‘डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांच्या मुलाखती’ : केशवराव मला पहिल्यांदा भेटले ते अपघाताने, पण पुन: पुन्हा भेटत राहिले…
ग्रंथनामा - झलक
विनोद शिरसाठ
  • ‘डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांच्या मुलाखती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 25 February 2023
  • ग्रंथनामा झलक ‘डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांच्या मुलाखती विनोद शिरसाठ Vinod Shirsath डेक्कन कॉलेज Deccan College शि. म. परांजपे S.M. Paranjpe अरुण टिकेकर Arun Tikekar

‘साधना’ या साप्ताहिकाचे आणि ‘कर्तव्य साधना’ या पोर्टलचे संपादक विनोद शिरसाठ यांचे ‘डेक्कन कॉलेज परिसरात केशवरावांच्या मुलाखती’ हे ११ काल्पनिक मुलाखतींचे पुस्तक नुकतेच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या मुलाखतींच्या माध्यमांतून शिरसाठ यांनी तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी विषयांवर काहीसं तिरकस, उपरोधिक भाष्य करत समाजजीवनातील विसंगती टिपल्या आहेत. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक...

.................................................................................................................................................................

ऑक्टोबर २०२० ते डिसेंबर २०२२ या सव्वादोन वर्षांत, ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादकीय जागेवर प्रसिद्ध झालेल्या ११ मुलाखतींचा हा संग्रह आहे. केशवराव मला पहिल्यांदा भेटले ते अपघाताने, पण पुन: पुन्हा भेटत राहिले याचे कारण माझे पूर्वसंचित. कसे ते पार्श्वभूमीसह थोडक्यात सांगतो.

५ ऑक्टोबर २०२० रोजी वृत्तपत्रांतून बातमी आली, ‘‘६ ऑक्टोबर १८२१ रोजी सुरू झालेल्या पुणे येथील डेक्कन कॉलेजचे द्विशताब्दी वर्ष उद्यापासून सुरू होत आहे.’’ ती बातमी मला चित्ताकर्षक वाटली, कारण १९व्या शतकातील महाराष्ट्र हा माझ्या विशेष जिव्हाळ्याचा विषय! १९९५ ते २००५ या काळात मी त्या विषयावरील अनेक पुस्तके वाचली, लेख वाचले, भाषणे- चर्चासत्रे ऐकली होती. त्या शतकातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक प्रवाह आणि त्यांच्यातील अंतर्गत ताणेबाणे मला नेहमीच वैचारिक खाद्य पुरवत राहिले. केवळ तो काळ समजून घेण्यासाठी नव्हे, तर आजच्या वर्तमानाचे विवेचन व विश्लेषण करण्यासाठी आणि भविष्याचे अंदाज बांधण्यासाठीही!

साहजिकच, ती बातमी वाचली, तेव्हा त्या आठवड्याच्या साधना साप्ताहिकाचे संपादकीय डेक्कन कॉलेजवर लिहावे, हा विचार मनात चमकला. पण त्यावर काय लिहायचे, याचा विचार करू लागलो. त्यात अडचण अशी होती की, तेव्हा करोना लाटेमुळे लॉकडाऊनचे दिवस नुकतेच मागे पडले होते, पण बरेच निर्बंध कायम होते. शिवाय, मी पुण्यात नव्हतो; अहमदनगर जिल्ह्यातील लहान गावात (माझ्या घरी) राहून ‘साधना’चे काम करत होतो. त्यामुळे माझ्या हाताशी डेक्कन कॉलेजशी संबंधित काहीच दस्तऐवज किंवा पुस्तके वा लेख नव्हते. आणि ‘साधना’चा अंक तर दुसऱ्याच दिवशी छापायला जाणार होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

परिणामी, केवळ पूर्वतयारीवर काय लिहिता येईल, याचा विचार सुरू झाला. डेक्कन कॉलेजातून बाहेर पडलेले किती विद्यार्थी, किती विविध क्षेत्रांत (भारतात आणि जगात) वावरले असतील ही कल्पनाच थरारून टाकणारी वाटली. तेव्हाच ‘डेक्कन कॉलेजकडे पाहून केशवरावांच्या मनात आलेले विचार’, या शि.म. परांजपे यांनी लिहिलेल्या लेखाची तीव्रतेने आठवण झाली. इसवीसन २०००च्या दरम्यान माझी विद्यार्थीदशा संपत असताना शि.म. परांजपे यांचा तो लेख माझ्या वाचनात आला होता, माझ्या होस्टेलमध्ये त्याचे सामूहिक वाचनही दोन-तीन वेळा घडवून आणले होते. वक्रोक्ती, व्याजोक्ती, उपहास यामुळे शंभर वर्षांपूर्वीचा म्हणजे इसवीसन १९००दरम्यानचा तो लेख सर्वांचीच दाद मिळवून गेला होता.

पुढे मी ‘साधना’त काम करायला लागलो, तेव्हा अधूनमधून असा विचार उफाळून येत होता की, तो लेख कधी तरी काही तरी निमित्ताने वापरायला हवा. मात्र त्याला तसे निमित्त मिळत नव्हते. आता द्विशताब्दीचे निमित्त मिळाले, त्यामुळे तो लेख पुनर्मुद्रित करायचा आणि त्यातील काही धागे घेऊन संपादकीय लिहायचे असे ठरवले. पण मधल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात तो लेख मी वाचलेला नव्हता, त्यामुळे आता पुनर्मुद्रण करण्यासाठी तो कितपत योग्य ठरेल, याची थोडी शंका होती. शिवाय संपादकीय लिहायचे तरी तो लेख हाताशी आवश्यक होता. परंतु ती सगळी प्रक्रिया घडवण्यासाठी फक्त रात्र उरली होती. मग ‘शि.म. परांजपे यांच्या त्या लेखाची पाने स्कॅन करून मला पाठवा,’ असे ऑफिसमधील आमचे सहकारी सुदाम सानप व विनायक पवार यांना कळवले. त्यांना रात्रीच्या वेळी ते पुस्तक मिळत नव्हते, मात्र ‘काळ पत्रातील निवडक निबंध : खंड तीन’ची पीडीएफ त्यांनी मिळवली आणि मला पाठवली. तो लेख नजरेखालून घालतानाच वाटले, हा पूर्ण लेख जसाच्या तसा अंकात पुनर्मुद्रित करायला हवा.

त्यानंतर या लेखातला कोणता धागा पकडून तीन पानांचे संपादकीय लिहावे, याचा विचार करू लागलो. रात्री झोपताना उशिरा अशी कल्पना मनात चमकून गेली की, ‘ते केशवराव आज हयात असते आणि डेक्कन कॉलेज स्थापनेच्या द्विशताब्दी वर्ष प्रारंभ समारंभाला उपस्थित राहिले असते तर?’ तीच कल्पना पुढे अशी सरकली की, ते आजही हयात आहेत आणि रोज पहाटे त्याच परिसरात फिरायला येतात, मात्र आज लॉकडाऊनमुळे द्विशताब्दी समारंभ होत नाहीये, तर त्यांच्या मनात काय भावना आल्या असत्या? मग त्यांच्या वयाचा हिशोब करू लागलो. त्या लेखातील संदर्भ पाहता १६० वर्षांच्या दरम्यान त्यांचे आताचे वय राहिले असते. त्यातून मग अशी कल्पना निश्चित झाली की, लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होणार नाही, पण त्या दिवसाचे औचित्य म्हणून संपादक या नात्याने आपण तिथला माहोल टिपायला गेलो आणि एक वृद्ध आजोबा तिथे पहाटे फिरायला आलेले दिसले, ते या कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि तेच केशवराव निघाले. ते एकटेच त्या प्रांगणात भल्या पहाटे आपल्याला भेटले तर काय संवाद होईल, ही मध्यवर्ती कल्पना मनात तयार झाल्यावर मी रात्री झोपलो. आणि मग सकाळी उठून एकटाकी केशवरावांची पहिली भेट मुलाखत स्वरूपात लिहिली. शि.म. परांजपे यांच्या त्या लेखातील वर्णनावरून माझ्या मनात केशवरावांची व्यक्तिरेखा पूर्वीपासून ढोबळ मानाने तयार होतीच, तीच अधिक स्पष्ट होऊन कागदावर उतरली. आणि मग अंक छापायला सोडला. अर्थातच त्या बीजलेखासह.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

दोन दिवसांनी तो अंक छापून आला, तेव्हा त्या मुलाखतीचे स्वागत होणे साहजिक होते. पण संपादकीय जागेवर असे काही पहिल्यांदाच आल्याने काही वाचक बुचकळ्यात पडले. लॉकडाऊन असून मी पुण्यात कधी आलो, डेक्कन कॉलेजला गेलो कधी आणि केशवराव भेटले कधी असा प्रश्न काही जवळच्या मित्र-सहकाऱ्यांनाही पडला. इतकी ती मुलाखत खरीखुरी उतरली. त्या मुलाखतीवर आमचे सहकारी सुदाम, परितोष गोडबोले, सुरेश माने, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस यांच्यासह आणखी काही प्रतिक्रिया आल्या. तेव्हा वाटले, केशवरावांच्या आणखी काही मुलाखती घेऊन संपादकीय जागेवर प्रसिद्ध कराव्यात. जास्त नाही, पण महिन्यातून एक मुलाखत असे प्रमाण ठरवावे आणि डेक्कन कॉलेज स्थापनेचे २००वे वर्ष पूर्ण होईल, तेव्हा केशवराव परदेशात निघून गेले असे सांगून मुलाखत मालिका थांबवावी, असे नियोजन मनात आकाराला आले. त्यासंदर्भात आमचा तरुण मित्र संकल्पशी बोललो तर तो म्हणाला, ‘अशा प्रकारे कितीही मुलाखती तुम्ही घेऊ शकता आणि कितीही काळ हे सदर चालवता येईल.’ तरीही एक वर्ष आणि दहा ते बारा मुलाखती असेच नियोजन माझ्या मनात होते.

पुढच्या महिन्यात दुसरी मुलाखत घेतली, त्यानंतर मात्र व्यस्त दिनक्रमामुळे महिन्यातून एक हे प्रमाण मला राखता येईना. कारण खटकेबाज व रोचक संवाद, सूक्ष्म विनोदी छटा, व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील विसंगती आणि तरीही ठोस भाष्य अशा स्वरूपातील त्या मुलाखती घेण्यासाठी अधिक अवकाश व उसंत आवश्यक असायची. आणि साधना अंक छापायला सोडण्याच्या एक दोन दिवस आधी, तसे सहसा घडत नाही. त्यामुळे दर महिन्याला एक मुलाखत हे प्रमाण राखू शकलो नाही. परिणामी दोन वर्षाच्या अखेर दहाच मुलाखती झाल्या, म्हणून ठरवले आता ही मालिका लांबवायला नको.

वस्तुतः या मुलाखती लिहिताना मला सर्जनशीलतेचा चांगलाच आनंद मिळत होता. कारण केशवरावांशी संवाद म्हणजे स्वतःशी संवाद, ते माझ्या आतमध्येच तर होते, माझाच दुसरा आवाज वाटत होते मला. पहिल्या व दुसऱ्या मुलाखतीचा समारोप ‘‘चला, उशीर झालाय, निघतो मी’’ असे म्हणत, त्या-त्या प्रश्नाचे उत्तर न देता केशवराव निघून जातात असा सहज जुळून आला होता. नंतरच्या सर्व मुलाखतींचा शेवट मात्र मी जाणीवपूर्वक तसाच केला आहे.

केशवरावांच्या मुलाखती लिहिणे हे काम तसे रात्रीच्या किंवा सकाळच्या वेळेत, अवघ्या तीन-चार तासांत पूर्ण करणे हे थोडे जिकिरीचे असायचे. पण तरीही मला त्याचा त्रास असा काही झाला नाही. याची दोन कारणे सांगता येतील. एक - १९९८मध्ये डॉ. अरुण टिकेकर यांनी ‘बहाद्दर’ या टोपणनावाने लोकसत्ता दैनिकात ‘टिचकी’ हे सदर सहा महिने चालवले होते, त्यात लेले आणि बहाद्दर या दोन निवृत्तांचा संवाद प्रसिद्ध होत असे (पुढे त्याचे पुस्तक ‘लेले आणि मी’ या नावाने श्रीविद्या प्रकाशनाकडून आले). त्या सदरावर मी बेहद्द खूश होतो आणि बहाद्दर या टोपणनावाने टिकेकरच लिहीत आहेत, हे सर्वप्रथम ओळखणारा त्यांच्या अंतर्गत वर्तुळाबाहेरचा (कदाचित एकमेव) वाचक मी होतो. तसे पत्र मी त्यांना लिहिले होते आणि ‘लोकसत्ता’च्या १३ ऑगस्ट १९९८ च्या अंकात ‘लोकमानस’मध्ये ते प्रसिद्ध झाले होते. माझ्या नावाने काही तरी छापून येण्याची ती पहिली वेळ होती. त्यानंतर २००४मध्ये मी ‘साधना’त ‘लाटा लहरी’ आणि ‘लोकप्रभा’मध्ये ‘गुऱ्हाळ’ अशी दोन सदरे सात-आठ महिने चालवली, त्यात संवाद फॉर्ममध्येच लिहीत होतो. त्याचीच पुनरावृत्ती केशवराव भेटले तेव्हा झाली, एवढेच!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तर अशा या केशवरावांच्या मुलाखतींवर जाणकार वाचकांच्या प्रतिक्रिया अधूनमधून येत होत्या. विशेष म्हणजे चार-पाच मुलाखती प्रसिद्ध झाल्या तेव्हाच आमच्या एका कार्यालयीन बैठकीत, ‘साधना ट्रस्ट’च्या माजी अध्यक्ष विजया चौहान यांनीही सांगितले की, ‘केशवरावांच्या मुलाखतींचे पुस्तक यायला हवे.’ पण तरीही अकरा मुलाखतींचे छोटे पुस्तक ६ जानेवारी २०२३ रोजी ‘मराठी पत्रकार दिना’चे औचित्य साधून (बाळशास्त्री जांभेकर यांची स्मृती) प्रकाशित करताना, ‘हे वाचणार कोण’ असा प्रश्न माझ्या मनात चमकून गेला आणि संकल्पनेही थेट विचारला. पण ‘साधना’च्या संपादकीय जागेवर आलेल्या, एका सूत्रात बांधलेल्या या ११ मुलाखतींना काही एक संग्राह्यमूल्य निश्चितच आहे. म्हणून हे छोटे पुस्तक प्रकाशित करतो आहे. या सर्व मुलाखती एकत्र वाचल्या तर केशवराव या वृत्तीची आणि डेक्कन कॉलेज या शक्तीची प्रचिती येईल, असा विश्वास वाटतो.

गंमत म्हणजे, हे केशवराव खरोखरच दीडशेहून अधिक वर्षांचे आहेत आणि मी त्यांना प्रत्यक्षात भेटून मुलाखती घेतोय, अशीच समजूत असणारे काही वाचक मला शेवटपर्यंत भेटत राहिले. आणि केशवरावांच्या मुलाखती थांबवताना मलाही दुःख वाटते आहे, परंतु ते ब्रिटनला गेलेत तर मेल वा मेसेजद्वारे भेटत राहण्याची शक्यता किंचितशी शिल्लक ठेवून मी ते शल्य कमी केले आहे...!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......