अं क दु स रा
स्थळ : तेच. गोपी एकटाच बसलाय. स्वतःशीच विचार करतोय. माधुरी आणि बाकीचे गेले त्या दिशेला बघतो. काय झालंय कोण जाणे! असा आविर्भाव. पुन्हा आपल्याच विचारात गढून जातो. तेवढ्यात नितीन येतो.)
नितीन : हुश्श्! सुटलो... बरं वाटतंय म्हणाली ती... आता कसली काळजी नाही...
गोपी : काय रेऽऽ! काय झालं एकदम तिला... अंऽऽ?...
नितीन : तिला नं एकदम चक्कर आली... अचानक धक्का बसला... तो सहन नाही करता आला तिला...
गोपी : धक्का... कसला??
नितीन : छाऽन! तुम्हीच विचारताय! वाः ऽवाःऽ... अहो, तुमचं ते अफाट बोलणं... ते भांडण...
गोपी : आम्ही भांडत होतो... काय म्हणतोयस... (अंदाज घेतो.) अरे ऽ ते नेहमीचंच आहे. हंऽऽ... तोही खेळच एक... खेळ!
नितीन : (कटूपणे) असेल! पण... माझ्या बायकोला असल्या खेळांची सवय नाहीय... अन् तसल्या बोलण्याचीही... बोलणं कसलं म्हणा... मांजरांच्या भांडणासारखं... फिस्कारत होतात एकदुसऱ्यावर... वस्सकन् ...
गोपी : हाः... बरोब्बर! मांजरांसारखंच... पण मी माझ्या बायकोवर वस्सकन ओरडलो… तुझ्या बायकोला काय त्याचं? अंऽ काय...
नितीन : अहोऽ... खरंच फार हळवी आहे हो ती... नाजूक...
गोपी : तीच नं...
नितीन : हो. तीच. माधुरी. माझी बायको.
गोपी : नाही नाही! ती नाही म्हणत मी... मी म्हणतोय मीराचं... तुझ्या बायकोचं... छेः... फारच घोळ होतोय... माझी बायको की तुझी... (अंदाज घेतो)... ती माझी बायको असती नं... तर चांगलं समजावलं असतं तिला...
नितीन : (आता पुन्हा गोपीचं बोलणं त्याला समजू लागल्यानं) हो नं... मी ही चांगलं ठणकावलं असतं...
गोपी : कुणाला... अंऽऽ?
नितीन : कुणाला म्हणजे बाईंना!... म्हणजे त्या माझी बायको असत्या तर... असं वागू दिलं नसतं...
गोपी : (छद्मीपणं)... करून बघण्यासारखा आहे प्रयोग!... वाःऽ छान... नवा खेळ!... खेळगड्यांची अदलाबदल...
नितीन : (जरबेनं) सर... सऽर...
गोपी : (खेळकरपणे)... नाही रे!... इथं चालतं त्या अर्थानं नाही म्हटलं मी. मला तर ते अजिबात मान्य नाहीय... मी म्हटलं ते... आता ज्या गप्पा करायच्या त्यासाठी... मी काय... अरेऽ...मी तर फक्त गप्पाच करणार माधुरीशी... तू अन् मीरा मात्र...
नितीन : काय?
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
गोपी : ते मी काय सांगणार? ते फक्त मीरालाच ठाऊक... अन् तूही आढेवेढे घेऊ नकोस हंऽऽ... ती काही म्हणाली तर... होऽ ... माझी काही हरकत नाही. माझी कशालाच हरकत नसते. कधीच. अगदी माझ्या डोळ्यादेखत तिनं कुणाशी प्रेमालाप केले तरी... ती सरळ कुणाच्या गळ्यात पडली तरी... (पुन्हा एकदा नितीनचा अंदाज घेतो... आणि एकदम) तिला कुणीही कशीही वापरली तरी... (पुन्हा खेळकरपणे) आपली काही हरकत नसते! अजिबात कशालाच हरकत नसते... बरं का!
नितीन : (तोही आता रंगात आलाय) बघा हंऽऽ... म्हणजे... तसं कॉलेजात असताना मीही...
गोपी : अस्सं... अरेऽ काहीही करा... मजा मारा... जीवनाचा पुरेपूर उपभोग घ्या... आपल्या प्रिन्सिपॉल सरांचा तोच संदेश आहे... उगाचंच नीतिमत्तेचं... चारित्र्याचं स्तोम माजवणं त्यांना मान्य नाही... त्यामुळं ते मानत नाहीत रूढ संकेतही... मीरादेखील...
(मीरा-माधुरी येतात.)
मीरा : (येतायेताच)... सारखं मेलं माझ्याबद्दल बोलणं... आत्ता काय म्हणत होतास... अं? मी ऐकलं थोडंसं...
गोपी : मी म्हटलं... माधुरी माझी बायको असती आणि तू या नितीनची... तर... (नितीन त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याला समजावल्याप्रमाणे) हे बघ... आमच्यात तसं लपवाछपवीचं काहीच नसतं हंऽऽ... आपलं सारं अगदी खुल्लमखुल्ला... उघडउघड... राजरोस... आता बघ हं... मी इथं असतानाही...
मीरा : (मध्येच पुढे होते. नितीनच्या अगदी निकट जाते. त्याला काहीच कळत नाहीय.) मी तुला मिठीत घेईन... कुरवाळीन... (प्रत्यक्ष कृती करू लागते.)
नितीन : (दचकून... घाबरल्यासारखं) छेःछेः!! (महत्प्रयासानं दूर सरकतो) गोपी व मीरा दोघंही हंसू लागतात. इतका वेळ डोळे विस्फारून बसलेली माधुरी त्यांना हसताना पाहून हसू लागते... निराळ्याच जोषात... हे जाणवावं.) माधुरी... एऽऽ अगं असं हसतीयस का?
माधुरी : (हसतच) अरेऽ हसतेयस का म्हणजे काय? नितीन... अरे... सर हसतात... बाई हसतात... म्हणून मीही हसते...
मीरा-गोपी : (छद्मीपणं) म्हणजे आमचा बेत तिला पसंत आहे... अदलाबदलीचा...
गोपी : पण त्यासाठी नं... जरा माहिती असायला हवी... काय रे? तू माधुरीशी लग्न का केलंस... पैशासाठी?... कुणाचा पैसा मिळणाराय तिला?
नितीन : (चपापतो)... अं... पैसा तिच्या काकानं ठेवलाय... लग्न झाल्यावर तिला मिळणार होता... (माधुरी एकदम त्याला दटावते, पण तिच्याकडे लक्ष न देताच) पण आता त्यानं अट बदललीय म्हणे... तिच्या... आमच्या होणाऱ्या मुलालाच तो मिळेल म्हणे... अर्थात मी माधुरीशी लग्न केलं... ते काही पैशासाठी नाही... का ते ठाऊक आहेच तुम्हाला...
गोपी : खरंच... अगदी खरं?
नितीन : खरंच... अगदी खरं... अहो, मला हे कळलं तेही लग्नानंतर... म्हणजे ते पैशाचं... (आता पुरता सावरलाय... एकदम)... पण... (आठवल्यासारखं करून)... पण त्या मुलाचं पुढं काय झालं? आईनं आत्महत्या केली... बाप परागंदा झाला... मग सारा पैसा त्या मुलालाच मिळाला असेल नं? समजा असता एखादा वाटेकरी... तरी...
मीरा : अरेऽ... असता काय? होताच! पण त्या वाटेकऱ्याचीच वाट लागली... त्याचा नातलगच होता तो... पण...
गोपी : मीराऽ बस्स! हा विषय इथं संपला...
मीरा : हुं:ऽ आव तर मोठा आणता येतो... पण त्याला बळ लागतं… (पुन्हा नितीन माधुरीला)... तर तो नातलग मेला... अपघाती मृत्यू...
नितीन-माधुरी : (दचकून)... आंऽऽ
मीरा : पतंगाचा मांज्या म्हणे अडकला त्याच्यागळ्याभोवती... अन्... वर्षासव्वा वर्षाचं ते पोर...
गोपी : मीराऽ आता पुरे! एकदा सांगितलं ना... तो अपघात होता... मला काय समजत होतं.
मीरा : पण तरीही तुला वाटेकरी नको होता... नकोच असतो कधी... बघ ना... (पुन्हा नितीनशी लगट करते.) मी जरा का कुणाशी जवळीक साधली, की लगेच तुला दुःस्वास वाटतो... हं:ऽ... पण आता मोठ्ठा झालायस तू... समजूतदार बनलायस... आता तुला जमवून घेता येतं सारं... अंऽऽ खरं नंऽ... (माधुरी नितीनला जवळ ओढते.)
माधुरी : चल रेऽऽ नितीन... जाऊ या आता!
गोपी : चुकलीस पोरी... आता ते शक्य नाही!... इथनं जाणं आता तुझ्या... तुमच्या हातात नाही... कुणाच्याच हातात नसतं... चल. तुला इथं राहून चालणार नाही... रक्ताची चटक लागलेली वाघीण आहे ती... पुढ्यातलं सावज ओढणाऱ्यालाही....
मीरा : गप्प बस बाबा... भलतंसलतं काय रे बोलत बसतोस गोपी... (नितीनशी अधिक सलगी करत... लाडिकपणे) तू काही लक्ष देऊ नको रेऽ... आत्ता कुठं खेळ सुरू होतोय...
गोपी : चल माधुरी... बाई गंऽऽ... हा खेळ आपण पाहायचा नाहीय... पाहण्यासारखा नाहीय... तुला बरं वाटत नाहीय ना... पुन्हा थोडी ब्रॅन्डी घे... डोकंही उतरेल बघ... अन् मग बसू बागेत... निवांत गप्पा करत... (मीराकडे पाहात) तोवर यांचं... चालू देऽऽ
माधुरी : (घाबरून)... पण खरंच बरं वाटेल नं मला? अंऽऽ...
गोपी : अगंऽ चल.... (तिला आधार देत) सारं काही ठीक होईल हंऽऽ... अगदी घाबरू नकोस... (दोघं जातात)
नितीन : सरांना फारच काळजी वाटतीय हंऽ ...
मीरा : (अजूनही त्याला बिलगलेलीच)... होऽरेऽऽ भांडणतंटा करत असलो नं... तरी फार फार प्रेमळ आहोत आम्ही... अरेऽ ते दात वेगळे... काय खरं नं (पुन्हा लगट करते)
नितीन : पण बाईऽ... मला वाटतं ते... (लाजतो) म्हणजे आमच्या माधुरीला उलटी झाली नं... मला वाटतं म्हणूनच सर जरा हळवे झालेत... अहोऽ... मी त्यांना मारे सांगतोय की... मूल न व्हावं अशी तिची इच्छा आहे... आणि नंतर तिला चक्क ओकारी... म्हणजे आहे की नाही... (दाद मिळेल या अपेक्षेनं तिच्याकडं बघतोय. पण माधुरीचा उल्लेख होताच मीरा दूर सरकलीय. नंतर त्याच्या प्रत्येक वाक्याबरोबर जास्तच गंभीर होतीय...) बघाऽ... म्हणजे तुम्हालाही विचित्र वाटलं ना... अहोऽ, मी तर प्रथमपासूनच म्हणत होतो ...
मीरा : शीःऽ... काय रे बडबडतोयस... भलतंच... अगदी नको तेच बडबडतोयस... अरे किती अपेक्षेनं मी तुझ्याकडे आले... (पुन्हा जवळीक)... तुला गोंजारलं... तुझं हे धट्टकट्टं शरीर भावलं मला... वाटलं... ते जागेल... फुलेल... (हरवल्यागत)... अन्... मलाही फुलवेल...
नितीन : पण बाईऽ... प्रिन्सिपॉल सर...
मीरा : तेही असेच होते. तगडे. माझी पहिली आठवण त्यांना पाहिल्याची... ते असंच जिम्नॅशियममध्ये शिकवत असताना तसेच घरी आले होते... पक्कं याद आहे ते... नितीन... नितीऽऽन!!
नितीन : बाईऽ... मी पण कॉलेजात बॉक्सिंग चॅम्पियन होतो बरं का ...
मीरा : खरंच... अरे बॉक्सिंगची गंमत सांगू...? पप्पा नं... एकदा बोलता बोलता मला म्हणाले, माणसाला स्वतःचं संरक्षण करता यायलाच हवं... झालं! लगेच बॉक्सिंगचे ते मोठे मोठे ग्लोव्हज आणले... केव्हा... सांगू... आमचं लग्न झाल्यानंतरची गोष्ट हंऽ... अगदी मज्जाऽऽ... (तिचं बोलणं चालू असतानाच गोपी आणि माधुरी येतात. माधुरी जरा गुंगलीय... तिला गोपीनंच सावरलंय... मात्र मीरा स्वतःच्याच बोलण्यात गर्क) पण गोपी कसला... हूं:ऽ नको म्हणाला... अगदीच बुळा... पपा कसले ऐकतायत... काही नाही... बॉक्सिंग म्हणजे बॉक्सिंग... खेळायचं म्हणजे खेळायचं... आता असं त्यांनी खडसावून सांगितल्यावर त्याचं काय चालणार? अगदी नाइलाज झाला त्याचा... (गोपी असहाय... मानेनंच नाही नाही, सारं खोटं आहे... असं सुचवतोय... मग काय आम्ही दोघांनी ग्लोव्हज चढवले... मला मग एकदम जोर आला... अन् मग काय... ढिश्यूंऽऽ... (त्या आठवणीनं हसते... तसंच पुढे बोलत राहाते) अन् मग पुढं काय झालं... सांगूऽऽ... सुरुवात तर झाली आणि मग... ढिश्यूंऽऽ (क्षणभर थांबून त्याची उत्सुकता वाढलीय याची खात्री करून घेते.) अन् आमचं हे पेबळं... पडलं... भेलकांडलं... भले शाब्बाऽऽस... म्हणून पप्पांनी मला मिठीच मारली.... अन्... पण आमचा हा....
गोपी : मीराऽ... मला वाटतं की हे सारं काही पाहुण्यांना सांगणं बरोबर नाहीय. आणि त्याची गरजही नाहीयै... तू नियम मोडतीयस... लक्षात ठेव... आपल्या खेळाचे नियम मोडतीत्यैस... ध्यानात ठेव!!
मीरा : हे बघ... मी काय करत्यैय ते मला कळतंय... गोपी असेलही! पण त्याचे परिणामही तुलाच भोगावे लागतील... हे मात्र विसरू नको... (माधुरीला)... चल पोरी... जरा मोकळ्या हवेत जाऊ या पुन्हा... तेवढंच तुला बरं वाटेल... (बाहेरच्या बाजूकडे जातात.)
मीरा : अस्सं... असंच असतं त्याचं... ऐनवेळी रंगाचा भंग... जरा कुठं मजेला सुरुवात झाली की, याचं काहीतरी बिनसलंच... शीऽऽ
नितीन : साहजिकच आहे... आणि बायका त्या बाबतीत भारीच हळव्या असतात... आता आम्ही एकांतात साधं गप्पा मारत बसलो असलो नां : तरी जरा कुठं खुट्ट झालं की तिचं बिनसतं... अगदी असह्यच होतं जणू तिला...
मीरा : हंऽऽ आणि मग हा डाव... अनंगाचा डाव रंगवून अवेळी... नाही... ऐनवेळी उठून जाणारा हा भिडूऽ... (सारं काही जणू विसरून भूतकाळात गेलीय.) रात्र अद्याप कोवळी... नवी नव्हाळी... केवळ तो अन् मी... रंगत जाते खेळी... रंगत चाललेला डाव... फुलारू बघणारी मी... धुंद होत जातीय... सारं काही धूसर होतंय... अन् अचानक तो जातो. रंगलेला खेळ अधूरा टाकून. अन् मला अतृप्त ठेवून... मी अस्वस्थ... पण हा... हा माझा नवरा निघूनच जातो...
नितीन : (अचानक)... आणि मग तुम्ही त्याला शरण जाता... कारण त्यानं मांडलेला डाव आवरणं... केवळ त्यालाच शक्य असतं... फक्त त्यालाच!!!
मीरा : (एकदम खजिल झालीय. हलक्या दुखावल्यासारख्या आवाजात) खरंय! तूं... तूं... फारच जाणकार दिसतोयस... नशीब आहे माधुरीचं झालं... पण ती तर अशी नाजूक नार... नाही रेऽ हे असंच चालत आलंय... हे असंच चालणार... चणे आहेत तिथं दात नसणार... नसतातच! म्हणूनच तर पप्पांनी यातून मार्ग काढला... दैवाची चूक सुधारायचा... काही क्षणांसाठीच का होईना... आपला जोडीदार आपणच निवडायचा... सुख सजवायसाठी... तृप्तीसाठी... शांतीसाठी...
नितीन : पण.. (तो पुढं काही बोलायच्या आतच माधुरी आणि गोपी येतात. माधुरी अद्यापही तंद्रीतच आहे... गोपी मात्र उत्साही दिसतोय.)
गोपी : हां... हांऽ... अरे थांबू नको... लाजू नको... तिच्या सहवासात इतका वेळ राहूनही... तू अजून लाजतोयस ...
नितीन : (उसनं अवसान आणून)... तसं नाही... पण बाई एकदम काही...
गोपी : हॅऽ... त्यात काय... अरे, तसलं बोलणं या अशा वेळी करायचं नाही तर कधी? ही वेळ... ही हवा...
मीरा : चल रे नितीन... उगाच त्याच्या नादी लागू नकोस... मघा तू काही आला नव्हतास आमचं घर बघायला... चल... सारं काही दाखवते तुला... ड्रॉइंग रूम... डायनिंग रूम... टेरेस... बेडरूम... सारं सारं दाखवते... चलच... (त्याला जवळजवळ ओढतच नेते.)
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
गोपी : हंऽऽ... गेले ते... जाणारी पावलं... बेरूमकडं जाणारी... सिंहिणीच्या गुहेकडं... मीरेच्या शयनागराकडं... पप्पांच्या मीराची झोपायची खोली...
माधुरी : अंऽऽ पप्पा... पप्पा नाहीत मला... म्हणजे मला आठवतच नाहीत ते... तसं लहानपणापासून ऐकलंय मी त्यांच्याबद्दल... पण...
गोपी : तेऽ... नाहीत. तुझे पप्पा नाही... मीराचे पप्पा!... त्यांच्या मीरानं नेलंय त्याला... तुझ्या नितीनला!
माधुरी : नितीनला नेलं... माझ्या नितीनला नेलं?... अंऽऽ कुणी?
गोपी : मीरानं... तरुण रक्ताची चटक आहे नं तिला... ते आवडतात तिला... अंऽ... तसं नाही... खरं म्हणजे ती... तीच भुलवते त्यांना... फशी पाडते!
माधुरी : भुलवते... फशी पाडते?... मीरा... या बाई?...
गोपी : होऽ... भुरळ घालतात... आपल्या लावण्यानं... मादकतेनं... त्यासाठी खास जागा... म्हणजे तिची बेडरूम... तिचं शयनगृह... कारण तिथं तिची खास अस्त्रं तिला वापरता येतात...
माधुरी : मदनाची... विद्ध करणारी... घायाळ करून टाकणारी... म्हणजे... तलम वस्त्रं... असून नसल्यासारखी... पण... पण... नितीननं सांगायचं होतं मला... मीसुद्धा... (पदर टाकते) मी त्याच्यासाठी काहीही केलं असतं होऽऽ... काहीही...
गोपी : (तिचा पदर पुन्हा तिच्या खांद्यावर टाकतो.) अगंऽ पण मी कुठं काय म्हणतोय... पण तिचीही जिद्द आहे... त्याच्यासाठी काहीही करायची... अन् ती एकदा जिद्दीला पेटली की...
माधुरी : पण तो तसा नाहीय...
गोपी : ते कळेलच म्हणा आता...
माधुरी : अहोऽ खरंच... अगदी खरंऽऽ... (कबुली दिल्याप्रमाणे) तो इतर कुणाला मिळू नाही... म्हणून मीच केलतं ते नाटक... दिवस गेल्याचं... अन् सारं सारं खरंच वाटलं त्याला... किनईऽऽ अगदी भेळा आहे हो तो...
गोपी : (एकदम कठोरपणे)... म्हणून तू मूलही नको म्हणालीस त्याला...
माधुरी : (अगदी विचित्र वाटावं असं हसते)... मूल... नको... (त्याच्याजवळ जाते) एक गंमत सांगू का सर?
गोपी : होऽ सांग ना ...
माधुरी : पण सांगणार नाही ना कुणाला?
गोपी : नाही... अगदी मुळीच नाही!
माधुरी : शप्पथ?
गोपी : अगदीऽ
माधुरी : माझी?...
गोपी : घेतली...
माधुरी : तर सर... पहिल्यांदा मी म्हटलं ना त्याला की, आपल्याला मूल नकोऽ (हसते) तर हा नितीन... अहोऽ कित्येक दिवस... दुसऱ्याच खोलीत झोपत होता...
गोपी : (गंभीर झालाय) हंऽऽ
माधुरी : शेवटी मीच सांगितलं त्याला... सारं काही...
गोपी : (गंभीरपणे) पण अखेर त्याचाच जय होणारै...
माधुरी : अं... काय म्हणताय... त्याचा जय होणारै?
गोपी : हंऽऽ खरंय... तुम्हाला मूल होणाराय आता... खरं नं... (वरच्या खोलीतून आल्यासारखा आवाज. प्रथम हळू... नंतर अगदी स्पष्ट... त्यानुसार गोपी आणि माधुरीच्या प्रतिक्रिया व्हाव्या.)
मीरा : हुं... हूंऽऽ अरे बघ नं... ही नाइटी... खास रात्रीसाठी. नाइटी नाइटी फॉर नाइट...
गोपी : बाईऽ... मला... मला तहान लागलीय... मी
मीरा : अरे व्वा... तहान लागली... माझी? शारीरिक तहानभूक हरवेल... या नाइटीत मला पाहिलंस तर... बघ...
नितीन : अहोऽऽ... पण... बघा हं...
मीरा : अरेऽ असा रे कसा यडचाप तू... पाठ फिरवतोयस (मिस्किलपणं) मग तुला इथं कशाला आणलं मी... ते काही नाही... (लाडालाडात) हं... अस्संऽऽ... आता उगाच सोवळेपणा करू नको... खरं तर मी म्हणते... ही नाइटी तरी कशाला हवीय... अगदी खरं सांगायचं हंऽऽ...
नितीन : (अगदी थंडपणं... सरावल्यासारखं...) आता खरं सांगायचं... तर... हो!
मीरा : बघूं या हंऽऽ खरं बोलतोयस का तू... (थोडा काळ शांतता.) हाःऽ... हाःऽऽ... अरे, मी लाजायचं की तू... अरे खरं तर मला किनैऽ... नेहमी असंच वावरावसं वाटतं... अंऽ...असं नाही हंऽऽ (आवाज हळूहळू ऐकू येईनासा होतो)
माधुरी : शीःऽऽ शोभतं का हे बाईंना... पण नितीन... मी म्हटलं नाही तुम्हाला... (चिरडीनं) त्यांनाही कळेल... तो माझ्याशिवाय कुणालाच समजू शकला नाहीय... आणि तसा तुमच्या मुलात आणि त्याच्यात असा काय फरक आहे... की म्हणूनच!!...
गोपी : काय... (एकदम)... काय म्हणतेस काय?... ती बोलली तुझ्याशी... आमच्या अवीबद्दल...
माधुरी : अवी... अवी कोण? अवी नाही होऽऽ...
गोपी : अगं तोच... आमच्या मुलाचंच नांव ते... (करडेपणानं) त्याच्याबद्दलच बोलली नं मीरा तुझ्याशी?
माधुरी : सहज म्हणाल्या हो बाईऽ...
गोपी : काय?... काय म्हणाली ती?
माधुरी : असं दटावू नका होऽ... असं रागावू नकाऽ... मी घाबरते मग... भीती वाटते मला...बाई नं... त्या म्हणाल्या, उद्या आमचा मुलगा येईल... यायलाच हवं त्यानं... आणि मग म्हणाल्या आम्ही इतकी आतुरतेनं वाट बघतोय...
गोपी : का... का? वाट बघतोय... तेही सांगितलं तिनं?
माधुरी : म्हणजे काय... असा उद्या त्याचा वाढदिवस नं... म्हणजे बाई म्हणाल्या हं तसं... मला काय कळतंय नाहीतर?... पण खरंच बाइर्कडं पाहून कुणाला वाटणार नाही हं... त्यांना इतका मोठा मुलगा असेल म्हणून...
गोपी : अंऽऽ अंऽऽ...
माधुरी : अहोऽ असं काय? उद्या अठरावा वाढदिवस आहे ना त्याचा... म्हणजे...
गोपी : (मध्येच)... तेही सांगितलं का... हंऽऽ...मीरा... मीराऽऽ... आता मात्र मला माझी खेळी खेळायलाच हवी... शेवटची चाल... अखेरची विजयी चाल... शह अन् मात! (एकदम आपुलकीनं... वास्तवात आल्यासारखं.)... अगं मलाही खरंच तसं वाटत नाही. तो मोठा झालाय... इतकी वर्षं झाली!! हेच खेळ खेळतोय आम्ही... पोरं असल्यासारखंच वागतो अजून... अन् तसंच वागतो... मग तसंच वाटायला लागतं.. पोर असल्यासारखं... आता आमची पोरं लग्नाला आली... तुमची तर झालीदेखील लग्नं... (क्षणभर थांबतो... माधुरीचा अंदाज घेतो... ती अपेक्षेनं त्याच्याकडे बघतीय.) ...आणि आता तर काय... तुझा नवरा तिच्या जाळ्यात सापडतोय...
माधुरी : मला नाही तसं वाटत... माझा विश्वास आहे त्याच्यावर...
गोपी : (प्रथमच खऱ्याखुऱ्या आनंदानं) माझाही!... म्हणूनच आता तिला चांगला धडा शिकवायचाय...
माधुरी : होऽऽ...
गोपी : तुझ्या मदतीनं... करशील मला मदत?
माधुरी : होऽऽ...
गोपी : बघ हंऽ... नाहीतर जाशील तिच्यामागं... बाईऽबाईऽ करत... अन् मग फसशील... पुन्हा ओकशील...
माधुरी : अहोऽ नका हो ती आठवण करू... मला पुन्हा कसंसंच व्हायला लागलं बघाऽ... नुसत्या त्या आठवणीनं...
गोपी : घाबरू नको... आता आपल्याला त्याच्यावरचा इलाज ठाऊक आहे... अगदी झटपट इलाज... काय... खरं नंऽ... हंऽ हे घेऽ... चटकन पिऊन टाक...
माधुरी : अं... हंऽहंऽ द्या… (त्याने पुढे केलेला ग्लास घेते... पिऊन टाकते. ग्लास त्याच्याकडे देते. गोपी ग्लासवर टिण्ऽ टिण्ऽऽ टिण् ऽऽ असे आवाज काढतोय... प्रथम उगाचंच असं वाटतं... पण नंतर जाणवतं हे हेतूपूर्वक चाललेय... लयीत... एका ठरावीक लयीत... माधुरी गुंगलीय... तो क्षणभर थांबून अंदाज घेतो... एकीकडे ग्लासचा (टिण्ऽ टिण्ऽ आवाज पुन्हा सुरू... माधुरी किंचित सावरल्यासारखी अगदी हळू आवाजात बोलते... त्याच आवाजाच्या लयीत...)
माधुरी : घंटा वाजतीय... टिण्ऽ टिण्ऽ मंद मंजुळ घंटानाद... टिण्ऽ टिण्ऽ टिणऽ...
गोपी : काय म्हणत्यैस काय?... घंटेचा आवाज येतोय तुलाऽ? असा...? ठाण्ऽ ठाण्ऽ ठाण्ऽऽ
माधुरी : नै होऽऽ... तसा ठाण्ऽ ठाण् ऽ नाही... ती देवळातली घंटा... मला आवाज आला तो दारावरच्या डिंगऽ डाँग... बेलचा... असाऽऽ (पुन्हा तालात म्हणते) टिण्ऽ टिण्ऽ टिण्ऽ टण्ऽ टण्ऽ टण्ऽ दार आपलं वाजवतंय कोऽण...?
गोपी : (कौतुकानं) काऽय...? काय म्हणत्यैस?...
माधुरी : दार आपलं वाजवतंय कोण...? आपल्या दारात आलंय कोण...?
गोपी : (स्वतःशीच बोलल्यासारखे)... छेःछेःऽऽ! अहोऽ, पत्ता कुणाचा ना कुणा.... अन् ही करतीय उगाच ठणाणाऽऽ...
माधुरी : टिण्ऽटिण्ऽ... टण्ऽ... टणऽ...
गोपी : (एकदम काहीतरी सुचून) दारात आला पोस्टमन...
माधुरी : अंऽ नाही... कुठाय कोण?
गोपी : आहे तर... पोस्टमन आलाय पोस्टमन...
माधुरी : पण मला तर दिसत नाहीये!
गोपी : (थट्टेच्या सुरात)... असंऽ... खरंच का तुला कुणी दिसलं नाही?... (गंभीरपणे)... दारातला पोस्टमन तुला दिसत नाही...? दिसला नाही?
माधुरी : टण्ऽ टण् ऽ... कुठाय कोणऽ? (काकुळतीला आलीय)... मला खरंच कुणी दिसत नाहीय होऽऽ...
गोपी : हाःऽहाःऽऽ... आता कसं दिसेल कोण... चटकन् तार देऊन… पोस्टमन गेला निघून... मग आता तुला दिसणार कुठून...?
माधुरी : गेला... निघून गेला?... तार देऊन गेला?... तार?... कसली तार?
गोपी : हं ऽऽ फार फार वाईट बातमी दिली त्यानं... तो... तो... गेला!! ज्याचा उद्या वाढदिवस आहे... असं आम्ही तुला सांगत होतो... तो... तो गेला... तो... माझा... आमचा मुलगा... गेलाऽऽ
माधुरी : नाहीऽ... नाऽऽहीऽऽ... खोटं आहे हे... सांगा ना हे खोटं आहे म्हणून...
गोपी : नाही!... हे खरंय सारं... खरं हेच आहे... तो नाहीय... आता तो नाहीय...
माधुरी : असं?... मग मला दाखवा ती तार...
गोपी : तार... तार...? ती तार तर... मी फाडून टाकली! तेवढ्यापुरतं वाटलं... मी मृत्यूला हरवलं... पण... अशी तार फाडून का कुठं बातम्या खोट्या ठरतात? खरंच आहे ते... तो आता गेलाय....
माधुरी : आई गंऽऽ... कित्ती कित्ती वर्णन करत होत्या बाई त्याचं... अन्... अन्... तुम्ही खेळ असा अचानक संपला म्हणता?
गोपी : संपला... कुठं संपला? (जणू मीराशीच बोलतोय) तुला काय वाटलं मीराऽऽ ... तूच केवळ खेळात विजयी होशील... मी... मी कधीच जिंकू शकणार नाही? तू ठरवशील ते नियम!... मान्य!... आणि आता ते नियमही तूं मोडणार...?.... पण आज दान माझ्या बाजूनं पडलंय... मीराऽ आज मी जिंकणाराय...
माधुरी : (जरा मोठ्यानं) खरंच म्हणताय तुम्ही? खेळ संपला!... खरंच खेळ संपला?...
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गोपी : (हसतो)... नाही... नाही, माधुरी तसं नाही. खेळ संपला नाहीय... (तिच्या जवळ जाऊन)... अगंऽ... खेळाला आता कुठं सुरुवात होतीय... (लहान मुलं एकमेकांना विश्वासात घेऊन कुजबुजतात त्याप्रमाणं तिला जवळ घेऊन सांगतो) मघा दाराची घंटा वाजली... मी दार उघडलं... हंऽऽ दारात पोस्टमन होता... होऽ... तारवाला... त्यानं माझ्याकडं... तार... दिली... (माधुरी अभावितपणे तो बोलेल ते हळूहळू बोलू लागते... प्रतिध्वनीसारखं)
माधुरी : तार... दिली...
गोपी : मी ती फोडली.... वाचली...
माधुरी : वाचली...
गोपी : आणि... आणि मला धक्काच बसला...
माधुरी : धक्का बसला... अन् तुम्ही खचलात...
गोपी : (सुखावतो... माधुरी अपेक्षेनुसार... त्याहीपेक्षा अधिक चांगली साथ दिल्यानं) हातापायातलं त्राणच गेलं माझ्या...
माधुरी : जीव अगदी घाबरा झाला होता तुमचा... मी... मी चटकन् पाणी दिलं तुम्हाला... पदरानं वारा घातला...
गोपी : (समाधानाने) पण ते शब्द डोळ्यापुढून हलत नव्हते... दुपारी येथे... अंऽऽ...
माधुरी : (चुटकी वाजवून) स्कूटरचा भयानक अपघात झाला... भरधाव ट्रकखाली स्कूटरस्वार सापडला!!
गोपी : (भयंकर खुश झालाय)... अन् उरलं रक्ताचं थारोळं... मांसाचा चिखल... कलेवर... इतकी वर्षं जिवापाड जपलेल्या... आमच्या रक्तामासाच्या गोळ्याचं...
माधुरी : पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारा येत होता.... फार... फार वेदना होत होत्या... तिकडं बघवतही नव्हतं...
गोपी :... पणऽऽ... पण तो साऱ्या साऱ्या... साऱ्या सुखदुःखांच्या पलीकडं गेला होता...
माधुरी : हे जग सोडूनऽऽ...
गोपी : शाब्बास ऽऽ छान... छाऽन... हे नीट लक्षात ठेवायचं हं... पोस्टमन...
माधुरी : आला...
गोपी : त्यानं तार...
माधुरी : आणून दिली...
गोपी : मला मग...
.... ....
.... ....
(नुसत्या घोकंपट्टी केल्यासारख्या मंद हालचाली... त्यांच्या डोलण्याच्या लयीत ते बाहेरच्या बाजूस जात असतानाच पडदा पडतो.)
(दु स रा अं क स मा प्त)
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment