खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाईं रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी । एका एका लागतील पायीं रे ।।
नाचती आनंदकल्लोळी । पवित्र गाणे नामावली ।
कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।।
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा । हार मिरविती गळां ।
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव । अनुपम्य सुखसोहळा रे ।।
लुब्धली नाही, लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।।
वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।।
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ।।
- संत तुकाराम
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
: पात्र-परिचय :
मीरा : वय अदमासे ४५-४६, किंचित स्थूल. नीटस. वयाच्या मानाने लहान दिसते. वय जाणवू नये असा उत्साह. मधूनच गंभीर होणारा चेहरा किंवा सहज भासणारा थकवा. त्यातूनच वय जाणवावे. एरवी बोलण्यातून जाण व अनुभव प्रतीत होतोच. एकूण सुखवस्तू, पण असंतुष्ट, कावेबाज, छद्मी स्त्री.
गोपी : तिचा नवरा. वयानं तिच्याच बरोबरीचा, पण अधिक भासतो. स्वभाव वरवर सोशिक, पण फार काळ दबून राहणारा नाही. योग्य जागी अचूक शब्द सफाईने वापरण्याचे कसब. त्यांत किंचित अधिकारी वृत्तीची जाणीव व्हावी... केवळ त्यामुळेच तो स्वामित्व गाजवू शकेल हे ध्यानात यावे. पण मीरेसारखा किंचित तुसडा, दुसऱ्याला दुखवायची आवड असणारा नाही. तसा बोलका, प्रेमळ, प्रसन्न. तरीही सतत कसली तरी सल असल्यासारखा.
नितीन : गोपीच्याच कॉलेजातील लेक्चरर. साधारण पंचविशीचा. प्रेमळ, पण जीवनात अननुभवी. छक्केपंजे माहीत नसलेला, सरळ स्वभाव. तसा फारसा बोलणारा नाही. मनस्वी. सहज हरणार नाही, या वृत्तीचा. स्वतःच्या तत्त्वांशी एकनिष्ठ.
माधुरी : नितीनची बायको. जेमतेम विशीची. कशानंही बावरणारी. खरं तर जगाची अद्याप ओळख पटलेली नाहीय. भावना आवरणं तिला शक्य होत नाही. निर्व्याज, निर्मळ, हळवी. नितीनबद्दल तिला जरा अधिकच वाटतं.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अं क प हि ला
(मध्यरात्रीची वेळ)
(घरातलं नेहमीचं फर्निचर असणारा हॉल. एखाद्या प्रोफेसरच्या घराला शोभेल असा. भारदस्त. फर्निचर शक्यतो कडेलाच असावे. मध्यभागी गालिचा अथवा छानशी बैठक. साऱ्या महत्त्वाच्या घटना त्यावरच व्हाव्यात. तुरळक रहदारीचा आवाज. थोडा गलबला. हसणे... लाडिक खट्याळ... मीराचं... पार्टीहून उत्साहानं परतताहेत हे जाणवावं, इतक्या उत्सहानं ती प्रवेश करते. किंचित भडक साडी. आखूड ब्लाऊज. जाणवेल अशी रंगरंगोटी. येताना गोपीच्या हाताला धरून जवळजवळ त्याला ओढतच घेऊन आलीय. तो किंचित त्रासलेला, पण तिला दुखावण्याची त्याची (आत्ता तरी) इच्छा नाहीय...)
मीरा : तुझं हे अगदी नेहमीचंच झालंय हंऽ... आता आग्रह तरी किती करायचा बाई?
गोपी : मुळीच नाही. आग्रह नकोच. कारण आत्ता मी तुझं काहीही ऐकणार नाही.
मीरा : असं रे काय... जरा वेळ थोडी कोडी खेळू या म्हटलं तर...
गोपी : नाही म्हणजे नाही!
मीरा : तुझं हे नेहमीच असं असतं. मेलं कुणी यायचं असलं की, नेमकं काही काम निघतं... नाहीतर तुझा मूडच जातो. (त्याचा अंदाज घेते.) नपेक्षा तू म्हणतोस, डोकं दुखतंय माझं...
गोपी : म्हणजे, आत्ता कुणी येणाराय?... या वेळी?
मीरा : हो. आत्ता. या वेळी... त्यात काय झालं!... कुणीही केव्हाही यावं. खरं तर मीच बोलवलंय त्यांना. आपल्याच कॉलेजात आहेत ती... ठाऊक असतील की तुला. तो लेक्चरर आहे...
गोपी : छे!... नुसत्या येवढ्याशा माहितीवर काय कर्म कळणार?
मीरा : अगदी गोऽऽड जोडी आहे रे... इवली इवली छकुली. नुसतं थोडं बोलणं झालं पप्पांकडे. मला इतकी आवडली ती... इतकी आवडली की, मी म्हटलं आता याच आमच्याकडे... आत्ताच...
गोपी : पण अशा... या अवेळी...
मीरा : हुं:ऽऽ, तोही अशीच खळखळ करत होता. तुझ्यासारखीच. तर ती छकुली म्हणाली, आता पार्टी म्हणजे चांगले पार्टी गेम्स असतील असं मला वाटलं होतं, पण तिथं तसं काहीच नव्हतं बाई. मला तर कधी एकदा ती पार्टी संपतीय असं झालं होतं बघा. बाई मी येते तुमच्याकडं. त्यावर तो पुन्हा कधीतरी आधी नीट ठरवून येऊ की आम्ही वगैरे घोळ घालत बसला. पण मी म्हटलं नुसतं तर आमच्या घरी यायचंय. त्याला मुहूर्त कशाला बघत बसायचं. अरे यायचं... गप्पा करायच्या. खाणं-पिणं... नाही आता खाण्याचा प्रश्न नाही म्हणा... पण पिण्याचं मात्र जमेल बरं का, आमच्याकडं सारा सरंजाम नीट असतो. प्यायचं आणि मग मजेशीर खेळ खेळायचे... अरे, खेळ म्हटल्यावर ती छकुली हरखलीच... जाऊया... म्हणून तिनंच मग हट्ट धरला त्याच्याकडे...
गोपी : तिला काय ठाऊक आपले खेळ... (अचानक्)... आपण होऊन येतायत ना ते?... मग या म्हणावं... खेळायला या. खेळा. कळू दे त्यांनाही... मीराचे खेळ काय अन् कसले असतात ते!
मीरा : असं अगदी बोलायलाच हवं का?... अरे खेळ ते काय... साधे अन् सोपे खेळ –
गोपी : अन् कधी कधी जीवघेणे...
मीरा : गप रेऽ हुं:! जीवघेणे म्हणे... (वेडावते)
गोपी : ठीक आहे. (क्षणभर थांबून, नंतर एकदम म्हणू लागतो) ‘खेळ मांडियेला, वाळवंटी घाई…’
मीरा : आपले नेहमीचेच खेळ. म्हणजे गतस्मृतीच्या छाया, अंतर्मनाचं प्रकट रूप, अपुऱ्या इच्छा... पुऱ्या न होणाऱ्या आकांक्षा... अगदी कुणालाही आवडतील हे खेळ...
गोपी : हो नं. पाहुण्यांचा छळ... तोही कणाकणानं... पोखरून पोखरून त्यांचा अगदी भुसा करायचा... त्यांच्याच शब्दांनी...
मीरा : पण मी म्हणते, त्यात वाईट काय आहे? कधीतरी... सुप्त इच्छा कुठंतरी प्रकट व्हाव्यात... कराव्यात... असं वाटतच असतं की सर्वांना... अरेऽ, प्रत्यक्ष भूमीची रहस्यही जिथं धरणीकंप... ज्वालामुखीच्या रूपांनी प्रकट होतात... तिथं आपण तर काय...
गोपी : हंऽऽ बरोबर आहे, नाही तर मग ती रहस्य... नको तेव्हा... नको तिथं प्रकट होतात... त्या गोष्टीत होतात तशी... अचानक आणि अगदी अनपेक्षितपणं...
मीराला गाढवाचे कान... वेळूच्या बनातून आली तान...
मीराला गाढवाचे कान... (हसतो. खोटंच. अगदी कृत्रिम.)
कान... लां ऽऽऽब... कान... छान! कान... तान... व्वा ऽऽ मीराला गाढवाचे कान...
मीरा : बघ. बघ! नुसती आठवण करायची खोटी, की झालीच तुझी सामन्याला सुरुवात.
गोपी : पर्यायच असतो कुठं मला!
मीरा : नसतोच. नसतोच पर्याय तुला. तुला खेळावंच लागतं. मी म्हणेन तो खेळ... माझ्याच नियमांनुसार... अन् माझी जीत ठरलेलीच!
गोपी : हंऽऽ. खरंय... तू नेहमीच जिंकतेस... अगं... अवीसुद्धा कधीकधी म्हणतो - पप्पा... पप्पाऽ मम्मीच कशी हो नेहमीच जिंकते? (स्वतःशीच बोलल्याप्रमाणे) त्याला काय ठाऊक की नियम करणाऱ्यानं कितीही जरी जिंकायचं ठरवलं, तरी त्यासाठी प्रतिस्पर्ध्याची हरण्याची तयारी असावी लागते... त्यानं फक्त हरायचं... मग पुन्हा खेळायचं... हरायसाठीच... तशी तयारी नसली, तर मग संपलंच सारं...
मीरा : मी कशी जिंकते? असं म्हणतो तो... असं विचारतो? खरं तर त्याला ठाऊक असायला हवं... माझाच आहे ना तो. आणि माझं सारं अस्तित्वच मुळी त्याच्यासाठी आहे. मीच या खेळाची जननी आहे. आदिमाता. आदिमाता कधी हरलीय?... मीही तशीच आहे. नेहमीच जिंकणारी... विजेती... कायमची अजिंक्य... अपराजित.
गोपी : ...पराभवाची कल्पनाही असह्य होणारी ...
मीरा : हुं:ऽ अरे, त्यापेक्षा मरण परवडलं... त्या पराभवानं होणाऱ्या मानहानीपेक्षा...
गोपी : (एकदम वेगळ्याच सुरात... नाटकी पद्धतीनं) ...अन् ते परवडणारं मरणही तुला मिळणार नाही. तुला खेळायचंय... पराभव सोसायचाय... मी जे दुःख नेहमी भोगतो, ते तुलाही कधीतरी भोगावंच लागेल... त्यावाचून तुला गती नाही! (मुद्दाम तिचं लक्ष वेधून घेऊन)... पण एक गोष्ट विसरू नको, मीराऽ खेळायचं म्हटलं नं मीरा, की माणसाची हरायचीही तयारी हवी... कळतंय ना... मुद्दाम सांगून ठेवतोय... मला ठाऊक आहे ना... पण मीराऽ अगं मी छोट्या चकमकी हरलो ना... तरी अखेर लढाई मात्र मीच जिंकणाराय... आय विल विन द वॉर... अंतिम... निर्णायक विजय माझाच असेल, मीराऽ माझा विजय... सदानकदा हरणाऱ्या या गोपीचा...
मीरा : (तुच्छतेनं) हूं:ऽ अरे, एकदा ज्याला पराभवाची चटक लागली, तो पराभवाचाच गुलाम झाला... तो मग कधी जिंकूच शकत नाही.
गोपी : असं तुला वाटतंय... पण बघशीलच तू... आणि माझं एक जाऊ दे! पण इतरांबरोबर तरी तू कुठं नेहमीच जिंकतेस? कधीकधी बोथट ठरतात तुझी हत्यारं... मादक नजरेचा प्रभाव पडत नाही. स्पर्श अस्वस्थ करत नाही... लडिवाळपणा आपलंसं करू शकत नाही... लागट सलगी... जवळीकही फोल ठरते... अन् मग तू राहतेस अतृप्त... (दारावर हलकेच टकटक) बघ... आले वाटतं तुझे पाहुणे... नाही... नवं सावज - काय आहे त्यांच्या नशिबी कोण जाणे... आलेऽऽ... आजचे पाहुणे. येणारी पावलं तर उमटलीच... आता...
मीरा : गप रेऽ... दार तर उघड की आधी... जाऽ...
गोपी : होऽनाऽ. दार तर उघडायलाच हवं... मी खेळात सामील झालोय ना! मग माझ्या डोळ्यांसमोर तू इतरांशी केलेला लघळपणा मला चालायलाच हवा... खेळच तोऽऽ... इतरांशी तू केलेलं नाटकी प्रेम समजून घ्यायला हवं... तुझा अभिसारिकेचा शृंगार... आक्रमण... सारं काही खेळातलंच. तुझी अतृप्ती... अन् पाहुण्यांचे शब्द... ही कसली मीरा... ही तर महामाया... नाही महाकामा... चंडकामा... लाव... लाव...
मीरा : त्या षंढांना काय कळतंय... छक्के साले... (हे शब्द नेमके पाहुण्यांना ऐकू जावेत या बेतानेच दार उघडतो. अचूक) (दारात ती दोघं. थक्क... बावरलेली. माधुरी किंचित घाबरी झालीय. नितीनचा हात तिनं घट्ट पकडलाय.)
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
नितीन - माधुरी : माफ करा हं... पण...
मीरा : (अगदी आपुलकीनं) अरेच्चाऽऽ... आलात वाटतं तुम्ही... छान छाऽन. बसा जरा... आत्ता आणते हं सरबत... (जाते.)
नितीन : अंऽऽ... खरं म्हणजे... आम्ही येणारच नव्हतो...
माधुरी : पण म्हटलं... बाई रागावतील, म्हणून...
गोपी : (मध्येच)... का... असं का बरं वाटलं तुम्हाला? अंऽऽ कां?
नितीन : (अस्वस्थ) नाही. म्हणजे काय... प्रिन्सिपॉल सरांकडून निघताना बाई म्हणाल्या... अरेऽ तुम्ही जाता जाता या ना आमच्याकडे... उद्या सुट्टीच आहे नं... खूप आग्रह केला त्यांनी... म्हणाल्या...
माधुरी : बसू या गप्पा मारत...
नितीन : हो नंऽ म्हणूनच जरा उशीर...
गोपी : जरा नाही. चांगलाच!
नितीन : हो. चांगलाच उशीर झाला होता. तरी आम्ही आलो. तुम्ही रागाऊ नये, म्हणून अगदी घाईघाईत आलो... पण ही...
गोपी : आलात नं... स्वतःच्याच पावलांनी...
नितीन : हो... अं होऽ. स्वतःच्याच पावलांनी.
गोपी : पण आत्ता तर... तिनं बोलावलं म्हणालात नाऽ...
नितीन : (गोंधळलाय) होऽऽ बाईंनी बोलावलंच होतं...
गोपी : हंऽऽ अस्सं...
माधुरी : हो नाऽ. कित्ती गोऽड बोलतात नं त्या... नाही म्हणताच आलं नाही त्यांना... म्हणून आलो.
गोपी : आलात ना?... मग आता अडकलात. इथं येणारा भले येत असेल आपल्या स्वतःच्या मर्जीनं... पण जाताना त्याला बाईची परवानगी घ्यावीच लागते. (आपल्या बोलण्यानं ते पेचात पडलेत, त्यांना काहीच समजत नाहीय याची खात्री करून घेतो. समाधानानं स्वतःशीच हसतो. एकदम गंभीरपणं)... किंवा मग बाईच हाकलून देतात... लाथाडून टाकतात. ऊसाच्या चिपाडाप्रमाणं...
नितीन : पण ... अहोऽ खरंच त्यांनी बोलावलं... अगदी आवर्जून... म्हणून...
गोपी : (हसतो) तुम्हाला नाही म्हटलं मी... मी आपला तिच्या सवयी सांगतोय तुम्हाला... (गंभीरपणे) सावध करतोय तुला... राजाऽऽ
नितीन : मी... माझं नाव नितीन...
गोपी : (त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करून) सावध राहा... राजाऽऽ वैऱ्याची रात्र आहे... जागा रहा... सावध रहा... (दोन-तीन वेळा म्हणतो)
माधुरी : अहोऽ... हा नितीन... नि ती न...
गोपी : तेच ते. सावध राहा राजाऽ... (सावधपणं)... नाही राजा नाही... नितीन सावध!... वैरिणीची रात्र आहे. तुला माहित्यै?
नितीन - माधुरी : (उत्सुकतेनं) - काय?
गोपी : (अगदी सावकाश)... ती... चेटकीण आहे!
नितीन : हॅऽ उगाच काहीतरी...
गोपी : (अगदी गंभीर)... खरंच सांगतोय. (ती दोघं ऐकतायत याची खात्री करून घेतो. सावधपणं मीरा गेलीय तिकडं पाहतो. कानोसा घेतो.) खरंच ती चेटकीण आहे! ताज्या रक्ताची तहान आहे तिला... ताज्या... तरुण रक्ताची तहान... कधीच न शमणारी... कायमची... कणकणानं रक्त शोषून घेते ती... सहवासात येईल त्याचं... करते नष्ट रक्त अन् तारुण्यही... झिजून खंगून जातो तो… पण तिचा मोह सुटत नाही... तिला मात्र तो नकोसा होतो... मग… मग काय... बस्स... ख ला स!!
माधुरी : काय?
गोपी : खलास... खलास करते त्याला... तिचं इप्सित साध्य झालं की, आठ पायांच्या कोळिणीप्रमाणं... काही काही सुगावा नसतो त्याचा... गायब...
नितीन - माधुरी : असंऽऽ खरंच?
गोपी : (खदखदून हसतो. एकदम बोलायला लागणार असं वाटतं... पण पुन्हा काहीतरी आठवून हंसतो.) (ती दोघं थक्क होऊन पहाताहेत.) (त्यांच्याकडे बघून हसू आवरतो.) घाबरलात?... अरेच्चा... अरेऽ गंमत केली तुमची... फिरकी घेतली... सारं नाटक... खोटं नाटक... (एकदम नाटकी आविर्भावात.) असं असतं नाटक, राजाऽऽ असं असतं नाटक... (सर्व जण खळाळून हसतात.)
(अचानक) - पण माझं अन् तिचं तसं सख्य नाही हंऽऽ... सदानकदा भांडतच असतो आम्ही... होऽऽ प्रेमविवाह केलाय ना... लव्ह मॅरेज... (अगदी हलक्या आवाजात) लग्न करणं भागच होतं म्हणा... म्हणून तर आज आहे... प्रोफेसर... हेड ऑफ द डिपार्टमेंट!
माधुरी : म्हणता काय? लग्नाची सक्ती झाली तुमच्यावर?... म्हणजे... (लाजते) बाईवर लग्नाआधी तसं काही...
गोपी : (फटकन्... तोडून टाकल्यासारखं) खुळी आहेस... तशी वेळ स्वतःवर येऊ देण्याइतकी ती बावळट नव्हती... कधीच... (वेगळ्या स्वरात) मी मात्र बुळा होतो... पेबळा...
माधुरी : तुम्ही काय बोलताय... काही समजतच नाहीयै...
गोपी : कसं समजेल असं?... मला तरी तेव्हां कुठं समजलं होतं... हं:... कळत होतं इतकंच की... निश्चित स्वरूपाची नोकरी मिळतीय... शिवाय देखणी बायको... प्रिन्सिपॉल प्राचार्यांची मुलगी... त्यामुळं... पुढं खूप स्कोप आहे... बस्स... त्यामुळं तिच्या भूतकाळाच्या कॅलिडोस्कोपकडं मी लक्षच दिलं नाही...
माधुरी : म्हणजे बाई... बाई तेव्हा...
गोपी : (गंभीरपणे) चालू होत्या! (ती दोघंही थक्क) अर्थात त्या वेळी हा शब्द नव्हता म्हणा... पण असंच काहीतरी म्हणायचो आम्ही... पब्लिक प्रॉपर्टी... नगरवधू...
नितीन : अंऽऽ (घुटमळतो )
गोपी : ... आणि तरीही मी तिला माझी वाग्दत्त वधू केली... पत्नी म्हणून निवडलं... अर्धांगिनी...
नितीन : म्हणजे तुमची परिस्थिती...
गोपी : नाही. माझी परिस्थिती चांगली होती, पण मला प्राध्यापक बनायचं होतं... हंऽऽ साध्या थर्ड क्लास एम.ए.ला कोण करणार प्राध्यापक? अं... अखेर आमचे प्रिन्सिपॉल भेटले. याच अटीवर त्यांनी मला प्राध्यापक म्हणून नेमलं... त्यांच्याच कॉलेजात... पुढं सोसायटीचा मेंबरच करून घेतलं... अन् मग डॉक्टरेटही मिळवून दिली... पुढं त्यांची जागा मिळण्यात अडथळा येऊ नये म्हणून... (वेगळ्याच स्वरात) तसं मला तिच्याबद्दल आकर्षण होतंच... जीवघेणं... त्यांच्यासारखंच! आमचे दोन टोकांचे स्वभाव जुळणं शक्य नाही, हे ठाऊक असूनही... माझी जिद्द होती - सुखी संसार करायची.
नितीन : आम्ही तेच बघतोय की... अहोऽ... इतक्या रात्री आम्ही कसं यायचं असं विचारलं...
माधुरी : त्यावर बाई म्हणाल्या... अरेऽ त्याची तुम्हाला कशाला काळजी... त्याला तर खूप आवडतं... गप्पा मारायला... खेळायला...
गोपी : तेच तर सांगतोय... तेव्हापासून तिच्या आवडीनिवडी मी माझ्याच समजतो... (जरा थांबून मग)... खरं सांगू... अलीकडे ती एकटी आली, तर तिच्याशी काय बोलायचं याची पंचाईत पडते... काय करायचं हा प्रश्न सतावतो... विक्रमादित्याच्या त्या वेताळासारखा... पण असं... तुमच्यासारखं... कुणी आलं नं... की बरं वाटतं... वाटतं... खूप खूप गप्पा माराव्यात... त्यातच रात्र संपून जावी... सारा वेळ तिचं दर्शनही होऊ नये... (त्याच वेळी मीरा येते. तिनं त्याचं बोलणं ऐकलंय.)
मीरा : पण इतकं कुठं याचं भाग्य? तर मी येतेच. अन् मग गप्पांना भलताच रंग चढतो... वेगळीच दिशा मिळते... (ग्लास देता देता अचानक् कसली तरी जाणीव झाल्यासारखं.)... ईऽऽ (चेहरा चाचपडते)... क्रीम लावायला विसरलेच की मीऽ...
गोपी : पाह्यलंत!... या वयातही आपलं कॉम्प्लेक्शन जपायचंय तिला... कांती तेजःपुंज राखायचीय... आमिष म्हणून... नवी नवी... कोवळी सावजं गटवायला... (त्या दोघांकडे पाहून सूचकपणे हसतो. मीरा मंद हसते... खेळ सुरू झाला म्हणून... पार्श्वभूमीला मंद आवाज... ‘खेळ मांडियेला...’)
माधुरी : (विषय बदलून)... पण तुमच्या लग्नाचं काय म्हणत होतात... सक्तीचं.
गोपी : (फटकन्) हूं:ऽ त्यात काय आहे...
माधुरी : सांगा नं... मला कि नैऽऽ... असं काही ऐकायला खूप मज्जा वाटते...
(गोपी आणि मीरा एकमेकांना खुणावतात.)
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
मीरा : चल गंऽऽ... (माधुरीचं लक्षच नाहीय. तंद्रीत असल्यसारखी आहे.)
नितीन : माधुरीऽ अगं, बाई तुला बोलावतायत...
माधुरी : (एकदम भानावर येऊन)... अय्याऽ... खरंच की... सॉरी हं बाई... आलेचऽऽ (त्या दोघी जातात)
नितीन : (अचानक) अहो... सऽर... आमचंही लव्ह मॅरज आहे... खरंच!
गोपी : (हळूहळू. प्रत्येक शब्दावर भर देत) लव्ह... मॅरेज!!
नितीन : होऽ... तसंच. प्रथम प्रेम. मुक्त... मोकळं... बंधनरहित प्रेम...
गोपी : अन्... त्यावर इलाज म्हणून लग्न...
नितीन : तसं... अगदी तसंच काही नाही...
गोपी : पण बरंचसं तसंच. तुमच्या मोकळ्या वागण्यानं तिला दिवस गेले. पण ज्या धाडसी मोकळेपणानं तुम्ही प्रेम केलंत... उपभोग घेतलात... त्या धाडसानं तुम्हाला गर्भपात करता आला नाही. कारण परंपरा... संस्कार... त्यावर उत्तम तोडगा म्हणून... तुम्ही लग्न केलंत.
नितीन : (त्याच्या बोलण्यात आता मोकळेपणा आलाय.) तशी गंमतच झाली बरं का, सर! तिला खात्री वाटत होती की, तिला दिवस गेलेत म्हणून... तीन महिने झाले म्हणत होती. मग अगदी खात्रीच झालीय म्हणाली. मग मात्र आम्ही लग्नच केलं.
गोपी : केलं... अन् लग्न केलं. (दोघंही हसतात)
नितीन : तर आम्ही लग्न केलं... अन् आपली वाट बघतोय...
गोपी : हाःऽ हाःऽ लग्न होऊनही वाट पाहात होतात?
नितीन : अहोऽ म्हणूनच वाट पहात होतो (दोघंही हसतात)... म्हणजे मग...
गोपी : पुन्हा प्रेम सुरू...
... ... ...
नितीन : तर मी काय सांगतोय सर...
गोपी : मी ऐकतोय...
नितीन : शेवटी डॉक्टरांकडं गेलो. तपासलं त्यांनी... अन्...
गोपी : (खऱ्या खुऱ्या उत्सुकतेनं) अन् मग?
नितीन : (आता हाच हसतो.) कसचं काय अन् कसचं काय... सारंच ओमफस्... अहोऽ त्या डॉक्टरांनी सांगितलं की, तसं काही नाहीय... सारेच कल्पनेचे खेळ...
गोपी : (गंभीरपणे) पण... पण असं कसं झालं...
नितीन : (मोठ्या माणसांप्रमाणे)... होतं असं कधीकधी... होतं काय, झालंच! अहोऽ कल्पनेतच तिला डोहाळेही लागले होते... त्यामुळं ओटीपोटही मोठं झाल्यासारखं, वाढल्यासारखं वाटू लागलं... नाही. तिची खात्रीच होती तशी... (खजिल होतो) अन् माझीही!
गोपी : (त्याच गंभीरपणं) मग पुढं काय ...
नितीन : पुढं काय?... पुढं काहीच नाही! त्या डॉक्टरांनी निदान केलं... अन् सारं काही निवळलं... तिचं पोटही!
गोपी : हंऽऽ
नितीन : हंऽ काय ...
गोपी : नंतर तुम्हाला काही मूल...
नितीन : अद्याप नाही... (लाजतो) म्हणजे आम्हीच टाळत होतो... पण आता मात्र मला मूल हवंय. तातडीनं... पण तिचा विरोध आहे त्याला... खरं म्हणजे आपल्याला काही हे पटत नाही हं, सर...
गोपी : खरं आहे तुझं ...
नितीन : म्हणजे सुरुवातीला... सुरुवातीला मलाही वाटायचं साहजिकच आहे... तिला वाटायचंच... चैन करावी... मौजमजा करावी. म्हणून मीही तसा खूश होतो, बरं का...
गोपी : हंऽऽ ...
नितीन : पण वर्ष झालं... दुसरं उलटलं... तिसरंही सरलं... मग मात्र मला जरा शंका वाटायला लागली... मी लगेच गेलो डॉक्टरांकडं ...
गोपी : (चमकतो) का... का गेलास डॉक्टरकडं?
नितीन : म्हटलं, आपल्यातंच कुठं उणं असलं तर... पण तसं काही नव्हतं... सारं काही ठीक होतं... डॉक्टरांनीच सांगितलं तसं... (गोपी अगदी काळजीपूर्वक ऐकतोय. चेहरा खूपच गंभीर.) मग एकदा मीच माधुरीला विचारलं... खरं खरं सांग म्हटलं... तर ती म्हणाली की, मी मुद्दामच ती काळजी घेतीय... मला मूल नकोय इतक्यात... सध्यातरी...
गोपी : मग?
नितीन : मग काय... इतक्यात नको... सध्या नको... असं म्हणता म्हणता ती कधीच नको असं म्हणायला लागली. का म्हटलं, तर म्हणे मला भीती वाटते... मी मरेन म्हणून... (अचानक) तशी तिची प्रकृती नाजूक आहेच म्हणा...
गोपी : चिपाड आहे... अगदी चप्पट!!
नितीन : (चमकून)... काय?
गोपी : तसं नाही... पण म्हटलं... आमची मीरा कशी गरगरीत आहे... तिच्यापुढं तुझी बायको अगदी सपाट...
नितीन : आहे खरं...
गोपी : तर तीही एक कहाणीच आहे. ती गरगरीत कशी?... तर इतरांचं तारुण्य शोषून... त्यानंच ती झालीय जाड... फोफावलीय... सोकावलीय... तुझ्या बायकोचं वजन काय असेल?
नितीन : असेल अठ्ठ्याण्णव पौंड... चाळीस किलो...
गोपी : अस्सं... अरेऽ मीरा नं एकशेवीस (त्याचा अंदाज घेत एकदम) एकशेवीस वर्षांची आहे!
नितीन : (दचकून डोळे विस्फारून बघतोय)
गोपी : म्हातारी मीरा... एकशेवीस वर्षांची मीरा... माझी बायको...
नितीन : हॅऽऽ सर, उगाच काय काहीतरीच...
गोपी : अरेऽ हा आहे... एक खेळ... अर्थाचा अनर्थ... तुम्ही खेळायलाच आलात नं?... तुझ्या बायकोला खेळ फार आवडतात म्हणे... सांभाळ हंऽ... आमचे खेळ फार विक्षिप्त आहेत. पाहुण्यांशी गप्पा... भांडणं... फिरक्या... हकालपट्टी... सारं काही येतं त्यात... आता आपल्या गप्पा तर झाल्याच...
नितीन : नाही झाल्या... तुमच्याबद्दल तुम्ही कुठं काही बोललात?
गोपी : ते तुम्हीच काढून घ्यायचं माझ्याकडनं... तोच तर खेळ...
नितीन : (त्याला साधारण कल्पना आलीय. गोपीकडं पहात राहतो. अचानक्) लहानपणीच्या एका चुकीची तुम्ही अद्यापही खंत करताय...
गोपी : (मजेत)... शक्य आहे...
नितीन : तुमची आई खूप सुरेख होत...
गोपी : हो. होतीच.
नितीन : पण... पण तुमच्या चुकीनं तिचा जीव गेला...
गोपी : (चटकन्) नाही!! (स्वतःला सावरतो) नाही, म्हणजे आता माझा बचाव मलाच करावा लागणार...
नितीन : (गंभीरपणं शून्यात पहात)... त्या छोट्या मुलानं आपल्या आईला... नको त्या वेळी... नको त्या अवस्थेत... नको त्या माणसाबरोबर पाह्यलं...
गोपी : (अगदी मन लावून ऐकतोय. स्वतःतच हरवल्यागत मुद्रा) हंऽऽ
नितीन : आणि नेमकं तेव्हा तिच्या हे लक्षात आलं...
गोपी : (अभावितपणे तोंड झाकतो)
नितीन : ... मुलगा किंचाळला. त्याचा बाप धावत आला... त्यानं ओळखलं...
गोपी : (एकदम बोलू लागतो.) ...हंऽऽ पण ते चिडले नाहीत. ते म्हणाले, झाली असेल चूक तिच्याकडून... तशी ती त्यांच्याहून खूपच लहान होती... पण त्यांच्या त्या न चिडण्यानंच ती खजिल झाली...
नितीन : स्वतःचं पाप तिला सहन झालं नाही. मोठी मनस्वी... खानदानी होती ती...
गोपी : होतीच... म्हणूनच तर तिनं हिरकणी खाऊन जीव दिला... (एकदम तिरीमिरीनं) नाही तर मीराचा बाप... प्रत्यक्ष पोटच्या पोरीला...
नितीन : (उत्सुकतेनं) प्रिन्सिपॉल सरांचं काय म्हणालात?
गोपी : (चटकन सावरतो) ...काही नाही, म्हटलं की... त्यांनीही... मीराला आईमागं कशी वाढवली...
नितीन : पण तारुण्यानं तिला सारं काही विसरायला लावलं...
गोपी : खरंय... अखेर हे तारुण्यच सार्यांचा शाप आहे... तुझ्या माधुरीचा... आमच्या मीराचा... तुझा... माझा... पप्पांचाही...
(त्या दोघी येतात )
मीरा : (चमकून)... पप्पांचं काय?
गोपी : (सावरून)... म्हटलं... ते आहेत, म्हणून हे कॉलेज आहे... म्हणून मीरा आहे... म्हणून मी आहे... म्हणून आज यांना बोलावलंय... (हसतो)
नितीन : आणि... आम्ही आलोय...
गोपी : (गंभीरपणे) मिराऽऽ आज मात्र तुझा अंदाज चुकणार हं... अगं हा राजा...
नितीन : (अस्पष्टपणे)... नाही... नितीन...
गोपी : (नितीनकडे दुर्लक्ष करत)... अगदी चलाख... हुशार आहे...
मीरा : काय म्हणतोस काय... मग तर खेळ चांगलाच रंगेल...
गोपी : ते काही मला ठाऊक नाही... पण तू हरू लागलीस ना, तर मग रंगलेल्या खेळाचाही भंग करशील... अगंऽ मला इतक्या सहजपणं बनवलं त्यानं... कुठला तरी कुणाचा तरी भूतकाळ चक्क माझ्यावर लादला.
नितीन : छे:! तुमचाच! आणि त्यात काही विशेष नाही. ती मानसशास्त्राची एक साधी पद्धत आहे, सत्याचा शोध घ्यायची...
गोपी : पाह्यलंस... पुन्हा मलाच खोटं ठरवतोय. मी काय... साधा संस्कृतचा इतिहासजमा प्राध्यापक. आता उरलंच आहे कुठं काय म्हणा... आता काय... संस्कृत नाही... अन् संस्कृतीही...
नितीन : हो नाऽऽ म्हणून तर प्रिन्सिपॉल सरसुद्धा...
मीरा : (घाबरून) पप्पांचं काय?
नितीन : (गोपीची नक्कल करीत) ते आहेत... म्हणून कॉलेज आहे... म्हणून... (सर्व जणच हसतात. मीरा सुटकेचा निःश्वास टाकते) संस्कृती म्हणे!... संस्कृती म्हणायचं खरं... पण आपल्या पुराणकाळात तर राजरोस व्यभिचार चालत... त्या गोष्टी आपण अभिमानानं वाचायच्या... सांगायच्या... शीःऽ...
गोपी : समजेल... समजेल... पोराऽ तू नवा आहेस इथं म्हणून... अरेऽ, कालचक्र सारखं फिरत असतं... अव्याहत. पुन्हा तोच इतिहास... त्याच प्रथा... या, या आपल्या कॉलेजच्या आवारात काय घडत नाहीयै? पण ते पॅशन अन् पुढारलेपणाच्या नावाखाली खपवलं जातंय... नाहीऽ... त्याचाच इथं अभिमान आहे... मुक्त स्वातंत्र्य... मुक्त विचार... यांच्याबरोबर मुक्त प्रणयाचाही पुरस्कार केला जातोय पोरा! (एकदम) अरेऽ तुलाही त्यांच्यात सामील व्हावंच लागेल... तशी माधुरीही... आकर्षक आहे...
नितीन : (रागानं) काय बकवास करताय... (चटकन सावरून एकदम नरमाईनं)... सऽर...
गोपी : नाही पोराऽ... तुला सावध करतोय... पुढं येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी... तेवढंच मला समाधान!... असं आपलं म्हणायचं... कारण या इशाऱ्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुला वाकावंच लागेल... नाहीतर इथून जावं लागेल...
नितीन : पण असं कसं असेल... मी आपल्या प्रिन्सिपॉल सरांना...
गोपी : (कुत्सितपणं)... संस्थापकाकडेच तक्रार नेणार म्हणतोस? ने बापडा!... (छद्मीपणानं)... पण जाताना तिला बरोबर घेऊन जा...
नितीन : (भाबडेपणानं) कुणाला... माधुरीला? तिचा तिथं...
गोपी : (त्याला मधेच थांबवत)... अरेऽ माधुरीला नाही!... मीराला! तिचंच ऐकतात ते... फक्त तिचंच! (वेगळ्या सुरात) पण तिला तयार करायचं तर तुला तिची मर्जी संपादन करायला हवी... काहीही करून तिच्या पसंतीस उतरायला हवं... (हलकेच) बायकोला वाचवण्यासाठी नवऱ्याचा बळी!... वापर... चुरगाळ... दे टाकून...
नितीन : मला वाटतं... तुम्ही... तुमची प्रकृती ठीक नाहीय... शिवाय फार झालीय... रात्र. तेव्हा...
गोपी : नाही रे बाबाऽ... मी अगदी पूर्ण बरा आहे... अन् शुद्धीवरही... त्याचाच राग येतो कधीकधी... असं... असं अशात बुडून विसरून जाताच येत नाही स्वतःला! आता अधूनमधून मद्य घेतो... पण मद्यावरच माझा अंमल बसवतो. इतर बरेच लोक जग विसरतात... मद्य घेतल्यावर... मी मात्र प्याल्यावर प्याले रिते केले... तरीदेखील विसरू शकत नाही मलाच मी...
नितीन : अगदी जीवघेणं दुःख दिसतंय तुमचं...
गोपी : नाही. जीवघेणं नाही. हे आहे पोखरणारं... कणाकणानं... कुरतडणारं... कुरतडत राहणारं... एखाद्या किडीसारखं... विकृत...
नितीन : तसे आपण सारे किडेच आहोत म्हणा... खरं नं माधुरी?... सारे क्षुद्र कीटक आपण. रौरवात खितपत पडलोय... एकाकी...
माधुरी : सुटकेच्या आशेच्या तंतूला लटकून... आला दिवस आपला म्हणणारे...
गोपी : अगं मीराऽऽ हा नितीन नं शास्त्रज्ञ आहे.
मीरा : अय्या! खरंच की...
नितीन : छेः छेःऽ... अहो, मी आपला साधा जीवशास्त्राचा लेक्चरर...
गोपी : घ्याऽ... अहो साऱ्या जगाचं मूळ... जो जीव... त्याच्याच शास्त्राचा हा प्रतिनिधी... आमच्या संस्कृतीला व्यभिचार म्हणणार... अन् मग मात्र प्रयोग म्हणून तेच करणार...
नितीन : तसं नाही होऽ... प्रयोग ते काय...
गोपी : तेच ते! तुम्हाला त्याचं काय वाटणार?... मीराऽ यांचे काय प्रयोग चाललेत... ठाऊक आहे? अगं निपुत्रिकांना मुलं देणार... परीक्षा नलिकेच्या सहाय्यानं... अन् खरं म्हणजे ज्याला जसं हवं तसं मूलही हे तयार करणार.
मीरा : मग छानच आहे की... गोपीऽ तू म्हणजे... अगदी हाऽच आहेस रेऽ...
गोपी : मीराऽ लक्षात घे... ज्याला जसं हवं तसं... म्हणजे त्या आईबापांना हवं असेल, तसं ते मूल नसणार... तर ते असणार... या शास्त्रज्ञांना हवं तसं... आपला हा नितीन ठरवील तसं...
नितीन : सऽऽर... तुमचा काहीतरी गैरसमज होतोय... ते तसं काहीय... चांगले गुण एकत्र होऊ शकतील... असं शास्त्रज्ञांना वाटतं. म्हणून थोडी निवड...
गोपी : तेच रे ते... अरे आमच्या संस्कृतीला व्यभिचारी संस्कृती म्हणून हिणव... पण आता तुम्ही तर राजरोस पशुतत्त्वच आणणार की मानवांसाठी...
मीरा : अय्या, म्हणजे काय रेऽ
गोपी : अगं म्हणजे यापुढं सगळी मुलं की नाही, अगदी एकसारखी असणार!... अगंऽ मला तर संशय येतोय की, हा नितीन आहे नं... त्याच्याच त्या साऱ्या प्रितकृती असणार... एकसारखे साच्यातले गणपती... याच्यासारखेच...
मीरा : काय म्हणतोस... म्हणजे सारी मुलं या नितीनसारखी... अरेऽ व्वाऽऽ... वाःऽरे राजाऽ... कित्ती गोऽड नै?
नितीन : अं... तसं नाही सर... मी खरंच सांगतो... तुमचा काहीतरी गैरसमज होतोय...
गोपी : मी पुरता समजून आहे, नितीन... अरे पुराणकालापासून हेच चालत आलंय... प्रबळानंच सारं बळकवायचं... सबल असेल त्यानं सारं जिंकायचं... बायकाही... अन् दुर्बलाच्या निशबी फक्त छीःऽ थूःऽ... त्यानं फक्त बघत राहायची... विटंबना! स्वतःचीच!!! एकदा हे प्रयोग यशस्वी झाले की, मग या साऱ्याच दुर्बलांचं खच्चीकरण... पुन्हा प्रचंड प्रमाणावर... बेंबीखाली वीतभर अंतरावर एक दोन इंची व्रण... बस्स... विविधताच नष्ट करणारैयत निसर्गाची... आपला जोडीदार आपण निवडायचा नाही... आपलं मूल कसं असावं त्याची कल्पनाच करायची नाही... ते मूल मुळी आपलं असेल की नाही... याचीच मुळी शाश्वती नाही!!
नितीन : हे बघा... खरंच सांगतो...
गोपी : ... आणि त्या जमातीला आपण पूर्ण पुरुषांची पिढी म्हणायचं.
मीरा : हं:ऽऽ
गोपी : पण तिथं काही काव्य नसणार... अन् नसेल संगीतही... सारं काही साचेबद्ध...
मीरा : होऽऽरे?
गोपी : शास्त्रज्ञ अन् गणिती असतील सारे जण... अतिसुसंस्कृत...
मीरा : छाऽन ...
गोपी : पण या प्रयोगाची निष्पत्ती काय होईल... सारं काही आखीवरेखीव... चाकोरीतलं... साच्यातलं... मानवी संस्कृतीतच रूपांतर होईल... नेमून दिलेली कामं करत राहणाऱ्या प्रचंड पलटणी... परावलंबी... स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्वच नसलेल्या...
नितीन : झालं?... संपलं का तुमचं?
गोपी : (त्याच्याकडं लक्षच देत नाही)... आणि या साऱ्याला माझा विरोध आहे.
मीरा : तोंड बघा विरोध करणाऱ्याचं!!!
गोपी : कारण मग साऱ्या जीवनातली गंमतच नाहिशी होईल. सदा बदलणारे जीवनाचे रंग नाहीसे झाले, तर मग या आयुष्यात उरेलंच मुळी काय? नाही... नाही... हा किल्ला मी पडू देणार नाही... मला ते सहनच होणार नाही...
मीरा : असं काय म्हणतोस गोपी... तुला हा किल्ला सोडूनच द्यावा लागणार आहे... अरेऽ या ढेरीनंच का किल्ला लढवणारेस... ऍ हॅ रे... किल्ला लढवणार...
गोपी : पण ढेरीचा अन् लढण्याचा मुळी संबंधच काय... उगाच नसतं काहीतरी... तर मित्रा, मी लढेन... अखेरपर्यंत लढेन... एक हात पोटाखाली धरीन... तुमच्या खच्चीकरण मोहिमेपासून वाचण्यासाठी... पण दुसऱ्या हातानं मात्र मी लढतच राहीन... अगदी मरेपर्यंत...
मीरा : (वेडावते. टिंगलीच्या स्वरात) शाब्बास... वाऽऽवाऽऽ
नितीन : ते बरोबरच आहे म्हणा. मी म्हणजे भावीकाळातील एक आदर्शच आहे.
मीरा : त्यात काय संशय... आहेसच तू तसा... छोन्या... आहेसच तू आदर्श...
माधुरी : पण नितीन... मला कळत नाही की, तुला हे सारं का करायचंय? मला तर कधी बोलला नव्हतास...
नितीन : (रागाने) माझे आईऽ... जरा गप्प बस की...
माधुरी : (दचकून... घाबरल्या सुरात) अंऽऽ
गोपी : (आपल्याच तंद्रीत) हुं:!! हे आदर्श म्हणे... साधा विनोदही कळत नाहीय... प्राचीन काळातही असे दाखले आहेतच म्हणा... आणि मला ते चांगलेच ठाऊक आहेत...
नितीन : पण तुम्हाला या शास्त्रातलं काहीच कळत नाही... काय बरोबर नं?
गोपी : ते काही सांगता यायचं नाही. पण माझा विषय मला चांगला समजतो... मला कोण आणि केव्हा धमकी देतंय तेही चटकन, अगदी ताबडतोब कळतं.
मीरा : पण खरंच का रे नितीन... सारी जणं तुझ्यासारखीच दिसणार?
नितीन : अर्थात... साऱ्या नारींचा मी स्वामी... नाथ होणार... अन् सर्व जणींशी संबंध... संभोग...
मीरा : मऽऽग... बघ कित्ती छान आहे की नाही ...
माधुरी : (कानावर हात ठेवते) नितू... तू असं नको ना बडबडू... नको रेऽ खरंच नकोऽ रेऽऽ नको...
नितीन : चुकलं... माझं चुकलंच...
माधुरी : अरे ती तसली भाषा... तुझ्या तोंडात... तिही इथं...
नितीन : माधुरीऽ... मी चुकलो म्हटलं नं...
माधुरी : हंऽ... मग ठीक आहे... (एकदम खळखळून हसते... हळूहळू स्थिरावते एकदम गोपीला) पण मग तुमच्या मुलाचं काय...
गोपी : काय?
नितीन : तुमच्या मुलाबद्दल काहीतरी...
गोपी : मु ल गा... आ म चा...मु ल गा...
माधुरी : होऽ... मुलगा... तुमचा!! अंऽ तुमचा मुलगा... तो केव्हा येणाराय?
गोपी : हांऽऽ... (थंडपणे) मीराऽ आपला छोकरा कधी येणाराय घरी?
मीरा : जाऊ दे रेऽ ...
गोपी : छेऽ छे:!! असं कसं? मला कळायलाच हवं... तूच जर ते असं चारचौघात बोलतीयैस, तर सांग ना केव्हा येणारे तो?
मीरा : जाऊ देऽ ना म्हटलं नं मी?... मी चुकले... मी असं तिऱ्हाइतांजवळ बोलायला नको होतं एकदम... ते मी असं उघड करायला नको होतं...
गोपी : ते नाही... तो!... तूच त्याला वाढवलंयस... कधी येतोय तो लबाड? कधी येणारे तो... म्हणजे उद्या त्याचा वाढदिवस वगैरे आहे का काय?
मीरा : मी नाही सांगत जा...
गोपी : (कृत्रिमपणे) पण मीरा...
मीरा : मी त्या विषयावर काहीही बोलणार नाहीय...
गोपी : तेही बरोबरच आहे! (माधुरी आणि नितीनला) त्याच्याबद्दल नंऽऽ मीरा नाही बोलायची... आमच्या मुलाबद्दल... खरं तर तिला वाईट वाटतं... त्याचं संगोपन करायला लागलं म्हणून...
माधुरी : (भंपकपणे) सांगा ना... ते कार्टं कधी येणारे घरी? (खुदखुदते)
गोपी : हंऽऽ मीराऽ तू एवीतेवी संयम सोडून हे यांच्याजवळ बडबडली आहेस... तर आता सांगून टाक ना... ते कार्टं येणारे तरी कधी... इथं घरी?
नितीन : माधुरीऽ... मला वाटतं... तू हा विषय...
मीरा : अरे गोपीऽ त्या पोराबद्दल तसं बोलणारच... त्याचंही ते प्रकरणच आहे...
गोपी : कुणाचं?... त्या कार्ट्याचं... च्यायला... त्याचं एवढ्यात... त्या कार्ट्याचं...
मीरा : कार्टं नाही!!... उगाच वाट्टेल ते म्हणू नको त्याला... तो काय बेवारशी नाहीयै! प्रकरण आहे ते तुझंच!
गोपी : अरे व्वाऽ... यापेक्षा मजेशीर गोष्ट मी कधी ऐकली नव्हती...
माधुरी : मीही...
नितीन : माधुरीऽ...
मीरा : गोपीला नेहमीच त्या प्रश्नानं सतावलंय... आमच्या छोकऱ्यानं... म्हणजे तो गोमटा छोकरा नक्की आपलाच आहे की नाही, याचीच या गोपीला शंका वाटते... नेहमीच...
गोपी : च्याऽयलाऽ... किती खुनशी आहेस तू मीरा...
मीरा : (त्याला डिवचण्यासाठी) अलेऽ... अलेऽ... अछं ले काऽय... तुना मी कित्ती कित्तीदा शांगितलंय... (नेहमीच्या स्वरात) तुझ्याशिवाय कुणापासूनच... अन् ते ठाऊक आहे तुला... पण तरीही तुला त्याची खात्री वाटत नाही...
गोपी : हंऽ... अगदी दुष्ट... खुनशी मीरा!!
माधुरी : (विव्हळल्यासारखं व्याकुळ स्वरात) देवा रेऽऽ देवाऽऽ
नितीन : मला वाटतं... आपण या विषयाची चर्चा अशी...
गोपी : (जरा आवाज चढवून) मीरा खोटारडी आहे... ती खोटं बोलतीय... (मीरा हसते) मला काही बाबींची पुरेपूर खात्री आहे... म्हणजे आपल्या देशाच्या सीमा... बाजूचे सागर... आपले परदेशांबरोबर झालेले करार... पण एका बाबीबद्दल मात्र संशय आहे... आमच्या मुलाच्या जन्मात माझा हिस्सा किती आहे याची... आमच्या कुरळ्या डोळ्यांच्या... घाऱ्या केसांच्या मुलाबद्दल...
माधुरी : अय्या... कित्ती छान नं?
मीरा : सुरेख... छान बोललास हंऽ गोपी...
गोपी : (नाटकीपणानं) धन्यवाद...
मीरा : अगदी समयोचित भाषण... खरंच सुंदर... अगदी छान...
माधुरी : खरोखरच सुरेख... सुंदर...
नितीन : (जरबेच्या स्वरात) माधुरीऽ...
गोपी : मीराला ठाऊक आहे... कळतं तिला सारं... तिलाच कळतं!
मीरा : मऽग... कळतंच मुळी... मीही कॉलेजला जात होतेच कीऽऽ...
गोपी : होऽ अन् शिवाय इंग्रजी शाळेत शिक्षण... तेही कॉन्व्हेटमध्ये... ती नं तेव्हा इतकुलीशी... गोऽड छकुली होती... कॉन्व्हेंटमधली...
मीरा : तरीही मी आपल्या संस्कृतीची अभिमानी आहे... आपल्या...
गोपी : अभिमानी नाही... वरवर दाखवतेस तसं... (मीरा हसते.)
माधुरी : काय? खूप छान आहे नै?
नितीन : हंऽऽ छानच म्हणायचं...
मीरा : (बघायचंय?) एऽऽ
गोपी : (मोठ्यांदा चुकचुकतो)
मीरा : च्यॅक च्यॅक काय? फत्रुड कुठचा!
माधुरी : ते नाहीत... तुम्हीच आहात फत्रुड!
मीरा : (माधुरीकडे बोट रोखून) मी फत्रुड काय... आता बघ... सांभाळ बरं का... साभाळ गं बाईऽऽ
माधुरी : ठीक आहे... पण ना मला ते थोडं...औषध...
नितीन : माधुरी ऽ... मला वाटतं... झालं तेवढं पुरे झालं...
मीरा : आणि बरं का रे गोपी... आपल्या छकुल्याचे डोळे किनई घारे नाहीयैत... छानपैकी पाचूसारखं हिरवे गार आहेत...गर्द हिरवे... माझ्यासारखे...
नितीन : (रोखून बघतो)... पण... पण... तुमचे डोळे तर... तपकिरी... चॉकलेटी आहेत...
मीरा : हंऽऽ... कधी कधी या दिव्यात दिसतात ते तपकिरी... पण ते मूळचे हिरवेच आहेत... पण आमच्या सोनुल्यासारखे नाहीत हंऽऽ त्याचे कसे गर्द... अन् गोपीचे... गोपीचे तर पांढरे फटक... नाही नाही... निळसर... निळे... निळेनिळे...
गोपी : काय ते एकदा नीऽऽट ठरव मीराऽ ...
मीरा : मला वाटतं... अंऽऽ... मग तुझे पण डोळे हिरवेच आहेत... बाबांचे डोळे हिरवे... आईचे डोळे... पोराचे डोळे... हिरवे हिरवे डोळे... आणि किनई... पप्पांचे डोळेदेखील हिरवेच आहेत...
गोपी : काहीतरीच हं मीरा... त्यांचे डोळे असं गुंजेसारखे लाल लाल आहेत... लालचुटुक डोळे... पांढऱ्या उंदरासारखे... खरं म्हणजे तेही एक पांढरा उंदीरच आहेत...
मीरा : वाऽरे शूर... आता मारे बोलतोयस... पण पप्पा इथं असते ना... तर शब्ददेखील फुटला नसता तुझ्या तोंडून... शेळपट कुठला...
गोपी : (माधुरी आणि नितीनलाच)... तुम्हाला माहीत्यै... अस्से पांढरे पांढरे केस... अन् ते लाल लाल डोळे... माणकांसारखे... मोठा थोरला पांढरा उंदीर...
मीरा : पप्पांचा द्वेष करतो हा गोपी... तसं पप्पांनी त्याचं काहीच वाकडं केलं नाहीय... पण याला स्वतःच्याच...
गोपी : (मान डोलावतो... तिचं वाक्य पुरं करतो) कमकुवतपणामुळं त्यांचा हेवा वाटतो.
मीरा : कसं अचूक बोललास... अगदी बरोब्बर... (गोपी निघालेला बघून)... अरेच्चा… एकदम असा कुठं निघालास... अचानक...
गोपी : असंच जरा... डोकं थंड करून येतो...
मीरा : ठीक आहे... जा...
गोपी : जशी आज्ञा... (जरासं थांबून) धन्यवाद... (जातो.)
मीरा : तसा तो खूप गुणी आहे हंऽऽ पण साला माझ्या पप्पांचा द्वेष करतो… ठाऊक आहे का तुम्हाला…
नितीन : (हसत खेळत)... सांगा की मग... त्यात काय...
मीरा : (दुखावल्या स्वरात)... काय रेऽ... तुला काय वाटतंय... मी बाता मारतीय… विनोद करतीय... मी कधीच विनोद करत नाही! मला विनोदबुद्धी नाही नाऽऽही... (थांबून)... पण मला दुसऱ्याला खिजवता येतं बरं का... पण ते म्हणजे काय... विनोद नाही... काय...
माधुरी : माझंही तसंच आहे!
नितीन : नाही हं माधुरी... तुला तशी जाण आहे विनोदाची...
माधुरी : मॅऽऽग (सुखावलीय.)
मीरा : मग काय... तुम्हाला ऐकायचंय का... तो हलकट माझ्या पप्पांचा का द्वेष करतो ते... सांगतेच तुम्हाला की, तो पोचट सारखा सारखा पप्पांना पाण्यात का पाहतो ते...
माधुरी : अय्या... सांगा कीऽऽ...
मीरा : (कणखरपणे... माधुरीला)... काही काही लोकं दुसऱ्यावरच्या संकटांनीच सुखावतात... पोसली जातात...
माधुरी : (दुखावलीय)... नाहीच मुळी!
नितीन : माधुरीऽऽ...
मीरा : ठीक आहे... गप्प बसा दोघंही! (क्षणभर एकदम शांतता.) हंऽ तर मी काय सांगत होते... आठवलं... मम्मी अगदी लवकर गेली... मला धड आठवतदेखील नाही... त्यामुळं मी पप्पांबरोबरच वाढले... (थांबून विचार करते)... तशी शाळेला वगैरे गेले म्हणा... पण खरं तर त्यांच्याबरोबरच मोठी झाले... आई गं ऽऽ... मला इतके आवडायचे ते... आदर वाटायचा... मी जणू त्यांची भक्तीच करायची... शप्पथ... अजूनही करते… त्यांनाही माझा खूपच लळा होता... अगदी खूऽऽप... ठाऊक आहे... आमच्या दोघांचं म्हणजे अगदी छान जमायचं... खरंच जमायचं...
नितीन : असं... अरे व्वा!!
मीरा : ...आणि मग पप्पांनी हे कॉलेज सुरू केलं... आता तेच त्यांचं जीवन आहे... नाही... पप्पा म्हणजेच हे कॉलेज आहे...
नितीन : ठाऊक आहे मला... मी वाचलंय त्याबद्दल...
मीरा : तू गप रेऽऽ आणि मी काय सांगत्यैय ते ऐक... (एकदम थांबून... त्याला सांभाळून घेण्यासाठी) तेव्हा मीही मग कॉलेज वगैरे संपवून इथंच राहायला आले... पुन्हा पप्पांकडे... थोडे दिवस म्हणून... लग्न झालंच नव्हतं तेव्हा... म्हणजे तसं खरंखुरं लग्न हंऽऽ बाकी एक प्रकरण होतं म्हणा... मी ज्या बाइर्कडं राहायची... त्यांचा एक गडी होता... उंचनिंच... तरणा... पण... बागकाम करायचा केवळ एवढ्याशा... कुस्तीच्या चड्डीवर... अन् मी आपली बघत राहायची त्याच्याकडं... एकटक... भानच हरपायचं... पण त्या बाईंनी एकदा हे पाह्यलं...अन्... तो गुल... कुठं गायब झाला की निघून गेला... नंतर त्याच्याबद्दल काही कळलंच नाही... मग मीही आले पप्पांकडे... अन मग मला खरंच वाईट वाटलं... त्या माळ्याच्या पोराबद्दल... शीःऽ मी खरंच अगदी भंपक होते होऽ... पण मग मी पप्पांकडे लक्ष पुरवलं... त्यांचं सारं काही मीच करायची... कित्ती काळजी घ्यायची त्यांची... खूप खूप बरं वाटायचं मला... अन् त्यांनाही...
नितीन : हो... हो ...
मीरा : हो काय होऽ...अन् त्या वेळचं तुला काय माहीत रे? हो म्हणेऽऽ (नितीन खांदे उडवतो, तिच्या ध्यानात ते येतं एकदम त्याला चुचकारण्यासाठी लाडानं)... असं रुसू नको छकुल्या... (नितीन किंचित हसतो)... आणि मग... मग एकदम माझ्या डोक्यात आलं... इथं... कॉलेजातल्या कुणाशी तरी मी लग्न करायला हवं. तसं ते वेडगळपणाचंच ठरलं म्हणा... पण तेव्हा मात्र मला तसंच वाटत होतं... शिवाय पप्पांना तसंही कॉलेज आपलं राहावं, असं वाटायचंच... परंपरेनं... (एकदम)... पण असा दूर दूर का राहातोय तूंऽ... इथं... जवळ येऊन बस ना...
नितीन : (माधुरीकडे बघत... पण तिचं त्याच्याकडे लक्षच नाहीय)... नकोऽ... तसं हे ठीक आहे...
मीरा : बघ हं. पण जरा ऐसपैस बस की... हंऽ... तर वंशपरंपरा... इतिहास... अन् पप्पांनाही मला वाटतं वाटायचं नेहमी... कुणाला तरी आपला वारस म्हणून तयार करावं... या जबाबदारीसाठी... म्हणजे मग... नंतर... कळलं ना...
नितीन : हो... होऽ तर...
मीरा : (त्याच्याकडे लक्ष न देताच)... अन् तेही साहजिकच आहे म्हणा... तुम्ही काही घडवलंत की मग त्याची नीट देखभाल व्हावी असं वाटतंच... ते परक्यांच्या हाती जाऊ नये याचीही काळजी वाटत असते... म्हणून ते कुणाकडं तरी सोपवायचं... म्हणून मीच प्रयत्न करत होते... पप्पांसाठी योग्य वारस शोधायचा... म्हणजे त्या वेळी त्याच्याशी लग्न करायचं वगैरे माझ्या डोक्यात नव्हतं... म्हणजे तसा काही पणबीण नव्हता केला... की जो मला जिंकेल त्याला कॉलेज... नाही... जो कॉलेजची जबाबदारी स्वीकारेल त्याला मी मिळेन... असं काही नव्हतं ते... पण मला खोलवर कुठंतरी तसं वाटत होतं... नाही... माझी खात्रीच होती तशी... पण तसे सगळे तरुण... चांगले जे होते... त्यांची लग्नं आधीच झाली होती...
नितीन : अर्थातच...
मीरा : (विचित्रपणे हसते)... तुझ्यासारखंच ना रे राजाऽऽ...
माधुरी : (मीराची नक्कल करीत)... तुझ्यासारखंच रे राजाऽऽ...
मीरा : पण नेमका तेव्हाच गोपी आला... तेव्हा आला गोपी... (खरोखरच गोपी प्रवेश करतो.)
गोपी : (येता येता... त्याच्याकडे ट्र... ग्लास इ. सामग्री आहे)... तेव्हा गोपी आला... नवी जबाबदारी पेलत... असाच... हंऽ... तू काय सांगत होतीस मीराऽ... अंऽऽ?
मीरा : मी नंऽ... गोष्ट सांगतीय... या पोरांना... बस नं तूही... तुलाही खूप गोष्टी कळतील...
गोपी : (उभाच आहे) हो... हो... ते ठीकच आहे...
माधुरी : ... तर तुम्ही परत आलाय!
गोपी : होऽऽ... मी आलोय...
माधुरी : नितीऽऽ न... अरेऽ... हे आलेत...
नितीन : हो... हो... ते आलेत...
मीरा : हंऽ... तर मी काय सांगत होते... कुठवर आले होते...
माधुरी : मला आता इतकं बरं वाटतंय...
नितीन : शूःऽऽ गप... गप बस...
माधुरी : (त्याची नक्कल करते)... शूःऽऽ गप... गप्प बस...
मीरा : हांऽऽ... आठवलं... तर तेव्हाच गोपी आला... बरोब्बर! गोपी आला. तेव्हा तो तरुण होता... हुशारही... आणि बघा... अगदी गोंडस होता... आता खरंही वाटणार नाही म्हणा कुणाला... पण होता... तेव्हा...
गोपी : अन् तुझ्यापेक्षा लहान...
मीरा : होऽऽ... माझ्याहून लहान... अधिक कोवळा...
गोपी : चांगला पाच-सहा वर्षांनी...
मीरा : हो... सहा वर्षांनी लहान... पण मला त्याचं कधीच काही वाटलं नाही... तर तो त्या वेळी तसा आला... त्याच्या डोळ्यांत चमक होती... आणि मग... मग मी त्याच्या प्रेमातच पडले... कशी... कधी... ते कळलंच नाही माझं मलाच...
माधुरी : अस्संऽऽ... कित्ती मजा...
गोपी : खरंच... ती प्रेमात पडली होती... तुम्ही ते पाहायला हवं होतंत... मी शिकवायसाठी वर्गात गेलो की... बाहेर हिरवळीवर ती बसून राहायची... मधूनच विचित्र विव्हळायची... सर्वांना ऐकू जाईल असं मोठ्यानं... एकदम गवतच उपटायची... कधी कधी रात्रीही माझ्या खोलीबाहेर हेच... काही करणंच अशक्य होऊन जायचं...
मीरा : (हसत... आता तिला खरीखुरी गंमत वाटतीय) काय की बाई... अगदी वेडी झाली होती मी... याच्याकरता... तिथं... तेव्हा... त्या वेळी...
गोपी : तशी मीरा म्हणजे अस्सल प्रेमिका आहे हंऽऽ...
मीरा : म्हणजे काय... आहेच मी... प्रेमिका... चिरंतनाची प्रेयसी... आणि एकदा मी त्याच्या प्रेमात पडले नं... मग लग्न तसं अटळच होतं... आणि योग्यही. कारण मी म्हटलं नं... तुम्हाला की, पप्पाही अशा कुणाच्या शोधात होतेच... जो कुणी...
गोपी : एक मिनिट... एक मिनिट थांब हंऽऽ मीराऽऽ...
मीरा : (त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून)…पप्पांना त्यांची जागा आता दुसऱ्या कुणीतरी घ्यायला हवी होती... आणि ती बदलाची वेळ येईपर्यंत तो चांगल्यापैकी तयार व्हायला हवा होता...
गोपी : (कडकपणं)... मी तुला थांब म्हटलं... मीराऽऽ... मिनिटभर थांब...
मीरा : (त्याची दखल न घेताच)... म्हणजे पप्पा निवृत्त होतील तेव्हा... अन् मला वाटतं...
गोपी : मीराऽऽ आता बस्स झालं!... बंद कर सारं...
मीरा : (चिरडीला येऊन)... काय झालं आता... आता काय हवंय तुला?
गोपी : (थंडपणे) मला वाटलं तू आपल्या प्रेमाची... प्रणयाची कहाणी सांगत्यैस... मला वाटलं नव्हतं... तूं हे भलतंसलतंच काही सांगायला सुरुवात करशील म्हणून...
मीरा : पण मी तर तेच सांगणारे... मग? काय म्हणणं आहे तुझं...
गोपी : मला नाही वाटत... ते बरोबर आहे म्हणून... तुझ्या जागी मी असतो नं... तर मुळीच काढला नसता हा विषय...
मीरा : तू काढला नसतास नं हा विषय... माझ्या जागी असतास तर... पण तू नाहीच्चेस ना माझ्या जागी...
गोपी : बघ बुवा... अगोदरच तू एक भलीच गोष्ट बोलून टाकलीयस… फोडलीयस... तुला माहीतच आहे...
मीरा : (गडबडून जाते)... काय... काय?...
गोपी : तेच... आपल्या लाडक्याबद्दल. आपल्या त्या कार्ट्याबद्दल... आपला मुलगा... आणि मी सांगून ठेवतोय मीरा... तू जर का हे असंच सुरू केलंस नं तर मी रागावीन... मला सहनच होणार नाही ते...
मीरा : (त्याला हसत... छद्मीपणानं)... अस्सं... खरं का काय?
गोपी : (खडसावल्यासारखं) मी सांगून ठेवतोय तुला...
मीरा : तू काय...??
गोपी : मी सावध करतोय तुला मीराऽऽ... इशारा देतोय...
नितीन : पण मी म्हणतो... आपण या साऱ्याची चर्चा करायलाच हवीय का?.
मीरा : (त्याला थांबवत)... मला ताकीद मिळालीय!... (थांबते. थोड्या वेळानं माधुरी अन् नितीनला...) हंऽऽ... तर मी काय सांगत होते... हांऽऽ... तर माझं या शेळपटाशी लग्न झालं... आणि ते सारं मीच व्यवस्थित आखलं होतं... तो होता नवरा मुलगा... त्याला सर्वच दृष्टींनी तयार करणं आवश्यक होतं... म्हणजे मग ती जबाबदारी त्याला पेलली असती... प्रथम त्याच्या विषयाचा प्रमुख म्हणून... नंतर मग कॉलेजचा प्रचार्य म्हणून... तुम्हाला कळतंय नं... हे सारं अशा तऱ्हेनं व्हावं म्हणून ठरवलं होतं... (थांबून गोपीकडे बघते... पण त्याची तिच्याकडे पाठ आहे.) तुला राग येतोय? हो ऽऽ? हंऽऽ... (पुन्हा नितीन माधुरीला) तर असं सारं व्हायचं होतं... तसंच नियोजन होतं... अगदी सोपं... सोप्पं... पप्पांनाही हा बेत पसंत होता... काही काळ तरी... पण नंतर काही वर्षं त्यांनी याचं काम पाह्यलं... (गोपीला डिवचण्यासाठी)... फारच राग येत असेल नं... (पुन्हा नितीन अन् माधुरीला)... पण एकंदर ते पाहिल्यानंतर हा बेत काही फारसा चांगला आहे... असं काही त्यांना वाटेना... पुन्हा पुन्हा विचार करूनही पटेना... गोपी ही जबाबदारी पेलू शकेल याची त्यांना खात्रीच वाटेना... त्याची घडण तशी नव्हतीच... ते त्याच्या रक्तातच नव्हतं...
गोपी : (अजूनही त्यांच्याकडे पाठच आहे) थांबव हे मीरा... एकदम बंद कर!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मीरा : (विजयानंदानं) हुं:ऽ... तुला कोण विचारतंय... मी नाही आता गप्प बसणार... आता मी सांगणारच... तर गोपीलाऽऽ नंऽऽ किनई तशी जिद्दच नाही... तशी महत्त्वाकांक्षा नव्हती... तशी जिगर नाही... तेव्हा तर तो... तो अगदीच पुचाट होता... पुचाट... फद्या... भला मोठा फ द्या...
गोपी : (अतिशय रागानं)... तुला हे बंद कर असं म्हटलं मी मीराऽऽ...
मीरा : अरे रागावू नको... फोडशील तो सेट... खूप भारी आहे बरं का तो... तुझ्या पगारात तो परवडणार नाही आपल्याला... साध्या प्राध्यापकाच्या पगारात ते परवडणारं नाहीय बाबाऽ (पुन्हा माधुरी अन् नितीनकडे वळून)... तर तो योग्य नव्हताच... विश्वस्तांच्या सभेत... कार्यकारिणीच्या बैठकीत... काही जमनंच नव्हतं त्याला... तसं भारी असं व्यक्तिमत्त्वच नाहीय त्याला... कळलं ना मी काय सांगत्यैय... त्यामुळं पप्पांची फाऽर फाऽऽर निराशा झाली... अपेक्षाभंग... तुम्ही समजू शकाल त्यांचं ते दुःखऽ... अन् म्हणून मी इथं अडकलीय... या पुचाटाबरोबर... या फद्याबरोबर...
गोपी : (एकदम वळून)... आता गप्प बस मीरा... चूपऽऽ
मीरा : कॉलेजला लागलेली ही कीड... हा किडा क्षुद्र कीटक...
गोपी : मीराऽ... नको... बस्स झालं... बस कर आता... बास कर म्हटलं मी...
मीरा : (रागानं)... आपण सारे किडे...हुं:ऽऽ किडे-मुंग्यांचंच जिणं आपलं...
गोपी : मुंग्या... मुंग्या कशाला इथं... मुंग्या नकोत... त्या फार थोर असतात...
मीरा : (कुचकेपणानं) हंऽऽ... अन् आपण क्षुद्र... स्वार्थासाठी काहीही करणारे... लाचार... दीऽन...
गोपी : मुंग्या कर्तृत्ववान... महाप्रतापी... सर्वभक्षक... आकाशात उडून सूऱ्याला गिळणाऱ्या...
मीरा : आणि आपण.... स्वार्थासाठी कोणतीही तडजोड करणारे... कणाहीन... आपल्या स्वार्थासाठी... (एकाच वेळी... प्रथमत तालावर... पण नंतर ओरडून... एकमेकांचा आवाज बुडवून टाकण्यासाठी एकाच वेळी दोघांचे बोल)
मीरा : आपल्या स्वार्थासाठी गोपी : मुंगी उडाली
प्राचार्यांची पोरगी आकाशी
गटवली कुणी...? तिने गिळिले
पुन्हा तिला मोकळी सूर्यासी...
सोडली कुणी...? थोर नवलावू
स्वतःची उणीव झाला...
झाकली कुणी... वांझी पुत्र
स्वतःची उणी... प्रसवला...
झाली दुणी... (तेच पुन्हा पुन्हा...)
इतरांची उणीदुणी ... ... ...
काढतो कुणी... ... ... ...
(एकमेकाचा अंदाज घेतात. नितीन-माधुरी गप्प.... थक्क... गाता गाता क्षणभर दोघंही गप्प होतात. शांतता. जीवघेणी. प्रचंड तणावाची. हे सारं सहन करण्याची माधुरीची कुवत नाही. खुणेनंच मीरा तिला बोलावते... आत जाण्यासाठी... त्या दोघी निघतात... त्यांच्यामागोमाग नितीनही...)
गोपी : (अचानक्) नाहीऽऽ... नाहीऽऽ
वांझ पुत्र प्रसवणार नाही...!
मीराला मूल होणार नाही...!!
मीराला.... मूल... होणार नाही...!!!
... .... ....
(माधुरी पडण्याच्या बेतात. मीरा आणि नितीन तिला सावरत असतानाच पडदा पडतो.)
(प हि ला अं क स मा प्त)
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment