शिरीष घाटे यांची मुखपृष्ठे अवचटांशी नातं सांगतात. इलस्ट्रेशन आणि पेंटिंग यांच्या सीमारेषेवर असणारी चित्रशैली आणि साहित्याची उत्तम जाण ही घाटे यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत
ग्रंथनामा - आगामी
दीपक घारे
  • ‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 30 May 2022
  • ग्रंथनामा आगामी पुस्तकांच्या चित्रवाटा Pustakanchya Chitravata शिरीष घाटे Shrish Ghate

मराठीतील एक प्रसिद्ध मुखपृष्ठकार व चित्रकार शिरीष घाटे यांनी गेल्या ४० वर्षांत मराठीतल्या अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं केली आहेत. त्यात अनेक नामवंत प्रकाशनसंस्था आणि नामवंत लेखकांचा समावेश आहे. या मुखपृष्ठांपैकी काही निवडक मुखपृष्ठांचे ‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ हे संपूर्ण रंगीत पुस्तक नुकतेच ग्रंथालीने प्रकाशित केले आहे. येत्या चार जून रोजी सोलापुरात भगवान चव्हाण आणि गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होतेय. त्यानिमित्ताने या पुस्तकाला ज्येष्ठ कलासमीक्षक प्रा. दीपक घारे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

..................................................................................................................................................................

मराठी साहित्यामध्ये सोलापूरला एक वेगळं स्थान आहे. द.रा. बेंद्रे, त्र्यं.वि. सरदेशमुख अशा थोर लेखकांपासून आजच्या नीतीन वैद्य सारखे संपादक आणि ‘आशय’ परिवारासारख्या साहित्यप्रेमी रसिकांच्या साहित्यिक उपक्रमांमुळे सोलापूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिरीष घाटे यांच्या चित्रकारितेचा त्यात मोठा वाटा आहे. ‘चित्रकारिता’ असं मी म्हणतो, कारण घाटे मुखपृष्ठकार म्हणून सर्वांना माहीत असले तरी त्यांची मूळ प्रकृती चित्रकाराची आहे. साधारणपणे १९८० पासून गेली चाळीस वर्षे ते पुस्तकांची मुखपृष्ठे करत आहेत. ह.वि.मोटे प्रकाशनापासून ते रा.ज.देशमुख, राजहंस, मनोविकास अशा अनेक ख्यातनाम प्रकाशकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. सोलापूरचं सुविद्या प्रकाशन हे तर घरचंच प्रकाशन असल्यामुळे सर्वाधिक मुखपृष्ठे त्यांनी सुविद्यासाठी केलेली आहेत.

यातील पुस्तकं आणि लेखक यांचे विषय आणि लेखनशैली पाहिली तर त्यांची विविधता आणि घाटे यांनी शोधलेली दृश्यभाषा तितकीच विविधरूपी आहे. त्यात वास्तव चित्रण आहे, प्रतीकात्मता, अमूर्तता आणि चिन्हात्मकताही आहे. थोडक्यात सांगायचं तर पुस्तकाचा आशय चित्रभाषेत सांगण्याची त्यांची धडपड आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मराठीला मुखपृष्ठ चित्रकारांची मोठी परंपरा आहे. दलाल, मुळगांवकरांपासून सुभाष अवचट, चंद्रमोहन आणि रविमुकुल अशा समकालीनांपर्यंत चित्रभाषा समृद्ध झालेली आहे. त्यात घाटे यांची मुखपृष्ठे अवचटांशी नातं सांगतात. इलस्ट्रेशन आणि पेंटिंग यांच्या सीमारेषेवर असणारी चित्रशैली आणि साहित्याची उत्तम जाण ही घाटे यांच्या कामाची वैशिष्ट्ये आहेत. ‘आशय’ दिवाळी अंकासाठी केलेली मुखपृष्ठे ही खरं तर रचनाचित्रं अथवा पेंटिंग्ज आहेत. मुखपृष्ठं करताना पुस्तकाच्या आशयाचं बंधन असतं. पण दिवाळी अंकाची मुखपृष्ठं करताना घाटे यांनी अधिक स्वातंत्र्य घेतलेलं आहे.

या पुस्तकात क्रम आहे तो प्रकाशनानुसार. म्हणजे रा.ज. देशमुख आणि कंपनीसाठी केलेली मुखपृष्ठं, मग दिलीपराज प्रकाशनाची अशी मांडणी केलेली आहे. काळानुसार त्यांची मांडणी केलेली नाही. तशी असती तर चित्रकाराचा प्रवास कळला असता. पण एकूणच घाटे यांच्या चित्रशैलीत फारसे बदल झालेले दिसत नाहीत. विविधता आहे पण एकाच कालखंडात ते विविध शैली हाताळताना दिसतात.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, चित्रकलेचं औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. त्या अर्थाने ते स्वयंशिक्षित चित्रकार आहेत. त्यांची प्रेरणा साहित्य आणि कविता हीच राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या रेषेत आणि लयबद्ध रचनेत एक प्रकारची काव्यात्मता आपोआपच आलेली आहे.

‘मुखपृष्ठ चित्रकाराला साहित्यकृतीमधील आशय, प्रकाशकासाठी विक्रीयोग्यता आणि चित्रकलेतील तत्त्वांचा तोल अशा तिहेरी बिकट पेचामधून चित्रनिर्मिती करायची असते’, असं घाटे यांनी सांगितलं आहे ते योग्यच आहे. चित्रकार आपल्या परीने पुस्तकाचा अन्वयार्थ लावत असतो आणि चित्ररूपात मांडत असतो. त्यासाठी लेखकाने, प्रकाशकाने चित्रकाराला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सुदैवाने घाटे यांनी कामाला सुरुवात केली, त्या काळात नुसत्या देखण्या मुखपृष्ठापेक्षा संकल्पनात्मक मुखपृष्ठ मांडणीला सुरुवात झाली होती. आजही मुखपृष्ठांच्या बाबतीत सजावट हा शब्द वापरला जातो. तो अत्यंत चुकीचा आहे. कारण मुखपृष्ठ किंवा आतील मांडणी व चित्रे म्हणजे पुस्तकाच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असतो. ते चित्रप्रतिमांच्या आधारे केलेलं एक भाष्य असतं. चांगलं मुखपृष्ठ हे सुरुवातीला वाचकाचं लक्ष वेधून घेतं आणि पुस्तक वाचून झाल्यावर ते अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं.

या संग्रहात एका चित्रकाराची मुखपृष्ठे एकत्रितपणे पाहायला मिळताहेत. शिवाय त्याने केलेल्या मुखपृष्ठांमागची निर्मितिप्रक्रिया थोडक्यात नोंदवलेली आहे. त्यातून घाटे यांची विचार करण्याची पद्धत, त्यातून गवसलेल्या दृश्य प्रतिमा, रंग-रेषांच्या माध्यमाची केलेली निवड आणि प्रत्यक्ष मुखपृष्ठ अशी एक रंजक मैफल तयार होते. सर्वसाधारण वाचकाला त्यातून मुखपृष्ठ बघावं कसं हे कळेल, तर कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्मितीचा बोध होऊ शकेल.

एका वेगळ्या पातळीवर या मुखपृष्ठांमधून गेल्या चाळीस वर्षांमधल्या साहित्यरूपाचा आणि बदलत्या दृक्-संवेदनशीलतेचा, तिच्या वैशिष्ट्यांचा प्रत्यय येऊ शकेल. उदाहरणादाखल या पुस्तकातील ‘मृगजळातील नौका’ हे पहिलं मुखपृष्ठ आणि ‘नट, नाटक आणि आपण’ हे मुखपृष्ठ पाहावं, दोन्ही प्रतीकात्मकच आहेत. पण पहिल्या मांडणीमध्ये नवखेपणा आहे, अक्षरमुद्रण पद्धतीच्या मर्यादा आहेत, तर दुसऱ्यात प्रतीकं अधिक प्रगल्भ आणि अर्थपूर्ण बनली आहेत. अवकाश अधिक बोलका बनला आहे. मुखवट्यांमुळे त्यातलं नाटकाचं आभासी जग जिवंत होतं आणि मुखवट्याच्या तिरप्या किंचित विरूपात्मकतेमुळे सत्य आणि नाट्यरूप यांच्यातला सूक्ष्म फरक अधोरेखित होतो. यालाच मी बदलती संवेदनशीलता असं म्हणतो.

घाटे यांनी लेटरप्रेस, ऑफसेट, डिजिटल अशा बदलत्या मुद्रणपद्धतींचा कलात्मक उपयोग करून घेतला आहे. ‘वि.स.खांडेकर : विचारधारा’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाची साचेबद्ध मांडणी आणि ‘कोसळेपर्यंत’चं अमूर्त शैलीतील मुखपृष्ठ हा प्रवास देखील घाटेंच्या आणि वाचकांच्या बदलत्या संवेदनांचा द्योतक आहे.

त्र्यं.वि. सरदेशमुख यांच्या ‘कविता चंद्रकेतूची आणि उत्तररात्र’ या कवितासंग्रहासाठी घाटे यांनी एक निसर्गचित्र केलं होतं. सरदेशमुख यांनी त्यातला रंगसंगतीचा घोटाळा नेमका सांगितला. पहाटे उठून उत्तररात्रीचे सूर्योदयापूर्वीचे रंग निरखायला सांगितले आणि मग घाटेंनी तो मूड अचूक टिपणारं चित्र पुन्हा केलं. घाटे यांची चित्रं पूर्ण वास्तववादी कधीच नसतात. पण वास्तवाचं अचूक निरीक्षण अनुभवापलीकडची अनुभूती येण्यासाठी किती आवश्यक असतं, याचा वस्तुपाठच या प्रसंगातन मिळतो.

चित्रशैलीचा विचार करताना अनुकरण करून चालत नाही, तर आशयानुरूप ती नव्याने घडवावी लागते. अरुण गद्रे यांच्या कादंबऱ्यांचे आणि लेखनाचे विषय मुळातच अतिशय वेगळे असतात. त्याला अनुरूप अशी शैली इथे दिसते. ‘एक होता फेंगाड्या’ या आदिमानवाच्या काळातील कादंबरीसाठी घाटे यांनी काळ्या पार्श्वभूमीवरील रेखाचित्रांचा उपयोग केला आहे. यासाठी के.के. हेब्बर यांच्या रेखाचित्रांची शैली प्रकाशकांनी सुचवली होती. घाटे यांनी रेषेचा वापर त्याप्रमाणे केला असला, तरी त्यांची रेषा हेब्बरांच्या तरल प्रवाही रेषेपेक्षा आणि प्रत्यक्ष गुहाचित्रांच्या रांगडेपणापेक्षा वेगळी आणि दोन्हीचा समतोल साधणारी आहे. उपयोजित चित्रकाराला संदर्भचित्रांचा (references) आधार घ्यावा लागतो, पण प्रतिभेच्या बळावर तो त्याचं रूपांतर एका स्वतंत्र अर्थवाही प्रतिमेत करतो. ‘गिलगमेश’चं मुखपृष्ठ याचं उत्तम उदाहरण आहे.

घाटे यांच्या बहुतेक मुखपृष्ठांची शैली (Treatment) ही इलस्ट्रेशनला जवळची असते. मानवी चेहरे अथवा मानवाकृती त्यांच्या चित्रांमध्ये असतात. बरेच वेळा चित्र अमूर्त पण एखाद्या छोट्याशा मानवाकृतीने त्याला ‘अर्थ’ दिला जातो. चित्र वाचकांना अर्थसुलभ व्हावं म्हणून तर ही युक्ती नसेल? मात्र काही अमूर्त मुखपृष्ठांमध्ये घाटे यांना ही गरज भासलेली नाही. ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हे असं एक उत्तम मुखपृष्ठ आहे. त्याची रचना एखाद्या अभिजात अमूर्त चित्रासारखी आहे. पण पुस्तकाच्या आशयाशी इमान राखणारी आहे. अनेकदा मराठी पुस्तकांवर अमूर्त चित्रं छापली जातात, पण त्यांचा आणि पुस्तकाच्या आशयाचा संबंध असतोच असं नाही. घाटे यांच्या मुखपृष्ठांबाबत असं घडत नाही ही जमेची बाजू आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

मुखपृष्ठांना साहित्य मूल्य आणि दृश्य रचनेचं मूल्य अशी दोन्ही मूल्यं असतात. शब्द आणि शब्दप्रतिमांना जसं रचनेचं तत्त्व लागू पडतं, तशी मुखपृष्ठांच्या मांडणीची रचनातत्त्वं असतात. आकार, आलंकरण आणि घाट (शेप,पॅटर्न, फॉर्म) हे रचनेचे तीन घटक आहेत, कुसुमाग्रजांच्या ‘माधवी’चं मुखपृष्ठ आलंकरण (पॅटर्न) या पातळीवर राहतं. ‘भावपेशी’चं मुखपृष्ठ पॅटर्नच्या पलीकडे जातं. कारण भावपेशीच्या आकृतीमुळे हँडमेड पेपरवरील सूक्ष्म रेषा भारित होतात आणि चैतन्यमय होतात. म्हणजेच त्याचं अर्थवाही फॉर्ममध्ये रूपांतर होतं. ‘तळभोवरा’मधील सर्पयुगुलाची प्रतिमा अशीच अनेक अर्थवाही संदर्भ घेऊन येते.

घाटे यांच्या मुखपृष्ठांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला अक्षरांचा वापर. त्यात मुद्राक्षरांचा वापर आहे, सुलेखन आहे, अक्षरांचा चिन्हात्मक वापर आहे. चित्राच्या शैलीशी संवाद साधणारे सर्जनशील सुलेखनही आहे. ‘मराठवाडी’ पुस्तकाचं अक्षरलेखन अजंठाच्या चित्रशैलीशी एकरूप झालेलं आहे. अशा वेळेस अक्षर हेच इलस्ट्रेशन होतं.

शिरीष घाटे यांच्या मुखपृष्ठांची विविधता अशी नजरेत भरते. आपल्याकडे दृश्यकलेवरचं लेखन फार थोडं आहे. मुखपृष्ठ कलेवर स्फुटलेखन थोडं फार झालेलं आहे. पण एका चित्रकाराच्या मुखपृष्ठांचा संग्रह असा प्रथमच प्रकाशित होत असावा. ग्रंथरूपाची रुची निर्माण होण्यास त्यामुळे मदतच होईल.

‘पुस्तकांच्या चित्रवाटा’ - शिरीष घाटे

ग्रंथाली, मुंबई

पाने – १९८

मूल्य – ७५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......