इतिहासाकडे अधिक निकोप, चिकित्सक व विधायक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. अन्यथा, शेजवलकर म्हणतात तसे इतिहासाच्या ‘क्षीरा’ऐवजी दुरभिमानाचे काळेकुट्ट ‘नीर’च हाती येणार!
ग्रंथनामा - झलक
राजा दीक्षित
  • ‘मोहरा महाराष्ट्राचा’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ आणि संत तुकाराम व शिवाजी महाराज यांची छायाचित्रं
  • Wed , 15 June 2022
  • ग्रंथनामा झलक मोहरा महाराष्ट्राचा Mohra Maharashtracha रमेश अंधारे Ramesh Andhare शिवाजी महाराज Shivaji Maharaj संत तुकाराम Sant Tukaram त्र्यं. शं. शेजवलकर T. S. Shejvalkar

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. या घटनेला १ मे २०२० रोजी ६० वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ग्रंथाली या प्रकाशनसंस्थेने विज्ञान, भाषा, साहित्य आणि संस्कृती या तीन क्षेत्रांतील महाराष्ट्राच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या तीन महत्त्वाकांक्षी ग्रंथांचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र हे तिन्ही प्रकल्प करोनाच्या आकस्मिक लाटेमुळे लांबले. तरीही ग्रंथाली आणि संबंधित प्रकल्पाच्या संपादकांनी ते नेटाने पूर्ण केले. नुकतेच हे तिन्ही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. प्रस्तुत ‘मोहरा महाराष्ट्राचा’ हा त्यापैकीच एक. याचे संपादन रमेश अंधारे यांनी केले आहे. या ग्रंथात गो. बं. देगलूरकर, रा. चिं. ढेरे, वसंत आबाजी डहाके, आ. ह. साळुंखे, श्रीधर रंगनाथ कुलकर्णी, रावसाहेब कसबे, दि. के. बेडेकर, अशोक चौसाळकर, भास्कर लक्ष्मण भोळे, फकरुद्दीन बेन्नूर, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्रीपाद भालचंद्र जोशी, जनार्दन वाघमारे, सुनीलकुमार लवटे, फ. म. शहाजिंदे, निशिकांत मिरजकर, गो. म. कुलकर्णी, अजय देशपांडे आदी ४३ लेखकांच्या साहित्य आणि संस्कृतीविषयक लेखांचा समावेश आहे. त्यातील हा एक लेख... 

..................................................................................................................................................................

साहित्याशी सामाजिकता अविभाज्यपणे निगडित असते. या सामाजिकतेची ऐतिहासिकतेशी बेमालूम गुंफण झालेली असते. इतिहास ही एका अर्थी आपली सामाजिक अस्तित्वओळख असते. इतिहास-भान, इतिहास-लेखन आणि साहित्यासकट विविध प्रकारचे सर्जन यांचे जैविक नाते असते. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्याच्या सामाजिकतेचा वेध घेताना मराठी माणसाची ऐतिहासिक जडणघडण समजावून घ्यायची, ती यामुळेच. त्यासाठी खरं तर महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकायला हवा. पण विस्तारभयास्तव त्याला फाटा देऊन लेखाच्या मूळ विषयानुषंगाने काही ठळक मुद्दे मांडण्याचे योजलेले आहे.

‘मराठी माणूस’ कोणाला म्हणावे? अर्थातच मराठी संस्कृतीशी समरस होणाऱ्याला म्हणावे. मराठी माणसाची एक साधी सोपी, पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र.के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एक तरी अभंग तोंडपाठ येतो, तोच अत्र्यांच्या मते खरा मराठी माणूस. (एवढ्यावरच थांबले तर ते अत्रे कसले? ‘ज्याच्या घरी नाही गाथा। त्याला हाणा चार लाथा’ असेही ते ऐकवतात!) अत्रेकृत व्याख्येच्या चालीवर असे म्हणता येईल की, ‘ग्यानबा तुकाराम’ हा मंत्र ज्याच्या कानी पडलेला नाही, असा एकतरी मराठी माणूस आढळेल का? ‘ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस।।’ या शब्दांत जिचे वर्णन केले जाते, त्या परंपरेशी प्रत्येक मराठी माणूस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडलेला असतो.

‘ग्यानबा तुकाराम’ या मंत्राप्रमाणे ‘शिवाजी महाराज की जय’ या मंत्रानेही मराठी माणूस भारलेला असतो. ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी या नावांमध्ये अशी कोणती बरे जादू आहे? वास्तविक ही तुमच्या-आमच्यासारखीच हाडामांसाची माणसे. पण त्याहीपलीकडे कालच्या आणि आजच्या मराठी समाजाला व्यापून राहिलेल्या सांस्कृतिक बंधुभावाची ती महान प्रतीके आहेत. अशा प्रतीकरूप व्यक्तीच्या निव्वळ चरित्रांमधून इतिहास घडत नाही. खरं तर अशा व्यक्तींनी ज्या समाजाचे प्रतिनिधित्व केले, त्या समाजाची सर्वांगीण कथा म्हणजे इतिहास.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

इतिहासाचा विलक्षण अभिमान, हे मराठी माणसाचे खास वैशिष्ट्य आहे. पण असा अभिमान बाळगणाऱ्या असंख्य मराठी माणसांना शिवबा, तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या आधीसुद्धा महाराष्ट्राला काही अर्थपूर्ण इतिहास होता, याची जाणीव नसते. आपण हे विसरतो की, ‘ज्ञानेश्वरी’ हा मराठी साहित्याचा आरंभबिंदू नसून, तो एका सांस्कृतिक प्रक्रियेचा कळसबिंदू होता आणि शिवाजी हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा आरंभबिंदू नसून, तो एका मोठ्या ऐतिहासिक प्रक्रियेचा कळसबिंदू होता.

महाराष्ट्रात सुमारे एक ते दीड लाख वर्षांपूर्वीपासूनच्या मानवी अस्तित्वाचे सलग पुरावे उपलब्ध आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासात महत्त्वाचा मानला गेलेला शेतीचा टप्पा महाराष्ट्रात सुमारे ४००० वर्षांपूर्वी सुरू झाला. महाराष्ट्रातील अतिप्राचीन संस्कृतीचा अर्थपूर्ण आविष्कार घडला तो ताम्रपाषाणयुगात. इ.स.पू. २००० ते १००० असा त्याचा एक सहस्रकाचा कालखंड सांगता येईल. या काळात मराठी संस्कृतीला नव्हे, तरी महाराष्ट्राच्या प्रादेशिकतेला आकार येऊ लागला. ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीनंतरच्या काही शतकांच्या इतिहासासाठी मुख्यतः पुराणकथांवर अवलंबून राहावे लागते. उदा जनस्थान, पंचवटी, दण्डकारण्य वगैरेंचे माहात्म्य आहे, ते याच काळाच्या संदर्भात. सातवाहनांपासून यादवांपर्यंत विविध राजवटींच्या एक दीड सहस्रकात महाराष्ट्र-जीवनाला खरा आकार प्राप्त झाला. या काळात लेणी, मंदिरे, शिल्पकाम, चित्रकाम, लोकसाहित्य, प्राकृत ग्रंथ, धार्मिक पंथोपपंथ यांची केवढी तरी रेलचेल आढळते. यादव काळात मराठी समाजाची कितीतरी वैशिष्ट्ये आणि वैगुण्येसुद्धा आकाराला आली.

अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीपासून (इ.स. १२९४) महाराष्ट्राच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाले. दिल्लीची सुलतानशाही व पुढे मुघलशाही, दक्षिणेतील मुस्लीम राजवटी, विशेषत: निजामशाही, आदिलशाही व कुतुबशाही यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वर्चस्व गाजवले. काही मुस्लीम राज्यकर्ते आणि सूफी संत यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला अर्थपूर्ण योगदान दिले. यानंतरचा शिवकालापासून आजपर्यंतचा इतिहास आपल्याला बराचसा ज्ञात असतो.

चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याच्या काळात चिनी प्रवासी ह्यु एन त्संग याने महाराष्ट्राला भेट दिली. (इ.स. ६४१) त्या वेळी ह्यु एन त्संगाने केलेले महाराष्ट्रवर्णन आजही फार अर्थपूर्ण वाटते- “या भागातील जमीन सुपीक असून मशागतीखाली आहे. हवामान उष्ण आहे. लोक धाडसी, उमदे, परंतु प्रामाणिक आणि साधे आहेत. विद्याभ्यासाचे ते चाहते आहेत. उपकारकर्त्याचे उपकार ते कधीही विसरणार नाहीत. मदतीसाठी हात पुढे केला, तर ते जरूर धावून येतील. परंतु कोणी अपमान केला तर प्राणाची तमा न बाळगता ते त्याच्यावर सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत. नि:शस्त्र माणसावर तो बेसावध असताना ते कधीही हल्ला करणार नाहीत. ज्याच्यावर हल्ला करावयाचा आहे, त्याला ते अगोदर पूर्वसूचना देतील. त्याचप्रमाणे त्याला शस्त्रसज्ज होण्यास वेळ देतील. नंतरच त्याच्याशी चार हात करतील. पळणाऱ्या शत्रूचा ते पाठलाग करतील, पण शरणागताला उदार मनाने अभय देतील.”

महाराष्ट्राच्या मातीचा ह्यू एन त्संगाने सांगितलेला स्वभावधर्म मोठा मार्मिक आहे. ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेद ऐसे।।’ या तुकारामांच्या सतराव्या शतकातील उक्तीत आणि ‘राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा । नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा।।’ या गोविंदग्रजांच्या विसाव्या शतकातील वर्णनातसुद्धा हा स्वभावधर्म प्रत्ययाला येतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे ऐतिहासिक वैशिष्ट्य नमूद करण्याजोगे आहे. महाराष्ट्र ही उत्तर भारत व दक्षिण भारत यांच्यामधील भौगोलिक आणि सांस्कृतिक संयोगभूमी आहे. याचा प्रत्यय अगदी ताम्रपाषाणयुगातसुद्धा येतो. हडप्पा संस्कृतीच्या संधिकालात त्या संस्कृतीची धावरी वेल गुजरातमार्गे ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्रात पोहोचल्याचे दाखले पुरातत्त्वशास्त्र देते. इनामगाव येथील ताम्रपाषाणयुगीन अवशेषांवरून उत्तरेकडील माळवा संस्कृती आणि दक्षिणेकडील ब्रह्मागिरी संस्कृती यांची विलक्षण सरमिसळ तेथे झाल्याचे दिसून येते. तसेच प्राचीन काळी नाग, मंड, भिल्ल इ. मूळच्या वन्य जमाती, उत्तरेकडून आलेले आर्य, शक, हूण, समुद्रमार्गे आलेले यवन आणि दक्षिणेकडून आलेले द्रविडजन या सर्वांच्या संमिश्रणातून ‘मऱ्हाटे’ लोकांचा उदय झाला आणि महाराष्ट्र ही विविध संस्कृतीची संयोगभूमी ठरली.

हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्माची लेणी वेरूळला कशी एकत्र नांदतात, हे बघण्याजोगे आहे. ‘हिंदू तुर्क संवाद’ हे एकनाथांचे भारुड, शेख महमंद यांचा ‘योगसंग्राम’ हा ग्रंथ आणि जिझिया कराच्या निषेधार्थ औरंगजेब बादशहाला शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातील धर्मसहिष्णुतेची उदात्त भाषा म्हणजे महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लीम समन्वयवादाची उत्तुंग शिखरे होत. अनेकांना ज्याची कल्पना नसते, अशी एक अर्थपूर्ण गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. पंधराव्या शतकाच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या ‘गुरुचरित्रा’त ‘महाराष्ट्रधर्म’ या शब्दाचा प्रथमच जो वापर केला गेला, तो बीदरच्या मुस्लीम राज्यकर्त्यांच्या गौरवार्थ. ‘विविधतेतील एकता’ आणि ‘एकतेतील विविधता’ या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यांचा प्रत्यय महाराष्ट्रात विशेषत्वाने येतो. महाराष्ट्राची शतकानुशतकांची समावेशकता आजही मोठ्या प्रमाणात टिकून आहे.

इतिहास आता जरा बाजूला ठेवू आणि महाराष्ट्रातील इतिहास-लेखन आणि इतिहास-भान यांचा थोडा विचार करू. महाराष्ट्राच्या इतिहासाचा पट भव्य आहे. पण मराठी माणसाचे इतिहास-भान प्राधान्याने मराठ्यांच्या इतिहासाभोवती (१६३०- १८१८) केंद्रित झालेले असते. असे का व्हावे? संत चळवळीचा अपवाद वगळता शिवपूर्वकालीन इतिहासात मराठी माणसाला फारसा रस नसतो. जणू काही तो सारा इतिहास हा आमचा अनौरस इतिहास आहे!

या मानसिकतेचे मुख्य रहस्य आमच्या इतिहासलेखनपरंपरेत आहे. इतिहासलेखनाचे शास्त्र आम्ही पाश्चात्त्यांकडून आत्मसात केले. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी इतिहासलेखनाचा प्रतिवाद करणारा राष्ट्रवादी इतिहासलेखनप्रवाह जरी उफाळून आला, तरी त्यावरील पाश्चात्त्यांचे मूळ संस्कार मिटले नाहीत. त्यामुळे ‘राष्ट्र’ या महासंकल्पनेभोवती गुंफलेले तपशीलनिष्ठ अस्मितावादी राजकीय इतिहासलेखनच आम्ही प्राधान्याने करत राहिलो.

भारत हा विविधतेने नटलेला खंडप्राय देश असल्याने आमचा राष्ट्रवाद प्रादेशिकतेच्या मुशीतून साकारत गेला. स्वाभाविकपणे प्रादेशिक अस्मितेभोवती आमचे इतिहासलेखन घोटाळत राहिले. त्यातून पुन्हा ब्रिटिशांचे भारतातील सत्ताग्रहण मराठ्यांना पराभूत केल्यावरच खऱ्या अर्थाने साकार झाले होते. त्यामुळे मराठ्यांच्या अस्मितेवर विलक्षण आघात झाला होता. एकोणिसाव्या शतकभर चाललेल्या नव्या अस्मितेच्या जडणघडणीत इतिहास हे सांस्कृतिक हत्यार विशेष महत्त्वाचे ठरू लागले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘मराठ्यांचा इतिहासाची साधने’ या ग्रंथमालेच्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत (१८१८) इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात उफाळून आलेल्या ‘इतिहासविषयक आस्थेच्या लाटे’चा निर्देश केला होता. ही लाट प्राधान्याने मराठ्यांच्या इतिहासासंदर्भातील होती. नव्या राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरक ठरणारा महाराष्ट्राच्या इतिहासातील राष्ट्रसदृश घटक मुख्यत: शिवरायांचे स्वराज्य हाच होता. हे स्वराज्य म्हणजे मध्ययुगीन चौकटीतील राष्ट्रवादाचे फलित होते. ‘स्वराज्य’ अथवा ‘नूतन सृष्टी’ शिवरायांनी निर्माण केली असली तरी तिला जीवनरस पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य मध्ययुगीन महाराष्ट्रातील संतचळवळीने केले होते.

मराठी भाषाभिमानाने या राष्ट्रवादी जीवनरसाला दाटपणा प्राप्त करून दिला होता. महानुभावांनी जाणीवपूर्वक केलेला मराठीचा वापर, ज्ञानदेवांनी उच्चारलेली अमृतातेही पैजा जिंकण्याची भाषा, ‘संस्कृतवाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासोनी झाली?’ हा एकनाथांचा रोकडा सवाल, फादर स्टीफनकृत मराठी प्रशस्ती आणि शिवाजी महाराजांनी तयार करवून घेतलेला ‘राज्यव्यवहारकोश’ ही सारी तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतची मराठीविषयक अभिमान जागृतीची परंपरा ऐतिहासिक महत्त्वाची आहे.

‘महाराष्ट्रा’चे नामोल्लेख कितीही प्राचीन असले, तरी त्यातील ‘राष्ट्र’त्त्वाची पहिली जडणघडण संतचळवळ व शिवकार्यातून झाली. त्याआधीचा इतिहास कितीही वैभवशाली असला तरी तो झगमगाट नव्या अस्मितेच्या उभारणीला फारसा उपयोगी नव्हता. त्यामुळे आधुनिक काळात जरी त्या इतिहासावर संशोधन झाले, ग्रंथलेखन झाले, अभ्यासक्रमांमधून तो इतिहास शिकवला गेला, तरी आमच्या इतिहासविषयक मानसिकतेला व्यापून टाकले, ते मात्र संतचळवळीने आणि मराठ्यांच्या इतिहासाने. आमची नवी अस्मिता घडवण्याच्या कामी उजाळा दिला गेला, तो प्रामुख्याने या इतिहासाला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या ‘महाराष्ट्रगीता’तील (१९२७) ओळी या दृष्टीने मोठ्या अन्वर्थक आहेत.

विक्रम वैराग्य एक जागि नांदती

जरीपटका भगवा झेंडाही डोलती

धर्म राजकारण समवेत चालती

शक्ती युक्ती एकवटूनि कार्य साधिती

पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...

यातील ‘विक्रम-वैराग्या’बाबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. मध्ययुगीन मराठी संतांचे वैराग्य' म्हणजे जीवनपराङमुखता नव्हती. ‘विवेकासहीत वैराग्याचे बळ’ ही तुकारामांची धारणा महत्त्वाची होती. धर्म-जाती-लिंग या बाबतीतील भेदभावांचा संतांच्या मांदियाळीत झालेला लोप, लोकभाषेचा व लोकव्यवहारातील छंदांचा त्यांनी केलेला वापर, ज्ञानाची कवाडे स्त्री-शूद्रांना खुली करण्याची त्यांची दृष्टी, त्यांचा उदार, मानवतावादी व सात्त्विक उपदेश; द्वैताद्वैत, सगुण-निर्गुण, शैव-वैष्णव, हिंदू-मुस्लीम, पंडिती-जानपद परंपरा या प्रकारच्या वादांपलीकडे पोहोचणारा त्यांचा समन्वयवाद; ‘अवघे देखे जन ब्रह्मरूप’ (तुकाराम) आणि ‘प्रपंच करावा नेटका’ व ‘महाराष्ट्रधर्म वाढवावा’ (रामदास) या प्रकारची दृष्टी या सर्वांमुळे संतचळवळीने मध्ययुगीन महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण केले आणि व्यापक पायावर मराठी अस्मितेची उभारणी केली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शिवाजी महाराजाचा विक्रम हा केवळ असामान्य धाडसापुरता मर्यादित नव्हता. एकतर आपली विक्रमशीलता त्यांनी मराठी समाजात संक्रमित केली. दुसरे असे की, त्यांच्या स्वराज्यातील ‘स्व’ हा शिवाजी नावाच्या व्यक्तीपुरता सीमित नव्हता. त्यामुळे राजेशाहीचा लोककल्याणकारी आविष्कार शक्य झाला. शिवाजी महाराजांचे राज्य म्हणजे सरंजामशाही संधिसाधूपणाचा व्यक्तिगत खेळ नसून, तो मध्ययुगीन प्रादेशिक राष्ट्रभावनेचा प्रभावी आविष्कार होता. शौर्य, धैर्य, मुत्सद्दीपणा, दूरदृष्टी, स्त्रीदाक्षिण्य, धर्मसहिष्णूता, लोकहितदक्षता यांसारख्या गुणसमुच्चयामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य हा एक सामाजिक दिलासा ठरला. ‘मुद्रा भद्राय राजते’ हे शिवमुद्रेतील ब्रीद आणि ‘जाणता राजा’ व ‘बहुत जनांसि आधारू’ ही रामदासकृत शिवप्रशस्ती म्हणजे निव्वळ कविकल्पना नव्हती. तर त्यांना वास्तवाचा आधार होता. संतचळवळीची सहिष्णुता टिकवून शिवाजी महाराजांनी तिला जयिष्णुतेची जोड दिली.

भारतीय परंपरेचे भान राखून आणि संतांनी निर्माण केलेले मराठी सत्त्व टिकवून इस्लामी संस्कृतीसुद्धा त्यांनी आत्मसात केली. अशा रितीने काळाची नस पकडता येणे, हे महापुरुषाचे एक महत्त्वाचे लक्षण असते. इतिहासकार शेजवलकर जेव्हा असे म्हणतात की, “शिवाजीच्या अंगी मुसलमानी संस्कृती संपूर्ण बिंबली होती, फक्त त्यांचे मन हिंदू राहिले होते.” तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत असावे.

मराठी माणसाच्या जडणघडणीच्या दृष्टीने आणखी एक घटक लक्षात घ्यायला हवा. शिवशाहीच्या तुलनेत पेशवाईचा उणेपणा अनेकांनी मांडला आहे. तो गृहीत धरूनसुद्धा अठराव्या शतकातील मराठ्यांच्या सत्ताविस्तारामुळे गतिशीलतेच्या ज्या क्षमता मराठी समाजात निर्माण झाल्या, त्यांचे भावी आधुनिकतेशी जैविक नाते होते. मराठ्यांची राजकीय धुरिणत्वाची दृष्टी, नव्या प्रशासकवर्गाचा उदय, मर्यादित का होईना, नव्या उत्पादक शक्तीचा उदय, शाहिरी वाङ्मयाला आलेला फुलोरा इत्यादी गोष्टींची पुरेशी सामाजिक आर्थिक मीमांसा आपण करत नाही. पण ती मीमांसा केली तर अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील सातत्य-बदलांचे नाते अधिक स्वच्छपणे उलगडू शकते.

मराठी माणसाच्या ऐतिहासिक जडणघडणीत एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन आणि विसाव्या शतकातील सामाजिक, आर्थिक, राजकीय चळवळी व घडामोडी यांचे स्थानही महत्त्वाचे आहे. सामाजिक संबंधांच्या व संस्थांच्या लोकशाहीकरणाची दृष्टी या काळात विकसित होत गेली. तसेच अभिजन नेतृत्वाकडून बहुजन नेतृत्वाकडचा अर्थपूर्ण प्रवास विशेषतः विसाव्या शतकात घडून आला. सामाजिकदृष्ट्या उदार आणि भौतिकदृष्ट्या प्रगतिशील, अशी महाराष्ट्राची जी प्रतिमा आधुनिक युगात निर्माण झाली, ती मुख्यतः एकोणिसाव्या विसाव्या शतकातील मंथनामुळे. अर्थात मुळात त्यावर मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा जो प्रभाव पडला पडला होता, तो विसरून चालणार नाही. त्याबाबत नमुन्यादाखल काही उल्लेख केले तरी पुरे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकातील सुधारकांनी अभंग, ओवी, पोवाडा, भजन, कीर्तन यांचा जाणीवपूर्वक वापर केल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. परस्परविरोधी विचारांचे तंबू ठोकलेल्या सर्वांमध्ये (उदा. एकोणिसाव्या शतकातील फुले-चिपळूणकरांमध्ये, आताच्या साम्यवादी-हिंदुत्ववाद्यांमध्ये) शिवाजी महाराजांविषयीच्या प्रेमाचे समान सूत्र हमखास आढळते. भक्ती चळवळीच्या ऐतिहासिक अन्वयार्थाबाबत न्या.म. गो. रानडे यांचा ‘राइज ऑफ द मराठा पॉवर’ (१९००) हा ग्रंथ सर्वज्ञात आहे, पण त्यांची ‘धर्मपर व्याख्याने’ (१९०२)सुद्धा या दृष्टीने वाचण्याजोगी आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतसुद्धा मध्ययुगीन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक प्रेरणा प्रकर्षाने जाणवतात. आधुनिक मराठी साहित्यावर व संस्कृतीवर संत तुकाराम यांचा केवढा प्रभाव आहे, याचा अप्रतिम वेध डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या ‘तुकाराम दर्शन’मध्ये (१९९६) घेतलेला आहे. त्यांचा निर्देश केल्यावर अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही.

वर उल्लेख केलेल्या मध्ययुगीन महाराष्ट्राचा प्रभाव ही एक सर्वव्यापी वस्तुस्थिती असली तरी या प्रभावाचे स्वरूप स्थल, काल, व्यक्ती, संस्थापरत्वे बदलत गेले, हे मात्र विसरता कामा नये. उदात्त आणि विकृत अशी दोन्ही टोकेसुद्धा या प्रभावाने गाठल्याची साक्ष वेळोवेळी मिळालेली आहे. हा प्रभाव जरी बहुजनांपर्यंत झिरपलेला असला तरी त्याची माध्यमे दीर्घकाळ आणि मुख्यतः अभिजनांच्या हाती राहिली. किंबहुना इतिहासलेखन आणि साहित्यनिर्मिती ही सांस्कृतिक व्यवहार म्हणजे महाराष्ट्रातील अभिजनवर्गाच्या धुरिणत्वाची साधने होती. म.जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्यांच्या विचारांत आणि कार्यात या धुरिणत्वाला धक्के देण्याचे सामर्थ्य होते. मात्र सत्यशोधक, ब्राह्मणेत्तर वा दलित चळवळींनासुद्धा सरंजामशाहीच्या, मध्यमवर्गीयत्वाच्या वा पुरुषशाहीच्या कोंडाळ्यांनी ग्रासले नाही, असे नाही.

साठोत्तरी कालखंडात महाराष्ट्रातील अभिजन वर्चस्वाला जोरदार धक्के बसू लागले. इतिहास व साहित्य या उभय क्षेत्रांमध्ये त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ, आपल्या धुरिणत्वाला ग्रहण लागल्याच्या शल्यातून अभिजनांना जे भावनिक कढ येऊ लागले आणि त्यांच्या वैफल्यग्रस्तेतून जो सांस्कृतिक पलायनवाद उद्भवू लागला, त्याची परिणती म्हणजे ऐतिहासिक कादंबऱ्यांची आणि त्यांच्या लोकप्रियतेची लाट होय. साठोत्तरी काळात महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यवहारांचे लोण अभिजन केंद्रापासून बहुजन परिघाकडे पसरू लागले. स्त्रीसाहित्य, ग्रामीणसाहित्य, कामगारसाहित्य, दलितसाहित्य, आदिवासीसाहित्य यांसारख्या प्रवाहांमुळे ढवळून निघाले. साऱ्या सर्जनशील आविष्कारांमध्ये बहुविधता आणि विद्रोह यांचा प्रत्यय येऊ लागला. मात्र हा विद्रोह उफाळून येत असताना महाराष्ट्राच्या समाजजीवनातील व्यामिश्रता वाढत गेली. त्याचे काही दुष्परिणाम झाले.

एकोणिसाव्या शतकापासून संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीपर्यंत महाराष्ट्रातील प्रादेशिक अस्मितेचा राष्ट्रीय अस्मितेशी चांगला मेळ होता. ‘भव्य हिमाचल तुमचा अमुचा, केवळ माझा सहाकडा’ या वसंत बापटांच्या कवितेतूनसुद्धा तो मेळ व्यक्त होतो. परंतु भारतीय स्वातंत्र्यप्राप्ती आणि संयुक्त महाराष्ट्रनिर्मिती या दुहेरी ध्येयपूर्तीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत ध्येयहीन संकुचित प्रादेशिकतावाद फोफावत गेला आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी इतिहासाचा वापर केला गेला. नवनव्या आर्थिक ताणांनी उद्भवलेल्या विषम समायोजनापोटी सामाजिक दुरिते पोसणाऱ्या संरक्षक यंत्रणा महाराष्ट्रात बळावू लागल्या. दांभिक राजकारणाचे आणि कृतक सुधारणावादाचे पेव फुटले. जातिद्वेष पद्धतशीरपणे पोसला गेला. जागतिकीकरण, उदारीकरणाच्या लाटेत तर भणंगीकरण व उठवळीकरणाला अधिकच चालना मिळाली. उदार व पुरोगामी प्रतिमा असलेल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये ‘वैचारिक अस्पृश्यता’ वाढत गेली. संवाद टाळण्याच्या प्रवृत्तीतून विसंवाद वाढू लागले. चिंतेची बाब अशी की, पुरोगाम्यांमध्येसुद्धा ही वैचारिक अस्पृश्यता वाढीस लागली.

या साऱ्या पार्श्वभूमीवर इतिहास हे संकुचित शक्तीच्या हातातील खेळणे बनू लागले. दलित वा आदिवासी यांच्यावरील सामुदायिक हल्ल्यात किंवा हिंदू-मुस्लीम दंगलीत प्रतिगामी शक्तींनी ‘शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्याची उदाहरणे आहेत. ऐतिहासिक उत्सवांना भडक, भावूक आणि व्यक्तिपूजक स्वरूप प्राप्त झाले. इतिहासाचे विकृतीकरण आणि महापुरुषांचे अपहरण घडू लागले. मराठ्यांचा इतिहास असो वा आधुनिक समाज सुधारणांचा इतिहास असो, ज्या भावूक पद्धतीने त्याकडे पाहिले जाते, त्यामुळे भटाची नाहीतर भाटाची भूमिका आम्ही वठवतो असे वाटू लागते. फॅसिस्ट विचारसरणीला इतिहास मोठे बळ पुरवू शकतो, याचा प्रत्यय साठोत्तरी महाराष्ट्रात वेळोवेळी येत गेला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दीर्घकाळ काही विशिष्ट पक्ष व संघटनांवर फॅसिस्टत्वाचा शिक्का मारता येत होता. अलीकडच्या महाराष्ट्राला मात्र सर्वपक्षीय फॅसिस्टत्वाचा जातिनिष्ठ ऑक्टोपस ग्रासू लागला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इतिहासविषयक बिघडत्या मानसिकतेबद्दल इतिहासक्षेत्रातील विद्वान असहाय बघ्याची भूमिका पार पाडत आले. किंबहुना संशोधकीय इतिहास आणि लौकिक इतिहास यामध्ये प्रचंड दरी पडली. ती सांधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न फारसे झालेच नाहीत. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही इतिहासलेखन उदंड केले, पण इतिहासविषयक चिंतन मात्र चिंताजनकरीत्या कमी केले.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता त्र्यं. शं. शेजवलकरांच्या ‘महाराष्ट्राच्या मानगटीचा समंध’ (१९४०) या जुन्या लेखाची आठवण येते. या लेखाच्या प्रारंभी शेजवलकर म्हणतात, “महाराष्ट्राला एक जबरदस्त भूत, फार मोठा समंध बाधत आहे. त्याचे नाव इतिहास... इतिहास माणसाला शहाणा करतो असे बेकन समजत होता. पण आज इतिहास माणसाला पागल बनविताना दिसत आहे.”

१९४०मधील ही विधाने एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीसुद्धा जशीच्या तशी लागू पडणारी आहेत. ज्या इतिहासातून मराठी माणसाची जडणघडण झाली, त्या इतिहासाकडे अधिक निकोप, चिकित्सक व विधायक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. अन्यथा, शेजवलकर म्हणतात तसे इतिहासाच्या क्षीराऐवजी दुरभिमानाचे काळेकुट्ट ‘नीर’च हाती येणार. स्वातंत्र्योत्तर मराठी संस्कृतीची आणि साहित्याची समाजशास्त्रीय चिकित्सा करताना या ‘नीरक्षीर’विवेकाचा अनुबंधसुद्धा महत्त्वाचा ठरेल. पण तशा सविस्तर व सोदाहरण चिकित्सेसाठी एक स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल. तूर्त या लेखप्रपंचावर समाधान मानणे भाग आहे.

‘मोहरा महाराष्ट्राचा’ - संपा. रमेश अंधारे

ग्रंथाली, मुंबई | पाने - ६४४ (मासिक आकार) | मूल्य - १५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......