तो जुगल चंद्र घोष यांच्या आयुष्यातला एक ‘निर्णायक क्षण’ ठरला… ते महात्मा गांधींचे ‘अनुयायी’ झाले!
दिवाळी २०२५ - लेख
श्याम पाखरे
  • जुगल चंद्र घोष
  • Tue , 14 October 2025
  • दिवाळी २०२५ महात्मा गांधी जुगल चंद्र घोष Jugal Chandra Ghosh

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

जुगल चंद्र घोष एकेकाळी सूडाच्या भावनेने पेटून उठले होते. रोज रात्री होणाऱ्या खुनखराब्यात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. पण एके दिवशी त्यांच्याच मुलीसारख्या एका मुलीचे प्रेत पाहून ते चरकले. तो क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला… त्यानंतर वर्षभरातच महात्मा गांधी कलकत्त्यातले दंगे शमवण्यासाठी दाखले झाले. तेव्हा जुगल चंद्र घोष त्यांचे अनुयायी झाले. पुढे त्यांनी पूर्व कलकत्ता ‘गांधी स्मारक समिती’चे सचिव म्हणून काम केले. त्या समितीमार्फत हैदरी मंझिलची देखभाल केली जाते. नोव्हेंबर २००२मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्या जुगल चंद्र घोष यांची ही कहाणी…

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

१९ ऑगस्ट १९४६, सकाळी बेलिआघाट मेन रोडवरील जुगल चंद्र घोषच्या घरासमोर विलीझ ओव्हरलॅन्ड जीप येऊन थांबली. नेहमी रहदारीने गजबजणारा तो रस्ता काही दिवसांपासून सामसूम होता. त्यामुळे जीपच्या ब्रेकचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला. तो ऐकून काहीशा लगबगीने जुगल चंद्र घराबाहेर आला. जीपकडे जाता जाता त्याने आकाशाकडे एक कटाक्ष टाकला. काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर आपले अजस्त्र पंख पसरवून गिधाडे घिरट्या घालत होती. त्याने वाकून जीपच्या डाव्या दरवाज्याच्या खिडकीतून ड्राइव्हरच्या सीटवर बसलेल्या डॉ. सुरेशचंद्र बॅनर्जींना हात जोडून नमस्कार केला. ‘भितरे आसो’, बॅनर्जी शांतपणे म्हणाले. जुगल चंद्र जीपचा दरवाजा उघडून त्यांच्या शेजारील सीटवर जाऊन बसला. बॅनर्जींनी जीप चालू केली. ते आज अचानक का आले आणि आपल्याला कोठे घेऊन जात आहेत, याची जुगल चंद्रला काही कल्पना नव्हती. बॅनर्जींना प्रश्न विचारण्याची त्याची हिंमत नव्हती.

कलकत्त्याच्या कामगार वर्गामध्ये बॅनर्जींचा दबदबा होता. ते ‘इंटक’चे संस्थापक अध्यक्ष होते. जुगल चंद्रच्या आखाड्यातील अनेक चेल्यांना बॅनर्जींच्या शब्दामुळे फॅक्टरींमध्ये रोजगार मिळाला होता. १६ तारखेपासून शहरात कर्फ्यू लागला होता. गस्त घालणाऱ्या सैनिक आणि पोलिसांना सोडून रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. १९ तारखेला सकाळी कर्फ्यू शिथिल करण्यात आला. दोन दिवसांपासून हवेत दुर्गंधी पसरली होती.

जीप वेलस्ली एरियात आली, तेव्हा दुर्गंधीची तीव्रता असहनीय झाली. जुगल चंद्रने गळ्यातला गमछा नाकावर धरला. रस्त्याच्या कडेला, गल्लीबोळांमध्ये तीन दिवसांपासून माणसांचे मृतदेह अस्ताव्यस्त कुजत पडलेले होते आणि गिधाडे थव्याथव्यांनी येऊन त्यांच्या मासांचे लचके तोडत होती. डोम जातीच्या अंत्यजांना जबरदस्तीने कामाला जुंपून सैन्याने मृतदेह उचलायला सुरुवात केली होती. ज्या मृतदेहांच्या अंगावर चांगले कपडे होते, त्यांचे कपडे त्यांना ट्रकमध्ये टाकण्यापूर्वी डोम काढून घेत होते.

जीप मलिक बाजारमार्गे पार्क सर्कसच्या दिशेने निघाली. तो मुस्लीमबहुल इलाका होता. मुसलमान दंगेकरींनी तेथील हिंदूंची घरे आणि दुकाने निवडून आग लावून भस्मसात केली होती. तेथेही मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले होते आणि गिधाडांचे थवे त्यांच्यावर झेपावत होते.

बॅनर्जींनी जीप चौकाजवळ रस्त्याच्या कडेला थांबवली. जुगल चंद्र खिडकीतून त्या भेसूर दृश्याकडे डोळे विस्फारून पाहत होता. तेव्हा बॅनर्जींच्या हाताचा तडाखा त्याच्या गालावर बसला. जुगल चंद्रने आश्चर्याने बॅनर्जींकडे पाहिले. काही समजायच्या आत एकामागून एक आणखी चार फटके त्याच्या गालांवर बसले. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

पस्तिशीतील जुगल चंद्र कलकत्त्यामधील एक नावाजलेला मल्ल होता. बलदंड पोलादी शरीर, राकट चेहरा, दाट भुवया आणि त्याखालील भेदक डोळे यामुळे त्याला पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरत असे. बेलिआघाटमधील त्याच्या आखाड्यामध्ये त्याने चेल्यांची फौज उभी केली होती. कलकत्त्यामधील बाहुबलींमध्ये त्याचे नाव वरच्या स्थानावर होते. संतापाने थरथरणाऱ्या जुगल चंद्रने बॅनर्जींकडे रोखून पाहिले. बॅनर्जींचा चेहरा मात्र थंड होता. त्याला बॅनर्जींबद्दल मनापासून आदर वाटत असे. त्यामुळे आपल्या रागावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवून काही न बोलता तो जीपचा दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागला. तेव्हा बॅनर्जींनी त्याच्या कुर्त्याची कॉलर आपल्या डाव्या हाताने पकडून त्याला थांबवले आणि दरवाजा बंद करण्यास फर्मावले.

“नीट पाह जुगल चंद्र. ते समोर पडलेले कुजणारे मृतदेह हिंदूंचे आहेत आणि तू हातावर हात ठेवून काय बसला आहेस?”

“सुरेशबाबू मी आहे म्हणून बेलिआघाटमधील हिंदूंना कोणी स्पर्श करू शकला नाही. आम्ही तेथे यशस्वीपणे स्वसंरक्षण केले आहे.”

“स्वसंरक्षण? तुला वाटते की, ते पुरेसे आहे?” बॅनर्जी उपरोधिक स्वरात म्हणाले. जुगल चंद्रच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत ते पुढे म्हणाले, “मी पूर्व बंगालचा आहे. तेथे आपण हिंदू मूठभर आहोत. तरीही तेथे मुसलमानांच्या आघातावर आम्ही प्रत्याघात करतो. म्हणून आम्ही तेथे अजूनही तगून आहोत, नाहीतर केव्हाच नामशेष झालो असतो. या मुसलमानांवर सूड उगवला नाही, तर उद्या तुझा आणि माझा मृतदेह आपल्या कुटुंबियांसह रस्त्याच्या कडेला कुजत पडलेला दिसेल. ही सूड घेण्याची वेळ आहे, जुगल चंद्र, सूड!” या वेळी मात्र नेहमी शांत दिसणाऱ्या बॅनर्जींच्या चेहऱ्यावर आवेशाची छटा विजेप्रमाणे चमकून गेली.

काही क्षण विचार करून जुगल चंद्र गुरगुरल्यासारखा म्हणाला, “सूड घेतला जाईल, सुरेशबाबू. तुम्ही काही दिवस तुमची ही जीप मला द्या.”

बोवबाजारमधील महेंद्र सर्कस स्ट्रीटवर बॅनर्जींचे घर होते. त्यांना तेथे सोडून जीप घेऊन जुगल चंद्र बेलिआघाटच्या दिशेने निघाला. कॅनाल ब्रिज ओलांडून त्याने जीप थांबवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाकडाच्या अनेक वखारी आणि तबेले होते. गेल्या तीन दिवसांमध्ये दंगलींच्या भयंकर काळातदेखील केवळ जुगल चंद्रच्या माणसांनी दिलेल्या संरक्षणामुळे ते सुरक्षित होते. जुगल चंद्रने त्यांच्याकडे पैशांची मागणी करताच, एक प्रश्नही न विचारता प्रत्येकाने हजार, दोन हजार रुपये काढून त्याला दिले. ते पैसे कुर्त्याच्या खिशात कोंबून त्याने आपल्या चेल्यांना तासाभरात आखाड्यात जमण्याचा संदेश पाठवला. थोड्याच वेळात शंभर दीडशे तरुण आखाड्यात जमले.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

गांधींचे शब्द ऐकून अनेक दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या जुगल चंद्रच्या मनाला शांती मिळाली. कलकत्त्यामधील मुसलमानांना वाचवण्यासाठी सुहरावर्दीदेखील गांधींना शरण आले आणि हैदरी मंझिलमध्ये येऊन राहिले. १ सप्टेंबर रोजी गांधींनी प्राणांतिक उपवासाला सुरुवात केली. त्यांनी उपवास सोडावा म्हणून दंग्यात भाग घेतलेल्या लोकांनी आपली शस्त्रे गांधींसमोर आणून टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्यामध्ये जुगल चंद्रदेखील होता. त्याने गांधींसमोर जमलेल्या शस्त्रांच्या ढिगाऱ्यावर आपली तलवार टाकली.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

दोन तरुणांनी जुगल चंद्रने जीपमधून आणलेल्या तलवारी, भाले आणि लोखंडी गजांचा ढीग आखाड्याच्या मध्यभागी आणून टाकला. सोबत त्यांनी दोन खोकीदेखील आणून ठेवली.

हनुमानाच्या तसबिरीला नमन करून जुगल चंद्र तरुणांसमोर उभा राहिला. त्याने त्या खोक्यांवरील झाकणे दूर केली. त्यांच्यामध्ये गावठी बॉम्ब होते. सर्वांवर नजर फिरवत कणखर आवाजात तो म्हणाला, “सरावाच्या वेळी जेव्हा तुमच्यापैकी कोणी मी शिकवलेला कुस्तीचा डाव यशस्वीपणे वापरून दाखवतो, तेव्हा त्याला मी चवन्नी बक्षीस देतो. आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. जो कोणी मुसलमानांचा मुडदा पाडेल, त्याला प्रत्येक मुसलमानामागे मी दहा रुपये बक्षीस देईल आणि हाफ मर्डर करणाऱ्याला प्रत्येक हाफ मर्डर मागे पाच रुपये बक्षीस देईल.”

ते ऐकून तरुण आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले.

“आजपर्यंत आपण स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलले होते, पण आता रक्ताचा बदला रक्ताने घेण्याची वेळ आली आहे. माझा आदेश आहे की, मुसलमान वस्त्यांवर हल्ले चढवा. त्यांना कापून काढा. पण याद राखा, बायका आणि मुलांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे.” जुगल चंद्रने ‘जय माँ काली!’ अशी गर्जना केली. पाठोपाठ तरुणांनी केलेल्या जयघोषामुळे आखाड्याचा परिसर दणाणून गेला. एकेक करत तरुण जुगल चंद्रच्या पायांवर डोके टेकवून समोरील शस्त्र उचलून आखाड्यातून बाहेर पडू लागले.

बेलिआघाट हा हिंदूबहुल इलाका होता. तेथे मियाबागान नावाची मुस्लीम झोपडपट्टी होती, जिची लोकसंख्या सतरा हजारांवर होती. तेथे राहणारे मुस्लीम मजूर, कारागीर मुस्लीम लीगचे कट्टर समर्थक होते. तेथे कलकत्त्यामधील मोठमोठ्या मुसलमान गुंडांचे वास्तव्य होते. दंगे सुरू झाल्यानंतर बेलिआघाटमध्ये हिंदू आणि मुसलमान इलाख्यांचे परस्परविरोधी शत्रू छावण्यांमध्ये रूपांतर झाले होते.

आतापर्यंत मुस्लीम भागातून हिंदू भागात आक्रमक हल्ले चढवले जायचे. आता जुगल चंद्र आणि त्याच्या माणसांनी मुसलमानांवर हल्ले चढवायला सुरुवात केली. सूडाच्या भावनेमुळे माणसे सद्सद्विवेक हरवून बसली होती. सुडाचीदेखील एक नशा असते. काही दिवसांतच बेलिआघाटमध्ये दीडशे मुसलमानांचे खून पडले. कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी सैन्याची तुकडी बेलीआघाटमध्ये पाठवण्यात आली. रात्री कर्फ्यू लागत असे. रक्ताने माखलेल्या अवस्थेत कर्फ्यू लागण्यापूर्वी जुगल चंद्र घरी परतत असे. त्याची बायको नऊ महिन्यांची गर्भवती होती. तिच्या जीवाला सतत घोर लागून राहायचा. कर्फ्यू लागल्यानंतर खिडकीतून बाहेर डोकावणेदेखील शक्य नसायचे. काही न बोलता कसे तरी जेवण उरकून तो लपतछपत घराबाहेर पडायचा. मुख्य रस्त्यावर सैन्याचा पहारा असे. त्यामुळे हिंदू-मुसलमानांच्या झडपा गल्लीबोळांमध्ये होत असत.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

एके रात्री जुगल चंद्र घरी परतला, तेव्हा त्याच्या बायकोला कळा सुरू झाल्या होत्या. परंतु कर्फ्यूमुळे तिला रुग्णालयात घेऊन जाता येईना. अखेर ती घरीच प्रसूत झाली. मुलगी झाली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जुगल चंद्रच्या घरी पाळणा हलला. बाहेर मृत्यूचे तांडव चालू होते. जुगल चंद्रच्या हातांनी कितीतरी माणसांचा जीव घेतला होता. त्याला त्या हातांनी आपल्या नवजात मुलीला स्पर्श करवेना. तो दुरूनच तिच्या निरागस चेहऱ्याकडे कितीतरी वेळ पाहत राहिला. बेलिआघाटमधील हिंदूंचा नेता म्हणून जुगल चंद्रवर मुसलमान गुंडांचा डोळा होता. मुलीचा जन्म झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला मुख्य रस्त्यावरील त्या घरात ठेवणे त्याला असुरक्षित वाटले. म्हणून त्याने त्यांना आखाड्यात हलवले. तेथे त्याच्या चेल्यांचा खडा पहारा होता.

त्या दुपारी जुगल चंद्र ताठ मानेने बॅनर्जींना त्यांच्या घरी भेटायला गेला. बॅनर्जी त्याच्यावर फार खुश होते. जुगल चंद्र त्यांच्याशी बोलत असताना, समोरच्या टेबलावरील फोन खणखणला. बंगालचे मुख्यमंत्री शाहिद हुसेन सुहरावर्दींचा फोन होता. सुहरावर्दी म्हणाले, “सुरेशबाबू हे काय चालले आहे? आता हे थांबवा.”

“शाहिदसाहेब पश्चिम बंगालमध्ये केवळ दोन गुंड आहेत, एक सुहरावर्दी आणि दुसरा सुरेश बॅनर्जी. दंगे तुम्ही सुरु केले. आता तुम्ही थांबला तर आम्ही थांबू,” एवढे बोलून बॅनर्जींनी फोन बंद केला आणि हसत जुगल चंद्र कडे पाहिले. सुहरावर्दींचा डाव त्यांच्यावरच उलटला होता. हिंदूंची प्रतिक्रिया इतकी हिंसक होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. दंगलीमध्ये पाच हजारांपेक्षा अधिक माणसे मारली गेली होती. हिंदूंपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मुसलमानांचे बळी पडले होते.

एके दिवशी सकाळी सैन्याचे पथक बेलिआघाटमध्ये रस्ते, गल्लीबोळांतून गस्त घालत होते. मियाबागान झोपडपट्टीमधील गस्त संपवून सैनिक पुढे जाऊ लागले, तेव्हा शेवटच्या सैनिकाला तेथील गुंडांनी पकडले आणि त्याचा खून केला. गस्त संपल्यानंतर सैन्याच्या कॅम्पमध्ये सैनिकांची मोजणी झाली, तेव्हा एक सैनिक कमी असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. सैन्याने शोध मोहीम सुरू केली. तालपूर रोड, बेलिआघाट मेन रोड, राखालदास लेन भागात जेथे जेथे गस्त घालण्यात आली होती, तेथे शोध घेण्यात आला. मियाबागान झोपडपट्टीत शोध घेत असताना एका सैनिकाला एका झोपडीभोवती संशयास्पद हालचाल आढळली. त्या झोपडीभोवती बायकांनी गराडा घातलेला होता. त्यांना दूर हटवून जेव्हा तो सैनिक त्या झोपडीत गेला, तेव्हा त्याला तेथे हरवलेल्या सैनिकाचा मृतदेह लपवून ठेवलेला आढळला. बाहेर येऊन शिट्टी वाजवून त्याने इतर सैनिकांना संकेत दिला.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ 

हेहीपाहावाचा : या देशात जर कोणाच्या विचारांनी झपाटले जाण्याची आवश्यकता असेल, तर ती महात्मा गांधींच्याच, असा मला विश्वास वाटतो!

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ 

शिट्टीचा आवाज ऐकून सैन्य मियाबागानमध्ये शिरले. आपल्या साथीदाराचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहून सैनिकांची माथी ठणकली. संध्याकाळ झाली होती आणि अंधार पसरू लागला होता. सूडाचा आणखी एक अध्याय सुरू झाला. सैनिकांनी बायोनेटने झोपडपट्टीतील लोकांना भोसकण्यास सुरुवात केली. तसे करताना त्यांनी बायका, लहान मुले, म्हातारी माणसं कोणालाही सोडले नाही. रात्रभर ते हत्याकांड चालू होते. ज्यांनी शेजारी वाहणाऱ्या कॅनालमध्ये उडी मारून पलीकडचा किनारा गाठला, केवळ त्यांचेच जीव वाचले.

पहाटे जुगल चंद्रच्या घराच्या दरवाजावर थाप पडली, म्हणून तो बाहेर आला. कोलयार्डमध्ये दोन हिंदू मजुरांचा काल रात्री खून झाल्याची खबर घेऊन एक तरुण आला होता. जीप सुरू करून तो वेगाने कोलयार्डच्या दिशेने निघाला. वाटेत मियाबागानजवळील रस्त्यावर कमांडिंग ऑफिसर जेनिंग्स उभा असलेला त्याने पाहिले. जेनिंग्सने थांबण्याच्या केलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून त्याने जीपचा वेग वाढवला. कोलयार्डमध्ये पोहचून त्याने तेथील हिंदू मजुरांना शस्त्रे वाटली आणि सावध राहण्यास सांगितले.

बेलियाघाटकडे परत येताना मियाबागानजवळील रस्त्याच्या मधोमध आपली जीप थांबवून जेनिंग्स उभा होता. जुगल चंद्रला आपली जीप थांबवावीच लागली. जेनिंग्स त्याला ओळखत होता. तो म्हणाला, “गेट डाउन, जुगल चंद्र.” तो जीपमधून खाली उतरला. तेथून काही अंतरावर चार ट्रक्स उभ्या होत्या. जेनिंग्स त्याला तेथे घेऊन गेला. एक एक करत त्याने जुगल चंद्रला ट्रकच्या आत पाहण्यास सांगितले. रात्री मियाबागानमध्ये सैन्याने केलेल्या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या पुरुष आणि महिलांचे मृतदेह धान्याच्या पोत्यांप्रमाणे एकावर एक रचून ठेवण्यात आले होते. छिन्नविछिन्न मृतदेहांवरील जखमांमधून अजूनही रक्त वाहत होते आणि काही मृतदेहांचा मेंदू बाहेर आला होता.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

गेल्या काही दिवसांच्या अनुभवांमुळे त्याला वाटत होते की, त्याच्या मनाचा दगड झाला आहे. परंतु तसे झाले नव्हते. ते दृश्य पाहून हादरून गेलेला जुगल चंद्र चौथ्या ट्रकपाशी आला आणि त्याने आत पाहिले, तेव्हा आतील मृतदेहांच्या थरांच्या वरून काहीतरी धपकन खाली पडले. त्याने लक्षपूर्वक पाहिले, तेव्हा त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो एका लहान मुलीचा मृतदेह होता. तिला पाहून जुगल चंद्रच्या डोळ्यांसमोर त्याच्या तान्ह्या मुलीचा चेहरा तरळला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ती मृत मुलगी त्याच्याकडे रोखून पाहत आहे, असे त्याला वाटले. त्याने आपला हात तिच्या डोळ्यांवर ठेवला आणि तिच्या पापण्या बंद केल्या. त्याच्या खांद्यावर हात ठेवून जेनिंग्स म्हणाला, “जुगल चंद्र, येथे सुरू असलेले सूडसत्र कोणत्या थराला जाऊ शकते, हे तू पाहिलेस ना? आता तुम्ही लोक शांत व्हा.” त्या प्रसंगाने जुगल चंद्रचे मन हेलावून गेले. कलकत्त्यात आता शांतता पसरली होती, परंतु जुगल चंद्रचे मन अशांत आणि अस्वस्थ होते.

ऑगस्ट १९४७मध्ये फाळणीची चाहूल लागली, तेव्हा कलकत्त्यामधील वातावरण पुन्हा तापू लागले. शांतता स्थापन करण्यासाठी गांधी बेलिआघाटमधील मुस्लीम इलाख्यातील हैदरी मंझिलमध्ये येऊन राहिले. दररोज संध्याकाळी गांधी प्रार्थनासभा घेत. एक दिवस जुगल चंद्र त्या सभेला गेला. “रक्ताचा सूड रक्ताने घेतल्यामुळे समस्येचे समाधान होणार नाही. तुम्ही एका माणसाला मारून टाकाल. उद्या त्या माणसाचा मुलगा येऊन तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला मारून टाकेल. हे कुठपर्यंत चालणार. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, तुम्हाला संयम ठेवावा लागेल. केवळ शूर माणसे संयम ठेवू शकतात.”

गांधींचे शब्द ऐकून अनेक दिवसांपासून अस्वस्थ असलेल्या जुगल चंद्रच्या मनाला शांती मिळाली. कलकत्त्यामधील मुसलमानांना वाचवण्यासाठी सुहरावर्दीदेखील गांधींना शरण आले आणि हैदरी मंझिलमध्ये येऊन राहिले. १ सप्टेंबर रोजी गांधींनी प्राणांतिक उपवासाला सुरुवात केली. त्यांनी उपवास सोडावा म्हणून दंग्यात भाग घेतलेल्या लोकांनी आपली शस्त्रे गांधींसमोर आणून टाकण्यास सुरुवात केली. त्यांच्यामध्ये जुगल चंद्रदेखील होता. त्याने गांधींसमोर जमलेल्या शस्त्रांच्या ढिगाऱ्यावर आपली तलवार टाकली.

.................................................................................................................................................................

(सर्वंकष’ या त्रैमासिकात दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या लेखाचे पुनर्मुद्रण. ‘Partition Voices’ या प्रकल्पांतर्गत बीबीसीचे पत्रकार अँड्रीव व्हाईटहेड यांनी १९९७ साली घेतलेल्या जुगल चंद्र घोष यांच्या मुलाखतीवर आधारित.)

.................................................................................................................................................................

लेखक श्याम पाखरे इतिहासाचे अभ्यासक आहेत.

shyam.pakhare111@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......