_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत माझा इंग्रजी साहित्याशी काही संबंधच आला नाही. मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो, त्यामागेही अभ्यासाची पुस्तके हाच उद्देश होता. पहिल्या दिवशी ब्रिटिश लायब्ररीत पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टींची पुस्तकेसुद्धा आहेत… अशा तऱ्हेने माझ्या इंग्लिश साहित्य वाचनाचा ‘ओनामा’ झाला. पुढच्या पाच वर्षांमध्ये अभ्यासाचा बोजा सांभाळत काही मोजके लेखक वाचले, त्यापैकी एक म्हणजे विल्यम सॉमरसेट मॉम (१८७४ - १९६५).
कथांचा ‘बादशहा’ आणि कादंबऱ्यांचा ‘शहेनशाह’ म्हणून ओळखले जाणारे ब्रिटिश लेखक सॉमरसेट मॉम हे मुळात वैद्यकीय डॉक्टर. शिक्षणादरम्यान गुरुजनांकडून ज्या काही मार्गदर्शक सूचना मिळाल्या, त्या आपल्या आयुष्यालादेखील लागू होतात हे त्यांनी पुढे त्यांच्या लेखनातून विशद केले. डॉक्टर झाल्यानंतर एक-दोन वर्षेच त्यांनी डॉक्टरकी केली आणि त्यानंतर तिला कायमचा रामराम ठोकला. आयुष्यात कुठले तरी एकच काम झटून करावे, हा त्यामागचा हेतू. अर्थात वैद्यकीय शिक्षणामुळेच आपल्याला मानवी मनाची जटिलता अन् व्यामिश्रता अतिशय चांगल्या प्रकारे समजली; अन्य प्रकारच्या शिक्षणातून ती तेवढी नीट समजली नसती, अशी कृतज्ञताही मॉमनी व्यक्त केलेली आहे.
मॉम तसे ‘एडवर्डीय’ परंपरेतील लेखक. त्यांनी ९१ वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ आयुष्यात तब्बल ६५ वर्षे लेखन केले. या कालावधीत त्यांनी १९ कादंबऱ्या, ३१ नाटके, शेकडो लघुकथा, आठ ललित आणि चार आत्मपर पुस्तके लिहिली. त्यांच्या साहित्याची, विशेषतः नाटकांची जगातल्या बहुतेक प्रमुख भाषांत रूपांतरे झालेली आहेत. मराठीतसुद्धा पु.ल. देशपांडे, माधव मनोहर आणि अन्य काही लेखकांनी मॉम-साहित्याची रूपांतर केलेली आहेत. मॉमची पुढील चार पुस्तके आजही चर्चिली जातात - १) ‘Rain’, २) ‘Of human bondage’, ३) ‘Cakes and ale’, ४) ‘A writer’s notebook’ आणि ५) ‘The summing up’.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
‘रेन’
मॉमचे अनेक कथासंग्रह ब्रिटिश लायब्ररीत हारीने मांडून ठेवलेले असायचे. त्यातले एकेक करून वाचले, पण ‘Rain’ या दीर्घकथेने मनात एक कप्पा तयार केला. पुढे पदवी मिळाल्यानंतर ग्रंथालय बंद केले आणि त्यानंतर संसाराच्या दबडघ्यात जवळपास ३० वर्षे वाचन अगदी विसरून गेलो. पण चार वर्षांपूर्वी अचानक एके दिवशी मॉमच्या साहित्यवाचनाकडे वळलो.
तो २०२१चा पावसाळा. एक-दोन जोरदार पाऊस पडले होते. त्या रिमझिम वातावरणात अचानक हुक्की आली की, आपण फार पूर्वी वाचलेली मॉमची ‘Rain’ पुन्हा वाचायला घेतली तर? मग ती जालावर वाचली. डॉ. मॅकफेल हा वैद्यकीय डॉक्टर, डेव्हिडसन हा ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि सॅडी ही वेश्या यांच्यातील परस्परसंबंधांवर बेतलेली ही कथा. अस्वस्थ करणारी ही कथा उच्चभ्रूपणा, दिखाऊ सभ्यता आणि तथाकथित नैतिकता यांचा अलगदपणे बुरखा फाडते. परिणामकारक शेवटामुळे ती मर्मभेदी झाली आहे.
या कथेच्या द्वितीय वाचनातून तिची काही सौंदर्यस्थळे नव्याने जाणवली. मॉमनी सॅडीची जी दोन्ही भिन्न रूपे रंगवलीत, त्याला तोड नाही. तिचा तिरस्कारयुक्त भाव तर अंगावर चालून येतो (इथे विजय तेंडुलकर आठवतात!). धर्माच्या बुरख्याआड दडलेला विषयासक्त डेव्हिडसन हे तर कथेचे बीज व बलस्थान आहे. ‘समाजात वेश्याव्यवसाय अजिबात चालू देता कामा नये’ हे धर्मगुरूंचे मत, तर ‘तो अटळ आहे’ हे पोलिसांचे मत! “पोलिसांना वेळच्या वेळी हप्ते मिळाल्यावर ते दुसरे काय म्हणणार?” हा संवाद जबरदस्त. असे हे सनातन प्रश्न व त्यांची ठरलेली उत्तरे. ही दीर्घकथा स्मरणात राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, तिच्या अंतिम चरणात सॅडीने पचकन थुंकत उद्गारलेली दोन वाक्ये : She answered, “You men! You filthy, dirty pigs! You’re all the same, all of you. Pigs! Pigs!” या उद्गारांतून मॉम तमाम पुरुष जातीचे स्खलनशील रूप उघडून दाखवतात का?
या संपूर्ण कथेत ‘रेन’ हा शब्द तब्बल २६ वेळा आलाय आणि तो क्रमाने क्रोध, शिक्षा आणि पश्चात्ताप यांचे प्रतीक बनून येत राहतो. त्याची साद्यंत वर्णने मनात खळबळ व चिंता उत्पन्न करतात. जसा कथेचा कळसबिंदू जवळ येतो, तसे पावसाचे वर्णन अधिकाधिक येऊ लागते आणि ती अलंकारिक होतात. त्यापैकी ‘malignant’ हे विशेषण सर्वोत्तम आहे!
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
‘ऑफ ह्यूमन बाँडेज’
ब्रिटिश लायब्ररीत कथासंग्रहाच्या जोडीने मॉमच्या कादंबऱ्यादेखील होत्या, परंतु त्यांचा आकार पाहूनच धडकी भरायची. एकदा एक मित्र गप्पा मारताना म्हणाला की, ‘अरे, माहिती आहे का, मॉमची ‘ऑफ ह्यूमन बाँडेज’ ही जगातली नंबर दोनची कादंबरी आहे.’ त्याच्या या उद्गारांनी प्रभावित होऊन धाडसाने तो ६४८ पानी ठोकळा आणला आणि नेटाने वाचला. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील हे सर्वांत मोठे दीर्घवाचन.
‘ऑफ ह्यूमन बाँडेज’ ही विशेष उल्लेखनीय आत्मचरित्रात्मक बृहदकादंबरी. १९१५मध्ये ती लिहिली गेली. एखाद्याने एखाद्या क्षुद्र व स्वार्थी व्यक्तीवर जिवापाड प्रेम केले, तर त्याच्या वाट्यालाही दुःखभोग येतात, हा तिचा सारांश.
या कादंबरीच्या तीन खंडांपैकी मधला खंड तिचा आत्मा असून त्यात नायक आणि त्याच्या प्रेयसीची धगधगती प्रेमकथा आहे. त्याचे वर्णन अत्यंत उत्कट आणि पिळवटून टाकणारे केलेले असून त्यामुळेच ही कादंबरी अभिजाततेच्या जवळपास पोचते. कादंबरीचा नायक दिव्यांग असून तो मेडिकलचा विद्यार्थी आहे, तर त्याची प्रेयसी हॉटेलमध्ये वेटर. तो खुळ्यासारखा तिच्या प्रेमात पडतो, परंतु ती मात्र त्याला सातत्याने फसवून त्याची लुबाडणूक करते. अखेरीस हे प्रेम असफल होते. तो त्याच्या मार्गाने जातो आणि तिचा अध:पतित मार्ग वेश्याबाजारात जाऊन पोचतो.
अशा प्रकारच्या तत्कालीन आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. त्यात कथानायकाचा बालपणापासून ते तारुण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यातील त्याचे प्रेमाचे अनुभव विस्ताराने येतात. त्यातून बऱ्याचदा दुःखच पदरी पडते, परंतु अखेर त्या दुःख पचवण्यातूनच हे नायक कणखर होताना दिसतात.
अर्थात कादंबरीचा सुरुवातीचा आणि शेवटचा बराचसा भाग निव्वळ वर्णनात्मक असून पाल्हाळीक झालेला आहे. काही वर्षांनी खुद्द मॉमनादेखील ते जाणवले असावे. म्हणूनच नंतर त्यांनी या बृहद्कादंबरीची संक्षेपित आणि चटपटीत अशी दीडशे पानांची आवृत्ती तयार केली. (या कादंबरीवर चित्रपटही निघाला आहे. तो युट्युबवर पाहता येतो.)
या कादंबरीने माझ्या मनावर ठसा उमटवण्याचे अजून एक कारण म्हणजे या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या तळटीपेतले एक वाक्य - “For your own satisfaction and mine please read this preface”. किंबहुना त्यामुळेच मला पुस्तकांच्या प्रस्तावना वाचायची सवय लागली.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
‘केक्स अँड अॅले’
मॉमच्या लेखनावरची इतर विद्वानांची टीकाटिपणी वाचून हे समजते की, बहुतेक समीक्षकांच्या मते ‘ऑफ ह्यूमन बाँडेज’ ही कलाकृती मॉमच्या साहित्यात सर्वोत्कृष्ट आहे, परंतु खुद्द मॉम यांनी त्यांच्या उतारवयात काहीसे वेगळे मत मांडले होते. जरी ते समीक्षकांच्या मताशी तत्त्वतः सहमत होते, तरी त्यांच्या मते ‘Cakes & Ale’ ही त्यांची सर्वाधिक आवडती कादंबरी आहे.
ही कादंबरी समाजातील तथाकथित उच्चभ्रूपणाच्या बेगडी कल्पनांवर भाष्य करते. तिचे शीर्षक काहीसे कुतूहलजनक आहे. ‘Cakes & Ale’ हा शब्दप्रयोग शेक्सपियरच्या ‘Twelfth Night’ या नाटकातील संवादातून घेतलेला आहे. तसेच इसापच्या एका कथेत केक आणि मद्य ही सुबत्तेची प्रतीके मानली आहेत.
कादंबरीचा झोत दोन महायुद्धांदरम्यानच्या काळातील लंडनमधील साहित्यविश्वावर असून, त्यावर लेखकाने सडेतोड उपरोधिक भाष्य केलेले आहे. त्यातली तीन मुख्य पात्रे लेखकांचीच आहेत. एडवर्ड हा गाजलेला व दिवंगत झालेला, अलरॉय हा मध्यम दर्जाचा आणि तिसरा खुद्द विल्यम हा कादंबरीचा तरुण निवेदक. एडवर्ड पहिल्या बायकोच्या मृत्यूनंतर एमी या दुसऱ्या स्त्रीशी लग्न करतो. ती अलरॉयला एडवर्डचे चरित्र लिहिण्याची विनंती करते.
एडवर्डची पहिली बायको रोझी ही कादंबरीतील एक महत्त्वाचे पात्र असून ती एडवर्डची लेखनासाठीची स्फूर्ति-देवता असते. रोझी हे या कादंबरीतील मुख्य स्त्रीपात्र. ती सामाजिक उच्चभ्रूपणाचे प्रतीक आहे. ती प्रांजळ असून मुक्त लैंगिक जीवन जगणारी असल्यामुळे त्या काळी तिच्यावरची सनातनी मंडळींची तुफान चिखलफेक समजण्यासारखी आहे. निवेदकाने तिच्याकडून शरीरसुख घेतलेले असल्यामुळे तो तिच्याकडे सहृदयतेने पाहतो.
एडवर्ड आणि रोझी यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी निवेदकाने अलरॉयला सांगाव्यात, अशी अलरॉयची अपेक्षा असते, परंतु अखेरीस निवेदक त्या स्वतःच्या मनातच ठेवतो.
कादंबरीतील एडवर्ड व अलरॉय या दोन प्रमुख पात्रांचे Hugh Walpole व Thomas Hardy या दोन प्रसिद्ध इंग्लिश साहित्यिकांशी खूप साधर्म्य आढळल्यामुळे त्यांच्याच आयुष्यावर ही कादंबरी बेतल्याची टीका त्या काळी झाली होती. तसेच रोझी म्हणजे मॉम यांच्या असफल प्रेमातली प्रेयसी, अशीही वदंता होती. अर्थात मॉमनी त्याचा परिस्थितीजन्य पुराव्यासह इन्कार केला होता (कदाचित यामुळेदेखील ही कादंबरी मॉम यांची सर्वाधिक लाडकी होती का? असो).
कादंबरीच्या मुख्य शीर्षकाबरोबरच ‘The Skeleton in the Cupboard’ हे एक पर्यायी उपशीर्षक आहे. तो एक वाक्प्रचार असून त्याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यातील लज्जास्पद किंवा त्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या गोष्टी लोकांपासून दडवून ठेवणे, असा आहे. कादंबरीत एकेक गुपिते उत्कंठावर्धक गतीने उलगडत समोर येतात.
त्याचबरोबर इंग्लंडच्या राजसत्तेशी जवळीक असलेले काही उपटसुंभ स्वतःला कसे लेखक म्हणवून घेतात, हे दाखवून त्यांच्यावर केलेले उपरोधिक भाष्य मुळातून वाचण्यासारखे आहे. एकंदरीत अशा प्रवृत्तीवर केलेला कठोर प्रहार हेदेखील या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : तो जुगल चंद्र घोष यांच्या आयुष्यातला एक ‘निर्णायक क्षण’ ठरला… ते महात्मा गांधींचे ‘अनुयायी’ झाले!
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अ रायटर्स नोटबुक
ही मॉमची खरडवही! दैनंदिन जीवनातील असंख्य गोष्टींच्या नोंदवहीत केलेल्या टिपणांचे हे पुस्तक. मॉमनी ही टिपणे वयाच्या १८व्या वर्षापासून ७०व्या वर्षापर्यंत सातत्याने केली होती. कुठल्याही नव्या लेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी ते प्रथम त्यांच्या या टिपणवहीचा आधार घेत. या लेखनामध्ये लहानसहान वाक्यांच्या जोडीने काही मोठे परिच्छेददेखील आहेत. लेखकाचे निरीक्षण आणि त्यावरील मत असे त्यांचे एकंदरीत स्वरूप आहे. काही लहान वाक्ये बोधप्रद तर आहेतच, पण त्यातील काही आपल्याला हलवतात.
“लेखकांसाठी एक नियम : अतिस्पष्टीकरणाच्या भानगडीत पडू नका” यासारखे एखादे वाक्य होतकरू लेखकांना मूलभूत लेखनसिद्धान्त सांगून जाते, तर “समाजातील ‘वर्ग’भेद हे नेहमीच अस्तित्वात असून त्यांचे अस्तित्व नाकारण्याऐवजी ते कबूल करण्यातच प्रामाणिकपणा आहे” हे वाक्य सार्वकालिक जागतिक कटू सत्य अधोरेखित करते. वचनांसमान असणारी अशी अनेक वाक्ये या पुस्तकातून उतरवून घ्यायचा मोह होतो, पण तो न आवरल्यास सुमारे एक चतुर्थांश पुस्तकच उतरवून काढावे लागेल!
हे पुस्तक लिहिताना मॉमनी Jules Renard या फ्रेंच लेखकाचा आदर्श समोर ठेवलाय. त्याने लिहिलेले साहित्य जरी काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्याने २० वर्षं लिहून ठेवलेली त्याची टिपणवही मात्र एक महत्त्वाचा ऐवज असल्याचे मॉम सांगतात. अशा टिपणवहीचे पुस्तक प्रसिद्ध करण्यातून वाचकांना लेखकाच्या साहित्यिक ‘कारखान्या’चे दर्शन घडते आणि त्याची निर्मितीप्रक्रियादेखील समजते, असे त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.
मॉम यांच्यावर त्यांच्या आधीच्या पिढीतील गी द मोपांसा या लेखकाच्या शैलीचा प्रभाव होता. मॉमनी आपल्या कथालेखनातून मानवी मनाचे चलनवलन तटस्थ नजरेतून वर्णन केल्याचे आढळते. माणसामाणसांच्या संबंधातील सत्य ते परखडपणे वाचकांसमोर मांडतात. लेखन ही फार कष्टाची गोष्ट आहे, असेही ते लेखनाच्या ओघात सांगतात.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : या देशात जर कोणाच्या विचारांनी झपाटले जाण्याची आवश्यकता असेल, तर ती महात्मा गांधींच्याच, असा मला विश्वास वाटतो!
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
द समिंग अप
हे मॉमचे आत्मकथन, पण रूढार्थाने आत्मचरित्र नव्हे. मॉमनी स्वतःच्या प्रदीर्घ लेखनायुष्याचा कोलाज यात चितारलाय. मॉम हे बहुआयामी लेखक होते. त्यांनी आपल्या ६५ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत अनेक साहित्यप्रकार हाताळले. त्यात कादंबरी, लघुकथा, नाटक, ललितनिबंध, समीक्षा, चित्रपटलेखन आणि टीव्हीवरील गुप्तहेर मालिका अशा नानाविध प्रकारांचा समावेश आहे. ‘द समिंग अप’मध्ये या सर्व लेखनप्रवासाबरोबरच सखोल आत्मचिंतनदेखील आहे.
मॉमनी इंग्लिश, फ्रेंच व इतरही काही भाषांतील अभिजात साहित्य भरपूर वाचलं होतं. लेखन हा विचारांच्या विरेचनाचा (purgation) उत्तम मार्ग आहे, अशी त्यांची धारणा होती. लेखक म्हणून त्यांनी स्वतःलाही एक शिस्त लावली होती. लेखनाचा पहिला खर्डा लिहून झाल्यानंतर त्यातील जो भाग कापावासा वाटेल, तो ते तिथल्या तिथे कापून टाकत.
त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या सत्यघटनेवर आधारलेल्या दिसतात. परंतु निव्वळ सत्यघटना ही काही कथा होऊ शकत नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. “Fact is a poor storyteller” हे त्यांचे आवडते वाक्य. म्हणूनच त्यांनी निरीक्षणातील सत्याला नेहमीच कल्पनेची यथास्थित डूब दिलेली आहे. त्यांच्या काही लेखनावर झालेल्या टीकेमुळे व्यथित न होता, त्यांनी त्यातून शांतपणे आत्मपरीक्षण केले.
मॉम जातिवंत भटक्या होते. लेखनासाठी नवनवे विषय मिळावेत यासाठी त्यांनी जगभर भ्रमंती तर केलीच, पण त्याचबरोबर समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतील लोकांत ते मुद्दामहून मिसळले. भारतभेटीत अरुणाचलमच्या संत रमणमहर्षींना भेटणे हा त्यांच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग होता.
त्यांनी त्यांच्या परीने ईश्वराचा शोध घेण्याचादेखील बराच प्रयत्न केला होता, परंतु त्यांना काही तसे पुरावे मिळू शकले नाहीत. म्हणून आयुष्याच्या अखेरीस ते स्वतःला ‘अज्ञेयवादी’ समजत. मानवी मनात सातत्याने वसलेल्या भीतीच्या भावनेतून ईश्वरी संकल्पना निर्माण झाली असावी, असा त्यांचा निष्कर्ष आहे.
स्वतःच्या लेखनाच्या भांडवलावरच दिगंत कीर्ती आणि भरपूर संपत्ती मिळवल्यानंतर या लेखकाला काही मूलभूत प्रश्न पडले, जे त्याने मोकळेपणाने वाचकांसमोर मांडले. जसे की, “खरंच आपण का लिहितो? जगात एवढे दैन्य, दुःख आणि असंख्य समस्या लोकांना ग्रासत असताना त्यासाठी आपण प्रत्यक्ष काही कृती करतो का? आपण जे लिहितोय, त्याचे महत्त्व स्वतःखेरीज अन्य कुणाला तरी असते का?”
तत्कालीन समीक्षकांनी त्यांची बऱ्यापैकी उपेक्षा केली असली, तरी रसिकवाचकांनी मात्र त्यांच्यावर जिवापाड प्रेम केले आणि वारंवार आपल्या पसंतीची पोच त्यांना दिली.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आपल्या हयातीत लोकप्रिय असणारे अनेक लेखक वा कलाकार असतात, परंतु मृत्यूपश्चातही जागतिक लोकप्रियता दीर्घकाळ टिकून राहणारे लेखक तसे मोजकेच. सॉमरसेट मॉम हे अशा मोजक्या लेखकांपैकी एक.
जगात जिथे जिथे म्हणून इंग्रजी साहित्य पोचले, तिथे तिथे त्यांचा जयजयकार झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट दिली आणि इंग्लंडच्या राणीने ‘कंपॅनियन ऑफ ऑनर’ हा ब्रिटिश नागरिकाला मिळणारा सर्वोच्च किताब बहाल केला. त्यांच्या असंख्य वाचकांचे त्यांना निर्व्याज प्रेम लाभले. अर्थात या देदीप्यमान यशामागे त्यांची आयुष्यभराची कठोर मेहनत आहे, हे सांगणे न लगे. ते दररोज चार तास ते बैठक मारून लेखन करत असत. या दिनक्रमात कोणत्याही कारणाने कधी खाडा झाला नाही.
“व्यावसायिक लेखकाला लेखनाचा कंटाळा परवडत नाही”, असे ते म्हणायचे. लेखनाची दैनंदिन सवय केल्यावरच लेखक भरपूर लिहू शकतो आणि विपुल लेखन केल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही, असे त्यांचे मत होते.
वाचकांचे रंजन हा मुख्य हेतू मनात ठेवूनच त्यांनी बहुतांश लेखन केले. स्वतःच्या साहित्यिक स्थानाबद्दल ते म्हणतात, “मी स्वतः लेखकांच्या दुसऱ्या पंगतीतल्या पहिल्या खुर्चीतला लेखक आहे”. त्यांनी लेखनावर मिळवलेल्या अलोट धनसंपत्तीतील एक हजार पाउंड वेगळे काढून त्यातून ‘सॉमरसेट मॉम प्रतिष्ठान’ सुरू केलं आणि दरवर्षी एका होतकरू इंग्लिश ललित साहित्यिकाला ४०० पाउंडांची ‘पर्यटन शिष्यवृत्ती’ मिळण्याची सोय करून ठेवली.
मॉमच्या पुस्तकांच्या वाचनातून मला बरेच काही शिकायला मिळाले. लेखन हे फावल्या वेळात करायचे सोम्यागोम्याचे काम नाही, ती कठोर मेहनत असते. भरपूर वाचन, चाणाक्ष निरीक्षण आणि त्याच्या नित्यनेमाने नोंदी करणे, हे मॉमचे गुण अनुकरणीय वाटतात. लेखनातून मिळणारे नाव आणि प्रसिद्धी या गोष्टी अल्पजीवी असतात, याचे त्यांना पुरेपूर भान होते. आयुष्यभर लेखन करणाऱ्या बहुप्रसव लेखकांनी वयाच्या योग्य त्या टप्प्यावर निवृत्तीसुद्धा घेतली पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन लेखक-जमातीसाठी मार्गदर्शक ठरावा.
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. हेमंतकुमार कुलकर्णी वैद्यकीय डॉक्टर असून सृजन साहित्यप्रेमी आहेत.
kalpaklekhak@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nitin Palkar
Fri , 24 October 2025
डॉ. हेमंतकुमार कुलकर्णी यांच्या बहू आयामी लेखन प्रतिभेचा परिचय देणारा हा आणखी एक लेख. 'तुमच्या अभ्यासू वृत्तीला दाद द्यावी तेवढी थोडीच', असे मी त्यांच्याशी सांभाषणादरम्यान एकदा बोललो होतो, ते अगदी यथार्थ आहे हे त्यांच्या लेखनातून नेहमीच जाणवते. विल्यम सॉमरसेट मॉमच्या प्रचंड लेखनाचा सामान्य वाचकांना परिचय करून देण्याबरोबरच त्याच्या प्रतिभेबद्दल आदर व्यक्त करून आपण मॉमकडून काय घ्यावे हे ही डॉ. कुलकर्णी सांगतात. वैद्यकीय प्राध्यापक, परीक्षक हा व्यवसाय सांभाळून लेखनाचा छंद डॉ. हेमंतकुमार कुलकर्णी ज्या पद्धतीने जोपासतायत ते खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉ. हेमंतकुमार कुलकर्णी यांना पुढील लेखनासाठी अनेकानेक शुभेच्छा.