गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा
सदर - गांधी @ १५०
विनोद शिरसाठ
  • महात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Tue , 02 May 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… हा चौथा लेख.

.............................................................................................................................

प्रिय आनंद, संग्राम, प्रकाश...

गावाला येऊन दोन आठवडे झाले. काल-परवाच पुणला येणार होतो. पण गणेशोत्सवाचे दहा-बारा दिवस म्हणजे गदारोळ! त्यातून येणारी ‘डोकेदुखी’ आणि ‘वैताग’ टाळणसाठी, ‘श्री गणेशाचे विर्सजन होईपर्यंत पुणे शहरात पाऊल ठेवणे नको’ असा विचार केला आणि इकडचा मुक्काम लांबवला.

मागच आठवड्यात ‘आऊटलुक’चा ‘What If...’ विशेषांक वाचलनंतर तुम्हांला लांबलचक पत्र लिहिलं होतं. माझी अपेक्षा अशी होती की, तो अंक कुठून तरी मिळवून, तुम्ही सर्व जण वाचाल आणि मग मी पुण्याला आल्यावर त्यातल्या ‘तर का’ या प्रश्नावर चर्चा कराला मजा येईल. पण तुमच्याकडे इतका पेशन्स नव्हता. माझ पत्रातील त्रोटक माहितीवरून तुम्ही, ‘तर काय झालं असतं?’ ही संकल्पना घेऊन चर्चा सुरू केलीत. ती चर्चा ‘गांधीजी आणि त्यांनी केलेल्या घोडचुका’ या विषयावर आली आणि मग तुम्ही तिघे एका बाजूने तर विवेक एकटा दुसऱ्या बाजूला- असा वाद-संवाद रंगला. नंतर त्यालाच विसंवादाचं रूप आलं. अर्थात, ही सर्व माहिती मला सागरकडून कालच फोनवरून कळली. म्हणून, हे पत्र लिहायला बसलोय...

तुम्ही गांधीजींबाबत उपस्थित केलेले प्रश्न, त्यांच्या भूमिकांवरील आक्षेप मला अजिबात नवे वाटले नाहीत. यापूर्वी अनेक तरुण मित्रांशी बोलताना मला हेच ऐकावं लागलं आहे. पण मित्रांनो, मला हे सांगितलं पाहिजे की, यातले बहुतेक आक्षेप हे ‘गैरसमज’ आहेत. आपल्या तरुण मित्रांनी ‘इतिहास’ नीट अभ्यासलेला नसतो, गांधीबाबा वाचलेला नसतो; तरीही मोठ्या आवेशाने ते बोलत असतात. ऐकीव माहितीच्या तुकड्यांवर हे लोक आपली मतं बनवतात. अरे, चुकलोच! ‘मतं बनवतात’ हे म्हणणंही चूक आहे; इतरांनी व्यक्त केलेली ‘रेडिमेड मतं’ स्वत:ची म्हणून मांडतात!

आपल समाजाची सर्वांत वाईट सवय कोणती, तर इतिहासकालीन व्यक्ती अथवा घटनांबद्दल बोलताना त्या काळाचा, तत्कालीन परिस्थितीचा विचार केला जात नाही. अनेक विधानं संदर्भाशिवाय वापरली जातात. त्यामुळे ती ‘स्फोटक’ वाटतात. कित्येक विधानांची मोडतोड करून विपर्यास केला जातो. हे काही वेळा अजाणता होत असेल, पण अनेक वेळा जाणीवपूर्वकही केलं जातं. असा अपप्रचार करणारे खूप लोक असतात. पण त्या अपप्रचाराला उत्तर देणारे, गैरसमज दूर करणारे लोक संख्येने ‘नगण्य’ असतात. म्हणून मला तर वाटतं, मराठीत एखाद्या साप्ताहिकाने-मासिकाने ‘गांधीजी : समज-गैरसमज’ असा विशेषांक काढावा. कारण गांधीजींना ‘महानायक’ समजणारे खूप आहेत, पण ‘खलनायक’ समजणारेही कमी नाहीत.

मित्रांनो, गांधीजी किती महान होते, हे या पत्रात मी लिहिणार नाही. त्यांच्याबाबत घेतले जाणारे काही आक्षेप, त्यातून निर्माण केले गेलेले गैरसमज आणि त्या संबंधातील वस्तुस्थिती एवढेच सांगणार आहे. अर्थात, हे सारं मी अभ्यासपूर्वक मांडतो आहे, हे नव्याने सांगणची गरज नाही. या ठिकाणी मी दिलेले ‘तपशील’ बरोबर आहेत, पण ‘विश्लेषण’ मात्र तुम्ही स्वतंत्र बुद्धीने, पूर्वग्रह बाजूला सारून तपासून पाहा...

गांधीजींबाबत सर्वांत जास्त आक्षेप आहेत देशाच्या फाळणी संदर्भात! ‘माझ्या देहाची फाळणी आधी होईल, मग देशाची’ असं म्हणणाऱ्या गांधींनी फाळणीला मान्यता कशी दिली, हा प्रश्न गेली पंचावन्न वर्षे विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधाचं असेल, तर त्या काळाचा व परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. त्यातून दिसणारं चित्र कसं आहे? ब्रिटिश येण्यापूर्वी ‘भारत’ नावाचं ‘सार्वभौम राष्ट्र’ कधीच नव्हतं. सन १९४७मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ६०० संस्थानं होती. जात, धर्म, भाषा, संस्कृती, भूगोल या सर्वच बाबतींत टोकाची भिन्नता होती आणि आर्थिक विषमतेचं तर विचारालाच नको. हिंदू व मुस्लिम धर्मातील दरी कमालीची रुंदावली होती. दोन्ही धर्मांतील मूलतत्त्ववादी संघटना त्यापूर्वी कित्येक वर्षे आधीपासून जनतेच्या मनात ‘द्वेषभावना’ पेरण्याचं काम करीत होत्या. या सर्वांचा परिणाम म्हणून, देशभर हिंसाचार उसळला होता. लुटालूट, जाळपोळ, बलात्कार यांचं थैमान माजलं होतं. मुस्लिम लीगच्या नेत्यांशी चर्चेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. ‘फाळणी अटळ आहे’ या निष्कर्षावर काँग्रेसचे बहुतेक नेते आले होते. जीनांशी चर्चेच सतरा फेऱ्या गांधीजींनी केल्या होत्या, पण तडजोड झाली नव्हती. शेवटी ‘काँग्रेस वर्किंग कमिटी’ने फाळणीला मान्यता दिली. त्या वेळी गांधीजींपुढे दोनच पर्याय होते. फाळणीला मान्यता देणं किंवा मुस्लिम लीग व काँग्रेस या दोन्हींच्या विरोधात उपोषण सुरू करणं. उर्वरित नेत्यांना घेऊन गांधींनी उपोषण केलं असतं तर ‘गांधी विरुद्ध काँग्रेस’ असा नवाच संघर्ष निर्माण झाला असता. देशातील आगडोंब शिगेला पोहोचला असता. सर्वच संस्थानिकांनी बंड पुकारलं असतं, देशात ‘यादवी’ माजली असती. त्याची परिणती देशाचे अनेक तुकडे होण्यात झाली असती. गांधींनी फाळणीविरोधात ‘उपोषणा’चं एकमेव हत्यार का वापरलं नाही, त्याचं कारण हे आहे!

गांधीजींनी लोकसंख्येची अदलाबदल करायला विरोध केला, हा एक मोठाच अपराध त्यांच्या माथी मारला जातो. अशी अदलाबदल केली असती, तर सर्व मुस्लिम पाकिस्तानात गेले असते आणि कायमची डोकेदुखी टळली असती-असं विवेचन अनेक विद्वानांकडून केलं जातं. पण अशी अदलाबदल करणं मानवतेला काळिमा फासणारं कृत्य होतं, हा तात्त्विक मुद्दा बाजूला ठेवला तरी व्यावहारिक दृष्टीने अशी अदलाबदल अशक्य होती. हजारो किलोमीटर लांबीरुंदीचा हा देश. त्यात, विखुरलेले आठ कोटी मुस्लिम. त्यांची पाकिस्तानात रवानगी कशी करायची? नव्यानेच स्वातंत्र्य मिळालेला देश, तुटपुंजी साधनं, आर्थिक दारिद्रय आणि माथी भडकलेली माणसं. फाळणीला मान्यता मिळत नाही म्हणून सुरू झालेला हिंसाचार, फाळणी निश्चित झाल्यावर आणखी वाढला. लोकसंख्या अदलाबदलीची घोषणा केल्यावर काय झालं असतं, याची कल्पनाच करता येणार नाही. एकाच कुटुंबातील दोन भावांची नीट वाटणी झाली नाही, तर ते भाऊ परस्परांचा जीव घ्यायला उठतात; मग आठ कोटी लोकांची लाखो कुटुंबं पाकिस्तानात पाठवायची आणि तिकडचे हिंदू भारतात आणायचे, हा अविचार प्रत्यक्षात आणायचा ठरला असता तर अभूतपूर्व ‘सामूहिक हत्याकांड’ झाले असते आणि त्या अदलाबदलीच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला माणसंच शिल्लक राहिली नसती. म्हणजे लोकसंख्या अदलाबदलीचा विचार देश बेचिराख करणारा ‘अविचार’ ठरला असता!

पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत यासाठी गांधीजींनी उपोषण केलं होतं, असा एक मोठा आक्षेप गेली ५५ वर्षे उपस्थित केला जातो आणि गांधीद्वेषासाठी त्याचा वापर केला जातो. यातली वस्तुस्थिती काय आहे? ब्रिटिशांनी हा देश सोडण्याचे ठरवले, तेव्हा अखंड भारताच्या गंगाजळीत ३७५ कोटी रुपये होते. फाळणीची प्रक्रिया पार पाडताना त्यातला पाकिस्तानचा वाटा ७५ कोटी रुपयांचा आहे, हे दोन्ही सरकारांकडून मान्य केलं गेलं होतं. फाळणीनंतरही काही काळ दोन्ही देशांची एकच रिझर्व्ह बँक होती. त्यातला २० कोटींचा पहिला हप्ता पाकिस्तानला ताबडतोब दिला गेला होता. उर्वरित ५५ कोटी रुपये देणे बाकी होते. दरम्यानच्या काळात पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला, जे काश्मीर तोर्पंत भारतात सामील झालेलं नव्हतं. तरीही काश्मीरवर आक्रमण केलं, म्हणून ते ५५ कोटी रुपये देऊ नयेत, असं भारतातील काही लोकांना वाटत होतं. पण ती रक्कम पाकिस्तानची आहे, तो आर्थिक व्यवहार आहे, त्याची राजकीय प्रश्नांशी सांगड घालू नये, असं मत अनेकांचं होतं. स्वतंत्र भारताने काश्मीरसाठी प्राणपणाने लढावे, पण आर्थिक करार पाळावा आणि पाकिस्तानचे पैसे द्यावेत, असा आग्रह इतर अनेकांप्रमाणेच गांधीजींनीही धरला. खरं तर कोणताही प्रामाणिक माणूस असाच विचार करील. हे ५५ कोटी रुपये पाकिस्तानला देण्यासाठी गांधीजींनी भारत सरकारवर दबाव जरूर आणला; पण त्यासाठी उपोषण केलं नव्हतं. दिल्लीत चालू असलेले जातीय दंगे थांबविण्यासाठी गांधीजींनी उपोषण केलं होतं. योगायोग इतकाच की, हे उपोषण व ५५ कोटींचं प्रकरण एकाच काळात उद्भवलं होतं. अनंत अडचणींनी हैराण झालेल्या आपल्याच सरकारविरोधात उपोषण करण्याइतपत ‘अव्यवहारी’ हा महात्मा निश्चितच नव्हता!

म्हणजे, फाळणीला मान्यता द्यायला नको होती; लोकसंख्येची अदलाबदल करायला मान्यता द्यायला हवी होती; आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी आग्रह धरायला नको होता, असे जे तीन मोठे आक्षेप गांधीजींबद्दल द्वेष पसरविण्यासाठी वापरले जातात. त्यांची वस्तुस्थिती अशी आहे. आणखी काही आक्षेप सांगता येतील.

गांधीनी शब्द टाकला असता, तर भगतसिंग व इतर काही क्रांतिकारकांची फाशी टळली असती- असा एक साळसूद प्रश्न विचारून, गांधी हा माणूस किती कठोर हृदयाचा व निर्दयी होता, याचं रसभरीत वर्णन केलं जातं. याबाबतीत गांधीची भूमिका स्पष्ट होती. क्रातिकारकांचा हिंसेचा मार्ग गांधींना पसंत नव्हताच. त्यामुळे त्यांचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नव्हता. याबाबतीत गांधी काय करू शकले असते? क्रांतिकारकांनी प्रायश्चित्त घेऊन हिंसेचा मार्ग सोडून देण्याचं वचन दिलं असतं, तर त्यांची शिक्षा कमी करणसाठी प्रयत्न करायला गांधीजी तयार होते; पण गांधींचा हा विचार क्रांतिकारकांना पसंत नव्हता. मग हा तिढा कसा सोडवायचा होता? चौरिचुरा येथे झालेल्या हिंसक घटनेची जबाबदारी स्वीकारून गांधींनी प्रायश्चित्त घेतलं होतं आणि न्यायाधीशांना सांगितलं होतं, “मला जास्तीत जास्त शिक्षा द्या!” त्या वेळी फर्मावलेली सहा वर्षांची शिक्षा गांधींना ‘कमीत कमी’ वाटली होती.

‘गांधीजींनी, सुभाषबाबूंना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावला’, हा गैरसमजही जनमानसात रुजवला गेलाय. गांधीबाबा किती ‘पाताळयंत्री’ माणूस होता, हे सामान्यांच्या मनावर ठसविण्यासाठी हा युक्तिवाद केला जातो. पण तो किती अर्थहीन आहे, हे खोलात गेलं तर लक्षात येतं. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी कशी होती? दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या दरम्यान काँग्रेसमध्ये दोन गट पडले. महायुद्धाची संधी साधून ब्रिटनला कोंडीत पकडायचे; जर्मनी व जपानची मदत घेऊन सशस्त्र लढा उभारायचा आणि देश स्वतंत्र करायचा, अशा विचारांचा छोटा गट- त्याचे नेते होते सुभाषबाबू. या भूमिकेला दुसऱ्या मोठ्या गटाचा व गांधीजींचाही विरोध होता. नेमके त्याच वेळी (१९३८मध्ये) त्रिपुरा येथे काँग्रेसचे अधिवेशन होणार होते. या दोनही गटांनी आपले उमेदवार उभे केले. त्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सुभाषबाबू निवडून आले. गांधींचा पाठिंबा होता ते पट्टाभी सीतारामय्या पराभूत झाले. त्या वेळी गांधीजी म्हणाले, ‘हा माझाच पराभव आहे.’ आणि ते खरंही होतं. हिटलरच्या जर्मनीची व जपानची मदत घ्यायची की नाही, या मुद्द्यावरून ती निवडणूक लढवली गेली होती. सुभाषबाबूंचा विजय हा गांधीजींना आपला पराभव वाटला, यात नवल कसलं? त्या वेळी सुभाषबाबू अध्यक्ष झाले होते, पण काँग्रेस र्काकारिणीत त्यांच्या बाजूने बहुमत नव्हतं. त्यामुळे अनेक ठराव त्यांच्या विरोधात जात होते. म्हणून सुभाषबाबूंनी राजीनामा दिला. त्यानंतर लगेच ते जर्मनी व जपानला गेले; हे लक्षात घेतलं तर तो मतभेदाचा मुद्दा किती महत्त्वाचा होता, हे लक्षात येईल. हे तपशील विचारात घेतले, तर सुभाषबाबूंना गांधींनी राजीनामा देण्यास भाग पाडलं, हे म्हणणं चुकीचं ठरतं.

मित्रांनो, स्वत:साठी जीवनाचं तत्त्वज्ञान व देशासाठी स्वातंत्र्य मिळविण्याची साधनं म्हणजे ‘सत्य व अहिंसा’- असा ठाम विश्वास असणारे गांधीजी क्रांतिकारकांचा किंवा सुभाषबाबूंचा मार्ग कसा पसंत करतील?

गांधींनी आंबेडकरांशी ‘पुणे करार’ केला. त्या संबंधातही दोन गट अशीच टीका करतात. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला म्हणून नाराज झालेला एक गट, आणि दलितांना दुप्पट ‘राखीव मतदारसंघ’ दिले म्हणून नाराज होणारा दुसरा गट. पण तो करार करताना गांधींची भूमिका काय होती? अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देणं म्हणजे हिंदू समाजातच फूट पाडणं आणि देशाच्या विघटनास हातभार लावणं झालं असतं. म्हणून उपोषणाचं हत्यार गांधींनी वापरलं होतं.

फाळणी टाळण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून जीना यांना ‘पंतप्रधानपद’ आणि त्यांना वाटल्यास ‘सर्वच मंत्री मुस्लिम’ असा एक तोडगा गांधींनी सुचवला होता. या संबंधातही गांधींजींवर होणारी टीका-टिप्पणी अशीच निरर्थक आहे. या तोडग्याचा उत्तरार्ध कोणी लक्षात घेत नाही. स्वातंत्र्य मिळवताना सत्ता कोणाच्या हातात द्यावी, यासंबंधातील वादावरचा हा एक पर्राय होता. पण त्याचा पुढचा भाग महत्त्वाचा होता. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होतील; त्यात जीना व त्यांच्या पक्षाला जनमत प्राप्त झालं, तरच त्यांना पुढेही कारभार पाहता येईल.

यासंबंधात गांधींची भूमिका स्वच्छ होती. त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे. लोकांची इच्छा असेल, तर एखादा पारशीदेखील देशाचं नेतृत्व करू शकतो. “भंग्याच्या घरात जन्माला आलेली मुलगी ‘राष्ट्रप्रमुख’ झाली, तर मला सर्वाधिक आनंद होईल” या त्यांच्या विधानाचा उत्तरार्ध होता- “ती चारित्र्यवान व कर्तबगार असली पाहिजे.” समाजातील दुर्बल घटकांना- अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटू नये, यासाठी गांधीजी अनेक वेळा त्यांना झुकतं माप देत होते. यामागची भूमिका समाजाचं व देशाचं ‘विघटन टाळणं’ हीच होती.

मित्रांनो, मी सुरुवातीलाच लिहिलं- गांधीजी किती मोठे होते, हे सांगण्यासाठी हे पत्र नाही. त्यांच्याबाबत असलेले काही ‘गैरसमज’ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवले जातात, एवढंच मला सांगायचं आहे. काही कट्टरपंथी लोक गांधीजींना ‘फाळणीला करणीभूत असणारा माणूस, मुस्लिमांचे लोढणे गळ्यात अडकवणारा खलनायक, हिंदुराष्ट्राच्या मार्गातील धोंड, हिंदू संस्कृती पारदळी तुडवणारा धर्मद्रोही’ अशी विशेषणं लावतात. कट्टरपंथीयांचा दुसरा एक गट ‘ब्रिटिशांचा हस्तक, भांडवलदारांनी पाळलेला महात्मा’ अशा शिव्या देतो. ‘गांधींनी कोणतंच आंदोलन शेवटास नेलं नाही; क्रांतिकारकांचं खच्चीकरण केलं; त्यांची अहिंसा हे ढोंग होतं’ अशा प्रकारची सवंग विधानं करून ‘गैरसमज’ पसरविण्याचं काम हा गट करतो. एकंदरीत विचार केला, तर सर्वच कट्टरपंथी लोक गांधीजींबाबत द्वेष पसरवण्याचं काम करतात. त्यामुळे हा महात्मा गैरसमजांच्या भोवऱ्यात अडकला आहे.

मित्रांनो, मी गांधीजींचं अंध समर्थन करणार नाही. त्यांचे काही विचार, काही भूमिका मलाही मान्य नाहीत. पण त्यांच्या १३५व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माझ्या भावना पुढीलप्रमाणे आहेत-

कमीत कमी दोष असणारा, गांधी हा हाडा-मांसाचा ‘माणूस’ होता; आणि त्याने कमीत कमी चुका केल्या!

मित्रांनो, तुम्ही ऐकीव माहितीच्या तुकड्यांवर गांधीजींबाबत असलेले ‘गैरसमज’ बळकट करू नका. तसंच कोणी तरी सांगतोय म्हणून गांधीजींचा उदो-उदोही करू नका! तुमचं मत विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक बनवा; आणि मग काय ते ठरवा!

तुमचा मित्र

आकाश

(हा मूळ लेख साधना साप्ताहिकाच्या २ ऑक्टोबर २००४च्या अंकात ‘लाटा-लहरी’ या सदरातील एक लेख म्हणून प्रकाशित झाला होता. १ जुलै २०१५ रोजी साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘लाटा-लहरी : सहा तरुण मित्रांचे वादसंवाद’ या पुस्तकात या लेखाचा समावेश करण्यात आला आहे.)

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......