अजूनकाही
२०१८मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ने म्हणजे एनआयएने जाहीर केला आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञा ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींना ‘पुराव्याअभावी’ निर्दोष मुक्त करण्यात आले. या निकालावर अपेक्षेप्रमाणे लगेच विविध प्रतिक्रिया आल्या. अशा खटल्यांतून सर्व आरोपी निर्दोष कसे सुटतात, तपास-यंत्रणांनी योग्य प्रकारे तपास करून पुरावे मिळवले नाहीत, की त्यांना योग्य प्रकारे पुरावे सादर करता आले नाहीत वगैरे वगैरे. पण भाजपनेते आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अशी होती की, ‘हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाहीत. त्यामुळे ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘भगवा दहशतवाद’ असे म्हणणे चुकीचे आहे.’ ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘भगवा दहशतवाद’ हे शब्दप्रयोग करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
या निकालाच्या आधी १० दिवसांपूर्वी म्हणजे २१ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने २००६मध्ये मुंबई लोकमध्ये झालेल्या ‘प्रेशर कुकर स्फोट मालिके’तील सर्व ११ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. तेव्हाही न्यायालयाने दिलेले कारण तेच होते, आरोपींनीच गुन्हा केला असल्याबाबतच्या ठोस पुराव्यांचा अभाव.
भाजपच्या मते, मुंबईतील स्फोटांबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल ही तात्पुरती घटना आहे. हा निकाल चुकीचा आहे, तसे न म्हणता ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयात बदलला जाऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे; तर मालेगाव स्फोटाबाबतचा निकाल मात्र भाजपच्या दृष्टीने अंतिम समजण्यात येत असल्यामुळे त्यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात काहीच अर्थ नाही असे, भाजपला वाटते. त्यामुळे या निकालावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची नाही, असा त्यांचा निर्णय (का निर्धार?) आहे.
भाजपची अशी ठाम समजूत आहे की, इस्लाम हा त्याच्या अनुयायांना अशा प्रकारची कट-कारस्थाने करण्यास उद्युक्त करणारा धर्म आहे. आणि तसे भाजपनेते वेळोवेळी बोलूनही दाखवत असतात. खरे तर अशा प्रकारे न्यायालयाचा एक निकाल तात्पुरता आणि दुसरा अंतिम ठरवणे, हे कायदेशीररीत्या बरोबर असू शकत नाही. तरीही तसे म्हटले जात आहे, कारण ते भाजपच्या विचारसरणीला सोयीचे आहे.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आता ‘हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाहीत’, या भाजपच्या म्हणण्यावर चर्चा सुरू झाली आहे. ती करणाऱ्यांत भाजपच्या म्हणण्याला त्यांच्या विचारसरणीचे लोक पाठिंबा देणारे आणि त्यांना विरोध करत त्याविरुद्ध बोलणारे, अशा दोन्ही प्रकारचे असतात. अर्थात भाजपच्या ‘हिंदू कधीच दहशतवादी असू शकत नाहीत’ या म्हणण्याला ‘गोदी मीडिया’ही उचलून धरतो आहे. याउलट विरोध करणाऱ्यांना ‘शहरी नक्षलवादी’, ‘सरकारविरोधी’ वा ‘देशद्रोही’ ठरवले जाईल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अन्य नेते, भाजप सदस्य व सहानुभूतीदार म्हणतात की, हिंदू दहशतवादी असूच शकत नाहीत. आता त्यांचे म्हणणे खरे मानायचे म्हणजे गांधीहत्या करणारा नथुराम गोडसे हिंदू नव्हता, प्रथमच मानवी बॉम्ब (सुइसाइड बॉम्ब) बनवणारे श्रीलंकेतील लिबरेशन ऑफ तमिळ टायगर्स (एलटीटीए)चे सदस्य हिंदू नव्हते, राजीव गांधींची हत्या करणारे तमिळ टायगर्सचे अनुयायी, आणि माओवादी - ज्यांना उजव्या विचारांचे लोक नेहमी ‘दहशतवादी’ म्हणतात - ते हिंदू नाहीत!
त्याचप्रमाणे शीखही - ज्यांना हिंदुत्व विचारसरणीचे लोक हिंदूच समजतात, त्यांनी खलिस्तानी चळवळ सुरू केली आणि ज्यांच्या कृत्यांत सर्रास दहशतवादच दिसला - हिंदू नाहीत. शिवाय दडपशाही करणाऱ्या ब्रिटिशांच्या वसाहतवादी, जुलुमी राज्यात ज्या अनेकांनी स्वातंत्र्यलढा (ज्यात संघाचा कधीच सहभाग नव्हता) दिला आणि ज्यांना दहशतवादी म्हटले गेले, तेही हिंदू नव्हते, असेच म्हणावे लागेल.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत बोलायचे, तर त्या खटल्यात सुरुवातीला असलेल्या फिर्यादी वकील रोहिणी सालियन यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले आहे की, २०१४मध्ये केंद्रात सत्तापालट झाल्यानंतर काय झाले, त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या म्हणाल्या होत्या की, त्या वेळी त्यांना एनआयएच्या एका अधिकाऱ्याने बोलावून घेऊन सांगितले की, तुम्ही मालेगाव खटल्यात नरमाईने घ्या (गो सॉफ्ट ऑन मालेगाव केस). सालियन यांनी त्या वेळी सांगितले होते की, त्यामुळे त्या वेळी कलम १६४ अन्वये दंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेला पुरावा बाजूला सारून सुधारित पुरावा सादर करण्यात आला होता. त्यांनी त्यानंतर सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिला. त्यांनी या खटल्याच्या निकालानंतर म्हटले आहे की, ‘हा एनआयए कोर्टाचा निकाल मला अपेक्षितच होता. आता मालेगाव खटल्याच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाते किंवा नाही, हे पाहायचे.’
दरम्यान या प्रकारच्या विविध प्रकरणांत सुटका झालेल्यांचे तसेच शिक्षा भोगून सुटलेल्यांचे सत्कार करणे, त्यांच्या मिरवणुका काढणे वगैरे सोहळे होतीलच. कारण गेल्या काही वर्षांत भाजपकडून अशा लोकांचा सत्कार करून मिरवणुका काढण्याचा पायंडाच पडला आहे. त्याद्वारे ते सिद्ध करू पाहतात की, हे न्यायालयाकडून मुक्त झालेले किंवा शिक्षा होऊन सुटलेले आरोपी आमचे ‘हीरो’ आहेत. लोकांनी त्यांना तसे मानले पाहिजे, कारण आता आमचे राज्य आहे. आमच्या कुणाही माणसाला शिक्षा होवो वा न होवो ते निरपराधच आहेत, कारण ते हिंदू आहेत! आणि इतरांनीही त्यांना तसे मानायला हवे.
हे वारंवार सांगण्यामागे त्यांना असे दाखवून द्यायचे असते की, आमच्या राज्यात आम्ही काहीही करू शकतो! आम्हाला उच्चपदस्थांचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणूनच २०१४च्या सत्तापालटानंतर अनेक ठिकाणी कथित गोरक्षक गोमांस असल्याच्या केवळ संशयावरून मारहाण करतात, काही वेळा ती जीवघेणी असते, तरी आम्ही कसा पराक्रम केला, हे ते अभिमानाने सांगतात.
अशा प्रकारच्या अनेक घटना देशभर घडल्या आहेत आणि घडत राहतील. कारण हे गुन्हे करणाऱ्यांना फारशी अटक झालेली नाही आणि शिक्षादेखील झालेली नाही, कारण ती ‘वजिरा’ची ‘प्यादी’ आहेत. त्यामुळे बऱ्याचदा पोलीससुद्धा या केवळ संशयापोटी कुणालाही मारहाण करणाऱ्या या गोरक्षकांबाबतची तक्रारच नोंदवून घेत नाहीत. उलट या प्रकारची तक्रार करणाऱ्यावरच गुन्हा दाखल करतात.
आता कळीचा प्रश्न असा आहे की, या कथित गोरक्षकांना एखादे मांस गोमांस आहे, हे कसे समजते? त्यांच्याकडे दिव्यदृष्टी आहे का? मुळात ते मांसाहारीही नसतात. खरे तर ते इतर प्राण्यांचेही मांस असू शकते, नव्हे असतेदेखील. नुकत्याच एका प्रकरणात मांसाची तपासणी झाली, तेव्हा ते गोमांस नाही असे दिसून आले. पण केवळ संशय आला म्हणून कोणालाही अडवणे, त्याला मारहाण करणे, प्रसंगी जीवही घेणे वगैरे प्रकार सर्रास होत आहेत. अगदी कुणाच्याही स्वयंपाकघरात जाऊन तेथे नासधूस करण्याचे प्रकारही अनेकदा झाले आहेत. संबंधित ते मांस गायीचे आहे की, अन्य कोणत्या प्राण्याचे आहे याची तपासणी कोण करणार, हा प्रश्नच आहे. पण कथित गोरक्षकांच्या या कृत्याला ‘दहशत’ म्हणायचे नाही, कारण हे स्वयंघोषित गोरक्षक हिंदू असतात. त्यामुळे ते दहशतवादी असणारच नाहीत!
शेतकऱ्यांच्या दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणारा भाजपच्याच मंत्र्याचा मुलगा हाही हिंदू नाही असे म्हणायचे आणि त्या शेतकऱ्यांवर वाहने घालणारेही हिंदू नाहीत, असे म्हणायचे? दिल्लीतील शाहीन बागेतील मुस्लीम महिला आंदोलन करत होत्या, तेव्हा भाजपचाच एक नेता ‘गोली मारो सालों को’, असे म्हणत होता. तो कोण म्हणायचा?
अगदी अलीकडेच पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ जणांना प्राण गमावावे लागले. त्यातील एक जण हिमांशी नरवालचा पती होता. त्या दुर्घटनेनंतर ती असे म्हणाली की, ‘यावरून काश्मिरी लोक आणि मुस्लिमांना लक्ष्य करू नका.’ त्यावर भाजप जल्पकांनी तिच्यावर टीकेचा भडिमार केला. हा ‘सायबर दहशतवाद’ नाही का? नाहीच कारण ते सर्व जण हिंदूच आहेत!
बलदंड (मस्क्युलर) हिंदुत्वाने आता समाजातील दरी रुंदावत नेली आहे. दोन जमातीतील सामंजस्य आणि बंधुभाव दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. त्यामुळे मुलिमांवर बहिष्कार घातला जात आहे. त्यांची दुकाने बंद करावयास लावली जात आहेत आणि केवळ संशयावरून त्यांची घरे पाडून अनेक कुटुंबे उदध्वस्त केली जात आहेत, याला ‘दहशतवाद’ नाही, तर काय म्हणायचे?
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मालेगाव खटल्यातील आरोपींबाबत पुरावा नाही असे म्हणणे, हे स्वामी असीमानंद यांची त्या वेळची साक्ष आणि पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा त्या बाबतचा अहवाल वाचला, तर त्याच्या विरुद्ध आहे, असे स्पष्टपणे दिसते.
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश इत्यादींचे राजरोस, दिवसाढवळ्या खून झाले, त्या खटल्याचा निकाल दहा वर्षे झाली तरी अद्याप लागलेला नाही. लवकर लागेल असेही वाटत नाही. कारण त्याखटल्यांतही साक्षीदार उलटत आहेत, साक्ष बदलत आहेत. यामागचे रहस्य वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही. पुरावे नाहीसे झाले, तरी फार आश्चर्य वाटणार नाही. कारण तीच भाजपची पद्धत आहे. ते संशयितही निर्दोष सुटले, तर आश्चर्य वाटायला नको! कारण ते हिंदूच आहेत. ते अशी कृत्ये करणेच शक्य नाही.
गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये झालेल्या हत्याकांडाचे सूत्रधार अजूनही मोकळेच आहेत, दंगलीच्या वेळी लष्कर विमानतळावर आले असतानाही त्यांना लगेच गाड्या न पुरवणारे कोण होते, दंगेखोरांना काय करायचे ते करू दे, तुम्ही मध्ये पडू नका, असे पोलिसांना सांगणारे तत्कालीन मंत्रीदेखील भाजपचे हिंदूच होते. मात्र आता ते उच्च पदे भूषवत आहेत, हे आपण पाहतोच आहोत.
थोडक्यात, काय तर तुम्ही ‘हिंदू’ असाल तर तुम्हाला काहीही करायला मोकळीक आहे, तुम्हाला कोणीही ‘दहशतवादी’ म्हणू शकणार नाही!
.................................................................................................................................................................
लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.
aashriketkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment