_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
काही गोष्टी अचानक घडतात. कोणी त्याला योगायोग म्हणतात, तर कोणी नशीब. तेव्हा मुंबईमध्ये नोकरी होती, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये. कामाच्या वेळा बदलत असत. त्यामुळे संध्याकाळी बऱ्याचदा मोकळा वेळ मिळत असे. तेव्हा थोडं भटकायचं आणि विंडो शॉपिंग करायचं. त्या वेळी कधीतरी काही चांगलं हातात पडत असे. असंच एकदा ऑफिसपासून जवळच असलेल्या हुतात्मा चौकातील - फ्लोरा फाऊंटन - येथील पदपथावर जुनी-नवी पुस्तकं विकणाऱ्यांपैकी एकाच्या उघड्यावरच मांडून ठेवलेल्या पुस्तकांकडे नजर टाकत असताना, अचानक ज्याचा शोध घेत होतो, ते पुस्तक दिसलं. एडवर्ड अल्बी या नाटककाराचं ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ?’
...त्याच्यावर सिनेमाही निघाला होता. त्याच नावाचा. एलिझाबेथ टेलर आणि रिचर्ड बर्टन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र तो पाहण्याचा योग आला नाही, पण त्याच्याबाबत वाचनात आलं होतं. तो ज्या नाटकावर बेतलेला होता, ते नाटक तरी मिळायला हवं असं सारखं वाटत होतं. साधारण १९७९ला हा योग आला.
लगेच ते पुस्तक घेतलं. घासाघीस न केल्यानं विक्रेताही खुश होता. आता कधी ते वाचतोय असं झालं, पण कामावर जायचं होतं, त्यामुळे धीर धरणं भाग होतं. जवळच्या झोळीत टाकलं. काम संपवून घरी गेल्यावर रात्री जागून तो बेत अमलात आणला. नाटकाचा विषय आगळावेगळा होता. कधी कुतूहल जागवणारा, गोंधळात टाकणारा, तर कधी विचार करायला लावणारा. कोणत्या तरी कोड्याचं उत्तर शोधावं तसा. नंतर पुन्हा एकदा निवांतपणे वाचलं, तेव्हा मनात रुजलं. वाटलं की, याचं काहीतरी करायला हवं.
इंग्रजी वा परदेशी भाषांतली नाटकं मराठीत येण्याची प्रथा तशी जुनी आहे. त्यातही ‘भाषांतरा’पेक्षा ‘रूपांतरित’ नाटकं खूपच जास्त. दुसरं असं की, रूपांतरित नाटकं आपल्या प्रेक्षकांना अधिक भावतात. याचं सहज आठवणारं उदाहरण म्हणजे ‘बेकेट’ या नाटकाचा अनुवाद कुसुमाग्रजांनी त्याच नावानं केला, तर त्याचं रूपांतर वसंत कानेटकर यांनी ‘बेईमान’ या नावानं केलं. ‘बेईमान’ला जसा प्रतिसाद मिळाला, तसा ‘बेकेट’ला मिळाला नाही.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
तसंच ‘माय फेअर लेडी’ची दोन रूपांतरं पु. ल. देशपांडे आणि विद्याधर गोखले यांनी अनुक्रमे ‘ती फुलराणी’ आणि ‘स्वरसम्राज्ञी’ या नावानं केली. तीही प्रेक्षकांना खूपच भावली. मग आपणही तसं का करू नये, असं वाटलं. ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ?’ मराठीत आलेलं नव्हतं.
मी त्याआधी बऱ्याच कथा रूपांतरित केल्या होत्या आणि त्या ‘नवल’ मासिकात, ‘मनोहर’ साप्ताहिकात आणि इतर काही मासिकांत प्रकाशित झाल्या होत्या. त्याशिवाय लिझी बोर्डन प्रकरणावर आधारित एका एकांकिकेवर ‘नाती रक्ताची’ या नावानं एक एकांकिकाही रूपांतरित केली होती. ‘नवल’मध्ये ती छापून आली होती. आणि ‘महाराष्ट्रीय कलोपासक’च्या ‘मासिक एकांकिका’ या उपक्रमात मंचावर सादरही झाली होती. त्यामुळे आपला हा विचार अंमलात आणायला हरकत नाही, हा आत्मविश्वास आला होता. त्यामुळे जमेल तसं, वेळ असेल तेव्हा रूपांतराचं काम करू लागलो.
सुरुवातीला नाटकाचं नाव आणि त्यातील पात्रांची नावं कशी असावीत, हा विचार केला. एकंदर स्वरूप ध्यानात घेऊन ‘खेळ मांडियेला’ हे नाटकाचं नाव निश्चित केलं. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग लता मंगेशकरांच्या आवाजात आला होता. तो वारंवार नभोवाणीवर लागत होता. त्यामुळे डोक्यात बसला होता. नेमकी त्यातीलच सुरुवातीची ओळ नाटकाचं नाव म्हणून चपखल बसते हे जाणवलं आणि चांगलाच उत्साह आला.
पात्रांची नावं ठरवताना ती मूळ नावांशी जुळणारी असावीत असं वाटलं. मग जॉर्ज गोपी बनला, मार्थाची मीरा झाली, निकला नितीन हे नाव दिलं आणि हनीची माधुरी झाली. नाटक आपल्याकडचंच वाटावं अशी. एकच होतं की, नाटकातील प्रमुख बाब ‘पार्टी गेम’ ही आहे आणि खेळ आपल्याकडं फारसा माहीत आणि प्रचलित नव्हता. तरी प्रेक्षक हा प्रकार समजून घेतील असं वाटलं आणि काम सुरू केलं. (आता आपल्याकडंही हा प्रकार मान्यता पावला आहे. म्हणजे त्या वेळी थोडं काळापुढचंच हे नाटक म्हणता आलं असतं.)
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
मुख्य प्रश्न सुटल्यावर मग लेखन झपाट्यानं होऊ लागलं. अगदी सहज नाटक पुढं जाऊ लागलं. त्यामुळे आणखीच उत्साह आला आणि वेळ मिळेल तेव्हा लिहायला लागलो. बघता बघता एक अंक लिहून पुरा झाला. तो वाचल्यानंतर आपल्याला हे जमतंय हे कळलं. या कामातही किती आव्हानं आहेत हेही उमगलं.
नंतर मात्र काम झटपट होत गेलं आणि नाटक पूर्ण झालं. पुढं काय करायचं हा प्रश्न होताच. मग वडील मुंबईला आले, तेव्हा त्यांना वाचायला दिलं. ते इंग्रजी साहित्य बरंच वाचत आणि नाटकांचीही आवड आणि जाण त्यांना होती. त्यामुळे त्यांचं मत महत्त्वाचं होतं. त्यांनी पसंती दिली.
आता कुणाला द्यावं असा विचार करताता माधव मनोहर यांचं नाव आठवलं. ते एका मैत्रिणीचे काका होते, पण ओळख वगैरे नव्हती. तरीही म्हटलं जाऊन तर पाहू. ते जवळच, शिवाजी पार्कच्या एका गल्लीत राहत. धीर करून एक दिवस त्यांच्याकडं गेलो आणि ओळख करून देऊन माझं काय काम आहे, ते सांगितलं. हस्तलिखित त्यांच्याकडं दिलं. ते काय म्हणतात ही धाकधूक होतीच. पण त्यांनी हसून म्हटलं, ‘ठेवा. वाचायला थोडा वेळ लागेल.’ मी म्हटलं, ‘चालेल मला.’ मग थोडं इकडचं-तिकडचं बोलणं झालं, म्हणजे मी कुठं कामाला आहे, कुठं राहतो या प्रकारचं. ऑफिसचा फोन नंबर त्यांच्याकडं आहे असं त्यांनी सांगितलं. मग ‘थोड्या दिवसांनी येतो’ असं सांगून निघालो. ते दारापर्यंत सोडायला आले आणि ‘या सवडीनं’ असं म्हणाले.
नंतर एक-दोनदा त्यांच्याकडं चक्कर झाली, पण मी नाटकाचा विषय काढला नाही. अवांतर गप्पा झाल्या. मग तेच म्हणाले की, ‘वाचून झालं की कळवीन.’ आता माधव मनोहर काय म्हणतात, याची वाट पाहत राहिलो. काही दिवस गेले. त्यांच्याकडून काहीच कळत नव्हतं. विचार केला की, त्यांच्या कामातून वेळ मिळाला की, वाचून सांगतील. त्यामुळे निवांतपणं वाट बघत राहिलो. नंतरच्या भेटीत मात्र ते म्हणाले, ‘चांगलं झालंय, फक्त दुसरा अंक वाढवायला हवा. म्हणजे नाटकाला योग्य आकार येईल.’ मग जो भाग वगळला होता, तो सांगून त्यांना अशा प्रकारे वाढवता येईल, हे सांगितलं. त्यावर ‘हे चालेल’, असं म्हणून त्यांनी संमती दशर्वली.
त्याप्रमाणे दुसरा अंक थोडा वाढवला आणि त्यांना दिला. त्यांनी तो लगेच वाचला आणि म्हणाले – ‘आता ठीक आहे. हे आता माझ्याकडे ठेवतो.’ म्हटलं, ‘ठीक आहे.’ मग त्यांनी विचारलं, ‘आधी असं काही लिहिलं होतंत का?’ त्यावर मी गोष्टी आणि एकांकिका या रूपांतरांबाबत सांगिलं. ते म्हणाले, ‘आश्चर्य आहे. फारसा अनुभव नसतानाही तुम्हाला हे जमलंय!’ खूप समाधान झालं.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
नंतर कार्बन प्रतींमध्येही सुधारणा केली. नाटकाच्या हस्तलिखिताच्या तीन-चार प्रती होत्या. तेव्हा झेरॉक्स नसल्यानं, कार्बनपेपरचा उपयोग करून काम केलं. अनंत भावे यांना एक प्रत दिली. त्यांनी थोड्या दिवसांतच प्रतिक्रिया सांगितली- ‘आपल्याला आवडलं.’ ‘पुष्पाबाईंनी वाचलं का?’ असं विचारलं, तेव्हा ते हसून म्हणाले- ‘वाचलं की, पण त्यांचं म्हणजे...’ असं बोलून पुन्हा हसले. ऑफिसमधील एक-दोघांनाही प्रत वाचायला दिली. त्यांनी अनुकूल मत दिलं. राम पटवर्धन यांनाही वाचायला दिलं. त्यांनीही ‘ठीक झालंय’ असं सांगून, ‘आमच्याकडेही, ‘सत्यकथे’त या प्रकारची एक कथा छापली होती’, असं म्हटलं. एकंदरित हे प्रकरण योग्य मार्गावर आहे असं वाटलं.
आता माधव मनोहर काय सांगतात याची वाट बघत काही काळ निवांत राहिलो. आणि एक दिवस अचानक ऑफिसमध्ये त्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘तुमचं नाटक आयएनटीनं घेतलंय. वाचनही झालं. सतीश दुभाषीनं केलं.’ मी अवाकच झालो. थोडं सावरल्यावर म्हटलं- ‘मला का नाही सांगितलंत?’ त्यावर ते सहज म्हणाले- ‘त्यात काय सांगायचंय?’ हा धक्काच होता. पण ते पुढं म्हणाले- ‘विजय बोंद्रे तुम्हाला भेटायला येईल. तोच दिग्दर्शन करणार आहे.’
त्याप्रमाणं तो आला. प्रायोगिक क्षेत्रात त्याचं चांगलं नाव होतं. त्यानं बसवलेल्या नाटकांना राज्य नाट्यस्पर्धेत बक्षिसं मिळाली होती. त्यानं स्वतःही काही नाटकं रूपांतरित केली होती. अगदी नजीकच्या काळात त्याच्या ‘मेन विदाउट शॅडोज’च्या प्रयोगालाही राज्य नाट्यस्पर्धेत अव्वल क्रमांक मिळाला होता, हे माहीत होतं. पण ते पाहता मात्र आलं नव्हतं. त्यानं काही शंका विचारल्या, त्याची उत्तरं त्याला पटली. त्यानं ‘पुराणकाळातील काही उल्लेखांचा खुलासा हवा’ असं म्हटलं. मग त्याला खुलासेवार संदर्भ आणि त्यांबाबतच्या कथा सांगितल्या. त्याचं समाधान झालं असावं. ‘एकदा घरी ये. निवांत बोलू’, असं म्हणून तो गेला.
नंतर एकदा ऑफिसमध्ये त्याचा फोन आला. त्यानं त्याच्या आफिसचा पत्ता दिला आणि ‘तिथं पहिल्यांदा भेट’ असं म्हटलं. मी त्याला मला सोयीची वेळ दिली. ‘ठीक आहे, केव्हाही ये’, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. एअर इंडियाच्या इमारतीच्या १८व्या मजल्यावर त्याच्या ऑफिसमध्ये भेटलो. त्या वेळी पात्रयोजना काय असावी याबाबत बोललो. मी म्हटलं, ‘मला त्याबाबतचा काही अनुभव नाही.’ त्यावर तो म्हणाला- ‘विचार करायला हवा. हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणायचं आहे. त्यानुसार विचार करायला हवा.’ त्यानं नायकाच्या भूमिकेसाठी अनेकांच्या भेटी घेतल्या, पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित लेखक आणि दिग्दर्शकही नवा, हा विचार त्यामागं असणार. पण विजयनं प्रयत्न सोडले नाहीत. अखेर श्रीकांत मोघे यांनी होकार दिला. नायिकेच्या भूमिकेसाठीही सुरुवातीला काहींनी नकार दिला, पण विजयनं धीर न सोडता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर आशा पोतदार यांनी होकार दिला. निकच्या भूमिकेला जयराम हर्डीकरनं चटकन होकार दिला आणि माधुरीच्या भूमिकेसाठी तेव्हा ‘बॉबी’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या किरण वैराळेनं.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : अंक पहिला : खेळ मांडियेला
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
पात्रयोजनाही नक्की झाल्यावर बाकी तयारी. संगीतासाठी शांक-नील ही जोडी विजयच्याच टीममधली. त्यामुळे त्यांची निवड सहजच झाली. नेपथ्याची कल्पना विजयनं सांगितली. हे महत्त्वाचं होतं. कारण एकाच सेटवर काही तासांतील घडामोडींवरील हे नाटक होतं. अर्थात फारसा पसारा नव्हता. साधारण बैठकीच्या खोलीत असतात, ते सोफा, खुर्च्या, छोटी सहज हलवता येणारी टेबले. मांडणी अशी की, पात्रांच्या हालचालींना अडथळा येणार नाही. हे त्यानं नक्की केलं. भिंतींना शुभ्र पांढरा रंग, खोलीला दोन दरवाजे, एक बाहेर जाण्यासाठी, तर दुसरा घरात जाण्यासाठी. चटकन हलवता येईल असं हे नेपथ्य असणार होतं. बहुधा व्यावसायिक नाटक, म्हणून ही योजना केली असणार.
नंतर अधूनमधून त्याची गाठ पडत राहिली. एव्हाना ऑफिसमध्येही ही बातमी पसरली. एकदा अचानक संपादक गोविंदराव तळवलकर यांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. आणि म्हटलं- ‘तुमचं नाटक येतंय म्हणे!’ म्हटलं- ‘हो. आयएनटीनं घेतलंय.’ त्यावर ‘छान’ असं म्हणाले. बरं वाटलं. बाहेर आल्यावर काही सहकाऱ्यांनी विचारलं, ‘काय रे, काय झालं?’ त्यावर आमचं काय बोलणं झालं, ते त्यांना सांगितलं. त्यांनाही बरं वाटलं. फोननं घरीही कळवलं. तेव्हा वडील म्हणाले, ‘मुहूर्त केव्हा करणार आहेत, ते ठरल्यावर लगेच कळव. आम्ही नक्की येऊ.’
दरम्यान आयएनटीचं ‘एक होता युवराज’ हे नाटक येणार होतं. त्याच्या ब्रोशरवर मागच्या बाजूला ‘आगामी- खेळ मांडियेला’ हे नाव होतं. ते ब्रोशर दीर्घकाळ जपून ठेवलं होतं.
यथावकाश बाबुलनाथ मंदिरात नाटकाचा मुहूर्त ठरला. म्हणजे मंदिराच्या पायऱ्या उतरून थोडं खाली आलं की, डाव्या बाजूला आयएनटीची प्रशस्त जागा होती, तिथं. तसं घरी कळवलं, आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांनाही यायला सांगितलं. ज्यांना वेळ सोयीची होती, ते म्हणाले ‘नक्की येऊ’. बाकीचे काही बोलले नाहीत. काही जणांनी मात्र शुभेच्छा दिल्या.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : अंक दुसरा : खेळ मांडियेला
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
…आणि मुहूर्ताचा दिवस उजाडला. आई-वडील आले होते. मी लवकरच निघालो होतो. आई-वडील माझा मित्र आणि (त्याच्या पुण्यातील ‘इंडियन एक्सप्रेस’च्या नोकरीच्या काळात) घरच्यांपैकीच एक बनलेला शिरीष कणेकर याच्याबरोबर आले होते. कार्यक्रमाला सर्व जण वेळेआधी पोहोचले. सर्व कलाकारही. खास उपस्थिती अभिनेत्री तनुजा यांची असणार होती. त्याही आल्या आणि मग मुहूर्ताचा कार्यक्रम वडलांच्या हस्ते पार पडला. नंतर श्रीकांत मोघे यांनी नाटकाच्या प्रतीतील एक संवाद, जे पान आलं ते उघडून वाचला. तो असा –
‘‘हो ऽ! संपवलं..! मी. मीच संपवलं…! कारण... ते संपवायलाच हवं होतं... आशेची वेल कल्पनेत बहरली… तरी प्रत्यक्ष आधाराला हात गेला… तर तिचा उपयोग होत नाही! तो… तो माझा आधार होता… कल्पनेतलाच. या जगातून जाताना माझी खूण मागं ठेवायची होती मला... मला मूल हवं होतं... छोटंसं... गोजिरवाणं बाळ हवं होतं...”
(नेमका हा संवादच त्यांच्या समोर यावा हे नवलच. पण मनात पाल चुकचुकली. आणि पुढं तसंच झालं. नाटकाबाबत कल्पनेची वेल बहरली होती, पण प्रत्यक्षात... )
मुहूर्ताचा कार्यक्रम चांगला झाला. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांत छोटी बातमीही आली. निदान ‘म.टा.’मध्ये तरी सविस्तर यायला हवी होती, असं एक सहकारी म्हणाले. म्हटलं, आली हे काय थोडं झालं! थोड्या दिवसांत तालमीची तयारी झाली. जागा आणि वेळ ठरली. मला जाणं शक्य नव्हतं, पण विजय चांगली सुरुवात झाली, असं म्हणाला. पुढची तालीम थोड्या दिवसांनी ठरली होती. कारण जयराम ‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाच्या दौऱ्यावर जाणार होता. आणि…
...त्या दौऱ्यातच अघटित घडले. एका ठिकाणी त्यांची बस अचानक पेटली. त्यातूनही काही जण वाचले, पण दुर्दैवानं जयराम हर्डीकर आणि शांता जोग मात्र आतच राहिले. नाट्यसृष्टी सुन्न झाली. आम्हालाही तो धक्का पचवणं अवघड होतं. बरंच काही लिहून आलं. मीही काही मुक्तछंदात लिहिलं. सूत्रधार आणि नटी यांच्या संवादरूपात. त्याचा शेवट ‘शो मस्ट गो ऑन’नं केला होता. आमच्या ‘म.टा.’च्या पुरवणीत तो येणार होता. पुरवणी विभागातील भालचंद्र वैद्य यांनी तसं सांगून तयार करून घेतलेलं चित्रही दाखवलं होतं, पण तो आला नाही. कुणा वरिष्ठानं याबाबत बरंच आलं आहे, असं सांगून तो काढायला लावला. नंतर मात्र याबाबतचे दोन-तीन लेख ‘म.टा.’मध्येच छापून आले. म्हटलं, ठीक आहे. त्या मजकुराचा योग नव्हता. वर्तमानपत्रात असं चालायचंच म्हणून मनाची समजूत घातली.
जयरामच्या जागी कोणाला घ्यायचं याचा विचार विजय करत होता. त्यानं काही जणांना विचारलंही, पण त्यांच्याकडून नकार आला. कुणी तयार होईना. कुणी म्हणालं- असंच असतं या नाट्यसृष्टीत. या लोकांचे विचार वेगळे असतात. थोडी निराशा आली. विजयही हताश झाला. त्याचा उत्साह मावळणं समजण्यासारखं होतं....
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : अंक तिसरा : खेळ मांडियेला
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
आणि मग हळूहळू नाटकाचा विषय मागे पडत गेला. काही काळानंतर भालचंद्र झा यांनी त्यात रस घेतला. ते करणार होते, आयएनटीसाठीच. भेटायलाही आले. आमचं बोलणं झालं. त्यांना काही शंका होत्या. त्यांचं खुलासेवार उत्तर दिलं. त्यांचं समाधान झालं. ते म्हणाले- ‘आता कामाला लागतो.’
काय झालं कोण जाणे, पण नंतर त्यांच्याकडून काहीच कळलं नाही. मीही काही विचारण्याच्या फंदात पडलो नाही. कारण ता माझाही उत्साह संपला होता. हे प्रकरण संपलं असं समजून चाललो. आप्त-सुहृद साऱ्यांनाच वाईट वाटलं.
आता माझ्याकडं कुणाला दाखवण्यासाठीही काही नव्हतं. विजयनं कुणाकुणाला आयएनटीनं सायक्लोस्टाइल (चक्रमुद्रांकित) करून काढलेल्या प्रती देऊन टाकल्या होत्या. त्या परत मिळाल्या नाहीत. अखेर आयएनटीमधून कशीबशी एक प्रत मिळवली. पण तोवर म.टा.मध्ये आलेले स्नेही, नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी ती कुणाला तरी दिली. ती परत मिळाली नाही. नंतर बराच काळ गेला. नोकरी संपवून पुण्यात परतलो. एक प्रत मित्र आणि ‘महाराष्ट्रीय कलोपासक’मधील मधू जोशी यांच्याकडं दिली होती. पण दरम्यानच्या काळात त्यांचं निधन झालं. त्यामुळे ती मिळण्याची शक्यताही नव्हती.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘कलोपासक’मधील दुसऱ्या एका मित्रानं सांगितलं की, त्याच्या सामानातही ती आढळली नाही. दरम्यान जागा बदलून दुसरीकडं गेलो. तिथं संगणकावर लेखनाचं काम सुरू होतं. जुनी काही हस्तलिखितं त्याच्यावर टाकत होतो. नाटकाशी संबंधित काही जण दरम्यान कालवश झाले होते. तरी डोक्यात कुठंतरी नाटक होतंच.
दरम्यान मुंबईत असतानाच आणखी एक नाटक लिहिलं होतं. पुण्यात एका महिलेनं मूल होण्यासाठी सर्व उपाय करून थकलेल्या स्त्रियांना मूल दिल्याचं प्रकरण गाजत होतं. ते न्यायालयातही गेलं होतं. शेवटी त्यातील चलाखीचं सत्यही बाहेर आलं. त्यासंबंधी एक पुस्तिकाही प्रकाशित झाली होती. हा नाटकाचा विषय आहे असं वाटलं. आणि त्यावर नाटक लिहिलं. ‘गवसले मृगजळ’ असं त्याचं नाव. काहींनी वाचून जमलंय असंही सांगितलं, पण ते कुणा नाट्यकर्मीला दाखवायचं सुचलं नाही. ते संगणकावर टाकलं…
आणि पुन्हा ‘खेळ मांडियेला’ची आठवण झाली. पण बरेच प्रयत्न केले, तरी त्याची प्रत मिळत नव्हती. एके दिवशी आवराआवर करताना अचानक एक हस्तलिखित प्रत मिळाली. सुरुवातीची. त्यात दुरुस्त्याही केलेल्या होत्या. खूप बरं वाटलं. तातडीनं ती संगणकावर टाकली. म्हटलं निदान आता ती सुरक्षित राहील. पण पुढं काय करायचं ते मात्र सुचत नव्हतं.
पाच वर्षांपूर्वी जयसिंगपूरला आलो. इथं सारंच नवीन. त्यात आजारामुळे कुठं जाणं-येणंही नाही. मग वाटलं नाटकाची ही चित्तरकथा तरी लोकांसमोर आली पाहिजे. ही वाचून कुणाला हे नाटक करावंसं वाटावं ही इच्छा. तसं झालं तर बरंच.
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment