श्रीधर अंभोरे यांच्या चित्रात समाज-संस्कृती व विचारांचे अंश आहेत आणि चित्रनिर्मितीतील मनस्वी आनंद हा त्यांच्या प्रज्ञेचा आविष्कार आहे
ग्रंथनामा - झलक
रणधीर शिंदे
  • ‘श्रीधररेषा’
  • Fri , 19 August 2022
  • ग्रंथनामा झलक श्रीधररेषा Shreedhar Resha श्रीधर अंभोरे Shreedhar Ambhore महावीर जोंधळे Mahaveer Jondhale सुधीर पटवर्धन Sidheer Patwardhan

प्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांविषयीचं ‘श्रीधररेषा’ हे ज्येष्ठ संपादक महावीर जोंधळे यांनी लिहिलेलं पुस्तक नुकतंच शब्दशिवार प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

एक हरहुन्नरी अवलिया कलावंत म्हणून श्रीधर अंभोरे महाराष्ट्राला परिचित आहेत. सृष्टी आणि माणसांविषयी अपार कुतूहल त्यांना आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या प्रदेशांशी त्यांचा जवळून संबंध आला. त्यांचे चित्रकलेविषयी औपचारिक शिक्षण वा गुरुगंडा बांधणी झालेली नाही. कलेविषयीची आंतरिक प्रेरणा आणि सृष्टीवाचनातून स्फुरलेले आकारक्षण चित्रबद्ध करण्यात त्यांना धन्यता वाटते. त्यामुळे त्यांची चित्ररेषा महाराष्ट्रातील चित्रकलापरंपरेशी फटकून आणि ‘स्वतंत्र’ राहिली. या चित्ररेषेचे पूर्व आणि उत्तर घराणे नाही. अहमदनगर येथे पोस्टात काम करत असताना त्यांनी काही साहित्यविषयक उपक्रम केले. ‘आदिम’ व ‘दिंडी’ ही नियतकालिके सुरू केली. यामध्ये सदाशिव अमरापूरकर, अरुण शेवते यांचा सहभाग होता. याचबरोबरच त्यांनी वाङ्मयीन नियतकालिकांची मुखपृष्ठे व रेखाटने केली. बहुविध स्वरूपाचे वाचन आणि सृष्टीवाचनातून झालेल्या शहाणीवेच्या जोरावर त्यांनी त्यांची स्वतंत्र चित्रशैली निर्माण केली. वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी त्यांना फाय-फाऊंडेशनसारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही ते आवडलेल्या कलाकामासाठी मनःपूर्वक भटकंती करतात.

चित्रनिर्मितीतील मनस्वी आनंद हा त्यांच्या प्रज्ञेचा आविष्कार! त्यामुळेच नियमबद्ध व व्यावसायिक स्वरूपाची कामे अंभोरे यांनी केली नाहीत. इतरेजणांच्या सांगण्यावरून ते चित्रे काढत नाहीत. त्यांनी आवडलेल्या विषयांवर काही पुस्तकांची मुखपृष्ठे व रेखाटने केली. दबलेल्या इच्छांचा आविष्कार चित्रात असतो, असे त्यांना वाटते. चित्रनिर्मितीत साधना आणि रियाजाला ते महत्त्व देतात. लोकांताऐवजी एकांतातील आंतरिक प्रेरणा आणि त्या क्षणीची सत्प्रवृत्ती अंभोरे यांना महत्त्वाची वाटते. त्यामुळेच चित्रांकडे ते विशुद्धतेच्या, निर्मळतेच्या भावनेने पाहतात. शतकानुशतके वाहत आलेल्या नेणिवेतील आधिभौतिकाचे अंभोरे यांना कमालीचे आकर्षण आहे. त्यामुळे त्यांच्या चित्ररेषेचे नाते आदिमतेशी आहे. सृष्टीतील ओबडधोबड आकार व आकारविहीन अवकाशाचे त्यांना पराकोटीचे आकर्षण आहे. गडद रंगांच्या सरमिसळीऐवजी कृष्णधवल रंग ही त्यांची प्रियतम अवकाशभूमी आहे. त्यामुळेच या कृष्णधवल प्राथमिक रंगभूमीवर त्यांनी चित्राकारास सजवले आहे. छोट्या-मोठ्या दगडांचे अवाढव्य आकार, झाडांचे, बुध्यांचे अनियमित वेल्हाळणे, विविध वास्तू, पशुपक्षी, प्राणी व मानवी जग यांच्या ‘असण्या’ची रेषासंस्कृती त्यांनी निर्माण केली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

श्रीधर अंभोरे यांच्या चित्रशैलीला दार्शनिक चिंतनशीलतेचे दाट संदर्भ आहेत. पिंपळवृक्ष, पिंपळपानांची सळसळ, पक्ष्यांचे थवे, फांद्यांच्या चमचमणाऱ्या क्षण गुणगुणीचे नाते बुद्धकाळाशी आणि चिंतनाशी आहे. या अर्थानेही अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन होऊ शकते.

अंभोरे यांच्या चित्रशैलीत निसर्ग आणि सृष्टीच्या ‘असते’पणाला विशिष्ट स्थान आहे. त्यांच्या रेषाचित्रांमधील आकारांची खेचभूमी ही निसर्ग आणि जंगल आहे. भारतातील अनेक वनोपवने त्यांनी अंतःकरणपूर्वक पाहिली, अनुभवली आहेत. त्यांच्या चौफेर आणि संवेदनशील मनाने निसर्गाच्या ‘असते’पणाला अंतःकरणात साठवले आहे. या आकारांना ते चित्रबद्ध करत आले आहेत. सुनियोजित, चिरेबंद आकार, घाटांऐवजी विमुक्त आदी आकारांचे त्यांना जादुई आकर्षण आहे. निसर्गाला ते गुरू मानतात. लहानपणी गावाकडे पाहिलेल्या ‘बाभुळबना’ने त्यांना खूप काही दिले आहे. सृष्टीच्या या चौकटविरहित सळसळण्याला त्यांनी त्यांच्या रेषाचित्रांमध्ये मध्यवर्ती स्थान दिले. त्यामुळे अंभोरे यांच्या रेषाचित्रातील विलोभनीय अशा निसर्गसृष्टीतील नात्यांमधले परस्परसंबंध जाणून घेणे, हे आनंददायी आहे.

त्याचबरोबर अंभोरे यांच्या चित्रशैलीत मानव प्रवासाची रूपे आहेत. मानवी रूपांना चित्रांकित करण्याचे वेगळे सामर्थ्य त्यांच्या रेषाचित्रांमध्ये आहे. या ठिकाणी सुधीर पटवर्धन आणि श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांमधील ‘मानवी’ रेखाटने पाहणे उदबोधक आहे. पटवर्धनांच्या मानवी चित्रांतील पराकोटीची अभावग्रस्तता व करुणा ही महानगर जीवनातून आली आहे. तिचे म्हणून एक वेगळे स्थान आहे. एक अनागर अशा माणसांच्या करुण आणि केवील चेहऱ्याच्या समूहसंस्कृतीने अंभोरे यांच्या चित्रशैलीला वेगळे परिमाण लाभले आहे.

अंभोरे यांची स्वतःची एक चित्ररेखाटन शैली आहे. ती त्यांनी स्वतंत्ररित्या घडवलेली आहे. या चित्रात मानव संस्कृतीच्या आदिखुणांचे ठसे आहेत. गडद हिरव्यापोपटी रंगांची डेरेदार झाडं, मातट रंगाचा बुंधा, झाडाच्या डहाळ्यांवरले चिमुकले धवलपक्षी, चेहराविहीन स्त्री आणि पुरुष, गाय आणि बैलांनी त्यांची चित्रसृष्टी सजली आहे. पाठमोरे विशाल पसरलेले गडद निळे फिकट नीलरंगी नभांगण, समुद्ररंग आणि आकाशरंग एकमेकांत मिसळून गेलेले पाहणे विस्मयजनक आहे. त्यांच्या चित्रातील दृष्टीबिंदूतून संथ विराम पावत गेलेले, मिटत गेलेले आकाश मनात नवे अर्थध्वनी निर्माण करतात. त्यांच्या चित्रांतील मोठ्या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर जमिनीवरील एक स्थिरचित्राचे प्रभावीपणे साक्षांकन आहे. रंगांच्या ताजेपणाचा, टवटवीतपणाचा प्रत्यय देणारा आल्हाददायक अनुभव अंभोरे यांच्या रंगचित्रात आहे. कमळफुलांचे आकार, झाडापानांचे अनंत नक्षीकाम, त्यातल्या वेल्हाळ लयबद्ध रेषांच्या पुंजवळणांनी बहार आणली आहे. कमळ, विविध पानेफुले, पक्षी, चंद्रकोर, मोर आणि मानवी चेहरे आणि ऊर्ध्वगामी हातांबोटांचे आकाशाकारांना वेगळे स्थान आहे.

अंभोरे यांच्या चित्रांत मानव-संस्कृतीचे एक वेगळे चित्रांकन आहे. समूहगर्दी, चेहऱ्याची विशिष्ट भरड ठेवण, त्यातली अभावग्रस्तता, आजूबाजूचा अस्ताव्यस्त परिसर, फुटकीतुटकी भांडी, समूह, डोईवर ओझे बाळगणारे स्त्री-पुरुष, स्त्रियांच्या कटीवरील लहान मुले, शेळ्या-मेंढ्या, असा कृतिशील मानवसमूह त्यांच्या चित्रांत आहे. कष्टकरी, श्रमण संस्कृतीची ही चित्रे आहेत. खूप तपशील न भरता मानवी जगण्यातील अभावग्रस्तता व त्यातली करुणा या चित्रांतून पाझरते. निसर्ग भावस्थितीच्या वेगवेगळ्या मूडस् त्यातला अवकाशपैस पकडणारी रेषाचित्रे आहेत. कमीत कमी रेषा, त्यांची एकमेकांतील अनेक प्रकारची गुंतवळ, काळ्या-पांढऱ्या रंगाच्या प्रभावी वापरातून इतकी अर्थघनता आणली आहे. त्यांच्या रंगचित्रांत आणि रेखाचित्रांत मानव आणि निसर्ग यातल्या आदिम भावावस्थेच्या छटा आहेत. त्यामुळे श्रीधर अंभोरे यांच्या चित्रशैलीचे वाचन एका वेगळ्या समज-उमजेकडे घेऊन जाते.

महावीर जोंधळे यांचे अंभोरे यांच्या रेषाचित्रांविषयीचे हे मुक्त स्वरूपाचे चिंतनलेखन आहे. ते मोठ्या प्रमाणात आस्वादात्मक व भावदर्शी आहे. अंभोरे यांच्या रेषाचित्रांचा त्यांच्या मनावर जो ठसा उमटला आहे, त्याला काहीएक प्रमाणात चौकटबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. अंभोरे यांच्या चित्रवाचनातून त्यांच्या मनावर झालेल्या परिणामांच्या नोंदी व त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये जोंधळे यांच्या लेखनात आहेत. अंभोरे यांच्या चित्रांची काहीएक मीमांसा आहे. अंभोरे यांच्या रेषाचित्रांचे वाचन, आकलन आणि त्यांना जाणवलेले अर्थ नोंदवले आहेत. या चित्राकारांचे आकारसौंदर्य, तत्त्वे आस्वादात्मक पद्धतीने मांडले आहेत. ‘त्या त्या चित्रात’, ‘सूचक भावनिर्मिती’, ‘एकतत्त्व शैली’, ‘उभं आडवं आणि तडक’, व ‘अमेरिकेतही श्रीधर’ या पंचसूत्रातून जोंधळे यांनी चित्रवैशिष्ट्ये नोंदवली आहेत. जोंधळे यांच्या चित्रअन्वयार्थास खास अशा प्रशिक्षित चित्रकला मीमांसेचे संदर्भ नाहीत; परंतु जोंधळे यांच्या सूक्ष्म अशा रेषाचित्र पाहणीतून त्यांच्या मनावर त्या त्या चित्राचे जे संस्कारठसे उमटले, त्याचे हे शब्दरूप आहे. मात्र या चित्रअर्थात चित्रांविषयी, कलावंताविषयी जाणवलेल्या अर्थाची काहीएक संगतवार निरीक्षणे व चित्रविशेष आहेत.

आरंभी त्यांनी श्रीधर अंभोरे यांच्या रेषाचित्रांची व्याप्ती व पसारा सांगितला आहे. ‘रेषालय’ केंद्रवर्ती ठेवून अभिव्यक्तीला प्राधान्य देणारी उज्ज्वल चमक असणारी ‘श्रीधररेषा’ त्यांना वाटते. ‘साधनं कमी आणि साधना जास्त’ या शब्दांत अंभोरे यांच्या कलेचे वेगळेपण सांगितले आहे. श्रीधर अंभोरे यांच्या सुट्या सुट्या चित्रांमधील जाणवलेली अर्थसंगती शोधली आहे. या चित्राकारांतील मानवीपण, लोकभावना, निसर्गाकार, समाजसंस्कृतीचे संदर्भ, भूमिनिष्ठा, लयबद्धता, ताजेपणा, कल्पनाशीलता व सर्जनशीलतेची रूपे उलगडून दाखविली आहेत. अंभोरे यांच्या आकारचिंतनामागे असणाऱ्या कलावंताच्या जाणीव-नेणीव व विचारशीलतेची रूपे ते सांगतात. या चित्रांमधील ‘पंखहीन समाजातील खरेखरे अबोली अर्थ व माणूसकेंद्री दृष्टीची वैशिष्ट्ये सांगतात’. ‘त्यांची चित्रे सर्वहारा संस्कृतीकडे अधिक झुकलेली आहेत’, हे त्यांचे निरीक्षण महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर श्रीधर अंभोरे यांच्या चित्रांतील 'काळ्या' रंगाच्या दाट उपस्थितीच्या संदर्भक्षेत्राचा नोंदवलेला अन्वयार्थ महत्त्वाचा आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘अमेरिकेतही श्रीधर’ या टिपणात अंभोरे यांचा संक्षिप्त चरित्रांश सांगितला आहे. ‘श्रीधररेषा’ जाणून घेण्यासाठी तो महत्त्वाचा आहे. श्रीधर अंभोरे यांचे व्यक्तिमत्त्व, संवेदन स्वभाव, मानवी गोतावळा, खुली-उमदी विमुक्त दृष्टी, कमालीचे साधेपण, फिरस्ती, सर्जनशील वेडेपण व ‘रेषाइमाना’ची संक्षिप्त सूत्रे सांगितली आहेत.

महावीर जोंधळे यांच्या चित्रवाचन लेखनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील आस्वादपरता. त्यांनी आवडलेल्या, भावलेल्या चित्राची संगतवार वैशिष्ट्ये भावभाषेत सांगण्याला महत्त्व दिले आहे. चित्रवाचनाच्या एकांत मग्नतेतून आलेला प्रत्यय नोंदवला आहे. त्यात भावलेली मनःपूर्वकता आहे. त्यामुळे हा रेषागौरव अधिक जास्तीच्या आत्मप्रत्ययी भाषेत नोंदवला आहे. ‘ही चित्रगाथा म्हणजे आईनं जात्यावर म्हटलेली ओवी वाटते’. ‘त्यांचे चित्र एक कविता असते आणि कथाही’. ‘डोळे तप्त होतात आणि निवतातही’, अशी चित्र आस्वादरूपे आहेत. एका अर्थाने ही मुक्तचित्रचिंतन शैली आहे. अंभोरे यांच्या 'चित्रगाभ्यात शिरून हळूहळू मन अगारू झाले की, असाधरणेतचा अर्थ उकलत जातो, या भावनेने त्यांनी लेखन केले आहे.

एकंदरीत, महावीर जोंधळे यांनी श्रीधर अंभोरे यांच्या रेषाचित्रांचे अर्थ व वैशिष्ट्ये शोधली आहेत. कलावंतांच्या संदिग्ध प्रमेयवाटांची अर्थसंगती त्यात आहे. अंभोरे यांच्या चित्रात समाज-संस्कृती व विचारांचे अंश आहेत. त्याचबरोबर या चित्रांचे सौंदर्याकार नोंदवले आहेत. कोणत्याही कलावंतांची बेसरबिंदी (ग्रेस यांचा शब्द) शोधणे हे महाकठीण काम असते. कलावंतांच्या रंगरेषाकाराचे अर्थ-अनर्थ व साहचर्य संबंधाचा संगतवार उलगडा करणे कठीण असते. मराठीत चित्रसमीक्षा व चित्रांवरील लेखन फारसे होत नाही. या पार्श्वभूमीवर या लेखनाचे मोल आहे. हा चित्रवाचनाचा प्रारंभिक टप्पा आहे. हरेक चित्ररसिकांच्या मनात सापेक्ष चित्रवाचनाचे ब्रह्मांड अर्थ असतात. त्याला ध्वनित केले तर 'चित्रसमजेची वृद्धी होईल. या वाटेवरून चित्रवाचनाची संस्कृती अधिक वर्धमान व्हावी. तिला असंख्य फांद्या फुटाव्यात. यासारख्या प्रयत्नातून अंभोरे यांच्या रेषा-चित्रांच्या आकलन-अर्थाच्या वाचक/सापेक्ष अनेक कक्षा प्राप्त होतील, असा विश्वास वाटतो. चित्रवाचनाची अशी खुली भूमी अशा लेखनातून प्राप्त व्हावी.

‘श्रीधररेषा’ - महावीर जोंधळे

शब्दशिवार प्रकाशन, मंगळवेढा

पाने - ८४

मूल्य - १०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......