वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे
ग्रंथनामा - झलक
प्रज्ञा दया पवार
  • ‘प्रतिक्षिप्त’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 03 November 2023
  • ग्रंथनामा झलक संजय पवार Sanjay Pawar प्रतिक्षिप्त प्रतिक्षिप्त Pratikshipta

प्रसिद्ध नाटककार व स्तंभलेखक संजय पवार यांचं ‘प्रतिक्षिप्त’ हे नवंकोरं पुस्तक पिंपळपान प्रकाशन या नव्याकोऱ्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

गेली अनेक वर्षे संजय पवार सातत्याने स्तंभलेखन करत आहेत. नाटक, एकांकिका, चित्रपट पटकथा-संवादलेखन यांसारखे कस पाहणारे कलाप्रकार अंगभूत करून घेतलेले असताना आणि त्यातून परिवर्तन-सन्मुख सूत्रं गाभ्याशी ठेवत असतानाही त्यांना स्तंभलेखन करावंसं वाटणं आणि तेदेखील इतकं सातत्य राखून करावंसं वाटणं, हे पुरेसं बोलकं आहे!

वर्तमानाला-भोवतालाला दिलेला उत्कट प्रतिसाद, अनेक घटितांवर तातडीने व्यक्त होण्याची आत्यंतिक तीव्र निकड वा असोशी, एकरेषीय नसलेल्या विचार, भावना, संवेदना आणि कल्पनेचा गुंतागुंतीचा कल्लोळ, शिवाय भाषेच्या चौफेर हुकमी फटकाऱ्यांचं तीव्र ज्वालाग्राही रसायन म्हणजे ‘प्रतिक्षिप्त’ असं संजय पवारांच्या प्रस्तुत स्तंभलेखनपर पुस्तकाविषयी म्हणता येईल.

अर्थात, विविध विषयांच्या, घटना-प्रसंगांच्या अनुषंगाने जरी ‘प्रतिक्षिप्त’मधील लेखन झालेलं असलं, तरी यातील सर्व लेखांना एकमेकांशी अभिन्नपणे जोडणारं आशयतत्त्व म्हणजे ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे!’ व्यक्ती -समष्टी- सृष्टी यात अभिन्नत्व पाहणारी / मानणारी पवारांची ‘मी’पणाची आधुनिकतावादाने घडवलेली मूल्यजाणीव इथेही ठळकपणे मौजूद आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

व्यक्ती-समष्टीत अंतराय न मानणारी आणि तरीही त्यातली द्वंद्वात्मकता नजरेआड होऊ न देणारी ‘प्रतिक्षिप्त’मधील लेखकीय संज्ञा आपल्याला भयंकराच्या दरवाजाची अजस्त्र विक्राळता निरनिराळ्या मितींमधून, निरनिराळ्या भिंगांमधून निर्दयपणे दाखवत राहते. या लेखकीय संज्ञेत अनुस्यूत असलेलं लखलखीत राजकीय भान आपल्याला जराही सैलावायला उसंत देत नाही. आसूड आहेत, प्रहार आहेत, वार-प्रतिवार, डावपेचात्मक पवित्रे आहेत आणि त्याच्या प्रकटीकरणासाठी उपहास, उपरोध, विडंबन, वितंडा ही पवारांच्या भात्यातली नेहमीची यशस्वी हत्यारंही आहेत.

वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे.

गेल्या काही वर्षांत - अगदी नेमकेपणाने सांगायचं तर २०१४पासून अत्यंत वेगाने भारताच्या प्रजासत्ताक संकल्पनेचा होणारा ऱ्हास आपण अनुभवतो आहोत. आपल्या देशातल्या कित्येक समूहांना एकीकडे प्रचंड भीतीच्या, असुरक्षिततेच्या सावटाखाली जगत राहण्याची सक्ती वाट्याला आलेली आहे. काळीज कुरतडून टाकणारी निश्चिततेच्या अंताची भयावह जाणीव, हे भारताचं एक दुःखदायक वास्तव आहे, तर दुसरीकडे अतोनात वाढणारी भक्तव्याधी, उन्मादाच्या कर्कश आरोळ्या, सांस्कृतिक राष्ट्रवादाची आक्रमकता गल्लीबोळांपासून ते सहा पदरी, आठ पदरी महामार्गापर्यंत मुसंडी मारत पसरते आहे.

‘नाही म्हणणार भारतमाता की जय’, ‘साक्षी महाराजांची कफनी कोण उतरवेल?’, ‘हिंसेचा सनातनी बुरखा’, ‘आरती संग्रहाची समीक्षा होत नाही!’, ‘पुरोगामी नवी सभ्य शिवी’ यांसारखी शीर्षकं नि अनेक लेख या दृष्टीने आपल्याला पाहता येतील.

संसदीय राजकारण आणि त्याची बहुप्रस्फुटिते या नेपथ्यावर संजय पवारांचं स्तंभलेखन अविरतपणे चालतं. ‘पानीकम’, ‘एकलव्याच्या भात्यातून’, ‘चोख्याच्या पायरीवरून’ या आधीच्या पुस्तकांतले त्यांचे कोणतेही लेख काढून पाहावेत… इतकी मांदियाळी त्यांच्या स्तंभलेखनात या विषयाने व्यापलेली आहे. संसदीय सत्ता निवडणूकप्रधान राजकारणाच्या माध्यमातून जरी साकार होत असली आणि त्यातला लोकसहभाग हा जरी कळीचा घटक असला, तरी राजकारण हा जेव्हापासून भांडवलप्रधान उद्योगधंदा होत गेला, तेव्हापासून चिरफाळत गेलेल्या आपल्या लोकशाहीची व्याकूळ भणंगता संजय पवारांनी प्रस्तुत लेखनातूनही साक्षात केली आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा : 

सध्याच्या ‘ऱ्हासमय’ काळात पवारांचं सदरलेखन सामाजिक ‘शल्य-चिकित्सका’ची भूमिका निभावत आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ ‘आक्रमक शैली’, या चष्म्यातून पाहून चालणार नाही!

..................................................................................................................................................................

पाशवी सत्तेची सर्वस्तरीय प्रबळ नृशंसता, अमर्याद विध्वंसकारकता आणि एकूणच कमालीच्या वेगाने आक्रसत-घटत जाणारा आपला परिवर्तनवादी मुक्तिदायी अवकाश त्यांच्या आधीच्या स्तंभलेखनाप्रमाणेच ‘प्रतिक्षिप्त’ या नूतन पुस्तकातलं महत्त्वाचं संभाषित आहे.

आणखी एक संभाषित संजय पवारांच्या लेखनात सातत्याने सशक्तपणे येतं, ते म्हणजे लिंगभावविषयक संभाषित! यावर स्वतंत्रपणे भरभरून लिहावं, अशा अनेक जागा त्यांच्या याही लेखनात दिसतात. ‘बाई मेली, कुणी नाही पाहिली’, ‘स्त्रियांच्या आत्महत्या’, ‘बेशरम पुरुषजात’, ‘प्रवृत्तीचा नाच कसा थांबवाल?’ ‘मुख्यमंत्री महोदय’, ‘बलात्कार परवाना द्या!’, ‘कोपर्डीत जत्रा, नेरुळला सायलेन्स झोन!’, ‘माहेरची साडी : प्र. भू. सनी लिओनी’, ‘लाज वाटते पुरुष असण्याची’, यांसारख्या लेखांतून व्यक्त होणारं पवारांचं लिंगभानविषयक आकलन पुरुष वाचक आणि स्त्री वाचकांनीही वाचावं इतकं अद्ययावत आहे.

स्त्रीवादाचं भान जगण्याच्या अग्रक्रमावर ठेवता येण्याची आंतरिक गरज वाटणं, त्या प्रेरणेच्या हाका ऐकणं, हा राजकीय कृतिशीलतेमध्ये परिवर्तित होणारा ‘प्रतिक्षिप्त’मधला लोभस प्रवास आहे.

प्रत्येकच लेखकासमोर काही अटीतटीचे, निर्वाणीचे पेचप्रसंग येत असतात आणि त्या वेळी त्याला खणखणीत भूमिका घ्यावीच लागते. तसे ते संजय पवारांसमोरही आलेले आहेत. मात्र ‘प्रतिक्षिप्त’मधील काही लेखांमधून पवारांची लेखकीय संज्ञा स्वतःला काहीशा उच्च स्थानावरून पाहणारीच नव्हे, तर तसे सरळसरळ आग्रहपूर्वक सांगणारी आहे. मुळात पवारही याच नवभांडवली व्यवस्थेत सक्तीनं ‘कोऑप्ट’ व्हावं लागणाऱ्या अवकाशात जगतात आणि भूमिका घेतात. यातलं अद्वैत आपण कसं तपासणार आहोत, हा ऐरणीवरचा प्रश्न आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

कोणतंही लेखन जेव्हा स्व-चिकित्सेला नाकारतं आणि स्वेतरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं, शिवाय वितंडेची सोपी सुलभ लोकप्रिय मीमांसा अनुसरतं, तेव्हा एकसत्वीकरणाने बाधित झालेल्या कथित ‘दलित युवा-मानसा’कडून वाहवा मिळवणं अथवा कथित विद्रोहीवाल्यांचा अनुनय करणं, या सापळ्यात अडकू शकतं, नव्हे अडकतंच.

संजय पवारांनी हा धोका वेळीच ओळखून असल्या लोकप्रिय सापळ्यांपासून स्वतःला वाचवावं आणि त्यांच्या अस्सल विद्रोही पवित्र्याला जागावं, अशी त्यांची एक समकालीन लिहिती सहप्रवासिनी म्हणून माझी अपेक्षा आहे.

‘प्रतिक्षिप्त’ या शब्दाला काहीशी नकारात्मक अर्थच्छटा आहे. मेंदूपर्यंत कोणताही संदेश न पोहचता मज्जारज्जूंमार्फत जेव्हा शरीर एखाद्या घटना-प्रसंगाला सामोरं जाताना तत्क्षणी प्रतिक्रिया देतं, ज्या तऱ्हेनं प्रतिसाद देतं, त्याला उद्देशून ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ असं म्हटलं जातं. हे शीर्षक या स्तंभलेखनपर पुस्तकाला देताना पवारांना नेमकं काय अभिप्रेत आहे कल्पना नाही, परंतु मज्जारजू आणि मेंदूतही संदेशवहन पोहचवून भयंकराच्या दरवाजासमोर धडका मारायला लावणारं, कृतिशील हस्तक्षेपाकडे निर्देश करणारं, हे मौलिक पुस्तक आहे, असं आवर्जून अधोरेखित करावंसं वाटतं. वाचक या पुस्तकाचं मनापासून स्वागत करतील असा विश्वास आहेच. संजय पवारांना पुढील लेखनप्रकल्पासाठी मनापासून शुभेच्छा!

‘प्रतिक्षिप्त’ – संजय पवार

पिंपळपान प्रकाशन, मुंबई | पाने - २७१ | मूल्य – २९० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......