कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता सूर्योमुखी आणि सूर्यकेंद्री कविता आहे. तिला प्रकाशाचे वेड आहे. ती सूर्यसांगाती आहे
दिवाळी २०२५ - लेख
रणधीर शिंदे
  • कविवर्य नारायण सुर्वे आणि त्यांच्या कवितासंग्रहांची मुखपृष्ठे
  • Wed , 15 October 2025
  • दिवाळी २०२५ लेख नारायण सुर्वे Narayan Surve

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे...’ असा उदघोष करणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांचे १५ ऑक्टोबर २०२५पासून जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमिताने सुर्वे यांच्या कवितांविषयीचा हा विशेष लेख…

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

नारायण सुर्वे यांची कविता ही आधुनिक काव्यपरंपरेतील एक महत्त्वाची कविता आहे. मानववादी व सामाजिक काव्यपरंपरेला सुर्वे यांच्या कवितेने नवा आयाम प्राप्त करून दिला. कष्टकरी जनतेच्या आस्थाभावाचा प्रदीर्घ फलक सुर्वे यांच्या कवितेस आहे. माणसांविषयी अपार आणि अनावर असा सदभाव असणारी मराठीतील ही अपवादभूत कविता आहे. सुर्वे यांची कविता ही संवाद-कविता आहे.

सुर्वे यांच्या कवितेवर आजवर विविध अंगांने खूप लिहिले गेले आहे. ‘रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे/ याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे.’ या नव्या राजमुद्रेची ही कविता आहे. या लेखात सुर्वे यांच्या कवितेतील ‘सूर्य-चंद्र’ प्रतिमानाविषयी काही निरीक्षणे मांडली आहेत, कारण सुर्वे यांच्या कवितेत सूर्य-चंद्राच्या उपस्थितीला आणि आकाश अवकाशाला विशेष महत्त्व आहे.

लोकसमूह, श्रद्धाविश्वाचा भाग म्हणून तो मोठ्या प्रमाणात प्रकटला. सूर्य-चंद्राविषयी मानवी जगात कायम कुतूहल वसत आले आहे. या कुतूहलापोटी माणसाने सूर्य-चंद्राबद्दल विविध समजुती व गोष्टी प्रस्तृत केल्या. यात धर्मभावना, लोकश्रद्धेचा जसा भाग होता, तसा तो गूढता, रहस्य, अलौकिकत्व, दैवीरूप व मोहकता या रूपात प्रकटला. मानव समूहाला सूर्य-चंद्राविषयी कमालीचे आकर्षण आहे. मिथके व पुराणकथांमधून सूर्य-चंद्रकथांना अजरामर स्थान मिळाले आहे. सूर्य-चंद्र या प्रतिमांना उच्चतर आणि श्रेष्ठत्वाचा भाव होता. तो दूरस्थ आस्थाभावाचा होता.

मुख्य म्हणजे वाङ्मयपरंपरेत सूर्य-चंद्र प्रतिमांनाचा वापर हा पारंपरिक अर्थाचा आहे. चंद्र-चांदण्या-तारकांचे प्रतिमान हे आधुनिक साहित्यात मध्यमवर्गीय दृष्टीचे द्योतक म्हणून मोठ्या प्रमाणात प्रकटले. ते केवळ प्रेमाचा चित्रणासाठी वापरले आहे. ते सपाट, एकरंगी आहे. केवळ आणि केवळ प्रीत जाणीवेच्या वा स्त्रीगुणांच्या उपमानासाठी ते मोठ्या प्रमाणात प्रकटले.

सुर्वे यांनी या पूर्वरचिताला शबलित केले. त्यांनी कवितेत सूर्य-चंद्राचे सामान्यीकरण केले. सुर्वे यांच्या कवितेत सूर्य-चंद्राची आणि आकाशस्थ तारकामंडळाची उपस्थिती ही विशिष्ट हेतूने भारीत झाली आहे. ती सुर्वे यांच्या कवितेतील आशय व विचारविश्वाशी संलग्न आहे. त्यांच्या कवितेतील जाणीव प्रवाहाला ती वृद्धिंगत करणारी आहे. या कवितेत आदर्शवादी विचारविश्वाचा कल्पनाबंध म्हणून या प्रतिमानास महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. सुर्वे यांच्या कवितेत तो सामान्य, कष्टकरी वर्गाच्या संदर्भात आविष्कृत झाला आहे. ‘गालावरचा चंद्र आणि भाकरीचा चंद्र’ यातल्या द्वंदाला अधोरेखित करणारे चंद्रप्रतिमान सुर्वे कवितेत आहे. त्याला त्यांनी विविध परिमाणे मिळवून दिली आहेत.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सुर्वे यांच्या कवितेत चंद्राच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. तोही वाङ्मयातील पारंपरिक चंद्र प्रतिमानाच्या एकदम उलटा, विरोधी आहे. ‘भरल्या पोटाने अगा पाहतो चंद्र/आम्हीही कुणाची याद केली असती’, अशी ही सामाजिक, वर्गीय अंतराची जाणीव आहे.

‘जाहीरनामा’ या संग्रहातील कवितेत चंद्रप्रतिमानांची उपस्थिती ही निराश व उदास जाणिवेची आहे. हा चंद्र उदास, मळलेला आणि ढळलेला आहे. त्याचबरोबर विसाव्या शतकाच्या अंतर्विरोधांमुळे व निराश स्थितीमुळे चंद्र ‘मिटण्या’ची भावना आहे. ‘ह्या शतकात चंद्र महागला होता. ह्या शतकाची संध्याकाळ सुरू होत आहे’ या भावनेमुळे.

सुर्वे यांच्या कवितेतील आकाशमंडल हे कामाच्या आणि कष्टाच्या संदर्भात आविष्कृत झाले आहे. सभोवतालच्या कष्टचित्राचे अंकन त्यांच्या प्रतिमासृष्टीत आहे. त्यामुळेच ‘ब्रह्म, नक्षत्राची फुले गळ्यात घालून खळ्यात मळणी करत आहे’, ‘टिपूर चांदण्याराती मळणी घालू छान’ असा तो कष्टाच्या संदर्भात प्रकटला आहे. हा ‘स्वातंत्र्यसूर्य’ जसा आहे, तसाच तो ‘विराट श्रमसूर्यही’ आहे. ‘सत्यशिव श्रम सौंदर्याचा/चंद्र झळकतो नील अंबरी’ या प्रकारचा हा चंद्र आहे. सूर्य-चंद्राची उदात्त दैवी प्रतिमा काढून ती मानवी स्वरूपात न्याहाळली आहे. त्याला घामाच्या कहाणीचा संदर्भ आहे.

सुर्वे यांची कविता सूर्योमुखी आणि सूर्यकेंद्री कविता आहे. तिला प्रकाशाचे वेड आहे. ती सूर्यसांगाती आहे. सुर्वे यांच्या कवितेतील सूर्यप्रतिमा ही मार्क्सवादी विचारविश्वाच्या आशावादाचे द्योतक आहे. तो मानवी कल्याणाचा आहे. तो पहाटपणाचा आणि नवारंभाचा आहे. मानवी जीवन उजळवणारा आणि प्रकाशमान करणारा हा सूर्य आहे.

सुर्वे यांच्या कवितेतील वीरनायक हा सूर्यसोबती आहे. तो जेव्हा निघतो, तेव्हा ‘त्याची पावले/उजेडाकडे होती’ असा तो भविष्योमुख आहे. त्याचे ‘शरीर तांब्यासारखे’ आहे. आणि त्याने त्याच्या हातावर ‘सूर्य’ गोंदला होता; यात नव्या दिशाचे, काळाचे आवाहन आहे. त्यामुळे सुर्वे यांच्या कवितेतील वीरनायक हा सूर्यपूजक आहे. सुर्वे यांच्या कवितेतील वीरनायकाचे नाते हे महात्मा फुले व केशवसुत यांच्या कवितेतील वीरनायकाशी आहे. नव्या जगाचे स्वागत आणि नव्या युगाच्या प्रस्थापनेसाठी झटणार्‍या नायकाचे हे चित्र आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सुर्वे यांच्या कवितेत पारंपरिक प्रतिमानांचा छेद आहे. या अर्थाने त्यांचे नाते महात्मा फुले यांच्या कवितेशी जुळणारे आहेत. दि. के. बेडेकरांनी केशवसुतांच्या कवितेतील स्वर्गसमक्षेबद्दल चांगला विचार मांडला होता. आकाशधरेचे मीलन व्हावे यासाठी केशवसुतांची प्रज्ञा नेहमी झेप घेत होती. स्वर्गीची आनंदमयता पृथ्वीवर नांदावी असा केशवसुतांचा आवडता ‘युटोपिया’ होता. प्रबोधनकाळ व लोककल्याणकारी राज्याची आकांक्षा त्यामध्ये होती. केशवसुतांच्या कवितेत स्वर्गसमक्षता विविध रूपाने प्रकटली आहे. 

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सुर्वे यांच्या कवितेत सूर्यकुलाचे प्रतिमान आहे. ते विविधरंगी आहे. सुर्यकुलाचा वारसा आणि ‘सूर्यकुलाचे सभासद’ असल्याचा रास्त अभिमान त्यांना आहे. हा क्रांतीचा सूर्य आहे. त्याला अपेक्षित बदल हवा आहे. त्याला या आकाशाला रंगांचे चार ब्रश मारायचे आहेत. त्यात ‘तांबडा सूर्यगोल’ आहे.

तो कामगारांच्या, श्रमिकांच्या जगाचा जसा आहे, तसाच तो मार्क्सच्या विचारविश्वाचा आहे. तो भिलाईची झोतभट्टी, कारखाना, गिरणीकडे झेपावणारा आहे. तो उद्याच्या जगातील ‘नभाचा तारा लालबाग’ आहे. (इथे लालबागचा नवा अर्थ घेऊ नये.) सामान्यांच्या जगण्यातले हे सूर्यफूल आहे. हा वीरनायक प्रियेला म्हणतो आहे. अजून आवरआवर झाली नाही का? ‘सर्व काही नाकारून माझे शब्द केव्हाच निघालेत/सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही.’ या उच्चाराची ही कविता आहे. ‘एक सांगून ठेवतो, आपण सूर्यपूत्र आहोत’, ‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,’ ही भावना त्यामध्ये आहे.

सूर्यसांगाती असणार्‍या या कवितेत प्रकाशप्रतिमेचा वापर विविध प्रकारचा आहे. विचार व भावानुभवाच्या प्रकटीकरणासाठी या प्रकाशरंगाची विपुल उपस्थिती सुर्वे यांच्या कवितेत आहे. तो नवनिर्मितीचा, नवसृष्टीचा उद‍्गाता आहे. त्यामुळे मानव जगाच्या नवरचनेला त्यामध्ये स्थान आहे. ती कधी झुंजार व तेज प्रतिमपाधरण करतो. विजेच्या प्रपाताचा आहे. या कवितेत काळोखाकडून उजेडाकडे मार्गक्रमण करणार्‍या प्रकाशप्रतिमांचा वापर उल्‍लेखनीय आहे.

सूर्यसांगाती म्हणून आकाशाचा अवकाश सुर्वे यांच्या कवितेत आहे. सामान्यांच्या भल्यासाठी जनकल्याणार्थ वा ‘जनभक्‍ती’साठी या आकाश आव्हानाचा पवित्रा सुर्वे यांच्या कवितेत आहे. बहुतांश वाङ्मयात अवकाशाची उपस्थिती ही उन्‍नत व दिव्य स्वरूपाची असते. इथे मात्र सुर्वे आकाशाला आणि आकाशमंडलाला आव्हान देतात. यात मानवी सामर्थ्याची बाजू आहे.

‘आकाशाचे तारे खुडणारे हेच बाहू’ असा त्याचा मतिथार्थ आहे. ‘धरावा मुठीत नांगराचा फाळ/ चलावे नभाचे नांगराया शेत’ (सुर्वे, पृ. ५४) ही आकाश नांगरण्याची जाणीव मराठीत अभिनव आहे. नवसमाजाचे ‘स्वप्न’ या आकाशभूमीतून निर्माण व्हावे. अशी निर्मिती बांधणी त्यात आहे. त्यामुळेच तार्‍यावर नवी धरणे बांधवीत. ग्रहांवर थोडी वीज खेळवावी. ‘तार्‍यांच्याहि पुढची दुनिया माझ्या नजरेत आहे’, असा भाव या वीरनायकाच्या मनात आहे. तो आकाशावर ‘चाल’ करू पाहणारा आहे. ‘आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही’ असा त्यात उदंड आत्मविश्वास आहे.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

या उलट मराठी कवितेत केवळ प्रेमासाठी आकाशस्थ नक्षत्र तार्‍यांसाठी आसुसलेले, झुरणारे कविनायक आहेत. सुर्वे यांच्या कवितेत एका अर्थाने आकाशाचे छत्र नाकारणे हाच भाग आहे. ‘मुक्‍ततेचा ध्वज आज भिडवावा अंबरा’ या मुक्‍ततेच्या अवकाशासाठी अंबराला आव्हान आहे.

‘गर्जना अशी करा मेघ मुके होतील

मुक्‍तिध्वज सूर्यहि खांद्यावर घेईल’ (इशारा)

असा ‘इशारा’ या कविताविश्वात आहे. ‘अमुची दुनियाच निराळी आहे.’ कारण ‘आम्हा अस्मान ठेंगणे सारे/अमुचे मित्र हे तारे वारे/ घण घेऊन सूर्य ये कामा/ढग प्रणाम करती आम्हा’ असा या समूहलढ्यातील अविर्भाव आणि आत्मविश्वास सुर्वे यांच्या कवितेत आहे.

सुर्वे यांच्या कवितेत चंद्र-सूर्याच्या संदर्भात ‘राष्ट्रजाणीव’ आहे. ती अभिमानाची व राष्ट्रप्रेमाची द्योतक आहे. सुर्वे यांचे कवितेतील राष्ट्रप्रेमाची जाण ही प्रदर्शनी वा भाबडी नाही. ती भूमीप्रेमाची आंतरिक ओढीची जाणीव आहे. ‘महाराष्ट्र देशी उगवते उषा’ किंवा ‘धरती महाराष्ट्राची आणिक अंबर महाराष्ट्राचे’ या ‘महाराष्ट्र प्रेमा’चे द्योतक म्हणून हा आकाश सूर्याचा अवकाश प्रकटला आहे. सळसळत्या बहरत्या महाराष्ट्र परंपरेचे सूत्र हे ‘निळाईच्या दर्पणात झळके बिंब रविचंद्राचे’ या रूपात प्रकटले आहे. तर महाराष्ट्र शिखरी शिवपताका आणि पायी आरती करतो चोखा’ तिथे ‘निळे सलील झुलते आकाश फूल’ असे हे महाराष्ट्राचे आल्हादचित्र आहे.

कष्ट आणि राष्ट्रकर्तव्याच्या आविष्कारात चंद्रसूर्याला गौणत्व आहे. हिमालयाच्या रक्षणासाठी भारतीय जवान बंदुक घेऊन उभा असताना तो गावाकडील पत्नीला पत्र लिहितो. त्या वेळी त्याला गाव आठवते. त्यावेळी चिमणे हंसपक्षी निजले असतील तुझ्या उबदार कुशीत अशी याद आहे. त्यामुळे सूर्य-चंद्राची पारंपरिक प्रतिमा भंजित केली आहे. त्यावेळी ‘पिंपळावर आला असेल चंद्र, माझी याद सांगीत’/ असे स्मरण आहे. तर सीमेवर अग्निवर्षावाचा हुकूम येतो. त्यावेळी ‘निघालो तेव्हा सूर्य येत होता डोंगरा आडून पेंगत’ अशा भावना व्यक्‍त केल्या आहेत. (‘भारतीय जवानाचे पत्र’) तर शहिदांसाठी ‘सूर्य तुम्ही तेजाळ’ अशी प्रतिमा वापरली आहे. या राष्ट्रप्रेरणा या ‘महाराष्ट्र देशी उगवते उषा’ यासाठी आहोत. या नव महाराष्ट्रभूमीच्या पालखीला ‘सूर्य-चंद्र बिंब शोभे’ असा भाव आहे.

‘रवि चालला घरा’ या कवितेत निसर्गचित्राचे आल्हाददायक वर्णन आहे. मात्र त्यातही खास अशा सुर्वे यांची भावनाचित्रे आहेत. मावळतीच्या सूर्यचित्राची भावदृकसंवेनचित्रे या कवितेत आहेत. दृश्य रंग गंध आणि भावसंवेदनांचे भरगच्च प्राचुर्य या कवितेत आहे. प्रतिमानांचा विलोभनीय वापर आहे. चेतनागणोक्‍ती अलंकरणांचा प्रभावी वापर आहे. जो बालकवींच्या ‘फुलराणी’, ‘निर्झरासशी’ जवळीक साधणारा आहे. ‘आकाश, पृथ्वी आणि मानवी’ संदर्भातील जाणीव कवितेत आहे. क्रमशः पालटणार्‍या मावळतीनंतरच्या दृश्याचा मनावर उमटणार्‍या क्षणचित्रांची ही माळका आहे. रवि सोन्याचा उंबरठा ओलांडून आपुल्या घरा चालला आहे. ढग डुलत झुलत चालले आहेत. पक्षीगण परतत आहेत. पूर्वेच्या नगरात नवलाख दीप झिळमिळत आहेत. यात एक आनंद बेहोषी आहे. ‘घरा’चा बंध आहे. आकाशात चंद्रआगमन झाले आहे.

या दोन आकाशस्थ दृश्य पार्श्वभूमीवर सुर्वे पृथ्वीवरील ‘अवकाशाकडे लक्ष वेधतात, पण जास्त रमतात ते पृथ्वीवर, भूमीवर. या धुंद चंद्रप्रकाश पार्श्वभूमीवर गवळ्याची नार नदीतीरावरून घागर घेऊन परतते आहे. डोंगरावरील गुराख्याचा पोर खिल्‍लार हाकवीत येतो आहे. खांद्यावर नांगर टाकून. पुढे तारकांची वेणी माळून, भाली चंद्रतिलक रेखून, केवड्याचा गंध उधळून दारी ‘पृथ्वी हिरकणी’ उभी आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

राजकीय सामाजिक बदलाचा पुरस्कार करणारी सुर्वे यांची कविता व्यक्तिगत कौटुंबिक संबंधाचे कथन करताना ती कमालीची भावमधुर, हळवी व संवेदनशील होते. पती-पत्नीतील भावसंबंधांचे संवेदन व्यक्‍त करताना ती हळवी होते. कोमलता आणि मानवी ऋजुता असते. पती-पत्नीतील भावसंवेदना व्यक्‍त करताना आकाशस्थ प्रतिमांना हळुवारतेचे, खोलवरच्या प्रेममयतेचे स्थान मिळाले आहे. ती जेव्हा दमून येते तेव्हा हे ‘आकाशाचे पाखरू छान वाटते’ किंवा ‘तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन’ अशी भावना त्यामध्ये आहे. हे पती-पत्नींतील प्रेमबंध आल्हाददायक आहे. ते सर्जनशील सहभावाचे, आनंदाचे आहेत. घरट्यात चांदणे उतरू लागते, तेव्हा ‘मीच मयूर होतो’ असा हा प्रेमाविष्कार आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

सुर्वे यांचे कवी म्हणून मोठेपण इथे आहे. भव्य प्रदीर्घ अशा अवकाश प्रतिमाफलकावर प्रत्यक्षातल्या मानवी संवेदनाभाव चित्रांचे रेखांकन व त्याची बाजू ‘उजळ’ करतात. त्याला मानवी रूप देतात. या तर्‍हेने सुर्वे आकाशस्थ भव्य उदात्त प्रतिमानांचे सामान्यीकरण करतात. सामान्यांच्या आविष्कारासाठी सूर्य-चंद्र आणि त्यांच्या साथीदारांच्या उपस्थितीला साक्षात करतात.

या प्रतिमानातील उदात्त तत्त्वाचा भाव कायम ठेवून तो सामान्य जणांसाठी वापरतात. मानवी जीवनासंदर्भात या ‘सृष्टी दरबारा रंग येतो.’ या रंगबहार ‘घर’ स्मृतिचित्रात वाटेकडे डोळे लावून उभ्या असणार्‍या हसर्‍या फुलांची (मुलांची) आठवण आहे. या रम्य धुंदचित्राची अखेर ‘कांकणाच्या गोड धुंदीत/भाकरी वास दरवळे’ या भावरूपात आहे. या जाणीवेत पार्थिव इच्छांच्या धुंदी आहे. ती अमूर्तातील, अलौकिकाची नाही, तर ती आत्ताची आणि इथली आहे. आकाश-धरेच्या या धुंदसृष्टीचे इतकी विलोभचित्रे अपवादभूत कवींनाच सापडते.

राजकीय सामाजिक बदलाचा पुरस्कार करणारी सुर्वे यांची कविता व्यक्तिगत कौटुंबिक संबंधाचे कथन करताना ती कमालीची भावमधुर, हळवी व संवेदनशील होते. पती-पत्नीतील भावसंबंधांचे संवेदन व्यक्‍त करताना ती हळवी होते. कोमलता आणि मानवी ऋजुता असते. पती-पत्नीतील भावसंवेदना व्यक्‍त करताना आकाशस्थ प्रतिमांना हळुवारतेचे, खोलवरच्या प्रेममयतेचे स्थान मिळाले आहे. ती जेव्हा दमून येते, तेव्हा हे ‘आकाशाचे पाखरू छान वाटते’ किंवा ‘तुझ्या कानांच्या पाळीत तारे मी खोवीन’ अशी भावना त्यामध्ये आहे. हे पती-पत्नींतील प्रेमबंध आल्हाददायक आहे. ते सर्जनशील सहभावाचे, आनंदाचे आहेत. घरट्यात चांदणे उतरू लागते, तेव्हा ‘मीच मयूर होतो’ असा हा प्रेमाविष्कार आहे.

मानवी नातेसंबंधात विशेषतः प्रेम व वत्सल भावनांच्या प्रकटीकरणासाठी चंद्र प्रतिमानांचा वापर हा हृद्य स्वरूपाचा आहे. या भावनांच्या प्रकटीकरणासाठी ओथंबलेले ममत्वभाव सुर्वे यांच्या शब्दकळेत आहे. ‘सोनफूल चांदण्याचा चारा’ किंवा ‘भुर्‍या जावळाआड आपला सोनुला चंद्र स्वप्नधुंद असतो.’ या वत्सल भावनेचे चित्र सुर्वे यांच्या कवितेत आहे.

‘बालचंद्र’ शीर्षकाच्या कवितेत ‘गोंदुनिया आभाळाच्या/मुखावर लाल तीळ’ अशा ओळी आहेत. ‘माझ्या गगनीचा धवलचंद्र/ तुझ्या सोनुल्यांचा होईल मामा’ असे मायाळूभाव ‘लुमुम्बास सलाम’ या कवितेतील राष्ट्र जाणिवे संदर्भाला आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सुर्वे यांच्या कवितेत पारंपरिक प्रतिमानांचा छेद आहे. या अर्थाने त्यांचे नाते महात्मा फुले यांच्या कवितेशी जुळणारे आहेत. दि. के. बेडेकरांनी केशवसुतांच्या कवितेतील स्वर्गसमक्षेबद्दल चांगला विचार मांडला होता. आकाशधरेचे मीलन व्हावे यासाठी केशवसुतांची प्रज्ञा नेहमी झेप घेत होती. स्वर्गीची आनंदमयता पृथ्वीवर नांदावी असा केशवसुतांचा आवडता ‘युटोपिया’ होता. प्रबोधनकाळ व लोककल्याणकारी राज्याची आकांक्षा त्यामध्ये होती. केशवसुतांच्या कवितेत स्वर्गसमक्षता विविध रूपाने प्रकटली आहे. ‘स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य’ यात एक नाते कल्पिले आहे. ‘ये खालता भूतली/ये बा / आणिक या धरेस देऊ नको अंतर’ पृथ्वीचा सुरलोक की बनवुनी टाकीन मी सत्वर’ या विश्वासाचा स्वर केशवसुतांच्या कवितेत आहे.

सुर्वे मात्र या ‘युटोपिया’ऐवजी परंपराप्रतिमांना नकार देतात, कारण ‘बोंब मारून बोलवावा असा स्वर्ग आहेच कुठे?’ अशी त्यामध्ये भावना आहे. किंवा ‘कनच्याबी देवाचं नाव नगा लिवू/माणसाचंच लिवा’, या मनुष्यकेंद्री कवितेचा जागर सुर्वे यांच्या काव्यविश्वात आहे.

एकंदर सुर्वे यांच्या कवितेत चंद्र-सूर्य प्रतिमेचा वापर लक्षणीय आणि वेगळा आहे. मुख्य म्हणजे वाङ्मयातील सूर्य-चंद्र पारंपरिक वापराला छेद दिला. व मोठ्या प्रमाणात असणार्‍या या प्रतिमा वापरातील रोमँटिक बाजूला शबलित केले आहे. आकाशस्थ प्रतिमांना मानवी संदर्भ देण्यात या प्रतिमांचा मोठा वाटा आहे. मानवी कष्ट, लोककल्याण, घामाची जाणीव या चंद्र-सूर्यप्रतिमेत आहे. मार्क्सवादी दृष्टीची तीवर गडद छाया आहे. मानवी सामर्थ्यावर त्याचा अदम्य विश्वास आहे. ‘माणसा इतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही’ किंवा केशवसुत ‘माणसांचे इतके लोभी हो तुम्ही कसे झालात?’ या मानवप्रेमाची व मानवथोरवीने सुर्वे यांच्या कवितेतील सूर्यचंद्राचा आकाश नटलेला आणि बहरलेला आहे. तो नवनिर्माणाशी जोडलेला आहे.

सुर्वे यांच्या या वीरनायकाचे नाते महात्मा फुले, केशवसुत, अण्णा भाऊ साठे व काही प्रमाणात कुसुमाग्रज यांच्या वीरनायकाशी नाते आहे. तसेच सुर्वे यांची कविता ही मानव व भूमिकेंद्री कविता आहे. मानवसृष्टीचे गाणे गाणार्‍या ‘सूर्यपुत्राची’ ही कविता आहे. त्यामुळे ‘आम्ही नसतो तर हे सूर्य चंद्र तारे बिचारे फिक्के फिक्के असते’.

.................................................................................................................................................................

लेखक रणधीर शिंदे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे प्रमुख आहेत.

rss_marathi@unishivaji.ac.in

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......