पुन्हा एकदा बिहार!
दिवाळी २०२५ - लेख
प्रवीण बर्दापूरकर
  • नीतीशकुमार, प्रशांत किशोर आणि तेजस्वी यादव
  • Sat , 18 October 2025
  • दिवाळी २०२५ लेख बिहार ‌Bihar निवडणूक Election नितीशकुमार Nitishkumar

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

या २० वर्षांत जास्त काळ नितीशकुमार भाजपसोबत राहिले आणि याच काळात भाजपची विधानसभेतील सदस्यसंख्या वाढत गेली, तर नितीशकुमार यांच्या जनता दल (सेक्युलर)ची सदस्यसंख्या कमी होत गेली, हे उल्लेखनीय आहे. भाजप पहिल्यांदा अस्तित्व राखण्यासाठी लढतो, मग कोणाला तरी पाडण्यासाठी लढतो आणि मग जिंकण्यासाठी लढतो असं जे म्हटलं जातं, ते बिहारमध्येही लागू आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘व्होट चोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणूक होत आहे. खरं तर केवळ बिहारच नाही, उत्तर भारतातील अनेक राज्यांतील निवडणुकांत होणारे गैरप्रकार तसे काही नवीन नाहीत. माझ्या पिढीनं बिहारात एकगठ्ठा मतदान कसं होतं, हे अनुभवलेलं आहे. प्रश्न इतकाच आहे की, त्या वेळी असलेल्या विरोधी पक्षांना राहुल गांधी यांच्याइतक्या सशक्तपणे ‘व्होट चोरी’चे हे प्रकार उघड करता आले नव्हते, कारण ती तत्कालीन सर्व पक्षांची गरज होती.

यासंदर्भात एका निवडणूक दौऱ्यात ऐकलेला एक किस्सा असा. एक वृद्ध गृहस्थ त्यांचं मतदान आटोपल्यावर मतदान केंद्राच्या प्रमुखाकडे जातात आणि विचारतात, ‘माझी पत्नी मतदानाला येऊन गेली का?’ रेकॉर्ड बघून तो अधिकारी सांगतो की, ‘सकाळीच येऊन मतदान करून गेली.’ त्यावर ते वृद्ध हळहळतात आणि म्हणतात, ‘याही वेळेस आमची भेट हुकली...’ त्यावर तो अधिकारी त्याला विचारतो की, ‘तुम्ही एकत्र राहत नाही का?’ तेव्हा ते वृद्ध सांगतात की, ‘माझ्या पत्नीचं निधन होऊन अनेक वर्षं झाली आहेत, पण ती न चुकता प्रत्येक निवडणुकीत मतदान करते आणि ती मतदान करून बाहेर गेल्यावरच मी नेमका येतो. त्यामुळे आमची भेट होत नाही.’ अर्थात हा किस्साच असल्यामुळे यात सांगोवांगी बरीच असणार हे खरंच, तरीही बिहारमध्ये मतदान कसं होतं, यावर त्यातून प्रकाश पडतो.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे अनेकांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. त्यात सर्वांत वरचा नंबर नितीशकुमार यांचा आहे. सतत राजकीय तळ्यातमळ्यात करून (खरं सांगायचं तर, कोलांटउड्या मारून!) गेली २० वर्षं नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी ठिय्या मारून बसलेले आहेत. या वेळेसही ते मुख्यमंत्रीपद टिकवू शकतात की नाही, हा एक उत्सुकतेचा मुद्दा आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

या २० वर्षांत जास्त काळ नितीशकुमार भाजपसोबत राहिले आणि याच काळात भाजपची विधानसभेतील सदस्यसंख्या वाढत गेली, तर नितीशकुमार यांच्या जनता दल (सेक्युलर)ची सदस्यसंख्या कमी होत गेली, हे उल्लेखनीय आहे. भाजप पहिल्यांदा अस्तित्व राखण्यासाठी लढतो, मग कोणाला तरी पाडण्यासाठी लढतो आणि मग जिंकण्यासाठी लढतो असं जे म्हटलं जातं, ते बिहारमध्येही लागू आहे.

पाहता पाहता जनता दलाच्या विविध गटांचं बिहारवरील वर्चस्व मोडून काढत भाजप आता किमान १०० जागा मिळवण्याची अशा बाळगून आहे (पण ते फारच कठीण दिसत आहे, कारण त्यासाठी विजयाचा स्ट्राईक ९८ टक्यांपेक्षा जास्त ठेवावा लागेल.).

गेल्या निवडणुकीत भाजपला जास्त आणि जनता दल (सेक्युलर)ला कमी जागा मिळाल्या, तरी मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच ठेवण्यात आलं. याही निवडणुकीत भाजप-जनता दल आघाडी सत्तेत आली, तर नितीशकुमार मुख्यमंत्रीपदी राहतील किंवा नाही, याबद्दल आज तरी निश्चित काही सांगता येत नाही. खरं तर, जागावाटपावरून भाजप आणि नितीशकुमार हे दोघंही नाराज आहेत, पण दोघांनाही सद्यपरिस्थितीत एकत्र राहणं भाग आहे.

राजकारणात अगतिकता म्हणून एकत्र राहण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्ष परस्परांच्या जागा पाडण्यासाठी शांतपणे प्रयत्न करतात, असा आजवरचा अनुभव आहे. तसंच या वेळेस बिहारमध्ये घडलं, तर राष्ट्रीय जनता दल सत्तेत येण्याचा आणि तेजस्वी यादव मुख्यमंत्री होण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

याचा एक अर्थ तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्यात भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यातील बेदिलीही कारणीभूत आहे, असा काढावा लागेल. अर्थात त्यासाठी निवडणूक निकालाची वाट पहावी लागणार आहे.

भाजप आणि जनता दल (सेक्युलर) सत्ता राखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार हे उघड आहे. म्हणूनच दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिहारच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष घातलेलं आहे. निवडणुका ‘खेळणं’ हा मोदी यांचा आवडता खेळ असल्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

ज्या आक्रमक पद्धतीनं तेजस्वी यादव समोर आले, त्यामुळे तरुण वर्गातही त्यांची ‘चाहत’ मोठी आहे. त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा लावून ठेवत तरुणांना आकर्षित केलेलं आहे. नेहमीप्रमाणे बिहारमधलं जातीचं राजकारण लक्षात घेतलं, तर यादव समाज आणि मुस्लीम राष्ट्रीय जनता दलासोबत आहेच, त्यांच्यासोबत तेजस्वी यादव यांचं पारडं सध्या जड दिसत आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

महाराष्ट्रात ‘क्लिक’ झालेली ‘लाडकी बहीण’ योजना नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्येही जाहीर केली आहे; नुसती जाहीर केली नाही, तर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यात जातीनं लक्ष घालून आतापर्यंत ४० हजार कोटी रुपये रुपयांचं वाटपही केलेलं आहे. 

भाजपनं महाराष्ट्र आणि बिहार राज्यांतील बहिणींत बराच मोठा भेदभाव केलेला आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बहिणीला दरमहा १५०० रुपये विधानसभा निवडणुकीआधी वाटले गेले आणि सत्तेत आलो, तर ही रक्कम २१०० रुपये करण्याचं आश्वासन भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या आघाडीनं दिलं होतं. आता सत्तेत येऊन दहा महिने झाले, तरी १५००चे २१०० काही झालेले नाहीत, उलट वेगवेगळे निकष लावून ‘लाडक्या बहिणीं’ची संख्या कमीच करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या बहिणींना १५०० रुपये आणि बिहारमधील बहिणींना दरमहा १०,००० रुपये असा हा भेदभाव आहे!

महत्त्वाचं म्हणजे बिहारमधल्या एकूण मतदारांपैकी महिलांची संख्या जवळजवळ ४५ टक्के आहे. म्हणजे बिहारमधल्या बहिणींनी जर भाजप आणि जनता दल (सेक्युलर)च्या बाजूनं मतदान केलं, तर नितीशकुमार यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. बिहारी बहिणी महाराष्ट्रातील बहिणींप्रमाणेच दहा हजार रुपयांच्या आमिषाला बळी पडतात का, हे अर्थातच निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

याशिवाय बिहारमध्ये नितीशकुमार यांनी ‘हुकमाचा एक्का’ म्हणून ‘जातनिहाय जनगणना’ हे कार्ड वापरलं आहे. त्यांच्या या निर्णयाला केंद्रातल्या भाजप सरकारनंही पाठिंबा दिलेला आहे. ‘लाडक्या बहिणी’ व ‘जातीनिहाय जनगणने’चं कार्ड खेळून भाजप आणि जनता दल (सेक्युलर) म्हणजेच नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे.

भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्या यशात अन्य घटकही महत्त्वाचे आहेत. अर्थातच पहिला घटक जातीचा आहे. दुसरा म्हणजे जीतन राम मांझी, उपेंद्र कुशवाह आणि चिराग पासवान या नेत्यांच्या छोट्या पक्षांचीही साथ मनापासून मिळते की नाही, यावर भाजप-जनता दल (सेक्युलर)ची सत्ता पुन्हा येणं अवलंबून आहे. मिळालेल्या जागांवर हे तिन्ही नेते मुळीच खूष नाहीयेत आणि त्यांनी ही नाराजी लपवून ठेवलेली नाहीये. ती भाजप-जनता दलाच्या विरोधात जाईल का, हाही एक मुद्दा आहे. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

निवडणूक तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांचा ‘जनसुराज्य पक्ष’ कशी आणि किती मतं खातो, यावरही सत्तेसाठी दावा करणाऱ्या तेजस्वी यादव आणि नितीशकुमार यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत प्रशांत किशोर निवडणूक लढवतील, असं वातावरण होतं. निवडणूक लढवण्यातला त्यांचा अनुभव आणि ‘लौकिक’ लक्षात घेता, त्यांच्या पक्षाला तिसरा पर्याय म्हणून मानलंही जात होतं, पण ऐन वेळी निवडणुका न लढवण्याचा निर्णय प्रशांत किशोर यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांची मतं कोणाकडे वळणार, यावरही आगामी मुख्यमंत्री कोणत्या आघाडीचा होणार हे अवलंबून आहे.

एक नक्की की, प्रशांत किशोर यांची ताकद किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि आता ते निवडणूक लढवणारच नसल्यामुळे ती ‘झाकली मूठ’ राहणार आहे.

भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्या विरोधात लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह सर्व डावे ‘महागठबंधन’ म्हणून एकत्रितपणे उभे ठाकलेले आहेत की नाहीत, हे अद्याप स्पष्ट होत नाहीये. राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून बिहारमध्ये बरंच रान उठवलेलं आहे. त्यांनी बिहारमध्ये काढलेल्या ‘मतदार सुरक्षा यात्रे’ला फार चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा बिहारमधल्या काही काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. ४०च्या आसपास जागी विजय मिळवता आला, तर येणारं सरकार स्थापन करण्यात निर्णायक भूमिकेत काँग्रेस असेल आणि पक्षाला संजीवनी देणारं ठरेल, असं या गटाला वाटतं. परिणामी यात्रेचा प्रतिसाद ‘प्रसादा’त परावर्तित होतो की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

शिवाय सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असणारी नाराजी चांगल्यापैकी जाणवत आहे. काँग्रेस बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत राहिली, तर मोठा फरक पडेल. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचं कमी-अधिक प्रमाणात का असेना अस्तित्व आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे १९ उमेदवार विजयी झाले होते आणि ३० उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, हे लक्षात घेता राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांचे महागठबंधन यशाची आशा बाळगून आहे.

बिहारमध्ये कन्हैयाकुमार हा ‘माध्यमांचा लाडका’ आणि एक महत्त्वाचा गडी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याची खूप हवा झाली होती, मात्र निवडणुकीत यश काही मिळू शकलं नाही. त्यानंतर कन्हैयाकुमारनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तर भारतात सर्वपरिचित असलेल्या जातीचा आधार घेत, कन्हैयाकुमार ही बिहारमध्ये ताकद आहे, असं लोकसभा निवडणुकीच्या वेळी बोललं जात होतं, ती ताकद आता त्याला दाखवून द्यावी लागणार आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

बिहारमधल्या मित्रांनी दिलेल्या आणि वेगवेगळ्या निवडणूकपूर्व पाहण्यातून जी माहिती समोर येत आहे, त्यानुसार मुख्यमंत्रीपदासाठी सध्या तरी लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आघाडीवर आहेत. राष्ट्रीय जनता दलाकडून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या गर्दीमुळे लालूप्रसाद यादव यांचं निवासस्थान अक्षरश: ओसंडून वाहत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सारी सूत्रं तेजस्वी यादव यांनी हलवली होती. विधानसभेच्या २४३पैकी ७५ जागा मिळवून राष्ट्रीय जनता दलाला पहिल्या क्रमांकावर पोहोचता आलं, ते तेजस्वी यादव यांच्यामुळेच. या तरुण राजकारण्यात बिहारची जनता लालूप्रसाद यादव यांना बघते.

शिवाय ज्या आक्रमक पद्धतीनं तेजस्वी यादव समोर आले, त्यामुळे तरुण वर्गातही त्यांची ‘चाहत’ मोठी आहे. त्यांनी बेरोजगारीचा मुद्दा लावून ठेवत तरुणांना आकर्षित केलेलं आहे. नेहमीप्रमाणे बिहारमधलं जातीचं राजकारण लक्षात घेतलं, तर यादव समाज आणि मुस्लीम राष्ट्रीय जनता दलासोबत आहेच, त्यांच्यासोबत तेजस्वी यादव यांचं पारडं सध्या जड दिसत आहे.

या दोन दिवसांत उमेदवार अंतिम होतील आणि या आठवडाअखेर बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. दिवाळीच्या चार-पाच दिवसांत मोर्चेबांधणी पक्की होऊन आणि दिवाळी नंतर प्रचाराचा बार उडेल. निकाल लागेपर्यंत बिहारमध्ये काय होणार ही चर्चा नेहमीप्रमाणे रंगत राहील.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......