‘कुरबॅश आणि इतर कविता’ : हा कवितासंग्रह म्हणजे माझं आत्मचरित्र नव्हे, पण ‘आत्मिक चरित्र’ नक्कीच आहे!
ग्रंथनामा - झलक
राजा दीक्षित
  • ‘कुरबॅश आणि इतर कविता’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Sun , 13 July 2025
  • ग्रंथनामा झलक कुरबॅश आणि इतर कविता राजा दीक्षित

प्रसिद्ध इतिहासलेखक डॉ. राजा दीक्षित यांचा ‘कुरबॅश आणि इतर कविता’ हा पहिलावहिला कवितासंग्रह नुकताच संवेदना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या संग्रहाला त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

ज्ञानोबांनी म्हणून ठेवलंय की, ‘वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेवीण...’. कवी आणि रसिक यांनासुद्धा हेच लागू आहे, असं मला वाटतं. म्हणून वर्षानुवर्षं वहीत बंद राहिलेली ही कविता तुमच्या हाती देतोय. तुम्हाला ती भावण्यावर माझं कवी असणं जगापुढे सिद्ध होणार आहे.

खरं तर आपला कवितासंग्रह वगैरे प्रकाशित होईल, हे माझ्या डोक्यातही नव्हतं. किंबहुना मी स्वत:च त्या बाबतीत फार उदासीन होतो. नाही झाला कवितासंग्रह प्रकाशित म्हणून साहित्यसृष्टीचं काय नुकसान होणार आहे आणि झाला प्रकाशित म्हणून तरी साहित्यसृष्टीत अशी काय मोलाची भर पडणार आहे, असं मनात यायचं.

मी आत्मचरित्र लिहीन असे वाटत नाही. नुकतीच सत्तरी पूर्ण झालीय. त्यामुळे यानंतर पुन्हा कवितासंग्रह निघेल अशीही शक्यता वाटत नाही. म्हणून हे एक ‘काव्यात्मकथन’ सादर करतोय. अशी कथने साहित्यिक-सांस्कृतिक इतिहासासाठी मोलाची असतात! म्हणूनच लोककवी मनमोहन यांचे शब्द वापरून मी म्हणतो, ‘या नदीला घाट छोटा बांधुनी मी चाललो...’ या घाटावर तुम्ही जरा विसावताय, तर म्हटलं की, जरा अघळपघळ गप्पा मारू तुमच्याशी. म्हणून हा ‘संवाद’.

काव्य हे कवीचं आत्मचरित्र असतं, असं काही वेळा म्हटलं जातं. त्यात थोडा बदल करून मी म्हणेन, की हा संग्रह म्हणजे माझं आत्मचरित्र नव्हे, पण ‘आत्मिक चरित्र’ नक्कीच आहे.

 

महाविद्यालयीन जीवनापासूनचा सुमारे दोन-अडीच दशकांचा काळ हा माझ्या कवितेच्या बहराचा मुख्य कालखंड. पेरुगेट भावे स्कूल ही माझी शाळा चांगली होती. पण मी ‘अ’ तुकडीतला असलो, तरी पहिल्या पाचांत नसायचो. त्यामुळे संस्कृत नाट्यवाचनासारखा एखादा निराश्रित उपक्रम वगळता सांस्कृतिक-साहित्यिक उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये मी फारसा नसायचो. तशी संधी मिळत नव्हती. घरातले वातावरण मात्र साहित्यिक आवडीला पूरक होते. वडील साहित्यिक होते. कारकून म्हणून का होईना, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’त नोकरीला होते. ‘मिलिटरी अकाउंट्स’मधली जरा बऱ्या पगाराची कारकुनी सोडून, ज्यांच्याकडे लेखनिक म्हणून जायचे त्या श्री. म. तथा बापूसाहेब माटे यांचे बोट धरून, ते परिषदेच्या कारकुनीत शिरले. त्यांच्या नगण्य पगारामुळे घरी दारिद्र्य. पण आमच्या घरी साहित्यिकांची ये-जा असे. विकत नव्हे, पण वाचायला आणलेली किंवा भेट मिळालेली पुस्तके असायची. त्यामुळे ‘गवयाचं पोर रडलं तरी सुरात रडतं’ तैशी आमची साहित्यिक स्थिती! वडील साहित्यक्षेत्रात असले, तरी साहित्याची, भाषणांची माझी आवड खरी जोपासली ती आईनेच. माझ्या कवी असण्याचे मूळ श्रेय वडिलांपेक्षा आईलाच. म्हणजे ‘म.श्री.’पेक्षा विमल गोखले तथा प्रतिभा दीक्षित हिलाच. माझ्या साहित्यिक घडणीत आणखी एक मोठा वाटा होता तो माझ्या एस्.पी. कॉलेजचा. ‘भाऊ कॉलेज’ म्हणून हिणवले जाणाऱ्या या कॉलेजमध्ये मला विविध जातींचे मित्र मिळाले आणि मूळचा समावेशक असणारा माझा स्वभाव त्या वळणाने अधिकच पुढे गेला.

 

मी राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना यांच्यापासून कायमच अलिप्त राहिलो, पण इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीच्या काळात मनाला भयानक अस्वस्थता आली आणि पुण्यातल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या सत्याग्रहाचे नेतृत्व करून मी ११ डिसेंबर १९७५ ते २४ जानेवारी १९७६ असा दीड महिना अनुक्रमे येरवडा आणि विसापूरच्या तुरुंगात होतो. पुढे आणीबाणी हटली. इंदिराजींची सत्ता गेली. जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’च्या कल्पनेने प्रभावित जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. पण विविध विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बांधलेली ही मोट फुटली. त्या करंटेपणाच्या सत्रात चौधरी चरणसिंग पंतप्रधान झाले, तेव्हा मनाला फार यातना झाल्या. त्या मानसिक अवस्थेत लगेचच मला स्फुरलेली कविता ‘माणूस’ कार्यालयात नेऊन दिली. ती लगेचच्या अंकाच्या थेट मुखपृष्ठावर छापली. असे मोठे छान अनुभव तेव्हाचे!

 

१९७७मध्ये मी. एम.ए. झालो. आणीबाणीतला चळवळेपणा आणि अभ्यासाकडे केलेले दुर्लक्ष यांमुळे एम.ए. भाग एकची परीक्षा मला बुडवावी लागली. मग भाग दोनच्या एकाच वर्षात दोन्ही वर्षांचे सर्व पेपर एका दमात देऊन मी एम.ए. झालो. तेव्हाची एक गंमत अशी की, परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना अभ्यास सुरू केला. आशियाच्या इतिहासाच्या पेपरवरचं एक इंग्रजी गाईड वाचत होतो आणि तेही प्रथमच वाचत होतो. ऑटोमन साम्राज्यकाळात इजिप्तमध्ये शेतकऱ्यांचे शोषण होत होते, असा संदर्भ होता. महसूल आकारणीच्या वेळी हिप्पोपोटेमसच्या कातडीपासून बनवलेला चाबूक (Kurbash/Kourbash/कुरबॅश) वापरला जात असे. तो भाग मी वाचला आणि मन फार खंतावलं. माझं अभ्यासातलं लक्ष पार उडालं आणि ‘कुरबॅश’ ही कविता साकारली. १३ मे १९७७ रोजी केलेली ही शोषणावरची कविता माझी अतिशय आवडती कविता आहे.

एम.ए.चा माझा निकाल स्वाभाविकपणे डोळे दिपवणारा वगैरे नव्हता! पण माझ्या सर्व नोकऱ्या मला मुलाखतीतील कामगिरीवर, प्रकाशित लेखनावर आणि आत्मविश्वासाच्या बळावर मिळत गेलेल्या आहेत. पहिली नोकरी तरी त्याला अपवाद कशी असेल? ७.७.७७ अशा संस्मरणीय दिवशी फर्ग्युसन महाविद्यालयात माझी प्राध्यापकी सुरू झाली. मीनलशी नोंदणी पद्धतीने आणि साधेपणाने विवाहबद्ध झालो. वर्षभराने बाप झालो. या धामधुमीत माझ्यापासून कविता मात्र दुरावत गेली. कवी म्हणून मी मंदावलो! सगळ्यांचे असे होत असेल असे नाही; पण माझे मात्र झाले खरे!

बालपणीचं दारिद्र्य आणि न्यूनगंड पार्श्वभूमीवर अनेक अडचणींना तोंड देत, सततच्या अस्थिरतेचा सामना करत, कधी अपमान वा उपेक्षा पचवत, कामाचा प्रचंड ताण आणि मनाचेही विविध प्रकारचे ताण सोसत माझी पुढची वाटचाल झाली. पण यशाचा आलेख मात्र चढता राहिला. पद, पैसा, पुरस्कार वगैरे गोष्टींच्या अतिरेकी मोहापासून मी सदैव दूर राहिलो; पण या गोष्टी माझ्याकडे चालत येत गेल्या. यश मिळत गेलं, तसा न्यूनगंड विरत गेला. अस्थिरतेचा बाऊ न करता अखंड कर्मयोग चालू ठेवला, म्हणून साफल्याची अमृतसिद्धी झाली. पण या प्रवासातली होरपळ कवितेत उतरली आणि खरं तर कवितासुद्धा दीर्घकाळ होरपळली. या मोठ्या कालखंडात कवितेसोबतचा दुरावा कधी कधी असह्य होत असे. तुकोबांचा शब्दप्रयोग वापरायचा, तर मी कवितेसाठी ‘तृषाक्रांत’ झालो होतो.

‘कवितेवाचून झालो होतो

सुनासुना मी

आणि होते ब्रह्म खवळले अणुरेणूंतून’

अशी अवस्था होती!

पण एक आहे. कवितेबाबत असा भळाळ असला, तरी माझ्या गद्यलेखनाला असणारा काव्यात्मतेचा स्पर्श हा जणू उ:शापच होता. हा काव्यात्मतेचा स्पर्श म्हणजे बहुधा माझे शैलीवैशिष्ट्य असावे. अगदी ‘प्रार्थना समाजाचा इतिहास’ यासारख्या भल्याथोरल्या ग्रंथाचं संपादन करताना त्यातील माझ्या संपादनाला आणि पूरक लेखनालासुद्धा हा काव्यात्मतेचा स्पर्श असल्याचे बारकाईने वाचणाऱ्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही.

 

सर्व जबाबदाऱ्या नेकीने आणि आनंदाने पार पाडून मी आता अशा सर्व सार्वजनिक जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त झालो आहे. गंमत पाहा, ही मुक्तता झाल्यावर कविता माझ्या मनावर पुन्हा धडका मारू लागली आणि या संग्रहाच्या निमित्ताने मी तिचे गळामिठी मारून स्वागत करत आहे.

१९८७-८८पासून २०२४-२५पर्यंत मी कविता करण्याचे सरासरी प्रमाण इतके मंदावले होते की, साधारणतः वर्षाला शून्य ते दोन या घरात माझी कवितांची निर्मिती होती. अर्थात याला मी ‘भाकड काळ’ मात्र म्हणणार नाही. कारण संख्येने कमी असलेल्या या कविता गुणवत्तेने वाईट म्हणता येणार नाहीत, अशी माझी समजूत आहे.

मी केलेल्या सर्वच कविता या संग्रहात घेतलेल्या नाहीत. मला ज्या टाकाऊ वाटल्या, त्या वगळून मी स्वतः या कवितांची निवड केली. कधी नव्हे तो कवितासंग्रह येतोय म्हटल्यावर काही कविता जरा मोहाने घेतल्या आहेत. सर्वांनाच त्या आवडतील असे नाही. ज्या क्रमाने कविता केलेल्या होत्या, तो क्रम या संग्रहात अनुसरलेला नाही. संग्रहातला क्रम मी विचारपूर्वक ठरवलेला आहे. मात्र प्रत्येक कवितेखाली तारीख दिलेली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

संवादाचा आरंभ मी संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांनी केला. आता समारोप संत तुकारामांच्या शब्दांनी करणार आहे. एरवी केशवसुतांच्या ‘आम्ही कोण?’चा मला कोण अभिमान; पण ज्ञानोबा-तुकोबा यांची काव्यसंपदा समोर असली की, मात्र ‘यांच्यापुढे आम्ही कोण?’ अशी विनम्र जाणीव जागृत होते. जिथे लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ‘गीतारहस्या’ची सुरुवात-

‘संतांची उच्छिष्टे बोलतों उत्तरें ।

काय म्यां पामरें जाणावें हें ॥’

या तुकोबांच्या शब्दांनी केली, तिथे आम्ही तर काय बोलावे? म्हणून ज्ञानोबा-तुकोबांना वंदन करून तुकोबांच्या शब्दांनीच या संवादाचा विराम करतो,

“विस्तारी सांगतां बहुत प्रकार ।

होईल उशीर आता पुरे ।।”

‘कुरबॅश आणि इतर कविता’ – राजा दीक्षित | संवेदना प्रकाशन, पुणे | पाने – १४४ | मूल्य – २२५ रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......