_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
१.
मी साडेतीन वर्षांचा होतो, तेव्हा गावदेवीच्या लॅबर्नम रोडवरील मणिभवनच्या शेजारच्या व्हायडा व्हिला या इमारतीच्या तळमजल्यावर राहत होतो. तेथून आम्ही जवळच ग्रँट रोडला ‘आनंदाश्रम’ या एका नव्या कोर्या वसाहतीत राहायला आलो. तिथे ‘ए’ ते ‘एच’ अशा आठ सुरेख चार मजली इमारती होत्या; मध्ये खेळायला प्रशस्त अंगण होते. मुख्य म्हणजे तेथून वडिलांचे पुस्तकांचे दुकान दोन-तीन मिनिटांच्या अंतरावर होते. फक्त दोन अडचणी होत्या. आमचे घर दुसर्या मजल्यावर होते आणि सगळे पन्नासएक बिर्हाडकरू कोकणीच बोलायचे. आम्हीही घरी कोकणी बोलत असू, पण स्वतःच्या नातलगांपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करणार्या, मराठी बोलणार्या गावदेवीच्या कमलाबाई आठवणकर यांच्याकडून सकाळ-संध्याकाळ ‘खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या’ ही कविता बडबडून मला लाड करून घेता येत नसे.
आमच्या नव्या घरी भिंतीवर तीन मोठ्या तसबिरी लावल्या गेल्या. दोन देवींच्या होत्या – राजा रविवर्मा यांनी तयार केलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या. आम्ही पुस्तकांचे वितरक म्हणून सरस्वती हवी आणि लक्ष्मीची तसबीर तेव्हा पूजनासाठी लागायची. या तसबिरी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘पॉप्युलर बुक डेपो’त नेल्या जात. रोज संध्याकाळी परवचा म्हणण्यापूर्वी आम्ही मुले घरी या तसबिरींसमोर हात जोडून नमस्कार करत असू.
त्या तसबिरींशेजारी एका वृद्ध माणसाची त्याच आकाराची पण कृष्णधवल तसबीर होती. फोटोतील कपडे त्या देवींच्या भरजरी पोशाखाशी विसंगत वाटत. त्यांनी अत्यंत साधे धोतर-उपरणे नेसले होते. चेहरा हसरा, पण काहीसा सुरकुतलेला. आम्ही यांनाही देव समजून हात जोडत असू; पण हा काही देव नाही, तर माणूसच आहे, हे पाहताच लक्षात येत असे. त्यावर नीट वाचता येणार नाही, अशा हस्ताक्षरांत ‘मो.क. गांधी’ असे काहीतरी गिरवलेले दिसायचे. घरी आलेले सर्व त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणायचे. गांधी? म्हणजे हे तर गुजराती आडनाव; हे नाव धारण करणारा माणूस म्हणजे माझ्या बाबांसारखा दुकानदारच असणार आणि तरीही हा महात्मा?
त्या तसबिरीवरील स्वाक्षरी एक दिवस बाबांनी एका आटोग्राफ बुकमध्ये मला दाखवली. पॉप्युलर बुक डेपो सर्व प्रकारची पुस्तके विकत असले, तरी अधूनमधून पुस्तके छापून प्रकाशित करत असे. त्यांपैकी लुई फिशर या अमेरिकन पत्रकाराचे ‘अ वीक विथ गांधी’ या पुस्तकाची ‘गांधीजींच्या सहवासात एक आठवडा’ ही सत्यबोध हुदलीकर यांनी केलेल्या मराठी भाषांतराची प्रत गांधीजींना देऊन बाबा आले होते. तेथे पाच रुपये ‘हरिजन फंडा’ला देणगी देऊन त्यांनी माझ्यासाठी गांधीजींची स्वाक्षरी आणली होती. असे मिरवण्यात किंवा काम सोडून अगदी गांधींना भेटायला जाण्यात बाबांना रस नव्हता; तरी हुदलीकर हट्टाने आपल्या प्रकाशकाला सोबत घेऊन गेले होते.
आम्ही मुले घरी आईच्या शिस्तीत होतो; वडील सबंध दिवस कामात असायचे. सकाळी आठच्या सुमारास धोतर, कोट, टोपी घालून ते दुकानात जायचे, ते दीडला जेवायला परतायचे. जेवण आणि पंधरा मिनिटे वामकुक्षी झाली की, तीनच्या सुमारास परत दुकानात जायचे, ते रात्री नऊनंतर घरी यायचे. तेव्हा कुठे ते आम्हाला भेटायचे. दुकानात उभे राहून आणि दिवसभर काम करून त्यांचे पाय दुखायचे, तेव्हा आम्हा तीस-चाळीस पौंडाच्या मुलांना ते पायांवर वजन द्यायला सांगायचे. म्हटले तर ही एवढीच चैन ते करायचे.
आम्ही शाळेच्या गणवेशाच्या निमित्ताने मिलचे कपडे वापरत असू. वडील मात्र जाडेभरडे खादीचे कपडे वापरायचे. आम्ही श्रीमंत नसलो, तरी बर्यापैकी सुखवस्तू असल्याचे जाणवत होते, पण कधी हॉटेलात गेल्याचे किंवा मुंबईत भटकल्याचे किंवा बाहेरगावी प्रवास केल्याचे ऐकले नाही. वडील गरम चहा हौसेने प्यायचे. त्यांचे बालपण समुद्रकिनार्याच्या गावी गेलेले, त्यामुळे त्यांना मासे वर्ज्य नव्हते, तरी घाटावर वाढलेल्या माझ्या आईच्या शाकाहारी आग्रहामुळे ते पूर्ण शाकाहारी बनले.
एकदा ते आम्हाला बालीवाला थिएटरमध्ये बालगंधर्व यांचे ‘एकच प्याला’ प्रकाराबद्दल आम्ही मुले घाबरलो. हळूच चौकशी केली की, बाबा चोरून कधी पितात का? तेव्हा कळले की, ब्रँडी घरात औषधासाठी ठेवलेली होती. वर्षानुवर्षे त्याची गरज पडली नव्हती. बाबांना एक छोटेसे व्यसन होते. ते ‘पासिंग शो’ सिगारेट अधूनमधून ओढत, पण फार नाही. त्यामुळे त्यांनी लाडात येऊन आमचा पापा घेताना त्याचा दर्प जाणवत नसे.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
वडिलांचे खरे व्यसन म्हणजे काम करणे. दिवस-रात्र त्यांना कामाशिवाय काही सुचत नसे. नाटक-सिनेमा नाही, प्रवचन-कीर्तन नाही, कुठे कार्यक्रमांना जाणे नाही, कसलीही चैन करणे नाही; फक्त काम एके काम! त्यांच्याकडून सिनेमासाठी परवानगी मिळवणे कठीण. त्यांना एखाद्या संतपटाचे नाव सुचवले तरी ते उत्साहित होत नसत. ‘ ‘भक्तराज’ पाहिला, तर ‘संत तुलसीदास’ का नको? मग तिसरा, कोणताही का असेना त्याचा मोह होतो. त्यापेक्षा पहिलाच न पाहिला तर कसलाही मोह नाही. गांधींसारखा माणूस सिनेमा न पाहता ‘महात्मा’ झाला,’ हे उदाहरण ते देत असत.
वडिलांच्या कामसूपणाचा त्रास कधी आईला वाटला नाही. नवरा कुटुंबासाठी ‘घोळतो’, दिवसभर बाहेर कामात असला, तरी दुपारी-रात्री वेळेवर घरी येतो, याचे आईला कौतुकच असायचे. निदान या बाबतीत त्यांच्या स्वभावाशी जुळणारा तिचाही स्वभाव होता. ते उंच होते, तर ती मध्यम उंचीची आणि अंगाने काहीशी स्थूल होती. तशी तीही सबंध दिवस कामात असायची. घरात पाच मुले, शिवाय सदोदित पाहुणे. तिच्या माहेरचे नातेवाईक अधिक. ते फ्रीजच्या आधीचे दिवस; तेव्हा दररोज आपल्या पाच मुलांसाठी चार डाव ताजे खाणे आलेच. तिला कामे सहज झेपत आणि स्थूलत्वासोबत तिने कामसूपणाचाही वारसा आम्हाला दिला होता.
सदानंद दादा माझ्याहून तेरा वर्षांनी मोठा, तर धाकटा सुरेश हा दोन-तीन वर्षांनी लहान. मध्ये दोन बहिणी. त्यानंतरही मला एक बहीण झाली, पण ती तीन दिवसांतच गेली. म्हणजे जवळजवळ वीस वर्षांत सहा बाळंतपणे काढणारी आई म्हातारी झाल्यावरदेखील कामात व्यग्र असायची. घरी अधूनमधून स्वयंपाकीण असायची. तिची रोजच्या स्वयंपाकात मदत असली, तरी आई त्यांचीही मुलीप्रमाणे काळजी घ्यायची. त्यांचे लग्न, बाळंतपण सगळी आईने स्वीकारलेली जबाबदारी होती. अगदी घरी येणार्या वसईवाल्यापासून तो ग्रँट रोड बाजारातील भाजीवाल्यापर्यंत सगळ्यांना या आजीच्या हातचीच गावठी औषधे लागायची. आईला भेटायला येणारी मंडळी फारशी राजकीय व सामाजिक विषय काढत नसत.
वडिलांना भेटायला येणार्यांमध्ये काँग्रेसजनांचा भरणा जाणवायचा. बहुतेक जण खादीधारी, काही गांधींच्या सांगण्यानुसार एखादे विधायक काम हातात घेत असत. सुखवस्तूपणाने न पेंगुळलेले आणि आपापले काम सचोटीने चोख करण्याचा सगळे प्रयत्न करत, तरी त्यांना काही मोह व्हायचेच.
आम्ही चित्रापूर सारस्वत आणि भाषा कोकणी. शिरालीतील चित्रापूर मठाधीशांना आम्ही गुरू मानणारे. ‘कॅनरा सारस्वत असोसिएशन’ ही आमची ज्ञातिनिष्ठ संस्था. वडील त्यात लक्ष घालत. ते पुढे अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. ते उपाध्यक्ष होते तेव्हा रामराव पडबिद्री नावाचे अध्यक्ष होते. ते ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या वृत्तपत्राच्या संपादक मंडळात होते. अतिशय सालस गृहस्थ. मुंबई काँग्रेस पक्षाचे ते पदाधिकारी होते. ते घरी बर्याचदा येत. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आनंदाश्रम कॉलनी निरनिराळ्या चळवळींनी गजबजलेली असे. आमच्या वाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल आणि सरस्वती अॅथ्लेटिक लीग यांच्या शाखा क्रमाक्रमाने होत्या. मी त्यांत लुडबुडायचो. आम्ही ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ आणि ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ सारख्याच उत्साहाने म्हणत असू.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
मला आठवण सांगायची आहे, ती एका नगरपालिकेच्या निवडणुकीची. आमचा मतदारसंघ चार जागांचा होता. सहसा काँग्रेस पक्ष चारही उमेदवार उभे करत असे आणि ते निवडूनही येत. त्यांच्याकडून एखादी जागा हिसकावून घेण्यासाठी हिंदू महासभा आणि समाजवादी पक्ष एकेक उमेदवार देत असत. प्रत्येक मतदार एका उमेदवाराला चारही मते देऊ शकत. या पद्धतीने काही मतदारसंघांत समाजवादी काही जागा मिळवत, ते विशेषतः उमेदवाराच्या वैयक्तिक लोकप्रियतेच्या बळावर. त्या काळात मतदान केंद्रावर प्रचार करता येत असे. तिथे जाऊन दिवसभर पक्षाचे कार्यकर्ते जयघोष करत. राष्ट्र सेवा दल हे समाजवादी पक्षाशी जोडलेले नाही, असे जरी शाखाप्रमुख सांगत असले, तरी समाजवादी पक्षाच्या वतीने आम्हाला नारा देण्यासाठी बोलावण्यात आले होते.
एकदा मी गवालिया टॅंकवर मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघणार, तितक्यात बाबा टपकले. त्यांनी ‘कुठे जाणार?’ असा प्रश्न विचारला. मी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘तुला या राजकारणातले काय कळते?’ मी म्हटले, ‘काही नाही! पण आमचे शाखाप्रमुख म्हणतात म्हणून आम्ही चाललो आहोत.’ बाबांनी ठामपणे सांगितले, ‘आपल्याला जे कळत नाही, त्यात मेंढरासारखा भाग घ्यायचा नाही.’ मग मी गेलो नाही. हा पहिला धडा मला जन्मभर पुरतो आहे.
२.
त्या सुमारास जी घटना घडली, ती देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती, पण त्या वयात मला फारसे काही जाणवले नाही. ८ ऑगस्ट १९४२ रोजी सदानंददादा म्हणाला, ‘मी काँग्रेस अधिवेशन पाहायला चाललो आहे - गवालिया टॅंकला. येतोस का?’ मला फारसा बोध झाला नाही. माझे आठवे वर्ष चालू होते. दादाने अगत्याने विचारले आणि शिवाय काँग्रेस पक्ष आपलाच वाटायचा. त्यामुळे मी तयार झालो. तिथे खूप गर्दी होती. दादाने मला उचलून खांद्यावर बसवले आणि म्हणाला, ‘तिथे मधोमध दिसतात ते गांधीजी. आपल्या घरी त्यांचा फोटो आहे तेच!... आणि बाजूला ते टोपी घातलेले दाढीवाले मौलाना अब्दुल कलाम आझाद, हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.’ आम्ही गर्दीच्या शेवटी कसेबसे उभे होतो. मला स्टेजवरील काही दिसणे शक्यच नव्हते.
सारे धूसर – दूरवर. खांद्यावर बसून भाषण ऐकण्याइतका रस मला निदान तेव्हा नव्हता. मी घरी आलो, तो मात्र फुरफुरत, कोणातरी मोठ्या माणसांना पाहून आलो म्हणून. पण त्या फोटोतल्या माणसालाच पाहिल्याची खात्री वाटेना आणि तरीही मी दादाच्या वयाचा नव्हतो म्हणून कळले नाही, याचे त्या दिवशी फार वाईट वाटून गेले.
नंतरच्या आयुष्यातील दोन घटनांचा उल्लेख इथेच करावासा वाटतो. उत्तरायुष्यात गांधी अभ्यासक म्हणून मी व्याख्याने देऊ लागलो, तेव्हा अनेक श्रोते विचारत, ‘तुम्ही गांधींना पाहिले आहे का?’ त्यांना काय उत्तर देणार?
दुसरी महत्त्वाची गोष्ट- माझे प्रकाशनक्षेत्रातले एक मार्गदर्शक श्री.पु. भागवत एकदा जाहीर बोलताना म्हणाले होते की, तेव्हा ते तरुण होते आणि त्यांच्या ‘मौज’ साप्ताहिकासाठी या अधिवेशनाला पत्रकार म्हणून गेले होते. त्यांनी गांधींचे संथ आवाजातले ‘चले जाव’ हे इंग्रजांना ठणकावून सांगणारे आणि कार्यकर्त्यांना ‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश देणारे अडीच तासांचे भाषण कान व मन लावून हाताच्या अंतरावरून ऐकले होते. तेव्हा तरी हवा होतो की नाही मी त्यांच्या जागी! निदान शेजारी!!
आम्हा शाळेत जाणाऱ्या मुलांना १९४२ साली मुंबईवरील बॉम्ब हल्ल्याच्या भीतीने धारवाडला पाठवण्यात आले. कॉलेजला जाणारा दादा आई-वडिलांबरोबर मुंबईतच राहिला. मी काही महिने धारवाडला शाळेत होतो, तिथे टकळीवर सूत काढायला शिकलो. सगळेच तसे करत. माझी चरख्यापर्यंत प्रगती झाली नाही. माझ्या मोठ्या बहिणीची खास मैत्रीण विठा कामटे जिल्ह्याच्या मुख्य पोलीस अधिकार्याची मुलगी. तरी तिला तिच्या वडिलांपासून लपवाछपवी करावी लागत नसे, इतकी ती चळवळ उघड चालायची. तेथील एका कानडी वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तानुसार दादा आणि त्याचा एक मित्र रमेश नाडकर्णी विजापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती, म्हणून मदतकार्यासाठी गेले होते. त्यांच्या कामाचे स्वरूप कळण्यासारखे माझे वय नव्हते.
मुंबईला परतल्यावर काही दिवसांनी वडिलांनी दिलेला दुसरा जबरदस्त धडा मिळाला. घरात एक मोठे कपाट होते. त्यात मुलींनी लावायच्या गंधाची बाटली होती. खेळताना माझ्याकडून ती सांडली आणि घरच्यांना बरीच साफसफाई करावी लागली. कोणी हे केले असे बाबांनी सहज विचारले. मी जणू त्या गावचाच नाही असा वागलो; पण मला घरातल्या काहींनी पाहिले होते. मग मला चूक कबूल करावी लागली. तशी चूक फार मोठी नव्हती, असे मला भोळेपणाने वाटले, पण जाणूनबुजून खोटे बोलणे ही चूक वडिलांच्या नजरेत लहान नव्हती. कधी अंगाला बोट न लावणार्या बाबांनी चामड्याच्या पट्ट्याने वळ उठेपर्यंत मला चोप दिला. सत्य आणि अहिंसा ही गांधींची तत्त्वे या दोहोंच्या संघर्षात सत्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी बाबांनी एकदाच हिंसेचा आधार घेतला. हा दुसरा धडा.
या दोन्ही धड्यांसाठी बाबांचे आणि बापूंचे उपकार कधी मी विसरणार नाही.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
३.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ‘हिंदी’ राष्ट्रभाषा म्हणून सर्वांनी स्वीकारली होती. शाळेच्या क्रमिक पुस्तकांचे शीर्षक ‘सब की बोली’ असे होते. शिवाय बम्बई हिंदी विद्यापीठाच्या प्रथमा, द्वितीया, उत्तमा या परीक्षाही आम्ही विद्यार्थी देत असू. गांधींच्या आत्मकथेचे वाचन झाले, ते आधी हिंदी अनुवादातून. ‘काँग्रेस राष्ट्रभाषा समिती’च्या हिंदी परीक्षांसाठी काहीशा वेगळ्या अभ्यासक्रमात एक पेपर अरेबिकचा होता. पहिली परीक्षा मी दिली, तेव्हा फार नाही, तरी निदान माझे नाव अरेबिक किंवा उर्दू लिपीत लिहू शकण्याइतपत प्रगती झाली होती.
आम्ही राष्ट्र सेवा दलात वसंत बापट आणि साने गुरुजी यांची गाणी गात असू. स्वातंत्र्याची तहान सारखी वाढत होती. अखेरीस १५ ऑगस्टचा दिवस उजाडला आणि पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष अनुभवता आला. तोवर पॉप्युलरने दुकानाच्या कामासाठी एक डिलिव्हरी व्हॅन विकत घेतली होती. आमच्या नरसिंह ड्रायव्हरने ती बोरीबंदरच्या प्रचंड गर्दीत तशीच दामटवली. रोषणाई पाहण्यासाठी आसुसलेल्या आमच्यासाठी हे पथ्यावरच पडले. एकूण देशातल्या वातावरणात थोडाफार फरक दिसत होता. हिंदुस्थानात आणि पाकिस्तानात सीमेवर काही भयंकर चालले आहे, याचा वृत्तान्त वर्तमानपत्रांमध्ये यायचा. तरी त्या वयात त्याची आच आम्हाला जाणवत नसे.
एका संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे शाळेच्या पटांगणात क्रिकेट खेळत होतो. सातच्या सुमारास मुलांना पिटाळायला शाळेचा शिपाई सहदेव छडी घेऊन यायचा. त्या संध्याकाळी मात्र तो आधी आला, तोही छडीशिवाय. तो रडत होता. त्याने रेडिओवर काही भयंकर ऐकले होते. गांधींबाबांवर गोळ्या झाडल्या आणि ते गेले, असे काहीतरी तो पुटपुटत होता. आम्ही मुले खेळ थांबवून लगेच धावत निघालो. तेथून घर चालत दोन मिनिटांवर होते. लगेच नव्याने आणलेला रेडिओ लावला. बातमी खरी निघाली.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
वयाने लहान खरा, पण मी पार कोसळून गेलो. या माणसाला कधी भेटलो नव्हतो. बहुदा पाहिलेही नव्हते, पण कोणी फार जवळचे गेले, आता आपण पोरके झालो, असे वाटू लागले.
त्या सुमारास आमच्या आनंदाश्रम वाडीच्या आसपास हनुमान बिल्डिंगमध्ये भागवत नावाचे गृहस्थ राहत होते. काही दिवस आधी वाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालत असे, तेव्हा ते डोकावत असत. २० जानेवारीला दिल्लीत गांधींच्या प्रार्थनासभेत काही गडबड झाली होती, पण ती आमच्या लक्षात राहिली नव्हती. आमचे खेळ चालूच होते. ३० तारखेच्या आधी एक-दोन दिवस हा भागवत उगाच येऊन बडबडायचा. म्हातारा गांधी मरणार, याची त्याला खात्री वाटायची. खून झाला ह्या बातमीने आम्ही हादरलो, तर हा गृहस्थ पेढे वाटायला घेऊन आला. ‘मी सांगितले होते की नाही?’ अशी त्यांची विजयी मुद्रा होती. आम्ही मुले रागावलो, भांबावलो. परिसरातील कोणी तरी त्यांच्या घरातील सर्व समान बाहेर रस्त्यावर आणून जाळून टाकले. गांधींच्या नावाने हे असे सारे व्हावे, यामुळे मी त्या वयातही नाराज झालो खरा, पण अजूनही माझ्यात गांधी पुरता भिनला नव्हता.
गांधी गेल्यावर आलेले पोरकेपण स्वीकारणे निरुत्साहजनक असले, तरी माझे वय तेव्हा तेरा वर्षांचे. त्यामुळे काय करावे ते सुचत नव्हते आणि सुचले तरी काही करण्याचे ते वयही नव्हते. परिणामी आमच्या तीव्र भावना लाडके पंतप्रधान पंडित नेहरूंनी आपल्या रेडिओवरील भाषणात अत्यंत समर्पक शब्दांत व्यक्त केल्या, एवढ्यावर समाधान मानून घेतले. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते गांधीबाबामुळे, याबद्दल आमच्या मनात संशय नव्हता. जवाहरलाल ते स्वातंत्र्य टिकवून देशाला निश्चित दिशा देतील, याबद्दल फारशी शंकाही नव्हती.
आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातील मुले आजच्या मुलांपेक्षा राजकीय विचार फार आधीपासून करत होतो. शाळेत असतानाच निरनिराळ्या विचारप्रवाहांशी आमचा बरा-वाईट परिचय झाला होता. त्या काळात वाडीत बसवण्यासाठी मी ‘राजकीय विष’ या विषयावर एक नाटुकलेही लिहिले होते. चळवळीत भाग घेण्याची सवय झाली होती. स्पष्ट विचार करायला अजून शिकलो नव्हतो, पण गांधीजी यांची अहिंसा जशी पटायची, तसाच आदर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेबद्दलही वाटायचा.
वर्ष आठवत नाही, बहुधा १९४६ असावे. २३ जानेवारी या नेताजींच्या जन्मदिनी बोट कापून रक्ताने तिरंग्यावर ‘जय हिंद’ लिहिल्याचे आठवते. प्रभातफेरीत भाग घेऊन ब्रिटिशांचा अश्रूधूर अनुभवल्याचेही विसरू शकत नाही. हळूहळू देशातील राजकारण काय असायला हवे, त्यासंबंधी विचार मनात येऊ लागले. नेहरूंनी देशात मिश्र अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणात अमेरिकन आणि रशियन या दोन्ही गटांशी समभाव राखणे – अलिप्ततावाद - ही गांधीविचारांचीच परिणती आहे, असा विश्वास वाटू लागला.
गांधींचा कायद्यापेक्षा समाजातून उत्स्फूर्तपणे झालेल्या कामावर आणि चळवळीवर अधिक विश्वास होता, हे माहीत असूनही १९४९च्या अखेरीस भारताचे संविधान स्वीकारून २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताकाची स्थापना झाली, तेव्हा दिलासा मिळाला. २० जून १९५० रोजी मी एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला आणि आम्ही भारताच्या संविधानाचा अभ्यास करू लागलो. तेव्हा संविधानाचा अभ्यास करणारे पहिले विद्यार्थी म्हणून, जणू ते संविधान आम्हीच तयार केले असा अभिमान वाटू लागला. काही प्रमाणात ‘We, the people of India... IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION’, या शब्दांत राज्यघटनेतही हाच विचार मांडला होता.
विनोबा हे गांधीविचारांचे वारस, पण त्यांचा काही प्रमाणात आम्हाला विसर पडला होता. त्या नंतरची वर्षे नेहरूंच्या रूपाने गांधी आपल्यातच आहेत असे आम्ही मानत असू. त्या दोघांतील आर्थिक विषयांवरील मतभेद जगजाहीर होते, तसेच त्यांच्यातील जिव्हाळाही. गांधीदाम्पत्याला चार मुलगे झाले, तरी त्यांनी मुलगाच मानलेले जमनालाल बजाज, महादेव देसाई आणि जवाहरलाल नेहरूंबद्दल तशीच आपुलकी वाटायची. गांधी आगा खान महालातून बाहेर सुटल्यावर सुभाषबाबूने त्यांना ‘आझाद हिंद फौजे’च्या रेडिओवरून ‘राष्ट्रपिता’ म्हटले, त्याचे काहीसे आश्चर्य वाटले; तरी ते नाव त्यांना ‘महात्मा’इतकेच चिकटल्याने खूप बरेही वाटले.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
जसजसा मी समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावरील लोकांत मिसळू लागलो, तसेतसे लक्षात येऊ लागले की, ज्यांच्यावर गांधींचा प्रभाव पडला नाही, असे क्वचितच कोणी असले, तरी गांधींना पूर्णपणे समजून घेणे आणि त्यांची शिकवण स्वीकारणे, ही जवळजवळ अशक्य गोष्ट होती. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे गांधींना समजून घ्यायचा प्रयत्न करत असे आणि झेपेल तेवढे स्वीकारत असे. गांधींनी जीवनाच्या इतक्या पैलूंना स्पर्श केला, इतक्या ठिकाणी ते गेले, इतक्यांना ते भेटले आणि त्यांनी असंख्य पत्रे लिहिली, त्या सार्यांची संगती लावता येईलच असे नाही. त्यांचा ध्येयवाद न पचणारे होते आणि ही ध्येयासक्ती अव्यवहारी म्हणून त्यांना न मानणारेही होते.
त्या दिवसांत घरच्या लहान मुलांना घरगुती कामासाठी बाहेर पाठवण्यात धोका वाटत नसे. एकदा काही कामासाठी मी ग्रँट रोडच्या रेल्वे पुलावरून जात होतो. पाहतो तो एका कोपर्यात एका मुसलमान पोराचा मुडदा पडला होता. त्याला कोणी मारले, का मारले ते कळायला मार्ग नव्हता. परंतु कुजबूज होती की, हा जातीय म्हणजे धर्मीय दंगलीचा एक भाग होता. महमद अली रोडवर याचप्रमाणे हिंदू कापले जायचे. कोणालाही भीती वाटण्यासारखीच परिस्थिती होती… बालपणापासून अहिंसेचे संस्कार झाल्याने मी विशेष अस्वस्थ होत असे.
४.
एल्फिन्स्टन या माझ्या सरकारी कॉलेजमधले बहुतेक विद्यार्थी सुखवस्तू कुटुंबातलेच असायचे. साहजिकच ते प्रस्थापित शासनाशी समरस झालेल्या संस्कृतीत वाढलेले. गमतीचा भाग म्हणजे बहुतेकांचे कुटुंबीय १९४७पर्यंत ब्रिटिश आणि त्यानंतर नवीन काँग्रेस शासनाशी निष्ठा बाळगून असायचे. गांधी १९२० ते १९४८पर्यंत काँग्रेसचे मार्गदर्शक होते; ते पक्षात असले-नसले काय, काही फरक पडत नव्हता. पक्ष त्यांचेच म्हणणे स्वीकारत असे. तरीही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे काँग्रेस सरकार हे काहीसे वेगळे वाटायचे. नाहीतरी काँग्रेसचे नेहरूप्रणीत सरकारी पक्ष आणि विनोबांच्या नेतृत्वाखाली सर्वोदयी असे दोन भाग पडले होते. मी गांधीजींनी सुरू केलेला ‘हरिजन’ नेमाने वाचत असे. त्याचप्रमाणे भालचंद्र देसाईच्या प्रभावाखाली एम.एन. रॉय यांचा ‘रॅडिकल ह्यूमनिस्ट’सुद्धा. काँग्रेस की रॉइस्ट, अशी काही निश्चित राजकीय भूमिका घेण्याइतपत विचारांना दिशा मिळाली नव्हती. आम्ही पंधरा-सोळा वर्षांची मुले, साहजिकच आमचे लक्ष अभ्यास, उनाडक्या, मित्रमंडळ, खेळ, नाटक अशा उद्योगांतच असायचे.
दुसर्या वर्षातला माझा विनी शेंबवणेकर हा वर्गमित्र प्रचंड वाचन करायचा. त्याचे आवडते लेखक महात्मा गांधी आणि विस्टन चर्चिल. या परस्परविरोधी नेत्यांचे विचार त्याला आवडायचे. त्यांची लेखनपद्धती, भाषा की आणखी काही हे सांगणे कठीण, तरी कॅन्टीनमधील त्याच्या या बडबडीतून माझा गांधींच्या लेखनाशी परिचय वाढत गेला. कॉलेजात मी काही काळ गणिताशी झटापट केली, परंतु त्यासाठी मान मोडून काम करावे लागते, ते माझ्या इतर उपदव्यापामुळे न जमल्याने मी पराभव पत्करला आणि निमूटपणे इतर विषय घेऊन बीए झालो. इंग्रजी, संस्कृत, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांचे दोन दोन पेपर होते. खरे तर माझी विशेष प्रगती होती, ती इंग्रजी साहित्य या विषयात.
एमएसाठी विषय निवडताना ज्या विषयाचे वर्ग एकाच ठिकाणी भरत, असा विषय निवडणे आवश्यक होते, कारण मला शक्यतो लवकर कुटुंबाच्या व्यवसायात गुंतायचे होते. एका बाजूने कॉलेज परीक्षेत चढउतार अनुभवताना मराठी प्रकाशनक्षेत्रातील माझ्या थोड्या वेगळ्या कामामुळे मी मनाची उभारी कायम ठेवू शकलो होतो. त्या वेळी चार विषयांपैकी फक्त राजशास्त्र हा एकच विषय विद्यापीठात ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स’ या एका केंद्रावर शिकवला जाई; इंग्रजी किंवा तत्त्वज्ञान या विषयांसाठी निरनिराळ्या कॉलेजांत चकरा माराव्या लागत.
त्या दिवसांत विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात पारंपरिक अभ्यासक्रम शिकवला जाई. विभागप्रमुख आलू दस्तूर आणि त्यांच्या सहकारी उषा मेहता या दोघीही गांधीवादी; परंतु अभ्यासक्रमात गांधीविचारांना तेव्हा स्थान प्राप्त झाले नव्हते. ग्रीक तत्वज्ञान हा राज्यशास्त्राचा पाया होता. तो माझा पक्का झाला होता. वर्गातला माझा सोबती श्रीनिवासन हा जात्याच अत्यंत हुशार, चतुरस्त्र वाचन करणारा आणि कष्टाळू होता. त्याच्या संगतीत मीही खूप अभ्यास केला.
का कोणास ठाऊक प्रत्येक गोष्ट लोकशाहीच्या चष्म्यातून पाहायची मला सवय लागली. एमएला मला बर्यापैकी मार्क मिळाले. त्याच वेळी मी लैलात गुंतत होतो. सारे लक्ष अभ्यासात नसले, तरी आम्ही दोघांनी ५९ टक्के मार्क मिळवले. लैलाचा पहिला वर्ग थोडक्यात चुकला. एमएला पहिल्या वर्गासाठी ६६ टक्के लागत, ते फक्त श्रीनिवासन मिळवू शकला. तो पुढे मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र विभागप्रमुख झाला.
एमएच लैलाशी लग्न केल्याने व्यवसायात गुंतून घेणे आवश्यक होते. तरीही कधीतरी कॉलेजमध्ये अध्यापन करता यावे म्हणून पीएच.डी. करण्याचा मोह होताच. मी विषय निवडला तो मुंबईचे प्रशासन; म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास नव्हे, तर मुंबईकर नागरिक आपले प्रश्न सोडवण्यात किती सहभाग घेतात आणि तो कसा, याचा मला लोकशाहीच्या संदर्भात खोलात जाऊन शोध घ्यायचा होता. उदाहरणार्थ, मुंबईचा पाणीपुरवठा कसा व्हावा, ते कोण ठरवतो? मुंबईचे नगरसेवक, राज्य शासन, केंद्रीय मंत्रिमंडळ की वर्ल्ड बँक. त्याचप्रमाणे मुंबईच्या इतर नागरी प्रश्नांविषयी. परंतु प्रा. आलू दस्तूर यांनी मार्गदर्शन करायचे मान्य करूनही मी काही प्रगती करू शकलो नाही. व्यवसायातील कामाचा रेटा आणि संसारातील पदार्पण यामुळे सवड मिळणे कठीण झाले. शिवाय मी कायद्याची दुसरी परीक्षा देत होतो. त्यामुळे प्रबंधासाठीचा अभ्यास तसाच राहिला. ‘लोकांचा सहभाग’ हा माझ्या विचारांचा केंद्रबिंदू हा गांधीप्रेरणेचा परिणाम असावा.
कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झालो. कायद्याचा मुख्य गाभा मला बर्यापैकी समजला होता, परंतु प्रत्यक्ष कोर्टात काम करताना लागणारे प्रोसिज्यूरल कायदे परीक्षेला नव्हते. प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी बार कौन्सिलची परीक्षा देऊन सिव्हिल आणि क्रिमिनल कोड शिकता आले असते, परंतु वकिली करायची तर प्रकाशनव्यवसाय सोडावा लागेल, अशी माझी समजूत होती. तोवर मी प्रकाशनकार्यात गुंतलो होतो. मोठ्या भावाने आग्रहपूर्वक ‘व्यवसायात ये’ असे सांगितल्यावर ‘मी येईन पण मुख्यतः प्रकाशक म्हणूनच’ असा आग्रह धरला. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकून येऊन अध्यापनाच्या क्षेत्रात काम करण्याचा माझा मानस होता, तो बारगळला. प्रकाशक म्हणून काही प्रबोधनाचे काम करावे, असे मी ठरवले.
पॉप्युलर बुक डेपो हा सर्व प्रकारची पुस्तके विक्रीला ठेवत असे; कोणत्याही ग्राहकाला विन्मुख पाठवायचे नाही, हे धोरण होते. परंतु दुकानात प्रकाशनाच्या कामासाठी काही विशेष व्यवस्था नव्हती. मी कामाला सुरुवात केली, तेव्हा पुस्तकप्रकाशन हा आमच्या व्यवसायाचा छोटासा भाग समजला जात असे आणि सर्व साठ-सत्तर कर्मचार्यांचा हातभार लागत असला, तरी प्रकाशन व्यवसायाची जाण असलेले कोणी नव्हते.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
पहिली दोन वर्षे मी हळूहळू इंग्रजी पुस्तकांचे काम पाहू लागलो आणि अनेक इंग्रजीतून लिहिणार्या लेखकांशी संपर्क येऊ लागला. प्रकाशनसंस्था कशी उभी करता येईल याच्या विचारात मी गढून गेलो. प्रशिक्षणावर अढळ विश्वास असल्याने मला प्रकाशन विषयाचे प्रशिक्षण घ्यायला हवे असे वाटायचे. दादाचा परदेशी प्रकाशनविश्वाशी दाट संबंध होता. आज खरे वाटणार नाही, परंतु त्या वेळी आपल्या देशातच नव्हे, तर इंग्लंड-अमेरिकेतही पुस्तकप्रकाशन हा विषय कोणत्याही विद्यापीठात शिकवला जात नसे. दादा दोनदा इंग्लंड-युरोपमध्ये आणि एकदा अमेरिकेत हिंडून आला होता. युनेस्कोच्या वतीने त्याने याविषयी काही ठिकाणी शिबिरेही घेतली होती. त्याने इंग्लंडमधील प्रकाशकांच्या संस्थेकडे विचारणा केली आणि त्या संस्थेचे अध्यक्ष जॉन अॅटनबरो यांनी त्यांच्या छोट्याशा प्रकाशनसंस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून माझ्या तीन महिन्यांच्या नोकरीची व्यवस्था केली. ऑगस्टअखेर मी लैलासह बोटीने इंग्लंडला गेलो.
१ सप्टेंबर ते १५ डिसेंबर असे तीन महिने मी ‘दी इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस’ या संस्थेत काम केले. दोन आठवडे फ्रँकफुर्ट येथील आंतरराष्ट्रीय ग्रंथजत्रा पाहून येण्याची व्यवस्था दादाने केली होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की, सारे जग भारत म्हणजे गांधींचा देश असाच ओळखत होते.
प्रकाशनव्यवसायाला आपल्या देशात जे वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्वरूप आले आहे, त्याऐवजी संस्थेचे रूप कसे देता येईल, हे इंग्लंडच्या नोकरीत लक्षात येत होते. मुंबईला परत येईपर्यंत वडिलांनी मी करू पाहणार्या प्रकाशन-व्यवसायासाठी ताडदेवला प्रशस्त जागा घेऊन ठेवली होती. तोपर्यंत पुस्तक-प्रकाशन, वितरण ही दोन्ही पॉप्युलर बुक डेपोतूनच चालायची. ताडदेवला गेल्यावर पॉप्युलर प्रकाशन हे पुस्तकप्रकाशनासाठी आणि भटकळ बुक्स इंटरनॅशनल ही नवीन संस्था पुस्तक वितरणासाठी सुरू करण्यात आली. या दोन्ही संस्थांची जबाबदारी मला घ्यायची होती.
अशा रीतीने १९५२मध्ये जरी मी कामाला सुरुवात केली असली, तरी आता दहा वर्षांनी मी सर्वार्थाने जबाबदार प्रकाशक झालो. त्यानंतरच्या तीन वर्षांत हळूहळू माझ्या कामाला संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न मी केला. मराठीसोबत इंग्रजी भाषेतील पुस्तकांचीही निवड करू लागलो. पॉप्युलर त्या वेळी वैद्यकीय आणि सामाजिकशास्त्रे या दोन क्षेत्रांत अग्रेसर होता. १९२५ ते १९६१ या ३५ वर्षांच्या काळात ज्योतिषशास्त्र ते प्राणीशास्त्र अशा अनेक विषयांत पॉप्युलरने पुस्तके प्रकाशित केली होती. काही प्रमाणात या यादीला काटेकोरपणे काही निश्चित स्वरूप देणे आवश्यक होते. मानवविज्ञानशास्त्रे (ह्युमॅनिटीज) आणि सामाजिक शास्त्रे (सोशल सायन्सेस) ही दोन क्षेत्रे माझ्या परिचयाची होती. तेव्हा या दोन विषयांवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. अर्थात वैद्यकीय पुस्तकप्रकाशनात अग्रस्थान टिकून ठेवण्याचे होतेच.
१९६५ साली अमेरिकेत वॉशिंग्टन येथे ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ पब्लिशर्स’ भरणार होती. त्यासाठी अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने काही भारतीय प्रकाशकांना चार महिन्यांची प्रवासवृत्ती देऊ केली होती. मुंबईतून पॉप्युलरच्या वतीने माझी निवड झाली.
अमेरिकेत मला फारसे काम नव्हते, तेव्हा त्या विस्तृत देशात विखुरलेल्या मित्रांना भेटणे, भारतीय प्रश्नांवर काम करणार्या अभ्यासकांशी संपर्क प्रस्थापित करणे, ख्यातनाम विद्यापीठांना भेट देणे, हे मी उद्दिष्ट ठरवले. आम्हाला अमेरिकेत कुठेही जाण्याची मुभा होती. माझ्या प्रवासाची आणि गाठीभेटींची पूर्वतयारी ‘कौन्सिल फॉर लीडर्स अँड स्पेशलिस्ट’ ही संस्था करत होती. अनेक विद्यापीठांना भेटी दिल्यावर माझ्या लक्षात आले की, विसाव्या शतकात भारतातली सर्व संशोधने महात्मा गांधींभोवती फिरत आहेत. त्यातून माझ्याही गांधीविषयक विचारांना चालना मिळाली.
रात्री हॉटेलमध्ये परतलो की, टेलिव्हिजन पाहणे हा एकच उद्योग असायचा. त्यावरही इतिहासावर आणि गांधींवर कार्यक्रम असायचे. इंग्लंडच्या मानाने अमेरिकेतील सर्वसामान्य लोकांना भारताबद्दल कमी माहिती होती. अनेक विद्यापीठांत भारतीय पुस्तकांचा विशेष विभाग असायचा. प्राध्यापकांना त्यांचे संशोधन प्रसिद्ध व्हावे, यासंबंधी विशेष दडपण असायचे. ‘पब्लिश ऑर पेरिश’ हे त्यांचे ब्रीदवाक्य. साहजिकच त्यांना आपली पुस्तके भारतात वाचली जावीत, अशी इच्छा असायची. त्यामुळे या दौर्यात अनेक महत्त्वाची भारताविषयीची पुस्तके पॉप्युलरकडे प्रकाशनासाठी आली. विसाव्या शतकातील इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र यात गांधी केंद्रस्थानी होते. शिवाय गांधीविचारांवर स्वतंत्रपणे कामही करणारे संशोधक होते. यांत काही भारतीय असायचे, तर बहुतेक अमेरिकन.
अनेक वेळा स्वतःचा आणि स्वतःच्या मातृभूमीचा शोध हा परदेशी गेल्यावर लागतो, हा अनुभव या दोन परदेश दौर्यांत आला. याचा परिणाम असा झाला की, पॉप्युलरच्या इंग्रजी प्रकाशनामध्ये गांधींचा शिरकाव होत गेला. हळूहळू गांधींशी संबंधित दोनशेहून अधिक पुस्तके पॉप्युलरने प्रसिद्ध केली.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
५.
मे १९६४मध्ये जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झाला. गांधीविचारांशी असलेला एक महत्त्वाचा दुवा निखळला. वास्तविक नोव्हेंबरमध्ये जवाहरलालजींना ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने दोन पुस्तकांचे प्रकाशन करून ती जवाहरलालजींना त्यांच्या वाढदिवशी भेट देण्याची योजना आखली होती. त्यातील ‘जवाहरलाल नेहरू : ए कमेमोरेशन व्हॉल्यूम’च्या प्रकाशनासाठी पॉप्युलरची निवड झाली होती. मुद्रणाला सुरुवात झाली आणि अचानक उत्सवमूर्तीच आपल्यातून निघून गेले. पण समितीने ठरवले की, १४ नोव्हेंबरला दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करायचे; फक्त आमच्या पुस्तकाचे नाव बदलून ‘जवाहरलाल नेहरू : ए मेमोरियल अल्बम’ असे करण्यात आले. या पुस्तकाच्या निर्मितिप्रक्रियेत आम्ही बरेच काही शिकलो. या पुस्तकामुळे पॉप्युलरचे नाव देशात सर्वत्र पोहोचण्यात मदत झाली.
नेहरूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. शास्त्रीजी हा एक अगदी साधा माणूस होता. गांधींचे शुद्ध विचार आणि नेहरूंचे प्रशासन-कौशल्य यांचे मिश्रण त्यांच्यात होते. आम्ही कर्तव्यभावनेने शास्त्रीजींवर पुस्तक लिहून घ्यायचे ठरवले. त्या वेळचे ‘इंडियन एक्सप्रेस’चे संपादक डी.आर. मंकेकर हे आमच्या नात्याचे होते. पुस्तक लिहायला कोणाला सांगावे याचा सल्ला घेण्यासाठी मी त्यांना भेटलो. त्यांचा आणि शास्त्रीजींचा चांगला परिचय होता, तेव्हा ते स्वतःच पुस्तक लिहायला तयार झाले. अशी ही दोन्ही महत्त्वाची पुस्तके १९६४ साली प्रसिद्ध झाली आणि पॉप्युलरला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. नेहरू आणि शास्त्री हे दोघेही चरित्रनायक गांधींचे वारस!
जानेवारी १९६८मध्ये शास्त्रीजींचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्या नेहरूंच्या कन्या असूनही त्यांच्याबद्दल फारसे काही उपलब्ध नव्हते. त्या वेळी ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सहकार्याने ‘इंदिरा गांधी : रिटर्न ऑफ द रेड रोझ’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. या कामात जनजागृतीचा प्रयत्न होता. या चरित्राच्या निरनिराळ्या भाषांत आणि इंग्रजीत पेपरबॅक अशा एकूण आठ आवृत्या प्रसिद्ध झाल्या.
मराठीत जी पुस्तके किंवा लेखक दीर्घकाळ वाचले जातील, अशांचीच पुस्तके आम्ही प्रकाशित करत असू. इंग्रजीत मात्र मी लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक अशी पुस्तके लिहून घेऊन प्रसिद्ध करू लागलो. पंतप्रधानांप्रमाणे राष्ट्राध्यक्षांविषयीसुद्धा प्रजेला माहिती असावी म्हणून मी राधाकृष्णन यांचे चरित्र ‘दी इलस्ट्रेटेड वीकली’चे संपादक ए.एस. रामन यांना लिहायला सांगितले. त्यांना ते जमले नाही, परंतु त्यानंतर ए.जी. नुरानी यांनी डॉ. झाकीर हुसेन आणि जी.एस. भार्गव यांनी व्ही.व्ही. गिरी यांचे चरित्र पॉप्युलरसाठी लिहिले. हे दोघेही चरित्रनायक गांधींच्या चळवळीशी जोडलेले होते.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
१९६७च्या सार्वत्रिक निवडणुका या नेहरूंच्या मृत्यूनंतरच्या पहिल्या निवडणुका होत्या. त्यात नेहरूंच्या व्यक्तित्वापेक्षा देशापुढील समस्यांचा विचार मतदार करतील, अशी माझी भाबडी समजूत होती. तेव्हा अखिल भारतीय पातळीवर सात पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता होती. मी विचारवंतांच्या समितीच्या मदतीने सामान्य मतदाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या समस्यांवर आधारित प्रश्नावली तयार केली. त्या आधारे स.गो. बर्वे (काँग्रेस), मिनू मसानी (स्वतंत्र पक्षा), बलराज मधोक (जनसंघ), नानासाहेब गोरे (प्रजा समाजवादी पक्ष), मधू लिमये (संयुक्त समाजवादी पक्ष), श्रीनिवास सरदेसाई (कम्युनिस्ट पक्ष) यांच्याकडून आपापल्या पक्षांची भूमिका लिहून घेतली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यापलीकडे काही सांगण्यास नकार दिल्याने त्यांचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला. या सात पुस्तिका न्यूजप्रिंट कागदावर रोटरी मशीनवर छापून प्रत्येकी एक रुपयाला वितरित करण्याचा प्रयत्न केला. यात व्यवहारापेक्षा नागरिक म्हणून कर्तव्याची भावना अधिक होती. व्यावहारिक पातळीवर नुकसान झाले, परंतु आपल्यावरील राजकीय संस्काराचा काहीतरी उपयोग होत आहे याचे समाधान होते.
६.
वैयक्तिक पातळीवर माझ्यातील संशोधक वळवळत असे. १९६८ साली अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार होती. त्यापूर्वीच्या १९५६ ते १९६० सालच्या निवडणुकींबद्दलची थिओडोर व्हाईट यांची ‘मेकिंग ऑफ द प्रेसिडेंट’ ही दोन्ही पुस्तके मी वाचली होती. त्यांत फक्त निवडणुकांचे तपशील नसून देशापुढील अनेक तत्कालीन प्रश्नांचा ऊहापोह केलेला होता. १९६८ साली प्रत्यक्ष अमेरिकेला जाऊन या निवडणुकीचा अभ्यास करावा, असे मनाने घेतले. त्या सुमारास डॉ. बी.जी. गोखले हे आमचे लेखक अमेरिकेहून आले होते. ते उपाध्यक्ष हयूबर्ट ह्ंफ्री यांच्या निवडणूक समितीत होते. त्यांनी उत्तेजन दिले. त्या सुमारस भारतीय प्रकाशकांच्या वतीने रशियात जाण्याची संधी मला मिळाली. प्रत्यक्ष सोविएत रशियाला आमच्या व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्व नव्हते, तरी शासनाच्या वतीने आग्रह झाल्याने मी रशिया, नंतर युरोप आणि मग अमेरिका असा दौरा ठरवला.
अमेरिकेतला या निवडणुकीचा अनुभव अपेक्षेपेक्षा फार वेगळा निघाला. या निवडणुकीत फक्त राष्ट्राध्यक्ष निवडला जातो असे नाही, तर त्या देशात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या गॅलप पोल, लीग ऑफ वुमेन वोटर्स अशा संस्था त्या निवडणूक प्रक्रियेत निवडून आलेल्या अध्यक्षाकडून लोकांच्या अपेक्षा कोणत्या हे सांगतात, असे माझे गृहीत होते. परंतु डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार हंफ्री यांना उपाध्यक्ष असूनही निधी उभा करता न आल्याने त्यांना बराच काळ प्रचार करता आला नाही आणि निक्सन यांनी प्रचार केला तो फार वेगळ्या पद्धतीने. त्यांनी सर्वत्र फक्त एकच भाषण पोपटपंचीसारखे दिले.
त्या वर्षी एक पुस्तक निघाले, त्याचे नाव होते ‘सेंलिंग ऑफ द प्रेसिडेंट’. या विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी मी मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रमुख प्रा.रमेश बाबू यांना भेटलो होतो, परंतु अमेरिकेतील या निराशाजनक अनुभवानंतर मी तो विषय सोडून दिला.
एकदा सावरकरांचे अभ्यासक प्राध्यापक स.ह. देशपांडे भेटले. त्यांची इच्छा होती की, समान नागरी कायदा देशात यावा आणि त्याला मुसलमान समाजाने मान्यता द्यावी. त्या बदल्यात हिंदूंनी अयोध्येला राममंदिर बांधण्याचा आग्रह सोडून द्यावा. त्यातील राजकारण तर मला मान्य नव्हतेच, शिवाय समान नागरी कायदा या विषयावर मी अधिक खोलात जाऊन विचार करत होतो. यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी इतिहास, समाजशास्त्र, राजकीय घडामोडी, नैतिकता अशा निरनिराळ्या दृष्टीकोनांतून यासंबंधी अधिक विचार करणे आवश्यक होते, अशी माझी भूमिका होती, अजूनही आहे. सर्वधर्मसमभाव म्हणजे सर्वांसाठी एकच कडा नव्हे, तर प्रत्येक धर्म स्वतंत्र आहे, हे स्वीकारणे या विषयावर मी लेख लिहिला, परंतु संशोधन करणे वेळखाऊ होते.
तसाच दुसरा एक विचार केला होता. त्याचे स्वरूप समाजातील जातींच्या उतरंडीचे नवे रूप हे होते. भारतीय, विशेषतः हिंदू समाजव्यवस्थेत ब्राह्मण हे सर्वोच्च मानले जातात. माझा अनुभव असा बनत चालला होता की, अनिवासी भारतीय ही एक सर्वोच्च जात मानली जात आहे - सुपर कास्ट, फक्त सुपरक्लास नव्हे. हे सिद्ध करण्यासाठी बर्याच जणांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या असत्या, संख्याशास्त्राला मान्य अशा कसोट्या ठरवाव्या लागल्या असत्या. हे सारे करायला व्यवसायातील व्याप सांभाळून वेळ काढणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रबंधचे काम हातात घेता आले नाही. एका दृष्टीने हे सगळे विचार तसेच राहिले हे बरे झाले.
७.
गांधी गेले त्यानंतर पन्नास वर्षे उलटून गेली तरी गांधींचे प्रशंसक आणि विरोधक त्यांना विसरू शकत नव्हते. एका बाजूने विनोबा आणि देशभर पसरलेले सर्वोदयी कार्यकर्ते ‘भूदान’सारख्या चळवळीत गुंतले होते. ‘सब भूमी गोपाल की’, ‘जय जगत’, ‘अंत्योदय’ या विचारांचे आकर्षण होते. गांधींचा विधायक कार्यक्रम अजून विसरला गेला नव्हता. अनेक वयस्कर नेते बसल्या बसल्या सूत कातत आणि खादीचा प्रचार करत. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह हा तोडगा १९१७पासून सुचवला होता. प्रत्यक्षात माझ्याभोवती जी आंतरजातीय विवाहाची उदाहरणे होती, ती गांधींच्या प्रभावामुळेच होती. आमच्या छोट्याशा व्यवसायातदेखील जात, धर्म यांचा शिरकाव आम्ही पॉप्युलरमध्ये होऊ दिला नव्हता. ‘सर्वधर्मसमभाव’ आमच्यात बर्यापैकी मुरला होता.
काँग्रेस पक्षाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आम्ही प्रा. राम जोशी यांच्याकडून काँग्रेसचा इतिहास लिहून घेतला. त्याच्या प्रस्तावनेत जोशी यांनी भटकळ कुटुंबाच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामाचा उल्लेख केला. मला काहीसे आश्चर्य वाटले, कारण माझे वडील ‘वर्क इज वरशिप’ मानणारे होते. मग त्यांच्या गांधी-आचारांची उदाहरणे मला आठवू लागली. ते खादी वापरत व घरी ‘बॉम्बे क्रॉनिकल’ हे वृत्तपत्र येई. साबण हमाम - नट्यांनी लोकप्रिय केलेला ‘लक्स’ आम्ही कधी पाहिला नाही. टूथपेस्टसुद्धा डॉ. हमीद यांच्या गांधीप्रणीत कंपनीने तयार केलेली ‘कोप्रान’. वडिलांचा देवावर विश्वास होता, पण ते कर्मकांड टाळत. स्वदेशी आणि साधेपणा वडिलांत मुरलेला होता.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : तो जुगल चंद्र यांच्या आयुष्यातला एक ‘निर्णायक क्षण’ ठरला… ते महात्मा गांधींचे ‘अनुयायी’ झाले!
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
गांधीबाबा अनेक शतकांतून एकदाच भेटतो. गांधी अभ्यासक विनसेंट शीन यांनी सुचवल्याप्रमाणे काही अनाकलनीय ‘मिसटीक’ शक्यता स्वीकारल्याशिवाय गांधी समजून घेता येत नाही. नेहरूदेखील गांधींचा ‘एक कोडे’ असा उल्लेख करायचे. काही तर गांधींची गणना येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध अशा धर्मसंस्थापक विभूतींत करत, गांधींची एकाच धर्मावर नव्हे, तर सर्वधर्मसमभावावर निष्ठा होती हे विसरून.
तरी १९७४मध्ये निदान गांधींची झलक दिसू लागली. निमित्त झाले इंदिरा गांधी. १९६८ साली लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी आपल्या हातातील बाहुली ठरेल अशा समजुतीने इंदिरा गांधी यांची पंतप्रधान म्हणून निवड केली. त्या महत्त्वाकांक्षी होत्या आणि त्यांनी कामराज नाडर- संजीव रेड्डी- स.का. पाटील यांच्या ‘सिंडिकेट’ला बाजूला सारून स्वत:चा जम बसवला. १९६७ सालच्या निवडणुकीत कमी जागा मिळूनही त्या लोकसभेत विरोधी पक्षांतील मतभेदांचा फायदा उठवू शकल्या.
त्यानंतर ‘गरिबी हटाओ’ या घोषणेवर भाळून मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे कदाचित त्या उद्दामपणे निर्णय घेऊ लागल्या. अशा परिस्थितीत बिहार आणि गुजरात येथील विद्यार्थ्यांनी उचल खाल्ली. त्यांच्या आग्रहाखातर राजकारणातून निवृत्त झालेले सर्वोदयी जयप्रकाश नारायण या चळवळीचे नेतृत्व करू लागले. एके काळी जवाहरलाल नेहरू यांच्यासारखी लोकप्रियता लाभलेले, गांधींनी जयप्रकाशजींच्या पत्नी प्रभावती या शिष्येला दिलेली ब्रह्मचर्याची दीक्षा उमदेपणाने स्वीकारणारे आणि विनोबांच्या भूदान मोहिमेत निरपेक्ष सामील होणारे यांच्या नि:स्वार्थ हेतूंविषयी कोणालाही शंका नसायची. त्यांच्या समग्र लेखनाचा प्रकाशक होण्याची संधी मला मिळाली. त्यांच्यामार्फत गांधीविचारांचा प्रभाव माझ्या पिढीवर काही प्रमाणात दिसतो.
यानंतर मला जगात सर्वत्र गांधी दिसू लागले. बाबा आमटे यांच्याशी परिचय झाला. मेधा पाटकर फक्त धरणग्रस्तांसाठी काम करणारी नसून तिच्यावर गांधीवादाचे दाट संस्कार आहेत, हे लक्षात येऊ लागले. किंबहुना पर्यायी विकास या संबंधी त्यांनी आपली भूमिका मांडावी म्हणजे गांधीवाद अधिक स्पष्ट होईल, असे मला वाटत असे. ती नर्मदा बचावचे काम करणारी असल्यामुळे तिचे धरणग्रस्तांसाठी काम करणारे सोबती हे ‘छोटे गांधी’च आहेत, हे लक्षात येऊ लागले.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
दुसर्या बाजूने देशात काहीही बिघडले तर ते गांधींमुळे, असे म्हणणार्यांची संख्या वाढत होती. स्वतःवरील दोष दुसर्यावर ढकलण्यात तर गांधी सर्वांना सोयीस्कर होते – जणू ‘सॉफ्ट पंचिंग बॅग’च. गांधी-पर्वाचा विचार सुरू करण्यापूर्वी ज्या गोष्टी मी गृहीत धरल्या होत्या, त्यांना छेद देणार्या शंका कानावर पडत होत्या. माझी समजूत की, अस्पृश्यता निवारणासाठी गांधींनी बरेच काम केले; तरी आंबेडकर त्यांना शत्रू मानत. आंबेडकर ‘हरिजन’ शब्दालाही विरोध करत आणि त्यांचे दलित अनुयायी अनेक दशकांनंतरही स्वतंत्र मतदारसंघ मान्य न केल्याने गांधींवर राग काढत. घटनेत आंबेडकरांनीदेखील संयुक्त मतदारसंघ ठेवले आहेत, याचा त्यांना विसर पडतो. गांधींनी स्त्रियांना पुरुषांबरोबरचे स्थान दिले म्हणावे, तर उलट ‘महिला दक्षता समिती’चे काम करणार्या ‘मानुषी’सारख्या पत्रिकेत गांधींविरुद्ध त्वेषाने लिहिले जाऊ लागले. गांधींना आम्ही बालपणापासून संतपुरुष किंवा अवतार मानत आलो, तर हिंदुत्ववादी संघपरिवार गांधींना कट्टर शत्रू मानू लागला.
बाबा आमटे यांच्या कामाचा जसजसा परिचय होत गेला, तशी त्यांच्या आनंदवनात जायची ओढ निर्माण झाली. कॅनडाच्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे प्रा.जगन्नाथ वाणी हे व्यवसायाने गणिती, परंतु त्यांनी कॅनडाच्या धोरणांचा महाराष्ट्रातील संस्थांना आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी चंग बांधला. जर फाऊंडेशनने शंभर डॉलर गोळा केले, तर तेथील राज्य सरकार तेवढीच भर घालत असे आणि कॅनडाचे शासन त्या रकमेइतकेच अनुदान देत असे. म्हणजे फाऊंडेशनने देणगीदाखल जमवलेल्या रकमेची चौपट अनुदानासाठी उपलब्ध होत असे. दरवर्षी भारतात येऊन योग्य अशा संस्थांचा ते शोध घेत आणि त्यांना योग्य अशा शब्दांत अर्ज करायला मदत करत.
माझा या विषयातील रस लक्षात घेऊन एकदा त्यांनी मुद्दाम वर्ध्यातील सेवाग्राम व पवनार आश्रम, वरोरातील आनंदवन, विदर्भातील महारोगी सेवा समितीची केंद्रे, हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि गडचिरोली जवळ शोधग्राममधील सर्च यांचा दौरा ठरवला. या एका आठवड्याच्या गांधी-यात्रेने इतक्या दशकांनंतरही गांधीविचारांचे लोक कसे काम करताहेत हे जाणवले. वर्ध्याच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ गांधीयन स्टडीज’ आणि अनेक विद्यालयांतील गांधी अभ्यास केंद्रांना भेट देण्याची संधी लाभली.
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
हेहीपाहावाचा : ‘हिंद स्वराज’ची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही - रामदास भटकळ
_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
८.
चाळीसएक वर्षे प्रकाशनाचे काम केल्यावर हळूहळू निवृत्त होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा मी विचार केला की, या उलटसुलट परिस्थितीचा छडा लावला पाहिजे. प्रकाशन ही माझीच संस्था असल्याने औपचारिक निवृत्त होण्याचा प्रश्न नव्हता, परंतु निर्णयप्रक्रियेतून अंग काढून घेत मी वाचन आणि संशोधन या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. गांधींवर इतके लेखन झाले आहे की, प्रबंधासाठी कोणता पैलू घ्यावा हा प्रश्न होता. माझ्या अर्धवट वाचनातून एक गोष्ट लक्षात आली - सगळे गांधीविचार कोणा एकाला पटणे कठीण होते. गांधीच स्वातंत्र्यलढा पुढे चालवणार अशी खात्री वाटणार्या टिळकमहाराजांपासून तो आपले राजकीय वारस असे ज्यांना गांधींनी जाहीर केले अशा जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत प्रत्येकाचे गांधीशी तीव्र मतभेद होते. गांधी काही प्रमाणात प्रा. गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरू मानत असत, पण त्यांना ‘हिंद स्वराज’मधले गांधींचे विचार मान्य नव्हते. जवाहरलाल नेहरू यांना तर ‘हिंद स्वराज’ वाचनातदेखील रस नव्हता. सुभाषचंद्र बोस हे गांधी दाम्पत्याला मुलांसारखे प्रिय, पण ते काँग्रेसचे अध्यक्ष निवडून आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. एकूण गांधींचे विरोधक अनेक होते. गांधींच्या प्रशंसकांनी बरेच काही लिहिले होते, तेव्हा मी ‘गांधी आणि त्यांचे विरोधक’ यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले.
गावदेवीच्या मणिभवन गांधी संग्रहालयाला गांधी विषयावर अभ्यासकांना मार्गदर्शन करण्याची परवानगी होती. डॉ. उषा मेहता या एम.ए.ला आम्हाला शिकवत होत्या. त्या मणिभवनच्या संचालिका होत्या. त्यांना मी बिचकत प्रबंधासंबंधी विचारले. साठी उलटून गेलेल्या मला नोकरीच्या दृष्टीने डॉक्टरेटची आवश्यकता नव्हती. तेव्हा विद्यार्थी म्हणून त्या मला स्वीकारतील की नाही, हा प्रश्न होता. मला रस होता गांधींबद्दल साधकबाधक वाचन करण्यात आणि तेही मार्गदर्शनाखाली.
त्यांनी आठवड्याची मुदत मागून घेतली आणि विद्यापीठाचे नियम तपासून मला आपणहून फोन करून बोलावून घेतले. १९९८च्या सुमारास मी मणिभवनमध्ये फी भरून सत्तराव्या वर्षी परत विद्यार्थी झालो. माझा विद्यापीठात नोंद केलेला विषय होता- ‘गांधी अँड हिज अॅडव्हर्सरीज’; यात बदल करायला परवानगी नव्हती, याची मला तेव्हा कल्पना नव्हती.
उषाताई तशा वयस्क असल्या तरी अनेक कामांत गुंतलेल्या असायच्या. त्यामुळे त्यांच्याकडून फार मार्गदर्शन मिळणे कठीण होते. नाहीतरी मला अवांतर वाचन केल्याशिवाय या विषयाचा आवाका ध्यानात आला नसता; तरी उषाताईंनी केलेली एक सूचना फार उपयुक्त ठरली. गांधींच्या सर्वच विरोधकांविषयी मी प्रबंधात लिहू पाहिले असते, तर प्रत्येकाच्या बाबतीतला महत्त्वाचा मुद्दाच तेवढा सांगता आला असता, परंतु त्याची चर्चा करता आली नसती. उदाहरणार्थ टिळकांचा ‘साधनानाम अनेकता’वर विश्वास होता, तर गांधीविचार ‘साधनशुचिते’वर. गोखले ब्रिटिश शासनाशी संबंध राखून वैधानिक सुधारणांवर भर देत होते, तर गांधींनी न पटणार्या कायद्याशी असहकार हे नवीन अस्त्र शोधून काढले होते.
तेव्हा मेहता यांच्या सूचनेवरून मी विरोधकांपैकी विनायक दामोदर सावरकर आणि भीमराव रामजी आंबेडकर यांच्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. सावरकरांचे ब्रीदवाक्य ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले’ आणि नंतरच्या काळातली ‘हिंदुस्थान हिंदुओका, नहीं किसी के बाप का’ ही घोषणा गांधींच्या अहिंसा आणि सर्वधर्मसमभाव या संकल्पनांशी विपरीत होती. आंबेडकरांच्या दृष्टीने अस्पृश्यतानिवारण करून दलितांना सन्मान मिळवून देणे, हे सर्वांत महत्त्वाचे होते. या दोघांचा विचार देशात प्रबळ होता. त्यामुळे या अभ्यासाला फक्त अभ्यासाच्या दृष्टीनेच नव्हे, तर देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनेही महत्त्व होते. शिवाय इतर कोणाही विरोधकांपेक्षा या दोघांविषयी बरेचसे साहित्य मराठी, हिंदी आणि इंग्रजी या मला समजणार्या भाषांत उपलब्ध होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
वास्तविक मोहम्मद अली जिना यांच्याबद्दल खोलात जायला हवे होते, परंतु बरेचसे साहित्य उर्दूत असणार आणि पाकिस्तानात प्रसिद्ध झालेले साहित्य आपल्याला दुर्मीळ होते. म्हणून मी सावरकर आणि आंबेडकर यांच्यावर संशोधन करायचे ठरवले. गांधीजींचे स्वतःचे जवळजवळ शंभर ग्रंथ, सावरकरांचे दहा, आंबेडकरांचे पंचवीस असे बरेच साहित्य वाचायचे होते.
हे ठरवताना दोन महत्त्वाची धोरणे मनात ठेवली. एक तर आधी सावरकर आणि आंबेडकर यांच्या विचारांचा कसून अभ्यास करायचा आणि त्यांचा गांधीविरोधी दृष्टीकोन नीट समजून घ्यायचा. हे दोघे शक्यतो काँग्रेसपासून दूर राहिले. त्यांनी अनेक वेळा गांधींवर कडाक्याचे टीकास्त्र सोडले. त्यांचे ते लेखन तटस्थपणे वाचायचे. दुसरा निर्णय असा की, प्रत्येक विषयावर सावरकर आणि आंबेडकर काय म्हणतात ते सांगितल्यावर ते कसे चूक आणि गांधीच कसे योग्य, असा आग्रह धरायचा नाही, हे स्वतःला बजावून मी वाचायला सुरुवात केली.
गंमत अशी की, आपण गांधींना ओळखतो असे गांधींचे प्रशंसक आणि विरोधक या दोघांनाही वाटते. पण गांधीविचार समजून घेणे कठीण आणि प्रत्यक्ष आचारात आणणे त्याहून कठीण. मलाही वाटायचे की, गांधींना मी ओळखतो. तेव्हा खरे आव्हान सावरकर-आंबेडकर यांना समजून घेण्यातच आहे. तेव्हा मी सुरुवात त्या दोघांचे लेखन आणि त्यांच्यावरील पुस्तके वाचून केली. लेखक-संशोधकांना भेटायचे, ते मुख्यतः दोघांचे प्रशंसक यांना. माझी एक मैत्रीण शरयू अनंतराम ही महिला विद्यापीठात समाजशास्त्र शिकवत असे. तिचा प्रबंध सावरकर आणि आंबेडकर यांच्या जातीविषयक विचारांवर होता. तिची मते माझ्या मतांशी जुळत नसली, तरी आमच्यात बर्यापैकी चर्चा होत असे.
या अभ्यासात मला काय सापडले हा वेगळाच विषय आहे. एक गंमत सांगावीशी वाटते - माझा मुलगा सत्यजित हा मार्क्सवादाने झपाटला होता. तो एकदा मला म्हणाला की, ‘बाबा, तू फारच गांधींचा पक्षपाती झाला आहेस.’ मी त्याला उत्तर दिले, ‘ही जर चूक असेल, तर ती मी मान्य करतो. आणि म्हणून गांधी आणि त्यांचे विरोधक या विषयाचा अभ्यास करायला घेतला आहे. अखेरीस मी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो ते पाहूया, पण या देशात जर कोणाच्या विचारांनी झपाटले जाण्याची आवश्यकता असेल, तर ती गांधींचेच असा मला विश्वास वाटतो.’
.................................................................................................................................................................
लेखक रामदास भटकळ पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक आहेत.
ramdasbhatkal@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment