जयपूर- अत्रौली घराण्याच्या विशुद्ध परंपरेच्या वारसदार
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • धोंडुताई कुलखर्णी आणि त्यांचं आत्मचरित्र
  • Sat , 17 June 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music केशव परांजपे Keshav Paranjpe धोंडूताई कुलकर्णी Dhondutai Kulkarni सूर-संगत Sur Sangat किशोरी आमोणकर Kishori Amonkar

गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी लिखित (कथित) ‘सूरसंगत’ हे १३५ पृष्ठांचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. धोंडूताई कुलकर्णी या जयपूर- अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका व गुरू होत्या. परंपरेची विशुद्धता जपण्याचं त्यांचं ब्रीद होतं. जयपूर- अत्रौली घराण्याच्या संपन्न विद्येचा समृद्ध वारसा त्यांनी उत्तम तऱ्हेनं जपला आणि अगदी आधुनिक पिढीपर्यंत तो पोचवला. शास्त्रीय संगीतातले विविध कल (ट्रेंड्स) त्यांनी आपल्या सहा तपांच्या कारकिर्दीत पाहिले, अनुभवले. तरीही अभिजाततेचं निशाण सर्वस्व पणाला लावून त्यांनी उंच फडकत ठेवलं. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आत्मकथनाविषयी औत्सुक्य असणं क्रमप्राप्तच आहे. त्यात आणखी भर म्हणजे त्यांच्या शिष्या नमिता देवीदयाल हिने धोंडूताईंची व्यक्तिरेखाच मध्यवर्ती ठेवून वास्तव व कल्पनेचं संमिश्रण करून लिहिलेली ‘म्युझिक रूम’ ही कादंबरी जगभरात लोकप्रिय झाली आहे. ‘म्युझिक रूम’मुळे तयार होणारा वाचकाचा गैरसमज दूर व्हावा या महत्त्वाच्या उद्देशानं प्रेरित होऊन आपण हे पुस्तक लिहिलं आहे, असं धोंडूताई खासगीत सांगत आणि पुस्तकात मनोगतातही त्यांनी तसं म्हटलं आहे- ‘‘माझ्या या पुस्तकानं प्रेरित होऊन दोन जरी गवई तयार झाले, तरी माझ्या पुस्तक लिहिण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल,’’ असेही त्यांनी मनोगतात नमूद केले आहे.

पुस्तकातील प्रकरणे - काळाच्या बरंच पुढे जाऊन आपल्या कन्येला शास्त्रीय गायनाचं शिक्षण देण्याचा चंग बांधून तो पुरा करणारे धोंडूताईंचे तीर्थरूप ‘अण्णा’ हे या पुस्तकातलं पहिलं प्रकरण. त्यानंतर गुरू भुर्जीखान साहेब, अल्लादिया खानसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि अजीजुद्दीन खानसाहेब, त्यानंतर सूरश्री केसरबाई केरकर अशी व्यक्तिचित्रात्मक प्रकरणं आहेत. त्यानंतर जयपूर- अत्रौली घराण्याची वैशिष्ट्यं सांगणारं प्रकरण, आपल्या गुरूंच्या आणि आपल्या संस्मरणीय मैफिलींची संस्मरणं आणि हितगुज संगीत साधकांशी हे संगीतसाधकांना मार्गदर्शनपर अशी तीन प्रकरणं आहेत. परिशिष्टात किशोरी आमोणकर यांनी धोंडूताई कुलकर्णी यांची एक प्रकट मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीचा संपादित भाग आहे. संगीतातल्या गमती-जमती अशा त्यानंतरच्या प्रकरणात रंजक किस्से धोंडूताईंनी कथन केले आहेत. आणि शेवटचं प्रकरण धोंडूताईंच्या शिष्यांच्या नजरेतून ‘बाई’- गुरू धोंडूताई असं आहे.

‘अण्णा’ हे प्रकरण उणं पुरं आठ पृष्ठांचं आहे. (एकंदरच अण्णा या अफलातून व्यक्तिमत्त्वाची झलक या प्रकरणातून मिळते.) बाल धोंडूताईंना गाणं शिकवण्याचं अण्णांनी नथ्थन खानसाहेबांच्या गळी उतरवलं, ते केवळ आपल्या गायन शिक्षणाविषयीच्या तळमळीनं. अण्णांनी ‘भारत संगीत मेळा’ही काढला होता. १९३० च्या दशकाच्या काळाच्या संदर्भात ‘मी गाणं शिकत होते म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट करत होते,’ असं विधान या प्रकरणात धोंडूताईंनी केलं आहे. याविषयी अधिक तपशील बाईंनी द्यायला हवा होता. भुर्जीखानसाहेब आणि अल्लादियाखानसाहेब यांच्याविषयी लिहिताना धोंडूताई अगदी तल्लीन झाल्या आहेत. थोरल्या खानसाहेबांच्या संगीताइतकाच व्यक्तिमत्त्वाचा भव्योदात्तपणा बाईंनी शब्दांतून वाचकाच्या अनुभवाला आणून दिला आहे. लक्ष्मीबाई जाधवांच्या व्यक्तिमत्त्वाची ऋजुता धोंडूताईंच्या शब्दांतून चांगली अभिव्यक्त झाली आहे. अजीजुद्दीन खानसाहेब (बाबा) यांचा जगाला न उमजलेला मोठेपणा धोंडूताईंनी अधोरेखित केला आहे. बाबा तसे अलीकडे गेले. आधुनिक काळाविषयीची त्यांची मनोभूमिका, प्रतिक्रिया या गोष्टी धोंडूताईच सांगू शकल्या असत्या. बाबांच्या संदर्भात काही सांगायचं राहून जात आहे, असं हे प्रकरण वाचताना जाणवतं.

‘सूर- संगत’ – गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी

राजहंस प्रकाशन, पुणे,

पाने – १५२, मूल्य – १५० रुपये.

हे पुस्क ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3502

……………………………………………………………………………………………

सूरश्री केसरबाई केरकर यांचं गायन आणि वर्तन दोन्ही पेचदार! धोंडूताई या केसरबाईंच्या एकमेव शिष्या. म्हणूनच केसरबाईंवरच्या धोडूताईंच्या प्रकरणाविषयी विशेष उत्सुकता! धोंडूताईंनी केसरबाईंच्या गाण्याचं मोठेपण अगदी थोडक्यात पण तितक्याच नेमकेपणानं स्पष्ट केलं आहे. केसरबाईंची ज्ञानासक्ती, त्यांचा करारीपणा, त्यांचा दरारा, त्यांचा धोंडूताईंबद्दलचा जिव्हाळा एकंदरच एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व अशी केसरबाईंची ओळख धोंडूताईंनी प्रेमानं आणि आदरानं अधोरेखित केली आहे. तरीही केसरबाईंचा इतका निकट सहवास लाभलेल्या धोंडूताईंकडून केसरबाईंची अधिक विस्तृत ओळख घडायला हवी होती, असं राहून राहून वाटतं. केसरबाईंच्या अशा अनेक गोष्टी, अनेक किस्से असू शकतील की, जे फक्त धोंडूताईच सांगू शकत होत्या. अशा किश्शांतून केसरबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्र अधिक स्पष्ट होऊ शकलं असतं.

धोडूताई पुढच्या प्रकरणात जयपूर- अत्रौली घराण्याबद्दल बोलल्या आहेत. विस्ताराच्या दृष्टीनं या पुस्तकातील हे सर्वांत मोठं प्रकरण आहे. परंतु त्यातील अध्र्याहून अधिक मजकूर हा उ. अल्लादिया खान, उ. भुर्जीखान, उ. मंजीखान यांच्याबद्दलच आहे. घराण्याची ठळक वैशिष्ट्यं म्हणून आवाजाचा लगाव, श्रुतीविचार, दमखमचे अस्ताई अंतरे, जोडराग याविषयी संक्षिप्त विवेचन बाईंनी केलं आहे. इतर घराण्यांतून तालीम घेऊन मग या घराण्याचं गाणं शिकणाऱ्या व्यासंगी तयार गायकांनी या घराण्याच्या लयीच्या डौलाविषयी जे सांगितलं आहे, त्याचा परामर्श बाईंनी घेतलेला नाही किंवा त्या अनुषंगानं जयपूर घराण्याच्या लयताल विचाराचा सुस्पष्ट उलगडाही पुस्तकात झालेला नाही.

या घराण्यावर सामान्यत: जे आक्षेप घेतले जातात त्याचा प्रतिवाद करण्याचा अभिनिवेश या प्रकरणात जाणवतो. या घराण्याच्या गायकीला जी नवी वळणं मिळाली, त्याविषयीच्या तीव्र नापसंतीमुळे असेल या प्रकरणात भाषेचा सूर उपरोधाचा झाला आहे. ‘घराणी हवीतच’ असं आपलं मत हिरिरीनं मांडताना ‘घराणी नकोत’ म्हणणाऱ्यांचा पक्ष समजून घेऊन त्याचा तात्त्विक समंजस प्रतिवाद झालेला नाही, तर तिरकस अवहेलना झाली आहे. पुस्तकाच्या इतर प्रकरणांची लाघवी जिव्हाळ्याची भाषा या प्रकरणात संपूर्णपणे बदलली आहे. किंबहुना, त्यांच्याच लेखणीतून हे प्रकरण उतरलं आहे का, अशी शंका यावी इतका भाषेचा पोत बदलला आहे.

‘स्वरार्थभ्रमणी’ अशी संभावना करताना गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं नाव घेतलेलं नसलं तरी रोख अगदी सरळ आहे. ‘‘हा विषय खूप गुंतागुंतीचा, प्रचंड आवाक्याचा आहे. त्यासाठी निराळा ग्रंथ लिहावा लागेल,’’ असं लेखिका म्हणतात, पण ‘स्वरार्थरमणी’ प्रकाशित झाल्यापासून हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंतच्या काळात स्वरार्थरमणीवर विधायक टीका मात्र केली गेली नाही. प्रकृती अस्वास्थ्य, ‘सूर- संगत’चं कथन अशा कारणांमुळेही कदाचित ते शक्य झालं नसेल. पण दुर्दैवाने सप्रमाण विधायक टीका झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. किशोरीताईंनीच संगीताला विशाल गंगा आणि घराण्याला चंबूची उपमा दिली आहे. त्यांच्या या विधानाचा प्रतिवाद प्रस्तुत पुस्तकात अगदीच शाब्दिक पातळीवर झाला आहे. त्यामुळे त्याकडे गंभीरपणे पाहता येत नाही, याचा विषाद वाटतो. त्यातून ज्यामुळे आयुष्याची इतिकर्तव्यता वाटावी असं हे धोंडूताईंचं ग्रंथलेखन- या ग्रंथाचं व्यासपीठ धोंडूताईंनी किशोरीताईंचा प्रतिवाद करण्यासाठी प्रछन्नपणे वापरलं आहे याबद्दल अतिशय हळहळ वाटते.

‘जयपूर- अत्रौली घराणं’ या प्रकरणात या घराण्याचा वारसा कदाचित आपापल्या मकदुराप्रमाणे असेल किंवा आपापल्या प्रतिभास संपन्नतेप्रमाणे असेल, पण वारसा सांगणाऱ्या अन्य कलाकारांचे नामोल्लेखसुद्धा नाहीत. खास केसरबाई शैलीतील केसरबाईंचं एक वचन मात्र द्विरुक्तीनं उद्धृत झालं आहे- ‘‘अल्लादिया खानसाहेबांचे शिष्य किती?- ते हयात असेपर्यंत मी एकटी आणि त्यांच्या मृत्यूनंतर (बेडकाच्या छत्र्यांप्रमाणे!) अनेक!’’ असो.

यानंतरचं प्रकरण आहे ‘असं गाणं अशा मैफिली’. धोंडूताईंच्या मैफिली अधिक प्रमाणात १९७० पूर्वी झाल्या. त्यामुळे त्या मैफलींचे तसेच त्यांच्या गुरुजनांच्या मैफलींचे वृतान्त त्या काळावर प्रकाश टाकणारे आहेत. त्या वेळचे श्रोते, आयोजक, कलाकार एकूण संगीताचा माहोल हा विद्वत्तेला शरण होता, हे लक्षात येतं. या प्रकरणात त्या वेळच्या अनेक बुजुर्ग कलाकारांचे संदर्भ धोंडूताईंनी मोठ्या आस्थेनं दिले आहेत. पुस्तकातील शेवटच्या ‘हितगुज... संगीत साधकांशी’ या प्रकरणात धोंडूताईंनी अतिशय कळकळीनं तरुण कलाकारांना मार्गदर्शन केलं आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे तरुणाईबद्दलचा त्यांचा सूर अतिशय आशादायी आहे.

परिशिष्ट एक हे ‘संवाद : धोंडूताई कुलकर्णी-किशोरी आमोणकर’ असं आहे. धोंडूताईंच्या विचारांची स्पष्टता, त्यांचा सडेतोडपणा, त्यांची घराण्याविषयी निष्ठा या सर्व गोष्टी या संवादातून चांगल्या तऱ्हेनं प्रतीत होतात. किशोरीताईंनी अतिशय आदरानं आणि प्रांजळपणे संवाद साधला आहे. किशोरीताईंच्या प्रश्नांतून त्यांच्या चिंतनाच्या विषयांचं मनोज्ञ सूचन झालेलं आहे. विशेषत: किशोरीताईंची मुलाखतीच्या शेवटी आलेली प्रतिक्रिया धोंडूताईंचा मोठेपणा नेमकेपणाने सांगणारी आणि प्रांजळपणामुळे अत्यंत हृद्य वाटणारी आहे.

दुसरं परिशिष्ट ‘संगीतातील गमती-जमती’ हे एखाद्या नाटकात गंभीर प्रसंगांनंतर विनोदी प्रसंग घालून ताण कमी करतात तसा प्रकार वाटतो.

‘गुरुवंदना’ हे तिसरं परिशिष्ट धोंडूताईंच्या शिष्यांनी बाईंबद्दल व्यक्त केलेल्या भावना अशा स्वरूपाचे आहे. दहा शिष्यांच्या संक्षिप्त लेखांची लांबी १९ पृष्ठांची आहे. पुस्तकाचं स्वरूप धोंडूताईंचं आत्मकथन असं असेल तर शिष्यांच्या लेखांचं प्रयोजन लक्षात येत नाही, आणि जर ‘धोंडूताईंविषयी’ असं पुस्तकाचं स्वरूप असेल तर फक्त शिष्यांकडून लिहून घेणं पुरेसं वाटत नाही. असो!

उतारवयात धोंडूताई मुंबईत एकट्या राहत होत्या, त्या केवळ शिष्यांना विद्यादान करण्यासाठी. त्यांनी शिष्यांना विशुद्ध विद्यादान भरभरून केलं आणि त्यांच्यावर (आणि माझ्यासारख्या शास्त्रीय संगीतासाठी धडपडणाऱ्यांवरही) मनापासून प्रेम केलं. सहा वर्षांपूर्वीच्या आजारपणानंतर तर त्यांचं जग म्हणजे शिष्यांचा उत्कर्ष एवढंच होतं. शिष्यांच्या लेखांच्या समावेशाचं हेच कारण असावं.हे पुस्तक लिहिल्यावर बाईंना एक प्रकारची कृतकृत्यता वाटत होती; गुरुऋणाची आंशिक फेड झाली अशी त्यांची भावना होती.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, धोंडूताईंनी या पुस्तकाच्या मजकुराचं कथन केलं. उत्तरा दिवेकर यांनी आस्थेनं परिश्रमपूर्वक त्याचं लेखन केलं. राजहंसच्या मनोहर सोनावणे यांनी या लेखनाचं संपादन केलं. हा लेखनकाळ धोंडूताई मोठ्या आजारातून उठत असतानाचा होता. त्या बऱ्या झाल्यावर त्यांनी अक्षरश: प्रत्येक क्षण अन्य काही न करता विद्यार्थ्यांच्या तालमीसाठी वेचला, हे सर्व लक्षात घेतलं तर या लेखात उल्लेखलेल्या पुस्तकाच्या मर्यादांची कारणमीमांसा मिळते. या पुस्तकाच्या रूपाने राजहंस प्रकाशनाने अभिजात संगीत क्षेत्राशी मानलेल्या बांधीलकीची आणखी एक साक्ष दिली आहे.

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.