गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!
दिवाळी २०२५ - लेख
जयंत राळेरासकर
  • गुरुदत्त
  • Fri , 17 October 2025
  • दिवाळी २०२५ लेख गुरुदत्त Guru Dutt प्यासा Pyaasa कागज के फुल Kaagaz Ke Phool साहिब बीबी और गुलाम Sahib Bibi Aur Ghulam

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता गुरुदत्त ही आता एक दंतकथा झालेली आहे, तर त्यांचे चित्रपट ‘कल्ट’ बनले आहेत. पोटात वेदना आणि डोक्यात कैफ घेऊन जगलेल्या या कलंदर कलावंताच्या आयुष्याची शोकात्म अखेर झाली, पण त्यांनी तोवर केलेले चित्रपट आजही विस्मरणात गेलेले नाहीत. उलट त्यांच्याविषयी वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून लिहिले जाते. ९ जुलै २०२४ ते ९ जुलै २०२५ हे गुरुदत्त यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना, त्यांच्या सिनेमांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्याचाच भाग असलेला हा एक विशेष लेख…

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

गुरुदत्तच्या अंतर्मनात कसली वेदना होती देव जाणे! निर्मितीमधील कैफ हेच जणू त्यांचं आयुष्य होतं. व्यक्ती आणि कलावंत यांच्यातले ताणेबाणे त्यांना सोडवता आले नाहीत, पण ते साकार करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी आपल्या चित्रपटांमधून केला.

गुरुदत्तचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला, त्या वेळी ते वसंतकुमार होते. शिवशंकर आणि वासंती पदुकोन यांच्या घरात बंगळूरूत सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्याचा जन्म झाला. वडील शिवशंकर आणि आई वासंती दोघंही शिक्षणक्षेत्रात होते. आई वासंती लेखनही करत असे. गुरुदत्तला दोन भाऊ आणि एक बहीण होती. आत्माराम हा भाऊ कायम गुरुदत्तसोबत होता. त्यांनी ‘गुरुदत्त फिल्म्स’ ही निर्मिती संस्था पुढे कायम ठेवली होती. गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांचा सांभाळदेखील आत्माराम यांनीच केला.

बहीण ललिता लाजमी ही उत्तम चित्रकार होती. तिची मुलगी कल्पना लाजमी स्वत: निर्माती, दिग्दर्शक आणि पटकथाकार होती. निर्माते दिग्दर्शक श्याम बेनेगल हे गुरुदत्तच्या जवळच्या नात्यातले होते. एकंदरीत सगळा गोतावळा कलावंतांचा होता.

कुमारवयात असतानाच गुरुदत्त बंगालला गेले. कोलकात्याच्या भवानीपूर भागात ते राहत. साहजिकच त्यांच्यावर बंगाली संस्कृतीचा मोठा प्रभाव पडला. बंगाली भाषाही त्यांना अवगत झाली. याच काळात ते वसंतकुमारचे गुरुदत्त झाले.

१९४२ साली गुरुदत्त अलमोडा येथील उदय शंकर यांच्या नृत्यशाळेत होते. तिथं त्यांना नृत्य, नाटक आणि संगीत यांचं शिक्षण मिळालं… ते कोरिओग्राफीही शिकले, पण तिथं ते रमले नाहीत. त्यात महायुद्धाची धामधूम होती. त्यामुळे १९४४मध्ये गुरुदत्त मुंबईत आले. त्यानंतर यथावकाश आपल्या एका काकाच्या ओळखीनं पुण्यात ते प्रभात फिल्म कंपनीत कोरिओग्राफर म्हणून दाखल झाले आणि सिनेमाच्या दुनियेत  पर्दापण केलं. त्यांनी विश्राम बेडेकर यांच्या ‘लाखारानी’चं नृत्य-चित्रण केलं आणि त्यात एक छोटी भूमिकादेखील केली.

प्रभात कंपनीचा तीन वर्षांचा करार संपवून ते मुंबईत आले. पुण्याच्या या वास्तव्यात त्यांना देवआनंद आणि रेहमान हे दोन मित्र मिळाले. १९४७च्या सुमारास गुरुदत्त मुंबईत आले खरे, पण काही महिने ते बेकार अवस्थेत होते. नंतर ते अमिया चक्रवर्ती आणि ग्यान मुखर्जी यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. अमिया यांचा ‘गर्ल्स स्कूल’ आणि ग्यान मुखर्जी यांचा ‘संग्राम’ हे दोन चित्रपट चालू होते. मुखर्जी बॉम्बे टॉकीजशी संबंधित होते. तिथं बड्या मंडळींचा राबता होता.

देव आनंद स्वत:च्या ‘नवकेतन’च्या उभारणीत मश्गुल होता, पण तो गुरुदत्तची मैत्री विसरला नव्हता. त्यातून त्यांनी एक अनोखा करार केला - गुरुदत्तने चित्रपटनिर्मिती केली, तर देव आनंद हिरो असेल आणि देव आनंद निर्माता झाला तर, गुरुदत्त दिग्दर्शक असेल. हा करार दोघांनीही पाळला. देव आनंदने नवकेतनच्या बॅनरखाली ‘बाजी’ (१९५१)ची निर्मिती केली आणि दिग्दर्शन गुरुदत्तकडे सोपवलं. मैत्रीच्या त्या करारात देव आनंदने प्रथम बाजी मारली, तर गुरुदत्तने गुरुदत्त फिल्म्सच्या बॅनरखाली ‘सीआयडी’ (१९५६) काढला, तेव्हा देव आनंदला हिरो केलं. ‘सीआयडी’चं दिग्दर्शन मात्र त्याने राज खोसलांना दिलं.

१९५३पर्यंत गुरुदत्तने स्वत:ची टीम निर्माण केली. फोटोग्राफर व्ही.के. मूर्ती, लेखक अब्रार अल्वी, वहिदा रहेमान, जॉनी वॉकर ही सगळी मंडळी त्याच्या कुटुंबातली होऊन गेली. सुरुवातीला गुरुदत्तने ‘बाज’, ‘जाल’, ‘बाजी’, असे चित्रपट निर्माण केले. त्यानंतरच्या ‘आरपार’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ या चित्रपटानंतर मात्र गुरुदत्त बदलला आणि त्याचे विषयही. हे चित्रपट करमणूकप्रधान किंवा गुन्हेगारी विषय असणारे होते.

त्यानंतर १९५७ साली आला ‘प्यासा’. गुरुदत्तनी एकंदर २२ चित्रपट निर्माण केले. दिग्दर्शन आणि अभिनयदेखील केला. मात्र गुरुदत्त म्हटलं की, आठवतात ते ‘प्यासा’, ‘कागज के फुल’ आणि ‘साहिब बीबी और गुलाम’ हे तीन चित्रपट.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

प्यासा (१९५७)

‘प्यासा’ हा गंभीर विषयावरील वेगळा चित्रपट होता. गुरुदत्तमध्ये हा बदल कसा झाला आणि का झाला, ही आश्चर्याची गोष्ट आहे. मधल्या काळात गुरुदत्त काय चिंतन करत होते, त्यांच्या मनात काय चाललं होतं, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. इतकं नक्की की, जगण्याच्या प्रक्रियेतील तणाव गुरुदत्तला अस्वस्थ करत होते. हा शोध घेण्यास कारणीभूत ठरला तो बिमल रॉय यांचा ‘देवदास’, असे लेखक कृपाशंकर शर्मा म्हणतात. गुरुदत्तचं चिंतन नेमकं काय होतं, याचा आज शोध घेण्यात अर्थ नाही. मात्र पारो, चंद्रमुखी आणि देवदास यांच्या अनोख्या प्रेमाची तहानलेली अभिव्यक्ती गुरुदत्तसाठी आव्हान ठरली, यात काही तथ्य असावं.

कुंदनलाल सैगल यांच्या ‘देवदास’नंतर प्रभातने त्याला उत्तर म्हणून ‘आदमी’ काढला. जीवन जगण्यासाठी आहे, असं ठाम मत शांतारामबापू यांनी मांडलं होतं, त्याचीदेखील आठवण ‘प्यासा’च्या निमित्तानं होतं. मतांचा हा दृष्टीकोन बाजूला ठेवला, तरी ‘प्यासा’ ही कलात्मक निर्मिती होती, याबद्दल मात्र दुमत होऊ नये. ‘टाईम’ साप्ताहिकाच्या एका सर्वेक्षणात ‘प्यासा’ची ‘श्रेष्ठ चित्रपट’ म्हणून निवड झाली होती आणि त्याला पाचव्या क्रमांकवर स्थान दिलं होतं. अर्थात केवळ म्हणून नव्हे, तर एक उत्तम चित्रपट म्हणून ‘प्यासा’ आजही दाखवला जातो आणि त्यावर चर्चा होत असतात.

‘प्यासा’च्या कलात्मकतेत साहीर लुधियानवी यांचादेखील मोठा सहभाग आहे. स्वत: साहिरदेखील या सगळ्या अवस्थांमधून गेलेला शायर होता. गुरुदत्तच्या अंतर्मनातील खळबळ व्यक्त करण्यासाठी साहीरने संवेदनशील, अर्थपूर्ण गीतं लिहिली. गुरुदत्तचा नायक विजयसुद्धा कवीच असतो.

‘प्यासा’ची मूळ कथा गुरुदत्तने मुंबईतल्या बेकारीच्या काळातच लिहिली होती. त्या वेळी त्या कथेचं नाव होतं- ‘कश्मकश’. मात्र त्या कथेत नसलेली वेश्या मात्र अब्रार अल्वीनं निर्माण केली, असा एक प्रवाद आहे. सुखासीन आयुष्यासाठी मीना विजयला नाकारते. वास्तविक वेश्येच्या पात्राबद्दल गुरुदत्तच्या मनात खूप प्रश्न होते, पण अखेर त्यांनी हे पात्र स्वीकारलं. फक्त त्यातील काही भडक प्रसंग मात्र बदलले.

समाजाच्या बेपर्वा प्रवृत्तीमुळे निर्माण झालेली विफलता व्यक्त होणं, ही प्यासा’च्या मागे गुरुदत्तची भूमिका असावी. एरव्ही आपल्या आयुष्यात सहसा न सापडणारं हे प्रेम कुठल्या व्याख्येत बसवणं तसं अवघडच. बरंचसं वैयक्तीक आणि गूढ असे दु:ख किंवा वेदना रसिकांपुढे मांडावी आणि त्याच वेळी समाजाबद्दलसुद्धा भाष्य करावं, असं गुरुदत्तना वाटलं असावं.

देवदासने आपली वेदना दारूत बुडवली होती, पण ‘प्यासा’च्या कवी विजयने तसं काही करत नाही वा आत्मनाशाच्या वाटेवरसुद्धा तो जात नाही. समाजाच्या बेफिकीर वृत्तीची त्याला चीड असते. विजयच्या कथित मृत्युनंतर त्याचा पहिला स्मृतिदिन असतो, मात्र प्रत्यक्षात विजयच त्या सभागृहात येतो आणि कविता म्हणतो. कार्यक्रमात गोंधळ उडतो. समाजाची ही कानकोंडी भूमिका पाहून विजय व्यथित होतो. स्वत:च्या कवितांच्या स्वामित्वाबद्दलच्या भावना थिजल्या अवस्थेत असताना तो निघून जातो. फक्त गुलाबो त्याच्या सोबत जाते.  

चित्रपटाच्या अखेरीस गुलाबोला घेऊन तो आपल्या मार्गावर जातो. दुनियादारीची त्याला चीड येते, पण तो आत्मनाशाचा मार्ग स्वीकारत नाही. ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हैं...’ ही भावना घेऊन तो निघून जातो. हे सकारात्मक चित्रण असूनसुद्धा प्रत्यक्ष आयुष्यात गुरुदत्त मात्र...

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘प्यासा’ला जे यश मिळालं, ते ‘कागज के फूल’ला मिळालं नाही. ‘कागज के फूल’ ही गुरुदत्तच्या आयुष्याची कथा होती. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी गुरुदत्तनी ‘चौदहवी का चांद’ काढला. त्यात भूमिकाही केली, पण दिग्दर्शक म्हणून एम. सादिकची निवड केली. एम. सादिक हे मुस्लीम परंपरा आणि रिवाज याचे जाणकार होते. साहजिकच ‘चौदहवी का चाँद’ त्यांच्याकडे गेला. या चित्रपटामुळे गुरुदत्त ‘साहिब बीबी’चं स्वप्न पाहू शकले, हेदेखील तितकंच खरं.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

कागज के फूल  (१९५९)

ही गुरुदत्त यांची दुसरी निर्मिती. ‘प्यासा’मध्ये नायक विजय कवी असतो, तर ‘कागज के फूल’मध्ये नायक सुरेश सिन्हा एक यशस्वी दिग्दर्शक असतो, पण त्याचं कौटुंबिक आयुष्य मात्र दु:खमय असतं. तो स्वतंत्र राहत असला, तरी हॉस्टेलवर राहणाऱ्या आपल्या मुलीवर त्याचं प्रेम असतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे मुलीचा ताबा आईला मिळतो आणि सुरेश सिन्हा कोलमडून पडतो. योगायोगानं त्याला त्याच्या चित्रपटासाठी अभिनेत्री मिळते. चित्रपट होतोदेखील, पण ती अभिनेत्री रसिकांच्या गळ्यातील ताईत बनते. अभिनेत्रीच्या लोकप्रियतेमुळे तिच्या भोवती रसिकांचा गराडा पडतो आणि सुरेश सिन्हा मात्र एकटा पडतो. त्यांच्यातील अंतर वाढते. तो हताश आयुष्य जगू लागतो, त्याची प्रतिभा गळून पडते.

‘प्यासा’ काय किंवा ‘कागज के’ फुल काय, या कलावंतांच्या कथा. मनस्वी आणि उदध्वस्त आयुष्याचं गूढ उकलताना स्वत: गुरुदत्त कुठल्या मार्गानं जात होता, हे आजही अनाकलनीय आहे. ‘कागज के फुल’चा सुरेश वैयक्तिक आयुष्यातसुद्धा दुर्दैवी असतो. चित्रपटासाठी हवा तसा चेहरा सुरेश सिन्हाला अखेर शांतीच्या स्वरूपात सापडतो. शांती लोकप्रिय अभिनेत्री बनते. मात्र दिग्दर्शक म्हणून सुरेश सिन्हा हताश होत जातो. वैयक्तिक आयुष्यातील दुःखात त्याच्यातील सर्जनशील दिग्दर्शक मागे पडतो. दारूमुळे त्याचं आयुष्य उदध्वस्त होतं. शांतीभोवती मोठं वलय निर्माण होतं, त्यामुळे मनात असूनसुद्धा ती सुरेशपर्यंत पोहोचू शकत नाही.

सुरेशची हताश अवस्था त्याच्या कौटुंबिक आयुष्याची आहे. पत्नीसोबत त्याचे संबंध दुरावले आहेत, न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला मुलीचा ताबा मिळत नाही. दिशाहीन, भणंग आयुष्य त्याच्या वाटेला येते. योगायोगानं त्याच्या आयुष्यात आलेली शांती त्याला उभारी देण्यासाठी तयार आहे, मात्र तसं घडत नाही. रसिकांच्या गराड्यात अडकलेली शांती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. शांतीची अवस्था ही हतबलता आहे का प्रतारणा, याचा निर्णय न घेता सुरेशची अखेर होते. भोवती सगळी त्यानेच उभी केलेली दुनिया असते, पण त्याचं असं काहीच नसतं. त्याची प्रतिभासुद्धा राहत नाही. जुन्या आयुष्यातील पाऊलखुणा मनात जागवत असताना सुरेश स्टुडियोत येतो आणि तिथंच दिग्दर्शकाच्या खुर्चीत त्याच्या आयुष्याची अखेर होते. ‘कागज के फूल’ ही तशी गुरुदत्तची आपबिती आहे. सुरेश सिन्हा आणि गुरुदत्त दिग्दर्शक आणि व्यक्ती म्हणूनदेखील समांतर दिसतात. कलावंताच्या मनातील कला आणि यश याच्या कैफात आपलं माणूस दूर जाणं, अपरिहार्यच असतं का?

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

साहिब बीबी और गुलाम (१९६२)

गुरुदत्तचा हा तिसरा चित्रपट होता. ‘कागज के फूल’च्या अपयशानंतर गुरुदत्तने दिग्दर्शन करायचं नाही, असा निर्णय घेतला होता आणि अब्रार अल्वीकडे ती जबाबदारी दिली होती. अब्रार अल्वी दीर्घकाळ गुरुदत्तचा पटकथाकार आणि संवादलेखक होते. दीर्घकाळ गुरुदत्तच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात गुरुदत्त दिसले, यात आश्चर्य नाही. कथेचे मूळ लेखक बिमल मित्रा यांच्याकडून हक्क आधीच घेतले होते. शिवाय बंगाली भाषेत हा चित्रपट निघाला होताच. जमीनदारीची विपन्नावस्था आणि या दुर्दैवी ऐश्वर्यात अडकलेली छोटी बहु असा हा विषय होता.

चित्रपट सुरू होतो, त्या वेळी एका भग्न हवेलीच्या अवशेषात उभा भूतनाथ दिसतो. कथानक फ्लॅशबक तंत्रानं उलगडत जातं. भूतनाथ वास्तूरचनाकार असतो. एकेकाळी तो याच हवेलीचा एक भाग असतो. त्या भग्न अवशेषातून भूतनाथला एक स्त्रीचा आवाज ऐकू येतो. भूतनाथच्या समोर ऐश्वर्याचा काळ येतो. त्याला आता ऐय्याशीचं ग्रहण लागलेलं असतं. कबुतरबाजी, दारू, कोठ्यावरची ऐय्याशी, नाचगाणं हेच फक्त उरतं. हवेलीतल्या स्त्रियांना कसलंही स्थान नसतं. त्यांनी फक्त शृंगार करावा, दागिने ल्यावे, ही हवेलीतल्या जमीनदार पुरुषांची दृष्टी.  

छोटी बहु आपल्या पतीनं घरात राहावं, टिकावं यासाठी अनेक प्रयत्न करते. कुठल्याही समर्पणास तयार असते. पतीसाठी ती दारूदेखील पिते. आपण या हवेलीत एक नोकर आहोत, हे भूतनाथ विसरत नाही, पण छोटी बहु आणि तिचं दु:ख मात्र त्याला बेचैन करतं. योगायोगानं भूतनाथ आणि छोटी बहु यांचे भावबंध जुळतात.

अखेर भूतनाथ आणि छोटी बहु बग्गीतून मंदिराकडे जाताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. त्यात भूतनाथ जखमी होतो. हवेलीतला नोकर त्याला सांगतो की, छोटी बहुचा काहीच पत्ता लागत नाही. फ्लशबक संपतो...!  

त्याच हवेलीच्या अवशेषावर भूतनाथ आज उभा दिसतो. कामावरील मजूर बातमी घेऊन येतात की, खणताना त्यांना एका स्त्री देहाचा सांगाडा सापडला आहे. अस्थिपंजर देहावरील दागिने बघून भूतनाथच्या लक्षात येतं की, ही तर छोटी बहु! समर्पणाच्या टोकाच्या भूमिकेमुळे छोटी बहु चर्चेत राहली, पण तिच्या मनातील गुंतागुंत आणि संभ्रम समजणं, सोपंदेखील नाही.  

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सिनेमा आणि कलात्मक मांडणी यांचं गणित सोपं नसतं. गुरुदत्त यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही. कदाचित गुरुदत्त आणखी जगले असते तर...?

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ या दोन्ही कथा प्रतिभावंतांच्या, त्यांच्या मानसिक अवस्थेच्या. स्वत:च्या कवितांपासून स्वत:ला अलग करणारा कवी विजय आणि पत्नीच्या दुराव्यामुळे हताश दिग्दर्शक सुरेश सिन्हा या दोन्ही प्रतिमा गुरुदत्तमध्ये एकाच वेळी होत्या असं वाटतं. ‘देवदास’ हे त्याचं एक कारण असेलही, पण गुरूच्या स्वभावातील दु:खार्त छटा हेदेखील कारण त्यामागे दिसतं. १९५३ साली गुरुदत्तने गीता रॉयशी लग्न केलं. गुरुदत्तची आईसुद्धा मुंबईतच होती. गीता आणि गुरुदत्त यांचे संबंध प्रेमाचे होते, पण गुरूला त्यापेक्षा अधिक काहीतरी हवं होतं. गुरुदत्तने आयुष्य संपवलं, त्या वेळी गीता त्याच्यासोबत राहत नव्हती.

अब्रार अल्वी गुरुदत्तचा अतिशय जवळचा सहकारी आणि मित्रसुद्धा. ‘बहारे फिर भी आयेगी’चं चित्रीकरण चालू होतं. गीता दत्त स्वतंत्र राहत होती, आणि गुरुदत्त पूर्ण दारूच्या आहारी गेलेला होता. हा अर्थात त्याच्या स्वभावाचा भाग. पण इथून परतीची वाट नव्हती. सगळेच दूर गेले आणि आपल्याला समजून घेणारं कुणीच जवळ नाही, ही भावना पराकोटीच्या अवस्थेला पोहोचली आणि त्यानेच गुरुदत्तचा बळी घेतला.

कैफी ‘कागज के फूल’मधल्या एका गाण्यात म्हणतात- “देखी जमाने की यारी...बिछडे सभी बारी बारी...” कुणी कुणाला समजून घेण्याची वेळ निघून गेली होती, आपापले रस्ते निवडत सगळे वेगळे झाले आणि काळानं गुरुदत्तवर घाला घातला. सगळी किमया नशिबाची...‘वक्तने किया क्या हंसी सितम...हम रहे न हम, तुम रहे न तुम..” स्टुडिओच्या छाया-प्रकाशात एकटा सुरेश होता, तितकाच तो गुरुदत्तदेखील होता. पण ते कुणाच्याच लक्षात आलं नाही.

‘प्यासा’ला जे यश मिळालं, ते ‘कागज के फूल’ला मिळालं नाही. ‘कागज के फूल’ ही गुरुदत्तच्या आयुष्याची कथा होती. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी गुरुदत्तनी ‘चौदहवी का चांद’ काढला. त्यात भूमिकाही केली, पण दिग्दर्शक म्हणून एम. सादिकची निवड केली. एम. सादिक हे मुस्लीम परंपरा आणि रिवाज याचे जाणकार होते. साहजिकच ‘चौदहवी का चाँद’ त्यांच्याकडे गेला.

या चित्रपटामुळे गुरुदत्त ‘साहिब बीबी’चं स्वप्न पाहू शकले, हेदेखील तितकंच खरं. ‘साहिब बीबी’साठी त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. बर्लिन महोत्सवात त्याचा गौरव करण्यात आला.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

हेहीपाहावाचा : ‘बॉलीवुड’मधल्या संगीतकारांवर नेहमी ‘उचलेगिरी’चा आरोप केला जातो, पण शोधायला गेलं तर दिसतं की, बहुतेक सगळ्याच संगीतकारांनी ती केलेली आहे!

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

या तिन्ही चित्रपटांतून गुरुदत्तचं वेगळेपण जाणवतं. हे चित्रपट संगीतमय होते. अभिजात कलात्मक कलाकृती असो, किंवा रंजन-प्रधान चित्रपट असो, गुरुदत्तच्या चित्रपटांतलं गाण्यांचं महत्त्व लक्षात घ्यावं लागतं. बहुतेक सर्व चित्रपटांतली गाणी आजसुद्धा लोकप्रिय आहेत. ओ.पी. नय्यर आणि सचिनदेव बर्मन हे गुरुदत्तचे प्रमुख संगीतकार. ओपींनी गुरुदत्तसाठी ‘बाज’, ‘आरपार’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’, ‘सी.आय.डी.’, ‘बारा बजे’ आणि ‘बहारे फिर भी आयेगी’ असे सहा चित्रपट केले.

ओपींच्या संगीताचा लहेजा पाहता पडद्यावर ती जिवंत करण्याचं श्रेय गुरूदत्तलासुद्धा द्यावं लागेल. ‘बहारे फिर भी आयेगी’ हा तसा वेगळा विषय होता, जो गुरुदत्तने पुन्हा ओपींना दिला होता. त्यांनीही त्याचं भान ठेवलं होतं, पण ही गाणी फार लोकप्रिय झाली नाहीत, आणि दुर्दैवानं चित्रपट अर्धाच सोडून गुरुदत्तनेदेखील आपली जीवनयात्रा संपवली.

‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ हे दोन्ही गंभीर कथानक असलेले आणि कलात्मक मांडणी असलेले चित्रपट. गुरुदत्तने त्यासाठी सचिनदेव बर्मन यांची निवड केली होती. त्यांनी त्या आधी ‘बाजी’, ‘जाल’ हे चित्रपट केले होते, पण हे दोन्ही चित्रपट अर्थपूर्ण वर्चस्वाचे होते. हीच परिस्थिती ‘साहिब बीबी और गुलाम’च्या वेळीसुद्धा आली होती. पण त्या कथेत बंगाली संस्कृती आणि पार्श्वभूमी यांचा अभ्यास असणं, ही गरज होती. सचिनदेव बंगाली असले, तरी त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार बंगाली संस्कृती, संगीत आणि साहित्याचा अभ्यास असणारे होते. रवींद्र संगीताचा त्यांचा अभ्यास होता.

आपल्या चित्रपटाची नस गुरुदत्त नेमकेपणाने ओळखत. त्यामुळे गीतकार निवडताना ते भरपूर विचार करत असावेत असं वाटतं. त्यात अर्थातच काही वास्तवदेखील लपलेलं होतंच. साहीर स्वत: कवी होता आणि त्यानेसुद्धा अवहेलना, दुर्लक्ष अनुभवलेलं होतं. त्यामुळे साहीर ‘प्यासा’मधील कवीला अधिक न्याय देऊ शकेल, असा विचार गुरुदत्तनी केला असणार.

‘कागज के फूल’साठी गुरुदत्तने कैफ़ी आज़मीकडून गाणी लिहून घेतली. कैफी यांना तशी राजकीय पार्श्वभूमी होती आणि ते डाव्या विचाराचे होते. मैफिल आणि मुशायरे गाजवणारे कैफी तसे सिनेमाच्या वाटेला फारसे गेले नाहीत. ‘कागज के फूल’च्या सुरेशचं दु:ख त्यांनी ओळखलं होतं. ‘बिछडे सभी बारी बारी’ आणि ‘वक्त ने किया क्या हंसी सितम’ ही दोन्ही गाणी अजरामर बनली. स्वत: दिग्दर्शक या भावनेचा बळी होता. कैफी यांनी गुरुदत्तच्या मनात चाललेली आंदोलने आणि चित्रपटाची थीम नेमकेपणानं ओळखली होती.

‘साहिब बीबी और गुलाम’साठी शकील बदायुनी यांनी गाणी लिहिली होती. ही एक पिरीयड फिल्म होती. त्या माहोलसाठी दृश्यात्मक परिणाम साधणं ही गरज अधिक होती. शकील त्यात नक्कीच यशस्वी झाले. या व्यतिरिक्त गुरुदत्त यांच्या चित्रपटातून मजरूह सुलतानपुरी, शैलेन्द्र यांचीसुद्धा गाणी दिसतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘लाखारानी’मध्ये गुरुदत्तने छोटीशी भूमिका केली होती. तेव्हापासून त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनय केला. ‘साहिब बीबी’नंतर तर ती त्यांची गरजच झाली होती. ‘सौतेला भाई’ (दिग्दर्शक- महेश कौल), ‘बहुरानी’ (दिग्दर्शक- टी.प्रकाशराव), ‘भरोसा’ (दिग्दर्शक- के शंकर), ‘सांज और सवेरा’ (दिग्दर्शक-हृषीकेश मुखर्जी), ‘सुहागन’ (दिग्दर्शक- गोपालकृष्णन) आणि ‘बहारे फिर भी आयेगी’ (दिग्दर्शक- शाहीद लतीफ) अशा चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. यातील ‘बहारे फिर भी...’ ही एकमेव ‘गुरुदत्त फिल्म्स’ यांची निर्मिती होती. एका दृष्टीनं पाहिलं, तर हा गुरुदत्त यांचा संघर्ष होता आणि तडजोडदेखील होती. अर्थात सुरुवातीच्या काळातदेखील त्यांनी ‘बारा बजे’ (सिप्पी फिल्म्स-दिग्दर्शक – प्रमोद चक्रवर्ती) सारखे चित्रपट केले होते. स्वभावातील घाईमुळे त्यांचे अनेक चित्रपट अर्धवट राहिले. कुठेतरी बिनसलं आणि मनासारखे झालं नाही की, ते चित्रित झालेली रिळं बाजूला ठेवत. ‘प्रोफेसर’, ‘पिकनिक’, ‘राज’, ‘गौरी’सारखे चित्रपट अर्धवट राहिले. ‘गौरी’ हा बंगाली चित्रपट त्यांना गीता दत्तला घेऊन करायचा होता, पण तोही पूर्ण होऊ शकला नाही.

गुरुदत्तनी वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९ व्या वर्षी (१० ऑक्टोबर १९६४) हे जग सोडलं. चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”

पण प्रत्यक्षात सिनेमा आणि कलात्मक मांडणी यांचं गणित सोपं नसतं. गुरुदत्त यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलं नाही. कदाचित गुरुदत्त आणखी जगले असते तर...?

.................................................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now               

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख