प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांच्या ‘माफुआ’ आणि ‘सौत्रान्तिक मार्क्सवादा’चा त्यांच्या वारसदाराकडून विकास झाला नाही, तर शरद् पाटील हेच शेवटचे ‘माफुआवादी’ आणि ‘सौत्रान्तिक मार्क्सवादी’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही
दिवाळी २०२५ - लेख
श्रीनिवास हेमाडे
  • प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील
  • Wed , 15 October 2025
  • दिवाळी २०२५ लेख शरद् पाटील Sharad Patil

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील यांचे विविधांगी विचार विशद करत राहणे, तेच ते मुद्दे वेगवेगळ्या वाक्यरचना करून मांडणे, त्यांचा रतीब घालत राहणे, त्यांचे विविध विचार सांगणे, त्या विचारांना सामाजिक, राजकीय, आर्थिक सांस्कृतिक इत्यादी लेबले लावणे म्हणजे ‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ रचणे नव्हे, याची जाणीव अभ्यासक, चिंतक इत्यादींनी विकसित करणे नितांत अनिवार्य आहे. तत्त्वज्ञान निर्मिती ही केवळ तत्त्ववेत्त्यांची मक्तेदारी उरलेली नाही. ती अनेक ज्ञानक्षेत्रीय तज्ज्ञांनी आणि तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी मिळून बनली आहे. तत्त्वचिंतन हे ‘वैचारिक सहकारी सहयोगी क्षेत्र’ बनले आहे. म्हणून शरद् पाटील  यांचे तत्त्वज्ञान निर्मिती ही सहकारी वैचारिक चळवळ बनली, तर तिला काहीसे नेटके अकादामिक स्वरूप येऊ शकेल.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे १७ सप्टेंबर २०२४ ते १७ सप्टेंबर २०२५ हे जन्मशताब्दी वर्षे होते. त्यानिमित्ताने गेल्या वर्षभरात त्यांच्या विचारांना वाहिलेली चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा मुंबई, पुणे, नाशिक, वाई, संभाजीनगर, अलिबाग इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आल्या. त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांचा परिचय देणारी पुस्तके, निबंध स्पर्धा, निबंधवाचन इत्यादींचे आयोजनही करण्यात आले. ‘सत्यशोधक मार्क्सवादी साप्ताहिक’चे अंक वर्षभर नियमित प्रकाशित झाले.  

विसाव्या शतकात भारतीय विचारविश्वात, विशेषतः महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत आणि मराठी तत्त्वज्ञानात्मक वैचारिक साहित्याच्या विश्वात ज्यांची नावे मोठ्या आदराने घेतलीच पाहिजेत, अशा विचारवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रो. सुरेंद्र बारलिंगे, प्रा. दि. य. देशपांडे, प्रा. मे. पुं. रेगे, प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील (जन्म : १७ सप्टेंबर १९२५, मृत्यू : १२ एप्रिल २०१४) आणि डॉ. रावसाहेब कसबे यांचा समावेश होतो, यात शंका नाही. अन्यही साहित्यिक, वैचारिकलेखक,  कवी, समीक्षक, व्यावसायिक प्राध्यापक यांनी ही मांदियाळी संपृक्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील, प्रा. दि. य. देशपांडे आणि डॉ. रावसाहेब कसबे हे भारतीय वैचारिक व तत्त्वज्ञानात्मक परंपरेला आव्हान देणारे, त्या परंपरेस स्वतःविषयी पुनर्विचार करण्यास भाग पाडणारे ‘क्रांतिकारी विचारवंत’ म्हणून परिचित आहेत.

या निबंधात मी तीन मुद्दे मांडत आहे :

१) प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे तात्त्विक विचार अ‍ॅकॅडेमिक तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत मांडता येतील का, याची शक्यता तपासणे.

२) प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांना ‘दार्शनिक’ किंवा ‘तत्त्ववेत्ते’ म्हणता येईल का?

३) त्यांच्या तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व कोणाकडे जाते? त्यांचा ‘तात्त्विक जनता वर्ग’ कोणता?

‘प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ याकडे दोन दृष्टीकोनांतून पाहता येते. पहिला दृष्टीकोन सामाजिक व राजकीय स्वरूपाचा आहे आणि दुसरा तात्त्विक, अर्थात ‘तत्त्वज्ञान’ या विद्यापीठीय अध्ययन विषयाच्या स्वरूपाचा आहे. पहिल्या दृष्टीकोनातून विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, व्याख्याने, टीका लेख, संशोधनपर निबंध इत्यादी स्वरूपात त्यांच्याबद्दल भरपूर लेखन व चिंतन झाले आहे, असे म्हणता येईल. ते सारे त्यांचे तात्त्विकविचार स्पष्ट करतात. त्यांच्या लेखनावर इतिहास, ऐतिहासिक पद्धती, द्वंद्वात्मक तर्कपद्धती यांचा मोठा प्रभाव जाणवतो. तथापि मी तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे समग्र विचार ‘तत्त्वज्ञान’ या विषयाच्या अ‍ॅकॅडेमिक अर्थाने अभ्यासता येतील का, त्यांच्या विविध विचारांच्या विद्यापीठीय रचना करता येतील का, याकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो. 

शरद् पाटील यांचा प्रत्येक ग्रंथ, त्यांचा प्रत्येक लेख, त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार, त्यांच्याशी झालेल्या अनौपचारिक चर्चा-गप्पा गोष्टी, त्यांनी घेतलेली अभ्यास शिबिरे इत्यादीतून त्यांचे तत्त्वचिंतन, त्यांच्या तात्त्विक विचारांचा आशय त्यात प्रगट झाला आहेच, पण तो अ‍ॅकॅडेमिक तत्त्वज्ञानाच्या रचनेच्या दृष्टीकोनातून ‘पुरेसा’ नाही. विद्यापीठीय म्हणजे अ‍ॅकॅडेमिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास, चिंतन, संशोधन, आणि अभ्यासक्रमातील एक घटक या अर्थाने शरद् पाटील यांच्या ग्रंथातील अनेक विषयांची रचना करणे अनिवार्य आहे. 

कोणत्याही विचारवंतांच्या, तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास विद्यापीठीय शिस्तीत करावयाचा असल्यास त्या तत्त्वज्ञानाची रचना आणि मांडणी विद्यापीठीय चौकटीत करणे, त्या प्रकारचा आशय उपलब्ध असणे गरजेचे असते. म्हणूनच शरद् पाटील यांच्या तत्त्वज्ञानाची पुनर्रचना करणे आणि ते विद्यापीठीय अध्ययन-अध्यापन पद्धतीला अपेक्षित असणाऱ्या नव्या अधिकच्या आशय समृद्धीने संपृक्त करणे गरजेचे आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील यांचे वर्णन ‘महाराष्ट्रातीलच नव्हे, तर विख्यात जागतिक प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत शरद् पाटील’ असे केले जाते. या वर्णनातूनच त्यांच्या विचारांचा व्यापक पट अधोरेखित होतो. त्यांच्या अनेक ग्रंथांत व्यक्त झालेल्या विचारांचे आणि त्यात समावेश न झालेल्या अन्य अनेक संकलन-ग्रंथातील, साहित्यातील तात्त्विक विचारांचे तत्त्वज्ञानाच्या तांत्रिक परिभाषेत परिशीलन कसे करता येऊ शकेल, आणि ते तत्त्वज्ञान विद्यापीठीय व्यवस्थेत कसे आणता येईल याचे सूचन करणारा प्रस्ताव आराखडा प्रस्तुत लेखात मांडण्याचा प्रयत्न आहे.

प्राथमिक पातळीवर या प्रस्तावामागील काही हेतू सांगता येतील :

शरद् पाटील यांच्या तात्त्विक विचारांना विद्यामूलक (Academic) सैद्धान्तिक स्वरूप देणे. त्याद्वारे तत्त्वज्ञानाच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमात ‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’चा समावेश करण्याची सैद्धान्तिक तयारी करण्याची गरज अधोरेखित करणे. त्यानुसार महाराष्ट्रीय विद्यापीठांच्या ‘तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान अभ्यास मंडळा’च्या अपेक्षित चौकटीत व शिस्तीनुसार मसुदा बनवणे.

‘प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान : पुनर्रचनेच्या आणि नव्या आशयाच्या दिशेने’ या विस्ताराद्वारे रचना आणि आशय दोन्ही दृष्टीकोनातून एखादा नवा ग्रंथ किंवा अनेक विशेष ग्रंथ निर्माण करता येतील, असे सूचन करणे.

निर्माण होणारे ग्रंथ दोन प्रकारचे असू शकतील किंवा त्यांची रचना दोन प्रकारची असू शकेल. (अ) शरद् पाटील यांचे मूळ सिद्धान्त ग्रंथ आणि (ब) त्यावरील चिकित्सा, टीका, भाष्य ग्रंथ, संशोधन ग्रंथ व लेख.       

‘प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ शीर्षकानुसार विविध अभ्यासक्रम रचणे. जसे की प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधन प्रस्ताव इत्यादी.   

तत्त्वज्ञानाप्रमाणे सामाजिक विज्ञानांच्या व राजकीय विज्ञानांच्या, मानव्य व कला विषयांच्या, भाषा आणि ललित साहित्यविश्वाच्या; अनुषंगाने समग्र मराठी वैचारिक विश्वाच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमातही ‘प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ला अवकाश लाभू शकेल, अशी उपयोजित सैद्धान्तिक तयारी करण्याची गरज अधोरेखित करणे. अर्थात इतर विषयांच्या विद्यापीठीय अभ्यासक्रमास उपयोजित ठरतील असे काही प्रयत्न करणे, जसे की इतिहास, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी.     

तत्त्वज्ञानाचे औपचारिक विद्यापीठीय अभ्यासक्रम पुरे करू न शकलेल्या, शरद् पाटील  यांचा चाहता  वर्ग असलेल्या विद्यमान आणि नव्या भावी अभ्यासकांमध्ये, इतर विषयांच्या प्रेमींमध्येदेखील तात्त्विक परिभाषेत ‘शरद् पाटील विचार’ समजावून घेण्याचा विश्वास निर्माण करणे. 

विविध विद्यापीठांमध्ये शरद् पाटील तत्त्वज्ञान अध्ययन केंद्र’ स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू व्हावेत असे सूचित करणे.   

महाराष्ट्राप्रमाणेच बृहन्महाराष्ट्र भागात अन्यत्र कोठे मराठीत आणि इंग्लिशमध्ये तत्त्वज्ञानाचे अध्ययन व अध्यापन होत असल्यास तेथील अध्यापक व विद्यार्थी वर्गास या नव्या रचनेचा नक्कीच उपयोग होईल, फायदा होईल, असा विश्वास मला वाटतो. बृहन्महाराष्ट्र अमेरिका-युरोपात जास्त विस्तारल्याने तेथील शरद् पाटीलप्रेमी आणि तत्त्वज्ञान-प्रेमींना महाजालाद्वारे ‘शरद् पाटील विचार अध्ययन’ करणे शक्य होईल.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील यांच्या काही तात्त्विक विचारांची चिकित्सा करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ते गृहीत धरून आणि तत्त्वज्ञानाची पाश्चात्य-युरोपीय पद्धती अंगिकारून “शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ हि ज्ञानराशी निर्माण करता येऊ शकते. म्हणजेच (१) ज्ञान, (२) सत्ता (अस्तित्व), (३) तर्क, (४) नीति आणि (५) सौंदर्य या तत्त्वज्ञानाच्या पाच मूळ संकल्पनांचे उपयोजन करून, त्यांना अनुसरून शरद् पाटील यांचे ज्ञानशास्त्र, शरद् पाटील यांचे सत्ताशास्त्र/ शरद् पाटील  यांचे सद्वस्तुशास्त्र, शरद् पाटील  यांचे तर्कशास्त्र, शरद् पाटील यांचे नीतिशास्त्र, शरद् पाटील यांचे सौंदर्यशास्त्र, अशा पाच ज्ञानशाखा आपण निर्माण करू शकतो.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

पूर्वपीठिका

या प्रस्तुत प्रस्तावाला जर्मन तत्त्ववेत्ता इमान्युएल कांटच्या परिभाषेत केवळ ‘पूर्वपीठिका’ समजता येईल. तत्त्वज्ञानाबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आणि जिज्ञासा या अभिवृत्ती व्यक्त करण्यासाठी जे काही करावयाचे आहे, त्या साऱ्या प्रयत्नांना ‘तत्त्वज्ञानाची पूर्वपीठिका’ म्हणता येईल.

तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबाबत परिचय व पूर्वपीठिका या दोन संकल्पनांमध्ये फरक करणे उचित ठरते. ‘परिचय’ या संकल्पनेत अनंत विद्वज्जड, पंडिती गोष्टींची अपेक्षा असते. ज्यांना परिचय करून दिला जातो, त्या वाचकांना प्रेक्षकांना काहीएक पूर्वज्ञान आहे, असे गृहीत धरलेले असते. त्या गृहितावर आधारित प्रदीर्घ युक्तिवाद मांडणे आणि निष्कर्षाप्रत येणे, असे परिचय देताना घडते. ‘पूर्वपीठिका’ या संकल्पनेत अशा तांत्रिकदृष्ट्या किचकट गोष्टींची गरज नसते. पूर्वपीठिका ज्ञानासाठी उत्सुक असलेल्या सामान्यजनांसाठी असते. शब्दबंबाळ बोजडपणा टाळून सामान्य भाषेत ती मांडलेली असते. त्याच वेळी पुढील चर्चेची पूर्वतयारी म्हणून परिभाषेची, वादविवादाच्या उपकरणांची काही मूलभूत सिद्धान्तांची ओळख पूर्वपीठिकेत करून दिली जाते.

आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता इमॅन्युएल कांटने (१७२४-१८०४) आपले प्रगल्भ तत्त्वज्ञान ‘शुद्ध बुद्धीची मीमांसा’ (The Critique of Pure Reason) या ग्रंथात प्रामुख्याने मांडले, पण त्याला सुशिक्षित वर्गाकडून व तत्त्ववेत्त्यांकडूनही प्रतिसाद मिळेना. अखेर त्याने सर्वसामान्य वाचकांसाठी सोप्या रीतीने साध्या भाषेत ‘Prolegomena to any Future Metaphysics’ हा ग्रंथ लिहिला. कांटने वापरलेला ‘prolegomena’ हा शब्द मी त्याच अर्थाने वापरत आहे.

विसाव्या शतकातील प्रसिद्ध तत्त्ववेत्ते हान्स रायशेनबाख (Hans Reichenbach, १८९१- १९५३) या जर्मन विज्ञान तत्त्ववेत्त्याच्या भाषेत सांगावयाचे तर सहजबुद्धी जे शिकवते, त्यापेक्षा अधिक शिकण्याची इच्छा होण्याइतपत वाचकाकडे सहजबुद्धी असेल, तर या पूर्वपीठिका लेखातील प्रतिपादन समजण्यासाठी तेवढी तयारी पुरेशी आहे. वाचकांना तत्त्वज्ञान या विषयात रुची वाटावी, ती वाढावी, तसेच विद्यमान जग, त्यातील वास्तवाचे विविध स्तर, त्यातील समस्या आणि त्यांची गुंतागुंत यांचे विश्लेषण करण्यासाठी कोणती तत्त्वज्ञानात्मक आयुधे वापरता येतील, इतपत माहिती त्यांना असावी, हा उद्देश या लेखनामागे आहे. त्याचप्रमाणे जे वाचक अधिक काही करू इच्छित आहेत, ते प्राप्त करण्यासाठी त्यांना काय करावे लागेल, केवळ त्याचे दिग्दर्शन केलेले आहे.

 “.......चे तत्त्वज्ञान(Philosophy of….)

 तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे आणखी एक सूत्र किंवा तत्त्व म्हणजे “....चे तत्त्वज्ञान” (Philosophy of….) . उदाहरणार्थ, चार्वाकाचे तत्त्वज्ञान, बुद्धाचे तत्त्वज्ञान, प्लेटोचे तत्त्वज्ञान, बुद्धिवादाचे तत्त्वज्ञान, अनुभववादाचे तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान इत्यादी शब्दांमध्ये उपयोजनात आणला गेलेला किंवा आणला जाणारा शब्दप्रयोग आहे- ‘....चे तत्त्वज्ञान’. सामान्य माणूसही नेहमीच्या बोलण्यात “माझे तत्त्वज्ञान”, “आपले एक तत्त्वज्ञान” आहे, असे शब्द वापरतो. ते त्या व्यक्तीचे तत्त्वज्ञान किंवा जीवन जगण्याचे तत्त्व असते. त्या व्यक्तीविषयी बोलताना दुसरा माणूस “त्याचे/तिचे तत्त्वज्ञान” असे म्हणतो.

तार्किक संबंधक

‘कशाचे/कोणाचे’ (तरी) तत्त्वज्ञान’ या शब्दप्रयोगातील ‘...चे’ (‘Of’) हे उपपद बहुअर्थी, संदिग्ध आहे. त्याची दोन कारणे आहेत : 

व्याकरणीय दृष्टी : व्याकरणीय दृष्टीने ‘...चे’ (‘Of) हे उपपद ‘शब्दयोगी अव्यय’ आहे. व्याकरणीय दृष्टीकोनातून “....चे तत्त्वज्ञान” या शब्दप्रयोगाचे दोन अर्थ ध्वनित होतात :

(अ) तत्त्ववेत्त्याच्या नावाने ओळखले जाणारे तत्त्वज्ञान. Philosophy of Plato, Philosophy of Gramsci. 

(ब) एखाद्या वैचारिक परंपरेच्या नावाने ओळखले जाणारे तत्त्वज्ञान, जसे की, Philosophy of Rationalism, Philosophy of Phenomenology, बुद्धाचे तत्त्वज्ञान, नागर्जुनाचे तत्त्वज्ञान.

तात्त्विक दृष्टी : तत्त्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून ‘...चे’ (‘Of) ही ‘तार्किक संकल्पना’ (Logical Concept) आहे.

“ .....चे तत्त्वज्ञान” हा शब्दप्रयोग शब्दयोगी अव्यय रूपात वापरला गेला की, त्यातून ‘कोणता तत्त्वज्ञानात्मक आशय’ व्यक्त होतो, हा तार्किक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे येथे (‘Of)चा अर्थ ‘तार्किक संकल्पना’ असा होतो. कारण येथे संबंधित ज्ञेयाच्या तात्त्विक अर्थाचा निर्देश होतो. उदाहरणार्थ, ‘मनाचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Mind) या शब्दप्रयोगात ‘मन’ या संकल्पनेचे ‘अन्वेषण (a field of inquiry) असा अर्थ होतो, तर Spinoza's Philosophy of Mindमध्ये ‘मनविषयक सिद्धान्त’ (a theory) असा होतो. म्हणजेच ‘Of’ या तार्किक संबंधकाचा, किंवा संयोजकाचा एखाद्या विशिष्ट विषयाशी किंवा कोणत्याही विषयाशी कोणत्या रीतीचा तर्कशास्त्रीय संबंध आहे, याचे सविस्तर वर्णन आणि विश्लेषण ‘...चे’ (‘Of) च्या उपयोजनाने दिले जाते. ‘एखाद्या विषयाचे तत्त्वज्ञान’ सांगणे याचा अर्थ स्पष्ट करताना ‘...चे’ (‘Of)चा तार्किक अर्थ ‘अन्वेषण, चिकित्सा, तपासणी, परीक्षण, मग सिद्धान्त रचना’ असा होतो. Philosophy of Language, Philosophy of Religion, Philosophy of Counselling ही अन्य उदाहरणे.

एवढेच नव्हे, तर ‘तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Philosophy) या संकल्पनेत ‘तत्त्वज्ञानविषयक सिद्धान्त’ असा अर्थ व्यक्त होतो. या संकल्पनेचे तांत्रिक नाव ‘अधि-तत्त्वज्ञान’- Meta-Philosophy. तत्त्वज्ञान मूलभूत तात्त्विक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते. तत्त्वज्ञानविषयक मूलभूत तात्त्विक मूळ प्रश्न खुद्द “तत्त्वज्ञान म्हणजे काय?” (What is Philosophy?) हाच आहे! तोच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे, याचा अर्थ ‘कशासाठी तत्त्वज्ञान?’, ‘कोणासाठी तत्त्वज्ञान?’, ‘तत्त्वज्ञान (निर्माण) कसे करावे?’, ‘तत्त्ववेत्ता म्हणजे नेमका कोण?’ इत्यादी प्रश्न निर्माण होतात, तेही तत्त्वज्ञानच सोडवते. हे तत्त्वज्ञानविषयक प्रश्न असल्याने त्यांना ‘अधि-तत्त्वज्ञानात्मक’ म्हटले जाते. तत्त्वज्ञानाचे स्वरूप, पद्धती, विकास याविषयीचे हे प्रश्न आहेत. त्यांना उत्तर देण्यातूनच अनेक तत्त्वज्ञान परंपरा विकसित होत गेल्या आणि जात असतात.  

थोडक्यात, ‘...चे’ (‘Of) या संकल्पनेच्या वाक्यात होणाऱ्या उपयोजनाने तिचा तात्त्विक अर्थ निश्चित होतो आणि संदर्भानुसार त्या निश्चितीला समर्थनीय पुष्टी मिळते. शरद् पाटील  यांचे तत्त्वज्ञान निर्माण करणे, हा वस्तुतः या अधि-तत्त्वज्ञानाचा विषय बनतो.        

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ निर्माण करणे याचा अर्थ ‘तत्त्वज्ञान’ हा विषय ज्या पद्धतीने विद्यापीठात (आणि महाविद्यालयात) अभ्यासला, चिंतला जातो, त्या पद्धतीने मांडणे. या पद्धतीचे साधारण स्वरूप पुढीलप्रमाणे.

तत्त्वज्ञानाची पद्धती

आपले विचार मांडण्यासाठी युक्तिवाद केला जातो, पण प्रत्येक युक्तिवाद म्हणजे विचार नसतो. विशेषतः सामान्य माणूस भावभावना, विकारांच्या पगड्यामुळे फसवा युक्तिवाद करतात. वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ता हे दोघे युक्तिवाद करताना निरीक्षण, अनुभव, प्रयोग, पडताळा, निष्कर्ष अशी विचारपद्धती निर्माण करतात. वैज्ञानिकाची पद्धती ती ‘वैज्ञानिक पद्धती’ आणि तत्त्ववेत्त्याची पद्धती ती ‘तत्त्वज्ञानाची पद्धती’. तत्त्वज्ञानाची पद्धती ही (१) तत्त्वज्ञानात्मक विचार करण्याची आणि (२) तत्त्वज्ञान निर्माण करण्याची पद्धती असते. प्रत्येक तत्त्ववेत्ता आणि तत्त्वज्ञानातील संप्रदाय आपापल्या तात्त्विक धारणांनुसार पद्धती निश्चित करतात. ही पद्धती एकतर त्या तत्त्ववेत्त्याने स्वतःच निर्माण केलेली असते किंवा ज्या संप्रदायाचे प्रतिनिधित्व तो करतो, ती त्या संप्रदायाची असते.  

तत्त्वज्ञानात्मक चिंतन 

तत्त्वज्ञानात्मक विचार करण्याला ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) दर्जा प्राप्त होतो. ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ प्रक्रियेत सकृतदर्शनी साध्या दिसणाऱ्या संज्ञांना काटेकोर आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक अर्थ निश्चित केले जातात. ते अर्थ एकतर वाचक-लेखकाला अज्ञात असतात किंवा त्यांच्याकडून त्या संज्ञांच्या तांत्रिक अर्थाच्या अंगांकडे दुर्लक्ष झालेले असते अथवा वाचक-लेखकाने दुर्लक्ष केलेले असते. तथापि या संज्ञा जशा सामान्य चर्चाविश्वातील वापरात ज्या सहजतेने झिरपतात, तसे त्यांचे काटेकोर तांत्रिक अर्थ आणि त्याविषयीची जाणीव मात्र त्याच उत्कटतेने झिरपत नाहीत. मग निर्माण होतो तो एक अर्थचकवा. या ‘अर्थचकव्या’च्या निर्मिती प्रक्रियेत कोणाचीही चूक फारशी नसते. पण जाणकाराने तरी चकव्याची जाणीव विकसित करणे, हे त्याच्या स्वतःच्या आणि समाजाच्या बौद्धिक व वैचारिक सुरक्षिततेसाठी आवश्यक ठरते. ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ या संकल्पनेचे आधुनिक आणि परिष्कृत स्वरूप थोडक्यात पुढीलप्रमाणे विशद करता येईल.   

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील ‘धर्माचे तत्त्ववेत्ते’, ‘धार्मिक तत्त्ववेत्ते’ होते की, ‘धर्म संकल्पनेचे केवळ विश्लेषक’ होते? त्यांनी नवधर्म प्रवर्तन निश्चितच केलेले नाही; पण वैदिक हिंदू, बौद्ध धर्माचे नवे अन्वयार्थ उपस्थित केले आहेत. त्या अनुषंगाने त्यांचे धर्माचे तत्त्वज्ञान मांडता येईल. धर्माचा तत्त्ववेत्ता कोणत्याही धर्माचा पुरस्कार करत नाही. तो धर्मरहित असतो. मार्क्सप्रमाणेचं शरद् पाटीलदेखील, जरी त्यांनी सौत्रान्तिक स्वरूपाचा मार्क्सवाद स्वीकारला असला, तरी कोणताही धर्म ते स्वीकारत नसल्याने ते तात्त्विक व तार्किक अर्थाने ‘धर्माचे तत्त्ववेत्ते’ होते, असे म्हणता येते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे प्रचलित पाश्चात्य-युरोपीय सूत्र  -  

पाच मूळ संकल्पना आणि पाच  मूलभूत प्रश्न

विद्यमान समकाळात कोणत्याही तत्त्ववेत्त्याचे अथवा विचारसरणीचे तत्त्वज्ञान मांडण्यासाठी एक विशिष्ट पद्धती अवलंबली जाते. या पद्धतीतून तत्त्ववेत्त्याच्या अथवा विचारवंताच्या विचारांचे आकलन सुलभ, निःसंदिग्ध व सुस्पष्ट होते. म्हणजेच तत्त्वज्ञान काहीएका पद्धतीने (Methodology) आणि काही एका परिप्रेक्ष्यातून (Perspectives) विचार करते. ती पद्धती पाच संकल्पना, त्यांना अनुसरून पाच प्रश्न आणि त्यांच्या उत्तरातून विकसित होणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या पाच तत्त्वज्ञान शाखा या तात्त्विक उपकरणांच्या साह्याने तत्त्वज्ञान विकसित करणे व त्याचे मनन, चिंतन करणे या स्वरूपाची आहे. हा लघुत्तम मार्ग आहे.  (१) ज्ञान, (२) सत्ता (अस्तित्व), (३) तर्क, (४) नीति आणि (५) सौंदर्य या तत्त्वज्ञानाच्या पाच मूळ संकल्पना मानल्या जातात आणि त्यांना अनुसरून जे प्रश्न उपस्थित केले जातात ते ‘मूळ प्रश्न’ मानले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातून पाच शाखा निर्माण होतात.

प्रश्न तत्त्वज्ञानाच्या शाखा पुढीलप्रमाणे  

ज्ञान म्हणजे काय ?... ज्ञानशास्त्र  (Epistemology)

सत्ता म्हणजे काय?....सत्ताशास्त्र (Metaphysics)/ अस्तित्व म्हणजे काय? (सद्वस्तुशास्त्र Ontology)

तर्क म्हणजे काय?... तर्कशास्त्र  (Logic)

चांगले म्हणजे काय?... नीतिशास्त्र (Ethics)

सौंदर्य म्हणजे काय?... सौंदर्यशास्त्र (Aesthetics)

येथे ‘शास्त्र’ऐवजी ‘मीमांसा’ असेही विशेषण वापरण्याचीही पद्धत आहे. मूळ प्रश्न विचारणे, त्यांच्या उत्तरांचा शोध घेणे, त्या शोधाची पद्धती शोधणे आणि त्यासमग्र परिप्रेक्ष्यातून विचार करणे, हे ‘तत्त्वज्ञानात्मक चिंतन’ (Philosophical Contemplation) प्रक्रियेचे साधारण स्वरूप असते. कोणत्याही ज्ञानविषयाच्या, विचारसरणीच्या किंवा एखाद्या विचारवंताच्या आणि तत्त्ववेत्त्याच्या चिंतनाचे आकलनास या संकल्पना, प्रश्न आणि ज्ञानशाखा सहाय्यभूत ठरतात. प्रश्न आणि शाखा यांच्याद्वारे कोणत्याही विचारास ‘तात्त्विक चौकट’ (Philosophical Framework) पुरवली जाते.

या तत्त्वज्ञान शाखा म्हणजे ‘तात्त्विक चिंतनविषयाची क्षेत्रे’ मानली जातात. त्यांना एका अर्थाने ‘तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे सूत्र’ म्हणता येईल. ही पाश्चात्य-युरोपीय तत्त्वचिंतनातून विकसित झाली. साहजिकच प्रारंभी ‘पाश्चात्य-युरोपीय वर्गीकरणाची पद्धती’ नामाभिधानाने परिचित झाली. गेली अनेक शतके ती विकसित होत जाऊन जागतिक विद्यापीठीय अ‍ॅकॅडेमिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात स्थिर झाली आहे. 

कोणत्याही तत्त्ववेत्त्याचे, विचारसरणीचे अथवा एखाद्या विषयाचे तत्त्वज्ञान मांडणे, याचा अर्थ प्रस्तुतचे पाच मूलभूत प्रश्न उपस्थित करणे आणि त्यांच्या उत्तरातून विकसित होणाऱ्या पाच ज्ञानशाखा निर्माण करणे. या पद्धतीतून तत्त्ववेत्त्याच्या अथवा विचारवंताच्या विचारांचे आकलन सुलभ, निःसंदिग्ध व सुस्पष्ट होते. आज कोणत्याही देशाचे, संस्कृतीचे, व्यक्तीचे, विचारसरणीचे, चळवळीचे, समाज गटाचे तात्त्विक चिंतन याच सूत्रानुसार मांडले जाते. त्यामुळे हे सूत्र केवळ पाश्चात्य-युरोपीय अशी मक्तेदारीची उरलेली नाही. हे सूत्र सर्व नैसर्गिक विज्ञाने, सामाजिक विज्ञाने, मानव्यविद्या शाखा, व्यवस्थापकीय, वाणिज्य, अभियांत्रिकी इत्यादी ज्ञानक्षेत्रासाठी आवश्यक मानले जाते.

(ब) तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे भारतीय सूत्र     

पाश्चात्य-युरोपीय वर्गीकरणानुसारचे वर्गीकरण भारतीय तत्त्वज्ञानात आढळत नाही. अशी विभागणी न होण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील : 

भारतीय तत्त्वज्ञानातील प्रमुख सहा वैदिक-आस्तिक व तीन अवैदिक-नास्तिक दर्शनांमधील प्रत्येक दर्शनाची रचना भिन्न आहे. (माधवाचार्य विद्यारण्य (१२९६-१३८६) यांच्या ‘सर्वदर्शनसंग्रहा’त १६ किंवा १८ दर्शनांचा उल्लेख आहे) 

प्रत्येक दर्शनाची उद्दिष्टे भिन्न भिन्न आहेत.

प्रत्येक दर्शनाची परिभाषा भिन्न आहेत.

प्रत्येक दर्शनाच्या परिभाषेतील संकल्पनांचे अर्थ एकसमान नसून ते भिन्न भिन्न आहेत.

भारतीय दर्शन पद्धतीच्या परिभाषेत वरील तात्त्विक शाखा पुढीलप्रमाणे मांडता येतात :

प्रमाणशास्त्र (Epistemology) : ज्ञान म्हणजे काय? भ्रम म्हणजे काय? ज्ञानाचा विषय असलेले प्रमेय कसे जाणावे? हे मूळ प्रश्न. ते जाणण्याचा मार्ग म्हणजे प्रत्यक्ष-अनुमान-शब्द, मानस प्रत्यय, अंतःप्रज्ञा इत्यादी.    

प्रमेयशास्त्र (Metaphysics) : सत्ता किंवा अस्तित्व म्हणजे काय? हा मूळ प्रश्न. तो ज्ञानाचा विषय - प्रमेय. जग, माणूस-समाज, अंतिम सत्य सत्तावान आहे, अस्तित्वात आहे’ असे म्हणण्याचा नेमका अर्थ काय होतो? प्रमेय अस्तित्वात नसेल कशावरून? इत्यादी, सत्ता किंवा अस्तित्व म्हणजे मानसिक आणि वैचारिक पदार्थ, सत्ये आणि भौतिक जग व मानव यांच्या परस्परसंबंधांनी घडलेले मानवी जग हे वास्तव.        

मूल्यशास्त्र (Axiology) : मूल्य म्हणजे नीतीविषयक (Ethics) आणि सौंदर्यविषयक (Aesthetics) मूल्ये. नीति/ चांगले म्हणजे काय? सौंदर्य म्हणजे काय? हे मूळ प्रश्न. तेथून नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र यांची रचना होते.   

थोडक्यात, ‘काय अस्तित्वात आहे’ (सत्ताशास्त्र (Metaphysics), ‘आपण काय जाणू शकतो आणि जे काही जाणू पाहतो ते आपण कसे जाणू शकतो’ (ज्ञानशास्त्र Epistemology), जे जाणू पाहतो आहोत, त्याच्यासह आपण कसे जगू शकतो (नीतिशास्त्र Ethics) असे तीन महत्वाचे प्रश्न भारतीय-दर्शन व्यवस्था उपस्थित करते.

एखादा ‘तात्त्विक’ म्हणवला जाणारा विचार कोणती जीवनसरणी पुरस्कारतो किंवा नाही, याच्याशी या  पाश्चात्य-युरोपीय परंपरेतील पाच संकल्पना किंवा या तीन भारतीय संकल्पना संबंधित नाहीत; तर तो विचार अन जीवनसरणी तात्त्विक पद्धतीने मांडावयाची असल्यास या प्रश्नांच्या व संकल्पनांच्या आधारे मांडणे, ही किमान अट आहे, एवढेच येथे सुचवावयाचे आहे. ही मांडणी संबंधित विचारसरणीचे काटेकोर तत्त्वज्ञान निर्माण करण्यास अथवा होण्यात मदतकारक ठरते. त्यानंतर ती विचारसरणी ‘तत्त्वज्ञान’ या पदाला पात्र झाल्यास तिचा एकूण मानवी ज्ञानाच्या, तत्त्वज्ञानाच्या साठ्यात समावेश होऊ शकतो.                                  

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील यांच्या विचारविश्वात शेकडो संकल्पना आढळतात. एकेक शब्दाचे स्पष्टीकरण देत देत शरद् पाटील नव्या संकल्पना निर्माण करत जातात. आधीचे शब्द नव्या संकल्पनेत सामावलेले असतात. ती संकल्पना नंतरच्या शब्दात सामावली जाते, त्यानंतर तिच्यासह नवी संकल्पना मांडली जाते. असे सतत घडत जाते. त्यातून शेकडो संकल्पना जन्माला येतात. ही शरद् पाटील यांची तत्त्वज्ञान मांडण्याची एक रीत आहे. त्यामुळे त्यांच्या संकल्पनांचा नकाशा बनवणे आवश्यक ठरते. त्याच वेळी त्यांच्या शब्दांचा, सज्ञांचा स्वतंत्र शब्दकोश अर्थात निघंटू तयार करणेही आवश्यक आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान 

आता ‘....चे तत्त्वज्ञान’ हा व्याकरणीय शब्दप्रयोग करून ‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ अशी एक मांडणी पुढे आणता येते. त्याचे दोन अर्थ होतील : (१) ‘शरद् पाटील यांनी मांडलेले तत्त्वज्ञान’ आणि (२) ‘शरद् पाटील यांच्या तत्त्वज्ञानाची चिकित्सा, परीक्षण, टीका, सिद्धान्त मांडणी इत्यादी.

येथे दोन्ही अर्थांवर भर देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे दुसरा अर्थ सिद्ध करण्याचा प्रयत्न गेल्या वीस वर्षांत पुरेसा झालेला आहे. अर्थात तो प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यातून झाला आहे, तर तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून डॉ. प्रदीप गोखले यांची मांडणी ‘शरद् पाटील यांचे वैचारिक योगदान आणि आंबेडकरवाद’ या छोट्या पुस्तिकेद्वारे झाली आहे. तथापि ही छोटी पुस्तिका केवळ दिशादर्शक आहे, ती काही पूर्ण तात्त्विक रचना नाही. ते शरद् पाटील यांचे परिपूर्ण तत्त्वज्ञान’ नाही. शिवाय त्यातील द्वंद्वात्मक तर्कशास्त्र, वैगमनिक तर्कशास्त्र, बहुप्रवाही अन्वेषण पद्धती हे केवळ काही मुद्दे आहेत. पुढील दिशेने ते केवळ सूचन आहे. म्हणून ‘एक तत्त्वज्ञान रचना’ या परिप्रेक्ष्यातून अधिक त्यांचा अधिक विस्ताराने विचार होणे आवश्यक आहे. तसे झाल्यास तो शरद् पाटील यांच्या विचारांच्या तत्त्वज्ञानात्मक पुनराकलनाचा मार्ग असेल. 

शरद् पाटील यांच्या तत्त्वज्ञानाच्या रचनेचे पद्धतीशास्त्र  

शरद् पाटील यांच्या काही तात्त्विक विचारांची चिकित्सा करणारे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. ते गृहीत धरून आणि तत्त्वज्ञानाची पाश्चात्य-युरोपीय पद्धती अंगिकारून “शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ ही ज्ञानराशी निर्माण करता येऊ शकते. म्हणजेच (१) ज्ञान, (२) सत्ता (अस्तित्व), (३) तर्क, (४) नीति आणि (५) सौंदर्य या तत्त्वज्ञानाच्या पाच मूळ संकल्पनांचे उपयोजन करून, त्यांना अनुसरून, -

शरद् पाटील यांचे ज्ञानशास्त्र

शरद् पाटील यांचे सत्ताशास्त्र/ शरद् पाटील  यांचे सद्वस्तुशास्त्र 

शरद् पाटील  यांचे तर्कशास्त्र

शरद् पाटील यांचे नीतिशास्त्र

शरद् पाटील यांचे सौंदर्यशास्त्र

अशा पाच ज्ञानशाखा आपण निर्माण करू शकतो. अनुषंगाने शरद् पाटील यांच्या ज्ञानशास्त्राचे स्वरूप काय? इत्यादी पाच प्रश्न उपस्थित करता येतील आणि त्यांच्या उत्तरातून त्यांच्या ज्ञानशाखा अस्तित्वात आणता येतील, असे  म्हणण्यास जागा आहे.

उपयोजित शाखा  (applied)

शरद् पाटील यांनी विशुद्ध तत्त्वचिंतनाप्रमाणेच सामाजिक, राजकीय तत्त्वज्ञानावर आणि धर्मविषयक तत्त्वज्ञानावर, इतिहासावर प्रामुख्याने चिंतन केले आहे. त्यामुळे

शरद् पाटील यांचे सामाजिक तत्त्वज्ञान

शरद् पाटील यांचे राजकीय तत्त्वज्ञान

शरद् पाटील यांचे धर्मविषयक/धर्माचे तत्त्वज्ञान

शरद् पाटील यांचे इतिहासविषयक तत्त्वज्ञान

या आणि अशा इतर उपयोजित शाखांची तयारी करणे नितांत गरजेचे आहे. विशेषतः ‘शरद् पाटील यांचे धर्मचिंतन’ अतिशय मूलगामी आहे.

शरद् पाटील धर्माचे तत्त्ववेत्ते

शरद् पाटील ‘धर्माचे तत्त्ववेत्ते’, ‘धार्मिक तत्त्ववेत्ते’ होते की, ‘धर्म संकल्पनेचे केवळ विश्लेषक’ होते? त्यांनी नवधर्म प्रवर्तन निश्चितच केलेले नाही; पण वैदिक हिंदू, बौद्ध धर्माचे नवे अन्वयार्थ उपस्थित केले आहेत. त्या अनुषंगाने त्यांचे धर्माचे तत्त्वज्ञान मांडता येईल. साधारणपणे ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ म्हणजे आपापल्या धर्मात सांगितलेली विविध तत्त्वे, नियम, कर्मकांड, धार्मिक कठोरता, पाप-पुण्य, पुनर्जन्म, वर्ण-जात, ईश्वरपूजा, धर्माज्ञा धर्मसंसदेचे नियम, धर्मगुरूंच्या आज्ञा इत्यादींचे कठोर पालन करणे, असा अर्थ होतो. पण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने धर्माची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ (Logical and Philosophical criticism of Religion) म्हणजे ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ असा अर्थ होतो.

पहिला अर्थाचे ‘धर्माचे तत्त्वज्ञान’चा हा अतिशय सामान्य लोकांना अतिशय प्रिय आणि राजकारण्यांना, राज्यकर्त्यांना सोयीचे असते. सामान्य लोकांना-ईश्वरवादी, भक्तिवादी मंडळीना पहिला अर्थ आवडतो. बुद्धिवादीजनांना ‘धर्माची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ हा दुसरा अर्थ अभिप्रेत असतो. पहिल्या अर्थाच्या ‘धर्माचे तत्त्वज्ञान’मधून अन्य धर्माबाबतचे राजकारण सुरू होते. त्यांच्याविषयी प्रेम, सहभाव, समता की, तिरस्कार हे अस्पष्ट राखले जाते. यातील ‘Philosophy of Religion’चा दुसरा अर्थच, ‘धर्माची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ हाच तात्त्विक अर्थ आहे.

धर्माचा तत्त्ववेत्ता कोणत्याही धर्माचा पुरस्कार करत नाही. तो धर्मरहित असतो. मार्क्सप्रमाणेचं शरद् पाटीलदेखील, जरी त्यांनी सौत्रान्तिक स्वरूपाचा मार्क्सवाद स्वीकारला असला, तरी कोणताही धर्म ते स्वीकारत नसल्याने ते तात्त्विक व तार्किक अर्थाने ‘धर्माचे तत्त्ववेत्ते’ होते, असे निश्चितपणे म्हणता येते. विशेषतः धर्मकीर्तिच्या एका श्लोकाचा त्यांनी दिलेला संदर्भ आजच्या ‘स्नान आणि पापमुक्ति’च्या महाकुंभा महोत्सवाचा पार्श्वभूमीवर महत्वाचा आहे. धर्मकीर्ति म्हणतो,   

वेदप्रामाण्यं कस्यचित् कर्तृवादः स्नाने धर्मेच्छा जातिवादलेपः

सन्तापनं पापहानाय चेति ध्वस्तप्रज्ञान पंच लिंगानि जाडचे

(“वेदांना प्रमाण मानणे, या विश्वाचा कोणीतरी कर्ता आहे असे समजणे, स्नानातून पुण्य मिळते अशी श्रद्धा ठेवणे, जातीचा अहंकार बाळगणे व शरीराला क्लेश देण्यातून पापक्षय होऊन मोक्ष मिळतो, असा विश्वास असणे, ही पाच अकलेचे दिवाळे निघाल्याची लक्षणे आहेत!”)

‘माफुआ ते सौत्रान्तिक मार्क्सवाद’ हा खूप मोठा वैचारिक पल्ला असून त्यात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहासशास्त्र, भूगोल, भारतीयविद्या, इंग्रजी-मराठी साहित्य, पाणिनीय व्याकरण, संस्कृत, मराठी, इंग्रजी व्याकरण, भाषाशास्त्र, कायदा, धर्मशास्त्र, ईश्वरशास्त्र इत्यादी अनेक सामाजिक व मानव्य विद्याशास्त्रांचा समावेश होतो. त्या प्रत्येक विद्याशाखेची मांडणी करणे आवश्यक आहे. यातूनच ‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ अशी विस्तीर्ण ज्ञानराशी विद्यापीठीय चौकटीत निर्माण करता येऊ शकते आणि ती विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकते, असे म्हणता येईल.

संकल्पना नकाशा आणि निघंटु 

शरद् पाटील यांच्या विचारविश्वात शेकडो संकल्पना आढळतात. एकेक शब्दाचे स्पष्टीकरण देत देत शरद् पाटील नव्या संकल्पना निर्माण करत जातात. आधीचे शब्द नव्या संकल्पनेत सामावलेले असतात. ती संकल्पना नंतरच्या शब्दात सामावली जाते, त्यानंतर तिच्यासह नवी संकल्पना मांडली जाते. असे सतत घडत जाते. त्यातून शेकडो संकल्पना जन्माला येतात. ही शरद् पाटील यांची तत्त्वज्ञान मांडण्याची एक रीत आहे. त्यामुळे त्यांच्या संकल्पनांचा नकाशा बनवणे आवश्यक ठरते. त्याच वेळी त्यांच्या शब्दांचा, सज्ञांचा स्वतंत्र शब्दकोश अर्थात निघंटू तयार करणेही आवश्यक आहे.

शपांच्या सर्व संकल्पनांचा स्वतंत्र नकाशा बनवता येईल. ‘संकल्पनांचा नकाशा’ हीच एक नवी संकल्पना आहे, तिचे इथे उपयोजन करणे यथार्थ ठरेल, असा माझा विश्वास आहे. ‘संकल्पना नकाशा’ची संकल्पना अमेरिकेन शिक्षणतज्ज्ञ जोसेफ डी. नोव्हाक (Joseph D. Novak, १९३२-२०२३) आणि बॉब गोविन (Bob Gowin,१९२५-२०१६) यांनी मांडली.

संकल्पना नकाशा’ किंवा ‘संकल्पनात्मक चित्रकृती’ अनेक संकल्पनांमधील नाते उलगडून दाखवते. विविध प्रकारचे अभियंते, अध्ययन-अध्यापनातील अनुदेशन आराखडा रचनाकार, वास्तुविशारद, तांत्रिक परिभाषा लेखक आणि इतर बहुक्षेत्रीय ज्ञानरचनाकर्ते, अध्यापक इत्यादी तज्ज्ञांना संकल्पना नकाशाची गरज असते. गोल, चौकोन, बाण, कंस, चढत्या-उतरत्या शिड्या इत्यादी वापरून संकल्पनांचे परस्पर संबंध आरेखले जातात. ‘संकल्पना नकाशा’चा उगम अध्यापन-क्षेत्रातील ‘रचनावाद’ (constructivism)शी जोडला गेलेला आहे.

खरे पाहता नकाशा तयार करणे, हीच मुळात एक तत्त्वज्ञानात्मक कृती आहे. ‘जग जाणणे’ ही तात्त्विक जिज्ञासा असते. ज्या जगात आपण राहतो, ते जर सुव्यस्थितपणे जाणावयाचे असेल, तर त्या जगाचा नकाशा करणे आवश्यक आहे, याची सर्वप्रथम जाणीव ग्रीकांना झाली. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता, भूगोलतज्ज्ञ, जीववैज्ञानिक अ‍ॅनॅक्झिमेंडर (Anaximander इ. स. पूर्व ६१० ते इ.स .पूर्व ५४६)कडे जाते. त्यामुळे त्याला ‘नकाशाचा जनक’ किंवा ‘भूगोलाचा जनक’ म्हटले जाते. बंदिस्त जगाच्या कल्पनेला तिलांजली देऊन खुल्या ब्रह्मांडाची संकल्पना मांडून जणू जगतचिंतनच मुक्त केले! विसाव्या शतकात मात्र ‘नकाशाचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Maps) ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा निर्माण करण्यास शुभारंभ झाला, तिची पायाभरणी १९६८ साली अमेरिकेत झाली.

‘नकाशा म्हणजे राज्यविस्तार, राजकीय हत्यार आणि माध्यम आहे’, असे विश्लेषण दुसऱ्या महायुद्धापासून जोर धरत आहे. कागदावर नकाशा उतरवणे हे अडीच हजार वर्षांपूर्वी अतिशय धाडसाचे काम होते. कारण जगाची निर्मिती ईश्वराने केली आहे, जग शुभस्वरूप आहे इत्यादी ईश्वरशास्त्रीय कल्पना ख्रिश्चन, इस्लाम इत्यादी धर्मसंस्थांनी लादलेल्या होत्याच; पण विचारवंतांच्या मते ‘जग पाण्यावर तरंगते, पृथ्वी सपाट आहे’ अशा संकल्पना होत्या. वैदिक-अवैदिक तत्त्वज्ञानातील पुराणकथांमध्येही ब्रह्म्याने जग निर्माण केले, किंवा दशावतार कथाही जगाच्या धार्मिक व पुराणकथात्मक कल्पना मांडतात. या साऱ्या अशास्त्रीय कल्पना होत्या, त्या पार्श्वभूमीवर जगाचा नकाशा प्रत्यक्ष कागदावर उतरवणे म्हणजे अशा धर्मसंस्थांना, धर्मसंसदांना आणि धर्मगुरूंना आव्हान देण्यासारखे होते. ते अतुलनीय ज्ञानात्मक धाडस अॅनॅक्झिमेंडरने केले.  

कोणताही नकाशा सांगतो- “मला काळजीपूर्वक वाचा, माझा काटेकोर मागोवा घ्या, माझ्यावर संशय घेऊ नका. मी तुमच्या तळहातावर विसावलेली पृथ्वी आहे. माझ्यावाचून तुम्ही केवळ एकाकी आणि कुठेतरी गायब झालेले असाल!”   

हाच नियम शरद् पाटील यांच्या विचारविश्वाला लागू पडतो. त्यांनी मांडलेली प्रत्येक नवी संकल्पना अनेक अंधश्रद्धा, समजुती, गैरसमज, भाकडकथा, स्वार्थ, ब्राह्मणी वर्चस्ववाद, पुरोहितशाही, सरंजामशाही इत्यादी उघडकीस येते. त्यामुळे त्यांच्या सर्व संकल्पना सुव्यस्थितपणे समजून उमजून घेणे अनिवार्य ठरते. त्यासाठी त्यांच्या संकल्पनांचा नकाशा बनवता येईल.     

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील यांच्याबाबतीत त्यांच्या ‘तात्त्विक जनता वर्ग’मध्ये साम्यवादी, समाजवादी, मार्क्सवादी, पुरोगामी, वैज्ञानिक दृष्टी लाभलेल्या वेगवेगळ्या चळवळीतील कार्यकर्ते, तत्त्वज्ञानेतर विषयांचे निवडक प्राध्यापक, तुरळक पत्रकार यांचा समावेश होतो. एक मोठा लक्षणीय ‘तात्त्विक जनता वर्ग’ गोतावळा शपांना लाभला, पण त्यात बोटावर मोजण्याइतपतच निवडक तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक शरद् पाटील यांच्याकडे फिरकण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे; त्यामागे विविध कारणे आहेत. ती शरद् पाटील यांच्या व्यक्तित्व वैचित्र्यात आणि लेखनशैलीत दडलेली आहेत.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील  यांचे तत्त्वज्ञान :  काही प्रश्न 

आता, शरद् पाटील यांच्या तत्त्वज्ञानाची ही पाश्चात्य-युरोपीय मांडणी शक्य आहे, पण त्याच वेळी महत्वाचा प्रश्न असा की, शरद् पाटील यांच्या विचारांची भारतीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून ‘शरद् पाटील-दर्शन’ अशीही मांडणी शक्य होऊ शकते का? शरद् पाटील यांनी स्वतःचे वर्णन कसे केले असते? दार्शनिक की तत्त्ववेत्ता? या प्रश्नाचे उत्तर काहीसे अवघड आहे. कारण त्यांनी ‘दर्शन’ आणि ‘तत्त्वज्ञान’ या दोन्ही शब्दांची परस्पर संगती लावली आहे. त्यात ‘Philosophy’ हा शब्दही ओढून आणला आहे. ‘दर्शन’ आणि ‘तत्त्वज्ञान’ हे भारतीय शब्द आहेतच, पण त्यातील ‘तत्त्वज्ञान’ हा शब्द ‘Philosophy’चे मराठी भाषांतर म्हणून वापरला जातो. परिणामी तो ग्रीक-पाश्चात्य अर्थाने कधी वापरला जातो आणि भारतीय अर्थाने कधी वापरला जातो, याचा संभ्रम होतो. हा संभ्रम काही वेळेस खुद्द शरद् पाटील यांचाही झाल्याचे आढळते. त्यासाठी तो कसा वापरला आहे, त्याचा संक्षिप्त आढावा घेणे गरजेचे आहे. त्या वापरातून ते ‘तत्त्वज्ञाना’चे ‘आयडेंटिफिकेशन’ करू पाहतात.  

तत्त्वज्ञानाचे ‘आयडेंटिफिकेशन’

शरद् पाटील त्यांचे ‘तत्त्वज्ञान’विषयक मत देताना विविध विचारवंताचा धांडोळा घेतात. हे अर्थात ‘भाष्यकाराते वाट पुसतु’ परंपरेला अनुसरून आहे. प्रा. गं. बा. सरदार, प्रा. सुरेंद्र बारलिंगे, प्रा. मे. पुं. रेगे, सुधीर बेडेकर, श्रीपाल सबनीस, प्रदीप गोखले, रावसाहेब कसबे, गोपाल गुरू इत्यादी मान्यवरांची मते;  बुद्ध तत्त्वज्ञान, उपनिषदे, तसेच संघी (संघमुख्य), गणी (गणमुख्य), गणाचार्य, तीर्थंकर अशा संकल्पना यांचे संदर्भ ते देतात. ‘मार्क्सवाद : फुले-आंबेडकरवाद व त्यांचे टीकाकार’ या लेखातील ‘स्वतंत्र तत्त्वज्ञान कशाला म्हणावे?’ या भागात ते ‘तत्त्वज्ञाना’चे ‘आयडेंटिफिकेशन’चा प्रश्न उपस्थित करतात आणि अन्तोनिओ ग्राम्सीने केलेली तत्त्वज्ञानाची व्याख्या देतात.

ग्राम्सीच्या मते, ‘‘सर्व माणसे - प्रत्येक माणूस तत्त्वज्ञानी असतो. धंदेवाईक वा ‘तांत्रिक’ तत्त्वज्ञानी व इतर मानवजात यांच्यातील फरक ‘गुणात्मक’ नसून ‘संख्यात्मक’ आहे. प्रत्येक विचारसरणी प्रत्येक सामान्य विचारप्रवाह इत्यादी प्रत्येक ‘वैश्विक व जीवनविषयक संकल्पना’ यांना तत्त्वज्ञान म्हणणे अचूक ठरणार नाही. तत्त्वज्ञानी हा बिनकसबी कामगारांच्या तुलनेत ‘विशेषज्ज्ञ कामगार’ म्हटला जाऊ शकतो; पण हेही समर्पक होणार नाही. कारण उद्योगात कामगार आणि विशेषज्ज्ञ कामगार’ यांच्या व्यक्तिरिक्त इंजिनिअरही लागतो, जो तो उद्योग व्यावहारिकदृष्ट्‍याच काय पण तात्त्विक व ऐतिहासिकदृष्ट्‍याही जाणतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो त्याच्या काळापर्यंतच्या विचारांचा विकास जोखू शकतो आणि समस्या सोडवण्यासाठी तत्पूर्वी झालेल्या सर्व प्रयत्नांनी ती जेथपर्यंत आणून सोडली तेथपासून ती तो हाती घेऊ शकतो.”

हा परिच्छेद उद्धृत केल्यानंतर पुढे शरद् पाटील ‘जात्यन्ताच्या समस्येची तत्त्वज्ञाने’ या मुद्द्याचे स्पष्टीकरण करताना “मार्क्सवाद – लेनिनवाद हा शब्दप्रयोग तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात करता येणार नाही, असे मी मांडत आलो आहे” असे प्रतिपादन करतात, पण पुढच्या परिच्छेदात ‘माओ तत्त्वज्ञानी होता, भाष्यकार नव्हता’ असाही दावा करतात.

दर्शन, तत्त्वज्ञान आणि Philosophy : शरद् पाटील यांचा दृष्टीकोन

तत्त्वज्ञानाच्या अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रात दर्शन, तत्त्वज्ञान आणि Philosophy या तिन्ही सज्ञांची त्यातील सूक्ष्म भेद, साम्य, अर्थ, संदर्भ, व्युत्पत्ति इत्यादींची खोलवर चर्चा होते. सकृद्दर्शनी या तिन्हींना समान अर्थाची मान्यता दिली जात असली, तरी साम्य-भेद अधोरेखित करावे लागतात.

या तिन्हींची अतिसंक्षिप्त चर्चा शरद् पाटील यांनी ‘म. जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्ववेत्ते होते काय? या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रामुख्याने तीन लेखांमध्ये आणि ‘भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत’ या पुस्तकात केली आहे. (१) ‘मार्क्सवाद आणि फुले-आंबेडकरवाद’, (२) ‘फुले तत्त्वज्ञानी होते काय?’ आणि (३) ‘मार्क्सवाद - फुले – आंबेडकरवाद म्हणजे तत्त्वज्ञानाचे विचारसरणीकरण’. हा त्यांच्या माफुवावादाच्या उभारणीचा काळ होता. अन्यत्रही ही चर्चा प्रतिबिंबित होत राहते.   

कम्युनिस्ट आणि समाजवादी दोघांनी ‘फुले व आंबेडकर काय तत्त्वज्ञानी होते!?’ असा प्रश्न उपस्थित केला होता आणि ही मंडळी आंबेडकरांना तत्त्वज्ञानी म्हणण्यास तयार नाहीत, अशी माहिती देऊन शरद् पाटील त्याला उत्तर देतात. ते असे, “बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचे तौलनिक विवेचन ‘द बुद्ध अँड हिज धम्म’ मध्ये केले असल्याने आंबेडकरांना तत्त्ववेत्ते म्हणता येते, पण असे तत्त्वज्ञानावर अधिष्ठित विवेचन फुलेंनी केले नसल्याने त्यांना काही तत्त्वज्ञान होते, असे सकृतदर्शनी म्हणता येणार नाही, असे कम्युनिस्ट आणि समाजवादी दोघांना वाटते”.    

शरद् पाटील आंबेडकरांना तत्त्ववेत्ते मानतात, आणि फुले यांना ‘शूद्र तत्त्वज्ञानी’ असे नामाभिधान बहाल करतात. त्यासाठी ‘Plebian Philosopher’ असा शब्दप्रयोग वापरतात. फुल्यांच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास शूद्रांच्या आटोक्याबाहेर होता. त्या प्रतिकूल बौद्धिक वातावरणात जोतीराव फुलेंनी सांख्य, बौद्ध इत्यादी अब्राह्मणी तत्त्वज्ञानांचा पुरस्कार केला. त्यामुळे फुले ‘शूद्र तत्त्वज्ञानी’ आहेत, असे नमूद करून फुले-आंबेडकर दोघांनाही शरद् पाटील ‘थोर विचारवंत’ म्हणतात, पण ‘दार्शनिक’ म्हणत नाहीत आणि स्वतःला त्यांचा ‘स्वयंप्रज्ञ शिष्य’ म्हणवतात. नंतर ते म. फुल्यांना ते ‘केवळ समाजसुधारक’ ठरवतात आणि फुल्यांची विचारसरणी क्रांतीला निरुपयोगी आहे, असा निर्णय देतात. त्याचप्रमाणे डॉ. आंबेडकरही ‘पार्लमेंटरीवादी’ झाल्याने त्यांचीही विचारसरणी निरुपयोगी ठरवतात. ह्याचे कारण शरद् पाटील यांनी आता माफुआवाद सोडून सौत्रांतिक + मार्क्सवाद स्वीकारला आहे. यानंतर त्यांच्या ‘तत्त्वज्ञान’ संकल्पनेत बदल होतात.  

पण प्रश्न असा आहे की, या आणि अशा इतर विवेचनातून शरद् पाटील यांना ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?’ याबद्दल नेमके काय सांगावयाचे आहे, ‘तत्त्वज्ञान’विषयक नेमका कोणता तात्त्विक आशय व्यक्त करावयाचा आहे, त्याचे स्वरूप काय, मर्यादा काय? हे स्पष्ट होत नाही. म्हणूनच त्यांच्या समग्र विचारविश्वाची अकादामिक तत्त्वज्ञानात्मक मांडणी होणे आवश्यक आहे.

‘तत्त्वज्ञान’ म्हणजेच ‘Philosophy’ ही फार मोठी भुरळ घालणारी, म्हणून चकवा देणारी आणि अतिप्राचीन संज्ञा आहे. प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांच्या परिभाषेत मांडावयाचे तर ती ‘तत्त्वमाया’ आहे, असे म्हणता येईल. प्राचीन भारतीय परिभाषेत प्राथमिक अवस्थेत ‘आन्वीक्षिकी’ आणि नंतर ‘दर्शन’ या नावाने ती ओळखली जात होती, नंतर ‘तत्त्वज्ञान’. 

प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील - भारतीय दार्शनिक/ तत्त्ववेत्ते

शरद् पाटील हे दार्शनिक की तत्त्ववेत्ता की Philosopher, याचा विचार करता येईल. त्यांच्यासाठी प्रस्तुत तिन्ही अभिधाने उपयोगात आणता येतील, हे त्या तिन्ही शब्दांच्या व्युत्पत्तीद्वारे स्पष्ट करता येईल, शरद् पाटील त्यांनीही ती अनेक ठिकाणी विवेचनाच्या ओघात स्पष्ट केली आहे. विस्तार भयास्तव त्या विशद न करता त्या व्युत्पत्ती सर्वांना माहीत आहेत, असे मी येथे गृहीत धरतो. त्यापेक्षा ‘दर्शन’ व ‘तत्त्वज्ञान’ या वैदिक परंपरेशी जखडल्या गेलेल्या संज्ञा-संकल्पना वैदिकत्वाच्या जोखडातून मुक्त करण्याचा, त्या बंदिस्त चौकटीतून मुक्त करण्याचा एक मार्ग तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर आणि तत्त्ववेत्ते सुरेंद्र बारलिंगे यांनी सिद्ध केला आहे. त्याची थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक राहील.

प्रो. बारलिंगे यांच्या मते, “जेव्हा आपण भारतीय वा पाश्चात्य तत्त्वज्ञानाबद्दल बोलतो, तेव्हा तत्त्वज्ञानाच्या तार्किक रचनाबंधाचा विचार करत नसतो, तर सांस्कृतिक रचनाबंधाचा विचार करत असतो. म्हणजे ‘तत्वज्ञान’ असे आपण ज्याला म्हणतो, ते केवळ सांस्कृतिक रचनाबंधाचे प्रगटीकरण असते किंवा अमूर्तीकरण असते. ही एक अगदी कप्पेबंद व्यवस्था असते. तरीही एका रचनाबंधाच्या तत्त्वज्ञानाचा दुसऱ्या रचनाबंधाच्या तत्त्वज्ञानाशी कसलाही संबंध येत नाही, असे नाही, तो संबंध येतच असतो.”

बारलिंगे यांच्या म्हणणे सोपे करायचे तर असे की, उदाहरणार्थ, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान हे दोन भिन्न सांस्कृतिक रचनाबंध आहेत. ते कप्पेबंद आहेत, तरीही त्यांचा संबंधच येत नाही, असे नाही; तो येतो आणि आलाच. किंबहुना तो संबंध प्रस्थापित झाला म्हणूनच भारतात प्रबोधन युग सुरू झाले.

पुढे प्रो. बारलिंगे म्हणतात की, “अगदी एकाच सांस्कृतिक रचनाबंधामधील तत्त्वज्ञानांत वैविध्य आढळू शकते आणि विविध सांस्कृतिक रचनाबंधामधील तत्त्वज्ञानांत साम्ये आढळू शकतात. कारण एकाच सांस्कृतिक रचनाबंधामधील दोन माणसे एकसारखा विचार करतील, असे नाही. पण त्याचवेळी भिन्न सांस्कृतिक रचनाबंधामधील दोन व्यक्तींच्या विचारात सारखेपणा असू शकेल आणि त्यांच्या सहानुभूतीचे विषय सामाईक असतील व त्यांचे आकलनही समानधर्मा असू शकेल.”

याचा अर्थ उदाहरणार्थ ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या एकाच सांस्कृतिक रचनाबंधात वैदिक व अवैदिक असे वैविध्य आहे; त्यातही ‘चार्वाक-दर्शन’ आणखी वेगळे आहे. शिवाय अवैदिक-वैदिक ही एकमेव वर्गवारी नाही. अनेक दृष्टीकोनातून ती बदलते. अशी वैविध्यता असूनही त्यांच्यातील ‘साम्य’ आहे, ते त्यांचे ‘दर्शन’ असण्यात.’ प्रो. बारलिंगे यांचे मत मला मान्य करण्यात अडचण दिसत नाही.   

तत्त्वज्ञानाची ही विविधता व साम्यता लक्षात घेऊन प्रो. बारलिंगे ‘भारतीय तत्त्वज्ञान’ (Indian Philosophy) या संकल्पनेविषयी अतिशय व्यापक व मुक्त दृष्टीकोन समोर मांडतात. त्यांच्या मते, ‘भारतीय तत्त्वज्ञान’ असा शब्दप्रयोग केला जातो, तेव्हा ‘भारतात मांडलेले तत्त्वज्ञान’ असा न घेता, “भारतीय तत्त्ववेत्त्यांनी तपशीलवार मांडलेले तत्त्वज्ञान” असा अर्थ घेतला पाहिजे.

प्रो. बारलिंगे यांच्या मते, भारतीयहे विशेषण तत्त्वज्ञानाचे नाही, तर लेखकांचे असले पाहिजे, तत्त्वज्ञानाचे विशेषण नाही. भारतीयहे विशेषण लेखक-तत्त्ववेत्ते यांना उद्देशून केलेले ‘परिवर्तीत गुणवाचक विशेषणाचे उदाहरण’ मानले पाहिजे, त्यांच्या ‘विचारांना’ उद्देशून उपयोजनात आणलेले विशेषण’ नव्हे.    

थोडक्यात, ‘विचार’ भारतीय नसतात, तर लेखक-विचारवंत व तत्त्ववेत्ते ‘भारतीय’ असतात. एखादी अ-भारतीय किंवा न-भारतीय व्यक्तिदेखील भारतीय विचारकर्त्यांनी मांडलेल्या विचारांबद्दल तिचे विचार मांडू शकतो. त्या व्यक्तीची गणना ‘बिन-भारतीय’ अशी झाली, तरी तिच्या विचारांनी ‘भारतीय विचारविश्व’ समृद्ध होईल.        

प्रो. बारलिंगे यांचे ‘तत्त्वज्ञान’, पर्यायाने ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या संकल्पनेविषयीचे विवेचन अत्याधुनिक आहे. या विवेचनामुळेतत्त्वज्ञानया शब्दाशी निगडीत झालेलेभारतीयत्वाचे अथवावैदिकत्वाचे दडपण नाहीसे होते, दबाव संपतो, आणितत्त्वज्ञान आणि ‘दर्शन’ या संकल्पना वैदिकत्वाच्या बंदिस्त चौकटीतून मुक्त होतात, त्या अधिक व्यापक विचारांना उद्देशून वापरता येते. ती खुली संकल्पना होते. ती दार्शनिक अभिवृत्ती व्यक्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस लागू करता येते. या परिप्रेक्ष्यातून प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील - एक भारतीय दार्शनिक किंवा तत्त्ववेत्ते असा शब्दप्रयोग सार्थकतेने उपयोगात आणता येतो. त्या दृष्टीने शरद् पाटील यांच्या दर्शनशास्त्राची मांडणी भारतीय परिभाषेत पुढीलप्रमाणे करता येऊ शकेल.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

मार्क्सवाद हा पर्याय नसून विश्लेषणाची पद्धती आहे, याचे भान आधीच्या मार्क्सवाद्यांनी दिले होते. तथापि त्याचा विकास भारतीय दर्शनांच्या संदर्भात कसा करावयाचा याचा पहिला धडा कॉम्रेड शरद् पाटील यांनीच दिला. व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांची सांगड कशी घालता येते, याचे थेट प्रात्यक्षिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी करून दाखवले. शरद् पाटील उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या विश्लेषण पद्धतीकडे वळले असते, तर कदाचित ते आणखी नव्या अन्वेषण पद्धतीशास्त्र शोधू शकले असते. त्यांच्या माफुआ आणि सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धतीचा त्यांच्या वारसदाराकडून विकास झाला नाही, तर शरद् पाटील हेच शेवटचे माफुआवादी आणि सौत्रान्तिक मार्क्सवादी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील दर्शन : भारतीय दृष्टीकोनातून -

प्रमेयशास्त्र (Metaphysics) : प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय. जग, माणूस-समाज, अंतिम सत्य इत्यादी. यानुसार शरद् पाटील यांचे प्रमेयशास्त्राचे स्वरूप कोणते? त्याच्या विकासाचे टप्पे किती व कोणते? कोणत्या स्वरूपात ते विकसित झाले आहे, त्यांची एकूण प्रमेये कोणती आहेत, ती त्यांनी कोणत्या पद्धतीने शोधली आहेत; जसे की वर्ण-जात-शोषण आणि स्त्रीदास्य, ऐतिहासिक द्वंदविकास, द्वंद्वात्मकता, जाणीव-नेणीव या सद्वस्तू, इत्यादी प्रमेयांची सुव्यस्थित रचना करणे.  

प्रमाणशास्त्र (Epistemology) : शरद् पाटील यांच्या मते ज्ञानाची साधने किती व कोणती? प्रत्यक्ष-अनुमान-शब्द, मानस प्रत्यय, अंतःप्रज्ञा, बहुप्रवाही अन्वेषण पद्धती किंवा शरद् पाटील म्हणतात तसे ‘बहुप्रवा’ ही ऐतिहासिक भौतिकवादाचे प्रमाणशास्त्र आहे. ते मार्क्सवादाच्या प्रतिबिंबवादी प्रमाणशास्त्राप्रमाणे नाही. ते प्रमाणशास्त्र अनित्यात्मक, dialectical आहे. या सर्वांची रचना, स्वरूप, उपयुक्तता व मर्यादा विशद करणे. थोडक्यात शरद् पाटील यांच्या प्रमाणशास्त्र शाखेचा विस्तार करणे. यात तर्कशास्त्राचा (Logic)चा, जसे की द्वंद्वात्मक तर्कशास्त्र, वैगमनिक तर्कशास्त्र, जाणीव-नेणीव तर्कशास्त्र इत्यादी संकल्पनांचा समावेश करता येतो.  

मूल्यशास्त्र (Axiology) : मूल्य म्हणजे नीतीविषयक (Ethics) आणि सौंदर्यविषयक (Aesthetics) शरद् पाटील यांचे मत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समृद्धी; साहित्य, संगीत, कला, नाट्य इत्यादी सौंदर्यविषयक धारणा, त्यांचे आविष्कार इत्यादी. पारंपरिक धर्म-अर्थ-काम-मोक्ष या पुरुषार्थांचा शरद् पाटील  यांनी लावलेला अन्वयार्थ. या पुरुषार्थ परंपरेशी जोडलेल्या सौंदर्य या मूल्याचा विचार करणेही आवश्यक आहे, जसे की प्राचीन काळापासून ‘काव्यशास्त्र’ या नावाने होत असलेला पारंपरिक भारतीय साहित्यविश्वातील सौंदर्याचा विचार, भरतमुनीचे ‘नाट्यशास्त्र’ यांचा त्यांनी लावलेला अर्थ यांची रचना करणे, त्यातील शोषण, स्त्रीदास्य इत्यादी.

अशा रीतीने ‘शरद् पाटील यांचे प्रमेयशास्त्र’, ‘शरद् पाटील यांचे प्रमाणशास्त्र’ आणि ‘शरद् पाटील यांचे मूल्यशास्त्र’ अशी मांडणी शक्य आहे. या प्रत्येकाचा विस्तार भारतीय परिभाषेत करता येईल, याचे सूचन नोंदवतो. 

थोडक्यात, भारतीय परिभाषेत प्रमाण (ज्ञानमार्ग), प्रमेय (जग व मानव यांचा संबंध यांनी घडलेले मानवी जग हे वास्तव), पुरुषार्थ (मूल्यव्यवस्था -नीती व सौंदर्य) या संबंधी सिद्धान्त आणि विचार मांडतो तो दार्शनिक, त्यांचे दर्शन देतो तो दार्शनिक. तत्त्ववेत्त्याने केवळ मूल्यवान भासणारी वैचारिक अथवा सांकल्पनिक कामगिरी करणे अपेक्षित नाही, तर त्यापुढे जाऊन त्याची कामगिरी मानवी जीवनाला दिशा देणारी, जीवन प्रकाशमान करणारी असावी, अशी अपेक्षा असते; शरद् पाटील ही अपेक्षा पूर्ण करतात. म्हणून भारतीय दार्शनिक दृष्टीकोन, ग्रीक-पाश्चात्य दृष्टीकोन, त्याचप्रमाणे Philosophy, तत्त्वज्ञान आणि दर्शन या तीन संकल्पनांचे मूलार्थ लक्षात घेता शरद् पाटील यांना ‘तत्त्ववेत्ते म्हणता येते, हे निर्विवाद आहे, असे प्रस्तुत लेखाच्या परिप्रेक्ष्यात आणि संकल्पनाविश्वात जाहीर करण्यात अडचण नाही. म्हणून त्यांच्या दार्शनिक विश्वाची सुव्यस्थित रचना करणे आवश्यक राहील.

शरद् पाटील  तत्त्वज्ञान निर्मितीचे उत्तरदायित्व  

आता, एका महत्वाच्या प्रश्नाकडे येणे आवश्यक आहे. शरद् पाटील यांचे या प्रकारचे अकादामिक तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे उत्तरदायित्व कोणाकडे जाते? तत्त्वज्ञानेतर विद्वानांची की, विद्यापीठीय व्यावसायिक अभ्यासकांची? अन्य कोणाची? कोणता समाजगट या कामासाठी अधोरेखित करता येईल? हा अन्य मोठ्या लेखाचा (किंवा ग्रंथाचा भाग) विषय आहे. त्याचे संक्षिप्त सूतोवाच करून ठेवतो. वस्तुतः हे उत्तरदायित्व कोण्या एकावर टाकण्यासारखे एकांगी नाही. शरद् पाटील यांच्या स्वभावतः बहुप्रवाही असण्यासारखेच हे उत्तरदायित्वदेखील ‘बहुप्रवाही बहुजनवादी’ आहे. अर्थात त्याचे स्वरूप आंतरविद्याशाखीय आहे, पण ते तत्त्वज्ञान असल्याने त्यात ‘तत्त्वज्ञान’ हा विषय कळीचा राहील.        

शरद् पाटील  यांचा ‘तात्त्विक जनता वर्ग’

‘बहुप्रवाही बहुजन’पणा लक्षात घेता येथे आणखी एक संकल्पना मांडतो - ‘तात्त्विक जनता वर्ग’. म्हणजे समाजातील ज्या बुद्धिजीवी वर्गाला तत्त्वज्ञानाबद्दल प्रेम आहे असा वर्ग. शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान मार्क्सवादाला अनुसरून असल्याने ‘वर्ग’ संकल्पना उपयोजनात आणण्यात अकादमिक अडचण येऊ नये, पण हा वर्ग शोषक नसून सामाजिक उत्तरदायित्व प्रेमाने निभावणारा वर्ग आहे. साहजिकच हा नवा वर्ग वसाहोत्तर उत्तराधुनिक कालीन आहे.   

शरद् पाटील यांच्याबाबतीत त्यांच्या ‘तात्त्विक जनता वर्ग’मध्ये साम्यवादी, समाजवादी, मार्क्सवादी, पुरोगामी, वैज्ञानिक दृष्टी लाभलेल्या वेगवेगळ्या चळवळीतील कार्यकर्ते, तत्त्वज्ञानेतर विषयांचे निवडक प्राध्यापक, तुरळक पत्रकार यांचा समावेश होतो. एक मोठा लक्षणीय ‘तात्त्विक जनता वर्ग’ गोतावळा शपांना लाभला, पण त्यात बोटावर मोजण्याइतपतच निवडक तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक शरद् पाटील यांच्याकडे फिरकण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे; त्यामागे विविध कारणे आहेत. ती शरद् पाटील यांच्या व्यक्तित्व वैचित्र्यात आणि लेखनशैलीत दडलेली आहेत. या ‘तात्त्विक जनता वर्ग सदस्या’ने काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. तर्कशास्त्राच्या परिभाषेत त्यांना ‘अनिवार्य अटी आणि पुरेशा अटी’ म्हणता येईल.    

काही गृहीतके

ज्याला देशाप्रति प्रेम आहे, शोषक व्यवस्थेच्या जो विरोधात आहे त्याने हे काम केले पाहिजे; मग तो कोणत्याही वर्ण-जाती, वर्गाचा, लिंगाचा (LGBTQIA+) असो.

तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, चिंतक तयार होणे, त्यांनी चिंतन करणे ही पुरेशी अट नाही, तर त्यांनी स्वतःची तात्त्विक दृष्टी विकसित करणे, ती स्थापित करणे, ती संवादी बनवणे आवश्यक राहील.

त्या हेतूने या तात्त्विक जनता वर्गातील उत्सुक तत्त्वज्ञान निर्मात्याने, लेखक व्यक्तीने ‘तत्त्वज्ञान’ विषयात काहीएक निश्चित सुव्यवस्थित प्रशिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे.

ते प्रशिक्षण पदवी, उच्च पदवी आणि स्वतंत्र संशोधन अशा स्वरूपाचे असावे, असे नाही. पण तत्त्वज्ञान या विषयाची आणि त्याच्या पद्धतीशास्त्राची सखोल अकादमिक जाणीव ज्यामुळे विकसित होईल, असा अभ्यास त्या व्यक्तीने करावा, असे मला वाटते.  

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

हेहीपाहावाचा : कॉ. शरद् पाटील : “अब्राह्मणी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना धर्माला विरोध करते. तिने जातिव्यवस्थेला, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध केला पाहिजे, तरच या देशातील धर्मनिरपेक्षता सार्थ होऊ शकते!”

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

शरद् पाटील तत्त्वज्ञानाची इतर पद्धती -

शरद् पाटील यांचा पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष 

मी प्रारंभी नमूद केले आहे की ‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ याचे दोन अर्थ करता येतील. (१) ‘शरद् पाटील यांनी मांडलेले तत्त्वज्ञान’ आणि (२) ‘शरद् पाटील  यांच्या तत्त्वज्ञानाची चिकित्सा, परीक्षण, टीका, सिद्धान्त.

या दोन अर्थांकडे आपण भारतीय वाद-परंपरेला अनुसरून पहिला अर्थ अर्थात त्यांचे समग्र विचार हा ‘पूर्वपक्ष’ आणि त्या विचारांची चिकित्सा हा दुसरा अर्थ ‘उत्तरपक्ष’ म्हणून पाहू शकतो. त्यातही पहिला पूर्वपक्ष आणखी विभागून ‘माफुआचे तत्त्वज्ञान’ हा त्यांचा ‘पूर्वपक्ष’ आणि ‘सौत्रांतिक + मार्क्सवाद’ हा त्यांचा ‘उत्तरपक्ष’ या परिप्रेक्ष्यातून त्यांच्या विचारविश्वाची मांडणी करता येईल, असे मला वाटते.

आधीचे आणि नंतरचे शरद् पाटील

पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष प्रमाणेच आणखी एक मांडणी शक्य आहे. ती म्हणजे ‘आधीचे शरद् पाटील  आणि नंतरचे शरद् पाटील’. भारतीय तत्त्वज्ञानात कोणत्याही तत्त्वज्ञानाच्या प्राचीन अवस्थेला ‘वृद्ध’ म्हणतात, इंग्रजीत ‘early’ असे शरद् पाटील यांचेही मत आहे. पण त्यानुसार ‘वृद्ध’ आणि ‘तरुण’ या परिभाषेपेक्षा ‘आधीचे शरद् पाटील आणि नंतरचे शरद् पाटील’ हे जास्त बरोबर वाटते. त्याच वेळी ‘पूर्व शरद् पाटील आणि उत्तर शरद् पाटील’ असेही होऊ शकते. या संबंधी अधिक विचार करण्याची गरज आहे.           

भारतीय तत्त्वज्ञान : पूर्वपक्ष आणि शरद् पाटील तत्त्वज्ञान : उत्तरपक्ष

मी येथे आणखी एक मांडणी प्रस्तुत करू इच्छितो. ती म्हणजे शपांनी भारतीय दर्शन परंपरेची जी चिकित्सा, मीमांसा, टीका, भाष्य, वार्तिक इत्यादी केले आहे, ते भारतीय वादपरंपरेला अनुसरून ‘खंडन-मंडन’ किंवा ‘पूर्वपक्ष-उत्तरपक्ष’ स्वरूपाची आहे, असे सकृतदर्शनी म्हणता येते. ती काटेकोर शास्त्रशुद्ध मीमांसा आहे. तिच्यात बौद्ध दर्शनातील सौत्रान्तिक संप्रदायात मार्क्सवादाची जोड देऊन नवे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले आहे. आणि भारतीय वैचारिक परंपरा प्रवाही ठेवली आहे. त्यामुळे त्यांची समग्र मांडणी त्यांनी केलेल्या परंपरेच्या खंडनातून विकसित झालेले ‘मंडन’ आहे, म्हणून तो ‘उत्तरपक्ष’ आहे, असे मांडता येते. याचाही अधिक सविस्तर विचार करता येईल.              

मार्क्सवाद हा पर्याय नसून विश्लेषणाची पद्धती आहे, याचे भान आधीच्या मार्क्सवाद्यांनी दिले होते. तथापि त्याचा विकास भारतीय दर्शनांच्या संदर्भात कसा करावयाचा याचा पहिला धडा कॉम्रेड शरद् पाटील यांनीच दिला. व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांची सांगड कशी घालता येते, याचे थेट प्रात्यक्षिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी करून दाखवले.

शरद् पाटील यांच्या निर्गमन पश्चात (१२ एप्रिल २०१४) त्यांनी दिलेली अर्थविवरणे अधिक जटील झाली आहेत. या साऱ्या वर्गात शरद् पाटील यांच्याविषयी शंका, गैरसमज, अपसमज, रोष, संताप, दुखावल्या गेलेल्यांकडून काही प्रमाणात बहिष्कार इत्यादीला सामोरे जावे लागले, त्यावर उत्तरपक्ष रूपात नवा ग्रंथ रचता येऊ शकेल, असे वाटते. 

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

हेहीपाहावाचा : गौतम बुद्ध ते शरद् पाटील या परंपरेच्या नीट वाचनातून येणार्‍या काळातील जगण्याची दिशा सापडेल

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

भारतीय उत्तराधुनिकतेचा दार्शनिक

नंतर त्याही पुढे जाऊन आधुनिक अभ्यासक आणि चिंतकांना शरद् पाटील विरचनावादी, उत्तराधुनिक दार्शनिक मानून त्यांच्या समग्र विचारविश्वाची नव्याने मांडणी करता येईल, असे मला वाटते. मी त्यांना ‘भारतीय उत्तराधुनिकतेचा दार्शनिक’ असे म्हणू इच्छितो.

शरद् पाटील यांनी भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेले योगदान कोणते? शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान कोणते? कुंठीत विचार प्रवाहीत केला, याचा नेमका अर्थ काय? तर (१) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद विश्लेषण पद्धती, (२) त्यातूनच विकसित झालेली सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धती आणि (३) वर्ण-वर्ग-जात-स्त्रीदास्याचा अंत करणारा साम्यवाद, हे तीन मुख्य सिद्धान्त हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणजे “दार्शनिक सत्य आणि भौतिक मुक्ती कधी चिरस्थायी, त्रिकालाबाधित नसते. कालचे सत्य आजचे असत्य बनून (त्या) अस्थिर सत्याला अधिक दुर्बोध करते. कालची मुक्ती आजची गुलामगिरी बनून (त्या) अस्थिर मुक्तीला आणखी अस्थिर करते”, हे त्यांचे प्रतिपादन.” 

आजच्या (खरे तर कालच्या), उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत मांडावयाचे झाले तर शरद् पाटलांचे कार्य विरचनावादी (डीकंष्ट्रक्शन) आणि पुनर्रचनावादी (रिकंष्ट्रक्शन) म्हणता येईल. महाभारत, रामायण, उपनिषदे, पुराणे आणि मिथके तसेच अनंत भाकडकथा यांच्या महाकथनाच्या (ग्रँड नॅरेशन) जडशीळ ओझ्याखाली दबलेली अब्राह्मणी परंपरा त्यांनी मोठ्या शर्थीने मुक्त केली. या महाकथनाचे उत्तर बारीकसारीक कथाकथनांनी नाही, तर मूळ महाकथनांची विरचना करून देता येईल, असे त्यांच्या बाजूने म्हणता येईल.

ब्राह्मणी पुरुषी इतिहासाने स्त्रीशूद्रांचा मानवी जीवन विकासातील भूमिकाच नाकारली. म्हणूनच ‘घटनांची निवड’ हा इतिहास लेखनातील धोका आहे, हे त्यांच्या ‘निॠती’ या संकल्पनेच्या विश्लेषणातून समजते. 

शरद् पाटील उत्तराधुनिक तत्त्वज्ञानाच्या विश्लेषण पद्धतीकडे वळले असते, तर कदाचित ते आणखी नव्या अन्वेषण पद्धतीशास्त्र शोधू शकले असते. त्यांच्या माफुआ आणि सौत्रान्तिक मार्क्सवादी पद्धतीचा त्यांच्या वारसदाराकडून विकास झाला नाही, तर शरद् पाटील हेच शेवटचे माफुआवादी आणि सौत्रान्तिक मार्क्सवादी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.     

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

तत्त्वज्ञान निर्मितीचे कार्य : वैचारिक सहकारी मित्रांची सहयोगी चळवळ    

येथे एक मुद्दा अधोरेखित होणे नितांत आवश्यक आहे. तो म्हणजे शरद् पाटील यांचे विविधांगी विचार विशद करत राहणे, तेच ते मुद्दे वेगवेगळ्या वाक्यरचना करून मांडणे, त्यांचा रतीब घालत राहणे, त्यांचे विविध विचार सांगणे, त्या विचारांना सामाजिक, राजकीय, आर्थिक सांस्कृतिक इत्यादी लेबले लावणे म्हणजे ‘शरद् पाटील यांचे तत्त्वज्ञान’ रचणे नव्हे, याची जाणीव अभ्यासक, चिंतक इत्यादींनी विकसित करणे नितांत अनिवार्य आहे.

तत्त्वज्ञान निर्माण करणे, हे सर्वांचे काम असले तरी “...चे तत्त्वज्ञान” निर्माण करणे, हे काही अंशी व्यावसायिक तत्त्ववेत्त्याचे आणि बरेचसे तत्त्वज्ञान-प्रेमींचे काम आहे, असे मला वाटते. मग या तत्त्वज्ञान-प्रेमींचा व्यावसायिक विषय कोणताही असो. तत्त्वज्ञान निर्मिती ही केवळ तत्त्ववेत्त्यांचीच जबाबदारी आहे, ही संकल्पना आता जागतिक पातळीवरच कालबाह्य झाली आहे. याचे कारण आता तत्त्वज्ञानाने विविध वैज्ञानिक व तंत्रज्ञान प्रांतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिकशास्त्रात, मानव्य विद्याशाखेत उपयोजनाचे परिमाण स्वीकारले आहे.

तत्त्वज्ञानाच्या किमान उपयोजित तत्त्वज्ञानाच्या सात शाखा गेल्या दोन दशकांत विकसित झाल्या असून विशेषतः तंत्रज्ञान व सामाजिक विज्ञानात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचेचे तत्त्वज्ञान, संगणक विज्ञानाचे नीतिशास्त्र, माहितीचे तत्त्वज्ञान, अभियांत्रिकीचे तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञानाचे तत्त्वज्ञान, मज्जातंतु सौंदर्यशास्त्र, जैवरसायनशास्त्र तत्त्वज्ञान,  सूक्ष्मजीव विज्ञानाचे नीतिशास्त्र, माध्यमांचे तत्त्वज्ञान, शेतीचे नीतिशास्त्र, शेतीचे तत्त्वज्ञान इत्यादी शेकडो नवी तत्त्वज्ञाने विकसित होत आहेत. ही सारी आंतरविद्याशाखीय तत्त्वज्ञान क्षेत्रे आहेत. तेथे केवळ तत्त्वज्ञानाच्या नव्हे, तर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपापले योगदान दिले आहे.

हे वास्तव लक्षात घेता तत्त्वज्ञान निर्मिती ही आता ‘वैचारिक सहकारी मित्रांची सहयोगी चळवळ’ बनली आहे. तत्त्वज्ञान निर्मिती ही केवळ तत्त्ववेत्त्यांची मक्तेदारी उरलेली नाही. ती अनेक ज्ञानक्षेत्रीय तज्ज्ञांनी आणि तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थी, प्राध्यापकांनी मिळून बनली आहे. तत्त्वचिंतन हे ‘वैचारिक सहकारी सहयोगी क्षेत्र’ बनले आहे. म्हणून शरद् पाटील  यांचे तत्त्वज्ञान निर्मिती ही सहकारी वैचारिक चळवळ बनली, तर तिला काहीसे नेटके अकादामिक स्वरूप येऊ शकेल.

शरद् पाटील यांनी जाणीव-नेणीव ही संकल्पना मांडून विचारांचे एक वेगळे दालन उघडले. व्यक्तिगत जाणीव आणि सामूहिक जाणीव, व्यक्तिगत नेणीव आणि सामूहिक नेणीव अशा जोड्या मांडून त्यांचे स्वतंत्र त्याचे एक वेगळे तर्कशास्त्र मांडले. ते तर्कशास्त्राचा अभ्यास म्हणून केले जाते. तथापि त्यांच्या निर्गमन पश्चात विज्ञान-तंत्रज्ञानाने ‘जाणीव-नेणीव’ या संकल्पनेला नवा आयाम दिला, नवा आशय दिला. ती लक्षात घेणे आवश्यक ठरते.      

(प्राच्यविद्यापंडित शरद् पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय मराठी अभ्यास परिषदेच्या ३५व्या अधिवेशनात शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केलेल्या निबंधाचा संपादित अंश.) 

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास हेमाडे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

shriniwas.sh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

गुरुदत्तने वयाच्या ३२व्या वर्षी ‘प्यासा’, ३४व्या वर्षी ‘कागज के फूल’, ३६व्या वर्षी ‘साहिब बीबी और गुलाम’ केला आणि वयाच्या ३९व्या वर्षी हे जग सोडले!

चंदेरी दुनियेचे रिवाज आणि बेमुर्वतपणा गुरुदत्तना माहिती होता, पण तरीही त्यांनी कलात्मक चित्रपट काढले. ‘Cash and classics’ या लेखात (‘सेल्युलॉइड’ या मासिकातील लेख) गुरुदत्त म्हणतात, “कलात्मक मूल्ये आणि यश यांचे गणित जपण्याचा प्रयत्न करायला हवा. जगातील अनेक कलासक्त माणसांनी सातत्याने हे अपयश आणि अवहेलना पचवली आहे... बुचकळ्यात टाकणाऱ्या या अनिश्चिततेमुळे खरे तर, निर्मितीच्या उत्कट आनंदाची ‘नशा’ अनुभवता येते.”.......