आजोबांना (म. गांधींना) न्याय मिळवण्यासाठी शांतीपूर्ण मार्ग शोधावे लागले!
ग्रंथनामा - झलक
अरुण गांधी
  • ‘वारसा प्रेमाचा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 25 January 2019
  • ग्रंथनामा झलक वारसा प्रेमाचा Varsa Premacha अरुण गांधी Arun Gandhi महात्मा गांधी Mahatma Gandhi सोनाली नवांगुळ Sonali Navangul

महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी यांना वयाच्या सहाव्या वर्षी काही दिवस आणि वयाच्या बारा-तेराव्या वर्षी अठरा महिने आजोबांचा सहवास मिळाला. त्या काळात त्यांच्यावर आजोबांचा जो प्रभाव पडला, त्यावर आधारित त्यांनी २००३मध्ये ‘लिगसी ऑफ लव्ह’ हे इंग्रजी पुस्तक लिहिले. त्याचा मराठी अनुवाद ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने सोनाली नवांगुळ यांनी केला आहे. हा अनुवाद साधना प्रकाशनातर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

“ए हमालऽऽ चालता हो या बोगीतून!” चिरक्या आवाजात तो गोऱ्या कातडीचा माणूस जणू रागानं भुंकला.

“पण माझ्याकडं पहिल्या वर्गाचं तिकीट आहे. वैध आहे ते.” – गव्हाळ वर्णाच्या शिडशिडीत माणसानं संयमित स्वरात सांगितलं.

“असेल, पण तू इथून गेला नाहीस तर पोलिसांना बोलावेन मी!” तो गोरा ओरडला.

‘‘गरजेनुसार पोलिसांना बोलावण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण मी माझ्या बैठकीच्या जागी निवांत आहे!” कोणताही ताठा न दाखवता गव्हाळ वर्णाच्या माणसानं ठामपणानं प्रत्युत्तर दिलं.

गोरा माणूस चिडून तावातावानं कम्पार्टमेंटबाहेर गेला आणि काही क्षणात पोलीस व रेल्वे अधिकाऱ्याला सोबत घेऊन परतला. पुन्हा एकदा वर्णद्वेषी वक्तव्यांची आतषबाजी झाली आणि प्रक्षुब्ध झालेल्या तीन गौरवर्णियांनी एकजुटीने लहानखुऱ्या, गव्हाळ वर्णाच्या त्या माणसाला शब्दशः उचलून ट्रेनबाहेर फेकून दिलं. पाठोपाठ चेहऱ्यावर मानभावी हसू खेळवत उपकार केल्याच्या आविर्भावात त्याच्या बॅगाही फेकून देत ट्रेनला जोहान्सबर्गला जाण्यासाठी निघण्याचा इशारा म्हणजे सिग्नल देण्यात आला.

कोणताही दोष नाही, सफाईदार व ब्रिटिश धाटणीच्या इंग्रजी भाषेत संवाद साधता येतोय, शिवाय वर्तनही सौजन्याचं आहे, असं असताना तो गव्हाळ वर्णाचा माणूस वर्णद्वेषाची शिकार ठरला. परिस्थिती माणसाला घडवते असं म्हणतात! १८९० मधील दक्षिण आफ्रिकेतील या परिस्थितीनं, तिथल्या वातावरणानं मोहनदास करमचंद गांधी या माणसाला ऐतिहासिक परिणामांसह राजकीय व आत्मिक-आध्यात्मिक नेता म्हणून आकार दिला. घडवलं.

१८९३ मध्ये पीटर मारिट्झबर्ग रेल्वे स्टेशनवर हा यातनादायक प्रसंग घडला, तेव्हा माझ्या आजोबांनी दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा पाऊल टाकून कसाबसा एक आठवडा झाला होता. आजोबा तेव्हा हातात एकही ‘केस’ नसलेले तरुण वकील होते.

त्यावेळी ना त्यांच्या मनात अहिंसेची संकल्पना तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात होती, ना जग एक दिवस ‘महात्मा’ म्हणून त्यांना आदराचं स्थान देणार आहे याची जाणीव! या घडलेल्या अपमानास्पद प्रकारानं आजोबांचा संताप शिगेला पोहोचला; पण ते त्या अपमानानं खचले नाहीत. शिगेला पोहोचलेल्या संतापातूनच एका ज्ञानी, सुबुद्ध अशा नव्या माणसाचा उदय झाला.

ट्रेनमधून बाहेर फेकले जाण्याच्या घटनेनंतरच्या दिवसात व वर्षात वर्ण आणि वंशविद्वेषाच्या अनेक अनुभवांनी आजोबांच्या संतापावरील नियंत्रणाची सातत्यानं कसून परीक्षा पाहिली. असा शारीरिक व मानसिक छळ वाट्याला येतो, तेव्हा बहुतेक लोक हिंसक कृत्य करायला प्रवृत्त होतात. इतिहासात या बाबतचे अनेक दाखले मिळतात. छळ होतो तेव्हा माणसं केवळ प्रतिकार करतात असं नव्हे तर एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत त्यांची मजल जाते. माझे आजोबा मात्र संतापातून, चिडीतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा उपयोग प्रश्न सोडवण्यासाठी, शांतीपूर्ण पर्याय शोधण्यासाठी वापरायला शिकले. असे पर्याय जगात खूप सकारात्मक बदल घडवू शकतात याचीही त्यांना जाणीव झाली.

पीटर मारिट्झबर्ग रेल्वे स्टेशनवर घडलेला प्रसंग म्हणजे आजोबांनी वर्णभेद व वंशभेदाला प्रतिकार करण्याची केवळ सुरुवात होती. तीन वर्षांनी भारतात परतल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या दशेविषयीचं वास्तव भारतीय उपखंडातील राजकीय नेत्यांना कळावं म्हणून लेखणीचा खूपच उपयोग केला. वृत्तपत्रातून मुलाखती दिल्या. दक्षिण आफ्रिकेतील सरकारच्या पूर्वग्रहदूषित धोरणांचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला. आजोबांच्या या उद्गाराचे व उच्चाराचे पडसाद दक्षिण आफ्रिकेत सगळीकडे पोहोचले. तेथील स्थानिक वृत्तपत्रांनी जाणीवपूर्वक शब्दांची व आशयाची मोडतोड करून हे सगळं अशा प्रकारे पोहोचवलं की, जणू काही आजोबा म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्यांच्या सत्तेसाठी एक मोठं संकट आहेत. अशा प्रकारच्या लेखांमुळे आजोबांविषयी रागाची-द्वेषाची भावना तिथं उफाळून आली. मोहनदास गांधी जहाजे भरभरून भारतीय माणसांना दक्षिण आफ्रिकेत आणण्याची आणि गोऱ्यांपेक्षा त्यांचंच संख्याबळ वाढवण्याची योजना आखत आहेत, अशी भीती पसरवण्यात आली.

परिणाम? - जानेवारी १८९७ मध्ये आजोबा दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेले व दर्बन बंदरामध्ये पोहोचले, तेव्हा संतप्त जमाव त्यांची वाट पाहात होता. आजोबा यावेळी आपला परिवार आणि दोन जहाजातून भारतीय मजुरांना कराराने सोबत घेऊन गेलेले होते. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं या दोन्ही जहाजांना संसर्गजन्य रोगी असलेल्या जहाजांप्रमाणं किनाऱ्यापासून लांबच रोखलं. वाट पाहून प्रवासी व जहाजमालक कंटाळतील आणि निराशेनं भारतात परत जातील म्हणून सर्वांना दोन आठवडे समुद्रातच रोखून ठेवण्यात आलं. संयम व सहनशीलतेची परीक्षा पाहणारा हा प्रकार होता; पण सगळे प्रवासी जहाज किनाऱ्यावर उतरण्याची परवानगी मिळावी म्हणून वाट पाहात राहिले. दुसरीकडे किनाऱ्यावरचा जमाव आजोबा म्हणजे मोहनदास गांधी आपल्या हाती पडण्याची वाट पाहात खोळंबून होता.

दादा अब्दुल्ला यांनी म्हणजे या दोन्ही जहाजांच्या मालकांनी गांधी परिवाराला किनाऱ्यावर जमावाकडून मारहाणीनं स्वागत होण्याची शक्यता असल्याची कल्पना दिली. परिवाराचा मारहाणीपासून बचाव व्हावा म्हणून आजोबांनी दोन मुलांसह (त्यापैकी एक माझे वडील) आजीला आधी दर्बनच्या किनाऱ्यावर उतरून रूस्तमजी या पारशी मित्राच्या घरी जायला सांगितलं. रूस्तमजी आधीपासूनच बंदरात येऊन थांबलेले होते.

संयमाची परीक्षा पाहूनही जहाजं परत जात नाहीत हे पाहून दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं अखेर त्यांना बंदरातील जेट्टीवर येण्याची परवानगी दिली. मुलांसह किनाऱ्यावर उतरण्याची आजीलाही परवानगी मिळाली. जहाजावरील बाकी सर्वजण बंदरातून सुखरूप बाहेर पडल्याचं कळल्यानंतर सर्वांत शेवटी शिपिंग कंपनीच्या एका गोऱ्या एजंटबरोबर आजोबांनी बंदरामध्ये पाऊल टाकलं. मारहाण सोसावी लागण्याविषयी कोणाही सामान्य माणसांप्रमाणं त्यांच्या मनातही भीतीची भावना होती. या भावनेला शरण जाणं हा भेकडपणा ठरला असता; पण मारहाणीपेक्षा भेकडपणा अधिक तिरस्करणीय मानणाऱ्या आजोबांनी मोठ्या धैर्याने चालायला प्रारंभ केला. त्यांचं ते निर्धारपूर्वक पावलं टाकणं हे कोणाला भडकवण्यासाठी, प्रक्षुब्ध करण्यासाठी नव्हतं. त्यांनी आत्मसंयमनासाठी व भीतीवर मात करण्यासाठी प्रार्थना करूनच किनाऱ्यावर चालणं सुरू केलं होतं. आजोबांना पाहताच जमावाचा तोल सुटला. गोऱ्या एजंटला बाजूला ढकलून देत जमावानं आजोबांना घेरलं. क्रूरपणे लाथा घालणं आणि आरडाओरड करत गलिच्छ भाषेत शिवीगाळ सुरू झाली.

डोक्याला झालेल्या खोल जखमेतून रक्त ओघळायला लागलं; पण आजोबांनी कोणत्याही प्रकारे प्रतिहल्ला चढवला नाही. आजोबांचं असं वागणं उच्चरवात कोणी सांगितलेल्या अहिंसेच्या सिद्धांतामुळे नव्हतं. आपणही मारहाण करणाऱ्यांवर हात उचलला तर परिस्थितीत आणखी तेल ओतल्यासारखं होऊन मारहाणीला आणखी उग्र स्वरूप येईल याची जाणीव हे आजोबांच्या वागणुकीमागील अतिशय साधं कारण होतं.

आजोबांना ओळखून एका गोऱ्या महिलेनं अनपेक्षितपणे या हिंसक प्रकारात हस्तक्षेप केला नसता तर जमावानं कदाचित त्या दिवशीच आजोबांना मारून टाकलं असतं! आजोबांचा जीव वाचवण्यासाठी पुढे झालेली ती महिला म्हणजे दर्बनचे पोलिसप्रमुख अलेक्झांडर यांची पत्नी होती. संतापलेले हल्लेखोर व आजोबा यांच्यामध्ये जाऊन ती उभी ठाकली. तिनं आपल्या हातातली छत्री आजोबांच्या डोक्यावर धरली. हा प्रकार कोणीतरी पोलिसांना कळवला. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी आजोबांना संरक्षण देत सुखरूप रूस्तमजी यांच्या घरी पोहोचवलं. आजी तिथं आपल्या दोन मुलांसह त्यांची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहात होती. पोलीस आजोबांना संरक्षणात रूस्तमजींच्या घरी घेऊन जात असतानाही हिंसक जमाव पाठलाग करीत होता. आजोबांना आपल्या हवाली केलं नाही तर रूस्तमजींच्या घरामध्ये घुसण्याची धमकी देत होता. दक्षिण आफ्रिकेला बदनाम करणाऱ्या माणसाचा त्यांना आपल्या पद्धतीने ‘न्याय’ करायचा होता.

दर्बनच्या पोलिसप्रमुखांनी या जमावासमोर येत जमावाला सामुदायिकपणे एक गाणं म्हणण्यात गुंतवून ठेवलं. दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्यांनी आजोबांना पोलिसी गणवेश घालायला दिला आणि त्या वेषात जमावाची नजर चुकवून आजोबांना रूस्तमजींच्या घरातून पोलीस ठाण्यामध्ये हलवण्यात आलं. ते पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्याचा संदेश मिळताच पोलिसप्रमुखांनी जमावाला सांगितलं, “गांधी आश्चर्यकारकपणे अचानक गायब झाले आहेत!”

जमावाचा राग हळूहळू शांत करत जमाव पांगवण्यात आला. हल्लेखोरांपैकी काही जणांची ओळख पटवून पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकले; पण आजोबांनी हल्लेखोरांची रीतसर ओळख पटवून फिर्याद दिली तरच पुढं कारदेशीर कारवाई करता येणार होती. अशा परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आपल्यापैकी कोणावर आली असती तर आपण जास्तीत जास्त कलमं लागतील असे आरोप करून तक्रार दाखल केली असती. आजच्या जगात प्रत्येकाला कोणत्याही प्रकारच्या हानीची कायदेशीर भरपाई हवी असते! - आजोबांनी मात्र साफ सांगून टाकलं की, त्यांना हल्लेखोरांवर सूड उगवायचा नाही किंवा मारहाणीचा बदला या पद्धतीनं घेण्याचीही इच्छा नाही!!

आजोबांच्या या पवित्र्यानं हल्लेखोरांपेक्षा पोलीसप्रमुखच अधिक चकित झाले. ते आजोबांना म्हणाले, “तुम्ही तक्रारच नोंदवली नाही, तर मला या सर्वांना सोडून द्यावं लागेल!”

आजोबा म्हणाले, “हरकत नाही. मला वाटतं, गुन्हा केला जाणं आणि त्याला शिक्षा देणं याचं दुष्टचक्र योग्य वेळी थांबवणं महत्त्वाचं! माझ्यावर हल्ला केला गेला तो वस्तुस्थिती माहिती नसल्यामुळे. चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोचली आणि ते संतापले. हल्ला झाला तो अज्ञान आणि संताप यामधून. या बाबत योग्य जाणीव असतानासुद्धा मी त्यांना क्षमा केली नाही, तर त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग व द्वेष कायम ठेवण्यासाठी मीच दोषी ठरणार नाही का?”

मारहाणीचा सूड उगवण्याच्या इच्छेतून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर सतत ओझं बाळगून आपल्याला वावरावं लागेल, त्यापेक्षा आपण केलेली मारहाणीची कृती योग्य की अयोग्य याचं मूल्यमापन हल्लेखोरांना स्वत:लाच करू देणं चांगलं असं आजोबांना वाटलं. आजोबा हल्लेखोरांच्या मनात ‘आपण केलं ते बरोबर की चूक?’ अशा शंकेचं बीज पेरण्यात यशस्वी झाले. या क्षमाशील आणि सुसंस्कृत सभ्य माणसावर हल्ला करण्यात बहुतेक आपली चूकच झाली असं हल्लेखोरांना वाटलं. आजोबांच्या दृष्टीनं हल्लेखोरांना तुरुंगवास घडण्यापेक्षा पश्चात्ताप होणं अधिक महत्त्वाचं होतं. हल्लेखोरांना तुरुंगात टाकल्यानं ते काहीच शिकणार नव्हते, उलट तुरुंगवासानं त्यांना अधिक कडवट बनवलं असतं आणि आजोबांविषयी त्यांच्या मनात असणारे पूर्वग्रह आणखी पक्के झाले असते.

आजोबा शांतीप्रिय होते हे खरंच, पण दक्षिण आफ्रिकेत अनेकदा त्यांना शारीरिक हल्ल्यांचा सामना करावा लागला आणि भारतात, आपल्या मातृभूमीत स्वातंत्र चळवळीचं नेतृत्व करत असतानाही एक-दोन वेळा नाही तर तब्बल आठ वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. मला स्वत:ला असं वाटतं की, शांतीप्रिय माणसाच्या संदर्भात घडलेल्या अशा घटना या वरकरणी आधुनिक बनलेल्या माणसाच्या जीवनात खोलवर रुतलेल्या हिंसक प्रवृत्तीच्या मुळांचं दर्शन घडवतात.

जोहान्सबर्गमध्ये आजोबा भारतीय समाजाचे प्रतिनिधी होते. जोहान्सबर्गमध्ये स्थायिक भारतीयांनी सरकारच्या धोरणांच्या विरोधात सुरू केलेल्या सार्वत्रिक निषेध मोहिमेनंतर सरकारबरोबर करार करण्याची वेळ आली, तेव्हा भारतीयांच्या वतीनं आजोबांनी त्या करारावर स्वाक्षरी केली होती. काही भारतीयांना असं वाटलं की, सरकारबरोबर झालेल्या चर्चेनंतर जो करार झाला, त्यातून भारतीयांच्या पदरी जेवढं पडायला पाहिजे होतं तेवढं पडलं नाही. गांधींनी काही बाबतीत भारतीय समाजाच्या हितापेक्षा स्वार्थ पाहिला असा संशय व्यक्त करणारेही काहीजण होते. मनात काही शंका असेल तर त्याबाबत थेट आजोबांना प्रश्न विचारून स्पष्टीकरण मागता आलं असतं, पण शंकासुरांनी तसं केलं नाही. गोष्टी पुरेशा आणि योग्य पद्धतीनं जाणून न घेताच ही मंडळी संतापली. एका संध्याकाळी आजोबा त्यांच्या वकिलीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना तोंडाला फडकी गुंडाळलेल्या तीन तरुण भारतीयांनी आजोबांवर निष्ठुरपणे हल्ला चढवला. बेदम मारहाण केली. सुदैवानं त्यावेळी रस्त्यावरून जात असलेल्या माणसांनी आजोबांची या मारहाणीतून सुटका केली आणि त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यावेळीही पोलीस अधिकाऱ्यांनी आजोबांना तक्रार नोंदवण्याविषयी सांगितलं, पण आजोबांनी नकार दिला. या क्षमाशीलतेनं आजोबांची हत्या करू पाहणाऱ्यांमध्ये परिवर्तन घडवलं. आपल्या हातून घडलेल्या मूर्खपणाची त्या तीन भारतीय तरुणांना जाणीव झाली आणि त्यांनी स्वयंस्फूर्तपणे आजोबांचे रक्षक म्हणून वावरायला सुरुवात केली. खरं तर आजोबांनी त्यांना संरक्षकांची गरज नाही असं परोपरीनं सांगितलं, पण आजोबांविषयी पराकोटीचा आदरभाव निर्माण झालेल्या त्या तरुणांनी याबाबत आजोबांचं काही ऐकायचं नाही आणि केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं असं ठरवलं होतं. हे तिघेही पुढे आयुष्यभरासाठी आजोबांचे मित्र व अनुयायी बनले.

असंच खूप वेगळं परिवर्तनाचं उदाहरण म्हणून खान अब्दुल गफारखान यांचं उदाहरण सांगता येईल. भारताच्या वायव्य प्रांतामधील लढवय्या पठाणांचे नेतृत्व खान अब्दुल गफारखान करत होते. पठाणांची इतिहासकाळापासूनची ओळख लढवय्ये अशीच आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या कट्टर व रक्तरंजित संघर्षात पठाणांचा सहभाग होताच. जवळ बंदूक नसेल तर पठाणांना आपण कपड्यांशिवाय वावरत असल्यासारखं वाटायचं. पठाणांना बंदुकींचा वारंवार आणि मुक्तपणे वापर करायची सवय होती. खान अब्दुल गफारखान यांनी जेव्हा आजोबांच्या देश स्वातंत्र्यासाठीच्या अहिंसक लढ्याविषयी ऐकलं, तेव्हा त्यांच्या मनात आजोबांविषयी कमालीचं औत्सुक्य दाटून आलं. लढणाऱ्या माणसांचं बळ न वापरता ब्रिटिश राजसत्तेला उखडण्याची स्वप्नं एक किरकोळ माणूस कसा काय पाहू शकतो? याविषयीचं हे औत्सुक्य होतं. खान अब्दुल गफारखान आपल्या क्रांतिकारी दलाच्या सदस्यांना घेऊन दूरवरून प्रवास करत लपत-छपत वेषांतर करून मध्यभारतात आजोबांना भेटायला आले होते.

लोकांना आजही आश्चर्य वाटतं की, गांधींसारख्या शांतीप्रिय माणसानं रक्तरंजित संघर्षात गुंतलेल्या खान अब्दुल गफारखानसारख्या माणसाचं त्या काळी प्रेमानं कसं काय स्वागत केलं? असे प्रश्न मनात येतात याचं कारण आपण कोणत्याही गोष्टीकडं बरोबर किंवा चूक, शुभ्र की काळंकुट्ट अशा पद्धतीनं बघतो. माणसांमध्ये आणि माणसांच्या जगण्यामध्येही थोडं चांगलं-थोडं वाईट, थोडं पांढरं-थोडं काळं-करडं असं असू शकतं, याची समज आपण दाखवत नाही. आपण सरळ ‘ते आणि आम्ही’ अशी विभागणी करतो. ही वृत्ती व दृष्टी अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला बाधक ठरणारी असते. अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा माणसामाणसांमध्ये भिंती उभ्या करण्यावर नव्हे एकमेकाला समजून घेण्यातून माणसात परिवर्तन घडवण्यावर विश्वास आहे. प्रेमावर विश्वास आहे.

आदराची वागणूक आणि मैत्रीच्या पातळीवर एकमेकांना समजून घेण्यासाठी साधलेला संवाद यातून आजोबांनी खान अब्दुल गफारखान यांना हिंसक मार्गाकडून अहिंसक मार्गाकडं वळवलं. त्यातून त्यांच्यामधून एक प्रेमळ, समंजस पण क्रांतिकारी असा राजकीय नेता आकाराला आला. खान अब्दुल गफारखान यांनी आपल्या युद्धप्रिय लढवय्या गटाला शस्त्र खाली ठेवायला लावली आणि या गटाचं शांतीसेनेत रूपांतर केलं. आजोबांनी त्यांच्यासारख्या माणसाला आदरानं वागवून त्यांच्याशी मित्रत्वानं संवाद साधणं टाळलं असतं तर? तर गफारखान आयुष्यभराचे मित्र होण्याऐवजी कदाचित आयुष्यभराचे शत्रू बनले असते. आजोबांच्या शब्दातील ताकद समोरच्या माणसातील वैरभाव आणि संताप यावर वर्चस्व गाजवू शकत होती, कारण माझे आजोबा टोकाचे प्रामाणिक होते, त्यांच्याशी कोणीही सहज बोलू शकत होतं आणि ते कोणाशीही तितक्याच विनम्र भावानं बोलत असत. इतरांमध्ये जे परिवर्तन व्हायला हवं असं आजोबांना वाटायचं, त्यांचं स्वत:चं आचरण कायमपणानं तसंच राहिलं.

माणसं रागावतात. रागासाठीचं कारण प्रत्येक वेळी योग्य असतंच असं नाही आणि रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही तर बहुतेक वेळेला मानवी आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अकल्पित गोष्टी घडू शकतात. रागाकडे आपण एक तर उदध्वस्त करणारी भावना म्हणून भीतीने पाहतो किंवा या भावनेतील ताकद समजून न घेता पाहतो आणि कदाचित त्यामुळे एक रचनात्मक ताकद म्हणून या भावनेचा उपयोग कसा करून घेता येईल याच्या शक्यता समाज आजमावूनच पाहात नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने विध्वंसक मार्गाने आपला राग व्यक्त करते.

वास्तविक राग किंवा संतापाची ताकद प्रत्येक व्यक्तीला जशी विध्वंसासाठी प्रवृत्त करू शकते, त्याचप्रमाणे खूप काही चांगलं करण्यासाठीही प्रेरित करू शकते. दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेष व काळ्या वर्णाबाबतचे पूर्वग्रह यामुळेच आजोबांना रेल्वेतून बाहेर फेकून देण्यासारखे प्रकार घडले आणि आजोबांना न्याय मिळवण्यासाठी शांतीपूर्ण मार्ग शोधावे लागले. या आणि अशा अनेक अनुभवातून आजोबांना अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची भूमिका निश्चित करता आली आणि अहिंसेच्या तत्त्वाची ताकद एकवटणं शक्य झालं.

बहुतेक वेळेला लोक संतापले की, नाती उद्ध्वस्त करतात आणि कधी कधी तर खुनासारखा गुन्हाही करतात. संतापाच्या भरात हातून घडलेल्या अशा गुन्ह्यांची संबंधित व्यक्तीला आयुष्यात जबर किंमत चुकवावी लागते. कधी कधी अशी किंमत चुकवणं त्यांच्या स्वत:च्या जीवावरही बेतू शकतं. आजोबांनी या सगळ्याच गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या आणि त्यातून योग्य काय हे जाणलं. राग चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करण्यातून आपण केवळ नाती उदध्वस्त करतो असं नाही तर अनेकदा कधीच बऱ्या न होऊ शकणाऱ्या जखमांनी स्वत:च जर्जर होतो. खरं तर अंगात स्वयंशिस्त बाणवून रागावर नियंत्रण मिळवणं आणि रागाचा उपयोग हुशारीनं करून ती ताकद चांगल्यासाठी वापरणं ही फार अवघड गोष्ट नाही. राग येणं ही गोष्ट स्वाभाविक आहे, पण तो नियंत्रणात ठेवायला हवा. याची जाणीव जरी आपण ठेवली, तरी आपण रागाच्या व्यक्त होण्याला सकारात्मक कृतीचं वळण देऊ शकतो.

दैनंदिन काम करत असताना बरेचदा आपण शंभर वेळा मनाशी घोकतो की, कुठलाही निर्णय रागात घेणं योग्य नाही. रागाच्या उद्रेकाला आपल्यावर स्वार होऊ देण्याऐवजी आणि संघर्षाला सामोरे जाण्याऐवजी आपण रागातून मिळणारी ताकद चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी वापरली तर त्यातून आपल्याला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांनाही खूप काही शिकता येणार नाही का?

काही वेळेला आपण योग्य पर्याय निवडतो. भांडणाचा मुद्दा समजुतीनं मिटवण्याचा आपला प्रयत्न असतो, पण हा प्रयत्न आपण चुकीच्या पद्धतीनं करतो. आपल्याला वाटतं की, आपल्या रागाचं उग्र प्रदर्शन करून त्या जोरावर आपण समोरच्याला घाबरवून टाकू आणि आपण म्हणतो तेच कसं बरोबर आहे, हे विरोधकांना मान्य करायला लावू. बाहेरच्या व्यक्तींबद्दलच नव्हे तर घरातसुद्धा आपण असंच वागतो. आपली मुलं ऐकत नसतील तर आपण त्यांना रागावतो आणि आपल्या मनासारखं वागायला लावतो. मोठी माणसं असतील तर त्यांना भीती दाखवतो किंवा त्यांच्या वागण्यावर कठोर टीका करतो. भांडण किंवा संघर्षाचा मूळ मुद्दा अशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न केला तर उमटणाऱ्या प्रतिक्रिया चढ्या स्वरूपाच्याच असतात. एकदा आपल्या तोंडून तिखट, बोचणारे शब्द बाहेर पडले की, ते आपल्याला परत घेता येत नाहीत. म्हणूनच राग आला तरी शब्द जपून वापरणं महत्त्वाचं असतं. एक वेळ बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांनी नुकसान होणार नाही, पण शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे अपरिमित नुकसान होऊ शकतं. काही प्रकरणांमध्ये आपण क्षमा मागून वातावरण शांत करू शकतो, तसं केलं नाही तर मनावर उमटलेले खोल ओरखडे कायम राहतात.

खरं तर आपण जे लोकांना देतो तेच एक प्रकारे आपल्याला परत मिळत असतं. आपण जर समोरच्या माणसांविषयी आदरभाव बाळगत नसू, त्यांच्याविषयी सतत मनात संशय ठेवण्याची आपली वृत्ती असेल किंवा आपण समोरच्या माणसांचा सतत अपमान करत असू, त्याला प्रसंगी मारझोड करत असू तर ती माणसंदेखील आपल्याशी त्याच पद्धतीनं वागणार! आपण प्रत्येक माणसाला सन्मानाची वागणूक दिली, त्याच्याशी बेजबाबदारपणे किंवा अविवेकीपणाने वागलो नाही, तर आपल्यावर कोणाची क्षमा मागण्याची वेळ कधी येणार नाही. इतरांविषयीची आदर भावना आणि विचारीपण यांच्या जोरावर आपण आपल्या रागाला चांगुलपणात बदलू शकतो. कुरापती व संघर्ष वाढवण्यापेक्षा मनाच्या जखमा कायमच्या बऱ्या होतील असे पर्याय नक्की शोधू शकतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 25 January 2019

गांधीजी मोठे देवदूतच होते यात शंका नाही. प्रत्येकाने वैयक्तिक जीवनात खुशाल हवी तेव्हढी अहिंसा पाळावी. पण एक समाज म्हणून कोणी जर हिंसा घडवू लागलात तर पोलादी पंजाने बदल घ्यायचा असतो. हे आम्हांस 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातनं समजतं. बाकी, दरबन मधले काळे लोकं गांधीवर चिडले होते कारण गांधींनी भारतीयांना स्थानिक काळू लोकांपेक्षा वेगळा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती. ही मागणी अगदीच अतार्किक नव्हती. असो. -गामा पैलवान