच्या मळ्यांप्रमाणे त्या काळातील लोकही लागवड करत होते. मद्यनिर्मिती हा तिथला मोठा व्यवसाय होता. भरपूर विहिरीही तिथे सापडल्या. फळे, भाजीपाला, डाळी मुबलक पिकत होत्या. भाजी-विक्रीसाठी मोठ्या मंड्यासुद्धा होत्या. थंड आणि गरम पेयांसाठी बार व उपहारगृहांचे अस्तित्व समोर आले. एक हॉटेल तर चक्क १०,००० चौ. फूट मोठे होते!

इ.स. ७९च्या आधी ६२ साली सुमारे पाच-सहा रिश्टर स्केलचा भूकंप पॉम्पेत झाला होता. ज्वालामुखीचा धोका मात्र शहरवासियांच्या ध्यानात आला नव्हता. पूर्वीच्या भूकंपात घरे, मंदिरे, पूल, रस्ते इत्यादी मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. ते सर्व पुन्हा उभारण्यात आले होते. काही वास्तू ७९पर्यंत तशाच पडक्या अवस्थेत उभ्या होत्या. बरेचसे नागरिक अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झाले होते.

ज्वालामुखीच्या अभ्यासकांना असे लक्षात आले होते की, राखेखाली गुदमरून लोकांना मृत्यू आला अशी आधीची समजूत होती, ती योग्य नसून त्या वेळच्या २५० अंश सेल्सिअस इतक्या प्रचंड उष्णतेमुळे लोक क्षणार्धात गतप्राण झाले. ज्यांनी इमारतींचा आश्रय घेतला होता, तेही त्यातून सुटले नाहीत. राखेचा पंधरा-वीस फुटांचा थर हा त्यानंतर रचला गेला. बचावलेल्या प्लिनीच्या लेखनातून त्या काळातील ‘आँखो देखा हाल’ आपल्याला कळतो.

उद्रेकानंतर शहर जमिनीखाली गडप झाल्यावर पुढे शेकडो शतके ते विस्मरणात गेले. सन १५९८मध्ये, अडलेला ‘सानो’ नदीचा प्रवाह मार्गी लावण्यासाठी काही खोदकाम करण्यात आले. त्या वेळी प्राचीन भिंती आणि त्यावरील काही चित्रे उजेडात आली. फौंटाना नावाच्या आर्किटेक्टला बोलावण्यात आले. त्याने आणखी काही उत्खनन करून (आपल्या अजिंठ्याप्रमाणे) नवीन भित्तीचित्रे शोधून काढली. तो शोध तिथेच थांबला. ती चित्रे उत्तान असल्यामुळे सामान्य जनतेपासून दूर ठेवण्यात आली.

१७४८ मध्ये एका स्पॅनिश इंजिनिअरच्या अधिपत्याखाली पॉम्पेचे खऱ्या अर्थाने उत्खनन सुरू झाले. त्यात ज्वालामुखीच्या घळी प्रकट झाल्या. मृतांच्या पोकळीच्या जागी प्लॅस्टर भरण्यात आले. अजूनही तशीच पद्धत चालू आहे. परंतु प्लॅस्टरऐवजी रेझिनचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मानवी हाडांना धक्का न पोहचता त्यांचा अभ्यास करता येतो. उत्खननात मिळालेल्या असंख्य वस्तू नेपल्स शहरातील ‘नॅशनल आर्किऑलॉजिकल म्युझियम’मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत.

गेली २५० वर्षे पॉम्पे हे जगातील एक सुप्रसिद्ध प्रवासी स्थळ म्हणून गणले जाते. दर वर्षी सुमारे २५ लाख लोक तिथे भेट देतात. १९९७मध्ये युनेस्कोने त्याला ‘वर्ल्ड हेरिटज’चा दर्जा दिला आहे. प्राचीन अवशेषांना इजा पोहचू नये, म्हणून खास काळजी घेण्यात येते. हॉटेल्स, गाईड्स, गाड्या/बसेस इत्यादींना भरपूर आर्थिक प्राप्तीच्या संधी तिथे मिळत असतात. शहराच्या अर्थकारणातील तो एक महत्त्वाचा भाग आहे.

‘पॉम्पे’ या नावाने २०१४ मध्ये एक चित्रपट बनवला आहे. दूरदर्शनवर तो बऱ्याच वेळा दाखवला जातो.

अनेक शतके जमिनीखाली गाडले गेलेले पॉम्पे शहर नाश न होता सुरक्षित राहिले. उत्खननानंतर ते उजेडात आले आणि वस्तू-वास्तूंवर परिणाम होण्यास सुरुवात झाली. जग आणि पुरातत्त्वज्ञांसमोर हे मोठेच आव्हान होते आणि आहे. आवश्यक त्या प्रक्रिया करून, आहे त्या जागी आणि संग्रहालयात त्याचे जतन करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी होणारा आणि अजूनही लागणारा खर्च अवाढव्य आहे. सुमारे ३५ कोटी डॉलर्सची पॉम्पेच्या रक्षणासाठी आवश्यकता आहे.

पॉम्पेच्या महाअरिष्टाचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास पुढील गोष्टी लक्षात येतात.

पॉम्पेच्या लोकांना व्हेसुवियस हा ज्वालामुखी होता याची कल्पना नव्हती. इ.स. ७९च्या आधी किमान १८०० वर्षे त्याचा उद्रेक झालेला नव्हता. जेव्हा तो पर्वत राख आणि लाव्हा ओकू लागला, तेव्हा पहिल्या काही मिनिटातच २००० लोक मृत्युमुखी पडले. बाकीचे उष्णतेने आणि राखेखाली गाडले गेल्याने नष्ट झाले. २४ ऑगस्टच्या दुपारी ही दुर्घटना घडली.

ते शहर शेती आणि उद्योगधंद्यांमुळे भरभराटीला आलेले होते. तिथली जमीन अत्यंत सुपीक होती. बाहेरच्या देशांशी उत्तम व्यापार चालत होता.

१७४८मध्ये तिसऱ्या चार्लस् राजासाठी राजवाडा बांधताना प्राचीन पॉम्पे अचानक उजेडात आले. सन ७९पर्यंत ज्वालामुखी हा शब्द लोकांना ज्ञात नव्हता. ‘व्हल्कन’ या (ज्वाला आणि धातूंच्या) रोमन देवतेवरून ‘व्होल्कॅनो’ हा शब्द प्रचलित झाला.

व्हेसुवियस अंदाजे १७००० वर्षे प्राचीन आहे आणि आजपावेतो ५० वेळा त्याचा उद्रेक झालेला आहे. या पर्वतावर उद्रेकाची दोन वेगवेगळी मुखे आहेत. एक जुने आणि एक ७९मधील. पर्वताची उंची सुमारे १३०० मीटर्स (४३०० फूट) आहे.

उद्रेकानंतर बाहेर पडणारा लाव्हा ताशी ७२५ कि.मी. वेगाने वाहत जातो. त्याचे तापमान १००० सेल्सियसपर्यंत असू शकते. ७९मध्ये दर सेकंदाला १५ लाख टन लाव्हारस बाहेर पडत होता. २४ तास अखंड त्याचा प्रवाह चालू होता. व्हेसुवियस हा युरोपातील एकमेव ‘जिवंत’ आणि जगातील सर्वांत धोकादायक ज्वालामुखी मानला जातो. १८व्या शतकात त्याचा सहा वेळा आणि १९व्या शतकात आठ वेळा उद्रेक झाला. १९४४नंतर अद्याप त्याचा उद्रेक झालेला नाही.

पॉम्पेत मिळालेले अॅम्फी थिएटर हे सर्वांत प्राचीन (इ.स.पू. ८०मध्ये तयार झालेले) दगडी बांधकाम आहे. तिथे ५०००ची आसनव्यवस्था होती. त्या शहराचा दुर्घटनेत इतका विध्वंस झाला (१५-२० फूट ते जमिनीखाली गाडले गेले) की, त्यामुळे पुन्हा तिथे वस्ती करण्याचा विचार कोणाच्याच मनात उद्भवला नाही. पुढे ते विस्मरणात गेले. अधूनमधून काही प्रमाणात तिथल्या संपत्तीची लुटालूट झाली; पण ती एकूण व्याप्तीच्या मानाने अत्यल्प होती.

व्हेसुवियसच्या आजुबाजूला सध्या ३० लाखांहून अधिक लोक (धोक्याची परिस्थिती असूनही) राहतात. जगात अन्यत्र कुठल्याही ज्वालामुखीजवळ इतकी वस्ती नाही. संरक्षक भिंतीच्या आतील १५० एकरांवर झालेले पॉम्पेचे उत्खनन हे जगातील सर्वांत मोठे पुरातत्त्वज्ञांचे कार्य आहे.

पॉम्पेच्या उपनगरांतील काही घरे इ.स.पू. ३०० एवढी प्राचीन आहेत; म्हणजे ७९मध्ये उद्रेक झाला, त्या वेळी आजच्या अमेरिकेपेक्षा तिथली घरे जुनी होती.

आजच्या पाश्चात्त्य जगात खाजगी आणि सार्वजनिक जीवनाबद्दल ज्या कल्पना आहेत, त्यापेक्षा पॉम्पेच्या रोमन लोकांच्या संकल्पना फार वेगळ्या होत्या. लैंगिक चित्रण, आज जे आक्षेपार्ह मानले जाते आणि झाकले जाते, ते त्या काळी अत्यंत उघड दिसून येत होते. खाजगी जीवनातील अन्य गोष्टींसुद्धा गुप्त ठेवण्याची पद्धत त्या काळी नव्हती.

आदर्श रोमन घराची रचना त्या काळी अशी असायची. उत्खननामधून त्यावर प्रकाश पडतो. घराच्या बहुतेक भागांत सर्वांना मुक्त प्रवेश असायचा. रस्त्यावरूनच पुढच्या विभागात जाता येई. तिथे व्यापारी उलाढाल चाले. बहुतेक ठिकाणी पावसाचे पाणी साठवून ठेवलेला छोटा तलाव असे. मधला खूप मोठा भाग (छताशिवाय) उघडा असे. वर थेट आकाश! अन्य मोठा भाग म्हणजे प्रशस्त बाग. तीही बहुतेक ठिकाणी लोकांसाठी खुली असे. याला विरोधाभास म्हणजे तिथली शयनगृहे त्या मानाने लहान आणि खिडक्याविरहीत असत. साधारणपणे इमारती दोन मजली असत, काही तीन मजलीसुद्धा.

शहराच्या भोवतालच्या भागातही भरपूर लोकवस्ती होती. तिथे शेकडो शेतजमिनी आणि हवेल्या होत्या. सुमारे ३-४ हजार गुलाम शहरात राबत होते. त्या काळातली ती प्रथाच होती. त्यांच्या राहण्याची व्यवस्था गावाबाहेर होती. काही जण श्रीमंत धन्यांच्या घरातच राहत. समुद्रकिनारा हे पर्यटकांच्या विहाराचे लोकप्रिय स्थळ होते. रोमन सम्राट नीरो (राज्यकाल इ.स. ५४ ते ६८) याचा महाल शहराबाहेर बांधलेला होता, असे म्हणतात. पॉम्पेची एक सुकन्या पोपाए सबिना त्याची सम्राज्ञी होती.

जनतेच्या खाण्यापिण्याची चंगळ होती. गहू, डाळी, मासे, सुकामेवा, विविध फळे, कांदा-कोबीसारख्या भाज्या, अनेक प्राण्यांचे मांस यांचा भरपूर वापर होत असे. अर्थात त्यातले काही पदार्थ फक्त श्रीमंतांनाच परवडत हे स्पष्ट आहे. एकंदरीत सगळा समाज अत्यंत समृद्ध होता.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

शहराभोवतीच्या भिंतीमध्ये अनेक कमानी आणि दरवाजे होते. सुरक्षा व्यवस्था चोख होती. पादचारी आणि वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग होते. रस्ते प्रशस्त होते. त्यांना क्रमांक किंवा नाव देण्याची पद्धत मात्र नव्हती. काही काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक असावी, असा पुरावा आढळतो. विविध प्रकारच्या उद्देशांसाठी हजारो इमारती तिथे उभ्या होत्या. मोठ्या हवेल्या, दुकाने, मंदिरे, खेळाची मैदाने, उपहारगृहे, मंडया, सार्वजनिक स्नानगृहे, चोर किंवा गुलामांची जंगली प्राण्यांबरोबर झुंज लावण्यासाठी प्रेक्षागृहे, शाळा, पाणीपुरवठ्याची केंद्रे, बागा आणि नाट्यगृहे - एक ना अनेक!

जुन्या आणि नव्या देवतांची प्रार्थनास्थळे आणि कारंजीसुद्धा होती. आधुनिक शहरामध्ये ज्या सर्व सुखसोयी आवश्यक असतात, त्या त्या तिथे उपलब्ध होत्या. भिंतीवर आणि जमिनीवरसुद्धा पौराणिक/ऐतिहासिक प्रसंग चितारलेले असत. उच्चभ्रू लोकांच्या निवासस्थानी बाहेर बागेत जेवणासाठी - खास करून पाहुण्यांसाठी - उत्तम व्यवस्था असे. गुलामांसाठी मात्र कोंदट, तुरुंगाप्रमाणे बंदिस्त आणि अन्याय्य व्यवस्था असे.

ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तेव्हा धूर आणि वाळू-दगडांचा मोठा ढग आकाशात सुमारे ४० किलोमीटर उंच उसळला. १९४५मध्ये हिरोशिमावर जो बॉम्ब टाकण्यात आला, त्यापेक्षा त्या वेळच्या स्फोटाची क्षमता एक लाख पट मोठी होती. लोकांना बचावासाठी पळून जाण्याची जागाच कुठे उरली नाही. अल्पावधीत सर्व शहर भूमीने ‘स्वाहा’ केले. दुपारनंतर पुन्हा दुसरा स्फोट झाला आणि आधीपेक्षा उंच दगड-राखेच्या ज्वाळा उंचावल्या. या वेळी फेकल्या जाणाऱ्या धोंड्यांचे आकार इतके मोठे होते की, त्यांच्या माऱ्याने इमारती धडाधड कोसळू लागल्या. आपले प्रियजन आणि मौल्यवान वस्तूंच्या रक्षणाची कोणतीच संधी लोकांना मिळाली नाही. रात्री ११ वाजता पुन्हा तप्त राख आणि हवेचा मारा शहरावर झाला, आणि होते नव्हते ते सगळे बेचिराख झाले. एकेकाळचे ज्वलंत, उत्साही शहर हा हा म्हणता पृथ्वीच्या चेहऱ्यावरून अदृश्य झाले, विस्मृतीच्या गर्तेत जाऊन पडले; आणि १८व्या शतकातील उत्खननानंतर ते पुन्हा ‘प्रकट’ झाले!

‘रमणीय पुरातत्त्व’ – रवींद्र गुर्जर | मिहाना पब्लिकेशन्स, पुणे | पाने – ७६ | मूल्य - १५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......