ब्रिट यांनी जे लिहिले, ते एका दशकानंतर भारतातील कडव्या राष्ट्रवादाच्या, फॅसिझमच्या धर्माच्या कोंदणातील अवताराला इतके तंतोतंत लागू पडेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल!
ग्रंथनामा - झलक
श्रीमंत माने
  • ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 February 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक भक्ती-भीती-भास Bhakti-Bheeti-Bhas श्रीमंत माने Shreemant Mane

ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीमंत माने यांचं ‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

लॉरेन्स विल्यम ब्रिट या अमेरिकन अभ्यासकाचा ‘फॅसिझम एनीवन?’ या मथळ्याचा लेख १५ जुलै २००३ रोजी ‘फ्री इन्क्वायरी’ मासिकाच्या २२ व्या अंकाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित झाला. भारतात त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर होते. नरेंद्र मोदी हे नाव गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नुकतेच राजकारणाच्या प्रादेशिक क्षितिजावर पुढे आले होते. ते भविष्यात पंतप्रधान बनतील, असे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते; परंतु त्या वेळी ब्रिट यांनी जे लिहिले ते एका दशकानंतर भारतातील कडव्या राष्ट्रवादाच्या, फॅसिझमच्या धर्माच्या कोंदणातील अवताराला इतके तंतोतंत लागू पडेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल.

फॅसिस्ट किंवा प्रोटोफॅसिस्ट म्हणजे त्यासारख्या भासणाऱ्या जगभरातील किमान सात राजवटींची उदाहरणे यासाठी श्री. ब्रिट यांनी वापरली. नाझी जर्मनी, फॅसिस्ट इटली, फ्रान्कोसचे स्पेन, अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार पोर्तुगाल, पापाडोपॉलसचे ग्रीस, पिनोचेटचे चिली आणि सुहार्तोची इंडोनेशिया या त्या सात राजवटी. त्या त्या कालखंडात या राजवटी सर्वशक्तिमान वाटल्या असल्या, तरी एकविसाव्या शतकात यांपैकी एकही देश अगदी अपवाद म्हणूनदेखील जगाच्या मंचावर महासत्ता, महाशक्ती किंवा महाविचार म्हणून समोर आला नाही, येत नाही. ही एकच बाब त्या सत्ताधाऱ्यांच्या मूल्यांकनासाठी पुरेशी ठरावी. हुकूमशहा महासत्तांची उभारणी करू शकत नाही व हाच त्या राजवटींचा अंतिम निष्कर्षही मानायला हरकत नाही.

२० व्या शतकाच्या पूर्वार्धात जवळपास अडीच दशके ज्या विचारधारेने जग वेठीस धरले, त्या फॅसिझमची, त्याच्या ज्या सर्वसाधारण व सामाईक चौदा लक्षणांची लॉरेन्स ब्रिट नावाच्या अभ्यासकाने चर्चा केली, क्रमाने जी जगासमोर मांडली, त्या लक्षणांचा विचार भारतीय संदर्भाने, त्या परिप्रेक्ष्यातून करायला हरकत नसावी.

१. सातत्याने राष्ट्रीयत्वाचे आक्रमक प्रदर्शन

एखाद्या सेनाधिकार्‍याने त्याच्या देशरक्षणात्मक बांधिलकीचे, व्यवसायाचे किंवा प्रतिष्ठेचे, अभिमानाचे प्रदर्शन करावे, अशा पद्धतीने सत्ताधारी सर्वोच्च नेता व त्याच्या सामान्य समर्थकांनी सतत आक्रमक पद्धतीने राष्ट्रीयत्वाची ध्वजासारखी चिन्हे छातीवर ठळकपणे मिरवणे, त्यातून सतत जाहीरपणे देशप्रेम प्रदर्शित करणे. अशा राजवटीतील प्रत्येक नागरिक स्वत:ला देशरक्षणाच्या कार्यातील शिपाई असल्याचे दाखवू लागतो आणि त्यांच्या सामाजिक, वैचारिक, राजकीय विरोधकांकडूनही तशीच अपेक्षा ठेवतो. असे करताना दरवेळी विदेशी संस्कृती, समाज, लोक अथवा त्यांच्या संस्कृतीचे प्रतीक वाटेल अशा प्रत्येक गोष्टीबद्दल तिरस्कार बाळगतो, इतरांमध्येही तिरस्कार, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतो.

२. मानवी हक्कांबद्दल बेफिकिरी

अशा राजवटी सामान्य जनतेच्या, विशेषत: त्यातील दुबळ्या समाजघटकांच्या मूलभूत मानवी हक्कांबद्दल, त्यांच्या जीविताबद्दल व उपजीविकेच्या साधनांबद्दल बेफिकीर असतात किंवा भारतासारख्या बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुभाषिक समाजाचा विचार करता मानवी मूल्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. असे करताना प्रचारसाधनांचा व प्रचारतंत्रांचा अत्यंत सुनियोजित वापर केला जातो, जेणेकरून अशा ‘नाही रे’ वर्गातील प्रश्न ऐरणीवर येणार नाहीत, त्याबद्दल फारशी चर्चा होणार नाही. एखादवेळेस असे मानवी प्रश्न चव्हाट्यावर आलेच किंवा त्याबद्दल व्यापक चर्चा व्हायला लागली, समवेदना प्रकट होऊ लागल्या, समदु:खी लोक हळहळ व्यक्त करू लागले, तर भ्रम निर्माण करणारी माहिती समोर आणून, त्या प्रश्‍नांपेक्षा देशापुढील इतर प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करून किंवा तपशिलांवरच नको तितकी चर्चा करून मुळात ती सामान्यांची समस्याच कशी नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.

३. विशिष्ट शत्रू आणि झुंडी जमा करण्यासाठी त्या शत्रूचा वापर

वर उल्लेख केलेल्या सातही राजवटींमधील ठळक समान सूत्र कोणते असेल, तर ते सत्ताधार्‍यांनी स्वत:च्या चुका लपविण्यासाठी शोधलेले बळीचे बकरे किंवा खऱ्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी शोधलेला सामाईक बाह्य शत्रू. आपल्या कारभारातील चुका, चुकलेल्या दिशा किंवा लोकांमधील नैराश्य व संतापाला वाट करून देण्यासाठी शक्यतो प्रचारतंत्राचा सुनियोजित वापर करून असा शत्रू शोधला जातो. त्या संदर्भातील चुकीच्या माहितीचा, आपल्या देशाविरुद्ध षड्यंत्र आखल्याच्या कथित, निराधार गोष्टींचा जोरदार प्रचार केला जातो. अशा शत्रूंच्या मर्मावर, त्यांच्या शक्तिस्थळांवर हल्ले करण्याची भावना सतत चेतवत ठेवली जाते. बहुतेक वेळा हे शत्रू कम्युनिस्ट, समाजवादी, उदारमतवादी, वांशिक, धार्मिक किंवा ज्यूंसारखे अल्पसंख्याक असतात. एखाद्या देशाचे परंपरागत शत्रू, धर्माधर्मांमधील शत्रू, धर्मनिरपेक्ष व्यक्ती, समलैंगिक किंवा शांतताप्रिय व्यक्ती असतात. असे लोक देशाचे शत्रू, दहशतवादी, वगैरे ठरवले जातात आणि त्यांना सर्वशक्तिनिशी निपटून काढले पाहिजे अशा स्वरूपाची जनभावना तयार केली जाते.

४. लष्करी प्रभाव व उग्र लष्करी आविर्भाव

फॅसिझम विचारांच्या राजवटी एकतर कडव्या लष्करी शिस्तीचा आग्रह धरणाऱ्या, तिच्या आवश्यकतेचा प्रचार करणाऱ्या, अशी शिस्त हीच देशसेवा मानणार्‍या आणि सतत सैन्याबद्दल, सैनिकांच्या शौर्याबद्दल, आक्रमणे-प्रतिआक्रमणे यांबद्दल जाहीर चर्चा घडवणाऱ्या असतात. नागरी सोयी-सुविधांवर अधिक खर्च करण्याची नितांत आवश्यकता असतानाही संरक्षणसामग्री व लष्करी दलांवर प्रमाणापेक्षा अधिक खर्च केला जातो. लष्करी शिस्तीचे व आविर्भावाचे प्रदर्शन हे राष्ट्रीयत्वाचे, देशप्रेमाचे व देशसेवेचे लक्षण मानले जाते. कोणत्याही राष्ट्रीय उपक्रमाचे ईप्सित गाठताना, अन्य देशांना ललकारताना किंवा सत्ताप्राप्तीसाठी, सामाजिक व राजकीय प्रभावासाठी या लष्करी बाण्याचा वापर केला जातो.

५. लिंगभेदाची खोलवर मानसिकता

जगभरातील सारे राजकीय प्रवाह आणि देशादेशांच्या संस्कृती अजूनही प्रचंड पुरुषसत्ताक असल्यामुळे लिंगभेद दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न आवश्यक आहेत. तरीही या राजवटी स्त्रियांना दुय्यम स्थान देतात. त्यांच्या असण्याने, त्यांना द्यावयाच्या न्याय्य अशा समान वागणुकीने समाजावर कसले तरी आरिष्ट कोसळणार आहे, असा भ्रम पसरवीत असतात. स्त्रियांना माणूस म्हणून त्यांचे मूलभूत मानवी हक्क देण्यामुळे देश संकटात येईल, असा प्रचार केला जातो. त्यासाठी धार्मिक किंवा श्रद्धांचे आधार शोधले जातात. परंपरा, चालीरीती, रूढी-रिवाज यांचा आधार घेतला जातो.

६. माध्यमांवर नियंत्रण व त्यांचा वापर

सामान्य नागरिकांना घटना-घडामोडींची माहिती व जनमत तयार करण्याचे मुख्य साधन असलेली जनमाध्यमे म्हणजेच, ‘मास-मीडिया’वरील नियंत्रण हे फॅसिस्ट अथवा प्रोटोफॅसिस्ट राजवटींचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. अशी माध्यमे सत्ताधार्‍यांचीच री ओढत राहतील, त्यांच्या भूमिकांना छेद देणार नाहीत, यावर पाळत ठेवली जाते. सरकारी दफ्तरांमधील माहितीचे तपशील, माध्यम संस्थांचे आर्थिक व्यवहार, यांवर नियंत्रण ठेवले जाते. अशी नियंत्रित माध्यमे सतत देशभक्तीवजा चर्चा घडवत राहतील आणि ज्यांच्या देशभक्तीबद्दल संशय व्यक्त केला आहे अशांना सत्ताधार्‍यांची भीती दाखवत राहतील, याची काळजी घेतली जाते. माध्यम संस्थांचे मालक किंवा चालक सत्तावर्तुळात वावरत असतात किंवा सत्तेचे भागीदार बनतात. परिणाम हा होतो, की राजवटींचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी, अधिक-उणे शोधण्यासाठी योग्य ती माहिती जनसामान्यांपर्यंत पोचत नाही.

७. राष्ट्रीय सुरक्षेचा उन्माद

राष्ट्रीय सुरक्षा ही स्वाभाविकपणे सत्ताकेंद्राच्या अखत्यारीत असते. अशा वेळी सुरक्षेच्या नावाखाली विरोधकांची मुस्कटदाबी, दडपशाही, गोपनीयता व अनिर्बंध कृती या मार्गांनी सत्तावर्तुळ व त्यांच्या समर्थकांमध्ये सतत उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न फॅसिस्ट राजवटी करतात. बाकी काहीही सहन करू, पण ‘देशाच्या सुरक्षेशी, भवितव्याशी खेळ खेळू देणार नाही’ असे म्हणत विरोधकांना लक्ष्य केले जाते. जनतेमधून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी उभारले जाणारे लढे देशद्रोह किंवा उठाव असल्याचे दाखवून ते चिरडण्याचा प्रयत्न केला जातो.

८. धर्मसत्ता व राजसत्तेची सरमिसळ

साऱ्या फॅसिस्ट किंवा प्रोटोफॅसिस्ट सत्तांवर त्यांच्या विरोधकांकडून धार्मिकतेचा आरोप केला जातो. त्याचे कारण हे, की अशा सत्ता त्या त्या देशातील प्रभावी, बहुसंख्याक धर्माच्या पुरस्कर्त्या व प्रचारक असतात. त्यासाठी स्वत:ला कडवे, अतिरेकी धर्मरक्षक म्हणवून घेण्यात सत्ताधाऱ्यांना अभिमान वाटतो. असे करताना एकूणच मानवी जीवनाशी जोडलेली त्या धर्माची मूलतत्त्वे आणि सर्वसमावेशक धर्मविचार यांचा विसर पडतो. प्रसार व प्रचार असा केला जातो की, जणू सत्ताधारीच खरे धर्मरक्षक व नास्तिकांचे कर्दनकाळ आहेत. सत्ताधारी मंडळी व त्यांच्या राजवटीला होणारा विरोध हा नेहमी धर्मावरील संकट असल्याचे बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो.

९. भांडवलदारांचे हितरक्षण

धर्म व श्रद्धांच्या नावावर सामान्य माणसाचे जगणे असे सत्ताधार्‍यांकडून कमालीचे नियंत्रित केले जात असताना भांडवलदारांना मात्र निरंकुश वातावरण उपलब्ध करून दिले जाते. त्यांच्याकडून संपत्तीची निर्मिती ही देश व धर्माच्या रक्षणासाठीच असल्याचे भासवले जाते. अशा भांडवलदारांनी संरक्षण उत्पादनांमध्ये अधिक रस घ्यावा, असे प्रयत्न केले जातात. खरेतर सगळ्याच देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात भांडवलदारीला आश्रय दिला जातो. फॅसिस्ट व्यवस्थेत बहुतेक वेळा युद्धांमधील पराभव आणि अन्य देशांवर सत्ता मिळविण्याची अभिलाषा या बेचक्यात अडकलेले देश भांडवलदारीचे कवच तयार करतात. लब्धप्रतिष्ठित भांडवलदारांना समाजाचे आदर्श म्हणून सतत प्रकाशझोतात ठेवले जाते, जेणेकरून सामान्यांचे आर्थिक स्वप्नरंजन जोरदार व्हावे आणि भांडवलदारांना सामाजिक मान्यता मिळावी.

१०. कामगारशक्तीचे दमन किंवा निर्दालन

कामगारांचे लढे, त्यांची शक्ती हे सामान्यपणे सत्ताधार्‍यांना आव्हान मानले जाते. सत्तावर्तुळात वावरणाऱ्या, सत्तेचा लाभ घेणाऱ्या भांडवलदारांसाठी ती मुख्य भीती असते. कामगार, कष्टकरी वर्ग सत्ता उलथवून टाकण्याची ताकद बाळगतात. त्यामुळे फॅसिस्ट राजवटींमध्ये जिथे धर्माचा, श्रद्धांचा, लष्करी शिस्तीचा, लष्करी उत्पादने निर्मिती करणाऱ्या भांडवलदारांचा बोलबाला असतो तिथे कष्टकऱ्यांचे हक्क नाकारले जातात, डावलले जातात. श्रमशक्तीचे दमन किंवा निर्दालन हे अशा राजवटींचे लक्षण असते. काही राजवटींमध्ये तर गरिबांना दुय्यम नागरिकाची वागणूक दिली जाते. मंदी किंवा बेरोजगारीचा सामना करता येत नसल्याने लोकशाहीदत्त संस्था खिळखिळ्या केल्या जातात.

११. बुद्धिवंत व कलावंतांचा तिरस्कार

नवनव्या संकल्पनांना जन्म देणारे, त्याद्वारे मानवी जीवन सुंदर बनवू पाहणारे विचारवंत, बुद्धिवादी, कलावंत - हे जणू फॅसिस्ट राजवटींचे शत्रू असतात. वैचारिक व शैक्षणिक स्वातंत्र्य हे राष्ट्रीय सुरक्षा आणि परपंरा, प्रथा व चालीरीतींच्या चौकटींना मोठा धोका असल्याची मांडणी केली जाते. आमच्या इतिहासात इतक्या समृद्ध परंपरा व विचारधारा आहेत की आता हे य:कश्चित नवे काय देणार, ‘हे असे कोण लागून गेले’ अशा भाषेत या नवोन्मेषी संकल्पकांची हेटाळणी केली जाते. शैक्षणिक संस्था, विशेषत: विद्यापीठे अशा राजवटींच्या कडक नियंत्रणात असतात. त्या संकुलांमधील विविधांगी विचार दडपले जातात, संबंधितांचा छळ केला जातो किंवा त्यांना निपटून काढले जाते. अपारंपरिक विचार किंवा अभिव्यक्तीवर जोरदार हल्ले चढविले जातात. ‘कला व साहित्यकृतीदेखील राष्ट्राचे हित साधणाऱ्या, देशप्रेमाला पूरकच असाव्यात, राष्ट्रवादाच्या परिघाबाहेर काहीच चालणार नाही’ असा आक्रमक विचार अमलात आणला जातो.

१२. गुन्हे व शिक्षांबाबत दुराग्रह

न्यायव्यवस्थेला मान्य असलेली दंडसंहिता व शिक्षांच्या सौम्य स्वरूपाबद्दल काही आक्षेप असणारे लोक सत्तास्थानी व समर्थकांमध्ये असल्याने कायदा हातात घेण्याचे, झुंडशाहीच्या रूपाने शिक्षा देण्याचे प्रकार फॅसिस्ट राजवटीत सररास घडतात. भीती, द्वेष हा या कायद्याच्या गैरवापरामागील हेतू असतो. विरोधकांचा आवाज दाबून टाकण्यासाठी पोलिसयंत्रणेचा अमर्याद व बेमुर्वत वापर होतो. सामान्य गुन्हे व राजकीय गुन्हे यांची सरमिसळ त्यासाठी हेतुपुरस्सर केली जाते.

१३. मैत्री-वर्तुळे व भ्रष्टाचार

व्यावसायिकांचा सत्तावर्तुळातील वावर वाढला की त्याचा वापर खासगी संपत्ती तयार करण्यासाठी, नफा मिळविण्यासाठी होतो. सत्ताधारी व श्रीमंतांची मैत्री भ्रष्टाचाराला जन्म देते, तो वाढविते. सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळातील व्यक्ती राष्ट्रीय मालकीच्या नैसर्गिक संसाधनांची लूट करतात. त्यातून प्रचंड पैसा कमावला जातो. या भ्रष्टाचाराला राष्ट्रीय सुरक्षेचे, गोपनीयतेचे कवच लाभल्याने आणि मुख्य प्रवाहातील माध्यमे नियंत्रित असल्याने आणि त्यांचा वापर सत्ताधाऱ्यांच्याच हितासाठी होत असल्याने, अशी भ्रष्टाचाराची प्रकरणे शक्यतो चव्हाट्यावर येत नाहीत, सामान्यांपर्यंत पोचतच नाहीत.

१४. निवडणुकांचे फार्स

फॅसिस्ट राजवटींमधील जनमताचे कौल, निवडणुकांचे निकाल फसवे असतात. त्यात पक्षपात असतो किंवा गोंधळ, गडबड केलेली असते. निवडणूक यंत्रणांचा गैरवापर, विरोधी मतांवर दबाव टाकणे, मतदान प्रक्रियेत गडबड-गोंधळ आणि याउपरही निकाल विरोधात जाताहेत असे दिसले तर न्यायव्यवस्थेकडून निकाल बदलण्याचे, रद्द करण्याचे प्रयत्न, या मार्गांनी सत्ता टिकवण्याचे प्रयत्न केले जातात.

थेट उत्तरे मिळतीलच असे नव्हे, पण कोणताही अभिनिवेश न बाळगता किमान काही प्रश्नांवर चर्चा व्हावी, लोकांनी त्या चर्चेतून त्यांचे निष्कर्ष काढावेत, हा प्रयत्न या लिखाणामागे आहे. ते प्रश्न आहेत, मुख्यत्वे- भारत हा देश नेमका काय आहे? बहुसांस्कृतिकतेचा राष्ट्रवाद जोपासणारा १३० कोटींहून अधिक लोकांचा समूह, की बहुसंख्याकांचे म्हणजे हिंदूंचे राष्ट्र? गेल्या दोन शतकांमध्ये आपला प्रवास नेमका कसा झाला आहे आणि आपण नेमके कोठे उभे आहोत? कोणत्या मुक्कामावर पोचणार आहोत? तो मुक्काम राज्यघटनेच्या वाटेने गेल्यानंतर सापडणार आहे की अन्य कोणत्या? जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे लोकशाही राष्ट्र, वेगाने उभारी घेणारी आर्थिक महासत्ता आणि त्याहीपेक्षा सांस्कृतिक, धार्मिक, जातीय, भाषिक अशा विविधता जोपासणारा देश - ही अन्य देशांच्या तुलनेत भारताची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. तरीही प्रश्न निर्माण होतो, अनेक जण तो विचारतात की, ७२ वर्षांपूर्वी देशाची फाळणीच मुळात धार्मिक आधारावर झाली असल्यामुळे भारतात उरलेले एकाच धर्माचे आहेत की पाकिस्तानची निर्मिती जरी मुस्लीम राष्ट्र म्हणून झाली असली तरी त्याआधीच्या बहुधार्मिक, बहुविध, बहुजातीय, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक अशा ‘ब्रिटिश इंडिया’सारखेच तुलनेने थोडे छोटे असे भारत हे राष्ट्र आहे? हे स्पष्ट आहे, की आपण इथवर सहजपणे आलेलो नाही. ही वाट खाचखळग्यांची, काट्याकुट्यांची होती. पावलोपावली अडथळे, संकटे होती. त्या संकटांचे स्वरूप काय होते आणि त्यावर मात करण्याच्या प्रवासात माणूस म्हणून भारतीयांच्या पीछेहाटीची, मागासलेपणाची कारणमीमांसा करणारे, भविष्याचे दिशादर्शन करणारे जे महापुरुष-महास्त्रिया भेटल्या, त्यांचा नेमका सांगावा तरी काय होता? प्रजासत्ताक महत्त्वाचे, की धर्म व जातींच्या आधारावर उभ्या राहिलेल्या, आपापले झेंडे नाचवीत ध्वजसत्ताक राबवू पाहणार्‍या झुंडी? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा; राजकीय प्रवासाबरोबरच सामाजिक सुधारणांचा आढावा घेण्याचा; त्याचप्रमाणे आरोग्य, शिक्षण व नोकरी, तसेच शेती या देशापुढील खऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न!

.............................................................................................................................................

‘भक्ती-भीती-भास : फॅसिझमच्या छायेतील भारताचे दर्शन’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5171/Bhakti-Bhiti-Bhas

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 25 February 2020

श्रीमंत माने,

वरील लेखात जगातल्या यच्चयावत दुर्गुणांचं एकत्र गाठोडं बांधून त्याला फासीवाद असं नाव दिलेलं आहे. कामगारांचे व स्त्रियांचे हक्क वगैरेंची लोढणी फासीवादासोबत का बांधली आहेत? बरं, फासीवाद म्हणजे नेमकं काय आहे आणि काय नाही यावर कसलीही चर्चा केलेली दिसंत नाही. लेखक लॉरेन्स विलियम ब्रिट याच्या हेतूंविषयी शंका येते.

ब्रिटने ७ राजवटींची चर्चा केली आहे. मग साम्यवादी सोव्हियेत राजवटीची का केली नाही? तिची लक्षणं वर उल्लेखलेल्या फासीवादी लक्षणांशी जुळतात ना? की, लेखकाला सोव्हियेत राजवटीतला रशियन राष्ट्रवाद आणि सरकारी साम्यवाद यांच्यातल्या नेमक्या संबंधांची चर्चा करायचीच नाहीये? उगीच भलतेसलते प्रश्नं उपस्थित व्हायला नकोत.

नाझी आणि सोव्हियेतांनी गळ्यात गळे घातले होते ना १९३९ साली? मग साम्यवादाचा समावेश फासीवादांत का केला जात नाही?

आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. आजून काय!

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......