‘पत्र आणि मैत्र’ : मराठी साहित्यव्यवहाराचे आणि विशेषत: मुद्रण\प्रकाशन-संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ग्रंथातून लेखक, वाचक आणि समीक्षक ही त्रिपुटी नेमकी कशी आहे, हेही उमगते
ग्रंथनामा - झलक
सदानंद मोरे
  • ‘पत्र आणि मैत्र’, ‘वाणी आणि लेखणी’ या पुस्तकांची मुखपृष्ठं आणि दिलीप माजगावकर
  • Wed , 13 December 2023
  • ग्रंथनामा झलक दिलीप माजगावकर Dilip Majgaonkar राजहंस प्रकाशन Rajhans Prakashan पत्र आणि मैत्र Patra aani Maitra वाणी आणि लेखणी Vani aani Lekhani

राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी वयाची ८० वर्षं पूर्ण करून ८१व्या वर्षांत पर्दापण केले आहे. त्यानिमित्ताने ‘पत्र आणि मैत्र’ हे त्यांनी त्यांच्या लेखकांना लिहिलेल्या निवडक पत्रांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. वीणा गवाणकर, विजय तेंडुलकर, वि. स. वाळिंबे, अशोक जैन, कविता महाजन, सुनीता देशपांडे, गिरीश प्रभुणे, प्रभाकर पणशीकर, सदानंद मोरे, रवींद्र पिंगे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, पुष्पा भावे, अंबरीश मिश्र, अविनाश धर्माधिकारी, अभय बंग, रामदास भटकळ, ल. म. कडू, अभिराम भडकमकर इ. मान्यवर लेखकांनी लिहिलेली ३९ पत्रं, श्रीपुंनी माजगावकरांना लिहिलेलं एक पत्र, माजगावकरांच्या मुलाखतींचं संकलन आणि ‘असे दिसले दिगमा’ या विभागात अशोक प्रभाकर डांगे, अंबरीश मिश्र, आनंद आवधानी, दत्तप्रसाद दाभोळकर, मंगला आठलेकर, मंगला गोडबोले, मुकुंद संगोराम, विनया खडपेकर, डॉ. सदानंद बोरसे यांचे लेख, असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. प्रशांत दीक्षित, मंगला आठलेकर, रेखा माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, सारंग दर्शने यांच्या संपादक मंडळाने सिद्ध केलेल्या या ग्रंथाला महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

खरे तर शेकडो ग्रंथ प्रसिद्ध करणारे दिलीपराव स्वतः मात्र प्रसिद्धीपासून अलिप्तच राहिले. पहिल्यापासूनच सभा, समारंभ, उत्सव यांत ते सहसा दिसणार नाहीत. अगदी राजहंसच्या पुस्तकांच्या प्रकाशनसमारंभात किंवा त्यांच्यावरील चर्चेतदेखील ते क्वचित दिसतील. तथापि निदान सहस्रचंद्रदर्शनाच्या वयात तरी त्यांनी आपल्या अनुभवांची पोतडी उघडावी, असा आग्रह त्यांच्या चाहत्यांनी धरल्यामुळे त्याला मोडते घालणे, त्यांनाही शक्य होईना. प्रस्तुत ग्रंथ हा सर्वांच्या आग्रहाचे फलित होय.

हा ग्रंथ मला महत्त्वाचा वाटतो, कारण तो मराठी साहित्यव्यवहाराचे आणि विशेषत: मुद्रण\प्रकाशन-संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. त्यातून प्रकाशक म्हणून माजगावकरांचे व्यक्तित्व आणि योगदान लक्षात तर येणारच; शिवाय मराठी लेखक, वाचक आणि समीक्षक ही त्रिपुटी नेमकी कशी आहे, हेही उमगते.

ग्रंथातील लेखनाचे वर्गीकरण करायचे झाले, तर स्वतः माजगावकरांनी आपल्या लेखकांशी व काही संबंधितांशी पत्राद्वारा साधलेला संवाद, मुलाखतकारांनी वेगवेगळ्या निमित्ताने घेतलेल्या त्यांच्या मुलाखती आणि त्यांच्याविषयी इतरांनी लिहिलेले लेख असे करावे लागते. आपल्या लेखकाचे पुस्तक प्रकाशित करताना त्याला पत्र लिहून पुस्तकाविषयी, लेखकाविषयी आणि प्रकाशनाच्या प्रक्रियेविषयी व्यक्त होण्याची माजगावकरांची पद्धत आहे. त्यातून त्यांची वाङ्मयीन दृष्टी स्पष्ट होते. परंतु हे वाङ्मय ज्या समाजाच्या व्यवहारांचा एक भाग असतो, त्याच्या संस्कृतीविषयीही त्यांना काही म्हणायचे असते. संबंधित लेखकाचे व त्यांचे व्यक्तिगत पातळीवरील संबंधही कधीकधी उलगडत जातात. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून व मतांवरून काही तात्त्विक व काही व्यावसायिक मार्गदर्शक सूत्रेही हाती लागतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्वतः दिलीपराव ज्यांच्यामुळे प्रकाशनव्यवसायात पाऊल टाकते झाले, ते त्यांचे ज्येष्ठ बंधू श्रीगमा असेच एक विलक्षण रसायन होते. ‘माणूस’ची वाटचाल अडीच वर्षे मासिक, नंतर पाक्षिक, आणि जून १९६६मध्ये साप्ताहिक अशी झाली. त्याच वर्षी नेमके सांगायचे झाल्यास १ जून १९६६ या दिवशी श्री. गं.च्या निमंत्रणावरून दिलीपरावांनी मदतनीस म्हणून ‘माणूस’ कार्यालयात पाऊल टाकले. म्हणजेच हा काळ पाक्षिकाचे साप्ताहिक होण्याचा संक्रमणकाळ होता.

‘माणूस’साठी काम करताना दिलीपरावांना अनेक गोष्टी शिकता आल्या. सारंग दर्शने आणि प्रशांत दीक्षित या ज्येष्ठ पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत स्वतः दिलीपरावांनीच या उमेदवारीच्या काळाबद्दल सांगितले आहे, “सुरुवातीला मला नाटक, चित्रपट या विषयांवरील मजकूर श्री.ग. संपादनासाठी द्यायचे. दुसऱ्या बाजून मी प्रूफरीडिंग करायला शिकलो आणि त्याच वेळी प्रेसमधून अंकाची छपाई करण्याचं काम माझ्याकडे आलं. थोडक्यात ‘जिथं कमी, तिथं मी’ अशी कामाची वाटणी होती.” त्यामुळे लेखन मिळवणे, जाहिराती मिळवणे या कामांबरोबरच दिलीपरावांना माणूसच्या विक्रीव्यवस्थेकडेही लक्ष द्यावे लागले. त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत. “ही सुरुवातीची दोन-तीन वर्ष माझी सर्वार्थानं या क्षेत्रातील पायाभरणीची वर्ष होती. आणि श्री.गं.चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मला त्यांनी निर्णयस्वातंत्र्य दिलं, म्हणून मी मनासारखं काम करत गेलो”, असे स्वतः तेच मुलाखतीत स्पष्ट करतात.

विशेष म्हणजे ज्या दिवशी दिलीपराव ‘माणूस’मध्ये आले, त्याच दिवशी अरुण साधूही तेथील नोकरीत रुजू झाले. जडणघडणीच्या वयात साधूंसारखा साक्षेपी लेखक, सहकारी लाभणे, हाही एक योगच म्हणावा लागेल. पुढे राजहंसची सर्व जबाबदारी घेतल्यानंतर प्रकाशक म्हणून लेखक, विषय इत्यादींची निवड करणे, त्यानुसार संपादनमुद्रणाची प्रक्रिया पुढे नेणे इ. गोष्टी दिलीपरावांनी ज्या साक्षेपाने व चोखंदळपणाने केल्या, त्याची पूर्वतयारी अशा प्रकारे ‘माणूस’मधील या उमेदवारीच्या काळातच झाली. दिलीपरावांच्या मते “पासष्ट ते ऐंशी हा जो काळ होता, हा एकूणच सर्व क्षेत्रांतलं काही नवं घडण्याचा, जुनं मोडण्याचा काळ होता. या काळात मुंबईमध्ये वावरण्यानं दिनकर गांगल, अशोक जैन, अनंत भावे, पुष्पा भावे, रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, दत्तप्रसाद दाभोळकर या सर्वांना भेटत होतो. त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना समजून घेत होतो. ही मंडळी वाचतात काय? लिहितात काय? त्यांची शैली कशी आहे? या सगळ्या गोष्टी मी बारकाईनं पाहत असायचो.”

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

मुंबईतील चर्चांच्या अड्डयात नेहमी बरोबर असलेल्या दाभोळकरांच्या शब्दांत सारांश सांगायचा झाल्यास, ‘सारे कसे मंतरलेले होते.’

मंतरलेपण हा एक रोमँटिक प्रकार आहे, पण त्याच्यापलीकडे जाऊन माजगावकर या व्यवसायातील बारीकसारीक खाचाखोचाही शिकले. त्याचे काही श्रेय ‘संगम प्रेस’चे माधवराव पटवर्धन यांना द्यावे लागते. खरे तर सौंदर्यदृष्टी हा पटवर्धन कुटुंबाचाच एक भाग होता. तिची अभिव्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रांत होत राहिली. माधवरावांच्या वाट्याला मुद्रणाचे क्षेत्र आले, त्याचा फायदा दिलीपरावांना झाला.

साप्ताहिक, प्रकाशन आणि छापखाना या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सांभाळणे, ही काही सोपी गोष्ट नव्हे. त्यात परत आदर्शवादाची भर पडली, तर ती अधिक अवघड होते. याचा अनुभव दिलीपरावांना येत होता. लेखक-प्रकाशकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शन या व्यवसायात आवश्यक असतेच, पण शेवटी अनुभवासारखा दुसरा गुरू नसतो. मात्र त्यासाठी तुमच्यात चुका करत शिकायची क्षमता असावी लागते. ती दिलीपरावांकडे होती, म्हणूनच मुद्रणव्यवसायाला रामराम ठोकून पूर्णवेळ प्रकाशनाकडे लक्ष द्यायचा निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतला.

मुंबईतील वातावरण कसे अनुकूल होते, हे माजगावकर सांगतात. पण खरे तर एकूण मराठी साहित्यविश्वातील वातावरणच अनुकूल होते. ‘६० ते ८५-९० ही २५/३० वर्ष हा प्रकाशनव्यवसायाच्या ऐन बहराचा काळ’ असल्याचेही ते सांगतात. त्यासाठी ते ‘गोल्डन पीरियड’ असा यथार्थ शब्दप्रयोग करतात.

पण हे झाले साहित्यनिर्मितीच्या बाबतीत. प्रकाशित केले गेलेले साहित्य नीट वितरित करायची बाजू मात्र लंगडी होती. या पोकळीवर मात करण्याचा प्रयत्न ‘ढवळे ग्रंथयात्रा’ आणि विशेषत: ‘ग्रंथाली’च्या चळवळीने यशस्वीपणे केला. मात्र दिलीपरावांनी पूर्ण वेळ प्रकाशनव्यवसायात गुंतवून घेतले, ते या पार्श्वभूमीवर.

याच काळात दिलीपरावांनी काही धाडसी प्रयोगही केले. त्यातील ‘नेहरू डायरी’सारखे काही प्रयोग अंगावरही आले. पण हिंमत आणि हिकमत यांच्या आधारावर ते या परिस्थितीतून मार्ग काढू शकले. माणसाच्या यशापयशात दैवाचाही वाटा असतो, हा अनुभव त्यांनी घेतला आहे. नेमक्या त्याच वेळी राजहंसला ‘पानिपत’ने आणि अशोक जैन अनुवादित ‘इंदिरा गांधीं’च्या चरित्रानेही हात दिला. त्यानंतर राजहंसवर कधी उचललेले पाऊल मागे घेण्याची वेळ आली नाही. दाभोळकरांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास ‘त्या काळातील ‘राजहंस’चा इतिहास हा ‘जय नावाचा इतिहास’ आहे.’

पण खरी कसोटी तर येथेच आहे.

जागतिकीकरणाच्या लाटेत लोकांचे अग्रक्रम बदलल्याने साहित्यविषयक वातावरणच फार क्षीण झाले. वाङ्मयविषयक मासिकं बंद पडली. वृत्तपत्रांत एके काळी वाङ्मयाला जी जागा मिळायची, ती एकदम आक्रसली. साहित्यिक चर्चा मंदावल्या. साहित्यिक अड्डे संपले. एक साहित्यिक दुसऱ्याचं वाचेनासा झाला किंवा त्यावर जाहीर बोलणं टाळू लागला. त्यामुळे साहित्यिक वाद-विवाद थांबले. दूरदर्शन आणि खाजगी वाहिन्यांनी तर हा विषय अडगळीतच टाकला. या वातावरणाला उद्देशून राम पटवर्धन म्हणाले की, ‘हो, साहित्याच्या वातावरणात आज कानठळ्या बसवणारी शांतता आहे.’

जागतिकीकरण आणि उदारीकरण या प्रक्रियांत ‘इंटरनेट’ नावाच्या नव्या माध्यमाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे ‘मराठी प्रकाशन साहित्याच्या अंगानं बहरलं का खुरटलं?’ या टोकदार प्रश्नावरील दिलीपरावांचे उत्तर सम्यक आणि समतोल आहे. ही दोन्ही टोके त्यांना मान्य नाहीत. त्यांच्या मतांनुसार ‘इंटरनेट हा एक तंत्रबदल होता. त्यापूर्वी जागतिकीकरण हा एक महत्त्वाचा, वैचारिक, धोरणात्मक बदल होता. त्यामुळे खरं तर फार मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल झाले.’

“ही वाट मी शोधली असं नाही. ह. वि. मोटे आणि त्यांच्या पिढीतल्या काहींनी शोधलेली ही वाट आहे. मला ती पटली आणि माझ्या प्रकृतीला ती मानवली इतकंच... श्री.पु. माझा आदर्श असले, तरी ते माझं ‘स्कूल’ नाही. माझं ‘स्कूल’ ह. वि. मोटे किंवा रा. ज. देशमुख यांचं. ती मोठी माणसं. मोठी कामं त्यांच्या हातून होऊन गेली. ‘रणांगण’, ‘विश्रब्ध शारदा’, ‘बहुरूपी’, ‘स्वामी’ अशी अनेक पुस्तकं त्या दोघांनी दिली. त्या उंचीचं काम आपल्या हातून व्हावं, ते होईल का याची मनात धास्ती असते. प्रत्येकाची कामाची शैली भिन्न असते. एखादं साहस करावं, त्यातून दोन घरं पुढं जावं - अशी माझी शैली. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर यांपेक्षा माझ्या मानसिक प्रकृतीला मानवणारी.”

या बदलाचे लेखकांच्या लेखनावर व प्रकाशकांच्या प्रकाशनावर झालेल्या परिणामांचे चिंतन दिलीपराव करतात. समाजमाध्यमांवरील घाईघाईत दिलेल्या अनभ्यस्त प्रतिक्रिया त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाहीत. ते म्हणतात, ‘‘लेखकानं हे कधीही विसरता कामा नये, की साहित्यनिर्मिती ही गंभीरपणे घेण्याची कृती आहे. कोणतीही कला, मग ते साहित्य असो, संगीत असो, चित्रकला असो; तो एक दीर्घकाळ चालणारा प्रवास असतो. कोणत्याही कलेला रियाज लागतो.”

लेखकांना सल्ला द्यायचा अधिकार त्यांना आहेच आहे. ते सांगतात, “आपण लेखन का करतोय? लेखक म्हणून आपल्याला काय साध्य करायचंय? वाचकांना कोणता विचार द्यायचाय? वाचकाच्या जाणिवा अधिक प्रगल्भ करण्यासाठी, त्यांचं जीवन उन्नत करण्यासाठी आपण लेखन करतोय का? हे प्रश्न लेखकानं सतत स्वतःला विचारायला हवेत. आपल्या लेखकपणाचे भान जपत त्यांना ताकदीचं लेखन करावे लागेल, सकस लेखन टिकून राहील. एरवी फेसबुक, ब्लॉग यांच्यावरचं उथळ लेखन हे डेटाच्या महापुराच्या लोंढ्यात क्षणार्धात लुप्त होईल.”

दिलीपरावांच्या या सल्ल्यातील ‘लेखक’ या शब्दाच्या जागी ‘प्रकाशक’ शब्द घातला की, त्यांची प्रकाशकीय भूमिकाही आपल्या लक्षात येईल. कारण साहित्याच्या इमारतीचे हेच तर दोन मुख्य स्तंभ आहेत. त्यांच्यात सुसूत्रता असेल, तरच साहित्याचा व्यवहार यशस्वीपणे पुढे जाईल.

या व्यवहारात वाचक नावाचा तिसरा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. खरे तर लेखक, प्रकाशक आणि वाचक ही साहित्य व्यवहाराची त्रिपुटीच आहे. श्री. पु. भागवत, रा. ज. देशमुख आणि ह. वि. मोटे हे दिलीपरावांवर प्रभाव टाकणारे तीन पूर्वसुरी प्रकाशक, भागवतांनी ‘प्रकाशकाला जे योग्य वाटतं, ते पुस्तकरूपानं प्रसिद्ध करावं’ असा सल्ला दिलेला. तो ‘राजहंस’ने सुरुवातीला प्रमाण मानलाही, पण त्याच बरोबरीने वाचकाला काय हवे आहे, याचाही विचार व्हायला हवा. या दोघांचा मेळ घालायचे काम, खरे तर तारेवरची कसरत दिलीपराव यशस्वीपणे करत आले आहेत. ‘काही लोकप्रिय पुस्तकं निवडताना गंभीर विषयांवरची पुस्तकंही निवडायची, हा माझा दृष्टिकोन आणि आग्रह असतो.’ या त्यांच्याच वाक्याचा आधार घेऊन आपण म्हणू शकतो की, व्यवसाय आणि व्रत यांचा समन्वय करता आला, तर प्रकाशकाला व्यावसायिक यश आणि समाधान या दोन्हींचाही लाभ होऊ शकतो. प्रकाशकासाठी ही फार मोलाची ‘टिप’ आहे.

दिलीपरावांविषयीचे लेख आणि त्यांच्या मुलाखती यांशिवाय या ग्रंथामधील अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांनी लिहिलेली पत्रे. यातील सर्वाधिक पत्रे दिलीपरावांनी आपल्या लेखकांना लिहिली आहेत. आणि बहुतेक वेळा ही पत्रे संबंधित लेखकाच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्याशी साधलेला एक प्रकारचा मुक्तसंवाद आहे.

श्री.ग.मा. दिलीपरावांना ‘रत्नपारखी’ म्हणायचे आणि पाडगावकर म्हणायचे, ‘ही हस्तलिखितं तुझ्यासमोर ठेवली आणि ती वरवर चाळून ‘तू यातलं एक निवड’ असं सांगितलं; तर तुझा हात ज्यावर पडेल, तेच त्यातलं उत्कृष्ट असेल.’ हे काही आपुलकी आणि स्नेह यांच्यापायी नव्हे आणि त्याहीपुढे जाऊन स्वतः दिलीपरावांनाच आपली ओळख सांगायची झाली, तर त्यांनी न लिहिलेल्या नाटकातील एका संवादाच्याद्वारे सांगतील, ‘मी हाडाचा संपादक-प्रकाशक आहे. कोणा नव्या लेखकानं लिहिलेल्या चार ओळी वाचनात आल्या, तरी त्याच्याकडून तीनशे पानांचं पुस्तक लिहून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ दिलीपरावांचा हा काल्पनिक संवाद आत्मस्तुती नसून आत्मप्रत्यय आहे.

श्री. पु. भागवत हे प्रकाशनव्यवसायातील एक ऋषितुल्य नाव. त्यांना लिहिलेल्या पत्रात दिलीपरावांनी आपल्या व्यवसायाचे जणू मर्मच सांगितले आहे. ज्यांना आपण व्यावसायिक म्हणतो, अशा काही गोष्टी प्रकाशकांना कराव्याच लागणार हे उघड आहे. त्या आपण शक्यतो काटेकोरपणे व शिस्तीत करण्याचा प्रयत्न करतो, असे सांगून पुढे ते म्हणतात,

‘‘पण या गोष्टी नंतर येत असतात. मुळात मी माझा वाचक फार गंभीरपणे घेतो. Do not underestimate your reader and voter. हा माझ्या विचाराचा पक्का धागा असतो. त्या दृष्टीनं माझा वाचक, त्याची मानसिकता, त्याच्या सवयी, आवडी-निवडी, त्याच्या भोवतालच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत होत जाणारे बदल, त्यातून अपरिहार्यपणे येणाऱ्या एकप्रकारच्या धास्तावलेपणातून तो शोधत असलेला आधार यांबाबत माझ्या मनाच्या कोपऱ्यात सतत विचारांचा खेळ चालू असतो. तो माझ्या छंदाचा भाग बनावा इतपत चालू असतो. आणि त्यातून मी शोध असतो विषय, जे वाचक आज स्वीकारण्याच्या मनःस्थितीत आहेत असे विषय. मग मला विषयांचं बंधन काचत नाही. माझ्या मनासारखा विषय मिळाला, की मग मी शोधतो लेखक. ही जोडी जेव्हा मनाप्रमाणे जमून येते; तेव्हा तो लेखक नवा की नामवंत, पुस्तक स्वतंत्र की अनुवाद, लहान की मोठं या सगळ्या गोष्टी मला त्यापुढे गौण वाटतात. डॉक्टरचं सारं लक्ष जसं नाडीवर असतं, तसं माझं लक्ष वाचकाच्या मनातील विचारांचा ठाव घेत असतं. याचा अर्थ ‘मागणी तसा पुरवठा’ असं सोपं-सुटसुटीत गणित माझ्या मनात नसतं. त्यापलीकडे जाऊन काही टिकाऊ स्वरूपाचं, वाचकाला दीर्घकाळ विचार करायला प्रवृत्त करू शकणारं साहित्य आपण शोधलं पाहिजे. त्यासाठी शक्य तितक्या टाचा-नजर उंच करून प्रयत्न केले पाहिजेत, असं वाटत असतं.”

अवतरण थोडे दीर्घ आहे; पण ते दिलीपरावांच्या प्रकाशकीय कारकिर्दीचे महावाक्य आहे, असे मी मानतो. भविष्यात जेव्हा केव्हा राजहंस प्रकाशनाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्या लेखकाला याच मुद्द्यांच्या संदर्भात एकेका पुस्तकाचा वेध घ्यावा लागेल, यात शंका नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपण लेखक शोधतो, असे दिलीपरावांनी म्हटले खरे; पण ही शोधण्याची प्रक्रिया काय असते? लेखक नेमका कसा सापडतो? हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. मिलिंद संगोरामांना लिहिलेल्या पत्रात ते लिहितात की, ‘मला माझा लेखक समोर दिसतो. मला त्याच्या लेखनाइतकाच तो वाचायला आवडतो. क्वचित त्याला वाचण्यातून तो लेखनापेक्षाही मला अधिक पोहचतो.’

दिलीपरावांचे वैशिष्ट्य याच संदर्भाने सांगता येईल. एखाद्या प्रतिष्ठित लेखकाचे किंवा व्यावहारिकदृष्ट्या खपाऊ मानल्या गेलेल्या विषयाचे पुस्तक डोळे झाकून छापणारे प्रकाशक असतात. ते केवळ व्यावसायिक नफ्यातोट्याचे हिशेब मांडून काम करतात. परंतु लेखकाच्या लेखनप्रक्रियेतच समाविष्ट होऊन त्यांच्या प्रसववेदनेत सहभागी होणारा हा प्रकाशक आहे. या प्रकाराला ‘सरोगेट मदर’ची उपमा देण्यात काही औचित्यभंग होईल, असे मला वाटत नाही. या संदर्भातील त्यांच्या भावना वि. स. वाळिंबे यांना लिहिलेल्या पत्रातून फारच चांगल्या रीतीने व्यक्त झालेल्या दिसून येतात. येथेही त्यांच्या पत्रातील उद्धरण द्यायला हरकत नाही.

“त्या वेळी मला भावलेला विषय, त्यासंबंधी मनात केलेला अंधूक आणि अस्पष्ट विचार कृतिरूपात यायला तीस वर्षं जावी लागली. आज समाधान विचाराल; तर हे समाधान आहे, ते फार मोठं आहे. हे समाधान केवळ आपल्यामुळे लाभलं.”

तसे पाहिले, तर चरित्र व आत्मचरित्र हे दिलीपरावांच्या विशेष आवडीचे व आस्थेचे विषय. पण याचा अर्थ असा नाही, की इतर प्रकारांकडे पाठ फिरवायची. वेगवेगळ्या वाङ्मयप्रकारांबद्दलची त्यांची महत्त्वाची मतेही पत्रांमधून जागोजाग विखुरली आहेत. शेखर ढवळीकरांना दोन नाटकांच्या संदर्भातील पत्रात ते म्हणतात की, “त्या नाटकांनी माझ्या मनात नाटकाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. आणि कदाचित हे प्रश्न पडले, हेही कारण माझ्या निवडीमागे असेल, माहीत नाही.”

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

कादंबऱ्यांच्या संदर्भातील त्यांनी कविता महाजन, लक्ष्मीकांत देशमुख, अभिराम भडकमकर यांना लिहिलेली पत्रे वाचनीय झाली आहेत, ते त्यांतून व्यक्त झालेल्या त्या वाङ्मयप्रकाराविषयीच्या मतांमुळे. महाजनांच्या कादंबरीला दाद देताना ‘पुढच्या काळात हा लेखनाचा दागिना जपून वापरा. किरकोळ मोह टाळा. फुटकळ प्रसिद्धीपासून दूर रहा.’ असा सल्ला वडिलकीच्या नात्याने द्यायला ते विसरत नाहीत. असाच एक सल्ला त्यांनी रवींद्र पिंगे यांना दिला, ‘मान्यवरांवर सहसा लिहीत जाऊ नका. त्यामुळे कोणी नवा लेखक मोठा होत नाही. मोठे अधिकच मोठे होत जातात.’

आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘एका उच्च आध्यात्मिक पातळीवर ते खरंही असेल, पण जगातले सर्व सर्जनशील कलावंत या रसिकांच्या प्रेमासाठी तर आसुसलेले असतात. जगात इतर सर्व गोष्टी जमवून आणता येतात, पण वाचकांचे प्रेम आणि प्रेक्षकांच्या पसंतीची टाळी जमवून आणता येत नाही. ती आतूनच यावी लागते.”

एके ठिकाणी त्यांनी वाचकाला चक्क ‘बाप’ म्हटले आहे, म्हणजे वाचक हा अंतिम! जे महत्त्व नाटक-सिनेमाच्या व्यवसायात निर्मात्याला, तेच पुस्तकाच्या जगात प्रकाशकाला आहे. (निर्मात्याला आणि) प्रकाशकाला नजर असावी लागते. श्री.ग.मा. दिलीपरावांना ‘रत्नपारखी’ म्हणायचे आणि पाडगावकर म्हणायचे, ‘ही हस्तलिखितं तुझ्यासमोर ठेवली आणि ती वरवर चाळून ‘तू यातलं एक निवड’ असं सांगितलं; तर तुझा हात ज्यावर पडेल, तेच त्यातलं उत्कृष्ट असेल.’ हे काही आपुलकी आणि स्नेह यांच्यापायी नव्हे आणि त्याहीपुढे जाऊन स्वतः दिलीपरावांनाच आपली ओळख सांगायची झाली, तर त्यांनी न लिहिलेल्या नाटकातील एका संवादाच्याद्वारे सांगतील, ‘मी हाडाचा संपादक-प्रकाशक आहे. कोणा नव्या लेखकानं लिहिलेल्या चार ओळी वाचनात आल्या, तरी त्याच्याकडून तीनशे पानांचं पुस्तक लिहून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ दिलीपरावांचा हा काल्पनिक संवाद आत्मस्तुती नसून आत्मप्रत्यय आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

विद्या पोळ-जगताप यांना लिहिलेल्या पत्रात दिलीपराव पुढे खुलासा करतात की, “ही वाट मी शोधली असं नाही. ह. वि. मोटे आणि त्यांच्या पिढीतल्या काहींनी शोधलेली ही वाट आहे. मला ती पटली आणि माझ्या प्रकृतीला ती मानवली इतकंच.”

हा मुद्दा दिलीपरावांनी अशोक जैन यांना लिहिलेल्या पत्रातून अधिक स्पष्ट केला आहे, “श्री.पु. माझा आदर्श असले, तरी ते माझं ‘स्कूल’ नाही. माझं ‘स्कूल’ ह. वि. मोटे किंवा रा. ज. देशमुख यांचं. ती मोठी माणसं. मोठी कामं त्यांच्या हातून होऊन गेली. ‘रणांगण’, ‘विश्रब्ध शारदा’, ‘बहुरूपी’, ‘स्वामी’ अशी अनेक पुस्तकं त्या दोघांनी दिली. त्या उंचीचं काम आपल्या हातून व्हावं, ते होईल का याची मनात धास्ती असते. प्रत्येकाची कामाची शैली भिन्न असते. एखादं साहस करावं, त्यातून दोन घरं पुढं जावं - अशी माझी शैली. योग्य-अयोग्य, चूक-बरोबर यांपेक्षा माझ्या मानसिक प्रकृतीला मानवणारी.” ‘मन केले ग्वाही’ अशा प्रकारची ही धारणा आहे, असेच म्हणावे लागेल.

आपण या व्यवसायात नेमके काय करत आलोय, हे अत्यंत संक्षेपाने दिलीपरावांनी याच पत्रात सांगितले आहे- “क्लास आणि मास, लोकप्रियता आणि अभिरुची, रंजन आणि प्रबोधन या हातात हात घालून जाण्याच्या गोष्टी नाहीत. त्यांची विचित्र मोट बांधण्याचा खटाटोप मी काही वर्ष करतोय.” ‘साहित्यव्यवहारातील महासमन्वयाचा प्रयोग’ यापेक्षा वेगळा शब्दप्रयोग यासाठी करता येईल, असे वाटत नाही.

दिलीपरावांनी जिथून आपली कारकीर्द सुरू केली, त्या नियतकालिकाचे नावच ‘माणूस’ होते. हे नियतकालिक आज अस्तित्वात नाही, पण त्याच्या नावातील आशय मात्र दिलीपरावांच्या दृष्टिकोनात, भूमिकेत व वर्तनात स्वच्छ प्रतिबिंबित झाल्याचे आपण निश्चितपणे पाहू शकतो.

‘पत्र आणि मैत्र’ : दिलीप माजगावकर

संपादक - प्रशांत दीक्षित, मंगला आठलेकर, रेखा माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, सारंग दर्शने

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – ३१४ | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......