संगीत ही अशी कला आहे, जी शिकताना गुरूच्या, शिकवताना शिष्याच्या, सादर करताना श्रोत्यांच्या किंवा आस्वाद घेताना सादरकर्त्याच्या ‘धर्माचं’ विस्मरण होतं…
ग्रंथनामा - झलक
लोकेश शेवडे
  • अश्विनी भिडे-देशपांडे, मालिनीताई राजुरकर, उल्हास कशाळकर, उदय भ‌वाळकर, ‘स्वरभाषिते’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर-काटकर, नयन घोष, शंकर अभ्यंकर आणि यशवंतबुवा जोशी
  • Tue , 04 July 2023
  • ग्रंथनामा झलक स्वरभाषिते Swarbhashite मालिनीताई राजुरकर Malini Rajurkar उल्हास कशाळकर Ulhas Kashalkar उदय भ‌वाळकर Uday Bhawalkar दिनकर पणशीकर Dinkar Panshikar श्रुती सडोलीकर-काटकर Shruti Sadolikar Katkar अश्विनी भिडे-देशपांडे Ashwini Bhide-Deshpande यशवंतबुवा जोशी Yashvantbuva Joshi शंकर अभ्यंकर Shankar Abhyankar नयन घोष Nayan Ghosh

भारतीय शास्त्रीय संगीतातील मालिनीताई राजुरकर, उल्हास कशाळकर, उदय भ‌वाळकर, दिनकर पणशीकर, श्रुती सडोलीकर-काटकर, अश्विनी भिडे-देशपांडे, यशवंतबुवा जोशी, शंकर अभ्यंकर, नयन घोष अशा नऊ कलावंतांच्या मुलाखतींचा समावेश असलेलं ‘स्वरभाषिते’ हे रोहिणी गोविलकर यांचं पुस्तक नुकतंच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखक-नाटककार लोकेश शेवडे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

प्राचीन काळापासून संगीत, नृत्य, नाट्य, कला, साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये उर्वरित जगाशी तुलनीय गती राखत, स्वतंत्र वाटचाल साधलेल्या भारतीय उपखंडाला दस्तऐवजीकरणाबाबत मात्र प्राचीन काळापासूनच वावडं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे कोणत्याही कलेची वाटचाल नेमकी कशी होत गेली, याबाबत अभ्यासकांना तर्क आणि अंदाजांवर अवलंबून राहावं लागतं. भारतीय संगीताच्या बाबतीत ही बाब अगदी चपखलपणे लागू पडते.

सुरुवातीला दिलेलं छायाचित्र विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं आहे. ते अनवधानाने दिलं गेलं. या पुस्तकात उल्लेख मुलाखत असलेल्या ज्येष्ठ सतारवादक पं. शंकर अभ्यंकर यांची ही छायाचित्रं. चुकीबद्दल दिलगीर आहोत. - संपादक

.................................................................................................................................................................

श्रुतिस्थानं, स्वरस्थानं - त्यातून निर्माण होणारे थाट, राग, रागिणी- त्यांचे वादी-संवादी-विवादी- वर्ज्य-वक्री स्वर, आरोह-अवरोह स्वरावली, पकड, ताल, लय अशा अनेकविध नियम-उपनियमांनी करकचून बांधलेलं, पण त्या निर्बंधांच्या कुंपणाच्या आत गायक-वादकाला विहाराचं-विचारांचं-आविष्काराचं संपूर्ण स्वातंत्र्य असलेलं असं ‘शास्त्रीय’ संगीत पृथ्वीतलावर दुसरं नसेल. बुद्धिबळात जसे उंट, घोडा, हत्ती, प्यादं, वझीर अशा प्रत्येक सोंगटीच्या स्थानांना आणि चालींना नियम आहेत, अन्यही अनेक बंधनं आहेत. मात्र ते नियम, बंधनं पाळून पटावरचा पुढचा खेळ पूर्ण मुक्त आहे... हजारो वर्षं हजारो लोक खेळत आहेत.

पण तरी प्रत्येक मातब्बराच्या खेळ्या, त्याच्या चाली, शैली भिन्न आहेत आणि वरून नवनवीन खेळ्या विकसित होतच आहेत, त्या वेगळ्या असंच काहीसं उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचं आहे. मात्र उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचा पट बुद्धिबळ किंवा कोणत्याही खेळापेक्षा अधिक कठोर निर्बंध असलेला पण अधिक मुक्तता असलेला अधिक रंगतदार आणि अधिक विस्तीर्ण आहे. याखेरीज या पटावरचे नियम आणि निर्बंधदेखील वेळोवेळी बदलत गेले आहेत, ते अलाहिदा.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

भरतमुनीं-मतंगमुनींपासून शारंगदेवपर्यंत आणि अमीर खुश्रो- तानसेनपासून सदारंग (नैमत खान)- अदारंग (फिरोझ खान) अशा असंख्य दिग्गजांच्या प्रभावांमुळे गंधर्वगान-धृपद-थाट अशी स्थित्यंतरं घडत पुढे बडा खयाल, छोटा खयाल (चीज), तराणा, तिरवट, रासपर्यंत आणि विविध लोकसंगीताच्या प्रभावामुळे टप्पा, ठुमरी, होरी, कजरी, गजलपर्यंत - किंबहुना मराठी नाट्यसंगीतापर्यंत उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत येऊन ठेपलं आणि पुढे बॉलिवुडमध्येही मुसंडी मारत गेलं. या प्रदीर्घ विलोभनीय प्रवासातील गेल्या शतकाच्या प्रारंभापर्यंतचे पुरेसे दस्तावेज उपलब्ध नाहीत. तथापि, अनेक दिग्गजांनी आयुष्य वेचून संशोधन करत आजतागायत बरीच माहिती खणून काढली, अद्यापही नवनवी माहिती मिळवत आहेत, ही समाधानाची बाब.

गेल्या शतकाच्या साठोत्तरी दशकापर्यंत ध्वनिवर्धन, ध्वनिमुद्रणाचे प्रकार, सभागृह याबाबत बरीच उलथापालथ झाल्यामुळे, तीन महत्त्वाचे परिणाम झाले. एक म्हणजे शास्त्रीय संगीताचा श्रोतृवर्ग वाढला. त्यामुळे मैफली बांधण्याची पद्धत श्रोताभिमुख – ‘मॉड्युलर’ बनली. दुसरा- शिक्षणाची गुरुकुल पद्धत मावळत जात, संगीतातल्या घराण्यांचं महत्त्व अस्ताकडे गेलं आणि तिसरा- नवनवीन प्रयोग, नवीन राग, जोड राग, अनवट राग-शैली यांचं ध्वनिमुद्रण होऊ लागल्यामुळे ते जतन होऊ लागलं. अर्थात, अन्य कोणत्याही कलेसारखंच भारतीय संगीताचं स्वरूपही गेल्या शतकात वाहतंच राहिलं. पण या काळात भारतीय संगीतान घेतलेली वळणं पूर्वीपेक्षा संख्येनं आणि वेगानं अधिक होती.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

यापैकी बहुतांश प्रयोगांचं-वळणांचं सांगीतिक मुद्रण सुदैवानं त्या त्या वेळी झालं, तरी ते प्रयोग करण्यामागचे कलाकारांचे विचार, ते प्रयोग करताना, वेगवान वळणं घेताना-त्यांचे कलाकारांच्या आयुष्यावर झालेले विविधांगी परिणाम, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनेकविध बाबींमुळे, कलाकारांच्या परस्पर नातेसंबंधांमुळे त्यांच्या विचारांवर, कलेवर, सादरीकरणावर झालेले परिणाम, असा सर्वंकष आढावा घेणं दुरापास्त असल्यामुळे तो घेऊन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम फारसं झालं नाही. रोहिणी गोविलकरांनी घेतलेल्या मुलाखतीतून हाच आढावा आपोआप साकारत जातो.

मागील शतकाच्या मध्यापासून पुढे ‘माईलस्टोन’ ठरलेल्यांपैकी काही गायकांच्या-कलाकारांच्या मुलाखती रोहिणी गोविलकरांनी घेतल्या आहेत. त्यापैकी पं. यशवंतबुवा जोशी, पं. शंकर अभ्यंकर, पं. दिनकर पणशीकर, विदुषी मालिनीताई राजूरकर, यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात शतकाच्या पूर्वार्धात झालेली आहे. तर पं. उदय भवाळकर, पं. उल्हास कशाळकर, विदुषी श्रुती सडोलीकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात शतकाच्या उत्तरार्धात झाली आहे.

या मुलाखतींत कलावंतांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घराणी, गुरुकुल पद्धत यांची वर्णनं आली आहेत आणि त्यासोबत अजमेर संगीत शाळा, धृपद केंद्र, गंधर्व महाविद्यालय, संगीत रिसर्च अकॅडमी, अशा स्वतंत्र संस्था, अन्य घराण्यांशी संवाद-सांगीतिक देवाणघेवाण इत्यादी बाबींचेही तपशीलवार उल्लेख आहेत. शिवाय पं. देवधर मास्तर, पं. गजाननबुवा जोशी, पं. गुणिदास, पं. फिरोझ दस्तूर, पं. गुलुभाई जझदानवाला अशा नामांकित गुरुजनांच्या आणि पं. बडे गुलाम अली, गझल सम्राज्ञी बेगम अख्तर, पं. डागर बंधू, पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, विदुषी माणिक वर्मा, अशा उत्तुंग कलावंतांच्या अनुभवांचे संदर्भही आले आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.............................................................................................................................................................

या मुलाखतींतून ठळकपणे लक्षात येणाऱ्या दोन गोष्टी नमूद करणं अनिवार्य आहे. एक म्हणजे पं. देवधर मास्तर- पं. गजाननबुवा जोशी यांच्या गुरुस्थानाबाबत, गंधर्व महाविद्यालय-संगीत रिसर्च अकॅडमी या संस्थांच्या संगीत संवर्धनाबाबत आणि पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी यांच्या उत्कृष्ट गायनाबाबत मुलाखत घेतलेल्या बहुतांश कलावंतांकडून कुठे ना कुठे आदरपूर्वक कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला गेला आहे. याचा अर्थ, या संस्था, हे गुरुजन आणि आणि हे कलावंत किमान ५०-७५ वर्षं शास्त्रीय संगीताच्या क्षितिजावर अढळ राहिले, इतकी त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती आहे.

दुसरी नमूद करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाखत घेतलेल्या बहुतांश कलावंतांना उत्कृष्ट ‘संगीत’ हे ‘ईश्वरी’ संकल्पनेशी निगडित वाटतं. असं असूनही त्यांना संगीत सादर करताना श्रोत्यांचा धर्म किंवा ऐकताना सादरकर्त्याचा धर्म आठवत नाही. किंबहुना, त्यांच्या गुरू-शिष्य नात्यामध्ये, अगदी संगीताच्या गुरुकुल पद्धतीतदेखील गुरू-शिष्यांना परस्परांचा धर्म कधी आड आला नाही.

ज्येष्ठ गायिका विदुषी श्रुती सडोलीकर याच पुस्तकातल्या एका मुलाखतीत म्हणतात, “संगीतात कुठल्याही जाति-धर्माशी न जोडता मिळणारा आनंद आहे. हा मुसलमान आनंद, हा हिंदू आनंद, हा ख्रिश्चन आनंद असं काही नसतं… स्वर सुंदर लागल्यावर आतून ज्या ऊर्मी निर्माण होतात, त्याला कुठली जात, भाषा, धर्म नसतो.”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

याचा अर्थ, संगीत ही अशी कला आहे, जी शिकताना गुरूच्या, शिकवताना शिष्याच्या, सादर करताना श्रोत्यांच्या किंवा आस्वाद घेताना सादरकर्त्याच्या ‘धर्माचं’ विस्मरण होतं आणि ‘ईश्वराचं’ स्मरण होतं! अशी ही अद्भुत ‘स्मरण-विस्मरण’ शक्ती असलेलं भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचवणं, हे सुज्ञांचं एक आद्यकर्तव्य ठरतं आणि त्यासाठी त्याचा गेल्या अर्धशतकाचा आढावा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणंदेखील!

दिग्गज कलावंतांच्या मुलाखतींद्वारे तो समग्र आढावा साध्या-सोप्या भाषेत मांडणारं, हे पुस्तक पुढच्या अनेक पिढ्यांना अत्यंत मोलाचा ‘दस्तऐवज’ ठरेल, यात शंका नाही.

‘स्वरभाषिते’ – रोहिणी गोविलकर

अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने – २३१ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......