‘आता सगळ्या वह्या बुडीत खाती’ : संग्रहाचे शीर्षक काहीही असले तरी, या कवितेच्या वह्या कधी बुडीत खाती निघणे शक्य नाही!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
सुचिता खल्लाळ
  • ‘आता सगळ्या वह्या बुडीत खाती’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Mon , 15 May 2023
  • ग्रंथनामा शिफारस आता सगळ्या वह्या बुडीत खाती Ata Vahya Sagalya Budit Khati अनुराधा पाटील Anuradha Patil

‘आता सगळ्या वह्या बुडीत खाती’ हा कवयित्री अनुराधा पाटील यांचा नवा कवितासंग्रह. एकूण प्रकाशित संग्रहसंख्येच्या क्रमान्वये सहाव्या क्रमांकाचा आणि १९८१ ते २०२२ या प्रदीर्घ कालावधीतील सुमारे ३०-३२ वर्षांच्या सातत्यपूर्ण लेखनप्रवासातला सर्वांत अलीकडचा लेखनऐवज!

वरील तपशील मुद्दाम उल्लेखण्याचे कारण असे की, अनुराधा पाटील यांच्या कवितेवर काही बोलताना विशिष्ट संग्रह समोर ठेवून त्या एका पुस्तकापुरतेच बोलणे, हा त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा संकोच करण्यासारखे होईल. म्हणून या संग्रहाबद्दल बोलताना प्रामुख्याने दोन पैलूंना अधोरेखित करावे लागेल. एक, कवी म्हणून व्यक्तिगतरित्या प्रत्येक नव्या संग्रहागणिक निरीक्षणास येणारी काव्यात्म व्यक्तिमत्त्वाची उत्क्रांती आणि दुसरे, त्या-त्या लेखनकाळात घडणाऱ्या भवतालाविषयी अभिव्यक्तीने नोंदवलेला सजग समकालीन हस्तक्षेप.

‘उत्क्रांती’ ही जरी जैवशास्त्रीय परिभाषा असली, तरी ती कलावंताच्या जाणीव-नेणीवांचा पैस कसा विस्तारत जातो, त्याचे परिपक्व होत जाणारे आत्मभान क्रमशः कसे विश्वभानाकडे झुकत जाते, याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.  बव्हंशी, समान पठडीत, समान आशय, समान धारणा आणि तेच ते तपशील घेऊन सबंध लेखनकाळ एकाच प्रसंगनाट्याभोवती आपली कविता गिरवत राहणारे कवी मराठीत अनेक आहेत. दुर्दैवाने असे अनेक जण लोकप्रिय व आघाडीचे म्हणूनही मान्यता पावलेले दिसतात. परंतु कोणत्याही कलावंतासाठी त्याचे कलाविष्करण व्यक्तिगत जाणिवांच्या आणि काळाच्या पटावर, अशा दुहेरीपणे क्रमशः पुरेसे उत्क्रांत होत गेलेले नसेल, तर सार्वभौम असे विश्वभान व्यक्त होण्यासाठी आवश्यक विविधांगी चौफेर आकलन त्या कलावंतात रुजले नाही, असेच म्हणावे लागेल. मर्यादित मूलद्रव्य, मर्यादित अवकाशात सार्वकालिक वापरून उदंड लेखनमजकूर प्रसवता येईलही, पण वाङ्मयाचे कालातीत मानदंड त्याला लागू होणार नाहीत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

विशिष्ट काळात लिहिली गेलेली कविता, ही त्या त्या वर्तमानाचा ऐतिहासिक दस्तावेज असते. भविष्यात जर तो विशिष्ट काळ त्या कवीच्या व्यक्तिगत आयुष्यासंदर्भात किंवा सार्वजनिक घडामोडींसंदर्भात जाणून घ्यायचा झाला, तर तेव्हा कवितेत डोकावणे पुरेसे ठरावे, इतकी ती तथ्यनिष्ठ व सत्वत्निष्ठ असावी. खूप काळापूर्वी जमिनीत गाडलेले आणि दबावामुळे काळे पडलेले मातीखालचे कोळसासदृश्य जीवाश्म उकरून, गतकाळातील जैविक इतिहास अचूक हुडकून काढता यावा, तसं या जीवाश्मासारखेच कवितेचे बोल असे असावेत. त्यात खूप खूप वर्षांनंतरही समकाळाची जनुकं नेमकेपणानं गवसावीत. खरं तर गतकाळाचा सांस्कृतिक, सामाजिक इतिहास शोधण्याची ही कसोटी आहे, ती अमूकतमूक कवितेला लागू होत नसेल, तर तशी कविता फक्त मनोरंजन करू शकते, प्रायोगिकता साधू शकते, पण वर्तमानात हस्तक्षेप करण्याची क्षमता त्यात नसते.

या सगळ्या निकषांवर बाईंच्या कवितेच्या बाबतीत त्यांचे आधीचे संग्रह जाणिवांच्या विस्तारित आलेखाच्या रूपात अवलोकित करणं, ही बाब कवितेचा अभ्यासक म्हणून खूप रोचक आहे.

‘दिगंत’पासून सुरू झालेली आर्त जाणीव ‘...तरीही’, ‘दिवसेंदिवस’मध्ये अधिक तीव्र, नेमकी होत जाते आणि ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’मध्ये ती आत्मभान व विश्वभान या दोन्हींच्या जोडीने व्यापक होत ‘कदाचित अजूनही’मध्ये ही विश्वात्म सार्वभौमता समष्टीला कवेत घेताना आपला पैस आणखी रुंदावते. काळासोबत चालण्याची आणि विपर्यस्ताला प्रश्नांकित करण्याची, ही खुबी या कवितेला आवाहकतेच्या कसोटीवर टिकाव धरण्याचे सातत्य आणि उच्च काव्यात्म गुणवत्ता बहाल करत जाते.

काव्यात्म उत्क्रांतीचा हा प्रवास ‘आता वह्या सगळ्या बुडीत खाती...’ या संग्रहात अनेक अर्थाने अनुराधाबाईंच्या चाहत्यांना धक्का देणारा ठरला आहे. यात हटकून वापरलेली धक्कातंत्रे नाहीत, तर ‘दिगंत’पासून सुरू झालेल्या कवितेच्या उत्क्रांतीचा तो एक निर्णायक व उच्च आविष्करणाचा टप्पा आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

ही वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी वाचकाने कवितेच्या रूढ समीक्षेला फाटा देऊन वर्तमान अरण्यकाळाचा एक धगधगता दस्तावेज म्हणून या संग्रहाकडे बघणे प्रस्तुत ठरेल. विद्यापीठीय काव्यसमीक्षेत चाकोरीबद्धपणे वापरली जाणारी भाषिक वैशिष्ट्ये, रचनासूत्रे, प्रयोगतंत्रे, प्रतिमा-प्रतीकं-मिथकं या पारिभाषिक बाबी थोडं बाजूला ठेवून अनुराधाबाईंची कविता त्यातील सातत्य आणि बदल या दोन्ही सूत्रांना केंद्रस्थानी ठेवत धाडस, परखडपणा, सांस्कृतिक-राजकीय-सामाजिक अराजकाची, आघातांची सूक्ष्म जाणीव, यांसह एका विस्तृत अवकाशाला कवेत घेते, तेव्हा तो फक्त भाषाव्यवहार न राहता एका प्रतीकात्मक कृतीचे रूप कसे धारण करतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

या संग्रहातील कवितेची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की, ती या भाषाव्यवहाराला साहित्यिक कलाकृतीपुरते सीमित न ठेवता एक दैनंदिन जीवनव्यवहार म्हणून आपल्या काळाची व भवतालातल्या आपलीही लख्ख आरशासमोर उभं राहून चाचपडणी करायला भाग पाडतात. ही उकल करताना काही महत्त्वाची निरीक्षणं समोर येतात.

संग्रहाची ढोबळमानाने दोन भागात विभागणी करता येईल, पहिल्या भागात राजकीय जाणिवांच्या कविता आणि दुसऱ्या भागात करोना काळातील व इतर व्यक्तिगत भावसंवेदन उजागर करणाऱ्या कविता आहेत.

या संग्रहातील कवितेचं सर्वांत महत्त्वाचं व लक्षणीय वैशिष्ट्य हे आहे की, ही कविता टोकाची ‘पॉलिटिकली इनकरेक्ट’ आहे! हेच वैशिष्ट्य या संग्रहाला अधिक समकालीन, बंडखोर, तीव्र बुद्धिगामी, चिंतननिष्ठ, तथाकथित स्त्रीवादी कवितेपासून पूर्णतः भिन्न बनवते.

ज्ञानसत्तेनं राजसत्तेला प्रश्नांकित करणं, चुकीच्या गोष्टींसाठी जाब विचारणं, हेच कवीचं काम आहे, यात नवीन काहीच नाही. पण ‘आता वह्या...’मध्ये बाई हा प्रश्न खूपच थेटपणे विचारतात. कवितांची शीर्षकं, त्यातील वक्रोक्ती, धाडसी पर्दाफाश, अशा कैक जागा वर्तमानकालीन सत्ताव्यवहारातील मूक दमनाला उच्चारक्षम बनवतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

असे टोकदार होताना याआधीच्या संग्रहातून हळूवार संयतपणे व्यक्त झालेल्या या भावविभोर व तरल कवयित्रीला आपली भाषा जरा जास्त उग्र होतेय, याची पुरेपूर जाणीवही असते, तरीही ती मूल्यांचे राजकारण खेळणाऱ्या सत्तावर्गीय अभिजनांना, त्यांची राजकीय चलाखी धीटपणे दाखवून देत, मोकळ्या रानवाऱ्यावर युद्ध-ललकारीचा जाहीर एल्गार पुकारते. संवेदनेचे हे बदलते रूप कवयित्रीच्याच ओळीत वाचणे रोमांचकारी आहे. त्या लिहितात,

“कोवळ्या तरल शब्दांची मिजास भिरकावून

अचानक उग्र वासाच्या

काटेरी जंगलात

शिरेल माझी कविता

आणि भोवतालाचा

दांभिक मुखवटा फाडून

माझ्यासकट

देईल नजरेला नजर

निखळ निर्भय...”

ही कविता सतत भोवताली दाटून असणाऱ्या भयाबद्दल निरंतर बोलते. पण तेव्हा ती मुळीच पराभूत, हताश नसते, तर या भयाच्या भ्रमाचा भोपळा तिला फोडायचा असतो. सत्तेच्या तालावर नाचणाऱ्या आंधळ्या-बहिऱ्या स्वार्थसाधू भक्तांना आतल्या पोकळतेचं दर्शन घडवून भयमुक्त करायचं असतं. ‘या टोकापासून’ या कवितेत त्या लिहितात,

“आदिम गुहेत शिरताना

उतरवले त्यांनी

आपले कपडे, बूट आणि पट्टे

आत काहीच नव्हतं

बुजगावण्याखेरीज...

मग भय नेमकं कशाचं होतं

भोवतालात दाटलेलं?”

नव्यानव्या नंदीबैलांचा लाचार कासरा फिरवणारे मुठभर मस्तवाल एकीकडे आणि अत्याचाराने भयकंपित वळ उमटलेले बहुसंख्य शोषक दुसरीकडे, अशा दुहेरी शोषक-शोषितांचे एक वास्तवदर्शी चित्र ही कविता उभी करते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘संसदेच्या आरशात’ या उपरोधात्मक कवितेत, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील जनतेच्या प्रश्नांसंदर्भातील सांसदीय कामकाज, ऐरणीवरच्या समस्या यांना अतिशय कडवट उपहासाने मांडताना कवयित्री सामान्य जनतेच्या मनातले अनेक पदर सहज उकलत नेत, सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या देशातील सर्वोच्च लोकभवनाप्रति सामान्य माणसाची अपेक्षा व अपेक्षाभंग यासंदर्भातील दोन्ही वेदना वक्रोक्तीपूर्ण पद्धतीने मांडते.

‘बुलडोझर’सारखी कविता विकासाच्या नावाखाली दाबून टाकलेला हक्काचा आवाज व सर्वसामान्यांच्या मनातली अहोरात्र दहशत व्यक्त करते. अतिक्रमणाच्या कारणावरून रातोरात बेघर होणारे उद्ध्वस्त उंबरठे, बाटलीतल्या छुप्या राक्षसासारखा बेबंद भयाचा अहर्निश धुडगुस व्यक्त करताना अनुराधाबाई लिहितात,

“दंगल भडकावण्याचा आरोप करता येतो त्याला

एखाद्याचा आवाज बंद करून

आणि काढता येते विकासाची नवी ब्ल्यू प्रिंट

राजमान्यतेची मोहर लागलेली”

‘मतदान : एक अधिकार’ या कवितेत त्या म्हणतात,

“कुणी खांद्यावर हात ठेवला

तर खुशालणारी

औकात आमची

पण तुमची जात भाऊ

कांद्याच्या वाणाची

कापला तर रडवतो

आणि सोलावा तर नुसताच

पापुद्र्यामागून पापुद्रा

तळापर्यंत”

अशा ओळी मतदानप्रक्रियेचं व संवैधानिक मूल्यांचं लोभापायी केलं जाणारं विद्रूपीकरण अचूकपणे रेखाटण्यात यशस्वी ठरतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘नव्या स्वातंत्र्याची गोष्ट’ या कवितेत सरकारी कागदपत्रात केवळ अडथळा म्हणून नोंद असणाऱ्या फाटक्या माणसांचं इतरांनी मेहरबानी म्हणून बहाल केलेलं आणि भवतालच्या चिमूटभर उजेडालाही पांगळं करणारं काळवंडलेलं, श्वासापुरतं उरलेलं तोकडं स्वातंत्र्यही कसं गोठवलं जातं, हे सांगताना त्या लिहितात,

“मात्र गोष्टीतल्या आटपाट नगरात

उगवत असतो त्यावेळी

छप्पन इंच छातीच्या योद्ध्यांनी ओढून आणलेला सूर्य

लाल किल्ल्याच्या

धगधगत्या भींतीवरचा इतिहास पुसून टाकणारा

जिथं ते वठवतात

प्रेषिताची हातखंडा भूमिका

विचार करण्याचं इतरांचं

संशयास्पद स्वातंत्र्य

गहाळ करून”

‘नोंदवही’ या  कवितेत,

“ते जाळतात तुमचं पिढीजात खांडववन”

किंवा

“की तुम्ही असता त्यांच्यासाठी

गृहीत धरलेली अनंत शक्यता”

अशा ओळी लोकशाही आतल्या सामान्य माणसाच्या भाकरीचा आणि किमान भयमुक्त जगण्याचा प्रश्न धीटपणे उपस्थित करतात.

वाडःमयीन स्वातंत्र्य, अभिव्यक्तीची गळचेपी वगैरे तर खूप नंतरच्या बाबी झाल्या, पण इथे हात घातलेले प्रश्न गालफाडं खोल गेलेल्या, फाटक्या, तंगलेल्या, गांजलेल्या सामान्य माणसांचे आहेत. हे प्रश्न आणि ही माणसं खूप मूलभूत आहेत तरीही हा माणूस रांगेतला शेवटाचा माणूस आहे, ज्याच्यापर्यंत संवैधानिक मूल्ये अजूनही पोचलीच नाहीत, असे कवयित्री वारंवार सांगते.

हा अभाव, ही दहशत, हे भय आणि ते सहन करणारी माणसं अराजकाच्या विषण्ण काळात कसाबसा तग धरताना थकून गेली आहेत, तरी कागदाला कान लावून काळजातल्या शब्दांचे आर्त ऐकू येईल, म्हणून नव्या पहाटेची आशाळभूतपणे वाट पाहणारी ती चिवट, जिवट आहेत. अशा स्वातंत्र्य हिरावलेल्या लोकांसाठी कवयित्री अथक लिहीत जाते. त्यामुळे ही कविता आत्मविन्मुख होत नाही की, दुभंग व्यक्तिमत्त्वाचीही होत नाही. तिचा स्वर पुरेसा समाजोन्मुख व मानवी वास्तवाचे मानवीय दर्शन घडवणारा आपसूक होत जाताना दिसतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

त्यामुळे पहिल्या विभागातील एकूणच राजकीय विसंगतीवर बोट ठेवणाऱ्या कविता वर्तमानकालीन समग्र मानवी परिस्थिती व्यक्त करणाऱ्या ठरतात. जे काव्य वर्तमान पुरेशा वस्तुनिष्ठपणे उभारण्याला सक्षम असतं, ते काव्य फक्त एक साहित्यिक दस्तावेज नसतो, तर त्या समग्र काळाचंच ते दर्शन असतं.

हे दर्शन घडवून आणताना अनुराधाबाईंची कविता भावनिक संतुलन राखते, भक्कम तटस्थता ठेवत मूल्यांचे राजकारण उजागर करताना अनागोंदीच्या अरण्यकाळातही ती प्रगल्भ भाष्यकाराप्रमाणे संवैधानिक नैतिकता पुन्हा पुन्हा अधोरेखित करत जाते. कोणत्याही काळात कवितेचं काम कसं चालतं, किंबहुना ते कसं असावं, याचा आदर्श वस्तुपाठ या कवितांतून स्पष्ट होत जातो. मानवी व्यवहाराची संवेदना ओळखणं, ती त्यातील नैसर्गिक सहजभाव व अनैसर्गिक उपरोधासह व्यक्त करता येणं आणि तिचा समाजजीवनावर पुरेसा प्रभाव सोडता येणं, ही साधारणपणे कुठल्याही सार्वकालिक कवितेची वैशिष्ट्यं सांगता येतील.

या संग्रहात कवयित्री तथाकथित आधुनिकोत्तर काळात उत्क्रमणाच्या आडून होणारी विविध प्रकारची अतिक्रमणं उघड करताना विकासशील राष्ट्रातील लोकशाही प्रक्रिया पूर्णत्वाऐवजी गोठून जाण्याकडे अथवा मनाजोगती वळती करण्याकडे तर मूठभरांचा कल नाहीय ना, अशा अनेक छुप्या शक्यतांची उजळणी घडवून आणते. हितसंबंधविरहित, भयमुक्त, झुकावरहित असा हा माणसाचा प्रातिनिधिक आवाज आहे. अनुराधाबाईंची तरल भावनिष्ठ कविता राजकीय व सामाजिक आकारमान तोलतानाही तिच्यातल्या काव्यात्मकतेचा बळी जाऊ देत नाही.

दुसऱ्या विभागांतर्गत करोना काळातील कवितांमधून पुन्हा आपल्याला आतलं काळीज पिळवटून शब्दांना वेदनेची जिवंत वेणा बहाल करणाऱ्या अतितरल अनुराधाबाई जाणवतात. या कवितांतील अनिश्चितता फक्त व्यक्तिगत पातळीवर व्यक्त होत नाही, तर एकूणच मानवी स्वभावात झालेले आश्चर्यकारक बदल, त्यातील तुसडेपणा, स्वार्थप्रणित, स्वकेंद्री, सुरक्षित व्यवहार या सगळ्यांची नोंद या कविता घेतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘क्वारंटाइन’, ‘मी पडून आहे इथं’, ‘लॉकडाऊन’, ‘एवढं करा’, ‘भास’ अशा अनेक कविता अंगावर काटा आणणारं, करोना काळात जगलेलं भीषण वास्तव चलचित्रासारखं आपल्यासमोर उभं करतात. या कविता काळाच्या एका विशिष्ट तुकड्यातील भयावहतेचे दर्शन घडवताना प्रगत समाजातल्या माणसांचं असहिष्णू, मागास, अविकसित, कोतं रूप दाखवतात.

“सगळी दारं बंद आहेत

इथून तिथून

कुलुपबंद आहे देवाचंही दार”

“अख्ख्या जगाला येतोय

तितरबितर करणारा

मरणाचा वास

वरच्या बापानं धाडलेला

आणि किल्ली हरवलेल्था बेड्या

खोलता येत नाहीयेत

आमच्या हातीपायी पडलेल्या”

अशी उपहासात्मक हतबलता व्यक्त करणाऱ्या या ओळी मरणासन्न सार्वभौमातही कवीचं काम चोख बजावायचं विसरत नाहीत.

वैश्विक जैविक संकटानं ग्रासलेल्या मानवी प्रजातीसमोर कधी नव्हे तो स्थलांतराचे, विस्थापितांचे, निर्वासितांचे असंख्य प्रश्न निर्माण झाले. मुंग्यांसारखे लोंढेच्या लोंढे चतकोर भाकरीविना मैलोनमैल अनवाणी चालत होते. या तुकड्यातली ही भीषणता पुढे करोनोत्तर कवितांमधील जाणिवांमधूनदेखील डोकावताना दिसते. ‘नकार’ या कवितेत त्या लिहितात,

“पुरत नाहीत आजकाल

नुसती कवी असण्याची ऊब

आणि मुलीनं

चित्रात रंगवलेला

फाटका माणूस

येतच नाहीय कागदाच्याबाहेर

ज्याच्यासमोर उघडता येईल

आपली रिकामी मूठ... मुलगी विचारतेय स्वतःलाच

निर्वासितांच्या छावणीत

जन्माला आलेली मुलं

कुठल्या देशाची असतात

कुणाची बोलतात भाषा

जी कळत नाही

छत्रंचामरं घेऊन फिरणाऱ्या

फिरंग्यांना”

या ओळी निर्वासितांच्या छावणीत जन्मलेली मुलं, त्यांची भाषा, नागरिकत्व यासंबंधीचे प्रश्न विचारतात, छत्रचामरं आणि फिरंगी मस्तवालपणाबद्दलही बोलतात. अशा काळात एक लिहिता माणूस म्हणून स्वतःचं कागदापुरतचं सीमित कवित्व पुरेसं नसल्याची खंतही कवयित्री जाहीरपणे उजागर करते. एक बेबस कवी म्हणून आपल्या मर्यादांचं न्यूनत्व व्यक्त करण्याचा हा दिलदारपणादेखील काळाच्या हतबलतेची नोंद म्हणून तंतोतंत वास्तवदर्शी चित्र उभारण्याला पोषक ठरतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रेम, स्वप्नं आणि प्रार्थना सोबत घेऊन अर्धवट खेळातूनच पायही न वाजवता माघारी निघून जाणाऱ्या, लेखणी व शाईची गाठही न पडलेल्या गावातल्या मागे सुटलेल्या अशिक्षित पोरीबाळींबद्दल अनुराधा पाटील यांची कविता सातत्याने बोलत आली आहे. बाईचं हे मुकाटपण मांडताना कधीच आवाजी, आततायी न होणं हा त्यांच्या स्त्रीवादी कवितेचा विशेष आहे. ‘त्या होतात’, ‘खांब धरून चालताना’, ‘नकार’, ‘रुक्मिणी’, ‘आत्महत्या : एक बातमी’, ‘रुक्मिणी’ अशा निखळ स्त्रीवादी जाणिवांच्या मोजक्याच कविता या संग्रहात आल्या आहेत.

‘रस्ते’, ‘भोवताल’, ‘पुरावा’, ‘स्थलांतर’, ‘आलेख’, ‘जाहिराती’, ‘आकांत’, ‘अंगठा आणि जीभ’, अशा अनेक कविता भूक आणि भाकरीबद्दल, उपेक्षा आणि अवहेलनेविषयी बोलतात, तेव्हा ते काव्यसंवेदन काळाच्या सर्वव्यापी जाणिवेला व आकलनाला खोल परिमाण देत जातं. त्याचं कारण असं की,

अन्याय अत्याचाराविषयी लिहिताना अनुराधाबाईंची कविता कधीच तांत्रिक व सरावलेल्या कारागिरीची होत नाही, तर या कवितेची एकूणच संघटना उत्कट माणूसपणाचा प्रत्यय देणारी आहे.

“भाकरीएवढं चवदार काहीच नसतं

अख्ख्या जगात

पण कल्पनेच्या म्हाताऱ्या

उडतात

दिशाहीन त्याच्याभोवती

आणि झांजा वाजवत

मोडीत काढला जातो

स्वतःचा एवढासा सवतासुभा

श्वास घेण्याच्या हक्कासह

बुडीत व्यवहार म्हणून”

अभिजन संस्कृतीच्या सत्ताकेंद्रांवर हल्ला चढवणारी व बहुजनांच्या निरंतर कळवळ्याची भाषा बोलणारी ही कविता थेट तुकारामाच्या जातकुळीतली भासते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मुळातच कवयित्रीच्या व्यक्त होण्यातला संयत स्वर, नैतिक मूल्याग्रहाची आवाहकता, लोकपरंपरा व संतपरंपरेतील प्रतिमांचा, मिथकांचा वापर, मराठी जनमानसाचे व कष्टकरी बहुजनांचे आराध्य असणारा पंढरीचा पांडुरंग, अशा बाबी या कवितेत सातत्याने येत राहतात. त्यामुळे अगदी आरंभाच्या संग्रहापासूनच अनुराधा पाटील यांच्या कवितेचा बाज व संवेदनस्वभाव बव्हंशी आध्यात्मिक जाणिवांचा राहिला आहे.

माणूसपणाची नितांत कणव व जीवनमूल्यांविषयीची गाढ आस्था यांच्याशी बांधील असणारी ही कविता कधीच वरवरची, करमणूकप्रधान, मंचीय व टाळ्याखाऊ झाली नाही. ‘सहोदर’ आणि ‘वारसा’ या दोन उत्कृष्ट कविता व्यक्तिगत भावसंवेदन व्यक्त करणाऱ्या असल्या तरी त्यात वाचणाऱ्या प्रत्येकाच्याच जगण्यामागचा काळोख आणि अभावाच्या मूक भाषेला शब्दस्थ करण्याची ताकद आहे.

“उशाला चंद्रसूर्य घेऊन

झोपणारांच्या जगात

आपण उपरे होतो नेहमीच

आपल्याजवळ होतं सहोदर असण्याचं एकमेव पांघरूण”

आणि,

“आज आई आणि पूर्वज

दोघंही नाहीत माझ्या आसपास

पण तुटता तुटत नाही

त्यांनी बोटाला बांधलेला

वारशाचा धागा

जगण्यामागचा काळोख ओलांडताना”

या ओळी वाचणाराचे काळीज पिळवटून टाकतात. मौखिक परंपरेतील लयबद्धता आणि शब्दकळेचा देशी डौल या कवितांचे जिव्हार संप्रेषण घडवून आणतात.

संग्रहाचे शीर्षक काहीही असले तरी, या कवितेच्या वह्या कधी बुडीत खाती निघणे शक्य नाही!

‘आता सगळ्या वह्या बुडीत खाती’ – अनुराधा पाटील

शब्द पब्लिकेशन, मुंबई | मूल्य - ३७५ रुपये

.................................................................................................................................................................

सुचिता खल्लाळ, नांदेड

suchitakhallal@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......