अडवाणी यांनी १९९०मध्ये काढलेली रथयात्रा आणि मोदी यांनी २०१४मध्ये केलेली वाराणसीची मतदारसंघ म्हणून निवड, असा हा अवघ्या २४ वर्षांचा प्रवास...
ग्रंथनामा - झलक
प्रकाश अकोलकर
  • ‘अयोध्या ते वाराणसी : दिसलं तसं, बघितलं जसं’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 01 July 2022
  • ग्रंथनामा झलक भाजप BJP अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee लालकृष्ण आडवाणी Lal Krishna Advani नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah अयोध्या Ayodhya वाराणसी Varanasi

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘सकाळ’ माध्यम समूहातले एक राजकीय संपादक प्रकाश अकोलकर यांचं ‘अयोध्या ते वाराणसी : दिसलं तसं, बघितलं जसं’ हे पुस्तक नुकतंच रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चार दशकांच्या प्रवासाची आँखो देखी हकीगत सांगितली आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

भारतीय जनता पक्षाचं पहिलं-वहिलं अधिवेशन १९८०मध्ये मुंबईत झालं आणि समारोप सोहळ्यात अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘सुरज निकलेगा, अंधेरा छटेगा... कमल खिलेगा...’ असं भाकित केलं, तेव्हा तिथं उपस्थित असणं, हा निव्वळ योगायोग होता! त्यानंतर २००५मध्ये भाजपचं रौप्यमहोत्सवी अधिवेशन पुन्हा मुंबईतच पार पडलं आणि त्या अधिवेशनाच्या समारोपात वाजपेयींनी ‘लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन हे भाजपचे राम-लक्ष्मण आहेत’, असे उद्गार काढून भाजपमध्येच एक वादाचं मोहोळ उठवलं. त्या वेळी तिथं उपस्थित असणं हा मात्र ना योगायोग होता, ना अपघात! त्याचं कारण म्हणजे याच २५ वर्षांच्या काळात भाजपनं मारलेल्या सुसाट मुसंडीकडे कधी जवळून, तर कधी दुरून बघणं, पत्रकारितेच्या व्यवसायात असल्यामुळे अनिवार्य झालं होतं.

याच २५ वर्षांच्या काळात देशाचं राजकीय नेपथ्य का आणि कसं आरपार बदलत गेलं, हेही त्यामुळेच कधी जवळून, तर कधी काठावरून बघायला मिळत होतं. भाजपनं आपल्या राजकीय प्रवासातील पहिली-वहिली लोकसभा निवडणूक लढवली ती १९८४मध्ये. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या अमानुष हत्येमुळे देशभरात उभ्या राहिलेल्या सहानुभूतीच्या लाटेत भाजपचा पार पालापाचोळा झाला. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सारे मोहरे पराभूत झाले आणि भाजपचे अवघे दोन खासदार लोकसभेत जाऊ शकले. तर काँग्रेसनं आपल्या आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे ४०४ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवलं होतं. हे सारं बातमीदाराच्या नजरेतून पाहायला, अनुभवायला मिळत होतं.

मात्र, त्या निवडणुकीनंतर थोड्याच अवधीत भाजपने कोणाच्या ध्यानीमनी नसेल, अशी घोडदौड देशभरात केली. १९८९मध्ये राजीव गांधी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकांना सामोरे गेले, तेव्हाच काँग्रेसची पत घसरली होती आणि हा पक्ष दोनशेचीही मजल गाठू शकला नव्हता, तर भाजपच्या खासदारांची संख्या अवघ्या दोनवरून ८५पर्यंत गेली होती! या साऱ्या घटना डोळ्यासमोर घडत होत्या. महाराष्ट्रातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांबरोबर पत्रकारितेच्या पलीकडले संबंधही याच काळात जोडले गेले. प्रथम महाराष्ट्र भाजपमधील एक तुलनेनं उदारमतवादी नेते धरमचंद चोरडिया यांच्याशी दोस्ताना जडला आणि त्यातूनच पुढे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबरही मैत्री वाढू लागली. त्यामुळे बरंच काही बघायला मिळत होतं. जे दिसत नव्हतं, तेही हेच मित्र समजावून सांगत. मात्र, त्यातून मनात उभं राहणारं चित्र हे जे काही घडत होतं आणि दिसत होतं, त्यापलीकडलं असे. ते चित्र कुतूहलजनक वाटत असे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या कहाणीत शिरायचं असं ठरवलं, आणि प्राध्यापकी विश्लेषणाच्या बाजापलीकडे जाऊन ‘दिसलं तसं... बघितलं जसं...’ अशा माध्यमातून ही कहाणी एकदा पुस्तकरूपात साकार करायची, असंही तेव्हाच ठरवून टाकलं होतं.

एका अर्थाने ‘राइज अ‍ॅण्ड फॉल’ अशीच ही कहाणी होती.

भाजपने देशभरात बसवलेलं बस्तान प्रत्यक्ष बघायला मिळत असतानाच काँग्रेसची सुरू असलेली घसरणही बघायला मिळते आहे. ही घसरण देशात तोपावेतो रुजलेल्या सर्वसमावेशक आणि मुख्य म्हणजे सेक्यलर मूल्यांना, तसंच लोकशाही उदारमतवादाला तिलांजली देणारी तर ठरणार नाही ना, असा प्रश्न तेव्हाच सातत्यानं मनात येत होता आणि आता हे लेखन प्रकाशित होत असताना, तर देशात कमालीच्या विद्वेषाचं वातावरण निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

२०२१ या वर्षाची सांगताच अत्यंत विखारी वातावरणात झाली आहे. उत्तराखंडमध्ये झालेली ‘धर्मसंसद’ या विखाराचा अंगार घेऊन आली आहे. नाताळचे सोहळे उधळून लावण्याचे प्रकारही घडले आहेत आणि समाजात फार मोठी दुराव्याची दरी उभी राहिली आहे. अयोध्येत १९९२मध्ये ‘बाबरी’ जमीनदोस्त करण्यात संघपरिवार यशस्वी झाला, तेव्हा दिल्या जाणाऱ्या ‘अयोध्या तो बस झांकी हैं....’ या घोषणेचा उत्तरार्ध होता- ‘काशी-मथुरा बाकी हैं...’. आता, २०२२ उजाडत असताना ‘लोकशाही’ मार्गानेच भाजप ही ‘बाकी’ पूर्ण करावयास निघाला आहे की काय, असं वातावरण उभं राहिलं आहे.

भाजपनं २०१४मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ हा नवा चेहरा ‘प्रोजेक्ट’ केला आणि मग मोदींनी वाराणसी मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत वाराणसीला जाणं अपरिहार्यच होतं. अर्थात, जे काही दिसत होतं, ते पाहून भाजपच्या येथवरच्या प्रवासाला लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ या रथयात्रेमुळे मिळालेलं वेगळं वळणच कारणीभूत झालं असणार, असं तेव्हा वारंवार मनात येत होतं. वाराणसीच्या त्या धावत्या दौऱ्यात, सायंकाळच्या कातरवेळी त्या पुराणकालीन संदर्भ असलेल्या ऐतिहासिक दशाश्वमेध घाटावर उभं राहून ती सुप्रसिद्ध ‘गंगा आरती’ बघत असतानाच ‘अयोध्या ते वाराणसी’ हा भाजपचा प्रवास डोळ्यापुढे उभा राहत होता. मात्र, त्यानंतरच्या काळात देशातील वातावरण अधिकच झपाट्यानं बदलत गेलं. हा बदल अचंबित करणारा तर होताच; शिवाय देशाच्या सर्वसमावेशक अशा सांस्कृतिक प्रकृतीवर घाला घालणाराही होता.

खरं तर भाजपच्या स्थापनेला जेमतेम तीन-साडेतीन दशकं उलटून गेल्यानंतर आलेल्या नरेंद्र मोदी राजवटीत, देशाच्या आजवरच्या ‘सेक्युलर’, तसंच सर्वसमावेशक अशा बहुविध-बहुधर्मीय प्रकृतीशी विसंगत असं वर्तन देशातील एका मोठ्या समूहानं अचानक सुरू केलं होतं. हा बदल असा कसा झाला, याबाबत विचार करण्याचं आणि संदर्भ शोधण्याचं काम त्यामुळेच मग सुरू झालं.

हा बदल केवळ आजच्या भारताचं अस्वस्थ वर्तमान सांगणारा नाही, तर तो काँग्रेस आपल्या हातातून गमावत चाललेल्या राजकीय अवकाशाचाही (पोलिटिकल स्पेस) आहे. त्याचप्रमाणे अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी उभ्या केलेले भाजपमध्येही अमूलाग्र बदल घडवून आणले जात आहेत आणि हा पक्ष आता केवळ जणू नरेंद्र मोदी तसंच अमित शहा यांचाच बनला आहे. एका अर्थानं हा जनसंघानं घेतलेल्या ‘भाजप’अवतारानंतरचा आणखी एक नवा अवतारच आहे.

भाजपची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झाली असली, तरी त्यास आधीच्या काही दशकांची फार पार्श्वभूमी होती. या विचारधारेची नाळ १९५१मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडून स्थापन केलेल्या भारतीय जनसंघ नावाच्या पक्षाशी जुडलेली होती. त्याचबरोबर १९२५मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेतही त्याची बीजं होती. त्याचबरोबर या विचारसरणीचं नातं १९१५मध्ये पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुढाकारानं उभ्या राहिलेल्या हिंदू महासभेशीही होतं. अर्थात काळाचा हा पट फार मोठा होता. त्यामुळेच पृष्ठसंख्येच्या मर्यादेत राहून या प्रवासाचा वेध घेताना, या बदलांचं भान सुटणार नाही, याचीही शक्य तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न होता होईल तेवढा केला आहे.

अडवाणी यांनी काढलेली ‘सोमनाथ ते अयोध्या’ ही रथयात्रा मुंबापुरीत आली, तेव्हाच मुंबईकरांनी केलेलं त्या यात्रेचं जोरदार स्वागत, वातावरण बदलत चाललं असल्याची साक्ष देत होतं. ‘रथयात्रे’नंतर दोनच वर्षांत अयोध्येत ‘बाबरी विध्वंस’ प्रकरण घडलं आणि नंतर लागोपाठ मुंबईत झालेल्या दोन भीषण दंग्यांचा कटू अनुभवही पदरी आला. अर्थात, त्या दंगलींमुळेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं राज्य येऊ शकलं होतं. पुढे एकदा लखनऊ, रायबरेली, अमेठी या ‘हाय-प्रोफाइल’ मतदारसंघांचा धावता लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं झाला होता. दरम्यान १९९६ ते २००४ या काळात वाजपेयी यांची सरकारं आली आणि गेलीही!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मात्र, ‘अयोध्या ते वाराणसी’ हाच या प्रवासाचा शेवट आहे, हा विचार प्रकर्षानं मनात बळावला तो २०१४मध्ये मोदी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतरच. तेव्हापासून अधून-मधून कधी जमेल तशा, तर कधी सूत्रबद्ध पद्धतीनं या प्रवासाचे संदर्भ धुंडाळण्याचं काम सुरू झालं. ते काम आता पूर्ण होऊन या पुस्तकरूपात प्रसिद्ध होत आहे.

अर्थात हा आढावा वा विश्लेषण परिपूर्ण आहे, असा माझा दावा मात्र बिलकूलच नाही. अडवाणी यांनी १९९०मध्ये काढलेली रथयात्रा आणि मोदी यांनी २०१४मध्ये केलेली वाराणसीची मतदारसंघ म्हणून निवड, असा हा अवघ्या २४ वर्षांचा प्रवास हा या पुस्तकाचा विषय असला, तरी त्याचा मागोवा घेताना थेट १८५७च्या बंडापर्यंत मागे जावं लागलं.

पुस्तक प्रकाशित होत असताना, देशातील वातावरण अधिकाधिक गढूळ कसं होत चाललं आहे, हे बघणं मन विषण्ण करून जाणारंच आहे. भारताची सर्वसमावेशक प्रकृती आणि बहुरंगी-बहुधर्मीय संस्कृती नामशेष करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेलाच धोका पोहोचू पाहत आहे. मात्र, जनता ही चतूर आणि शहाणी असते, यावर विश्वास ठेवला तर या गढूळलेल्या विखारी वातावरणातून कधी तरी देशाला हीच जनता बाहेर काढेल, अशी खात्री वाटते. लोकशाही राज्यव्यवस्थेत जनता हीच सार्वभौम असते. त्यामुळे आता जनतेलाच निर्णय घ्यावा लागणार आहे.

‘अयोध्या ते वाराणसी : दिसलं तसं, बघितलं जसं’ – प्रकाश अकोलकर

रोहन प्रकाशन, पुणे

पाने – २५४

मूल्य – ३४० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......