अं क ति स रा
(कुणी आहे की नाहीऽ... असा मीराचा आवाज येतो. पाठोपाठ मीरा येते. रंगमंच रिकामाच आहे. इकडे तिकडे हिंडून कानोसा घेते. सोबत अखंड... असंबद्ध बडबड... स्वतःवरच चिडलीय हे त्यावरून स्पष्ट व्हावं. पण त्याबरोबरच हा राग कुणावर तरी काढता यावा म्हणून ती टपलीय... पण कोणीच दिसत नाही. टेबलाकडं लक्ष जाते... गोपीनं माधुरीला ब्रँडी दिलीय... ती बाटली, ग्लास तिथंच... मीराला जणूं सुटकेचा मार्ग सापडतो... खालच्या कप्प्यातून मद्याची बाटली काढते. सवयीनं... अन् सवयीनंच ग्लासात ओतून घेते... ते घेत असताना... एकीकडे बडबडही चालूच...)
मीरा : गेलेऽऽ... सारेजण निघून गेले... या मीरेला एकटं सोडून... साऱ्यांना मीरा तर हवी... पण तिच्याबरोबर राहायला मात्र नको... कारण एकदा त्यांचं काम झालं... मी त्यांची झाले... की उरतो फक्त तिरस्कार... मलाही तसंच वाटतं म्हणाऽ... (एकदम लहान मुलीप्रमाणं) पप्पा... पप्पाऽऽ... तुम्ही तरी नकाहो जाऊ असे... तुमच्या या लाडक्या लेकीचं इतकंही ऐकणार नाही तुम्ही... पप्पा... पप्पाऽऽ... नका नं ऊंऽऽ (हताशपणे) पप्पाही असेच... पण त्यांनी... त्यांनीच मला गोपी दिला... माझा गोपी... केवळ माझाच!... मी कितीकांची असेन... पण गोपी मात्र केवळ माझा... माझाच होता... आहे! माझी सुखदुःखं... मानतो तो आपली... पण मीच अशी निष्ठूर की... ते जाणवल्यानं जाणूनबुजून दूरच जाते सुखापासून... अन् मग पिते... सुख शोधायचं म्हणून पिते... आणि त्यालाही प्यायला लावते... आम्ही आम्हालाच विसरतो... अन सुख... आम्हाला गवसत नाही सुख म्हणून... (उचकी) (तिचं बोलणं संपण्याआधीच नितीन आलाय... तिच्याकडे एकटक बघतोय.)
नितीन : तुम्हा सगळ्यांना झालंय तरी काय?... (मीराला पुन्हा उचकी) तुम्हीही... बाईऽऽ तुम्हीसुद्धा...
मीरा : मीहीऽऽ... मी काय?... अंऽऽ
नितीन : तिनंही बहुधा घेतलीय... माधुरीनं... इथं कुणीच नव्हतं... म्हणून... मी तिला शोधायला बागेत गेलो... तर ती तिथं बसली होती... मी खुणेनंच तिला म्हटलं... ये म्हणून... तर... तर...
मीरा : तर काय रेऽ ...
नितीन : तर तिनं डोळाच मारला... तिनं... माझ्या माधुरीनं...
मीरा : तिनं... हाः हाः हाःऽऽ तिनं डोळा मारला...? असा?... हंऽऽ अरे, पण तू कां घाबरलास? का तिनं कधी डोळा मारला नव्हता... कधीच... तिनं घेतली होती म्हणतोस... म्हणूनच ती असं वागली... स्वतःला विसरून... म्हणजे तिला सुख गवसलं... मग आता मलाहीऽऽ (ती पुन्हा टेबलाकडे जाऊ लागते. नितीन तिला अडवतो. ती चवताळते.) वाःऽ वाःऽ वा रे शूरऽ... मघाशी मारे बेडरूममध्ये आलास... अन् तसाच गेलास परत... नुसती सजावट पाहून... काय... काय वाटलं असेल मलाऽ... आता पुन्हा माझ्या सुखाच्या आड येऊ नकोस... चल... हट्! (एकदम निराळ्या स्वरांत... स्वतःला हरवून) प्रत्येक पुरुषाला व्हायचं असतं अश्व अश्वमेधाचा.... कारण मेल्यावर का होईना राणी रत होते त्याच्याशी... पण इथं जो माझ्या सहवासात येतोऽऽ... तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होतो... आणि मग... (पुन्हा वास्तवात येते) हुं:ऽऽ... सगळे साले सारखेच... फालतू! माऽरे इच्छा धरतात राणीशी संग करायची... अन् प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा... (पुन्हा वेगळ्याच पातळीवरून) उत्सुकतेनं मी वाट पहात असते... जशी ग्रीष्मात तापलेली धरती आतुरतेनं प्रतीक्षा करते वर्षाधारांची... त्या मीलनसुखाच्या अपेक्षेची हुरहुर कासावीस करते मला... अन् मला त्यावेळी पाहताना ते होतात खलास... ते नरपुंगव... अश्वमेधाचा अश्व बनण्यापूर्वीच जीव मरतात... आणि मी बिचारी... सम्रज्ञी असूनही भोग घेऊ शकत नाही...नाही... (एकदम अभिमानानं) त्यांची लायकीच नाही या मीरेला आपलंसं करायची... ते तर क्षुद्र जीव... अन् मी... आदिमाया... आदिशक्ती... प्रत्यक्ष शंकराच्या उरावर थयथया नाचणारी काली मी... आणि तुम्ही सारे मर्त्य मानव... माझी तृप्ती तुमच्याकडून व्हावीच कशी? तुम्ही सारे आहा... नालायक...निकम्मेऽऽ...
नितीन : बाईऽऽ... पण मी... मी तर...
मीरा : सर्वजण असंच म्हणतात... मी तुला सुखी करीन... तृप्त!
नितीन : पण मी तुम्हाला म्हटलं... मला तुम्ही आवडलात... ते काही त्या अर्थानं नाही... तुम्ही मला एकदम आईच वाटलात... त्यामुळंच... खरंच... (मीरा त्या आठवणीनं व्याकुळते. आपल्यातील स्त्री चा हा पराभव तिला नकोय!) अन् मला वाटतं... तुम्हालाही ते जाणवलं...
मीरा : हुं:ऽ (उसन्या अवसानानं) तेच ते... कारणं कारणं अन् आणखी कारणंऽऽ... अरेऽ तुम्ही दुसरं काय देणार? सगळ्यांची मेली एकच गत... अगोदर फुशारक्या... मोठमोठ्या बढाया... आणि नंतर... एकदम ओमफस्... मग काय... खोटी कारणं... सबबी... अपेशी साले षंढ... निकम्मे... त्यामुळंच त्यांनी मला बदनाम केलंय... ऐकलं असशीलच एव्हाना... तूऽऽ अंऽहंऽ लपवू नको काही... मला काही कळणार नाही असं... त्यांना वाटतं... पण मला सारं काही ठाऊक असतं... सारं सारं कळतंही त्यांच्याच तोंडून... माझ्या सहवासात आले की... जणूं काही कबुली देतात आपल्या पापकृत्यांची... माफीही मागतात... षंऽढ... नपुंसक साले... केवळ माझ्या सहवासाच्या मोबदल्यात... हुं:ऽ... सारेच क्षुद्र ... लाचार... लाळघोटे... म्हणूनच मला तो आवडतो...
नितीन : (अभावितपणे)... अंऽ कोण?
मीरा : गोपीऽ... माझा गोपी!!... मला तृप्त करणारा... शांत करणारा गोपी...
नितीन : (स्वरात अविश्वास)... कोण... सर?
मीरा : होऽ... गोपी! माझा गोपीनाथ... मला मला खरंखुरं समाधान देणारा... माझ्या सुखासाठी आपलं सर्वस्व उधळून टाकायला तयार असणारा गोपी...
नितीन : (किंचित कुचकेपणानं) हं:ऽ... तृप्त... सुखी...
मीरा : तुला काय कळतंय रेऽ... अरे, कालचा पोर तू... गोपी तसा कुणालाच पुरता उमगायचा नाही... मलाही नाही... पप्पांनासुद्धा... तरी तो मला आवडतो... भावतो... माझ्या सुखालाच तो स्वतःचं सुख समजतो... म्हणूनच... त्याला कष्टी बनवण्यासाठी मी स्वतःचं सुख टाळते... जणू स्वतःवरच अत्याचार करते... त्याला छळण्यासाठी म्हणून... पण तो सारं काही समजतो... जाणतो... मला तो अगदी पुरेपूर ओळखून आहे... माझे सारे डावपेच जसे काही त्याला अगोदरच समजतात... आम्ही काय काय खेळ खेळतो... तेवढाच विरंगुळा... त्या खेळांचे सारे नियम अर्थात मीच ठरवते... नि तो त्याबरहुकूम खेळतो... मग मीच फटाफट नियम बदलते... माझ्या सोयीसाठी... आणि मग तोही त्याच्या चाली बदलतो... तितक्याच सफाईनं... जराही खट्टू न होता... खरा लढवय्या आहे तो... गोपी... माझा गोपी... अन् तुम्ही सारे षंढ छक्के... लाचार... निर्लज्ज... निकम्मे... माझी बदनामी करणारे नीऽच... (स्वतःच्याच शब्दांतील कटूपणा जाणवतो... समजावणीच्या सुरात) तशी तुझी वागणूक चांगली आहे हंऽ... अन् तुझी बायकोही... (त्याच वेळी गोपी येतो, त्याने अर्थातच तिचं बोलणे ऐकलेय.)
गोपी : सुंदर आहे... हो तर... छानच आहे याची बायको... तरुण... सुंदर... नाजूक... इतकी नाजूक की... आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून... तिची आई बनायचीही तयारी नाहीय...
नितीन : सऽर... सऽऽर!
गोपी : या नितीनला मात्र मूल अगदी हवंच आहे... पण... तिची तशी इच्छा नाही... ती मातृत्व टाळतीय... स्त्री असून...
नितीन : सर... सर मला वाटतं...
गोपी : की हा विषय इथं नको!
नितीन : (घुटमळतो)... तसंच काही नाही... पण ही जरा खाजगी बाब नाही का...?
गोपी : (ताडकन्) ...आणि माझ्या बायकोबरोबर तूं सरळ तिच्या बेडरूममध्ये गेलास... ती बाब मात्र...
नितीन : (काकुळतीनं)... अहोऽ... पण... (मीरा त्याची समजूत घालायला जाते. त्याला अगदी जवळ घेते.)
मीरा : अरेऽ असं काय... मी तुला आईसारखीच भासले नंऽऽ माझा मुलगाही... अगदी तुझ्यासारखाच आहे... लाजरा... बुजरा...
नितीन : पण मी कुठं लाजलोय... उगाचंच काय...
मीरा : ओऽहोऽऽ... लाजत नाहीस तू? खरं की काय?... (पुन्हा त्याच्याशी लगट करू लागते. तो पटकन तिच्यापासून दूर जाऊ पाहतो... तशी हसते.) अ हॅ रेऽऽ... लाजत नाही म्हणे!... उगी उगीऽऽ... असं रागवायचं नाही हं... नाही नं रागावणार? (खुदखुदते.)
गोपी : मीराऽ... आता पुरे हंऽऽ...
मीरा : असं रे काय करतोस... आत्ता कुठं खेळात रंग भरू लागलाय... बघ ना... हा... हा नितीन म्हणतोय की, तो लाजत नाहीय... (पुन्हा नितीनला मिठीत घेण्याचा प्रयत्न करते. तो तिला टाळण्याच्या प्रयत्नात, पण अखेर त्याला सरकायला जागाच उरलेली नाहीय... तो कासावीस... ती आणखीच जोरात हसते... विकट...)
गोपी : मीराऽऽ तुला गप्प रहा म्हटलं मी. त्याची आठवण काढलीस खरी… पण... तो आता येणार नाहीय!!
मीरा : काय...? काय म्हणालास...? कोण येणार नाहीय...? न येऊ दे... येणार नसला तर न येऊ दे! (पुन्हा हसायला लागते... स्वतःशीच पुटपुटते आहे... अचानक त्या शब्दांचा अर्थ तिला आकलन होतो ... तत्क्षणी तिचे हंसणे थांबते.) (वातावरणात कमालीचा तणाव) काय... काय म्हणालास तूऽ??
गोपी : मी म्हटलं... हे सारं आता पुरेऽ! कारण तो काही आता येणार नाहीय... येऊच शकणार नाही तो आता...!...
मीरा : (व्याकूळ) कोण... कोण येऊ शकणार नाही... का येऊ शकणार नाही?
गोपी : कोण?... तुला ठाऊक आहे... तू ज्याच्याबद्दल बोलत होतीस, ज्याची आतुरतेनं वाट पाहात होतीस... तो... अवी... आपला अवीऽ ....
मीरा : अवी येणार नाही? आपला अवी उद्या येणार नाही...? का... का... तुला कुणी सांगितलं?... तुला कसं कळलं... (ठामपणे) मला फसवूं नको हंऽऽ! उद्या येणाराय तो... मला पक्कं ठाऊक आहे... उद्याच येईल तो... दुपारी...
गोपी : (गंभीरपणे) नाही.... उद्या तो येणार नाही... आता तो कधीच येणार नाही... (क्षणभर शांतता) तो गेला!.... गेला तो...!! (थोडा वेळ थांबून) मघाशीच तार आलीय... स्कूटरवरून भरधाव जात असताना... एका ट्रकवर तो आदळला... अन् जागच्या जागीऽऽच...
मीरा : (भयानकपणे ओरडते)... नाहीऽ... नाऽऽहीऽऽऽ!!
गोपी : जागच्या जागीच ठार झाला!! डोक्याला जबरदस्त मार लागून... चेहरा अगदी ठेचून निघा...
मीरा : बस्स कर... गोपीऽऽ... गोपीऽ... तू त्याला असं मारू नको रेऽऽ
गोपी : चे ह रा अगदी ठेचून निघाला होता... अंगावरचे कपडे रक्तानं माखले होते… जखमांतून ठिकठिकाणी मांस लोंबत होतं...
मीरा : (एकदम थंड स्वरात) नाही!... असं काहीही झालेलं नाहीय!! मला ठाऊक आहे... तू... तू... त्याला मारणारायस...
गोपी : (तिच्या बोलण्याची दखल न घेता) अपघाताच्या जागीच त्याला मृत्यू आला... तात्काळ...अगदी वेदनारहित मृत्यू... वाऱ्याच्या झुळुकीनं बकुळी... प्राजक्ताचं फूल टपकावं... तसा तो आपल्यातून गेला... अगदी सहजपणं... गेला तो...
मीरा : (तिचा विवेक सरलाय. मघाचं ओढून ताणून आणलेलं धोकादायक गांभीर्य संपलंय) नकोऽ... नको रेऽऽ... इतका क्रूर नको होऊ... इतक्यातच असा कसा बदललास रेऽऽ... अंऽऽ? एकदम असं का मारतोयस त्याला? (एकदम स्वतःच्या तंद्रीत हरवते.) किती प्रयासानं वाढवलं होतं त्याला आपण... अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं त्याला... तूऽ तू तर एक क्षणभरही त्याला दृष्टीआड करायला तयार नव्हतास... (एकदम रागानं कडाडते) अन्... अन आता एकदम त्याला असं भयानक मरण का रे देतोयस...
गोपी : हे बघ... मी असं काहीही केलेलं नाहीय... मी फक्त तुला सांगतोय... त्या तारेतला मजकूर... आता तेही जर तुला ऐकायचं नसलं तर...
मीरा : नाही.... मला काहीच ऐकायचं नाहीय... (त्याच्यावर धावून जाते) मला ठाऊक आहे... तुला तो कधीच आवडत नव्हता.... द्वेष करायचास तू त्याचा... माझा... माझा लळा होता नं त्याला... जीव टाकायचा तो माझ्यावर... म्हणून... म्हणून तूं त्याला असं मारून टाकतोयस... खून करतोयस त्याचा.... (गोपीला मारायला धावणार/जाणार, तोच नितीन तिला अडवतो. घट्ट पकडतो. क्षणात ती खचते... त्याचा आधार घेते.) तू... तू तरी सांग रे मलाऽ... सारं सारं खोटं आहे म्हणून... माझ्यावर सूड उगवायला बघतोय हाऽ... होऽऽनं? बघ... खरंच... खरं सांगशील ना.... (नितीन अवाक झालाय. त्याला काहीच उमगत नाहीय. प्रश्नार्थक मुद्रेनं तो गोपीकडे बघतो. तो नजरेनंच सारं काही ठीक आहे... असं खुणावतो.)
गोपी : एकदम धक्कादायक बातमी कळली नं तिला.... ती, ती भांबावलीय... तिची मानसिक तयारी नव्हती नाऽऽ... म्हणून बिचकलीय... खचलीय... पण सावरेल... अंऽऽ... ती तार आली ना प्रथम....
मीरा : (पुन्हा उसळते) नाहीऽऽ... खोटं आहे हेऽऽ...खबरदार पुन्हा खोटं बोलशील तर! मला काही करताय येत नाही ना त्याला... तेवढं त्याचं धाडस कुठाय... म्हणून... म्हणून माझ्या... माझ्या छकुल्याचा... गोऽड गोऽड छकुल्याचा... हा निर्घृण बळी देतोय... हा हरामखोर... चांडाळ...
गोपी : (शांतपणे)... मला नावं ठेवून का नियती चुकणार आहे? म्हणतातच ना... होणारे न चुके... अन् मृत्यू कुणाला चुकलाय... त्यानं नुकतंच लिर्निंग लायसेन्स घेतलं होतं... हंऽऽ... पहिला धडा घेतला.... तो मृत्यूचा... काळाच्या थंडगार...
मीरा : (फक्त विकल किंकाळी) पण... पण असं ठरलं नव्हतं... (हुंदके देत) तुला त्याला मारायचा अधिकार नव्हता... तूऽऽ... तू... नियम मोडलायस....
गोपी : मुळीच नाही!... त्याला केव्हाही मारायची मला मोकळीक होती...
मीरा : पण आपण इतकी वर्षं त्याला सांभाळलं... त्याचे लाड केले... अन् आता आज एकदम...
गोपी : तो गेला... मला वाटलं तसं... बस्स!... संपलं सारं!!...
मीरा : नाहीऽऽ.... तू असं मारायचं नाहीयैस त्याला... आपण....
गोपी : हे बघ मीराऽ... नियमांचं महत्त्व तू नको सांगू... नियम प्रथम कुणी मोडला... तू... तूच!
मीरा : छेःऽ मी नाही!
गोपी : आपलं ठरलं होतं नां... खरं सांग... ठरलं होतं नां... की कुणा तिऱ्हाइताशी त्याच्याबद्दल बोलायचं नाही म्हणून....
मीरा : पण.... पण मी कुठं कुणाशी बोललीय?
माधुरी : (प्रथमच धाडसानं स्पष्ट बोलते.) होऽऽ.... तुम्हीच मला म्हणालात मघाशी...
मीरा : (हुंदके देत) नाही... नाही.... मी नियम मोडला नाहीय... मी कुणाशीच काही बोलले नाहीय!... कुणालाच काहीही सांगितलेलं नाहीय!!
माधुरी : (तिला हुंदके आवरणं अशक्य... रडतच बोलते...) नाही कसं?... तुम्हीच सांगत होतात.... प्रथम मला काहीच कळत नव्हतं.... अन् आत्ताही काही कळत नाहीय.... पण तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सांगत होतात... अगदी रंगात येऊन... की... (रडतच राहाते.)
गोपी : झालं समाधान? हुं:ऽऽ!!... मला नियम सांगतीय... मी म्हणजे क्षुद्र किडा जणू... पण... कधी कधी क्षुद्र किडाही डसतो... कायमची सल राहते.... साधी गोष्ट होती... मी नियम पाळला... अन् तू मोडलास... अन् तू नियम मोडल्यावर मी कशालाच बांधील राहिलेला नाही... राहिलो नाही! मला प्रकर्षानं वाटलं... बस्स झालं... आता त्याचं जिणं संपलं... यापुढं त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही... खलास... काय... अं?
नितीन : (मधेच) काय?
गोपी : मी काय म्हणतोय?...
नितीन : अंऽऽ काय म्हणताय तुम्ही?...
गोपी : अंऽ... अंऽऽ... काय करतोयस... समजलं का नाही?
नितीन : समजलं नव्हतं आत्तापर्यंत... पण... पण आता मला वाटतं... की मला समजतंय...
गोपी : खरंच?
नितीन : हो.... सारं... सारं उमगतंय मला.... धागे जुळू लागलेत... अन् सारं काही स्पष्ट झालंय... निदान मला तसं वाटतंय...
गोपी : वाटायला काही उरलंच नाहीय आता... त्या अपघातात तो ठार झाला.... अन् सारं काही संपलं...
माधुरी : खेळ खलास....
गोपी : आत्मा देह सोडून गेला....
माधुरी : आत्मा अमर आहे....
गोपी : आता तो साऱ्या दुःखांतून मुक्त झालाय....
माधुरी : साऱ्या साऱ्याच्या पलीकडं गेलाय....
गोपी : नैनं छिन्दन्ति शस्त्राणी । नैनं दहति पावकः।।
माधुरी : आता त्याला कुठचंच शस्त्र इजा करू शकणार नाही... अग्नी जाळू शकणार नाही...
गोपी : त्याला अग्नी द्यायला हवा!
माधुरी : पण तरीही तो जळणार नाही.... जीवात्मा परमात्मा झालाय... अमर... चिरंजीव....
गोपी : वासांसि जीर्णानि...
माधुरी : ज्या प्रमाणं आपण जुनी मलीन वस्त्र टाकतो त्यागून... अन् परिधान करतो वस्त्रे नवी... त्याचप्रमाणं आत्मा करतो त्याग कुडीचा जुन्या ही जाण ठेवायला हवी!
गोपी : ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय....
माधुरी : आपण अंधारातून वाट दाखवणारी होऊ या ज्योत अन्... मरणातच आपण पिऊ या अमृत...
गोपी : ईश्वरेच्छा बलीयसी...
माधुरी : त्या सर्वशक्तिमान ईश्वराची इच्छा हाच अखेर कायदा या जगाचा....
गोपी : मरणं प्रकृतीः शरीरिणाम....
माधुरी : मरण हाच जीवनाचा खरा अर्थ आहे...
गोपी : पुनरपि जननं... पुनरपि मरणं...
माधुरी : जन्माला आलेली व्यक्ती... मरायचीच कधीतरी...मेल्यानंतरही जन्म तिचा... पुन्हा केव्हातरी
गोपी : ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।
माधुरी : ईश्वर मृतात्म्यास शांती देवो ....
गोपी : ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो....
माधुरी : तथास्तु!!
(काही काळ भीषण शांतता. रंगमंचावरील प्रकाश कमी होऊन काही काळ थरथरल्यासारखा... सारंगीचे गूढ सूर... त्यातच गोपी अन् माधुरीचा एकमेकांत मिसळणारा आवाज.)
मरणात खरोखर जग जगते... आधि मरण अमरपण मग येते...
मी जाता राहिल कार्य काय... जन पळभर म्हणतील हाय हाय...
अनंत मरणे आधि मरावी... दिव्यत्वाची आस धरावी...
सूर्य तळपतिल चंद्र झळकतिल... तारे आपुला क्रम आचरतिल...
असेच वारे पुढे वाहतिल...
नितीन : (मधेच)मला वाटतं मला समजतंय!!...
गोपी : ॐ शांतिः शांतिः शांतिः!!
नितीन : मला सारं कळतंय.... कळलंय!
माधुरी : तथास्तु!... तथास्तु!
मीरा : (रागानं... पण तो प्रकटपणे न दाखवता) बस्स... बास!... पुरे झालं सारं... बास करा आता... (प्रेमळपणे)... निघा हंऽ तुम्ही आता... चांगलाच उशीर झालाय...
नितीन : होऽ... निघायलाच हवं... ठरलेल्या अवधीनंतर आम्ही डावाबाहेर फेकले जायचेच....
गोपी : तुम्ही जा आता! निघा बरं पोरांनो... पळाऽ पळाऽऽ... (स्वगत) मुलं नको असलेली मुलं नकोयत मला!....
माधुरी : हो बाई... निघायचंच... चल रेऽऽ...
नितीन : (जवळजवळ सुटकेचा निःश्वास टाकतो) हंऽऽ माधुरीऽ... चल जाऊया!
(नितीन - माधुरी जातात. पाठोपाठ गोपी. लगेचच दार लावून परततो.)
गोपी : चलाऽऽ... संपलं सारं... खेळ खलास!!...
मीरा : असं वागायला नको होतंस रे तूऽऽ... का... का... साऱ्याचा सत्यानाश केलास?
गोपी : मला नाही वाटत माझं काही चुकलं म्हणून... ज्या गोष्टीची सुरुवात मी केली... तिचा शेवट कधी करायचा... हे ठरवायचा अधिकारही माझा... केवळ माझाच होता!
मीरा : नाहीऽऽ... तू एकट्यानं असा निर्णय घेऊ शकत नाहीस... काही झालं तरी... ती आपली निर्मिती होती.... आपण भिडू होतो.... मग असा तडकाफडकी... का... काऽऽ?
गोपी : झालं.... संपलं सारं....
मीरा : दुष्ट... क्रूर... संपलं म्हणे!... संपलं नाही... चांडाळाऽऽ... तूं ...तूं संपवलंस...
गोपी : (अत्यंत थंडपणे) ...होऽ! संपवलं...! मी. मीच संपवलं...! कारण... ते संपवायलाच हवं होतं... आशेची वेल कल्पनेत बहरली... तरी प्रत्यक्ष आधाराला हात गेला... तर तिचा उपयोग होत नाही! तो... तो माझा आधार होता... कल्पनेतलाच. या जगातून जाताना माझी खूण मागं ठेवायची होती मला... मला मूल हवं होतं... छोटंसं... गोजिरवाणं बाळ हवं होतं... पण तुला हवा होता केवळ भोग.... शरीराचे भोग तुला हवे होते... पण क्लेष सोसायची तुझी तयारी नव्हती.... आपल्याच कामाच्या आहार गेलीस तूं... अन् त्या क्रीडेत खंड नको म्हणून टाळलंस मातृत्व.... तृप्तीसाठी. पण मातृत्वाखेरीज तृप्ती नाही... हे मात्र विसरलीस.... भोगाच्या इतकी आहारी गेलीस तू.... की... तेवढं एकच उद्दिष्ट उरलं तुझं... वासना थंडावण्यासाठी.... काहीही करायची तुझी तयारी होती.... मीराऽ... हुं:... मीरा... त्या मीरेला केवळ एकटा गिरीधर गोपाल हवा होता... राणादेखील दुसरा कोणी... म्हणून ती त्याच्यापासूनही दूरच राहिली होती... अन् तूही मीराच! पण जो येईल तो पुरुष तुझा गिरीधर गोपाल होता... तुझी शिकार होता... तुझी शिकार बनत होता...
मीरा : (किंचाळते) बाऽस.... बऽऽस!... नसतं काहीतरीच बोलतोयस तू....
गोपी : नाही... खरं तेच बोलतोय... खरं तेच सांगतोय... खरं सांगायलाही योग्य वेळ यावी लागते... आणि आज ती आलीय... आज खरं सांगायलाच हवं.... मीराऽ... आज नितीन सुखरूप निसटला... तुझं जाळं... तुझं मायाजाल त्याला गुरफटवू शकलं नाही... तुझे विभ्रम त्याला विचलित करू शकले नाहीत.... तुझी नजर त्याला खिळवूं शकली नाही... तुझं शरीर... ते शरीरही त्याला आकर्षित करू शकलं नाही... मीराऽऽ तुझं सामर्थ्य नाहीसं झालंय... तू... तू स्त्री उरली नाहीयेस... मीराऽ... तू रती नाहीस... मादी नाहीस... कुणीकुणीच नाहीयेस तू... (तिचा चेहरा पांढराफटक पडलाय... विकल... कानावर हात ठेवून मानेनंच बोलू नको... बोलू नको अशी खूण करतीय... पण तो आता ऐकत नाही. खस्सकन् तिचे हात कानावरून काढून टाकतो.) असे कान झाकल्यानं सत्य गप्प राहणार नाही, मीराऽ! तू सत्याला सामोरं जायला हवंस... ज्या आतुरतेनं जात होतीस कोणाही येणाऱ्या पुरुषाच्या स्वागताला....
मीरा : नकोऽ... नको नारेऽऽ गोपीऽऽ... माझं ऐक नाऽरे गोपीऽऽ ऐक ना!
गोपी : (स्वतःच्याच विचारात मश्गूल)... तेव्हा मीही असाच व्याकूळ होतो.... आर्जवं करत होतो तुझी... तुझी आर्जवं अन् तुला विनवण्या... मीराऽ... मीराऽऽ... आठवतंय तुला... मला हव्यास होता मुलाचा... अवतीभवती मुलांचा गराडा असता तर मी स्वर्गसुखात न्हालो असतो... पण... पण तुला काळजी होती... तुझ्या देहाची... सौंदर्याची... सुखाची... तरी पण त्याची परिपूर्ती अखेर मातृत्वात असते हे मात्र तू विसरलीस.... पहिलटकरणीच्या लाडिक मागण्या... गर्भवतीचं तेज... मातृत्वाचं मांगल्य... अन् आईपणाची सोज्वळता... साऱ्यासाऱ्याला मुकलीस तू... आणि मलाही वंचित ठेवलंस... पितृत्वापासून... आता हा वंश खुंटला... मला... माझ्या पितरांना... अन् तुलाही आता गती नाही... मुक्ती नाही!... वासनेच्या अतृप्तीच्या चक्रात तू आता अडकलीस... जखडली गेलीस... कायमची... अतृप्ता... वांझ... वांझोटी तू... (क्षणभर सारं काळोखल्याप्रमाणे भासते... पुन्हा उजेड... तिच्यावर... तिची नजर शून्यात.)
मीरा : वांझोटीऽऽ... वांऽझ.... (भयानकपणे हसते)... माझ्याजवळ कोणी मुलांना पाठवू नका.... कुणीही माझ्याजवळ येऊ नका.... .... ....म्हणूनच का रेऽ परत पाठवलंस... त्या पोरांना... घाईघाईनं हाकललंस... (क्षणभर थांबते. त्याच्याकडे रोखून बघते... तो अविचलित.) तू चुकलास गोपी... मला ओळखलंच नाहीस अखेर... अरेऽ मी लोभी होते... भोगी होते... मुक्त होते... पण तरीही मी स्त्रीच होते... स्त्री... या शरीरावर फार फार प्रेम केलं मी गोपीऽ... तुझ्याहून जास्त... म्हणून जपत होते... मुलाप्रमाणं त्याला... तळहातावरच्या फोडासारखं... करत होते त्याचं कोडकौतुक... पुरवीत होते त्याचे लाड... त्यासाठीच त्याला देत होते वेगवेगळी खेळणी.... होऽऽ... निव्वळ खेळणीच होती ती... आवडलं जवळ केलं... नावीन्य सरलं... दूर लोटलं... की विसरलं... बस्स! नव्यानव्याचा शोध... नावीन्याचा शोध... जणूं ती शरीराला नवी नवी लेणीच होती... त्यांची भाषा... त्यांची नजर... त्यांचा शृंगार... अरेऽ... अलंकार होते या देहाचे...
गोपी : तरीही तुझं चुकलंच मीराऽ... शरीराला मुलासारखंच वागवलंस खरं... पण त्यामुळं खऱ्याखुऱ्या मुलाला मुकलीस तूं... राखायला गेलीस शरीराचं ताजेपण... बहर... पण ती एक झुंज होती... हरण्यासाठी टकरायची! स्वतःला फसवून तू ती टक्कर घेतलीस... तरीही अखेर तिची परिणती होती... तुझ्या पराभवातच! तू हरलीयस... मीराऽऽ तू हरलीयस... (दुरून आल्यासारखा पण स्पष्ट ऐकू येणारा आवाज... थोर नवलाऊ झाला... वांझी पुत्र प्रसवला...)
मीरा : नाहीऽ... गोपी... गोपीऽऽ तूं सावर मला... मला तुझा आधार हवाय गोपी... मी… (पुन्हा तोच आवाज... आता किंचित मोठा...वांझी पुत्र प्रसवला.... .... ....कानावर हात ठेवते... मोठ्यांदा) नाही ऽऽ ...गोपीऽ मी वांझ नाही... मला मूल हवंय गोपीऽऽ... मला तुझं मूल हवंय... मला क्षमा कर गोपी... मला आई व्हायचंय... मला खरीखुरी स्त्री व्हायचंय... पूर्णपणं स्त्री व्हायचंय... परिपूर्ण स्त्री!! माझी चूक मला मान्य आहे. पण आता मी काहीही करायला तयार आहे रेऽ... (तो आवाज पुन्हा मोठ्याने ऐकू येतोय... विंचू पाताळासी जाय... .... .... ....) थांबव तेऽऽ! थांबवा... कुणीतरी बंद करा नंऽऽ (आपली असहायता तिच्या लक्षात येते... क्षणभर गप्प राहाते आणि मग कातर स्वरात बोलू लागते...) गोपी... गोपीऽऽ... तुला तरी वाटत नाही ना... गोपी तू खरंच मला समजून घेतलंयस ना... मला सुखी करायचा तू प्रयत्न केलास... नेहमीच... पण तेव्हा मलाच सुख नको होतं... (खिन्नपणे हसते) आणि आता तर आपल्या दोघांनाही सुख सोडून गेलंय... मी... मी कायम जिंकले गोपीऽ... अन् जेव्हा जिंकायला हवं होतं... तेव्हा मात्र पराभूत झाले... हरले... सपशेल हरले... निष्प्रभ झाले... उद्ध्वस्त झाले... मला आधार हवाय गोपी... तुझ्या बळकट बाहूंचा... निश्चयी मनाचा... गोपीऽ... मला सावर रे गोपी.... (आपण अखेर विजयी झालोय हे लक्षात येऊन गोपी हसतो, पण दुसऱ्याच क्षणी मीराची विकल अवस्था त्याला जाणवते... हलवून टाकते.... तिला मिठीत घेऊन हलकेच थोपटतो.)
गोपी : निराश होऊ नकोस मीरा... तू हरलीयस खरी... पण माझा तर सारीपाटच उदध्वस्त झालाय... आता दान टाकायला फासेच नाहीत आपल्यापाशी मीराऽ... आता डाव सावरायला संधीच नाही... अन् आता आपण दोघं खेळूंही शकणार नाही... तू... तू... (स्वतःला सावरतो)... आपण नियती बदलू पाहिली... करायला गेलो मात प्राक्तनावर... पण आता प्राक्तनच हसतंय आपल्याला... या या बेवारस पती पत्नीला... ज्यांच्याबरोबर त्यांचा सारा वंशच संपलाय... (अचानक थांबतो... चेहरा कठोर... आक्रमक. निश्चयाने बोलू लागतो.) नाहीऽऽ!! प्राक्तनाला ते समाधान मी मिळू देणार नाही.... (तिच्यापासून दूर होतो.) आपण चुकलो... नियती हसली.... सारं खरंय.... पण आपणच अखेर हसणार आहोत मीराऽ... हसणार आहोत... साऱ्या समाजाला... नियतीला... कळीकाळालाही हसणार आहोत.... (ती अपेक्षेने त्याच्याकडे बघतीय.) मीराऽ, मी तुला मूल देऊ शकणार नाही आता.... आपलं ते सारं गणितच चुकलं.... पण आता ताळा मात्र मी बरोबर मांडणाराय.... मीराऽ तुला मूल होऊ शकणार नाही... ते वय केव्हाच गेलंय... तरी पण मी तुला मूल देणारंय मीराऽ... मीरा... मीच तुझा मुलगा होणारै... मी तुझा मुलगा बनेन मीराऽ... तुझा पिता जर कधी तुला पती म्हणून हवासा वाटला होता...तर... मग मी मुलगा झालेला चालेल की तुला... नक्कीच आवडेल... (ती थक्क झालीय. तिला काही कळतच नाहीय.) अशी गप्प राहू नकोस मीरा... नवा खेळ सुरू झाला आहे... तू आई झालीयस मीराऽ... आपण जिंकलो... मीरा... आईऽऽ
मीरा : जिंकलो रे आपण.... जिंकलो! अन् हरलोही... (मीरा रडू लागते... प्रथम हळूहळू... मग मोठा होत जाणारा आवाज...
तुका म्हणे सोपी... केली पायवाट...
उतरावया भवसागर रेऽ...।।
खेळ मांडियेला... खेळ मांडियेला...
(रेकॉर्ड अडखळून तीच ओळ वाजत राहते...)
(मीरा हसते... तोही हसतो... ती हसता हसताच रडू लागते... पुन्हा हसते... त्यांचं रडणं हसणं चालू असतानाच पडदा पडतो.)
चटकन् रेकॉर्ड पुढे सरकून कोरस...
खेळ मांडियेला... । वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रेऽऽ....
(ति स रा अंक स मा प्त)
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment